शोध

Submitted by भावरेखा on 10 November, 2025 - 04:10

शोध स्वतःला निसर्गात तू ऋतुचक्र मूर्तिमान
तूच पालवी वसंतातली तू शिशिराचे शुष्क पान |
तूच तडाखा ग्रीष्माचा अन् तूच गारवा हेमंता
तूच श्रावणी पर्जन्य अन् तूच आषाढी वादळवात ||१||

शोध स्वतःला संगीतात तू सप्तसुरांचा मधुर मिलाफ
तूच भूपाळी प्रात:काळी तूच निशेचा मारुबिहाग |
रागामधला स्वर पण तू अन् तूच लयबध्द ताल साकार
तूच मूर्त काव्यात्मक शब्द तूच सुरेल अमूर्त आलाप ||२||

शोध स्वतःला नर्तनात तू नटराजाचा एक अवतार
अंग वाणी यांतील सत्त्व हाच तुझा स्वरूपालंकार |
तूच अभिनय भावपूर्ण जो तूच नृत्त अन् नृत्यही
तू तुझ्यात होती नवरस साकार तूंच दिव्य कलाविष्कार ||३||

तूच शून्य अन् तूच अनंत
तूच सूक्ष्म अन् तू सर्वस्व |
शोधशील जिथे तिथे सापडे
सर्वव्यापी ते तव अस्तित्त्व ||४||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users