
दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान दक्षिण क्षितीजावर चमकणारा एक तारा लक्ष वेधून घेत असतो. अग्नेयेकडून नैऋत्येकडे संथपणे वाटचाल करणारा हा 'अगस्ती' (Canopus) नावाने ओळखला जाणारा तारा आहे. व्याधाच्या तार्यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Sirius) तारा सूर्याच्या तीनपट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे, तर 'अगस्ती' (Canopus) तारा सूर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे.
सूर्याप्रमाणेच 'अगस्ती' ताऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते अशी पुरातन काळापासून धारणा आहे. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो, या दरम्यान अगस्ती तारा दक्षिण गोलार्धात अधिक वर येऊन चमकू लागतो. मे महिन्याच्या शेवटी हा तारा हळूहळू दक्षिण दिशेला अस्त पावू लागतो. याच्या अस्तानंतरच मान्सूनची सुरुवात होते. त्यामुळे समुद्राचे पाणी पिणारा 'अगस्ती' तारा ही ओळख त्याला मिळाली असावी.
वैदिक साहित्यामधील सर्वात जुन्या समजल्या जाणार्या ऋग्वेदामध्ये 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख आढळतो. वृत्रासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर देवतांना त्रास देत होता. ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. हे बघितल्यानंतर इतर राक्षस आपला जीव वाचवून समुद्रात जाऊन लपले. राक्षस दिवसा समुद्रात लपत असत आणि रात्री समुद्रातून बाहेर येऊन देवतांना आणि ऋषींना त्रास देत असत. या जाचाला कंटाळून देवता भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णुंनी त्यांना अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवतांनी अगस्त्य ऋषींना हा प्रकार सांगितला. समुद्रात लपलेल्या या राक्षसांना मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकले. अखेरीस पाणी संपल्यानंतर लपलेल्या या राक्षसांचा देवतांनी वध करून त्यांची दहशत संपविली. ही कथा कधी ना कधी आपण ऐकली असेल.
अगस्ती ऋषींची अजून एक कथा रूढ आहे. मेरू पर्वताची उत्तुंग शिखरे पाहून विंध्य पर्वताला ईर्षा निर्माण झाली व त्याने त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. विंध्य पर्वताच्या वजनाच्या असंतुलनामुळे पृथ्वीच्या कालगणनेत फरक पडू लागला. त्यामुळे विंध्य पर्वताचा गर्व वाढू लागला, तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना साकडे घातले. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत असताना अगस्ती ऋषींना वाटेत विंध्य पर्वत लागला. अगस्ती ऋषींकडे असणाऱ्या अद्भुत सिद्धी विंध्य पर्वताला माहीत होत्या. त्यांचा आदर म्हणून विंध्य पर्वताने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी 'मी दक्षिणेतून परत येईपर्यंत' त्याला त्याच अवस्थेत राहण्याची आज्ञा केली. ते दक्षिणेतून परत येतील या आशेने विंध्याचल पर्वत रांगा अजूनही तशाच झुकलेल्या अवस्थेत वाट पाहत आहेत.
विंध्य अगस्ती कथेला एक खगोलशास्त्रीय आधार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे विंध्य पर्वताची उंची वाढली. त्याकाळी अगस्ती तारा विंध्य पर्वताची उंची वाढल्यामुळे पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या भूभागांवरून दिसेनासा झाला. हा काळ काही हजार वर्षांपूर्वीचा असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येणार्या काळात पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा तारा अगस्त्य ध्रुव (दक्षिण ध्रुव) बनेल आणि हे चक्र असेच चालू राहील.
याच 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यातून करताना दिसतात. कर्झन वायलीच्या वधानंतर इंग्लंडमध्ये सावरकरांच्या मागे ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा लागला होता. या दरम्यान ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर त्यांना 'सागरा प्राण तळमळला' हे जगप्रसिद्ध विरहगीत सुचले होते. त्याच काव्याच्या शेवटच्या कडव्यात सागराला दम देण्याच्या भाषेत ते म्हणतात, तुझ्या फेसाळलेल्या लाटेच्या आवाजाने हसून मला खिजवणार्या सागरा, तू मला परत माझ्या देशी नेशील असे वचन तू मातृभूमीला दिले होते. या आंग्लभूमीला घाबरून तू माझा वचनभंग करतो आहेस. मात्र तू माझ्या (भारत) मातेला अबला समजू नकोस. कथिल हे अगस्तिस आता । रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला, सागरा, प्राण तळमळला ।। तुला आठवते का? आमचे ऋषी अगस्ती एका क्षणात तुला प्यायले होते. तुला नामशेष केले होते. अगस्तीचा वारसा सांगणारे आम्ही तुला धडा शिकवू! हतबल असतांना देखील सागराला दम देणार्या कवी मनाच्या सावरकरांचा आवाका विराट होता.
चला तर मग! सूर्याहून अनेक पटींनी मोठे असणारे अनेक सूर्य एकाच वेळी डिसेंबर जानेवारीच्या रात्रींमध्ये साध्या डोळ्यांनी पाहता येतात. या दरम्यान दक्षिण दिशेला दरवर्षी साध्या डोळ्यांनी सहज दिसणारा 'अगस्ती' तारा आकाशात शोधूया. पुराणातून, मिथकातून, आख्यायिकांतून आणि काव्यातून आलेला आपल्या ऋषीमुनींचा समृद्ध वारसा या कथांच्या माध्यमातून सर्वांना सांगूया.
आणि हो, यापुढे हा तारा पाहिल्यावर सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रायटनच्या किनार्यावर 'सागरा प्राण तळमळला' हे विरहगीत गुणगुणणारे सावरकर आणि ही कविता लिहून घेणारे त्यांचे मित्र निरंजन पाल यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.
मस्त लेख आणि माहिती. पूढल्या
मस्त लेख आणि माहिती. पूढल्या ३-४ महिन्यात ट्रॅक करेन या तार्याला.
अगस्ती तार्याला इंग्रजीत काय म्हणतात?
मदनलाल धिंग्राला ऑगस्ट ०९
मदनलाल धिंग्राला ऑगस्ट ०९ मध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर, डिसेंबर १९०९ ला ब्रायटनच्या समुद्र किनारी बसलेले असताना हे गीत - सागरा प्राण तळमळला लिहिले आहे, तर अजून तरी सव्वाशे वर्षे झाली नाहीत, अजून ९ वर्षे आहेत. बाकी माहिती उत्तम.
अगस्त्य ताराला इंग्रजीत कॅनोपस (Canopus) असे म्हणतात.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
टवणे सर, जसजसे उत्तर गोलार्धात उत्तरेकडे जाऊ, तसतसा अगस्ती दक्षिण क्षितिजाच्या जास्त जास्त जवळ दिसतो आणि एका विशिष्ट रेखांशानंतर दिसणारच नाही.
महाराष्ट्रातून बघताना तो दक्षिणेकडे खाली बघायची सवय होते, पण बंगलोरहून क्षितिजापासून बऱ्यापैकी वर दिसतो.
छान लिहीले आहे. ट्रॅक करायला
छान लिहीले आहे. ट्रॅक करायला पाहीजे हा तारा.
परंतु,
इंद्राने ब्रह्मदेवाकडे मदत मागितली. त्यावेळी ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्तासुराचा वध केला. हे बघितल्यानंतर इतर राक्षस आपला जीव वाचवून समुद्रात जाऊन लपले. राक्षस दिवसा समुद्रात लपत असत आणि रात्री समुद्रातून बाहेर येऊन देवतांना आणि ऋषींना त्रास देत असत. या जाचाला कंटाळून देवता भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णुंनी त्यांना अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवतांनी अगस्त्य ऋषींना हा प्रकार सांगितला. समुद्रात लपलेल्या या राक्षसांना मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकले. अखेरीस पाणी संपल्यानंतर लपलेल्या या राक्षसांचा देवतांनी वध करून त्यांची दहशत संपविली.
ही कथा खूप गडबड घोटाळ्या ची वाटते.
आधी ब्रह्मदेवाची मदत घेतली, मग जमेना, तेव्हा विष्णूकडे गेले. इंद्र स्वतः काहीच करु शकत नव्हता का?
विष्णूनेही हे काम अगस्ती ऋषींना ऑफलोड केले !
इंद्र स्वतः काहीच करु शकत
इंद्र स्वतः काहीच करु शकत नव्हता का?>>>>>
पुराणकथा वाचल्या नाहीत किंवा चित्रपट पाहिले नाहीत काय? इन्द्राचे सिंहासन डोलतेय आणि तो भयभीत होऊन शंकरादी देवांकडे याचना करतोय हे दृष्य सिनेमात पाहिलेय.
अगस्ती तारा बर्याच वर्ष पुर्वी एकदा पाहिलाय. दक्षिण आकशात ठळक तारे जवळजवळ नाहीतच. त्यामुळे हा लक्षात राहिला. carina ह्या नक्षत्रसमुहात हा तारा दाखवलेला. त्या आकाशातला हा एकच समुह् लक्षात आहे. बाकी काही आठवत नाही.
वाह! पुराण व खगोलशास्त्राची
वाह! पुराण व खगोलशास्त्राची वेधक गुंफण
देव आणि दानव यांच्या लढाईची
देव आणि दानव यांच्या लढाईची अनेक वर्णने पुराणात येतात. वृत्तासुराने सर्व देवांना लढाईमध्ये जेरीस आणले होते. त्याचा प्रतिकार न करता आल्याने देवांनी मैदानातून पळ काढला होता. त्यानंतर ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्तासुराचा वध केला. (म्हणजे वृत्तासुराचा वध इंद्रानेच केला) इंद्र विष्णुकडे गेले असा कुठेही उल्लेख नाही. या सर्व प्रकारामुळे सर्व देवता शेषशयनी असलेल्या भगवान विष्णुंकडे गेले. त्यांनी अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला, कारण अगस्ती ऋषींना 'मंत्रद्रष्टा' मानले जात असे. विस्तारभयास्तव पौराणिक उल्लेख थोडक्यात केला आहे. असो. यात पौराणिक कथा आणि विज्ञान याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. 'अगस्ती' (Canopus) हा तारा सूर्यापेक्षा ६५ पट मोठा आहे आणि सूर्यापेक्षा तीस टक्के जास्त प्रखर आहे. पृथ्वीपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे. हा तारा पृथ्वीच्या जवळ जर असता, तर कल्पना करा की पृथ्वीवरच्या पाण्याची कधीच वाफ झाली असती. म्हणूनच या तार्याला ‘अगस्ती’ हे नांव समर्पक वाटते.
छान माहिती.
छान माहिती.
वावे ची पोस्ट बघून शोधलं तर इथून नाही दिसणार असं समजलं. उत्तर अमेरिकेतील संदर्भात रिचमंड, व्हर्जिनिया ते सॅन होजे, कॅलिफोर्निया च्या दक्षिणेला असाल तर हा तारा दिसेल. याच्या उत्तरेला क्षितिजाच्यावर हा उगवणार नाही.
सुरेख लेख, माहीतीपूर्ण.
सुरेख लेख, माहीतीपूर्ण. प्रतिसादही छान.
इथे नगर जिल्ह्यात अकोले इथे अगस्तीमुनींचं वास्तव्य होतं बहुतेक, फार मला माहीती नाही, तिथले माहीतगार सांगतील. २००२ मधे आम्ही श्रीरामपुरला सामान शिफ्ट करताना अकोले संगमनेर मार्गे गेलो, तिथे सगळीकडे अगस्तीऋषींच्या नावाने सर्व दिसलं.
वृत्तासुर की वृत्रासुर?
वृत्तासुर की वृत्रासुर?
>>> पुराणातून, मिथकातून, आख्यायिकांतून आणि काव्यातून आलेला आपल्या ऋषीमुनींचा समृद्ध वारसा या कथांमधून कणाकणांत साठवूया.
Whoa! कशाच्या कणाकणांत साठवायचाय वारसा?
तुमचा नवा आयडी या धाग्याच्या
तुमचा नवा आयडी या धाग्याच्या दृष्टीने मजेदार आहे.
शिनुक्स (पॅसिफिक वायव्येला चिनूक्स म्हणतात) वारे अल्बर्टात असेच (म्हणजे अगस्तीने केले असेल तसे) स्नोला क्षणात नाहीसे करतात. हवाई वरुन बाष्पाने भरलेले वारे कनेडीअन रॉकीज च्या पश्चिमेला भरपूर स्नो फॉल करतात आणि रॉकीजना ओलांडलं की काहीसे गरम आणि बाष्प संपलेले निरभ्र आकाश (शिनुक्स आर्क नावाने शोधलंत तर फोटो दिसतील) क्षणात कॅलगरी मधले तापमान २० एक अंशाने वाढवतात आणि स्नो बघता बघता नाहीसा होतो. फार रोचक आहेत शिनुक्स.
धन्यवाद, अमित.
धन्यवाद, अमित.
मस्त लेख! आवडला. समुद्राचे
मस्त लेख! आवडला. समुद्राचे पाणी पिण्याबद्दल आणि विंध्य पर्वताबद्दल - दोन्ही कथा ऐकल्या आहेत. 'सागरा प्राण तळमळला' चा संदर्भ लक्षात आहेच. पण ही वर्णने व शास्त्रीय माहिती एकत्र छान गुंफली आहे.
शिनुक्स (वार्यां) बद्दल माबोवरच पूर्वी कधीतरी गप्पांत वाचलेले आठवते. अमित - चिनूक हे एका नेटिव्ह ट्राइबचेही नाव आहे ना? ते ही त्याच भागातले दिसते. पॅसिफिक नॉर्थवेस्ट
हो. चिनूक नेटिव्ह ट्राईब आहे.
हो. चिनूक नेटिव्ह ट्राईब आहे. ती ट्राईब जिथली आहे तिथून वारे तयार होतात म्हणून चिनूक वारे. मग फ्रेंच बोलणार्यांनी त्याचं शिनुक केलं.
ते वार्यात ज्ञानाचे कण कण
त्या वार्यात ज्ञानाचे कण कण भरून चहूदिशांना ते चौखूर उधळल्यावर त्याला चिनूक्स म्हणू लागले (अर्धा स कणांचा)
मस्त लेख आणि माहिती. कधीतरी
मस्त लेख आणि माहिती. कधीतरी हा तारा बघण्याचा योग येईल.
चिनूक हेलिकॉप्टर्सही असतात. . ही काहीशी सुरवंटासारखी दिसतात. सिनेमातून पाहिली आहेत.
छान लेख. नवीन माहिती समजली.
छान लेख. नवीन माहिती समजली.
आधी मलापण स्वाती ह्यांच्या प्रमाणे आय डी घेण्याबद्दल संभ्रम वाटला पण नंतर अमितच्या प्रतिसादातून उलगडले.
मस्त लेख! आवडला.
मस्त लेख! आवडला.
त्या वार्यात ज्ञानाचे कण कण भरून चहूदिशांना ते चौखूर उधळल्यावर >>
चिनुक्स याच्यावर तुम्ही हा
चिनुक्स याच्यावर तुम्ही हा व्हिडियो https://www.youtube.com/watch?v=rfE3cq8Nfj4 पहाच. अगस्त्य हा भारतीयांचा ध्रुव तारा. मला लहान्पणी प्रश्ण पडायचा की ध्रुवाने बारा हजार वर्षे तप कसे केले ? (याचा पॄथ्वीच्या प्रीसेशन शी संबंध असावा (हे माझा तर्क, व्हिडियोत नाही) कारण प्रीसेशन चा अर्धा काळ बारा ते तेरा हजार वर्षामधला आहे.) व्हिडियोत प्रीसेशनचे इतर डिसकशन आहे पण बारा हजार वर्षे तप पण तेच सुचविते हे ते विसरले.
अगस्त्य हाच नटराजाच्या (म्रुगशीर्श नक्षत्र) पायाखालिल तारा, किंवा (नटराज म्हणजेच उत्तानपाद ज्याचा पाय उचलेला आहे) त्याच्या पायावरुन खाली पडलेल दक्शिणेचा ध्रु॑व.
दक्षिण भारतात ज्या ज्या ठिकाणाहुन अगस्त्य दिसु लागला तिथे मंदिर बांधले गेले. रामाने विंध्य पर्वतावरुन अगस्त्य मुनीचे दर्षन घेतले यावरुन काहीजण रामायणाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न करतात.
अगस्त्य दक्षिणेला समुद्रात बुडाला वा दिसेनासा झाला, यालाच अगस्त्याने समुद्रचे पाणी पिले असे म्हटले जाणे सहाजिकच वाटते.
भारतात किती ठिकाणाहून
भारतात किती ठिकाणाहून दक्षिणेला समुद्र दिसतो?
भारतात किती ठिकाणाहून
भारतात किती ठिकाणाहून दक्षिणेला समुद्र दिसतो?
.
>>
प्रवासासाठी दक्षिणेला अगस्त्य ध्रुवासारखा वापरत. त्या खलाशांसाठी अगस्त्य दक्षिणेला समुद्रात बुडाला वा दिसेनासा झाला किंवा समुद्राला चिकटला. भारतातुन दक्षिणेला समुद्र दिसतो असे मी कुठे सुचविले असेल तर माफी, पण मला असे कुठे दिसले नाही
नटराज आणि पायाखालचा अगस्त्य (उत्तानपाद आणि ध्रुव) ओरायन आणि कॅनोपस.
त्याने पायाखाले अपस्मार आणि त्याखाली अगस्त्य दाखवला आहे.
खूप छान माहिती. लेख आवडला.
खूप छान माहिती. लेख आवडला.
नमस्कार. लेखातील मांडणी,
नमस्कार. लेखातील मांडणी, आख्यायिका व वर्णन आवडलं. काही उल्लेख बरोबर आहेत.
//विंध्य अगस्ती कथेला एक खगोलशास्त्रीय आधार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे विंध्य पर्वताची उंची वाढली. त्याकाळी अगस्ती तारा विंध्य पर्वताची उंची वाढल्यामुळे पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या भूभागांवरून दिसेनासा झाला.// हे मात्र पटत नाही. पर्वत कितीही उंच झाला तरी तो ता-याला दिसेनासा करू शकत नाही. तारा दिसेनासा झाला, हे मात्र खरं आहे. त्याचं कारण हे आहे की, २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीच्या परांचन गतीमुळे ध्रुव बिंदूची परिक्रमा पूर्ण होते. एके काळी, साधारण १४ हजार वर्षांपूर्वी अभिजीत उत्तर ध्रुव बिंदूजवळ तर अगस्त्य दक्षिण ध्रुव बिंदूजवळ होता. तेव्हा अगस्त्य कन्याकुमारीलगत काही भागातूनच दिसायचा आणि तोही समुद्राला स्पर्श करणारा, त्याच्या थोडाच वर. उर्वरित भारतातून तो दिसू शकायचा नाही. आणि आजही अगस्त्य साधारण पंजाबच्या उत्तरेवरून दिसू शकत नाही. ह्यासंदर्भात आणि भारतीय खगोल ननिरीक्षणांसंदर्भात डॉ. निलेश ओक आणि रूपा भाटी ह्यांनी केलेलं संशोधन विशेष आहे. पुन्हा काही हजार वर्षांनी अभिजीत व अगस्त्य (कॅनोपस) हे ध्रुव बिंदूजवळ येतील. अर्थात् त्यांच्या स्टेलर मोशनमुळे त्यात फरकही पडलेला असेल.
आणि हो, तो रात्रीच्या आकाशातला व्याधाखालोखाल दुसरा तेजस्वी तारा आहे. फक्त क्षितिजापासून फार वर जात नसल्यामुळे तो आपल्याला तितका तेजस्वी दिसत नाही.
@ निलिमा जी, अगदी बरोबर!
@ निलिमा जी, अगदी बरोबर!
तुम्ही मांडलेला १२ हजार वर्षांच्या तपश्चर्येचा अर्थ अगदी समर्पक आहे!
निलेश ओक डॉक्टर कधी आणि कशात
निलेश ओक डॉक्टर कधी आणि कशात झाला. बुलशिटींग ह्या विषयात पण प्रॉपर पीएचडी वगैरे मिळते का? वेद, पुराण इत्यादींतील खगोलविषयक बाबी ह्या शास्त्रीय पुरावे म्हणून वापरण्याजोग्य आहेत, म्हणजे सगळी so called "निरीक्षणे" आणि calculation करून आलेली ताऱ्यांची positions ह्या दोन्हीमध्ये statistically significant correlation आहे हे दाखवून दिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही आणि असे काही correlation दाखवून देता येत नाही म्हणून ओक आणि त्याच्यासारख्या सगळ्यांचे सगळे विश्लेषण फक्त आणि फक्त बुलशिटींग आहे. आपल्या निष्कर्षाला अनुकूल असणारे चार डेटा पॉइंट्स हाताने सिलेक्ट करायचे आणि विपरोधी असलेले हजारो दुर्लक्षित करायचे ह्याला हातचलाखी म्हणतात संशोधन नाही. चार पॉइंट्स मध्ये फर्मी ने हत्ती फिट करून दाखवला होता https://en.wikipedia.org/wiki/Von_Neumann%27s_elephant
अगस्तीचा तारा नक्कीच सुंदर आहे, भारता व्यतिरिक्त अन्य कितीतरी संस्कृतींतही त्याला महत्त्व दिले गेले आहे. इराणमध्ये त्याला सोहेल म्हणतात असे आज वाचले आणि त्याचे दर्शन दुर्मिळ असल्याने एखादा व्यक्ती "सोहेलचा तारा होणे" अशी म्हण प्रचलित आहे.
हे लॉजीक अगदी पटेलसे आहे!
हा तारा पृथ्वीच्या जवळ जर असता, तर कल्पना करा की पृथ्वीवरच्या पाण्याची कधीच वाफ झाली असती. म्हणूनच या तार्याला ‘अगस्ती’ हे नांव समर्पक वाटते....
हे लॉजीक अगदी पटेलसे आहे!
मात्र , अगस्त्य दक्षिणेला समुद्रात बुडाला वा दिसेनासा झाला, यालाच अगस्त्याने समुद्रचे पाणी पिले असे म्हटले जाणे सहाजिक वाट्ते - हे मात्र पटले नाही!
मस्त लेख आणि माहिती.
मस्त लेख आणि माहिती.
जगात किती ज्ञान आहे आणि आपली
जगात किती ज्ञान आहे आणि आपली ओंजळ चिमुकली. हेच नंतर सायन्स झाले.
अगस्ती ताऱ्याच्या धगीने समुद्र सुकत असेल तर धागा का तप्त होणार नाही!
@अमितव, शिनुक्स बद्दल छान
@अमितव, शिनुक्स बद्दल छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद! @निलिमा युट्यूबचा दुवा फारच छान
@मार्गी, गेल्या काही हजार वर्षांत एव्हरेस्ट पर्वताची उंची भूगर्भिय हालचालींमुळे सुमारे १५ ते ५० मीटर एवढी वाढली आहे. त्याचप्रमाणे त्याकाळात मध्य भारतात असलेल्या विंध्याचल पर्वत रांगा वाढत असाव्यात. त्यामुळे विंध्याचल पर्वतरांगांच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही भागांमधून, क्षितिजाच्या १ ते २ डिग्री वर दिसणारा अगस्ती तारा या पर्वतरांगा थोड्या उंच झाल्यामुळे दिसेनासा झाला असावा हा त्यामागे तर्क आहे. बाकी, माबो वर हा माझा पहिलाच लेख. चिकित्सक माबोकर रसिक वाचकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक 
छान लेख आणि माहिती
छान लेख आणि माहिती
Pages