गंधार
पंचेन्द्रीयातील पहिले इंद्रिय आणि मानवाची आद्य संवेदना म्हणजे घ्राणेन्द्रीय शक्ती
सर्वात आदिम प्राणी म्हणजे अमिबा सारखा एक पेशीय प्राणी सुद्धा आपल्या पेशीच्या भिंतीतून झिरपणार्या अणुरेणु ची रासायनिक तपासणी करून आजूबाजूच्या वातावरणाची माहिती काढत असतात.
मुळ वासाची शक्ती म्हणजे वेगवेगळ्या रसायनाची संवेदना मेंदूला देणे. हि शक्ती अंधारात उन्ह पावसात रात्री बेरात्री सुद्धा काम करीत असते आणि प्राणी मात्रांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देत असते.
प्राण्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन या चार मूलभूत अंतरप्रेरणा सुद्धा वासाच्या शक्तीवर अवलम्बून असतात.
मानवी वास घेण्याचा अवयव म्हणजे नाकाच्या आत असलेले ग्रहण केन्द्र/ संवेदक. यावर जेंव्हा वासाचे अणु/ रेणू येउन चिकटतात तेंव्हा त्याचे कुलूप किल्लीने उघडल्या सारखे आतील संवेदक मेंदूकडे संवेदना पोहोचवितात. मानवाच्या नाकात दहा चौरस सेमी क्षेत्र या संवेदकाचे असतात तर कुत्र्याच्या ते एकशे सत्तर चौसेमी असतात म्हणजेच मानवाच्या नाकात जर एक मेगा पिक्सेल कैमेरा असेल तर कुत्र्याच्या नाकात सतरा मेगापिक्सेल असतात म्हणूनच कुत्र्याची वास घेण्याची क्षमता १७पट इतकी जास्त असते.
हे वासाचे रेणू जेंव्हा नाकाच्या संवेदकांवर येउन चिकटतात तेंव्हा ते तेथे आपली एक आकृती निर्माण करतात आणि हि आकृती जाणून घेण्याची आपल्या मेंदूची क्षमता अफाट असल्याने "एकाच तर्हेच्या" वासा मध्ये मानवाला फरक करता येतो म्हणजेच दोन गुलाबाच्या फुलांच्या वासां मध्ये मेंदू फरक करू शकतो.
मूळ वासाची शक्ती माणसात कमी का झाली?
प्रथम मानवाचे पूर्वज हातापायावर( दोन हात दोन पाय) यावर चालत होते तेंव्हा त्याला जमिनीलगत असलेले असंख्य वास येत होते आणि त्याचे पृथक्करण करण्यासाठी तेवढी जास्त घ्राणेन्द्रीय शक्ती लागत होती. एकदा माणूस ताठ उभा राहून चालू लागला तेंव्हा त्याची या असंख्य ह्व्या आणि नको असलेल्या वासापासून त्याची मुक्तता झाली त्याच बरोबर त्याचे डोळे उंचीवर पोहोचल्यावर त्याला अधिक दूरचे दिसू लागले आणि त्या दृष्टीचा अन्वयार्थ लावण्यासाठी लागत असलेला प्रगत मेंदू विकसित झाला त्यात त्याचे डोळे एकाच रेषेत आल्यामुळे दोन्ही डोळ्याने त्रिमित (३ डायमेन्शन) दृष्टी लाभली त्यामुळे मानवाला वासाची तेवढी आवश्यकता राहिली नाही. परंतु मानवाची वासाची शक्ती अजूनही तेवढी कमी झालेली नाही. फक्त आपण ती जेवढी आवश्यक तेवढीच वापरत आहोत(need based).
त्यामुळे जर आपण ती वापरण्यास सुरुवात केली तर अतिशय आश्चर्य कारक रित्या आपल्याला तिचा वापर करता येतो. आपण साध्या सोप्या गोष्टी वापरत असतो तरीही त्या लक्षात घेत नाही. पेरू किंवा आंबा याचा वास घेऊन तो पिकला आहे कि नाही हे आपण सहज सांगू शकतो (पण प्रत्यक्ष किती लोक विकत घेण्याअगोदर आंब्याचा/ पेरूचा वास घेऊन पाहतात) दही/अन्नपदार्थ खराब झाला आहे हे सुद्धा सहज सांगता येते.
वासाच्या शक्तीचा एक फार महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थांचा स्वाद घेणे.
चव आणि स्वाद यात फरक काय?
फक्त पाच चवी आहेत गोड आंबट खारट कडू आणि नवी चव म्हणजे उमामी (MSG किंवा मोनोसोडियम ग्लुतामेट ची चव).
मग गुलाब जामून आणि काला जामून किंवा कलाकंद आणि कुंदा यांच्या चवी गोडच आहेत मग या चवीतील (खरंतर स्वादातील) फरक काय?
जेंव्हा कोणतही पदार्थ आपण खातो तेंव्हा त्यातील मसाल्यात असलेल्या तेलाचे बाष्पी भवन होते आणि ते आपल्या तोंडाच्या मागच्या भागातून उच्छवासाद्वारे नाकात शिरते आणि त्या पदार्थाच्या चवीबरोबरच त्याचा वास अशी संयुक्त आणि गुंतागुंतीची संवेदना मेंदूकडे जाते आणि आपल्याला स्वादाचा स्वर्गीय अनुभव मिळतो.
या स्वादाची एक प्रतिमा आपल्या मेंदूवर उमटते आणि परत आपण तो पदार्थ खाल्ला कि मेंदू हि नवी प्रतिमा त्या मूळ प्रतीमेबरोबर तुलना करून पाहतो आणि म्हणून आपल्याला सांगता येते को कोणता पदार्थ जास्त चांगला आहे/होता. जेंव्हा आपण पाककृती बरोबर त्याची छायाचित्रे पहातो तेन्व्हा ते आपल्याला जास्त भावते किंवा आपले पोट "आरडा ओरडा" करू लागते.
वरिल कारणासाठीच आपल्याला सर्दी झाली कि "चव लागते पण स्वाद येत नाही" कारण त्या स्वादाची तेले आपल्या घ्राणेन्द्रीयांपर्यंत पोहोचत नाहीत आणि उत्तम पदार्थ आणि भुसा यातील फरक कळत नाही. याच कारणासाठी गरम केलेला अन्नपदार्थ जास्त चांगला लागतो. कारण जास्त तापमानाला हि तेले जास्त प्रमाणात बाष्पीभवन होतात.
आपण बिर्याणी "दम" करायला ठेवतो तेंव्हा मटण किंवा रस्स्यातील तेले बाष्पीभवन होऊन बाहेर येतात आणि भांडे बंद असल्यामुळे बाहेर आलेल्या भातात शिरतात त्यामुळे असा भात सुद्धा स्वादिष्ट लागतो.
वासाच्या या दुनियेत मानवाने काही गोष्टी जाणून घेतल्या त्या म्हणजे कोणत्या वासामुळे आपल्याला धोका आहे आणि कोणता वास आपल्या फायद्याचा आहे. सडक्या मासाचा वास हा इतर परभक्षी जनावरांना आकर्षित करतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो या मुळे असा सडक्या मासाचा वास आपल्याला शिसारी आणतो. तसेच सडक्या अन्नामुळे विषबाधा होऊ शकते हे कळल्यामुळे तसा वास येणारे पदार्थ आपण आपोआप खाणे टाळतो.
आता या गोष्टी साध्या सरळ आहेत. पण ज्या गोष्टी इतक्या सरळ नाहीत त्या कोणत्या. त्यातील एक म्हणजे मानवी शरीराचा वास.
स्त्रियांना पुरुषांच्या अंगाचा (यात घाम,स्वेद ग्रन्थि, स्त्राव यांचा समावेश आहे) वास दिला तर काही तर्हेचा वास त्यांना आकर्षित करतो आणि काही तर्हेचा वास आकर्षित करत नाही. ( मूळ घामाला वास नसतो तर त्यातील प्रथिनांवर जीवाणूची प्रक्रिया झाल्याने एक तर्हेचा वास येतो) याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि स्त्रियांना आपल्या पेक्षा वेगळ्या तर्हेच्या MHC-Major Histocompatibility Complex ( ज्या जीन्समध्ये प्रतिकार शक्तीची सांकेतिक भाषा लिहिलेली असते)असलेल्या माणसांच्या शरीराचा वास आवडतो. जेंव्हा आई आणि बापाचे MHC वेगळे असतात त्या मुलांची प्रतिकार शक्ती खूपच जास्त चांगली असते. त्यामुळे अशा माणसाशी संबंध झाल्यामुळे जन्म झालेली संतती जीवशास्त्रीय दृष्ट्या जास्त सशक्त असते.
दुर्दैवाने आपल्या लग्न संस्थेत जीवशास्त्रीय गोष्टीन महत्त्व नाही. तेंव्हा मुलीला किंवा मुलाला काय आवडते त्यापेक्षा त्यांची जात धर्म, वर्ण, आर्थिक स्थिती आणि पत्रिका हे प्राधान्य घेतात. (एक वेगळा विचार- पत्रिकेत ३६ गुण जुळलेले स्त्रीपुरुष जीवशास्त्रीय दृष्ट्या अनुरूप आहेत/ होतात का हे त्याचे MHC जुळवुन पाहिले पाहिजे म्हणजे पत्रिका पाहण्यात तथ्य आहे काय ? या प्रश्नाचे अंशतः उत्तर मिळू शकेल.)
एवढ्या सगळ्या काथ्याकुटाचा आपल्या जीवनात उपयोग काय?
आपल्या अंगाला येणारा वास( पायाच्या मोज्यांचा वास सुद्धा) हा माणसाला स्वतः ला येत नाही कारण काय? आपली घ्रणेन्द्रीये थोड्या वेळाने संतृप्त होतात त्यामुळे त्यातून मेंदूला जाणार्या संवेदना बोथट होतात. पण तोच वास दुसर्याला अतिशय तीव्र वाटू शकतो. म्हणून दिवस सुरुवात करताना आपल्या पूर्वजांनी सकाळी स्नान करण्याची पद्धत रूढ केली.
कोणत्याही कामाला निघताना आपण स्वतःला शुचिर्भूत करणे अतिशय आवश्यक असते.
जे लोक कोणत्याही विक्री/विपणन विभागात कामाला असतील त्यांनी तर हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे कारण आपल्या अंगाला वास येत असेल तर आपले ग्राहक आपल्याला दूरच ठेवतील. हि गोष्ट आपले ग्राहक जर स्त्रिया असतील तर प्रकर्षाने लक्षात ठेवावी(यात कापड --बुटिक/ कोस्मेटीक्स दागिने किंवा सौंदर्य प्रसाधने विक्री हे व्यवसाय येतील) कारण स्त्रियांची वासाची शक्ती पुरुषांच्या पेक्षा दोन ते तीन पट जास्त तीव्र असते (त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचर्याच्या ढीगा जवळून चालताना ९० % बायका नाकाला पदर लावून जाताना दिसतील तेथेच पुरुष त्यामानाने शांतपणे पुढे जाताना दिसतात.
वासाचे एवढे महत्त्व का?
आपल्या मेंदूत वासाची एक प्रतिमा उमटलेली असते आणी हि प्रतिमा त्यावेळच्या स्मृतीशी घट्ट पणे निगडीत असते. त्यामुळे आपल्या मित्र/ मैत्रिण जर एक विशिष्ट अत्तर / सुगंध वापरात असेल तर त्या सुगंधाचा वास आल्यास आपल्याला त्या मित्र/ मैत्रिणीची आठवण प्रकर्षाने येते.
मी माझ्या लग्नागोदर माझ्या (होणार्या) बायकोला GAMBIT हा सुगंध भेट दिला होता आणी तो सुगंध आमच्या लग्न ते हनिमून आणी एक वर्ष पर्यंत(संपेपर्यंत) ती वापरत असे. त्यानंतर तो सुगंध मी कटाक्षाने परत आणणे टाळले (अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये म्हणून).
आता परत क्वचित कधी कुणाकडे हा सुगंधाचा दरवळ आला तर मला आपले सोनेरी आणी सुगंधी दिवसांचा पुनः प्रत्यय येतो.
प्रत्येक स्त्री/ पुरुषाच्या अंगाचा एक विशिष्ट गंध असतो. आणी भिन्नलिंगी व्यक्तींना तो आकर्षित करतो परंतु आपण या गोष्टी विसरलो आहोत.
आपल्या जोडीदाराला आपले आकर्षण वाटावे असे आपल्याला वाटत असेल तर हि बाब त्याच्या/ तिच्या ध्यानात आणणे आवश्यक आहे. जर त्याला किंवा तिला तो गंध आवडत नसेल तर असा गंध टाळून त्याला/तिला आवडणाऱ्या गंधाचे अत्तर/सुगंध वापरणे हितकारक असते.
जोडीदाराबद्दल आकर्षण निर्माण करणे हा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला आकर्षित करायचं असेल तर आपल्या आवडीपेक्षा तिच्या/ त्याच्या आवडीचा सुगंध विकत घेऊन अंगाला लावा
बर्याच पुरुषांच्या हे ध्यानात येत नाही. रात्री आपल्या बायकोच्या "जवळ" जाताना हा भाग ध्यानात न घेतल्याने बायकोला नवर्याबद्दल आकर्षण वाटत नाही आणी बाब टोकास गेल्यास नवर्याबद्दल किळस सुद्धा वाटते. ( बर्याच वेळेस पुरुष बायकोचा झोपेची गोळी म्हणून वापरताना सर्रास आढळतात आणी "बायकोचा विचार" करणे त्यांच्या पौरुश्त्वाला कमी पण आणणारे वाटते. असे महाभाग शेकड्यांनी दिसतात हा भाग अलाहिदा)
बायको शृंगारात रस घेत नाही हि तक्रार घेऊन कित्येक रुग्ण घेतात. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची पातळी फार कमी असल्याचे दिसून येते. अशा रुग्णांना प्रथम स्वतः रात्री स्वच्छ स्नान करून नवे कपडे घाला आणी अंगाला एखादी सुवासिक पावडर/ सुगंध लावा हे सांगावे लागते.
बायकोसाठी एखादा मोगर्याचा गजरा आणून पहा हि गोष्ट सांगावी लागते याचेच आश्चर्य वाटते. बहुतांश नवरे लग्नाच्या एक दोन वर्षानंतर या गोष्टी विसरून जातात.दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही बरेच पुरुष "आम्ही कोणतेही सौंदर्य प्रसाधन वापरत नाही" हे अभिमानाने सांगतात.
हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत लागू होते. लिंग शैथिल्य चे रुग्ण पाहताना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. बायकोचे रात्री घामाने थबथबलेले थंड गार शरीर जवळ घेताना कोणतेही उद्दीपन होत नाही. स्त्रिया पाळीच्या वेळेस आरोग्याची तेवढी काळजी घेत नसतील तर येणाऱ्या अंगाच्या दुर्गान्धामुळे पुरुषाला किळस येते हे ते बायकोसमोर सांगू शकत नाहीत. काही वेळेस बायका अतिशय हट्टी आणी दुराग्रही असलेल्या आढळून आल्या( मी आहे हि अशी आहे आता काय बदलणार?).
फरक हाच आहे कि शृंगाराच्या वेळेस स्त्री हि निष्क्रिय राहू शकते पण पुरुषाला सक्रीय भाग असल्याने जर स्त्रीबरोबर प्रतिकर्षण असेल तर शृंगार होऊ शकत नाही. अशी जोडपी जेंव्हा वंध्यत्वाच्या उपचारासाठी येतात तेंव्हा त्यांच्यात वर्षनुवर्षे संबंधच झालेला नाही असे सुद्धा दिसून येते. केवळ एकत्र राहत असतात आणी जेंव्हा पालकांकडून मुलाबद्दल आग्रह चालू होतो तेंव्हा हे उघडकीस येते.
मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि सर्वात सहज आणी फुकट मिळणारे उच्च दर्ज्याचे सुख म्हणजे झोप. मग झोप हि उत्सवासारखी का साजरी करू नये?
वैयक्तिकरीत्या मी स्व्तः रोज झोपताना शुचिर्भूत होऊन स्वच्छ चेहरा धुवून सुगंधी पावडर लावून नवीन पायजमा शर्ट घालून कडक इस्त्रीच्या चादरीवर झोपणे पसंत करतो.सुरुवातीला बायको जरा संशयाने पाहत असे पण नंतर तिला ती गोष्ट आवडू लागली.लष्करात असल्याने कडक इस्त्री हा जीवनाचा अविभाज्य भाग होता तरीही चांगली गोष्ट चांगलीच असते
जर लोक दारू पिण्यासाठी/ हॉटेलात जाण्यासाठी एवढा खर्च करू शकतात तर स्वच्छ कपडे आणी इस्त्रीची चादर यासाठी महिना तीन चारशे रुपये खर्च करण्यास प्रत्यवाय नसावा. एका चादरीच्या इस्त्रीला फारतर १० रुपये पडतात पण त्यावर झोपण्याचे सुख स्वर्गीय असते. त्यातून उशाशी मोगर्याचा गजरा असेल तर रात्री झोप चाळवली असताना पण एक अनाहूत आनंद आणी सुगंधाचा अनुभव येतो.
स्त्रियांसाठी --रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस जरी आपण झोपण्यापूर्वी स्वच्छ स्नान करून मंद सुगंध असलेली पावडर किंवा गजरा घालून एक इस्त्री केलेला गाऊन (किंवा आपण निजताना वापरता ते वस्त्र) घालून इस्त्रीच्या चादरीवर झोपून पहा. या गोष्टीना फारतर दहा मिनिटे जास्त लागतील.
स्त्रिया एकदा मुल झाले कि स्वतःकडे लक्ष देणे सोडून देतात."स्त्री हि क्षणाची पत्नी आणी अनंत कालची माता आहे" हे आचार्य अत्र्यांचे वचन स्त्रियांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करून आहे.
या गोष्टी केवळ दुसर्यासाठी (नवऱ्यासाठी) नव्हे तर स्वतः साठी करून पहा.
जर आपण साध्या बायकांच्या हळदी कुंकू समारंभात जाण्यासाठी तयार होण्यात दहा मिनिटे घालवता तर "स्वतःला आनंदित" करण्यासाठी आपण दहा मिनिटे दिली तर चालेल.
या लेखात गंध या पंचेंद्रियांपैकी पहिल्या इंद्रियाच्या शास्त्रीय माहितीचा उहापोह केलेला आहे.
यात प्रत्येकाची वैयक्तिक आवड वेगळीच असते त्यामुळे त्याबद्दल जास्त टिप्पणी केलेली नाही.
छान लेख.. माहिती आवडली.
छान लेख.. माहिती आवडली.
पदार्थ खाल्ला की त्याचा स्वाद मेंदुपर्यंत कसा पोचतो ते कळले. पदार्थ न खाताच त्याचा सुगंध किंवा सुवास आपल्यापर्यंत कसा पोचतो? त्यातुन कुठले द्रव्य उत्सर्जीत होतात? आणि हे कायम कसेराहतात,? म्हणजे चिवड्याला जो वास पहिल्या दिवशी येतो तोच दहाव्या दिवशीही येतो. त्याचे सुवास निर्माण करणारे घटक इतक्या दिवसात संपत नाहीत काय?
सुगंधी झोपेबद्दलची टिपण्णी आवडली. मी गजरे किंवा सुगंधी फुले आणली तर मुद्दाम उशीजवळ ठेवते.
चिवडा उघडा ठेवा. दोन दिवसात
चिवडा उघडा ठेवा. दोन दिवसात वास "उडून" जाईल. हेच कारण इतर कोणत्याही गंधाबद्दल आहे.
जितके तापमान जास्त तितका गंध लवकर उडून जाईल. आपण मसाले फ्रिज मध्ये ठेवले तर त्याचा स्वाद जास्त दिवस टिकतो आणि फ्रीझर मध्ये ठेवले तर अधिकच जास्त.
छान लिहिलं आहे. स्वादाबद्दल
छान लिहिलं आहे. स्वादाबद्दल साधारण माहिती होतं पण एवढं सविस्तर नव्हतं माहिती.
पुरुषांसाठीचे पर्फ्युम्स आणि पावडर्स वगैरेचा सुगंध हा प्रत्यक्षात स्त्रियांना आवडेल असा असतो हे खरं आहे का? माझी होस्टेलमधली एक मैत्रीण 'for men' लिहिलेली पावडर वापरायची. तो वास मस्त होता. तिला तसं सांगितल्यावर तिने मला हे सांगितलं होतं.
अजून एक म्हणजे काही सुगंध (सगळे नाही) हे मंदपणे आलेलेच छान वाटतात. त्यांचा घमघमाट तितका छान नाही वाटत. आमच्या सोसायटीत खाली कुणीतरी रातराणी लावली आहे आणि ती सध्या भरपूर फुलली आहे. रात्री खाली चक्कर मारताना रातराणीचा घमघमाट येतो. सुरुवातीला छान वाटतं, पण मग वाटायला लागतं की हा सुगंध लांबून, वाऱ्याच्या झुळकेबरोबर, मंद मंद आलेला जास्त आवडेल. कदाचित बकुळीचंही तसंच होईल. तुम्ही जे पत्नीला भेट दिलेल्या सुगंधाबद्दल लिहिलं आहे, तसंच काहीसं. अतिपरिचयाने त्या सुगंधाची जादू नाहीशी होईल असं वाटतं. तसंच मृद्गंधाचंही. याचंही अत्तर मिळतं पण मला नाही ते घ्यायला आवडणार.
छान लेख. रोचक माहिती मिळाली.
छान लेख. रोचक माहिती मिळाली.
छान, महितीपूर्वक लेख !
छान, महितीपूर्वक लेख ! धन्यवाद.
*...त्यामुळे मानवाला वासाची तेवढी आवश्यकता राहिली नाही....* - तरी पण, मानवाच्या वन्य/ आदिवासी जमातींमध्ये गरजेनुसार वासाची तीव्र जाण अजूनही असावी. विलबर स्मिथ या आफ्रिकेतील प्रसिद्ध लेखकाच्या वन्य जीवनावरील कादंबऱ्यात अशा जमातीमधले लोक केवळ वासावरून वन्य प्राण्यांच्या दूरवरच्या हालचालीसुद्धा अचूक ओळखतात, असे दाखले आहेत.
*प्रत्येक स्त्री/ पुरुषाच्या अंगाचा एक विशिष्ट गंध असतो. आणी भिन्नलिंगी व्यक्तींना तो आकर्षित करतो * -
फ्रान्सचा एक लुईस ( iv / v / vi ? ) नावाचा राजा दिसायला व शरीरयष्टिने ओबडधोबड असूनही केवळ त्याच्या अंगाला येणाऱ्या विशिष्ठ वासामुळे तत्कालीन स्त्रियांमध्ये खूप आवडीचा होता, असं वाचल्याचं पक्कं आठवतंय .
छान लेख. खूप आवडला. तुम्ही
छान लेख. खूप आवडला. तुम्ही शास्त्रीय माहिती सहज, सोप्या व रोचक शब्दांत दिली आहे व त्याच बरोबर गंधाशी निगडित समस्या व त्यावरील उपायसुद्धा सांगितलेत. अश्या विषयांवर अजून वाचायला आवडेल .
लेखाच्या शीर्षकातून लेखात काय असेल याचा नेमका बोध झाला नाही.
आपली घ्रणेन्द्रीये थोड्या वेळाने संतृप्त होतात त्यामुळे त्यातून मेंदूला जाणार्या संवेदना बोथट होतात. पण तोच वास दुसर्याला अतिशय तीव्र वाटू शकतो. >>>> हे स्वतः अनुभवले आहे. ऑफिस मध्ये जाताना परफ्युम मारून जायचो. मारल्यानंतर काही वेळाने मला त्याचा वास येणे बंद व्हायचे. म्हणून रोज नकळत थोडा अधिक जास्त परफ्युम मारला जायचा. एकदा एका सहकार्याने सांगितले कि सुगंधाची तीव्रता जास्त आहे, तेंव्हा आश्चर्य वाटले होते. मग नंतर कारण समजले व वापर कमी केला.
>>> प्रत्येक स्त्री/
>>> प्रत्येक स्त्री/ पुरुषाच्या अंगाचा एक विशिष्ट गंध असतो. आणि भिन्नलिंगी व्यक्तींना तो आकर्षित करतो >>>
Pheromones, Pheromones म्हणतात ते हेच का?
फेरोमोन असेच असतात
फेरोमोन असेच असतात
खूप छान, माहितीपूर्ण लेख
खूप छान, माहितीपूर्ण लेख
पुरुषांसाठीचे पर्फ्युम्स आणि
पुरुषांसाठीचे पर्फ्युम्स आणि पावडर्स वगैरेचा सुगंध हा प्रत्यक्षात स्त्रियांना आवडेल असा असतो हे खरं आहे का?
खरं तर कुणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. गंधाबद्दल असे कोणतेही ठोकताळे नाहीत.
परंतु साधारण पणे पुरुषांचे सुगंध हे जास्त तीव्र असतात याचे कारण पुरुषांना ( अंगमेहनतीची काम जास्त केल्याने ) घाम जास्त येतो आणि स्वतःच्या स्वच्छतेबद्दल पुरुष तेवढे चोखंदळ नसतात.
हि स्थिती एक शतक अगोदर जास्त करून होती जेंव्हा शेती किंवा कारखान्यातील काम हेच उत्पन्नाचे मुख्य साधन होते. त्यामुळे अंगमेहनत करणे घाम गाळणे हे कर्तृत्वाचे लक्षण समजले जात होते.
आता आता पर्यंत स्पा किंवा ब्युटीपार्लर मध्ये जाणे हे पुरुषांना कमीपणाचे वाटे.
याचे आणखी एक कारण पुरुषाच्या कणखर राकट पणा बद्दल जास्त भरभरून लिहिलेलं असतं आणि लोखंडाच्या कांबीसारखे शरीर हे पुरुषी सौंदर्याचे प्रतीक समजले जात असे. आणि म्हणून पुरुष सुद्धा या मनोवृत्तीच्या आहारी जात असत/ अजूनही जाताना दिसतात.
याउलट स्त्रियांचे गंध जास्त करून नाजूक( feminine), फुलांच्या वासाचे मंद सुगंध देणारे असे असतात. याचे एक कारण मागच्या शतकात स्त्रियांना तेवढे मोकळेपणा नसे यामुळे त्यांचा सुगंध जर तीव्र असेल तर "ती आपली जाहिरात करते" किंवा इतर पुरुषांना "आकर्षित" करण्याचा प्रयत्न करते असा काढला जात असे.
यामुळे कुलीन स्त्रियांनी नेहमी केवळ जवळच्याच पुरुषाला वास येईल असे सुगंध वापरले पाहिजेत हा समज दृढ झाला आहे.
स्त्री म्हणजे तिला फुलं, चॉकलेट, दागदागिने मंद सुगंध आवडलेच पाहिजेत आणि तिने शालीन विनम्र आणि मितभाषी राहिले पाहिजे या वैचारिक बंधनात( stereotype) समाजाने स्त्रीला अडकवले होते/ आहेत.
जसे मुलगी म्हणजे तिला गुलाबी रंग आवडला पाहिजे तिला असेच गुलाबी रंगाचे कपडे घातले पाहिजेत. आणि मुलाला निळ्या रंगाचे.
लग्नात तिने एवढा मोठा झगा घातला पाहिजे किंवा चार वेळेस साड्या बदलल्या पाहिजेत आणि फोटो चांगले यावेत यासाठी भारंभार मेक अप केला पाहिजे. हे समाजाने घातलेले मानसिक पिंजरे आहेत. एखाद्या मुलीला तसे करावे वाटत नसले तर तिला ते स्वातंत्र्यत नक्कीच दिले पाहिजे.
एखाद्या मुलीला निळा रंग आवडला किंवा चॉकलेट फुलं आवडत नाहीत असं समजला तर बरेच लोक आता आतापर्यंत नाक मुरडत असत.
सुदैवाने यात हळू हळू बदल होत आहेत.
आपण अशा वैचारिक बंधनात अडकलो आहोत का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
मुलीला पुरुषांसाठी (?) असलेले सुगंध आवडणे, निळा किंवा तत्सम रंग ( जो पुरुषांसाठी राखीव ठेवला आहे) यात गैर किंवा चूक काहीच नाही. किंवा असे सुगंध आवडणारी मुलगी म्हणजे टॉमबॉयच आहे असे लेबल लावणे हेच चूक आहे.
जंगलात झाडे कशी वाढतात तसे मुलांना आणि विशेषतः मुलींना वाढू द्या. शहरातील बागेसारखे कायम काटछाट करत ते डौलदार आणि सुबक कसे दिसेल असे कायम त्यांच्यावर बंधने न टाकता त्यांना नैसर्गिक रित्या फुलू द्या. मग पहा मुलं आणि मुली कसे जंगलातील झाडासारखे डेरेदार आणि समृद्धपणे वाढतील.
आणि हा मानसिक बदल आपल्या मुलांमध्ये नव्हे तर आपल्या स्वतःमध्ये सुद्धा करू शकता.
सुगंधा बद्दल सुद्धा एक स्टीरीओटायपिंग झालेले सर्रास दिसते ते म्हणजे महाग सुगंध असेल तर तो चांगला. विशेषतः फ्रांस मधला किंवा इटली मधल्या प्रथितयश कंपनीचा असेल तर अजून छान. खरं तर असं काहीही नाही. १० हजार रुपयांचा सुगंध आहे म्हणून तो मला आवडलाच पाहिजे हि कोणती जबरदस्ती?
मला १०० रुपयांचा सुगंध आवडत असेल तर मी तो बिनदिक्कत वापरायला सुरुवात केली पाहिजे.
आपली श्रीमंती दाखवण्यासाठी किंवा आपण प्रथितयश झालो आहोत हे सांगण्यासाठी भारंभार पैसे खर्चच केले पाहिजेत असे नव्हे.
दहा रुपयांना मिळणारा जुईचा गजरा तुम्हाला तितकाच आनंद देऊ शकतो जो एक हजार रुपयांचा निशीगंध आणि दुर्मिळ रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊ शकतो.
सुगंध हा आपल्या मनातला असावा लागतो लोकांच्या संमतीतला नव्हे
छान !माहितीपूर्ण लेख.शीर्षक
छान !माहितीपूर्ण लेख.वरचा प्रतिसादही आवडला.शीर्षक पाहून वेगळचं काहीतरी असेल वाटलं होतं पण आत गंधाबद्दल रोचक माहिती निघाली.
स्त्रियांची वासाची शक्ती पुरुषांच्या पेक्षा दोन ते तीन पट जास्त तीव्र असते .हे मात्र खरंय ,पदार्थ खराब झालाय का ते कसला वास येतोय हे बघण्याची जबाबदारी जास्तकरून स्त्रियांची असते..
मुळ वास घेण्याची शक्ती अद्भुत आहे .+1000000000
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा सविस्तर प्रतिसाद दोन्ही आवडले.
छान आणि उपयुक्त लेख आहे
छान आणि उपयुक्त लेख आहे
जोडीदाराबद्दल आकर्षण निर्माण
जोडीदाराबद्दल आकर्षण निर्माण करणे ... एक कला आहे.
पण ते कमी होत जाणे किंवा संपणे याला वासाशिवाय इतरही बरीच कारणे असतात.
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा सविस्तर प्रतिसाद दोन्ही आवडले. >> +१
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा
माहितीपूर्ण लेख आणि नंतरचा सविस्तर प्रतिसाद दोन्ही आवडले. >> +१
बोंबलाच्या वासाने एखाद्या
बोंबलाच्या वासाने एखाद्या मध्ये चक्क लाळ गळेपर्यंत भूक निर्माण होते तर एखाद्याला मळमळ उलट्या होउन अन्नावरची वासना उडते. घटना एकच पण दोन भिन्न व्यक्तींवर त्याचे १८० अंश आउट ऑफ् फेज परिणाम होतात. त्या व्यक्तिवरचे संस्कार हे एक महत्वाचे कारण असते, जेव्हा एखाद्याचे अन्न हे दुसर्याचे विष बनते त्यावेळी त्यांचे सहजीवन अशक्य बनते. पण दोन्ही गोष्टी नैसर्गिकच आहेत.