फसलेला फराळ

Submitted by किरण कुमार on 30 October, 2025 - 04:27

दिवाळीला घरी आलेल्या माझ्या ट्रेकिंगच्या मित्रांना बायकोने जो फराळ वाढला होता त्यात प्रत्येकाच्या प्लेटमध्ये चार चार लाडू पाहून मला आश्चर्य वाटले. नवऱ्याचे ट्रिपचे आणि ट्रेकिंगचे मित्र बायकोचे जन्मजात शत्रू असतात हे आम्हा ट्रेकर्स लोकांना चांगले माहीत असले तरी बायकोने शत्रूवर केलेले हे थेट आक्रमण मला फारसे आवडले नव्हते. बांधायच्या वेळी नरम आणि लुसलुशीत असलेले लाडू दोन दिवसात तोफांचे लोखंडी गोळे कसे झाले हा प्रश्न आमच्या घरात आधीच सर्वांना पडला होता.
"घ्या, सुरु करा,आम्ही दोघांनी मिळून बनविला आहे हा फराळ यंदा" बायकोने भात्यातून अजून एक तीर कमानीवर चढवला. माझ्या चेहऱ्यावरील विचित्र भाव पाहून मित्रांना थोडे वावगे वाटले खरे पण तिकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांना फराळावर ताव मारणे जास्त सोयीचे वाटले असावे. प्रत्येकाच्या ताटामधली, चकली, करंजी, शंकरपाळी हळूहळू कमी होत चालली असली तरी लाडू मात्र तोंडापर्यंत जाऊन परत खाली ताटात ठेवला जात होता. ते दृश्य पाहून माझी चलबिचल मात्र भलतीच वाढली होती.
"वहिनी, जरा पाणी घ्या हो" समरने आपल्या पिचक्या आवाजात विनंती केली तशा आमच्या सौभाग्यवती किचनमध्ये गेल्या. समरने माझ्याकडे कटाक्ष टाकला "ऐक ना हे लाडू आम्ही घरी जाऊन खातो,तेवढं वहिनीला सांग तूच."
एवढ्या हळू आवाजात बोलूनही माझ्या बायकोच्या कानापर्यंत ते वाक्य पोहचल्यामुळे पाणी घेऊन ती त्वरीत हॉलमध्ये आली. शाळेतल्या गडबड करणाऱ्या पोरांना खडूस शिक्षिकेने झापावे तसे तिने फर्मान सोडले, "अजिबात चालणार नाही,सगळा फराळ इथेच संपवायचा आहे. हवे तर तुम्हाला घरी खायला मी वेगळा बांधून देते, तुम्हाला उद्याच्या ट्रेकींगलाही कामाला येईलच ना!"
"नको नको अजून फराळ" असे एकसूरात सांगत धास्ती घेतलेल्या मित्रांनी लाडूवर लक्ष केंद्रीत केले. मित्रांपैकी संग्राम पीळदार शरीरयष्टीचा होता त्यात कराटेचे प्रशिक्षण घेताना हाताने कौलं, वीटा वगैरे तोडायाचे उद्योग त्याने यापुर्वी केल्याचे आम्हाला माहीत होते. त्यामुळे इतर मित्र त्याच्याकडे आशेने पाहू लागले. संग्रामने दोन तळहाताच्या मध्ये एक लाडू घेऊन तो मोठ्या ताकदीने दाबून फोडला. सर्वांच्या चेहऱ्यावर एखादा गड सर केल्याचा आनंद झळकला.
त्याला इतरांची कोलाहल चांगलीच माहिती असल्याने तो लाडू स्वतः खाण्या ऐवजी त्याने हात पुढे करुन सर्वांना वाटला. बारीक तुकडे झाले असले तरीही दाताखाली खडे चावल्यासारखे येणारे आवाज दातांच्या काळजीने भितीदायक वाटू लागले होते. गेली दहा मिनिटे लाडू कसा फोडायचा ?, तुमच्याकडे पाटा वरवंटा किंवा खलबत्ता आहे का? असे प्रश्न मनातच दाबून ठेवत घाबरलेल्या पब्लिकने आता सुटकेचा निश्वास टाकला होता. पुढील पंधरा लाडू फोडण्याचे दिव्य काम सहाजिकच संग्रामला करावे लागले. इतर फराळ हळूहळू संपत असताना लाडूसाठी तेवढी झुंज चालू होती. सरते शेवटी ते सोळा लाडू एकदाचे पोटात ढकलले गेले.

नेहमीप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी बायकोला माहेरी सोडायला मी तयार झालो होतो मात्र या ट्रेकींच्या समुहाने अचानक रतनगड, अलंग-मलंग सुळक्याचा ट्रेक ठरविला आणि मला पाचारण केले. बायकोला सोडवायला जळगावला जायचे की ट्रेकला या द्विधा मनस्थितीत अडकणारा मी नव्हतो कारण कुठल्याही ट्रेकरला बायकोच्या माहेरापेक्षा त्याचे ट्रेकिंग जास्त प्राधान्याचे वाटते, त्याला मी काही अपवाद नव्हतो. मी बायकोला एक कॅब करुन दिली आणि पोरांबरोबर माहेरी जाण्यास सांगितले.

"बरं... मी जाते माझी माझी", असं शांतपणे म्हणणाऱ्या बायकोच्या मनात काय उद्रेक होत होता ते तेव्हा काही माझ्या लक्षात आले नव्हते. "तुझ्या ट्रेकींगच्या मित्रांना फराळाला बोलाव", असे तिनेच सांगितले तेव्हा भलत्या आनंदात असणारा मी मित्रांच्या दातांचा करकर आवाज ऐकून खजिल झालो होतो.घडलेल्या घटनेचा आणि या लाडवांचा हिशोब ट्रेकींगदरम्यान नक्कीच होणार होता याची पूर्ण कल्पना मला होती. मी जळगावला जाण्याऐवजी ट्रेकींगला येणार आहे म्हणून हे सर्व चालले आहे हे समजायला मित्रांना फार वेळ लागला नव्हता.फराळ संपला तसा "आम्ही निघतो हा वहिनी" म्हणून ट्रेकर्स उठले.

"उद्या ये रे वेळेत स्टँडवर" संग्रामने मला पाहून हलकेच वाक्य फेकले. ट्रेकींगचे मित्र गेले तसे मी "काही गरज होती का लाडू द्यायची" असे सहज बोललो आणि पुढचे दोन तास माझे आणि विशेषतः माझ्या कानांचे भलतेच मनोरंजन झाले.

दुसऱ्या दिवशी पहाटेच कॅब आली. सर्व बॅगा गाडीपर्यंत पोहचवणे माझे परम कर्तव्य असल्यासारखे मी पार पाडले.बायकोला आणि पोरांना गाडीत बसवून बाय बाय केले आणि पुन्हा घरी येऊन गादीवर पहुडलो. मला दुपारी स्टँडवर पोहचायचे होते तिथून एस. टी. ने ट्रेकिंसाठी भंडारदरा गाठायचे होते.तसा बराच वेळ हातात असल्याने आणि सकाळी थोडी भूक लागल्याने मी दिवाळी फराळाचे डबे उघडले. 'आयला ,डब्बे चक्क रिकामे' मी मनातच पुटपुटलो. बहुधा सगळा फराळ बायकोने माहेरी नेला होता तेवढा लाडूचा डबा सोडून...........

"च्यायला, हे बरे आहे, म्हणजे माझ्या मित्रांना हे तोफगोळे खाऊ घातले मग तिच्या माहेरच्यांना हे का नको" माझ्यातील पुरुषी बाणा उगाचच जागा झाला. भूक लागली असली तरी ते लाडू काही मी खाऊ शकलो नसतो. मी वाण्याच्या दुकानातून ब्रेड आणले आणि ऑम्लेट करुन खाल्ले. मला राहून राहून तो लाडवाचा भरलेला डबा सारखा सारखा डोळ्यासमोर येत होता. नाही म्हटले तरी साठ सत्तर लाडू असतील त्यात, ट्रेकींगला तर मी नेणार नव्हतो अजून पंधरा दिवस बायकोही येणार नव्हती म्हणजे लाडू पुढे जाऊन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

लँडलाईन फोनच्या बाजूला असलेल्या काळया डायरीकडे सहज लक्ष गेले. त्यात मित्रांचे नातेवाईकांचे फोन नंबर तर होतेच शिवाय पत्तेपण होते. आपल्याकडे सर्वांचे पत्तेही असले पाहिजेत हा आग्रह अर्थात बायकोचाच होता.

'लाडू का बदला लाडू से लिया जाए तो', मनात एक असुरी विचार तरळला.तसेही पुढचे तीन चार तास काही काम नव्हते. कुरीयरवाला भीमा माझ्या ओळखीचा होता,लगेच त्याला कॉल लावला.

"सोलापूर, नांदेड, जळगाव आणि नगरला फराळ पार्सल करायचा आहे, साधारण किती दिवसात जाईल"
"फार वेळ लागत नाही भौ,दोन तीन दिवसात डिलिव्हरी होऊन जाईल"
भीमा त्याच्या टिपिकल टोनमध्ये उत्तरला"
"ये मग घरी माझ्या, सात आठ छोटे बॉक्स घेऊन ये,फराळ पार्सल करायचा आहे."
अस्मादिकांनी डाळ शिजवायला घेतली होती.

काळया डायरीमधून शोधून शोधून बायकोच्या नातेवाईकांचे आणि तिच्या मैत्रीणींचे पत्ते मी वेगळे लिहून काढले. प्रत्येक पार्सलबरोबर एक चिठ्ठी लिहिली.

"दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. यंदा आम्ही बनविलेले लाडू आपणास पाठवित आहोत आवडल्यास मला मोबाईलवर जरूर कळवावे.
आपलीच"
खाली अर्थातच बायकोचे नाव आणि मोबाईल नंबर.

भीमा पार्सलचे बॉक्स आणि पैसे घेऊन गेला. मी ट्रेकर्स बरोबर दुपारी चारच्या एसटीत बसलो. ट्रेकिंग दरम्यान मोबाईलला कुठेही रेंज नव्हती. आम्ही मनसोक्त भटकंती करत पुढचे तीन दिवस मोठा ट्रेक केला त्यानंतर दोन दिवस तिकडेच गाडीने अभय अरण्यात फिरत बसलो. तब्बल आठवड्याने अस्मादिकांची स्वारी घराकडे परतली.

एव्हाना आपले लाडू बॉम्ब सगळीकडे फुटले असणार या विचाराने माझ्या चेहऱ्यावर असुरी आनंद झळकला. माहेरी गेल्यावर चार चार तासाला कॉल करणाऱ्या बायकोने पुढचे सात दिवस काही कॉल केला नव्हता त्यामुळे नंतरच्या महायुद्धाची मला स्पष्ट कल्पना आली होती. काल तिचा कॉल आला तेव्हा थोरल्या पोराने सांगितले की ते सर्वजण पोहोचतील रात्रीपर्यंत.

माझी धडधड आता वाढू लागली होती. जगदंबा हातात झाडू घेऊन दर्शन देणार असे वाटू लागले होते.त्या रात्री साडेदहा वाजायच्या सुमारास आमचे वादळ पोरांसह घरी धडकले. ते सर्वजण बाहेरुन जेवण करुन आले होते. बायको माझ्याशी फारसे न बोलता आवरुन झोपायला गेली तसा मी थोडा आश्चर्यचकीत झालो. मी उगाचाच नको नको ते विचार करत रात्र जागून काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे मला बायकोने चहा आणून दिला जणू काही काहीच घडले नसावे. 'लाडू बॉम्ब फूटले का?' हा प्रश्न विचारण्याची माझी इच्छा होती खरी पण भीती वाटत होती.

"छान केले तुम्ही लाडू पाठवले सगळ्यांना. तसेही ते खराब झाले असते इथे" तिनेच फिरकी टाकल्याने मी अजून गोंधळलो.

"तुला राग नाही आला का, तुझ्या माणसांना मी कडक लाडू पाठवले म्हणून" माझे कुतुहल टोकाला पोहचले.

"छ्या त्यात काय राग यायचा,लाडूच तर आहेत काय कडक,काय मऊ, प्रेमाने पाठवले ते महत्वाचे."

नेहमी वसकन अंगावर धावून येणारी बायको अचानक समंजस वागणारी कशी काय झाली ते काही मला कळाले नाही. कदाचित माहेरच्या प्रेमाचा परिणाम असावा असेही एकदा वाटून गेले.

बायकोच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.

"आणि तसेही लाडू माझ्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना नाही पाठवले...... ते तर तुमच्याच मित्रांच्या घरी पाठवले ना तुम्ही! "

माझ्या डोळ्यांची बुबुळे आतल्या आत गोल फिरून गेली
"म्हणजे ...."
"म्हणजे तुम्हीच विचारा तुमच्या कुरिअरवाल्याला" बायको एव्हाना खो खो हसू लागली होती.

"थांब लावतोच फोन त्या भीमाला"
काय गोंधळ घातलाय त्याने काय माहीत.

"ए भीमा, पार्सल कुठे कुठे पाठवले माझे नेमके?" मी मोठ्या आवाजातच त्याच्याशी बोललो.

"काय भाऊ तुम्हीपण, तुम्ही पार्सल दिले माझ्याकडे पण त्यात चार ॲड्रेस वर पिन कोड नव्हता. घेणाऱ्याचा मोबाईल नंबर पण नव्हता म्हणून तुम्हाला दुसऱ्याच दिवशी कॉल लावत होतो तर आउट ऑफ रेंज होते तुम्ही.शेवटी आम्ही एक बॉक्स उघडला त्यात चिठ्ठीवर खाली वहिनींचा नंबर होता त्यांना कॉल केला पिन कोड विचारायला. वहिनीने सगळे पत्ते आणि फोन नंबर, पिन कोड नंबर आम्हाला व्यवस्थित लिहून पाठवले म्हणून बरे झाले.आतापर्यंत फराळ पण संपले असेल तुमच्या मित्रांच्या घरी"

ट्रेकींगला आमचे कॉल लागत नाहीत, घरचे काळजी करुन बरोबर कोण कोण गेले त्यांच्या घरीही चौकशी करतात म्हणून सर्व ट्रेकींगवाल्याचे फोन नंबर आणि पत्ते याची एक यादी करून सर्वांच्या घरी याआधी कधीतरी दिल्याचे मला पटकन आठवले.
माझ्या मित्रांच्या घरच्यांनीही लोखंडाचे लाडू खाल्ले असतील त्यामुळे आता त्यांच्या घरी गेलो की मला त्याचेही वेगळे टोमणे ऐकायला लागणार होते.

आमची जळगावची बायको भलतीच हुशार निघाली होती तिचे तर फक्त लाडू फसले होते. माझे मात्र फराळ आणि कुरिअरचे गुऱ्हाळ दोन्ही फसले होते.

- किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol