गंमत बघ…

Submitted by -शर्वरी- on 29 October, 2025 - 16:15

तू गंमत बघ,
आजही दिवस उगवतो, आणि मावळतो.
वेळच्या वेळी लागते आता भूक, तहान.
होतो आनंद, वाटते भीती, चिंता, अभिमान.
उगवत्या संध्याकाळी येतो बिलोरी चंद्र आकाशात.
दिवाळीच्या पहाटे गारव्यात लखलखते रात्र अंगणात.

आजही वाढतात झाडे, आजही फुलतात फुले.
पाखरे बांधतात घरटी पुन्हा परतून येण्यासाठी.
नविन झाडाला नवी पालवी, नविन फळ, नवे फूल.
आजही वाटते सगळे जुनेच, अजूनही बसली नाही धूळ.

कसे बदलले नाही काही? दिवस रात्रीचे चक्र फिरे.
तू नाहीस यात… तरी सुद्धा, कुठे न त्याला खिळ बसे?
त्या पडद्यामागे नवेच जग, अज्ञाताचे रहस्य भासे…
इथून तिथे जाण्यासाठी, एकच क्षण पुरा असे?
सहजच गेलीस कोणा गावी, न निरोप घेऊन वळून पाहिले.
झिरमिरता पडदा पडता बंध जन्मीचे गळून पडले.

सगळे आहे तसेच; कसे बदलले नाही काही!
तरीही गंमत बघ…
तू गेलीस आणि सारे बदलले आई!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! जरा वेगळ्या संदर्भात शांता शेळक्यांच्या खालील ओळी आठवल्या ही कविता वाचताना

सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे,
मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे,
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी.

अर्थात ह्या गाण्याची सिच्युएशन खूप वेगळी आहे