Villach. युरोपला जाणार्या पर्यटकांच्या यादीत ऑस्ट्रियातलं हे ठिकाण असण्याची शक्यता फारशी नसते. पर्यटक कंपन्यांनी सवय लावलेल्या ‘पॉप्युलर युरोप’मध्ये ऑस्ट्रियातली इन्सब्रुक, साल्झबर्ग ही शहरं असतात. कधीतरी चुकूनमाकून व्हिएन्ना असतं. पैकी पहिली दोन शहरं जर्मनीच्या सीमेलगत, त्यामुळे ‘पॉप्युलर युरोप’च्या वाटेवरच आहेत असं म्हणू शकतो. व्हिएन्ना पडली ऑस्ट्रियाची राजधानी. तुलनेने Villach खाली ऑस्ट्रियाच्या दक्षिण सीमेजवळ आहे. तिकडे वाट वाकडी करून कोण कशाला जातंय?
तरीही Villach ला (स्थानिक उच्चार - फिलाख) आमचे पाय लागले त्याला पर्यटनापलीकडचं एक वेगळंच कारण ठरलं.
ध्वनीप्रदूषणाविरोधात काम करणार्या एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेची माहिती वाचण्यात आली. ही संघटना शांततेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आटापिटा करते; जगभरातल्या सर्वाधिक शांत जागा शोधते. त्यांच्या वेबसाइटवर अशा जागांची माहिती दिलेली असते. एकदा सहज ती माहिती वाचताना Vilaach, Austria हे नाव तिथे दिसलं. योगायोगाने तेव्हा आमचं जर्मनी-ऑस्ट्रियाला जायचं चाललं होतं. त्यात साल्झबर्गला जाणार होतोच. तिथून Vilaach ला जावं का, असा किडा डोक्यात वळवळायला लागला.
गूगलच्या मदतीने आणखी थोडी माहिती शोधली. साल्झबर्गहून ट्रेन होती; एका दिवसात जाऊन येता येणार होतं. मग तो किडा कुठली पाठ सोडायला! अखेर साल्झबर्गमधल्या साडेतीन दिवसांपैकी एक दिवस Villach ला बहाल करून टाकला. आणि त्या दिवशी दोन तास ट्रेन प्रवास करून ध्यानीमनी नसणार्या त्या गावात जाऊन पोहोचलो.
त्या दिवसाच्या आमच्या फिरस्तीला एकच tag होता- जगातल्या सर्वाधिक शांत जागांपैकी एका ठिकाणी आपण जातोय. तो टॅग सोबत बाळगूनच रेल्वे स्टेशनमधून बाहेर आलो.
फोनवरच्या नकाशात city centre दिसलं ती दिशा पकडली आणि चालायला सुरुवात केली. १०-१५ मिनिटांत रमतगमत तिथे पोहोचलो. तर हा एक ब्राँझमधला बिअर-बाबा सामोरा आला. बिअरचा मग उंचावून मजेत उभा होता. डावीकडे एक रस्ता ‘बिअर गार्डन’ला जात होता. तिकडे दुर्लक्ष करून पुढे झालो तर एक storyteller दिसला. तुम्हाला वाटलं तर थांबा, पुढे गेलात तरी माझी हरकत नाही, असं जणू सांगत होता तो.

युरोपमधलं हे असं street art मला फार भुरळ घालतं. कुणा ग्रेट लोकांचे पुतळे असतात असं नाही. तुमच्या-आमच्यासारखी साधीसुधी माणसं असतात ती. कधी त्यामागच्या कलाकारांची माहिती तिथे दिलेली असते, इंग्रजीत असली तर वाचली जाते. माहिती वाचता आली नाही तरी तो पुतळा/म्युरल न्याहाळण्याची उत्सुकता वाटल्याशिवाय राहत नाही. सर्वाधिक भावतं ते त्यामागचं surprise element. चालताचालता अचानक दिसतात हे public art pieces. त्यात भारी मजा असते. असंच आणखी एक surprise element पुढे वाढून ठेवलं होतं. पण तेव्हा आम्हाला त्याची कल्पना नव्हती.
स्टोरीटेलरची स्टोरी थोडावेळ ऐकून पुढे झालो. आता पुढे एक नदी आडवी येत होती. ही Drava नदी.

संथ प्रवाह, मध्यम रुंदीचं पात्र. नदीवर एक पूल दिसत होता. पुलाच्या आधी एका ठिकाणी एक ब्राँझ विदूषक दिसला. त्याच्या चेहर्यावरचं मंद स्मित आणि निवांतपणा मला फार आवडला. त्याच्या मागच्या कॅफेत काहीजण निवांत बिअर पीत बसले होते.
आम्ही पूल ओलांडून old town मध्ये प्रवेश केला. दुपारची वेळ असूनही हवेतला गारवा, कोवळं ऊन, शांत रस्ते, शुकशुकाट, पानगळीचे लाल-पिवळे-केशरी रंग... Villach चं जग अगदी धीम्या गतीत निघालं होतं. अधल्यामधल्या वाराची अधलीमधली वेळ होती म्हणूनही असेल. तो शांतपणा, निवांतपणा डोक्यात, मनात आत आत उतरत होता. भले ते शहर म्हणजे सर्वाधिक शांत जागांपैकी एक नसेल, त्याच्या आसपासच्या एखाद्या जंगलामुळे त्याला ते बिरुद दिलं गेलं असेल, पण तरी ती शांतता हवेवर स्वार होऊन शहरात येत असणारच. वाटलं, तिथल्या लोकांना कल्पना असेल का अशा काही बिरुदाची? पण ती शांतता त्यांच्या जगण्याचाच एक भाग होती; त्याची वेगळी नोंद ते कशाला घेतील? ते काम आपलं, कारण अशी शांतता दुर्लभ आहे ती आपल्यासाठी. तिथल्या लोकांना थोडी गजबज, वर्दळ हवीशी वाटत असेल का? पिकतं तिथे विकत नाही वगैरे?
सौंदर्य बघणार्याच्या दृष्टीत असतं म्हणतात. तशी त्या दिवशी ती शांतता माझ्या कानांमध्येच होती.

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानसहान रस्ते, गल्लीबोळ दिसत होते. वाटलं तर तिथे वळायचं, जरा पुढे जाऊन परतायचं, असं आमचं चाललं होतं. असंच एका गल्लीत एक केक-शॉप दिसलं. आत शिरलो. ते दुकान १८५९ सालापासून त्या जागी उभं आहे म्हणे. त्याची मालकी तेव्हापासून एकाच कुटुंबाकडे आहे. अशा केक शॉपमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये मेनूकार्डातले आंतरराष्ट्रीय ओळखीचे पदार्थ सोडून काहीतरी local शोधण्याची तयारी हवी. मग त्यासारखी दुसरी मजा नाही. असाच एक पेस्ट्रीचा प्रकार आम्ही मागवला. जोडीला कॉफी. शांततेने कॉफीला पोटात सोडलं, की कॉफीसहित शांतता पोटात गेली, सांगता येणार नाही. कॉफी ढवळताना होणारा चमच्याचा आवाजही मोठा वाटत होता. चमचा कपावर आपटू न देता ढवळण्याचा आपसूक प्रयत्न केला गेला. डोळे मिटून शांतपणे कॉफीचे एक-एक घुटके घेतले गेले.
तिथे बसल्या बसल्या पुन्हा एकदा नकाशा पाहिला. साधारण अर्धा-एक किमी अंतरावर एक बाग दिसत होती. वेळेचा अंदाज घेतला. तिथपर्यंत जायचं, बागेत थोडा वेळ काढायचा आणि निघायचं, असं ठरवलं. केक-शॉपवाल्या बाईशी दोन-चार वाक्यं बोलून बाहेर पडलो.
पुन्हा सुरू- ही गल्ली, तो रस्ता, इथे थांब, तिथले फोटो काढ. रस्त्यावर पिवळ्या-केशरी पानांचा खच पडला होता, सिमेंटच्या रस्त्यांचा करडा रंग आणि ते रंग- कमाल रंगसंगती! (fall च्या दिवसांमध्ये ही रंगसंगती सगळीकडेच असते, कितीही बघा, समाधान होत नाही.) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहती घरं, मध्येच एखादी १००-२०० वर्षं जुनी इमारत, त्यावर चढलेल्या लालचुटुक पानांच्या वेली. या वेली इमारतींसाठी धोकादायक असतात म्हणे. पण दिसतात फार सुंदर.
...आणि एका छोटुशा स्मारकवजा रचनेने मनातल्या शांततेचा भंग झाला.

रस्त्याच्या कडेला एका इमारतीच्या कम्पाउंडच्या भिंतीला लागून कोपर्यात एक वीतभर चौथरा होता आणि त्यावर नारळाएवढा अगदी गोल एक दगड. त्या चौथर्यावर ‘25.2.1945’ अशी तारीख कोरलेली होती. दुसर्या महायुद्धादरम्यान त्या दिवशी Vilaach वर दोस्तराष्ट्रांनी तुफान बॉम्बहल्ले केले होते. बहुतांश शहर बेचिराख झालं होतं. त्याची आठवण म्हणून ते स्मारक. विध्वंसाच्या तुलनेने अगदीच लहानसं. फार कलापूर्ण काही नव्हतं. जवळ जाऊन उभं राहिलं तर उंची गुडघ्याइतकीही नव्हती. अर्थात इतका इतका विध्वंस म्हणजे इतकं इतकं मोठं स्मारक हवं, असं काही सूत्र नसतंच म्हणा. काळाच्या पट्टीवर ती आठवण आता खूप मागे गेलीय, त्यामुळे स्मारकही लहानसं आहे, असं आपलं उगीच स्वतःला सांगितलं आणि पुढे झाले. मनातली शांतता मला धरून ठेवायची होती.
थोड्या वेळात त्या बागेपाशी पोहोचलो. दर्शनी भागात एक चर्च आणि मागे बाग होती. मध्यम आकार, भरपूर झाडी, मध्यात कारंज्याचा आयताकृती हौद. बागेत बसायला बाकं असल्याचं लांबूनच दिसलं होतं.

आधी जाऊन एक बाक पकडला. अशी जागा ‘पकडण्याची’ आपल्याला एक फार सवय असते. एरवी पर्यायच नसतो दुसरा. तिथे त्याची गरज नव्हती, हे बाकावर टेकल्यावर जाणवलं. जरा पाणी वगैरे पिऊन आसपास पाहिलं तर तिथे जागोजागी पांढर्या रंगाची abstract sculptures दिसली. जमिनीवर केशरी पानांचा सडा आणि तो पांढरा रंग. मी टुणकन उडीच मारली.

उठून बागेत एक मोठी फेरी मारून आले. सगळी शिल्पं शांतपणे बघितली. काही समजली. काही नाही समजली. कदाचित एकदा पाहून कळत नसतील, ते घडवणार्यांची तीच योजना असेल, चार-पाचदा पाहिल्यावर काहीतरी लक्षात येईल, असंही असू शकतं. असं थबकून प्रत्येक शिल्पाकडे बघायला, त्यावर विचार करायला अवसर मिळणं, हा सुद्धा शांततेचाच एक प्रकार म्हणावा का? सर्वात आवडलं ते INFINITY चं शिल्पं. कारण विचारू नका. ते पाहिल्या-पाहिल्या त्याला दाद दिली गेली, बस्स!

बागेत तासभर वेळ ‘काढायचा’ ठरवला होता, तो भराभर पळूनच गेला. निघायची वेळ झाली.
आम्ही कशी काय त्या बागेची निवड केली? कल्पना नाही.
की Vilaach च्या शांततेनेच आम्हाला निवडलं होतं?
त्या शहरात आणखीही काही बघण्यासारखं असेल, जे आम्ही शोधलंच नाही, असंही असू शकतंच.
सगळ्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या नादातच पर्यटनातली शांतता आपण गमावतो का?
---
(युनिक फीचर्स पोर्टलवर पूर्वप्रकाशित)
माझ्या अनुभवात, लोक तुम्हाला
माझ्या अनुभवात, लोक तुम्हाला विचारतात कुठले. मी सांगते पुणे मग मीही प्रतिप्रश्न करते तर ते पुणे म्हणतात. पण आपल्याला उलट विचारतात - बॉर्न & ब्रॉट अप पुण्यातच का? आपण हो म्हणुन प्रतिप्रश्न केला की त्यांचे वेगळे गाव कळते.
अर्थात हे २-३ अनुभव. अनेक्डोटल आहेत.
अमेरिकेत जा नाहीतर युरोप
अमेरिकेत जा नाहीतर युरोप मध्ये नाहीतर चंद्रावर
संकुचित वृत्तीच्या लोकांची मानसिकता नाहीच बदलणार
सुरेख अनुभव आणि शब्दांकन.
सुरेख अनुभव आणि शब्दांकन. फोटोतून शांतताही पोहोचतेय.
चर्चाही आवडली. मला वाटतं पर्यटकांचेही उत्क्रांतीचे टप्पे असावेत. कोणी कोणत्या पायरीवर असावं हे अनेक घटकांवर अवलंबून असणार. कोणी लहान नाही आणि कोणी थोर नाही त्यात. आपला अनुभव आपण निवडावा आणि आपणचि भोगावा.
लेख आणि लेखात वर्णन केलेली
लेख आणि लेखात वर्णन केलेली जागा छान आहे.
मामी, प्रतिक्रिया आवडली.
मामी, प्रतिसाद आवडला. हेच
मामी, प्रतिसाद आवडला. हेच लिहायचं होतं पण जमत नव्हतं.
उत्क्रांती वगैरे असेलही पण
उत्क्रांती वगैरे असेलही पण बरेचदा अहंगंड, न्यूनगंड, न्यूनगंडांतुन येणारे अहंगंड वगैरे मानवी स्वभावाचे नमुने संवादातून, प्रश्नोत्तरातून पहायला मिळतात. असूया, मत्सर वगैरेही. हे मी माबोच्या पलिकडच्या विशेषतः अमेरिकेत आलेल्या मराठी लोकांच्या निरीक्षणाबद्दल बोलते आहे.
वी आर वायर्ड फॉर कनेक्शन. 'बिलॉन्गिंग' लागते आपल्याला. समूहाचा घटक असणे ही गरज आहे. पण आपणच भोवताली भिंती उभारत असतो, दुसर्याने उभारली की दुखावुन घेत असतो, दुखवत असतो वगैरे वगैरे.
बघा बरं, मी जिथली आहे तिथले
बघा बरं, मी जिथली आहे तिथले इथं कुणी नाही म्हणून मला यावेळी अनुमोदन द्यायला सुद्धा इथं कोणी नाही आणि तुम्ही बरोबर 'आपापली' बाजू जशी जमेल तशी सांभाळून घेतलीच. असं होतं (कुठेही ) संख्याबळाने कमी असले की. Thank you for proving my point!
आता मला जास्त समजवावे लागणार नाही. मी पर्यटक नाही, परदेशात वर्षानुवर्षे स्थायिक आहे. त्यामुळे हे अवांतर झाले पण 'इमोशनल क्लोजर' देऊन टाकायला ही पोस्ट लिहून संभाषण संपवते.
रॉय, सामो आणि स्पार्कलला पोचले.
गैरसमज वगैरे काही नाही स्वाती. महाराष्ट्र मंडळातले अनुभव आहेत बरेचसे, बरेच जुने आहेत - LA आणि थोडेफार कॅलगरी. दहा वर्षं लागतात मैत्री व्हायला, सिद्ध होते मग आपोआपच. मुळात सिद्ध का करावे लागावे. You know me, मी घाईघाईने मत बनविणाऱ्यांपैकी नाही. फ्रेंडली, पेशंट आणि रिस्पेक्टफुल आहे. सरळ सरळ बोललेली सुद्धा उदाहरणे आहेत. तुमची सुद्धा प्रगती होत आहे हे चांगलेच आहे वगैरे. बराच वेळ देऊन, बरेच कार्यक्रम अटेंड करून, बऱ्याच वेगवेगळ्या जणांशी बोलून एकंदरीत हे प्रकरण माझ्या सेल्फ एस्टीमसाठी चांगले नाही असे वाटून मी आधी महाराष्ट्र मंडळ सोडले व 'नॉन मराठी' मित्रमैत्रिणी शोधले. ते मला सहज मिळाले. येथे मात्र मला भरपूर मित्रमैत्रिणी मिळाले पण ते लेखनामुळे. आता काय सगळीकडे लिहून दाखवू की काय!
>>> मी जिथली आहे तिथले इथं
>>> मी जिथली आहे तिथले इथं कुणी नाही म्हणून मला यावेळी अनुमोदन द्यायला सुद्धा इथं कोणी नाही आणि तुम्ही बरोबर 'आपापली' बाजू जशी जमेल तशी सांभाळून घेतलीच.
पण मला हाही तसाच गैरसमजच वाटतो आहे! म्हणजे एकतर इथे कोणी ठरवून कोणाची ‘बाजू’ सांभाळली नाही, आणि ज्यांनी तुझ्याहून निराळा अनुभव नमूद केला, त्यांच्या मूळ गावा/ठिकाणाचा ते अनुभव जुळण्याशी काहीच संबंध नाही! असलाच तर सध्याच्या राहत्या ठिकाणाचाच संबंध असेल!
शिवाय अनुमोदन तुलाही रॉय यांनी दिलं आहे की!
>>> तुमची ‘सुद्धा’ प्रगती होत आहे हे चांगलेच आहे
असं म्हणणं मात्र खरोखरच विअर्ड आहे - कुणालाही राग येईल.
>>> मी घाईघाईने मत बनविणाऱ्यांपैकी नाही
हो, म्हणूनच असा ग्रह पक्का होण्याइतके (संख्या आणि/किंवा तीव्रता या अर्थी) नकारात्मक अनुभव आले याचं सखेदाश्चर्य वाटलं. असो.
दुधाने तोंड पोळलं की ताकही फुंकून पिणं हा मानवी स्वभाव आहे आणि तू लिहिलंस त्याप्रमाणे सेल्फ एस्टीम जपायला तो आवश्यकही आहे.
सॉरी ललिता, फारच अवांतर झालं
सॉरी ललिता, फारच अवांतर झालं हे सगळं तुझ्या धाग्यावर!
लेख बघितलेला पण वाचायला
लेख बघितलेला पण वाचायला शांतपणा मिळणार न्हवता म्हणून ठेऊन दिलेला तो आज वाचला.
ती शांतता चित्रात आणि शब्दात ही झिरपली आहे.
कुठे गेलो की पर्यटकी जागांबरोबर असंच नकाशात बघून काय आवडेल त्या जागा, जिकडून पूर्वजांनी चांगले फोटो काढले आहेत अशा जागा नक्की शोधतो. कधी सगळ्या गोष्टी बघायचा अट्टाहास करतो, कधी भोज्ज्याला हात लावला की उरलेल्या वेळात असं काही दिसतंय का शोधतो. सारखी शांतता ही नको वाटते, आणि कोलाहल ही सारखा नकोच वाटतो.
>>>>सिद्ध होते मग आपोआपच.
>>>>सिद्ध होते मग आपोआपच.
हा मुद्दा फार आवडला. मंत्रासारखी च मैत्रीही सिद्ध व्हावी लागते. मंन्त्रांचे १ लक्ष, अहा लक्ष वगैरे पुरश्चरण झाले की मंत्र सिद्ध होतात, तशी मैत्रीही अनेक वर्षांनंतर सिद्ध होते
प्रतिक्रिया वाचून....
प्रतिक्रिया वाचून....
इथे आणि एकूणच सगळीकडे बाहेर फिरायला गेलं की तिकडचे पदार्थ खा. तिकडे जाऊनही पुरणपोळी आणि गुलाबजाम खाणे म्हणजे अगदीच कमी लेखणे वगैरे वाचतो. माझं स्वतःचं मत बराच काळ थोडंफार असच होतं. किंबहुना अजूनही लोकल गोष्टी पदार्थ यांनाच प्राधान्य देतो. पण लोकं काय खात आहेत यावर टिपण्णी करू नये इतकं आता समजतं. किंबहुना टीटलीस वर वडापाव जरा बरा मिळणार असेल तर मी कधीही तोच खाईन. कारण आयता चांगला वडापाव ही चीज मला अजिबात मिळत नाही हे एक आहेच, पण तो कंफर्ट आहे माझा. क्वासा आणि पेस्ट्री आणि श्वारमा इथे फ्रान्स आणि मिडलीस्ट पेक्षा चांगलं मिळतं. पण वडापाव नाही मिळत. 40 वर्षांत काय आवडणार नाही ते समजतं. त्यातून वन स्टेप ॲट अ टाईम नवं शोधतो. पण आता नवं शोधायची तितकी उर्मी राहिली नाही, स्टेक खायची रोजची सवय नाही आणि अचानक स्टेक आणि रिब्स खाऊन दिवसभर वॉशरूम शोधण्यापेक्षा त्यावेळात चार गोष्टी बघेन. बाहेरचे फूड ट्राय करणे ही आताशा तितकी प्राधान्यक्रमावरील गोष्ट राहिलेली नाही.
भारतात पूर्णवेळ राहिलेल्या ज्येनानी बाहेर गेल्यावर काय खावं आणि खाऊ नये .... रादर कोणीही काय खावं आणि खाऊ नये ह्याची चर्चा स्वतःला लिबरल समजणारे का हौशीने करतात आणि त्यांना त्यात काहीच विरोधाभास कसा जाणवत नाही हे कोडं आहे. कोणाला नवे अनुभव घ्यायचे नाहीत तर नाहीत. त्यात काहीही चूक बरोबर कसं असेल? इथेही तो रोख अनेक प्रतिक्रियांत जाणवला म्हणून लिहिलं.
कारण आयता चांगला वडापाव ही
कारण आयता चांगला वडापाव ही चीज मला अजिबात मिळत नाही हे एक आहेच, पण तो कंफर्ट आहे माझा. क्वासा आणि पेस्ट्री आणि श्वारमा इथे फ्रान्स आणि मिडलीस्ट पेक्षा चांगलं मिळतं. पण वडापाव नाही मिळत.
>>>>
बाकीचे जाउदे पण आता कॅनडात वडापाव मिळत नाही म्हणजे तू योग्य त्या व्हाट्सअॅप ग्रुपवर नहियेस
सध्या इथे महाराष्ट्रात मिळणार नाही इतके मराठी पदार्थ विकणारे झाले आहेत.
वडापाव नको, व्हॉट्सॲप ग्रुप
वडापाव नको, व्हॉट्सॲप ग्रुप आवर व्हायचं.
त्यापेक्षा टीटीलस वर जाऊन त्या रॉय खानावळीत पापलेट आणि बिरडं खाऊ आपण. इथे रोज उठून देसी लोक आणि देसी पदार्थ नको.
>> खानावळीत पापलेट <<
>> खानावळीत पापलेट <<
संभाव्य गिर्हाईकांचे डेटा एनालिसिस केल्यास त्यांत पापलेट खाऊन धर्म बुडवणारे लोक जास्त निघणार नाहीत त्यामुळे आमच्या खाणावळीत पापलेट मिळण्याची शक्यता कमीच आहे.
>> पण आता नवं शोधायची तितकी उर्मी राहिली नाही, स्टेक खायची रोजची सवय नाही आणि अचानक स्टेक आणि रिब्स खाऊन दिवसभर वॉशरूम शोधण्यापेक्षा त्यावेळात चार गोष्टी बघेन. <<
हे ही बरोबर आहे. परंतु त्याने एक गोष्ट मात्र आपल्या ज्येना पर्यटकांची मिस होईल. मुतायला आणि पोट मोकळं करायला EURO कन्वर्टेड टू INR रक्कम लागते असे नातेवाईकांच्या (किंवा उबर ड्राइवर च्या) चेहऱ्यावर अचंबा निर्माण करणरे एक पेटंट वाक्य फेकता येण्याची शक्यता थोडीशी कमी होते.
रॉय यू आर प्रेडीक्टेबल.
रॉय यू आर प्रेडीक्टेबल.
उंदीर म्हटलं की आम्ही सापांची खीर कशी लहानपणी खायचो त्याची गोष्ट सांगणार. ते झालं की झुरळं आणि मुंग्या खाऊन कसे आदिवासी जगतात ते सांगणार. मुद्दा तेवढा लक्षात घेणार नाही. 
मला खात्री होती पापलेट लिहिल्यावर तुम्ही 'आम्ही फक्त उंदीर सर्व करतो' पवित्रा घेणार
अनप्रेडीक्टेबल असायला मी काय
अनप्रेडीक्टेबल असायला मी काय AI आहे का? मी ही माणूसच आहे.
अमितव, तुझा वरचा मोठा
अमितव, तुझा वरचा मोठा प्रतिसाद पटला. व्हेजिटेरियन असाल तर तसंही फार ऑप्शन्स शिल्लक नसतात.
मला फार फार आश्चर्य वाटलं हे
मला फार फार आश्चर्य वाटलं हे वाचून. मी माझ्या इथल्या कुठल्याच ऑनलाईन किंवा ऑफलाईन मराठी वर्तुळात हे पाहिलेलं नाही.
उलट लोक माहीत नसेल तर अगदी हौशीने ‘म्हणजे नेमकं कुठेशी आलं’ वगैरे विचारतात, ओळखी काढतात. >>>>>> संपूर्ण अनुमोदन! कॉलेजमध्ये, ऑफिसात आणि इथल्या महाराष्ट्रीय वर्तुळात पुणे मुंबई बाहेरची अनेक मंडळी आहेत आणि कुठेही हे पाहिलेलं नाही. उलट प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भागातल्या पद्धती आणि मुख्य म्हणजे खाणं ह्याबद्दल कुतूहलच असतं. ( अस्मितालाच इथे मायबोलीवर तीन चार वेळा तरी त्या चर्चेत काही संदर्भ नसताना पुण्याला आणि पुणेकरांना नावं ठेवताना बघितलेलं आहे! )
ही चर्चा खरतर ह्या बाफावर अवांतरच आहे आणि त्यामुळे अजून थोडं अवांतर.
हल्ली मायबोली उलट्या बाजूने विखारी होत चालली आहे असं वाटायला लागलं आहे. हिंदुंना, ब्राह्मणांना, शहरात रहाणार्यांना झोडपा हवं तसं.. चालतं सगळं, काय फरक पडतो? पेहलगाम हल्ल्याचा कुठलेही "पण" "परंतु" न करता स्पष्ट निषेध करणंही काही जणांना जड गेलं होतं. मी राजकारणाच्या ग्रुपांमध्ये नाहीये पण मध्यंतरी काहीतरी शोधताना दिसलं की सरकार विरुद्धची मंडळीच प्रचंड स्ट्राँग आणि विखारी भाषेत चर्चा करत होती! कधीही कोणी आत्ताच्या सरकारचं कौतूक केलं काही जण अगदी डुख धरून नंतर कुठलाही विषय असेल तरी त्यावर विरोध करतात. हे मुंबई पुण्याबद्दलचं एक उदाहरण वर लिहिलच आहे. बाकी सतत उच्चासनावर बसून फंडे झाडणार्यांना तर सोडूनच द्या. असो.
सुंदर फोटो सहित लेख
सुंदर फोटो सहित लेख
शांतता झिरपत गेली वाचताना
थोडे relax क्षण हवेतच ट्रिप मध्ये
बहुतेक वरणभात वाली मंडळी
बहुतेक वरणभात वाली मंडळी तिथले वुर्स्ट वगैरे कुठली खायला? त्यांना दोन दिवसात घरची आठवण करून द्यायला एखादे पोळी भाजी केंद्र काढावे म्हणतो. चांगले चालेल. - रॉय>>≥>>> कोणाकोणला झोपताना pindrop silence लागतो, कोणाला जेवायला वरणभात. Pindrop silence वाले वरण भाताला का judge करत आहेत?
… सुंदर स्लोवेनियालाही भेट
… सुंदर स्लोवेनियालाही भेट द्या. ब्लेड, बोहिन्स्क्य, स्लाप कोझ्याक वगैरे नितांत सुंदर…
याला अनुमोदन द्यायचे राहिले होते. लेक ब्लेड मी समर ब्यूटी म्हणून बघितलाय, तिथे राहिलोय. पण त्याचे बर्फाच्छादित रूप बघायला पुन्हा जायचे आहे - जाणार आहे, इंशागोविंदा !
ती शांतता चित्रात आणि शब्दात
ती शांतता चित्रात आणि शब्दात ही झिरपली आहे.>>>>>>>अमितव+१
आम्ही आजच जॉर्जियाला आपणच
आम्ही आजच जॉर्जियाला आपणच आयोजन करून १० दिवसांनी परत आलो..... लवकरच ते ही तत्सम अनुभव शेअर करायला प्रेरणा मिळाली.
वाह... अश्या ठिकाणी जावंच
वाह... अश्या ठिकाणी जावंच लागेल. रीळा बनवणाऱ्या झोंबीज नी जगात उच्छाद मांडला आहे त्यामुळे कुणाच्या रडारवर नसलेली ठिकाणं आजकाल कमीच.
Pages