अनोळखी कॉल

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 September, 2025 - 07:18

या आधी लिहिलेल्या कवितेत काही बदल सुचले..

वयाच्या त्या एका टप्प्यावर
जेव्हा लागते आयुष्य उतरणीला
व्यवहारी जगही लागते आता
हळूहळू सोईस्कर दूर जायला

मी वाट पहात असतो
कुणा भेटीची; सखा, आप्तेष्टांची
अशात फोन खणखणतो
कुणी तरी अनाहूत असतो

मोहरते माझे विद्ध मन
धन्य झाला आजचा दिन
कुणातरी आली आठवण
क्रेडिट कार्ड घ्या तो म्हणं

म्हणे वार्षिक शुल्क नाही काही
आहे अॅड‌ऑन कार्ड बायकोलाही

मी उत्तरलो

ही ऑफर घेऊ कुणासाठी
आता कुणीही नाही पाठी
तशीही आता नाही ऐपत
म्हातारपणी कुठली पत

आपण करूया शिळोप्याच्या गप्पा
मोकळा होईल मनाचा कप्पा
खूप असतं काही बाही भरलेलं त्यात
वाहताना बोजड गाठोडं तनमन थकतं

तो म्हणाला…

माफ करा बाबा मलाही पोट आहे
केवढं मोठं माझं विक्री टार्गेट हे
मला हाकारणे त्याचे बाबा म्हणून
गेले केवढे तरी सुखावून

त्या ९२ वर्षाच्या म्हाता-याची आठवली गोष्ट…
कुठेतरी जंगलात तो राहतो एकटं
सोबतीला त्याच्या गाय, घोडा, मांजर
झाडंझुडपं अन् उंच डोंगर
घरासमोर गर्द हिरवा उतार
झाडांवर पाखराची शीळ अन् इवलीशी खार
रातीला अंधार अन् रातकिडे किरकीर
किचनमध्ये भांड्यावर दाट काळा थर
रोज सकाळी देवाला साकडं
फिरूकुदे एक तरी पाहुणा इकडं
कोण असेल हा पाहुणा; मित्र, नातेवाईक,रात्र,दिवस की मरण?
रात्री विनवणी देवाला
उद्याचा दिवस पाह्यला
दे बळ पायाला

केवढी ही शक्ती प्रार्थनेत
मुंगीचे पायरवही, म्हणे
देव असतो ऐकत
तोच पाठवतो का सुर्याला
रोज सकाळी ह्याला उठवायला,
पाखरांना भुपाळी गायला
घनश्याम सुंदरा अरूणोदय झाला

तंद्री भंग करायला आला नकली पोलीस कॉल
म्हणाला

तुम्ही मनी लॉंडरीग केलंय
भोंगा आता, तुरंगात जाल‌
मी म्हणालो, साहेब मी कर्मदरिद्री
मी कपडेही कधी लॉंडरीत नाही धुतले
कफ्फलकानं मनीलॉंडरीग कसे केले ?
आता एक काम करा
या नंबरवर गाडीभाडं भरा
चौकीचा पत्ता एसएमएस करा, मीच येतो चौकीत
कबूल करेल गुन्हा , खुशाल टाका मला तुरुंगात
तुम्हाला बक्षीस मिळेल, प्रमोशन होईल
मला चार दोन दोस्त अन् सरकारी पाहुणचार मिळेल
दिवस जातील कसे मजेत
तसंही हा एकटेपणा नाही सोसवत
सालं दलींदर म्हातारं लय खट
असं म्हणत फोन झाला कट

मला हायसं वाटलं
डोंगरातलं म्हातारं पुन्हा भेटलं
तेच थरथरते हात; प्रार्थना कंपीत कंठात
टेक्नॉलॉजी कसली भारी
जरी जग पिंपळपानी तरलं
माणसातलं माणूसपण सरलं
चोरही आजकाल हायटेक झालं
चोरी करायला कशाला बदूंका, चाकू ,सुरे
फक्त एक लॅपटॉप, मोबाईल झाला पुरे

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार दसा, लई दिसांनी कवितेची आठव आली.
मस्त लिहलं आहे.
मी ह्या कवितेला माझ्याकडून नाव दिले आहे "थकलेल्या म्हाताऱ्याची कविता"
भारी लिहिली आहे.
म्हातारेबाबा साक्षात उभे राहिले.
धन्यवाद!