एक स्पेशालिस्ट आणि एक ग्रेटेस्ट शोमन : दोघांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी कुठला चित्रपट उजवा ?

Submitted by रानभुली on 20 September, 2025 - 01:33
Guide Mera Naam Joker

(चिकवा वर लिहून पोस्टचं बटण दाबायचाच अवकाश होता, पण मग तिथे अधिक चर्चा नको म्हणूनत स्वतंत्र धागा सादर करत आहे. )

दोन असे सिनेमे जे सतत डोक्यात घोळत असतात. ज्यांची तुलना होऊ शकत नाही, पण केल्याशिवाय राहवत नाही.
दोन असे दिग्दर्शक ज्यांनी हिंदी चित्रपटजगतावर राज्य केलं. दोन असे अभिनेते ज्यांच्या मागे रसिक वेडे होते.
दोन असे ड्रीम प्रोजेक्टस ज्यांची आजही चर्चा होते आणो दोन्हीही कितीही वेळा पाहिले तरी काहीतरी नवं गवसलं असं वाटतं.
या दोन्हींची तुलना करू नये पण आज या वैयक्तिक संघर्षात समविचारी आणि विषमविचारी सर्वांनाच सामील करून घ्यायचे आहे.
प्रश्न आहे या दोन्हीत उजवा सिनेमा कुठला ?
(तुलनाच होऊ शकत नाही हे मान्य आहे. पण जसं एखाद्या ठिकाणी प्रश्न देतात कि या दोन्हीची तुलना करा, तर करावीच लागते ना ? तसं समजा ) Lol

सिनेसृष्टीत अनेक महत्वाकांक्षी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते येऊन गेले. त्यांनी आपापले महत्वाकांक्षी सिनेमे सादर केले. ज्याला ड्रीम प्रोजेक्ट्स म्हटले गेले.

यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे राज कपूर. राज कपूरला ग्रेटेस्ट शोमन ऑफ इंडीया म्हटले जाते. राज कपूरचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मेरा नाम जोकर. (नंतर बॉबी आणि सत्यम शिवम सुंदरम ला पण ड्रीम प्रोजेक्ट म्हटले गेले, पण मेरा नाम जोकर हा त्याचा सर्वाधिक चर्चा असलेला सिनेमा आहे). शोमनची व्याख्या काय ? जर व्याख्याच पहायची तर गुरूदत्त सुद्धा या स्पर्धेत कमी नाही.

एखाद्या शो चे असे थेट्रिकल प्रेझेंटेशन ज्यात ड्रामा जास्त असतो (शुद्ध मराठीबद्दल क्षमा असावी).
पण काही काही टर्म्स या अंदाजाने वापरल्या जातात आणि त्याचा तोच अर्थ असतो. उदा राज कपूर सिनेमा ज्या स्केलला घेऊन जातो, त्या काळात ते कुणाला जमलं नाही. चार्ली चॅप्लीनचं कॅरी केचर असलेलं पात्र आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक व्यंग टिपत कला, संगीत यांचा सोहळा म्हणजे राज कपूरचा सिनेमा. आज भन्साळी मला शोमन म्हणा म्हणून झपाटल्यासारखे सिनेमे काढतो. पण व्यंग टिपण्यात तो खूप मागे आहे.

(गुरूदत्तचे सिनेमे ही वेगळी कॅटेगरी आहे. त्यावर नंतर कधीतरी बोलूयात. उलट मायबोलीवर अनेक जाणते आहेत त्यांनी गुरूदत्त वर लिहायला हवे. )

दुसरा अभिनेता , निर्माता म्हणजे देव आनंद. खरे तर देव आनंद आणि विजय आनंद ही जोडीच म्हणायला पाहीजे. कारण देव आनंद दिग्दर्शक म्हणून किती वाईट आहे हे सांगायला नकोच. पण विजय आनंद !
एक से एक चित्रपट. विजय आनंद आणि राज कपूर या दोघांनाही संगीताची उत्तम जाण होती. अर्थातच देव आनंदलाही.

देवने जेव्हां गाईड कादंबरी वाचली तेव्हां तो झपाटून गेला. त्याने यात एक आंतरराष्ट्रीय सिनेमा पहायला सुरूवात केली. त्याला अनेकांनी वेड्यात काढलं. काहींनी सांगितलं कि आर के नारायण यांनी यात एव्हढी भारतीय मूल्ये दाखवली आहेत कि आंतरराष्ट्रीय सिनेमा बनवण्याचा वेडाचार तू करूच नकोस. यावर देव आनंदचं म्हणणं होतं कि एखादी कलाकृती जेव्हढी मातीतली असती तेव्हढीच ती आंतरराष्ट्रीय होते. उदा ताजमहाल, अजंठा वेरूळ, खजुराहो. आपण भारतीय कथा जर आंतरराष्ट्रीय मंचावर मांडलीच नाही तर ती कलाकृती आंतरराष्ट्रीय होणारच नाही.

देव आनंदने गाईड साठी दोन टीम बनवल्या. एक हिंदी आणि एक इंग्रजी.
हिंदीची जबाबदारी त्याने विजय आनंदला दिली. इंग्रजी चा विचार आपण इथे नको करायला. इंग्रजी सिनेमा पडला आणि विस्मरणात गेला. पण २००७ च्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला आणि त्याने अनेक पुरस्कार मिळवले. देवचं स्वप्नं पूर्ण झालं. त्याचे बोल खरे झाले. इंग्रजी चित्रपट कादंबरीहुकूम होता.

पण विजय आनंदने पूर्ण स्वातंत्र्य घेतलं. इतकं कि आर के नारायण एकदा मिस्किल होऊन म्हणाले कि बहुतेक यांनी माझं नाव चुकून वापरलं. अर्थात थीम तीच आहे. गाईड हिट झाला.

गाईड बघताना अनेकदा मागच्या वेळी या सीनचा हा अर्थ लक्षात आला नव्हता असं वाटतं. मेरा नाम जोकर पहिल्यांदा पाहिला तेव्हां काय बंडल पिक्चर असं वाटलं होतं. पण कळत्या वयात पारायणं झाली तेव्हां राज कपूर मधला थोर दिग्दर्शक समजत गेला.

अशा या दोन सिनेमांची तुलना करावी का ?
कारण विजय आनंदला कधीच शोमन म्हटलेलं नाही. हीच तर माझ्या आतल्या भांडणाची सुरूवात आहे. व्याख्येप्रमाणे तर विजय आनंद गाईडच्या बाबतीत मेरा नाम जोकर पेक्षा जास्त ड्रामा दाखवतो. इतकंच नाही तर नृत्य संगीताच्या बाबतीत मेरा नाम जोकरच नाही तर आरकेच्या कोणत्याही सिनेमापेक्षा भारी पडतो. पण तो एका स्वप्नील दुनियेत नेत नाही. सामाजिक व्यंग दोन्हीही सिनेमे टिपतात. तरी विजय आनंदला फक्त स्पेशालिस्ट डायरेक्टर हेच टायटल राहीलं. तो शोमन होऊ शकला नाही. का नाही ? या विचारातून मग ही तुलना करण्याचं साहस केलंय.

मेरा नाम जोकर एका कलाकाराची तीन स्तित्यंतरं दाखवतो. हा वैयक्तिक आणि भावनाप्रधान चित्रपट आहे. तो त्याच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जातो. त्या कलाकाराच्या स्वप्नांची सफर घडवून आणतो.

गाईड हा राजू गाईडच्या जेलमधून सुटल्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅकमधून उलगडत जातो. यात रोझीची कथा येते. रोझी चं कॅरेक्टर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी धाडसच होतं. यासाठी सुद्धा देव आनंदला सल्ले मिळाले होते. ते धुडकावून त्याने स्वतंत्र विचाराचं एक स्त्री पात्र दाखवलं आणि तिला नायकाइतकंच महत्व दिलं. गाईड मधे नायकच कसा बरोबर हे दाखवलेलं नाही. त्याचं अधःपतन, त्याचा इगो ठळक केला आहे. ती स्वतंत्र होऊ पाहणारी नायिका आहे. अष्टनायिकेच्या व्याख्येत न बसणारी. तिचा नवरा एक ख्यातनाम पुरातत्त्वशास्त्री आहे. पण तिला त्याच्या सावलीत रमायचं नाही. तिच्यात टॅलंट आहे. तिच्या इच्छा आकांक्षा आहेत. छोटी छोटी स्वप्नं आहेत. ती राजू गाईड ओळखतो. तो तिच्या स्वप्नांना पंख देतो. इथे नवरा बायकोच्या वयातलं अंतरच नाही तर अनेक बाबतीतलं अंतर हे पुन्हा पुन्हा पाहताना लक्षात येतं.

पती पत्नी पूरक असू शकतात. त्यांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असायला हवं हे स्वतःच्या महानतेत गर्क असलेल्या नवर्‍याच्या गावीही नाही. भारतात हे कॉमन आहे. त्याच्या सामाजिक स्थानाच्या दबावापोटी अनेक स्त्रिया कसंबसं आयुष्य कंठत राहतात. ते खूप बोरिंग असतं असंही नाही. बस, स्वतंत्र ओळख हवी असणारीला ते अशक्य असतं. हे पात्र विजय आनंदने पूर्ण ताकदीने उभं केलं आहे. एव्हढ्या ताकदीने राज कपूर सुद्धा कधीही त्याची नायिका उभी करत नाही. त्याची थीम ही कॅरेक्टरच्या वर असते (मतभेदांचे स्वागत).

गाईड मधे देव आनंदचा राजू गाईड हा तिच्यासाठी गाईडच राहतो. तो तिचा ताबा घेत नाही. म्हणजे सिनेमा तसं सांगत नाही. नायक मात्र तिने धोका दिला या समजात राहतो. त्याच्या या समजात दिग्दर्शक प्रेक्षकाला सामील करून घेत नाही. त्याच्या चुका स्पष्ट दाखवतो.

मेरा नाम जोकर मधे राजू तीन स्त्रियांच्या प्रेमात पडतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रेमात त्या त्याचा वापर करतात. इथे सहानुभूती नायकाला दिली जाते. त्याच्या नायिका कुठल्या कुठे पोहोचतात पण हा आहे तिथेच राहतो. इथे राजकपूरने पडद्यावर चार्ली चॅप्लीनच्या ट्रँपच्या भूमिकेतल्या कलाकाराचेच पडद्यावरचे चरित्र पडद्यावर उभे केले आहे. हे आत्मचरित्र नक्कीच नाही. त्यामुळं हा चित्रपट वेगळा आहे. यात बालवयातलं प्रेम यावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे. आज सर्रास क्रश म्हणून टीचर होते असं बोललं जातं. त्या वेळी असं बोलायची चोरी होती.

गाईड मधे प्रेमात विफल झालेला नायक गुन्हेगारीमुळे तुरूंगात जातो. तिथून बाहेर पडल्यावर "वहां कौन है तेरा, जायेगा कहा" असं म्हणत थंडीने कुडकुडत असताना एक साधू त्याच्या अंगावर त्याची भगवी शाल घालतो. त्यावरच्या मजकुरामुळे हा ही साधू असावा म्हणून लोक त्याला हात जोडू लागतात. इथे सिनेमा वेगळाच ट्रॅक पकडतोय असे वाटते. इथे अनेक सामाजिका व्यंगांवर सिनेमा भाष्य करतो.
लोकांचा देवभोळेपणा. दगडालाही हात जोडायची वृत्ती, भगव्या कपड्यातल्या कुणावरही विश्वास ठेवणे हे दाखवले आहे.

गाईड मधे एक function at() { [native code] }इशय महत्वाचे भाष्य केलेले आहे ज्यावर प्रोफेसर पुरूषोत्तम अगरवाल नेहमी दाखले देतात.
राजू गाईड लोकांना सल्ले देत असतो. ते अर्थात त्याने धक्के खाल्ल्याने आलेल्या शहाणपणातून दिलेले असतात. पूर्वी गाईडच्या धंद्यात लोकांचा अंदाज घेत बोलायची त्याची कला इथे उपयोगी पडते. पण यामुळे स्थानिक पुजारी वर्गाचा आपला धंदा बुडेल या भीतीने संताप होतो. या ढोंगीला उघडे केले पाहीजे म्हणून ते त्याला संस्कृतमधे वाद विवादाचे आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नाला देव आनंद उत्तर देऊ शकत नाही. इथे ते म्हणतात "ये क्या बोलेगा ? संस्कृत आती हो तब ना ?" मग देव आनंद अस्खलित इंग्रजीत एक छोटेखानी भाषण करतो. त्या पुजार्‍यांची तोंडं बघण्यासारखी होतात. मग देव आनंद म्हणतो " ये क्या बोलेंगे, अंग्रेजी आती हो तब ना ?"

इथे सामान्य लोक अगदीच हेल्पलेस दाखवलेत. त्यांना दोन्हीही भाषा येत नसतात. प्रोफेसर अगरवाल म्हणतात कि आपल्याला न येणार्‍या भाषेत सांगितलं कि ते भारी असा लोकांचा समज आहे. आणि या भाषा येणारे महापंडीत असे लोक समजतात.

संस्कृत येत असतानाही तुलसीदासांनी कधीही संस्कृत मधे लोकांशी संभाषण केले नाही. त्यांनी अवधी भाषेत रचना केल्या. कबीराला संस्कृत उत्तम येत असतानाही त्याने कधी संस्कृतचा वापर नाही केला. रहीम यांना फार्सी येत असताना त्यांनी उर्दू, फार्सीचा उपयोग केला नाही. कारण त्यांचे तत्त्वज्ञान साधे सोपे होते. आणि लोकांना कळण्यासारखे व पटण्यासारखे होते. ते लोकांच्याच भाषेत सांगायला हवे होते. म्हणून त्यांना जड भाषेचा वापर करून ते थोपवायची गरज पडली नाही.

आज अनेक बाबा, महाराज उगवले आहेत. त्यांचा इतिहास काही वेगळाच आहे. राजू गाईडचा महात्मा बनण्याची प्रोसेस अशीच व्यंगात्मक टिप्पणी आहे. पण पुढे सिनेमा खरोखरच वेगळ्या उंचीवर नेला आहे. उगीचच हाय पॉईण्ट हवा म्हणून ते केलेले नाही. किंवा आता सिनेमा कसा संपवावा , क्लायमॅक्स ला हाय पॉईण्टला नेल्याशिवाय तरणोपाय नाही या क्लिशेपायी केलेला अट्टाहासही नाही.

इथे राजू गाईड ची तुलना पिंजराच्या मास्तरसोबत करता येईल. पिंजराचा मास्तर जिवंतपणीच आपला पुतळा बघतो. त्याला त्या आदर्श मास्तरच्या गावकर्‍यांच्या मनातल्या प्रतिमेला तडा द्यायचा नसतो. आता त्याचे जे अधःपतन झाले आहे त्यामुळे गावकर्‍यांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल म्हणून मास्तर आपल्या प्रतिमेचे मरण स्विकारतो. राजू गाईडला आपला भूतकाळ जर समोर आला आणि जर आपण फ्रॉड आहोत हे समजले तर लोकांनी ज्या "गाईड" वर एव्हढा विश्वास टाकला त्याच्याकडून फसवणुक झाली असे वाटते. कुठेच पळून जायला मार्ग नसतो. हा क्लायमॅक्स नेमका आहे.

मेरा नाम जोकर मधे चार्ली चॅप्लीनच्या आयुष्यापासून प्रेरणा घेतली आहे. असे अनेक विनोदवीर होऊन गेले ज्यांनी आपलं दु:खं लपवलं पण लोकांना हसवलं. कारूण्याची झालर असलेला विनोद श्रेष्ठ या समजावर हा चित्रपट आहे. हा गाभा न समजल्याने लोकांना तो पचला नाही. न चालण्यामागे अन्य कहाण्या आहेत. राज कपूरने षडयंत्राचा आरोपही केला होता. त्याची थीम काळाच्या पुढे होती असे आता म्हटले जाते.

अशा पार्श्वभूमीवर तुलना केली तर दोन्हीत उजवा कुठला हे आता अवघड नाही. तरीही आपण अजून काही मुद्दे पाहूयात.

कथा आणि थीम

मेरा नाम जोकर : - (राजू) च्या जीवनाचे तीन अध्याय – प्रेम, अपयश, आणि कलाकाराचा संघर्ष. आत्मचरित्रात्मक, भावनिक, आणि व्यंग्यात्मक.
गाईड : - टूर गाईड राजूची कथा – प्रेम, महत्वाकांक्षा, आणि आध्यात्मिक मुक्ती. सामाजिक संदेश (महिलांचं स्वातंत्र्य, आत्मशोध).

तुलना - गाईड अधिक संतुलित आणि युनिवर्सल थीम.

कलाकार
मेरा नाम जोकर : - राज कपूर (मुख्य भूमिका), रिशी कपूर (डेब्यू), सिमी गारेवाल, धरमेंद्र. राज कपूरचा जोकर अविस्मरणीय.
गाईड : -देव आनंद (राजू), वहीदा रहमान (रोसी). देव आनंदची भूमिका क्रिटिकल आणि भावनिक.

तुलना - देव आनंद आणि वहीदा यांचा केमिस्ट्री अप्रतिम.

संगीत

मेरा नाम जोकर : - शंकर-जयकिशन, शैलेंद्र. गाणी जसे "जीना यहां मरना यहां" भावुक.
गाईड : - एस. डी. बर्मन, शैलेंद्र. गाणी जयहांआज फिर जीने कि तमन्ना है" आणिहैपिया तोसे नैना लागे रे" कालातीत. शैलेंद्रच्या "दिन ढल जाये" या गाण्याला पुरस्कार मिळाले.

तुलना - Guide – बर्मनदांचे संगीत अधिक प्रभावी. पुरस्कारविजेते. ( एसजे आणि एसडी हे दोघेही अत्युच्च प्रतिभावान संगीतकार आहेत).

दिग्दर्शन

मेरा नाम जोकर : - राज कपूरचा परीस स्पर्श – लांबलचक (४ तास), तीन अध्याय.
गाईड : - विजय आनंदचे स्टायलिश दिग्दर्शन – सॉंग पिक्चरायझेशन आणि एडिटिंग उत्कृष्ट.

तुलना - Guide – अधिक संक्षिप्त आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम.

क्रिटिकल रिस्पॉन्स

मेरा नाम जोकर : - सुरुवातीला टीका (लांबलचक), नंतर मास्टरपीस
गाईड : -यशस्वी – फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री. म्हणून नावाजला गेला.

तुलना - Guide – क्रिटिकल रिव्ह्यूजमध्ये उजवा.

लिगसी (वारसा)

मेरा नाम जोकर : - कलात्मक धाडस, राज कपूरचे आत्मचरित्र (असा बोलबाला आहे).
गाईड : - आंतरराष्ट्रीय यश, सामाजिक संदेश.

तुलना : दोन्ही उत्तम, पण Guide अधिक प्रभावी.

निष्कर्ष
कोणता उजवा ठरतो?
गाईड उजवा ठरतो. कारण: व्यावसायिक यश, पुरस्कार (फिल्मफेअर स्वीप), आणि आंतरराष्ट्रीय मान्यता ( कान्स फेस्टिव्हल) यामुळे गाईड तुलनेने अधिक प्रभावी आहे. मेरा नाम जोकर वैयक्तिक आणि भावनिक आहे, पण त्याची लांबलचकता आणि सुरुवातेचे अपयश यामुळे गाईड पेक्षा कमी यशस्वी. दोन्ही चित्रपट बॉलीवूडचे मैलाचे दगड आहेत, पण गाईड ची कथा, संगीत, आणि दिग्दर्शन अधिक संतुलित आहे.

संदर्भ: विकिपीडिया, IMDB, The Hindu. ग्रोक

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्विवाद गाईड.

गाईड विजय आनंदचा होता आणि आहे. हल्लीच मला वाटते विविधभारतीवर ऐकले. गाईड हिंदीत करण्यासाठी त्याच्याकडे गेला तेव्हा तो म्हणाला की मुळ कादंबरी व इंग्रजी चित्रपट एक साधी कथा आहे पण मी हिंदीत बनवला तर तो माझा चित्रपट असणार, मला हवा तसाच बनणार. आणि त्याने तो तसाच बनवला. पिया तोसे नैना लागे रे… हे गाणे गाण्याचे चित्रिकरण व टेकिंगमधले मास्टरपिस आहे.

मला अर्थात शेवट आवडला नाही. ती देव आनंदची किमया वाटली. Happy

मेरा नाम जोकर - राज कपुर ही व्यक्ती आवडतच नाही. त्यात मे ना जो म्हणजे गतकाळाचे मुद्दाम काढलेले कढ वाटले. अजुन बरीच पिसे काढता येतील. पण काय फरक पडतोय, नावडता कोळसा का उगाळा??? गाणी मात्र ऐकायला आवडतात. जाने कहा.. सुंदरच आहे.

गाईड निर्विवादपणे विनर. अप्पुन का वोट गाईडकोच.

जनतेच्या कोर्टातही हाच निकाल लागला होता ना ?

दोन्ही चित्रपट लहानपणी पाहिले आहेत. तेव्हाच्या माझ्या चित्रपटाकडून अपेक्षा वेगळा असतील पण दोन्ही संथ आणि रटाळ असल्यासारखे आठवतेय.

तरी गाईड बाबत खात्रीने सांगता येत नाही. घरी त्या चित्रपटाचे चाहते होते. पण मला पुन्हा बघायला हवे शोधून त्यामुळे त्याबद्दल तूर्तास नो कॉमेंट.

पण मेरा नाम जोकर मात्र बरेपैकी आठवतोय. तो नक्कीच एका चांगल्या थीमची माती होती. जे काही सांगायचे होते ते किती मजेशीर आणि इंटरेस्टिंग पद्धतीने पोहोचवता आले असते. पण दिग्दर्शकाच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू असावे..

गाईड विजय आनंदचा होता आणि आहे. हल्लीच मला वाटते विविधभारतीवर ऐकले. गाईड हिंदीत करण्यासाठी त्याच्याकडे गेला तेव्हा तो म्हणाला की मुळ कादंबरी व इंग्रजी चित्रपट एक साधी कथा आहे पण मी हिंदीत बनवला तर तो माझा चित्रपट असणार, मला हवा तसाच बनणार. आणि त्याने तो तसाच बनवला. पिया तोसे नैना लागे रे… हे गाणे गाण्याचे चित्रिकरण व टेकिंगमधले मास्टरपिस आहे. >>> +१११

साधना, अनिंद्य . दोघांचेही आभार. आपल्यासारखाच विचार अजून कुणाचा आहे ही भावना सुखदच.
जोकरच्या बाजूचे सुद्धा असतीलच. जाणून घ्यायला आवडेल.

ऋन्मेष वाटलं होतं त्यापेक्षा वेगळा प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार.

गाईड! आनंद बंधुनी एक चांगली कलाकृती म्हणून गाईड बनवला आणि Showman ह्या बिरुदाला जागण्यासाठी एक भव्य चित्रपट काढायचा म्हणून जोकर बनवण्यात आला असे माझे तरी मत आहे.

निर्माता देव होता त्यामुळे काही बोलुन उपयोग नाही पण देवच्या जागी दुसरा सक्षम अभिनेता, जो बोलताना एका सुरात व दमात पुर्ण वाक्य बोलुन मोकळा होण्यापेक्षा भावनांचे चढउतार दाखवु शकतो, घेतला असता तर शेवटचा अर्धा तास अजुन चांगला झाला असता. माझा तर शेवटी संयम सुटला आणि कसातरी शेवट पाहिला. अर्थात देव हवाच होता आणि विजय आनंदने त्याच्याकडुन शेवटापर्यंत काम करुन घेतले. तरी…

मस्त लिहीले आहे. एक जाणवले - गाइडच्या मानाने मेरा नाम जोकर बद्दल कमी वर्णन आहे. तरीही गाइडबद्दल लिहीलेले आवडले. या माहितीवर आता पुन्हा बघायला आवडेल.

हे दोन्ही पिक्चर्स नीट पाहायला हवेत. मेरा नाम जोकर मी पाहिलेला नाही आणि गाइड पाहूनही बरीच वर्षे झाली. गाइडची गाणी मात्र ऑटाफे आहेत. त्यांचे चित्रीकरण सुंदर आहे. मेरा नाम जोकरची काही गाणी पाहिली आहेत पण ती आवर्जून बघावीत अशी अपीलिंग वाटली नाहीत कधी. विकीवर हा पिक्चर १९७० चा आहे असे दिसले. शंकर जयकिशन जोडीचा बहराचा काळ तोपर्यंत संपला होता, पिक्चर्स मधेही राजेश खन्ना-किशोरचे युग सुरू झाले होते. तेव्हा ते फ्रेश चेहरे, फ्रेश संगीत एकदा चलतीत आल्यावर हा जुन्या पद्धतीचा पिक्चर लोकांना कदाचित आवडला नसेल. त्यात राज कपूरचा हुकमी एक्का म्हणजे लता - तिची गाणीच यात नाहीत. याउलट गाइड हा एस डी बर्मन चा पीक फॉर्म म्हणता येईल. कदाचित देव आनंदचाही. 'गाता रहे' मधे देव व वहिदा काय ग्रेसफुल दिसतात! १९७० पर्यंत राज कपूर थोराड दिसायला लागून नायक म्हणून त्याची सद्दी संपली होती.

गीतलेखनही गाइडचे सरस वाटते. तत्कालीन गीतलेखकांत साहिर थोर होताच. पण कथेतील प्रसंगांचे नायक-नायिकांच्या दृष्टीने कमालीच्या सोप्या शब्दांत वर्णन करण्यात शैलेन्द्रचा हात कोणीही धरणार नाही. गाइडमधे त्याने कमाल केली आहे. एरव्ही शैलेंद्र आरके मधे असायचाच पण नेमका 'जोकर' मधे एक दोन गाणी वगळता नाही. आणि हसरत जयपुरीची गाणी लोकप्रिय असली तरी त्याला शैलेद्रची सर नाही.

त्यामुळे गाइड उजवा आहे हा निष्कर्ष काढायची सुरसुरी आली आहे पण 'जोकर' पाहून मग लिहीतो Happy

निर्माता देव होता त्यामुळे काही बोलुन उपयोग नाही पण देवच्या जागी दुसरा सक्षम अभिनेता, जो बोलताना एका सुरात व दमात पुर्ण वाक्य बोलुन मोकळा होण्यापेक्षा भावनांचे चढउतार दाखवु शकतो, घेतला असता तर शेवटचा अर्धा तास अजुन चांगला झाला असता. >>> शेवटचा पार्ट विचारात घेतला तर बलराज सहानींचं नाव डोळ्यासमोर येतं. पण मग सुरूवातीची वहिदा रेहमान बरोबर दाखवलेली केमिस्ट्री नसती दिसली.

भ्रमर, हे असू शकतं. वेगळा मुद्दा आहे.
@फारेण्ड
गाइडच्या मानाने मेरा नाम जोकर बद्दल कमी वर्णन आहे. >> हो. तसं झालंय. लिहीण्या आधी मेरा नाम जोकर पहायला हवा होता. हा सिनेमा आधी तुकड्या तुकड्यात पाहिलेला आहे. मेलोड्रामाचा अ तिरेक असल्याने असेल एका बैठकीत नाही पाहिला. त्यामुळे त्याचा जो इंपॅक्ट असतो तो न झाल्याने त्याच्या बद्दल कमी लिहीलं गेलंय.

शंकर जयकिशन जोडीचा बहराचा काळ तोपर्यंत संपला होता, पिक्चर्स मधेही राजेश खन्ना-किशोरचे युग सुरू झाले होते. ................................. १९७० पर्यंत राज कपूर थोराड दिसायला लागून नायक म्हणून त्याची सद्दी संपली होती. >> शंभर टक्के मान्य आहे. या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले. पण हे कमर्शियल सक्सेस च्या बाबतीत झालं. जर कमर्सियल सक्सेस आपण बाजूला ठेवलं तर फक्त कलाकृती म्हणून तुलना होईल.

मेरा नाम जोकर भारतात ४० वर्षांनी हिट झाला. मेरा नाम जोकर नंतरच्या रन मधे गर्दी खेचत गेला. परदेशात आजच्या गणिताने त्याने त्या वेळी १५०० कोटी रूपये कमावले आहेत. राज कपूर दिग्दर्शक म्हणून सुपरहीट होताच. त्यामुळं हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित होता.

अपयशाबद्दल अनेक कहाण्या आहेत. यातली एक लोकप्रिय म्हणजे गुलशन राय यांचा महत्वाकांक्षी वक्त हा सिनेमा रिलीज होणार होता. मेरा नाम जोकरची प्रचंड हवा असल्याने आणि दोन्ही एकाच वेळी प्रदर्शित होत असल्याने गुलशन राय यांनी कपट खेळलं. भारतातले सर्वात मोठे डिस्ट्रीब्युटर असले तरी राज कपूर हे बडं नाव असल्याने त्यांनी मेरा नाम जोकर प्रदर्शित होऊ दिला पण थेटर मालकांशी बोलून सर्वच्या सर्व तिकीटं विकत घेतली. ज्या वेळी प्रेक्षक तिकीट काढायला यायचे त्या वेळी गुलशन रायची माणसं दहा रूपयांचं तिकीट दोन रूपयात विकायची. ती ही पाच ते दहा तिकीटं. लोक स्वस्तात तिकीट घेऊन जात पण थेटर मोकळं असल्याचं बघून पिक्चर फ्लॉप झालाय हे सांगायला लागले. यामुळं गर्दी वक्त कडे गेली. त्यातही जवळपास सगळेच कलाकार असल्याने त्याचीही हवा झाली होती.

मेरा नाम जोकरचं बजेट १ करोड होतं. कमाई ८० लाख झाली. वक्तचं बजेटही १ करोड. कमाई २.९५ लाख. म्हणजे वक्तने प्रेक्षक पळवला. या दबावाखाली येऊन राज कपूरने जागतिक हक्क नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी १५ लाखात विकून टाकले. रशियात रिलीज झाल्यावर त्याने १५ कोटींची कमाई केली. पण राज कपूरला त्याचा काहीच फायदा झाला नाही.

वक्तने पहिल्या रन मधे २.९५ कोटींचा धंदा केला. आणि लाइफटाईम बिजनेस ३ कोटींचा केला. म्हणजे पहिल्या रननंतर फक्त ५ लाख रूपयांची भर घातली.

मेरा नाम जोकरने पहिल्या रन मधे ८० लाखांचा बिजनेस केला. १९७४ मधे रशियामधे १३ कोटी रूपये कमावले. अन्य देशात दोन करोड. आणि लाईफटाईम कलेक्शन १८ कोटी रूपये. रणधीर कपूर् ने भारतात त्याची कमाई भरून काढली.

वक्त बी आर चोप्रांचा आहे. (ओ मेरी जोहरा जबीं , बलराज सहानी, अचला सचदेव, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना , शर्मिला टागोर) . तो १९६५ साली आला होता.

ओह ! काहीतरी चुकलं. एक तर निर्मात्याचं / चित्रपटाचं नाव किंवा वर्ष.
चेक केलं नाही. Happy

माफ करा भरत.. वक्त नाही जॉनी मेरा नाम चित्रपट होता. स्वतः राज कपूरने आरोप केले होते. ही लिंक. गुलशन राय यांनी आरोप फेटाळले होते.
https://www.imdb.com/title/tt0066070/trivia/?item=tr5276711

बरोबर फेफ.

१९७० पर्यंत राज कपूर थोराड दिसायला लागून नायक म्हणून त्याची सद्दी संपली होती.>>>>>

मेरा नाम जोकर मधला हिरो मुख्यत्वे उतारवयीन आहे आणि फ्लॅशबॅकमध्ये वेगवेगळी वये आहेत.

टिनेज वयासाठी त्याने ऋषी कपुरला उभे केलेय. तसे तिशीच्या वयासाठी रणधीर कपुरला उभे केले असते तर वयानुरुप
कास्टिंग झाले असते. पण रणधीर कपुरचे अभिनयकौशल्य पाहता ही खेळी म्हणजे बुडत्याचा पाय खोलात असे झाले असते Happy

मेरा नाम जोकरची कथावस्तुच माझ्या मते डळमळीत आहे. खर्‍या सर्कशीत जोकरला फक्त दोन भागामधला फिलर म्हणुन वापरतात. मेनाजो मध्ये तो मेन पार्टी. आणि वर आयुष्यात नागवला गेलो म्हणुन सतत रडणारा. इथे गाईडशी तुलना केली तर राजु गाइडच्या चुका पडद्यावर येतात, लोक रिलेट करु शकतात. तसे मेनाजोचे काही होत नाही.

राजकपुरने या चित्रपटापासुन स्त्रीदेहाचे उघड प्रदर्शन मांडले आणि त्या जीवावर चित्रपट खेचण्याचा प्रयत्न सुरु केला. पद्मिनीची बरीच दृष्ये कॉम्प्रोमायजिंग आहेत. सिमीचा न्युड सिन खुप लांबुन चित्रित केलाय त्यामुळे असो. पण पद्मिनीची दृष्ये प्रेक्षकांना खुष करण्यासाठी आहेत. पण नुसती असली दृष्ये चित्रपट चालवत नाही हेही सिद्ध झाले.

नंतर बॉबी आला त्यात दुर्गा खोटे सोडली तर बाकी सगळ्यांना प्रदर्शन करायला लावले. हीना त्याने दिग्दर्शित केला नाही त्यामुळे या चित्रपटापासुन आरके बॅनरमधले हे प्रदर्शन थांबले. राम तेरी…. मधले प्रदर्शन नसते तरी चित्रपट चालला असता इतकी मजबुत कथा होती पण रा कुचा स्वतःवरचा विश्वास उडाला असावा.

लताचे गाणे नाही हे लक्षात आलेच नाही. त्याने काहीतरी कुरापत काढली असणार तिची.

वर वक्त बद्दल लिहिलेय ते खरे वाटत नाही. त्या काळी कित्येक चित्रपट सुरवातीला रिकामे थेटर आणि नंतर माउथ पब्लिसिटीवर हाउसफुल असे झालेले वाचलेय. लोक चित्रपट पाहुन तो बरा वाईट ठरवतात. रिकामे थेटर बघुन कसे ठरवणार. आणि सगळी तिकिटे विकत घेऊन ती खिडकीवर येणार्‍या प्रेक्षकाला २ रु विकली असती तर तोबा गर्दी झाली असती. २ रु ला विकुनही थेटर रिकामे म्हणजे मुळात खिडकीवर कोणी येत नसणार.

. त्या काळी कित्येक चित्रपट सुरवातीला रिकामे थेटर आणि नंतर माउथ पब्लिसिटीवर हाउसफुल असे झालेले वाचलेय. >> हे अगदी बरोबर. मुघल ए आझम आणि शोलेचा समावेश आहे यात. Happy

मेरा नाम जोकरची कथावस्तुच माझ्या मते डळमळीत आहे. खर्‍या सर्कशीत जोकरला फक्त दोन भागामधला फिलर म्हणुन वापरतात. मेनाजो मध्ये तो मेन पार्टी. आणि वर आयुष्यात नागवला गेलो म्हणुन सतत रडणारा. >> मेरा नाम जोकर बद्दल महत्वाची गोष्टच लक्षात राहिली नाही. राज कपूरने आयुष्यभर चार्लीचं कॅरेक्टर फॉलो केलं. त्या काळी (आजही) श्रेष्ठ विनोदाची व्याख्या करताना "ज्याला कारुण्याची झालर आहे असा " विनोद श्रेष्ठ समजला गेला आहे. चार्लीचं आयुष्य, त्याचं बालपण याबद्दल वाचलं कि उदास वाटतं. गहीवरल्यासारखं होतं. एव्हढं कारूण्य त्याच्या आयुष्यात असताना त्याने आपल्या दु:खावरच विनोद बनवला. असे आणखीही काही लोक आहेत. राज कपूरने ही थीम पकडताना चार्लीच्या जागी जोकर मध्यवर्ती भूमिकेत ठेवलाय.

रणधीर कपूरने खुलासा करताना सांगितलं कि त्या वेळी लोकांनी जोकर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला आणि कॉमेडी नाही म्हणून चित्रपट नाकारला. या सिनेमाची गोष्ट ही त्या जोकरची करूण कहाणी आहे. जोकर हा त्याचा मुखवटा आहे. त्या वेळी काळाच्या पुढची थीम असली तरी आता ते सादरीकरण लाऊड वाटेल. ना धड प्रतिकात्मक ना मास अपील असलेलं असं झालंय. पण धाडसी प्रयत्न दाद देण्यासारखा वाटतो.
नायिकांना बोल्ड सीन द्यायला लावायचं प्रयोजन काहीच नव्हतं. पण राज कपूरने कलात्मकतेची सुद्धा मार्केटिंग केली.
हुषार माणूस होता. देवयानी चौबळ ने लिहीलंय .

छान लिहिले आहे. Happy मी गाईड हल्लीच पुन्हा पाहिला, त्यामुळे पूर्ण आठवतोय. तिला नवऱ्याच्या सावलीत राहायचे नसते एवढेच नसून तिच्या कलेवर येणारी बंधनं आणि त्याचे बाहेरख्याली असणे ह्या मोठ्या बाबी वाटल्या. मला तर ते बाहेरख्याली असणं पथ्यावर पडले असेही वाटले. ते लग्न सुरवातीपासून तडजोडच होते. आईने तिला गडबडीने उजविलेले असते. जो बापाचे नाव नसलेल्या मुलीला 'हो' म्हणेल अशा पहिल्या पुरुषाशी. देव आनंद फायनान्स वर कंट्रोल करू पाहतो, जुगार खेळतो, तो चुकतो पण कुठेतरी जाणीव होते. पश्चात्तापदग्ध होतो, पण तोही दिशाहीनच आहे. त्यालाही माहीत नाही यावर उपाय काय मग ते संन्यास घेणे, नंतर एकदमच लक्षात येणं आणि खरोखरच बलिदान देणं असं आहे. त्यालाही रोझीशिवाय उद्दिष्ट राहिलेले नसते, परतही जायचे नसते. गाणी गाईडचीच सरस आहेत. दोघेही अतिशय ग्रेसफुल आणि देव आनंद आब राखून दिसायचा कायम. वहिदा तर ब्युटी विथ ब्रेन्सच वाटते नेहमीच. त्यामुळेच आवडते.

'मेरा नाम जोकर' अजिबात आठवत नाहीये. पण राज कपूरच्या नायिका ह्या त्याची 'सेवाभावी संस्था' असायच्या, हे मला मोठं झाल्यावर लक्षात आलं. अवीट गाणी (मे ना जो सोडून) , त्या काळाच्या मानाने आधुनिक तंत्रज्ञान, छायाचित्रण, दिग्दर्शन, अभिनय- या गोष्टींनी त्या गोष्टी ठळकपणे जाणवत नाहीत इतकेच. मे ना जो जेवढा आठवतोय त्याप्रमाणे मला लाऊड वाटला होता, रडारड, भावना, अभिनय सगळेच. रिपीट मूल्य नाही त्यात, पुन्हा आवर्जून पाहावासा वाटला नाही कधीच. राज कपूरच्या नायिका त्याच्याशी अंतरल्या तरी शेवटपर्यंत त्याच्याच असायच्या स्वतःच्या नाही, दुसऱ्यांच्या तर मुळीच नाही, नाहीतर त्या खलभूमिकेतच जायच्या. त्यावरून लक्षात येते. संगम मधे पण तसेच आहे. राज कपूरचा नायक आत्मकेंद्री असायचा. दुःख, करूणा, स्वप्नं, निराशा सगळं त्या नायकाचंच, नायिकेने त्या भोवती परिवलन करायचं नाहीतर ग्रहमालेच्या बाहेर जायचं. हेल्दी स्पेस दिलेली दिसली नाही कधी. ऑबसेस्ड आणि सॅडिस्ट नायक वाटतो. दुःखात रमायला आणि त्यावरून लक्ष वेधून घ्यायला आवडणारा. अगदी नेहमी नसेल पण हीच प्रतिमा या क्षणी आठवली. Happy

गाईड बघितला tv वर शाळेत असताना. मेरा नाम जोकर बघावासाही वाटला नाही. मला राज कपूर आवडत नाही. त्यामुळे गाईडलाच मत. शेवटी बोअर झाला गाईड, असं आठवतंय. गाणी आणि देव वहिदा आवडले.

मला देव आनंद्ची संवाद्फेक शैली आवडायची नाही. त्यात त्याचा चिरटा आवाज. (राजेश खन्ना त्याची बर्‍यापैकी कॉपी मारायचा).
दिसायला राज कपूपेक्षा नक्कीच बरा वाटायचा.
राज कपूर लबाड वाटायचा. काहीही भोळा वगैरे दिसणं न्हवतं.
स्टोरीविषयी नंतर ल्हिते.

राभु, अस्मिता , साधना मस्त लिहीलयत. मला रोझी खूप आवडुन गेली. मेनाजो मी ४ वेळा पाहीलाय. पण मला तो ओके वाटला.
तितर के दो आगे तितर ……. सुंदर गाणे आहे. आणि गाईडची गाणी तर शब्दच अपुरे आहेत. एस डी मला वाटतं (?)

पण राज कपूरच्या नायिका ह्या त्याची 'सेवाभावी संस्था' असायच्या >>> Lol

राज कपूरचा नायक आत्मकेंद्री असायचा. दुःख, करूणा, स्वप्नं, निराशा सगळं त्या नायकाचंच, नायिकेने त्या भोवती परिवलन करायचं नाहीतर ग्रहमालेच्या बाहेर जायचं >>> Happy संगम बघताना मला हा तिला हॅरॅस करतोय असे वाटले होते. तेव्हाच्या लोकांनी काय दृष्टिकोनातून पाहिला हे माहीत नाही पण आता पाहताना तो पहिला भाग शाखाच्या 'डर' मधल्या हॅरॅसमेन्टसारखा आहे.

मला एकूणच राज कपूर, मनोज कुमार वगैरे लोकांचे Selling India short वाटणारे संवाद, गाणी अजिबात आवडत नाहीत. "कुछ और न आता हो हमको, हमे प्यार निभाना आता है" टाइप. गावचे/गरीब लोक सगळे भोळे व चांगले, शहरी/श्रीमंत सगळे वाईट असले प्रकार तेव्हा खपून गेले असतील. आता बोअर होतात.

>>>>>पण राज कपूरच्या नायिका ह्या त्याची 'सेवाभावी संस्था' असायच्या
काल झोपेत होते त्यामुळे फार टायपत बसले नाही. पण हे वाक्य कै च्या कै खरे आणि मार्मिक आहे. कटु सत्य आहे.
.
मेनाजो मध्ये वयस्क राज कपूरने काम करण्याचा मोह टाळायला हवा होता. कुठे थांबायचे त्याच्या सारख्या शोमनलाही कळले नाही. अन्य कोण्या हिरोने तो सिनेमा छान चालला असता.

अस्मिता अगदी अगदी…

संगममधल्या राजकपुरचे मी शक्य तितके वाभाडे माबोवर आधीच काढल्यामुळे आता वाचकांना पुनःप्रत्ययाच्या आनंदापासुन वंचित राहावे लागतेय याबद्दल क्षमस्व!!!!

त्या काळात साम्यवाद शिक्षितांमध्ये लोकप्रिय होता. तेव्हाचे बलराज साहनीपासुन सगळे शिक्षित लेखक दिग्दर्शक गीतकार अभिनेते साम्यवादी होते. या विचारसरणीचे प्रतिबिंब तेव्हाच्या कथांमध्ये, गाण्यांमध्ये दिसते. राजकपुरचे बहुतांश चित्रपट श्रीमंत भांडवलदारांनी भोळ्याभाळ्या दिलदार मजदुरांना कसे पिळले, समाजाने कसे नागवले या थिमवर आधारीत होते.
काही प्रसिद्ध रशियन कथा त्याच्या चित्रपटात दिसतात. फिर सुबह होगी हे एक ठळक उदाहरण.

हा भोळाभाबडा मनमौजी चार्ली चॅप्लिनसारखा विनोदी जीव सामाजिक चरकात पिळवटुन निघाला की आपोआप करुण रसाची ढगफुटी व्हायची. त्याला रशियाने पायघड्या घालुन आपलेसे केले यात नवल नाही.

पण हाय… प्रत्येक चित्रपटात त्याच्या ह्या सगळे करुन सवरुन नंतर जबाबदारी नाकारायच्या आणि याचे पाप समाजाच्या गळ्यात ढकलायच्या वृत्तीमुळे तो माझा नावडता दोडका झाला…

अस्मिता, कसली चपखल पोस्ट आहे. अनेक बारकावे टिपलेत.
रोझीची स्टोरी लक्षात नव्हती. इथे दिल्याबद्दल आभार. आता तर ते पात्र जास्तच रिअल वाटू लागलंय.

पण राज कपूरच्या नायिका ह्या त्याची 'सेवाभावी संस्था' असायच्या >>> जे जबरी आहे. काय उपमा सुचलीय !! Lol

दोघेही अतिशय ग्रेसफुल आणि देव आनंद आब राखून दिसायचा कायम. वहिदा तर ब्युटी विथ ब्रेन्सच वाटते नेहमीच >>> वहिदा जेव्हां ज्वेलरीत (अगदी थोड्याशा) दाखवायचे तेव्हां ती रॉयल बहू वगैरे वाटायची. याउलट मीनाकुमारीला ज्वेलरीने मढवली तरी "मुझे इन सोने कि जंजीरो मे क्युं जकड के रखा है ?" सारखे एक्स्प्रेशन्स देत राहते. Happy

पुन्हा पाहीन आता दोन्हीही.

राभु Happy
वहिदा रेहमानच्या नजरेत धाक होता, खरेच बुद्धीची झळाळी असतेच चेहऱ्यावर. हुशारीचा अभिनय करताच येत नाही, असावेच लागते. Happy

फा, शेवटच्या परिच्छेदातले निरीक्षण अचूक आहे. बोअर होते आता खरेच.

साधना, धमाल पोस्ट. Lol माहितीपूर्णही आहे. राज कपूर खरेतर दोन पिढ्या आधीचा आहे माझ्यासाठी, त्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी खटकत असतील. पण त्याने पॅसिव्ह अग्रेसिव्ह नायक आणि सबमिसिव्ह नायिकेचे उदात्तीकरण केले आहे, शोमॅन म्हणून बाकी गोष्टी चकाचक असायच्या पण गाभा हाच.

मे ना जो च्या पोस्टर कडे बघून It सिनेमातला विकृत विदुषक आठवायला लागला. Proud सतत रडणाऱ्या व अटेंशन सीकिंग प्रौढ मंडळीना 'उगी उगी' करणारी कन्सेप्ट पटत नाही. Adult child नावाची संकल्पना आठवते. त्यामानाने गुरुदत्तचे दुःख प्रामाणिक आणि विमनस्क वाटायचं. ह्याला विकृतीची झालर आहे. आता मी जास्तच नावं ठेवायला लागले, पुरे करते. Happy

धन्यवाद सर्वांना. Happy

मला दोन्ही सिनेमे आवडले नव्हते. देव आनंद वर अभिनयाचा आरोपही करता येत नव्हता, आणि राज कपूर खूप मोठा दिसतो ‘जोकर’ मधे.

तसंही त्या काळातले सिनेमे आता कथा/टेक्नॉलॉजी मुळे रेलेव्हंट वाटत नाहीत. त्यापेक्षा ती गाणी ऐकावीत आणि खुश व्हावं. उगाच वाड-वडिलांच्या त्या काळातल्या आवडी-निवडीचे आता वाभाडे काढून काही सिद्ध होत नाही. आपल्या आताच्या आवडीच्या सिनेमांची काही वर्षांनी हीच गत होणार आहे.

मे ना जो च्या पोस्टर कडे बघून It सिनेमातला विकृत विदुषक आठवायला लागला. Proud सतत रडणाऱ्या व अटेंशन सीकिंग प्रौढ मंडळीना 'उगी उगी' करणारी कन्सेप्ट पटत नाही. Adult child नावाची संकल्पना आठवते. >>> “The secret source of humor is not joy but sorrow; there is no humor in heaven.” ― Mark Twain

जब्बार पटेलांचा एक होता विदूषक पाहिलेला नाही पण त्याबद्दल जे वाचलं आहे त्यावरून याच कन्सेप्टवर त्यांनी तो बनवलाय असं वाटतं. त्या त्या काळात "भारी" अशा काही कन्सेप्टस असतात. त्यावर कलाकृती बनवणं हे अभिजात समजलं जातं. वर फेफ म्हणतात तसं काळाच्या चौकटीत ते त्या वेळी उच्च अभिरूचीचं लक्षण असतं. राज कपूरने त्या वेळी आपल्याकडे न रूजलेल्या कन्सेप्टला हात घातला. त्यावर चर्च झाल्या. त्याचा फायदा काही वर्षांनी जब्बार पटेलांना झाला.

एके काळी शेक्सपीअर हा साहित्यिकांचा आयकॉन होता. कादंबरी लिहायची तर ऐतिहासिकच. नाटक लिहायचं तर ऐतिहासिकच. माझ्याकडून पण पुनरावृत्ती झाली. Happy

करुण रसाची ढगफुटी
नावडता दोडका >>>> Lol

करुण रसाची ढगफुटी
नावडता दोडका >>>> Lol

अस्मिताला (सेवाभावी संस्था लिहिलेल्या पोस्टसाठी) 100 गावं इनाम!! Rofl
(कसला तो राजकपूर! करून सवरून भागला म्हणतात त्यातली गत! भाबडा चेहरा करून उ*ड्या वा*ड्या बाया बघण्यात कसला आलाय आनंद!! - माझ्या आत्तेचे उद्गार! हिंदी सिनेमाची कमाल शौकीन. 2 महिन्याच्या असलेल्या माझ्या आत्तेभावाला आजीकडे सोपवून चटकन- म्हणजे अडीच तास- सिनेमा बघून येणारी. आणि हे 50 वर्षांपूर्वी, आमच्या रत्नागिरीत म्हणजे तुलनेने लहानशा शहरात. तिचंच हे असं मत, मग आम्हाला काय, मज्जाच!)

कधीही गाईड
राक कायम मी नाही त्यातला अन् कोयंडा लावा आतला टाइप वाटत आलाय, येडा बनून पेढा खाणारा
चोरी चोरी या एकमेव सिनेमात सहन झालाय

त्या कॉम्परिझन मधे देव आनंद तर अव्वल नंबर मधे ही सहन करणेबल होता

सवाल ये नहीं है के मैं जीऊंगा या मरूंगा
सवाल ये है के इस दुनियाको बनानेवाला, चलनेवाला कोई है या नहीं
अगर नहीं, तो मेरा जीना क्या, मेरा मरना क्या
मगर अगर है, तो सवाल ये है के वो अपने भक्तों की फरियाद क्यों नहीं सुनता...
लक बाय चान्स मधे ऑडिशन ला वापरलेला गाईड मधला डायलॉग...

जोकर अन् जॉनी मधे जॉनी अजूनही बघितला जातो, सहा महिन्यांपूर्वीच पाहिला. पण जोकर बघायचा विचारच होत नाही. भाबडेपणाच्या नावाखाली ठरकीपणा

जोकरचा पहिला म्हणजे एक तृतियांश .. सीम्मी वाला..... क्लासिक होता..... मग सामान्य
गाईड सर्वांगसुंदर