समारोप: मायबोली गणेशोत्सव २०२५
नमस्कार मंडळी.
नुकताच आपण गणरायांना निरोप दिला. दहा दिवस धामधुमीत कसे गेले ते कळले देखील नाही. दरवर्षी गणेशोत्सवाइतकीच वाट आपण "मायबोली गणेशोत्सव उपक्रम आणि स्पर्धा" ह्यांची पाहत असतो. ह्या दिवसात घरातल्याइतकीच लगबग आणि उत्सवी वातावरण मायबोलीवर असते.
२०२५ च्या मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाली आणि लगेचच संयोजक समिती स्थापन झाली.संयोजक मंडळाच्या मिटिंगा झाल्या, विचार मंथन झाले, मेसेज-कॉल्स झाले, व्हॉट्स ॲप ग्रुप बनला, एक्सेल बनवली गेली. स्पर्धा आणि उपक्रमांची यादी सुद्धा तयार झाली.
गणपतीत ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांना तसेच, इतरांनाही वेळ मिळत नसल्याने यावर्षी गेल्यावर्षीसारखे धागे लवकर काढायचे ठरवले. त्यासाठी पाककृती स्पर्धा व काही उपक्रमांचे धागे लवकर प्रकाशित करण्यात आले.
नेहमीच्या उपक्रमामध्ये मायबोली गणेश प्रतिष्ठापनेसाठी गणेश मूर्ती, सजावट याचबरोबर आपल्या मायबोलीवरील किल्ली यांनी त्यांच्या आवाजात सुश्राव्य गणपती स्तोत्र म्हटले. यासाठी किल्लीचे विशेष आभार. सर्वांनी "घरचा बाप्पा" व "बाप्पाचा नैवेद्य" या सदरासाठी आपापल्या घरातील उत्सव मूर्तींचे, गौरीचे, सजावटीचे फोटो व चविष्ट नैवेद्यांचे फोटो देऊन या धाग्यावर अगदी उत्साही वातावरण आणले.
शशक व प्रकाश चित्रांचा झब्बू यासाठी गेल्या पंचवीस वर्षात अनेक विषय आधीच येऊन गेल्यामुळे यात नाविन्य कसे आणावे हा एक मोठा यक्षप्रश्न नेहमी असतो. शशक वाक्य पूर्ण कथेत कुठेही वापरा असा बदल यावर्षी केला. त्याला भरघोस प्रतिसाद देखील मिळाला. यावर्षी "एक क्षण अभिमानाचा" या लेखन उपक्रमादरम्यान मायबोलीकरांनी आपल्या आणि आपल्या स्वकीयांच्या आयुष्यातील अभिमानाचे क्षण सर्वांसोबत वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद. त्याबरोबरच, "मला भेटलेला देवमाणूस" आणि "माझी संस्मरणीय भटकंती" या लेखन उपक्रमांना देखील उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त मंडळ आपले आभारी आहे. आपल्या छोट्या दोस्तांनीही तर नेहमीप्रमाणेच फार सुंदर चित्रे रंगविली आणि माबो गणेशोत्सवाची शोभा वाढवली. मोठ्यांच्या मायबोलीत छोट्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समस्त मायबोली तर्फे त्यांचे खूप खूप कौतुक.
परंतु गेल्या काही वर्षापासून छोट्या दोस्तांचा सहभाग हा लक्षणीय घटला आहे असे नमूद करावेसे वाटते. याबद्दल आपली काही मते असल्यास, सूचना असल्यास त्या जाणून घ्यायला नक्की आवडतील. त्यानुसार योग्य ते बदल नक्कीच केले जातील.
पाककृती स्पर्धेला सुद्धा यावर्षी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद दिलात. "चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ" आणि "फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ" या स्पर्धेत एकेक नावीन्यपूर्ण आणि चटपटीत पाककृती आल्या आहेत. यावर्षीच्या "पदार्थ आमचा सजावट तुमची" या हटके पाककृती स्पर्धेसाठी अप्रतिम आणि अगदी मिशेलिन स्टार रेस्टॉरेंट मध्ये पण वाढता येतील या दर्जाच्या पाककृतींच्या प्रवेशिका आल्या. वरण भात आणि शिरा या मराठमोळ्या पदार्थांना इथल्या बल्लवाचार्यांनी आणि सुगरणींनी अगदी कुठल्या कुठे नेऊन ठेवले. मायबोली गणेशोत्सवातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्सवामुळे अनेक रोमात असलेले मायबोलीकर इथे अँक्टिव्ह झाले. त्यांनी सर्व उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.
"सवाल जबाब" हा नवीन गंमत खेळ सगळ्या मायबोलीकरांनी छान खेळला. नवनवीन स्वरचित भन्नाट कोडी आणि त्यांची उकल करताना सगळ्यांना धमाल आली.
गेल्यावर्षीचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला गंमत खेळ म्हणजे "मायबोली व मायबोलीकरांवर मीम्स" ज्याला उदंड, भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तेच लक्षात ठेवून त्याची वर्जन 2.0 या वर्षी गंमत खेळ म्हणून ठेवली. त्या धाग्यावरील तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद पाहून आमचा निर्णय योग्य होता असे वाटले. किंबहुना आता हा गंमतखेळ दरवर्षी "by default" असणार यावर शिक्कामोर्तब झाले. एकापेक्षा एक विनोदी मीम्सने सर्वांना खळखळून हसवले. सभासदांच्या मायबोलीवरील वावरावरील अनेक मीम्स, त्या सर्वांनी खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. तसेच या समस्त उपक्रमांच्या, मतदानाच्या धाग्यांसाठी आणि लागेल तिथे योग्य ती तांत्रिक मदत केल्याबद्दल वेमा आणि ॲडमिन यांचे देखील आभार.
सर्व मायबोलीकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात इथले वातावरण सतत उत्साही, उत्सवी, आनंदी, खेळकर ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुम्हा समस्त मायबोलीकरांमुळे या उत्सवाला शोभा आहे. तुमच्या सहभागामुळेच हा उत्सव एवढा सुरेख होऊ शकला.
यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे आम्हा संयोजक मंडळाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या ही नक्की कळवा.
यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम तुम्हाला येथे https://www.maayboli.com/node/87139 पहायला मिळतील.
शशक व पाककृती स्पर्धांचे निकाल येथे https://www.maayboli.com/node/87244 पहायला मिळतील.
सर्व सहभागकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
चला तर मग यावर्षी आम्ही निरोप घेतो. पुढच्या वर्षी परत भेटू या.
आपला लोभ असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत रहावा ही सदिच्छा.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया !!!!
कळावे,
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०२५
अतरंगी, किल्ली, ऋतुराज, धनि, अभ्या, वामन राव
नमस्कार संयोजक (नमस्कार
नमस्कार संयोजक (नमस्कार अतरंगी, ऋतुराज., किल्ली, वामन राव, धनि , अभ्या...)
या वर्षीचाही गणेशोत्सव तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे यशस्वीपणे पार पडला. तशा सभासदांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. सगळ्यांना वेळेत प्रशस्तीपत्रकेही देऊन झाली आहेत. खूप खूप धन्यवाद . मायबोली तुमची ऋणी आहे.
Pages