सीरियल… का सिरीयसली unreal …
सध्या माझ्या एका व्हॉट्सअँप ग्रुप वर एका जुन्या पण पुन्हा नव्याने सुरू झालेल्या हिंदी दूरदर्शन मालिकेची चर्चा सुरू आहे. तीच हो… ती तुलसी आणि मिहिरची मालिका. खरं म्हणजे मी बऱ्याच वर्षांपासून या सगळ्या धारावाहिक मालिकांना काडीमोड दिला आहे; त्यांत हिंदी, मराठी, इंग्रजी असा भाषेवर आधारित कोणताही दुजाभाव नाही… अगदी होलसेल रेट मधे तमाम मालिकांना एकच वागणूक. पण त्यामुळे आमच्या ग्रुप मधल्या चर्चेत मला सहभागी होता येत नाही. तरीही या मालिके बद्दल, त्यातील कलाकारांबद्दल चालू असलेली चर्चा, विचारांची देवाणघेवाण… थोडक्यात ‘ गॉसिप ‘ ऐकायला मात्र मजा येत होती. पण जेव्हा मी त्यातल्या कलाकारांचे फोटो आणि काही व्हिडिओ बघितले तेव्हा मात्र मला धक्काच बसला. कारण माझ्या आठवणी प्रमाणे या मालिकेच्या आधीच्या season मधे मिहिरची plastic surgery झालेली होती आणि त्यामुळे त्याचा चेहेराच काय पण उंची, शरीरयष्टी, आवाज, चालण्या बोलण्याची लकब सगळंच बदलून गेलं होतं. पण आता बघितलं तर मिहिर पुन्हा त्याच्या ओरिजिनल रुपात दिसतोय. म्हणजे? मधल्या काही वर्षांत पुन्हा plastic surgery करवून घेतली की काय त्याने?
माझी ही मूलभूत शंका जेव्हा मी आमच्या ग्रुप मधे विचारली तेव्हा माझ्या त्या प्रश्नावर वेगवेगळी उत्तरं मिळाली. पण त्या सगळ्यांचा मतितार्थ मात्र एकच – “अगं, टीव्ही सीरियल आहे ती. त्यात काहीही होऊ शकतं.”
हे विधान मात्र अगदी मनापासून पटलं. यांचं नाव जरी सीरियल असलं तरी त्यांत रिअल असं फार कमी असतं;आणि अजूनही एका सत्याची जाणीव झाली. इतकी वर्षं उलटली पण या टीव्ही वरच्या मालिकांचा स्तर मात्र अजूनही जिथे होता तिथेच आहे. काही बाबतीत तर तो अजूनच ढासळत चालला आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करायला लागले तेव्हा माझं मन कित्येक दशकं मागे गेलं – अगदी दूरदर्शनच्या काळात… जेव्हा ‘ केबल टीव्ही ‘ हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळात जाऊन पोचले मी. त्यावेळी किती छान, दर्जेदार कार्यक्रम असायचे टीव्ही वर. रविवारी सकाळी साप्ताहिकी मधे सांगितली जाणारी पुढील आठवड्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, छायागीत, प्रतिभा आणि प्रतिमा,फूल खिले हैं गुलशन गुलशन मधली ever fresh तबस्सुम, आपल्या सैन्यदलांतील वीर योद्ध्यांवर आधारित परमवीरचक, रजनी, ये जो है जिंदगी, मिस्टर योगी, सर्कस , फौजी, जसपाल भट्टी यांचा उल्टा पुल्टा , चिमणराव गुंड्याभाऊ… ही यादी खरंच न संपणारी आहे.त्याकाळी पण धारावाहिक मालिका होत्याच की. बऱ्याचशा १३ भागांत संपणाऱ्या; पण काही दीर्घकाळ चालणाऱ्या ही होत्या. पण त्यातील प्रत्येक मालिका, प्रत्येक कार्यक्रम आपला दर्जा राखून होते. पण जेव्हापासून केबल टीव्ही ही संकल्पना आली तेव्हापासून हळूहळू या मालिकांचं जणूकाही अधःपतनच सुरू झालं. वेगवेगळ्या चॅनल्स मधे टीआरपी साठी जी स्पर्धा सुरू झाली त्यात दुसऱ्याला मागे टाकण्याच्या नादात आपण प्रेक्षकांना काय दाखवतोय याचंही भान राहिलं नाही. ‘ काहीतरी हटके ‘ दाखवण्याचा नादात आपण किती हास्यास्पद आणि खालच्या पातळीवरचं प्रक्षेपण करतोय हे देखील यांच्या लक्षात येत नसेल का? आपल्या प्रेयसीच्या हट्टापायी चंद्राला गवसणी घालून त्याचा एक तुकडा तोडून तिच्या पायाशी आणून ठेवणारा नायक, मालिकेतील अतिशय प्रेमळ, कष्टाळू नायिकेशी एखाद्या माणसाप्रमाणे गप्पा मारणारा, तिला घरातली बित्तंबातमी सांगणारा पोपट, चंद्रावर अडकलेल्या आपल्या प्रियकराला सोडवून आणण्यासाठी एका दुचाकी वरून आकाशात झेप घेणारी नायिका, एका शापामुळे माशी बनून घरभर उडणारी त्या घरची आदर्श सून… अरे, काय चाललंय काय? ‘ टीव्ही समोर बसलेला प्रेक्षक हा अत्यंत मूर्ख आणि तितकाच निरुद्योगी आहे. ‘ या एका तत्वावर या सगळ्या मालिका चालू आहेत. आणि आश्चर्य म्हणजे या अशा मालिकाही लोक अगदी आवडीने बघतायत. एकूण काय सगळा सावळा गोंधळ आहे.
पण जर थोडं लक्ष देऊन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते – साधारणपणे या प्रत्येक मालिकेची कथा, त्या कथेतील पात्रं, त्यांचे आपसांतले हेवेदावे, त्याग, प्रेम वगैरे भावना आणि मग त्यातून पुढे घडत जाणारे नाट्यात्मक प्रसंग… सगळं काही बऱ्यापैकी सारखंच… अगदी predictable म्हणता येईल इतकं! सुरुवातीच्या दोन तीन एपिसोड्स मधे आपल्याला अगदी आदर्श भासणारं – बहुदा दोन तीन पिढ्या एकोप्याने रहात असलेलं भलंमोठं कुटुंब बघायला मिळतं. गंमत म्हणजे चॅनेल कोणतंही असो, भाषा कोणतीही असो पण त्या मालिकेतील कुटुंबामधले सदस्य मात्र थोड्याफार फरकाने एक सारखेच असतात. म्हणजे बघा ना – प्रत्येक घरात एक अतिशय कर्तृत्ववान स्त्री अथवा पुरुष असायलाच पाहिजे. आणि ते पात्र जितकं जास्त कर्तृत्ववान तितकाच (किंवा तितकीच) मठ्ठ, कुचकामी, काही बाबतीत अगदी बावळट असा त्याचा किंवा तिचा जोडीदार! याशिवाय एक आदर्श मुलगा आणि त्याची हरहुन्नरी, संस्कारी बायको; दुसरा मुलगा मात्र अगदी त्याच्या बायकोच्या ताटा खालचं मांजर आणि त्याची बायको अर्थातच कजाग आणि स्वार्थी! या दुसऱ्या सुनेला घराबाहेर राहून फूस लावणारी , तिचे कान भरणारी तिची तितकीच हिकमती आई… या सगळ्यांच्या जोडीला एखादा लांबचा नातेवाईक आणि एक खूप प्रामाणिक विश्वासू असा नोकर … ही सगळी पात्रं म्हणजे त्या मालिकेची मूलभूत गरज; याशिवाय कथेनुरूप एक अविवाहित सर्वगुणसंपन्न मुलगी अथवा mills and boon च्या कादंबरीमधून सरळ अवतार घेतलेला most eligible bachelor असा लग्नाळू मुलगा ही पाहिजेच.
हे आदर्श कुटुंब बहुत करून श्रीमंतच असतं. त्यांचा स्वतःचा अगदी भरभराटीला आलेला एखादा व्यवसाय असतो. या घरातले सगळे पुरुष रोज सकाळी उठल्यापासून सुटा बुटात वावरत असतात. आणि घरात राहणारे वयस्क पुरुष अगदी कडक इस्त्रीचा कुर्ता पायजमा घालून एका आरामखुर्चीत वर्तमानपत्र वाचत बसलेले असतात. या घरातल्या पुरुषांना चट्ट्यापट्टयाचे पायजमे किंवा अघळपघळ बनियन मधे मी कधीच बघितलं नाहीये.
या पुरुषांनाही लाजवतील अशा या घरातल्या स्त्रिया – काही बाबतीत त्यांच्यापेक्षा वरचढ! रात्री जर डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन झोपल्या असतील तर सकाळी उठल्यानंतरही ती ओढणी जागची हललेली नसते. रात्रभराच्या beauty sleep मुळे की काय, पण त्यांचं रूपडं अगदी निखरुन आलेलं असतं. त्यांना तसं बघितलं की मला चांगलाच न्यूनगंड येतो. मी तर सकाळी उठल्यावर आरशासमोर उभी राहायलाही घाबरते. एकदा हिंमत करून सकाळी उठल्या उठल्या स्वतःचं मुखदर्शन केलं होतं; पण मग नंतर कितीतरी रात्री भीतीची स्वप्नं पडत होती मला. पण या सीरियल मधल्या सगळ्या बायका मात्र रोज भल्या पहाटे उठून सोळा शृंगार करून स्वैपाकघरात हजर असतात. रोज जरीकाठाच्या अगदी चापून चोपून नेसलेल्या डिझाईनर साड्या, वेशभूषेला साजेसे दागिने – ते ही रोज नवे. चेहेऱ्यावरच्या अगदी मस्कारा आणि लिपस्टिक पासून नेल पेंट पर्यंत सगळं मॅचिंग, छानशा हेअरस्टाईल मधे माळलेला मोगऱ्याचा गजरा. या अशा चालत्या फिरत्या mannequinsना बघितलं की मला माझ्या आजीचं एक वाक्य आठवतं – “आल्या सगळ्या साळकाया माळकाया लचकत मुरडत!”
या सौंदर्यवतींकडून प्रेरणा घेऊन मीदेखील एकदा असाच साजशृंगार करायचं ठरवून टाकलं. म्हटलं, आज वेळ आहे तर पुढच्या आठ दिवसांचा ड्रेस कोड आजच ठरवून टाकू. हो ना, नाहीतर रोजच्या “आज स्वैपाक काय करायचा?” या प्रश्नाच्या जोडीला “आज शृंगार काय करायचा?” हा प्रश्न उगीच त्रास देणार. म्हटलं,”नकोच ते झंझट.” म्हणून मग सगळ्या साड्या आणि त्यावर मॅचिंग दागिने काढून बसले. पण ‘ कसलं काय आणि फाटक्यात पाय ‘ अशी गत झाली. साड्या तर आहेत खूप, रोज नवी नेसायची ठरवली तरी दोन तीन महिने काही काळजी नाही. पण दागिने… त्यांचं काय करू? सीरियल मधल्या बायकांसारखे चकचकीत polish वगैरे केलेले सोन्या मोत्याचे ढीगभर दागिने कुठून आणू? माझ्याकडचा हा खजिना तर जेमतेम आठवडा भर पुरेल मला. त्यानंतर काय? खूप विचार केला आणि शेवटी ठरवलं, आपण बरे आणि आपला सुटसुटीत कॉटनचा सलवार कमीज बरा! आणि अशा रीतीने जात्याच अंगी असलेला समजूतदारपणा दाखवत मी माझे सगळे दागिने आणि साड्या पुन्हा कपाटात कोंबल्या.
पण या सगळ्या कसरतीत एक विचार सतत मनात डोकावत होता. त्या सीरियल मधल्या सदस्यांच्या अगदी अंगाखांद्यावर जरी श्रीमंती खेळत असली तरी घरात कामासाठी मात्र फक्त एकच मदतनीस. आणि तो किंवा ती मदतनीस देखील सकाळी घाईच्या वेळात गायब! त्यामुळे या सगळ्या लेकी सुना दिवसभर स्वैपाकघरात काम करत राहतात. आणि स्वैपाकघर तरी कसं – एखाद्या गृहसजावटीच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळण्याइतकं सुसज्ज आणि देखणं – अगदी डिझाईनर का काय म्हणतात ना, तसं. त्यात एक भला मोठा गोदरेजच्या कपाटाएवढा फ्रिज… पण तरीही चहा साखरेचे डबे, फळं ,भाज्या (त्यात पालेभाजीच्या दोन तरी जुड्या असायलाच हव्या), इतर भांडीकुंडी सगळं काही ओट्यावरच; अगदी आरास मांडल्यासारखं.
आणि या सगळ्या लेकी सुनांत जी स्वैपाक करत असते तिचे केस मात्र हमखास मोकळेच असायला हवे – आणि तेही एका खांद्यावरून पुढे घेतलेले. अधून मधून आपण किती थकलो आहोत हे दाखवण्यासाठी ती ललना आपल्या कपाळावरच्या अवखळ बटा हातानेच कानाआड करत करत स्वैपाक करत राहते; पण तरीही घरातल्या पुरुषांच्या जेवणात एकही केस मात्र कधीच सापडत नाही. हे कसं काय जमतं बाई यांना? मी तर सकाळी उठल्या पासून केसांचा एक घट्ट बुचडा बांधून त्याला एका क्लिपचा safety belt लावून घरभर फिरत असते; तरी अधून मधून एखादा केस अगदी डाव साधून स्वैपाकात एन्ट्री मारतोच… तोही नेमका माझं ताट सोडून इतरांच्या ताटात जाऊन विसावलेला असतो; एखाद्या शत्रूने केसाने गळा कापावा ना.. अगदी तस्साच! याउपर घरात फरशीवर, खास करून दाराच्या मागे जागोजागी केसांची जी रांगोळी तयार होत असते तिच्याबद्दल तर बोलायलाच नको.
पण त्या टीव्ही स्क्रीनच्या पलीकडच्या घरात – केस काय, साधा धुळीचा एक कणही नाही दिसत कधी… अगदी दिवस रात्र दारं खिडक्या उघड्या असतात; तरीही धूळ, डास, माश्या काहीच कसं नाही येत त्यांच्या घरात?’ कदाचित त्यांच्या सीरियलच्या time slotच्या आधी त्या सद्गुणी, कामसू स्त्रिया त्यांचं घर स्वच्छ करून ठेवत असाव्या. होय, असंच असेल. ‘… माझ्या टीव्ही सेट वरची धूळ स्वच्छ करत मी आपलं माझंच समाधान करून घेते नेहमी.
अजून एक मजेशीर सत्य तुमच्या लक्षात आलं का ? आलंच असेल म्हणा… It’s too obvious. आपण जेव्हा आपल्या घरातल्या सदस्यांशी संवाद साधत असतो, गप्पा मारत असतो तेव्हा आपण सोफ्यावर, खुर्चीवर, व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर नाहीतर पलंगावर कुठे तरी आरामात बसलेले असतो. पण या सीरिअल्स मधले सगळे सदस्य बहुतेक वेळा एकमेकांशी बोलताना उभे राहूनच बोलत असतात. आणि जर कधी आरामात सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले तर पुढच्या काही क्षणात कोणीतरी अशी काही धक्कादायक बातमी , असा एखादा गौप्यस्फोट करतो की ते सगळे बसलेले सदस्य “काय”, “काय”, “काय” म्हणत खाडकन उभे राहतात. (जी बातमी ऐकून एखाद्या सामान्य माणसाच्या पायातलं बळ जाऊन तो मटकन् खाली बसतो त्याच बातमीने या सीरियल मधल्या लोकांना मात्र उसनं अवसान येतं.) आणि हा “काय” हा प्रश्न देखील सगळे एकदम विचारत नाहीत. प्रत्येक जण स्वतःच्या स्वतंत्र प्रश्नाला साजेसा भाव आपल्या चेहेऱ्यावर आणून मगच “काय” हा शब्द उच्चारतो. आणि यामुळे गोंधळून जाऊन की काय पण तो कॅमेरा मागचा माणूस देखील एका long shot मधे सगळ्यांची प्रतिक्रिया न दाखवता, प्रत्येकाचा close up घेऊन त्याच्या प्रश्नाचा आणि हावभावाचा मान राखतो. पण या सगळ्या “काय काय” मधे त्या दिवसाचा एपिसोड संपून जातो, त्याचं ‘ काय ‘ ?
या सगळ्या गुंतागुंतीच्या विचारमंथनातून एक खूप महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. आपण जोपर्यंत या कुटुंबाच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालत नसतो तोपर्यंत त्यांच्या घरात सगळं कसं आलबेल असतं. पण जसजसे आपण रोज ठराविक वेळी आपल्या टीव्ही मधून त्यांच्या घरात डोकावून बघायला लागतो ना, तसे हळूहळू त्यांच्या त्या हसत्या खेळत्या आदर्श कुटुंबात रोज नवे प्रश्न, नवी आव्हानं, नवी संकटं उभी राहायला लागतात. आणि मग बघता बघता ( म्हणजे आपण ती मालिका बघता बघता) त्यांच्या आयुष्यात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणून मी केव्हाच ठरवून टाकलंय – कोणत्याही चॅनेल वरची कोणत्याही घराची कहाणी अजिबात म्हणजे अगदी अजिबातच बघायची नाही… नाही म्हणजे नाहीच! हो ना, उगीच आपल्या भोचकपणामुळे इतरांच्या सुखी संसारात बिब्बा का घालायचा? त्यांना त्यांच्या घरी गुण्यागोविंदाने राहू दिलं तर आपोआप आपणही आपल्या घरी सुखाने जगू शकू.
शेवटी काय – जगा आणि जगू द्या… हेच खरं!
क्षमस्व, लेख या सदरा खाली
क्षमस्व, लेख या सदरा खाली प्रकाशित करायचे होते, चुकून कथा कादंबरी या सदरात प्रकाशित झाले. हे इथून delete कसे करायचे?
सगळा लेख वाचला नाही. पण
सगळा लेख वाचला नाही. पण मिहिरची प्लास्टिक सर्जरी झाली नव्हती. अभिनेता बदलला , तेही दोनदा असं सांगितलं गेलं. तोवर प्ला स चा शोध लागला नव्हता बहुतेक. मंदिरा याच मालिकेत होती का? तिची प्ला स झाली आणि मंदिरा बेदीची अचिंत कौर झाली. तिचा चेहरा, उंची, शरीरयष्टी , आवाज हे सगळं बदललं.
प्ला सचा सगळ्यात मोठा खेळ देस में निकला होगा चाँद मध्ये होता. यात ओरिजिनल मि अमर उपाध्याय प्लास्टिक सर्जरी करून वरुण बडोला झाला आणि व ब प्ला स करून अ उ.
हिंदी मालिका खूप वर्षांत
हिंदी मालिका खूप वर्षांत बघितल्या नाहीत. मराठीत गुंतता हृदय हे (संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, पल्लवी सुभाष) ही साधारण २०११-१२ च्या सुमारास लागायची. एकदम मस्त होती. मी झी ५ वर परत एकदा सगळी बघितली होती काही वर्षांपूर्वी परत. बाकी हल्लीच्या ज्या काही मालिका थोड्याफार बघितल्या आहेत त्या म्हणजे तर अक्षरशः कचरा आहे.
मी सुद्धा एकही मालिका बघत
मी सुद्धा एकही मालिका बघत नाही... ना हिंदी ना मराठी... शेवटची पाहिलेली मालिका जुनीवाली 'बडे अच्छे लगते है".... तरी आई पहात असलेल्या काही मराठी मालिकांकडे कधीतरी लक्ष जातंच... एक तर हल्ली सगळे सण सगळ्या मालिकांमध्ये, कधीकधी दोनतीन मालिकांचे कलाकार एकत्र करून महाएपिसोड वगैरे... मला तर कोण कोणाचे कोण काही कळत नाही... पण एकंदरीत मेंदू बाजूला काढून ठेवूनच बघण्याच्या लायकीच्या !!
छान लिहिलं आहेत. सिरियल च्या
छान लिहिलं आहेत. सिरियल च्या नावाखाली जो काही बिनडोकपणा आणि मुर्खपणा दाखवला जातो त्याला मनोरंजन म्हणताच येणार नाही.
ह्यातल्या काही सिरियल्स चे एपिसोड एकामागोमाग एक सलग चार दिवस युद्धकैद्यांना किंवा अट्ट्ल गुन्हेगारांना दाखवले, तर ते "हवे ते गुन्हे कबूल करतो पण हा छळ थांबवा" असे म्हणतील.
अरे सिरीयल्स बघायला हव्यात
अरे सिरीयल्स बघायला हव्यात
त्याशिवाय पिसे कशी काढणार
तेवढ्यासाठी मी तू पा रे पाहिली होती