पाककृती स्पर्धा १ - वरण भात सजावट - अल्पना

Submitted by अल्पना on 2 September, 2025 - 10:59

या पाककृतीसाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे माबोकर नसलेली उत्साही मैत्रिण. दर वर्षी इथल्या गणेशोत्सवाच्या स्पर्धा सुरू झाल्यावर मी माझ्या या मैत्रिणीला सांगत असते. भाग घेतल्यावर आणि घ्यायच्या आधी काय करणार आहे, किंवा काय करावं याची हिच्याशी चर्चा होतेच. तिला माबो सदस्यत्व घेण्याचा अनेकदा आग्रहही करून झाला आहे. पण हि मैत्रिण सोशल मिडियावर रमत नाही.
यावेळी स्पर्धेचे विषय आल्यावर नेहेमीप्रमाणे हिला सांगितलं होतंच. वेगवेगळे पदार्थ करून बघायला मला आवडत असलं तरी सजावट करणं फार काही जमत नाही, त्यामुळे मी या विषयामध्ये प्रवेशिका देणार नव्हते. पण मैत्रिण म्हणाली मी तुला मदत करते, आपण दोघी मिळून करू, मी फोटो काढते. (ही मैत्रिण खूप सुरेख प्लेटिंग करते आणि एकंदरच छान फोटो काढते).
मी खरंतर त्यानंतर विसरूनही गेले होते. पण तिने काल परत आठवण करून दिली. शेवटी आज तिच्या घरी जावून वरण भाताची सजावट करून फोटो काढलेच.
नेहेमीप्रमाणे तुरीचे साधं वरण (जरा घट्टसर शिजवून घेतलं). त्यात हिंग, हळद आणि मीठ घालून छान घोटून घेतलं, अगदी हमस सारखं मऊ. आमचं वरण जरा पातळ झालं होतं, म्हणून मग थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवलं. अर्ध्या तासात हवं तेवढं घट्ट झालं. मऊ भात शिजवून घेतला आणि तोपण जरा घोटून घेतला. छोट्या कपकेकच्या मोल्ड मधून भाताच्या मुदी पाडल्या.
प्लेटमध्ये वरण वाढून घेतलं, त्यावर या भाताच्या मुदी ठेवल्या. त्यावर थोडा चिरलेला कांदा, टॉमॅटो आणि हिरवी ढब्बु मिरची चिरून ठेवल्या, लिंबाच्या फोडी ठेवल्या. तुपात सांडगी मिरच्या तळून घेतल्या आणि त्या प्लेटमध्ये वाढल्या. त्याच तुपात जिर्‍याची फोडणी करून ते तुप वरण भातावर वाढलं. वरून रंगासाठी थोडं काश्मिरी तिखट भुरभुरलं. आमचं वरण जरा थंड असल्याने ती तुप जिर्‍याची फोडणी, फोटो काढेपर्यंत थिजून गेली होती. मग फोटो काढताना चकाकीसाठी परत थोडं पातळ तुप घातलं.

या पाककृतीचे क्रेडीट माझी दिल्लीकर मैत्रिण प्राजक्ता हिलाच आहे.
varan bhat 1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिझ्झाचा हट्ट धरणाऱ्या बारक्याना हे फोटो दाखवले तर swiggy zomato च्या वरणभात ऑर्डर हमखास वाढतील इतकी कातिल सजावट झालीय

छान सजावट.

मला आधी वरण पॅनकेक वाटला.

भन्नाट दिसतंय हे!
केचपचा फराटा न मारताही एकदम सुरेख प्लेटिंग होऊ शकतं हे त्या शेफांना सांगा कोणी.

मस्त दिसते आहे सजावट, अल्पना. Happy
रंगसंगती तुझ्या डीपीसारखीच झाली आहे बघ नेमकी! Happy

(उद्या हे पाहून पुण्यातल्या हाटेलात कोणीतरी 'भात वरण मे डुबा के लाना' अशी ऑर्डर द्यायची शक्यता नाकारता येत नाही. Proud Light 1 )

मी वरण पण ओळखले नाही आणि भात पण ओळखला नाही... काय तरी अचाट दिसतेय हे प्रकरण..
म्हणजे ते मीचलीन स्टार मधे अगदी फीट बसेल ..

हो ना! इतकं वर्तुळाकार, कुठेही न पाघळणारं, पाघळलं असेल आणि करेक्शन केलं असेल तरी ते जराही न दिसणारं. वर हिरवंगार रसरशीत लिंबू, मिरची, टमेटो, जिरं आणि भुरभुरवलेलं तिखट, कढिपत्त्याची कोवळी काडी. पूर्ण सपाट आणि शार्प बदल होऊन उभ्या कडा असलेली काळसर हिरवी मॅट प्लेट! परत परत बघावं असं झालंय.

थँक्यू.
स्वाती, तू लिहिल्यावर डिपी बघितला. अगदीच सारखी रंगसंगती आहे. पण डीपी बदलायला हवा आता, मी different strokes मध्ये active नाहीये आता, फक्त सपोर्ट करते.
पाघळू नये इतपत घट्ट आणि घोटलेलं होते वरण. आम्ही दोघी चित्रं काढतो, रंगवतो त्यामुळे वरणाचे वर्तुळ सोप्पं होतं.
हमस आणि फलाफल प्लेटिंग इंस्पिरेशन आहे या प्लेटिंग चे.

वाह!

वरणाचा दोसा, त्यावर म्हैसूर मसाल्यासारखी पोडी आणि भाताच्या इडल्या - असं दिसलं मला ते. भन्नाट आहे!