मला भेटलेले देवमाणूस - (माझे वडील)
१) नव्वदीच्या दशकातील गोष्ट!
मी इयत्ता चौथीत होतो. बहुधा सोमवार होता. आदल्या आठवड्यात बाईंनी गृहपाठ दिला होता. जो माझा पूर्ण झाला नव्हता. या कारणावरून ओरडा खाणे माझ्यासाठी काही नवीन नव्हते. पण त्या दिवशी मला काय माहीत काय सुचले. मी शाळेत गेलोच नाही. म्हणजे घरून शाळेत जायला निघालो. पण वर्गात पोहोचलोच नाही. शाळेचा मेन गेट ओलांडायच्या आधीच पावले पुन्हा उलटी घराच्या दिशेने वळली. वयाने लहान असलो तरी स्कॉलरशिपच्या क्लाससाठी म्हणून बसने-ट्रेनने एकटा प्रवास करायला सुरुवात केली होती. कदाचित याच कौशल्याचा गैरफायदा उचलायची हुक्की आली असावी. जे आयुष्यात पहिल्यांदा मी घरच्यांना अंधारात ठेवत एक पुर्ण दिवसाची शाळा बुडवली.
आई वडील दोघे ऑफिसला जायचे. घरी फक्त आजी आजोबा असायचे. त्यांना गुंडाळणे काही अवघड गेले नाही. कोणा तरी महापुरुषाचे निधन झाल्याने शाळा लवकर सोडली असे त्यांना म्हणालो. संध्याकाळी आई ऑफिसमधून आल्यावर तिला सुद्धा हेच सांगितले. तिने शाळेला चार नावे जरुर ठेवली की असे कसे लहान मुलांना रामभरोसे सोडून दिले म्हणून, पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
वडिलांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी शहानिशा करायला थेट शाळा गाठली. मोबाईल व्हॉट्सॲपचा तो काळ नव्हता, जे घरबसल्या चौकशी करावी. शाळेत गेल्यावर त्यांना समजले की असे काही घडलेच नव्हते. घरी परत आल्यावर त्यांनी मला एका कोपऱ्यात नेऊन माझी शाळा घेतली.
जेव्हा मला समजले की वडिलांनी माझे खोटे पकडले आहे, तेव्हा जाणीव झाली की माझ्या वयाच्या मानाने ते केवढे मोठे खोटे होते. कारण माझ्या समवयीन मित्रांमध्ये तोपर्यंत कोणी असे केले नव्हते. आता आपली काही धडगत नाही हे त्याक्षणीच समजून चुकले. आणि या चुकीच्या बदल्यात मिळणार्या मोठ्यात मोठ्या शिक्षेसाठी मी तयार झालो. पण वडिलांनी ती दिलीच नाही. ते मला म्हणाले जर तुझ्या आईला हे समजले तर तिला किती वाईट वाटेल याचा विचार एकदा करून बघ.. आणि यापुढे असे वागू नकोस. इतकेच बोलून मला सोडून दिले.
आज मला त्या वयातील मोजून चार प्रसंग आठवत असतील. त्यापैकी हा एक जो कायम मनावर कोरला गेला. त्यांचे शब्द जसेच्या तसे आठवत नसले तरी त्यांनी केलेली कृती आजही तितकीच ठळकपणे लक्षात आहे. आईला पुढे कधीतरी म्हणजे जवळपास पंधरा-वीस वर्षांनी गप्पांच्या ओघात त्यांनी हे सांगितले. आणि तेव्हा तिला असे काही घडले होते हेच मुळात आठवत नव्हते.
त्या दिवशी मला मार पडला असता. शिक्षा मिळाली असती. तर कदाचित मी कोडगा झालो असतो किंवा त्या धाकाखाली सुधारलोही असतो, पण शक्य होते की ते सुधारणे मनापासून नसते. पुन्हा अशी चूक करू नये असे आतून वाटले नसते. मुले चुकल्यावर त्यांना कडक शिक्षा न देता त्यांना ती स्वीकारायला कशी लावावी याचा मला त्या दिवशी एक वस्तुपाठ मिळाला.
निदान शाळेत तरी मी पुन्हा अशी चूक केली नाही. पण बारावीला मात्र जेव्हा वयाने घोडा झालो तेव्हा एक घोडचूक केली.
२) बारावीची काशी - आयुष्यातील एक माईलस्टोन!
याबद्दल गणेशोत्सव २०२२ मध्ये लिहून झाले आहे.
कॉलेजचे ते मोरपिशी दिवस
तरी थोडक्यात सांगायचे तर, बारावीला पहिल्या वर्षी अभ्यास झाला नाही म्हणून गॅप घेतली होती. आणि पुढच्या वर्षी अभ्यासाच्या नावावर अभ्यास सोडून ईतर सारे काही करून निकालाच्या दिवशी तब्बल त्रेचाळीस टक्के मार्क्स घेऊन मी घरी आलो होतो. जिथे घरच्यांना माझ्याकडून अपेक्षा होती ती फक्त नव्वद टक्के मार्कांची.
काहीच अंदाज नसताना अचानक मिळालेला ईतका मोठा धक्का एखादे आईबाप कसा काय पचवू शकतात याची कल्पना नाही. किंवा आज मी स्वतः बाप झाल्यावर तो धक्का किती तीव्र असू शकतो याची कल्पना करू शकतो. माझ्या आईला तो पचवणे अवघडच गेले, तिने जागीच बसकण मारली. वडिलांनी मात्र त्याही परिस्थितीत पुन्हा एकदा डोके शांत ठेवले आणि त्यातूनही मार्ग काढला. मलाही मार्ग दाखवला. नातेवाईकाना खोटे मार्क्स सांगून मला त्यांच्या प्रश्नांपासून दूर ठेवले. आणि स्वत: धावपळ करून दहावीच्या गुणांवर मला डिप्लोमाला अॅडमिशन मिळवून दिले. तिथून मात्र मी पुन्हा माझ्यावर किंवा त्यांच्यावर अशी वेळ पुन्हा आणली नाही. किंबहुना, अभिमानाचे असे काही क्षण च दाखवले.
त्या दिवशी ते माझ्यावर चिडले असते किंवा त्यांना वाईट वाटून ते निराश झाले असते तर कदाचित माझेही आयुष्य तिथेच खचले असते. त्यादिवशीची त्यांची कृती आणि त्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय माझे आयुष्य सेट करणारे ठरले.
आणि हो, एकीकडे हे सगळे घडत असताना दुसरीकडे आमच्या घराची जी आर्थिक घडी विस्कटली होती, त्याची तर त्यांनी मला झळ सुद्धा लागू दिली नव्हती.
३) आंतरजातीय विवाह - आयुष्यातील दुसरा माईलस्टोन!
आता याला चूक म्हणावे की आणखी काही, पण प्रेमात पडून एका परजातीतील मुलीला लग्नाचे वचन दिले. पण माझ्या आईने काहीही ऐकून न घेता मला लग्नाची परवानगी देण्यास नकार दिला. तिच्याशी कुठलाही भावनिक वाद घालायची माझ्यात हिंमत नव्हती. तर दुसरीकडे मुलीला दिलेले वचन तोडायचे नव्हते. म्हणजे तिच्यासमोर वेगळे होण्याचा प्रस्ताव ठेवलेला, पण तिने तो धुडकावून लावला. त्यामुळे आता घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशीच लग्न करणे भाग होते.
जे मला ओळखतात त्यांच्या हे पचनीच पडत नव्हते की मी माझ्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध काही करायला जात होतो. पण आई तर या विषयावर एकही शब्द बोलायला तयार नव्हती. त्यामुळे प्रकरण वडिलांच्या कोर्टात जातच नव्हते. त्यांचे मत काय आहे किंवा त्यांना या प्रकरणाबद्दल कितपत कल्पना आहे हे मला काहीच माहीत नव्हते.
मुलीच्या घरून फार थांबावे अशी परिस्थिती नसल्याने मी रजिस्टर लग्नासाठी अर्ज केला आणि त्याची कॉपी घरी आईला दिसेल अशी ठेवली. जेणेकरून आता तरी या विषयाला आणि आईला वाचा फुटेल.
आई काही जातीभेद पाळणारी किंवा जुनाट विचाराची होती अश्यातला भाग नाही. घरात ज्यांनी आंतरजातीय किंबहुना आंतरधर्मीय लग्न केले त्यांना आईने कधीच नावे ठेवली नाहीत, एकीने मुसलमान मुलाशी लग्न केल त्यालाही आपले मूक समर्थन दर्शवले होते. पण नात्यातले कोणी तिला नावे ठेवायला किंवा भांडायला आले तर त्यांना पलटून उत्तर द्यावे अश्यातला तिचा स्वभाव नव्हता. थोडक्यात तिला नातेवाईकांना काय सांगावे याचे जास्त टेंशन होते.
तर आईने तो रजिस्टर लग्नाचा अर्ज उचलून वडिलांच्या हाती ठेवला आणि आमच्या घरात पहिल्यांदाच या विषयावर बोलणे झाले. आणि पहिल्याच फटक्यात वडिलांनी त्याचा निकाल सुद्धा लावला.
लोकांची पर्वा करू नये. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपली असते. लोकं फक्त बोलायला येतात, पण काही कमी जास्त झाले तर आपल्याला पोसायला येत नाहीत. त्यामुळे जगाला फाट्यावर मारून आपण आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगावे. आपल्याला ज्यात आनंद मिळतो ते करावे. हे तत्वज्ञान वडिलांच्या तोंडून कित्येकदा ऐकले होते. ते त्यांनी आईला त्या दिवशी पुन्हा नव्याने ऐकवले. तिला हिंमत दिली आणि माझ्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला.
लोकांची पर्वा करू नये असे बोलणे तुलनेत सोपे असते, पण निभावणे तितकेच अवघड.
तरी ते आमच्याकडे निभावले जात होते, पण कहाणीत अजून एक ट्विस्ट येणे बाकी होते.
लग्न करायचेच असले तरी पत्रिका जुळवूया म्हटले आणि तिथेच फसलो. त्यात मृत्युषडाष्टक योग आला!
पण समस्या ईथेच संपत नव्हती. हाच योग असलेल्या माझ्या एका काकांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काहीच वर्षात आधी ते आणि नंतर काही वर्षांनी काकी असे दोघेही अपघातात गेले होते. त्यामुळे आमच्याकडे हा योग कोणी हलक्यात घेणे शक्य नव्हते. हे समजून उमजून सुद्धा लग्न केले असते आणि दुर्दैवाने काही झालेच असते तर घरात फार मोठा वितंडवाद झाला असता. हा योग कोणापासून लपवून ठेवणे सुद्धा शक्य नव्हते कारण ज्याने पत्रिका बघितली तो पुजारी आमच्याच बिल्डींगमधील होता आणि एव्हाना बातमी शेजारच्यांना सुद्धा समजली होती.
आणि हे देखील काय कमी म्हणून, या सगळ्यात आतापर्यंत जी माझी सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझे वडील होते, ते प्रचंड श्रद्दाळूच नाही तर बरेपैकी अंधश्रद्धाळू देखील होते. रस्त्याने चालताना मांजर आडवे जाऊ नये याची काळजी घेणारे आणि तरीही गेलेच तर आपला रस्ता बदलून जाणारे होते.
पण त्या दिवशी माझ्यासाठी त्यांनी आपल्या सर्व श्रद्धा-अंधश्रद्धा बासनात गुंडाळून ठेवल्या. अजून एका पंडिताला गाठून झाडाशी लग्न करायचा पर्याय शोधला. ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणू शकतो. पण ती माझ्या सोयीची आणि त्यांच्या तसेच इतरांच्या समाधानाची होती.
मधल्या काळात मला रजिस्टर लग्न करायची परवानगी दिली. ज्यामुळे आम्ही लग्न करून साथिया चित्रपटाप्रमाणे तब्बल नऊ महिने एकमेकांपासून दूर आपापल्या घरी, पण निर्धास्तपणे राहू लागलो.
आपल्याच नाही तर आईच्या माहेरच्या नातेवाईकांना सुद्धा या लग्नाबद्दल सांगायची जबाबदारी त्यांनीच आपल्या शिरावर घेतली. माझ्या होणार्या बायकोच्या घरच्यांना सुद्धा लग्नात कुठलेही वाद होणार नाहीत याची खात्री दिली. आपला शब्द त्यांनी पाळला आणि अखेरीस कुठलेही विघ्न न येता आमचे लग्न पार पडले.
-------------
१) जेव्हा आपण चुकतो तेव्हा देव आपली चूक पोटात घालून आपल्याला क्षमा करतो.
२) जेव्हा आपण मार्ग भटकतो तेव्हा देव आपल्याला योग्य ती दिशा दाखवतो.
३) जेव्हा जग आपल्या विरोधात असते पण आपली बाजू सत्याची असते तेव्हा देव आपल्या पाठीशी उभा राहतो.
जर देव ही एक संकल्पना असेल तर ती अशीच काहीशी आहे.
या तिन्ही अनुभूती आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर जर एकाच माणसाने दिल्या असतील तर त्याला का नाही आपले देवमाणूस समजावे.
डिप्लोमा नंतर मला डिग्रीसाठी वालचंद कॉलेजला अॅडमिशन मिळाले होते. तेव्हा माझी तिथे पेईंग गेस्ट म्हणून राहायची आणि खायची-प्यायची सोय लावायला म्हणून ते सोबत आले होते. आमच्याबरोबर माझ्याच कॉलेजचा एक मित्र होता. दोन दिवस राहून, आमची सारी व्यवस्था लाऊन जेव्हा ते परत गेले. तेव्हा या दोन दिवसात त्यांचा अनुभव घेतलेल्या माझ्या मित्राने जे म्हटले ते एक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे, की "तुझा बाप तुझ्यासाठी काहीही करू शकतो!"
पण हा अनुभव त्यांनी इतरांना सुद्धा दिला आहे.
जसे संकटात सापडल्यावर सर्वप्रथम देवाची आठवण होते तसे चाळीत कुठलीही समस्या आली की त्याचे निवारण करायला लोकं त्यांच्याकडेच पहिली धाव घ्यायचे. त्यांचा राजकीय काल एका पक्षाकडे झुकलेला असला तरी जो पक्ष सत्तेत असायचा, जो उमेदवार आमच्या विभागात निवडून आलेला असायचा, त्याची मदत कुठलाही संकोच न बाळगता घेऊन लोकांची कामे करायचे. आजही झेपेल तितके करतात. आजही आमच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे असतात.
ही सगळी दुनियादारी त्यांना जमायची याचे कारण त्यांचे व्यक्तीमत्व माझ्या अगदी विरुद्ध टोकाचे आहे. मी कोणाशी फारसे न बोलणारा, आपल्याच कोषात राहणारा आहे. तर ते बसमधील प्रवासात कंडक्टरशी सुद्धा गप्पा मारणारे आहेत. पंधरा मिनिटांच्या टॅक्सी प्रवासात त्यांना टॅक्सी चालकाचे आणि त्याला यांचे सारे नाव-गाव-फळ-फुल माहीत व्हायचे.
मी चुकूनही लोकांत न मिसळणारा तर ते माझ्यापेक्षाही कमी वयाच्या मुलांना आपल्या मित्रासारखे वाटणारे आहेत. त्यांच्यासोबत पिकनिकला जाणारे, त्यांच्यासोबत मेहफिल जमवणारे, त्यांच्यासोबत पार्ट्यांमध्ये नाचणारे आहेत. लहानातल्या लहान मुलाला सुद्धा ते रिचेबल वाटतात. आणि यालाही एक देवमाणसाचे लक्षण म्हणू शकतो.
म्हणून मागच्या वर्षी जेव्हा त्यांचा ७५ वा वाढदिवस झाला तेव्हा त्यांच्या मित्रपरिवाराने एखाद्या सेलिब्रिटी किंवा राजकीय नेत्यासारखे त्यांच्या नावाचा भलामोठा बॅनर नाक्यावर लावला होता. आता याला आपण माझे अभिमानाचे क्षण या सदराखाली सुद्धा बघू शकता. कारण आई-वडिलांना जसे आपल्या मुलांच्या कर्तुत्वाचा अभिमान असतो तसेच तो मुलांना देखील असतोच. मग ज्यात आपल्याला देवमाणूस दिसतो त्यांच्याबद्दल असायलाच हवा 

खूप सुंदर मांडलेले आहे.
खूप सुंदर मांडलेले आहे. तुमच्या वडीलांना अनेक शुभेच्छा.
रू, प्रांजळपणे लिहीतोस ते खूप
रू, प्रांजळपणे लिहीतोस ! खूप आवडतं.
सुंदर लिहिलं आहे.
सुंदर लिहिलं आहे.
छान लिहिले आहेस ऋ. बाबा
सुंदर!!!
सुंदर!!!
ऋ तुमचे प्रांजल लिखाण नेहमीच
ऋ तुमचे प्रांजल लिखाण नेहमीच भावते.
एकही तो दिल है कितनी बार जीतोगे
सुंदर!
सुंदर!
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
^^छान लिहिले आहेस ऋ. बाबा
^^छान लिहिले आहेस ऋ. बाबा लोकप्रिय आहेत त्यांच्या वर्तुळात, बॅनर पाहून मस्त वाटले. सपोर्टिव्ह पालक असले की मुलांच्यात आत्मविश्वास टिकून राहतो.^^
एकदम सहमत..
विशेषतः शेवटच्या वाक्यासाठी तर हजार वेळा अनुमोदन..
रू, तुझ्या बाबांना खूप शुभेच्छा..
अनुकरण करावे असे lessons आहेत
अनुकरण करावे असे lessons आहेत ह्या लेखात. आवडले.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
तुझा बाप तुझ्यासाठी काहीही करू शकतो
हे पहिल्या वेळी ऐकले की फक्त शब्द वाटतील.
पण नंतर आपण mature होतो तेव्हा त्यातील अर्थ आणि अनुभव relate होत जातो.
पहिला प्रसंग तसा नॉर्मल.
12 वी नंतर त्यांनी प्रचंड समंजसपणा दाखवत परिस्थिती handle केलीय असे म्हणतो. हे फार कठीण आहे.
तुझ्यावर त्यांचा जबरदस्त विश्वास आहे, भले तुझ्याकडून चूक ( वेगळ्या नकारात्मक अर्थाने नव्हे तर मार्क आणणे, अभ्यास करणे ह्या बाबत ) आणि योग्य रीतीने वळणावर आणले आहे त्यांनी आयुष्य.
तिसऱ्या प्रसंगात त्यांची किती कसोटी लागली असेल समजू शकतो.
आवडलं, relate होईल असे फार कमी वेळा लिहितोस.
अश्या ठिकाणी energy लावशील तर असे चांगले लिखाण खूप घडेल तुझ्याकडून.
हा उगीचच सल्ला.
ह्या आगाउपणा साठी सॉरी.
राहवलं नाही.
परीविषयी लेखन अजून आठवतंय.
तसेच हे लेखन.
किती सुंदर लिहितोस हे ही खूप
किती सुंदर लिहितोस हे ही खूप आवडलं . तू ही एक चांगला बाबा आहेस असं मला नेहमीच वाटत , हे तुला तुझ्या बाबांकडून मिळालंय असं आज हा लेख वाचताना वाटलं.
तुझ्या बाबांना उत्तम दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा.
खूप छान मस्त लेख. तुमचे आणि
खूप छान मस्त लेख. तुमचे आणि तुमच्या बाबांचे ही कौतुक.
तुमच्या वडिलांना अनेक
तुमच्या वडिलांना अनेक शुभेच्छा.
सर्वच प्रतिसादांचे मनापासून
सर्वच प्रतिसादांचे मनापासून धन्यवाद
एक समाधान लिहिण्यातून मिळते तर एक आनंद प्रतिसादातून..
@ अस्मिता
<<< सपोर्टिव्ह पालक असले की मुलांच्यात आत्मविश्वास टिकून राहतो>>> +७८६
@ झकासराव
<<< तुझ्यावर त्यांचा जबरदस्त विश्वास आहे >>> हे मात्र अगदी योग्य. तो देखील इतका की यावरून माझी बायको माझी मस्करी सुद्धा करते
(मी त्या पात्रतेचा आहे, नाही, किती सार्थ ठरवला हे बाजूला ठेवूया, ते नाहीये याची कल्पना आहेच)
लिखाणाबाबत आपण कळकळीने दिलेला सल्ला योग्यच आहे आणि तो दिलात याचा आनंदच आहे.
गेल्या दोनेक वर्षात माझ्या धाग्यांची संख्या बरीच रोडावली आहे. त्यामुळे असले धागे आणि तसले धागे यांचे गुणोत्तर सुधारले आहे असे तरी म्हणू शकतो
@ मनीमोहोर
<<< हे तुला तुझ्या बाबांकडून मिळालंय असं आज हा लेख वाचताना वाटलं.>>> हो ममोताई, ते तिथूनच आले आहे. स्पेशली मुलांचे लाड नाही तर त्यांचा रिस्पेक्ट सुद्धा करणे आणि त्यांचाच नाही त्यांच्या मित्रांचा सुद्धा रिस्पेक्ट करणे हे सुद्धा त्यांच्याकडून शिकलोय आणि आवर्जून पाळतो.
छान लेख.
छान लेख.
तुझ्या बाबांना उत्तम दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा.
छान लिहिले आहे .तुमच्या
छान लिहिले आहे .तुमच्या वडीलांना अनेक शुभेच्छा.वाढदिवसाचा बॅनर मस्त आहे.
छान लिहिले आहेत. तुम्हाला आणि
छान लिहिले आहेत. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांनाही शुभेच्छा.
छान लिहिले आहेस अभि. तुझ्या
छान लिहिले आहेस अभि. तुझ्या बाबांचे काही किस्से ऑर्कुट/व्हाट्सऍपवरही वाचले आहेत. त्यानां आणि तुलाही शुभेच्छा.
धन्यवाद मानवमामा, मॅगी सिमरन
धन्यवाद मानवमामा, मॅगी सिमरन निर्मल
हो ऑर्कुट वर लिहिले असतील गप्पांच्या ओघात किस्से, नेमके कुठले ते आता मलाही आठवत नाहीत. लिहिण्यासारखे बरेच काही चालूच असते त्यांचे आजही याही वयात..
खूप छान.
खूप छान.
तुलाही एका प्रतिसादात चांगला बाबा आहेस असं म्हटले होते,त्या चांगलेपणाची देणगी बाबांकडून आली असावी.
>>>>चांगलेपणाची देणगी
>>>>चांगलेपणाची देणगी बाबांकडून आली असावी.
गुणसूत्रे व संस्कार.
हम्म
हम्म
धन्यवाद देवकी आणि सामो
धन्यवाद देवकी आणि सामो
आणि हो, ते असल्यास तिथूनच आले आहे.
फार मनापासून लिहीले आहेस
फार मनापासून लिहीले आहेस
आवडले लिखाणही आणि तुझ्या बाबांचे व्यक्तीमत्वही
छानच लिहीले आहे.
छानच लिहीले आहे.
प्रत्येकाचे वडील असतानाच त्यांचे असे केलेले कौतुक त्यांना पहायला मिळावे. खूप बरं वाटतं त्यांनाही.
कवी सौमित्र म्हणतात कि बापावर एक कविता लिहायचा कित्येक वर्षे प्रयत्न करतोय पण बाप समजतच नाही. आईवर किती कविता केल्या पण बापावरची एक कविता पूर्ण होत नाही. आत्ता चिमटीत गवसला म्हणताना बाप निसटून जातो. कडक शिस्तीच्या बडग्याचं त्याचं त्याने घेतलेलं आवरण त्याच्यातलं वात्सल्य जगाला दिसू देत नाही. ते शब्दांनी व्यक्त होत नाही, बाप झाल्यावर त्या त्या स्टेजला मुलाला बाप समजत जातो.
खूप सुंदर लिहिलंयस. भाग्यवान
खूप सुंदर लिहिलंयस. भाग्यवान आहेस!
हेमाताई +1
छान लेख.. तुझ्या बाबांना
छान लेख.. तुझ्या बाबांना उत्तम दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा.
छान लेख
छान लेख
वा! छान लेख!
वा! छान लेख!
Pages