परकीय भाषेतील "हिंदी/मराठी डब" चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 August, 2025 - 00:00

परकीय भाषेतील चित्रपटांचा मायबोलीवर धागा असावा. पण बरेचदा माझ्यासारख्यांना त्याचा काही फायदा होत नाही. कारण सर्वांनाच परकीय भाषेतील संवाद कळत नाहीत. तसेच चित्रपट बघताना सोबत सबटायटल वाचणे त्रासदायक ठरते. ते देखील बरेचदा इंग्लिशमध्येच असल्याने सर्वांनाच ते कळत नाहीत किंवा पटपट वाचणे जमत नाहीत. त्यामुळे बरेच जण हिंदीमध्ये डब केलेल्या चित्रपटांना प्राधान्य देतात. काही मराठीत देखील असतात. पण त्या डबिंगचा दर्जा तितका चांगला नसल्याने म्हणून म्हणा तितकी मजा येत नाही. सुधारणा झाली तर आवडेल.
असो,

तर अश्या सर्व चित्रपट प्रेमींसाठी हा धागा.

आजकाल ओटीटी किंवा युट्युबवर बरेच चित्रपट हिंदीमध्ये डब केलेले आढळतात. त्यातील आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल इथे लिहूया आणि इतरांना सांगूया.

त्याआधी मी हे चित्रपट साधारणपणे कसे वेचतो ते सांगतो.
पहिला मी ट्रेलर बघतो. तसेच कुठला जॉनर नमूद केला आहे ते बघतो. म्हणजे मूडनुसार कुठला चित्रपट बघायचा हे ठरवता येते. उदाहरणार्थ, हलके फुलके बघायचे असल्यास ड्रामा कॉमेडी रोमान्स असले चित्रपट आधी निवडतो. त्यानंतर जे शॉर्ट लिस्ट होतात त्यांचे नाव गुगल सर्च करून त्याचे IMDB रेटिंग बघून घेतो. किंवा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बघतो. बरेचदा चांगले मास चित्रपट बॉक्स ऑफिस कमाईवरून कळतात.
रेटिंग आणि बॉक्स ऑफिस कमाई दोन्ही कमी असेल तर सहसा वेळ वाया घालवायची रिस्क घेत नाही. किंवा थोडावेळ फॉरवर्ड करत बघतो आणि नाही आवडल्यास सोडून देतो.

चला, प्रतिसादात सुरुवात मीच करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा पाहिला तुम्ही वर सुचविलेला गुमस्तान (Ghumastan) चित्रपट
आवडला. चांगला होता.
म्हटले तर स्टोरी अगदीच झटकेदार नव्हती. एखाद्याला सरळ सांगितली तर काही विशेष वाटणार नाही. पण चित्रपटाची मांडणी अशी केली होती की शेवटपर्यंत उत्कंठावर्धक राहिला..

>> फोरेन्सिक

याची हिंदी आवृत्ती पाहीली होती. राधिका आपटे आणि विक्रांत मेस्सी होते त्यात.
मूळ मल्याळम बघेन आता.

फॉरेन्सिक कसा आहे?
दिसत राहतो.. अजूनपर्यंत पाहिला नाही कुठलाच.. ना ओरिजनल ना रिमेक

Lokah - Chapter १ चंद्रा
Jio hotstar
भाषा मल्याळम – हिंदी डब

Vampire लेडी सुपरहिरो अशी साधारण थीम आहे.
हलक्या फुलक्या कॉमेडीचा तडका आणि लाईट मोड असल्याने इंटरेस्ट टिकून राहिला. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र आता काय कसे घडणार याचा बरेपैकी अंदाज आला.
प्रेमप्रकरणामुळे थोडी स्त्री चित्रपटाची फिलिंग सुद्धा आली.

Aaryan - Netflix
Crime thriller Serial killer

Original Tamil language
Hindi dubbed available

एका टीव्ही शो मध्ये सेलिब्रिटीचा लाईव्ह इंटरव्यू चालू असताना प्रेक्षकातून अचानक एक जण बंदूक घेऊन उठतो आणि शो हायजॅक करतो. तो एक अपयशी लेखक कम सायको किलर असतो. तिथे तो डिक्लेअर करतो की मी येत्या पाच दिवसात पाच लोकांना मारणार आहे. रोज मी एकाचे नाव declare करणार आणि तासाभरात त्याला ठार मारणार. रोक सको तो रोक लो.

पण गंमत म्हणजे हे बोलून तो स्वतःलाच गोळी मारून ठार करतो.

पण तरीही त्याने आधीच प्लान केल्याप्रमाणे दर दिवसाला त्याचा एक व्हिडिओ रिलीज होतो ज्यात तो कोण मरणार त्याचे फक्त पहिले नाव सांगतो. आणि त्यानुसार शहरातील त्या व्यक्तीचा तासाभरात मर्डर होतो.

चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. कुठलेही फुसके सस्पेन्स नाही. फालतू कॉमेडी नाही. अनावश्यक लांबवलेला रोमान्स नाही. एखाद्या सीनमध्ये पुढे काय होणार हे समजले तरी कसे होणार याची उत्कंठा कायम राहते. प्रत्येक मर्डर नंतर आता पोलिसांचा पुढचा प्लॅन काय असणार आणि तो त्या मृत लेखकाने आधीच कसा गेस केलेला असतो हे बघणे रोचक आहे.

मी कालच हा सिनेमा रेकमेंड करणारं रीळ पाहिलं कुठेतरी आणि बघूया म्हणून नाव सेव्ह करून ठेवलं होतं.
आज बघतेच .

Premalu – Jio Hotstar
Original language – Malyalam

IMDb 7.8 – KL State Award Winner हे वाचून आणि लव्हस्टोरी आहे हे बघून सुरू केला.

सुरुवातीला ओके ओके वाटला. पण बदलावे ढकलावे असे कुठे वाटले नाही. थोड्याच वेळात चित्रपट हैदराबाद शहरात गेला आणि लव्हस्टोरी ट्रॅक सुरू झाला तसे हळूहळू रंगत गेला. सेकंड हाफ जास्त छान वाटला. एका मुली मागे दोन मुले आणि दुसरा हिरोपेक्षा भावखाऊ असे दाखवल्याने छोटी छोटी सी बात वाईब सुद्धा आले. हिरोचा मित्र त्याच्या लव्ह स्टोरी मध्ये गुंततो तसे मलाही चित्रपटात गुंतायला झाले त्यामुळे शेवटी गोड शेवट बघून छान वाटले. ओवरऑल फार आवडला.

The girlfriend - Netflix
ओरिजनल लँग्वेज - तेलगू

पझेसिव आवरणाखाली लपलेला मिसोजनस बॉयफ्रेंड आणि नशिबात आलेला अनसपोर्टीव हट्टी बाप यात फसलेली एक इंट्रोवर्ट मुलगी - रश्मिका

म्हटले तर कबीर सिंग वाईब देत ठराविक वळणाने जातो चित्रपट पण सादरीकरण चांगले असल्याने उत्सुकता कायम राहते.

पण सर्वात महत्वाचा आहे तो शेवट आणि तो कडक जमला आहे. तेवढ्यासाठी तरी आवर्जून पाहावा हा पूर्ण चित्रपट.

रश्मिकाला गेल्या काही काळात बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले हे बरेच जणांना आश्चर्यकारक वाटते. पण ती मस्त अभिनय करते!

पडक्कलम (Padakkalam) - जियो हॉटस्टार
मल्याळम - हिंदी डब

याच्या प्रोमोमध्ये एकजण दुसऱ्याची बॉडी कंट्रोल करताना बघून काहीतरी सुपर नॅचरल आहे याची कल्पना होती. पण नेमका जॉनर कसा आहे हे समजत नव्हते.
आज फेसबुकवर याच्या कौतुकाची एक पोस्ट वाचून लगेच बघितला आणि आवडला.

जुमानजी सारखा एक प्राचीन खेळ दाखवला आहे. जो वापरून एक प्रोफेसर इतरांच्या बॉडीला कंट्रोल करत असतो. आणि तीन कॉलेज स्टूडेंटला त्याचे रहस्य समजल्याने ते त्याच्या मागे लागले असतात.
इंटरवल होता होता अजून एक धमाल सुरू होते. बॉडी स्वॅपिंग!
अ चा आत्मा ब मध्ये, ब चा आत्मा क मध्ये, आणि क चा आत्मा अ मध्ये असा ट्रँगल तयार होतो. चित्रपट अजून वेगवान आणि धमाल होतो.

विषय सुपर नॅचरल असला तरी टिपिकल साउथ इंडियन मसाला आणि अतर्क्य गोष्टी जराही नाहीत. त्यामुळे ते न आवडणारे देखील निश्चिंत बघू शकतात. आवडला तर माझे आभार मानायची बिलकुल गरज नाही. बस दुवाओ मे याद रखना!

Eko - नेटफ्लिक्स
कमाल सुंदर चित्रपट आहे.

कुठल्याही नात्यात प्रोटेक्शन आणि रीस्ट्रिक्शन यामध्ये बारीक अंतर असते या थीमवर चित्रपट आहे.
स्टोरी टेलिंग अशी आहे की चित्रपटातील काही गोष्टी आपल्याला कळतात आणि काहींचा अंदाज लागतो तर काहीचा नाही. पण उत्सुकता कायम राहते. शेवटी एक वर्तुळ पूर्ण होताना बघायला मिळते. ज्यात एखादे रहस्य उलगडल्याचा धक्का कमी आणि समाधान जास्त मिळते.

जंगलाचे इतके सुंदर चित्रण आहे की संपूर्ण चित्रपटच बघायला छान वाटतो.
चित्रपटातील मेन कॅरेक्टर आहेत कुत्रे जो प्राणी मला बिलकुल आवडत नाही. पण सारेच कुत्रे हिंस्त्र आणि प्रेमात पडावे असे आहेत.

कुठलीही घटना थेट न दाखवता सुचक पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे इतर काम करता करता ऐकू नका. चित्रपट आवर्जून बघा.

किष्किंधा कांडम – जियो हॉटस्टार

Eko चित्रपट ज्याचा होता त्याचाच हा देखील म्हणून बघितला. तश्याच धाटणीचा आहे. जंगलाचे सीन इथेही फार सुरेख घेतले आहेत.

एक रिटायर्ड सनकी आर्मी अधिकारी ज्याची स्मरणशक्ती हरवत आहे.
त्याच्याकडची बंदूक हरवली आहे.
आणि त्याच्या घरचा एक लहान मुलगा सुद्धा गेले कित्येक वर्षे हरवला आहे.

जसे Eko मध्ये कुत्रे होते तसे इथे माकडे आहेत.
ते घरातल्या वस्तू चोरून पळतात.
अगदी बंदूक सुद्धा पळवतात.
कधी माकडाच्या हातात बंदूक दिसते तर कधी माकडाचीच गोळी मारून हत्या झालेली आढळते.

अश्यात नवीन सून घरात येते जी करमचंद आहे. ती म्हाताऱ्याचे संशयास्पद वागणे बघून खोदकाम करायला सुरुवात करते. स्वतःही गोंधळते आणि आपल्यालाही गोंधळवून टाकते.

शेवटी जे काही उलगडते ते प्रचंड धक्कादायक वाटले / संताप झाला / मनात करुणा दाटून आली / अस्वस्थ वाटले /खुदकन हसायला आले वगैरे वगैरे अशी कुठलीही हिंट देण्यात मजा नाही. ती बघण्यात आहे.

चित्रपट बराच स्लो पेस आहे. अगदी झोप येण्याची सुद्धा शक्यता आहे. शेवटी काहीतरी फुसके निघाले तर पोपट होईल अशी भिती पहिले तासभर वाटते. त्यामुळे पूर्ण झाल्यावर आणि सगळे संदर्भ जुळल्यावर समाधान मिळेल या विश्वासावर बघावा लागतो. मी तेच केले.

फार स्पून फिडींग होणार नाही. दृश्यांचे अर्थ आपणच उलगडावे लागतील. एखाद्या स्थितीत माणूस कसा वागू शकतो याचा विचार करावा लागेल. ज्यांच्या टेस्टबडस अश्या चित्रपटांचा आस्वाद घ्यायला तयार आहेत त्यांनीच बघावा.

MAD आणि MAD 2 (Mad Square)

Netflix - Hindi Dubbed - Orginal Telugu

नावाप्रमाणेच mad जॉनरचा चित्रपट. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ मधील वेडेपणा अनुभवायचा असेल तर आवर्जून बघा. थोडेफार छीचोरे चित्रपटाचे Vibes येतील. पण हा वेगळा आहे. स्टोरी अशी ठोस नसल्याने काही सांगण्यात मजा नाही. पण हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन सूट व्हावी असा चित्रपट आहे.

यात एक DD नाव असलेला कलाकार फार अवली वाटला. त्याचे अजून चित्रपट शोधायला गुगल केले तर याचाच दुसरा भाग सापडला MAD -2

यात कॉलेजमधून बाहेर पडल्यावरची स्टोरी आहे. पण जॉनर तोच. तसाच वेडेपणा. आधी पाऊणेक तास ठोस स्टोरीअभावी फसला की काय असे वाटतानाच हळूहळू रंग पकडू लागतो आणि पहिला आवडला असल्यास हा सुद्धा आवडून जातो. हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन इथे सुद्धा कायम राहते.

जय जय जय जय हे

जियो हॉटस्टार – ओरिजनल मल्याळम – हिंदी डबड

धमाल आणि हटके चित्रपट आहे.

मराठी स्थळ चित्रपटात एक सीन होता. त्या हिरोईनचा प्रोफेसर लेक्चर देताना मोठमोठी आदर्शवादी तत्वे झाडतो पण प्रत्यक्षात स्वतःची वेळ आल्यावर मात्र जुनाट विचारांचा निघतो. तो सीन या चित्रपटावरून प्रेरित असावा असे वाटते. अश्या प्रेमातील फसवणुकीने सुरुवात होत पुढे जाऊन त्या मुलीचे दुसरीकडे लग्न ठरते. तिचा नवरा शांत, समजूतदार, प्रेमळ आणि जबाबदार व्यक्ती दाखवला आहे. पण ते लग्न ठरेपर्यंतच..

लग्नानंतर एका छोट्याशा कारणावरून तो तिच्यावर चिडतो आणि तिच्या एक कानफटात मारतो. पण मुळात तो प्रेमळ आणि समजूतदार असल्याने त्याच संध्याकाळी तिला सॉरी म्हणून पिक्चरला आणि डिनरला देखील घेऊन जातो.
आणि मग हे वारंवार आणि रोजच घडू लागते. कानाखाली खा, आणि भरपाई म्हणून बाहेर जेवून या. आणि यात माहेरचा काहीच सपोर्ट मिळत नाही. इतका मार तर चालतो म्हणतात.

आणि एके दिवशी कहाणीत ट्विस्ट येतो. तो मारायला जाणार इतक्यात ती त्याचा हात पकडते आणि त्याच्या छातीवर एक लाथ मारते. नवरा दहा बाय बारा फूट दूर जाऊन कोसळतो. ती हे ऑनलाइन बघून शिकली असते आणि घरी दिवस-रात्र याचा सराव केला असतो.

इथून पुढे पिक्चरच बदलतो. नवरा बायकोला दबकून राहतो आणि आपली पुरुषप्रधान सत्ता परत मिळवायला स्वतः देखील कराटे शिकायला लागतो. यात त्यांचे एक तुंबळ युद्ध देखील होते. ते सुद्धा विथ कॉमेन्ट्री. फार धमाल झाले आहे. त्यात कोण जिंकते आणि कोण हरते आणि त्याही पुढे चित्रपट कसा सरकतो, शेवट गोड होतो की रोमँटिक की फिल्मी की स्वाभिमानी वगैरे उत्तरे चित्रपटातच शोधा.

ता.क. – यात नवरा झालेला कलाकार Basil Joseph मस्त ऍक्टर आहे. बिलकुल हिरो मटेरियल वाटत नाही. पण फार सहज अभिनय करतो. आता याचे अजून चित्रपट शोधत आहे. कदाचित असेच हटके असतील. साऊथ डब चित्रपट बघायला सुरुवात केल्यापासून जणू एक नवे दालन उघडले आहे Happy

सर्वम माया (२०२५)
जियो हॉटस्टार
मल्याळम – हिंदी डबड

हिरो नास्तिक दाखवला आहे तर त्याचे बाबा पुजारी. त्यात याचे वडिलांशी काही कारणाने मतभेद आहेत. हा नास्तिक असल्याने पारंपारिक व्यवसाय सोडून आपल्यातील गिटार वाजवायच्या कलेला न्याय द्यायला स्ट्रगल करत आहे. वडिलांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून घरी येतो. पण स्ट्रगल चालू असल्याने खिशात पैसे नाहीत. मग नाईलाजाने पोटापाण्यासाठी टेम्पररी पुजारी बनतो.

पुढे एक घटना घडते आणि याला एका मुलीचे भूत दिसायला लागते. भूत सुंदर आणि प्रेमळ असते. फक्त एक गोची असते की तिला आपण जिवंतपणी कोण होतो हे काहीच आठवत नसते. मग हा तिच्या मुक्तीचे प्रयत्न करतो, तर ती याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवायला मदत करते. पण कुठलेही भुताखेताचे चमत्कार करून नाही तर केवळ एक मैत्रीण म्हणून त्याला समजून घेऊन, त्याला कॉन्फिडन्स देऊन. हाच चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे.

भूत सहृदयी असले की पिक्चर मनोरंजक वाटतोच. पण ते यात कुठेही उथळ होत नाही. किंबहुना इमोशनल अँगल फार छान जुळून आला आहे. दोघांतील नाते खुलताना मस्त दाखवले आहे. आपल्याला सुद्धा ते भूत हळूहळूच आवडायला लागते. तिला स्वतःचे आयुष्य न आठवणे याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. त्यामुळे शेवटाला मन भरून येणे आणि फील गुड वाटणे एकत्रच होते. यात जो एक गिटारचा पीस वाजतो तो फार आवडला. स्पेशली शेवटी वाजतो तेव्हा मनात उतरतो.

वर उल्लेख केलेला जय जय जय जय हे आणि हा सर्वम माया दोन्ही जरूर बघा. म्हटले तर दोघांचा जॉनर वेगळा आहे पण दोघांतील सकारात्मकता भावली Happy

आवेशम (Aavesham) – २०२४
मल्याळम - हिंदी डब
जियो हॉट स्टार
जॉनर – ऍक्शन कॉमेडी

एका शब्दात वर्णन करायचे तर फाडू चित्रपट आहे.

एवढे दिवस समोर दिसत असूनही पाहिला नव्हता. पण काल योग आला.

फहाद फासिल काय जबरदस्त ऍक्टर आहे. काय खतरनाक swag दाखवला आहे. त्याच्या एकट्यासाठी सुद्धा बघू शकता. जबरदस्त लहरीपणा दाखवला आहे आणि थेटर मध्ये एन्जॉय करावेत असे त्याचे फाईट सीन आहेत.

स्टोरी लाईन – तीन जुनियर कॉलेजची फ्रेशर मुले. रॅगिंगचा वाईट अनुभव येतो. विरोध करायला गेले तर मार पडतो. म्हणून बदला घ्यायला एखाद्या लोकल गुंड्याशी मैत्री करता येईल का याचा शोध घेतात. त्यात त्यांना हा रंगा भाई भेटतो. त्याच्या जीवावर हे सुद्धा कॉलेजचे भाई बनतात. पण त्या नादात स्वतःच्या करिअरची वाट लावतात आणि त्याच्या गँगमध्ये जाऊन फसतात. नंतर यांना जाणवते की हा सायको आहे आणि उद्या आपल्याला सुद्धा मारू शकतो तसे हे घाबरून त्याच्यापासून सुटकेचे प्रयत्न करू लागतात. पण ते देखील सोपे नाही हे जाणवते. स्टोरी एवढीच आहे. पण चित्रपट धमाल बनवला आहे. हिंसाचार क्रूर किळसवाणा नाही तर स्टायलिश आहे आणि ओव्हरऑल चित्रपटाला एक कॉमिक टच आहे. त्या तीन मुलांचा अभिनय देखील तोडीस तोड आहे. रंगाभाईचा एवढा जबरदस्त रोल असून सुद्धा ते आपले नाणे खणखणीत वाजवतात. त्यामुळेच पिक्चर जमून आला आहे कारण तो आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवूनच बघतो.

वैधानिक इशारा – एवढे राडे दंगे लफडे होऊन सुद्धा पोलीस कायदा प्रशासन कुठेच दिसत नाही म्हणून नाके मुरडणार असाल तर मात्र दूरच राहा Happy

किष्किंधा कांडम बरा वाटला , कथेत फार दम नाही पण चित्रीकरण आणि सादरीकरण उत्तम आहे . मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर घराभोवतीचं हिरवंगार जंगल .

जय जय जय जय हे पण पहिला मी पण शेवट राहिला आहे .

जय जय जय जय हे शेवट छान आणि positive आहे. कोर्टातल्या सीनमध्ये मार्मिक संवाद आहेत आणि शेवटचा तिने घेतलेला निर्णय सुद्धा मस्त. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय पर्याय नाही हे अचूक पोहोचते.

कडावर छान आहे. जियो हॉटस्टार वर उपलब्ध आहे.
धन्यवाद विजय देशमुख Happy

सस्पेन्स थ्रिलर आवडणाऱ्यांनी डोके भंजाळून टाकणाऱ्या अपेक्षा घेऊन बघायला जाऊ नये. भावनिक फॅक्टर आणि मांडणी जास्त इफेक्टीव वाटली. त्यामुळे एकेक सस्पेन्स क्लिअर होत गेले तशी रंगत वाढली. शेवटी अर्धा तास शिल्लक असताना सारे क्लिअर होऊन सुद्धा ते काय कसे झाले ही स्टोरी बघायला चांगली वाटली. मेन लीड हिरोईन शवविच्छेदन करणारी डॉक्टर असल्याने त्या अनुषंगाने बरेच इंटरेस्टिंग गोष्टी आल्या. तिला बघून सारखी दीपिका पदुकोण आठवत होती.

नाव - Mana Shankara Vara Prasad Garu
झी 5 वर आहे. फुल ड्रामा ऍक्शन रोमँटिक मसाला पिक्चर आहे.

चिरंजीवी आणि नयनतारा डिव्होर्स झालेले कपल. त्यांना दोन मुले. नयनतारा फार मोठी बिझनेसवूमन, चिरंजीवी सुपरकॉप आणि नयनताराचा बाप सचिन खेडेकर हा दोघांच्या नात्यात काडी करणारी आण्टी. शेवट गोड.

चिरंजीवीला रजनीकांत स्टाईल बघून मजा आली. नयनतारा तर नयनसुख आहे. एका हिरोईनीशी लग्न माफ केले तर मी ते नयनताराशी करेन. व्यंकटेशचा cameo सुद्धा मस्त. दोघांच्या अदाकारीत साउथ इंडियन swag आहे. चित्रपट रिपीट व्हॅल्यू असलेला ब्लॉकबस्टर आहे. कधीतरी पुन्हा बघायलाही आवडेल. चित्रपटातील लोकेशन मस्त आहेत. कॅनव्हास मोठा आहे. मराठी चित्रपट कधीतरी या लेव्हलला गेलेला बघायला आवडेल.

With Love - नेटफ्लिस
ऑर्जिनल तामिळ - हिंदी डब

मस्त आहे!

अरेंज मॅरेजसाठी हिरो हिरोईन भेटतात. योगायोगाने एकाच शाळेचे निघतात. एकमेकांना शाळेची अधुरी लव्हस्टोरी सांगतात. मग त्यांना एक किडा सुचतो. तेव्हा जे प्रेम व्यक्त करता आले नव्हते ते आता त्यांना भेटून करायचे ठरवतात. बाकी बघा स्वतःच.
हलकाफुलका रोमँटिक माझ्या आवडीचा जॉनर.. मस्त जमून आला आहे.

Pages