प्राक्तन

Submitted by nimita on 16 August, 2025 - 23:59

प्राक्तन

शरद पौर्णिमेची ती मंतरलेली रात्र… आकाशात चमचमणारा तबकाएवढा चंद्रमा आता क्षितिजाकडे झुकायला लागला होता… त्याच्या शीतल प्रकाशातून बरसणाऱ्या अमृतधारा आकंठ प्राशन केल्यामुळे संपूर्ण पृथ्वी जणू काही तृप्त झाली होती. यमुनेच्या काठावर नृत्यात दंग होऊन रास खेळणारे गोप गोपिका आता थकून भागून आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते. हळूहळू यमुनेचा तो तीर निर्मनुष्य होत होता. रात्रभर गोकुळ वासियांच्या बरोबर आनंदोत्सव साजरा करून आता यमुना देखील श्रमली असावी; इतका वेळ आकाशीच्या चंद्राच्या ओढीने चंचल भासणाऱ्या तिच्या पात्रातील अवखळ लाटा आता शांतावल्या होत्या. मधूनच एखादी चुकार लाट नदीच्या पात्रातून उसळून डोकं वर काढत होती; जणू काही तीरावर कोणी दिसतंय का ते पहात असल्यासारखी! पण आता यमुनेच्या तीरी उभ्या असलेल्या त्या महाकाय कदंब वृक्षाखेरीज तिथे कोणाचंच अस्तित्व जाणवत नव्हतं.

पण म्हणून तिथे कोणीच नव्हतं असं मात्र नाही… त्याच कदंबाच्या बुंध्याला टेकून ‘ ती ‘ बसली होती… तृप्त, समाधानी आणि शांत ! इतरांसारखी तिला घराची ओढ जाणवत नव्हती. इतर गोकुळ वासियांसारखी रास खेळताना तिची नजर आप्तजनाना शोधत नव्हती. कारण… कारण तिला जे हवं होतं ते तर आधीच तिच्या आराध्याने तिच्या स्वाधीन केलं होतं. तिचा निरोप घेऊन गोकुळ सोडताना स्वतःची ती प्राणप्रिय बासरी तिच्या हाती सोपवून तो तिला म्हणाला होता,”यापुढे आपली प्रत्यक्ष भेट होईल की नाही – हे मलाही ठाऊक नाही. पण आजपासून… या क्षणापासून माझी ही बासरी मी तुझ्या स्वाधीन करतो आहे. कारण तुझ्याविना ही बासरी म्हणजे माझ्यासाठी केवळ एक छिद्रांकित वेळू आहे. तुझ्या अनुपस्थितीत मी कितीही प्रयत्न केला तरी या वेणु मधून ते स्वर्गीय स्वर कधीच निघणार नाहीत. जर भविष्यात पुन्हा आपली भेट झाली तर केवळ तुझ्यासाठी पुन्हा एकदा मी ही बासरी ओठांना लावेन; पण तोपर्यंत माझी ही निःशब्द, अबोल भेट तुझ्या स्वाधीन करतो आहे.”

त्याचे ते शब्द कानी पडताच तिच्या डोळ्यांत एकाच वेळी सुखाच्या आणि दुःखाच्या अश्रूंनी गर्दी केली होती. तिच्या मनाचा मयूर एकाच वेळी तृप्तीच्या आणि वियोगाच्या हिंदोळ्यावर झुलला होता. एक शब्दही न बोलता, चेहेऱ्यावर उसने हसू आणत तिने त्याला साश्रू नेत्रांनी निरोप दिला होता. तिच्यापासून दूर जाणारी त्याची ती नीलवर्णी छबी आपल्या डोळ्यांत साठवून घेत तिने त्याची बासरी आपल्या उराशी घट्ट कवटाळून धरली होती.

आणि त्या क्षणापासून आजपर्यंत तिने त्या बासरीला कधीच अंतर दिलं नव्हतं. तिच्या शरीराचं अविभाज्य अंग असल्यासारखी जीवापाड जपली होती ती तिने. तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाची, घडलेल्या प्रत्येक घटनेची साक्षीदार होती ती बासरी. साहजिकच आजही सर्वांबरोबर रास खेळताना ती मनातल्या मनात त्याच्या त्या बासरी बरोबरही रास खेळली होती… जणू त्याच्याशीच एकरूप झाल्यासारखी.

एकीकडे हातातल्या त्या बासरीवरून उगीचच आपली नाजूक बोटं फिरवत ती उठली आणि समोरच्या यमुनेच्या काठावर असलेल्या एका काळया कातळावर जाऊन बसली… यमुनेचं ते काळसर निळं पाणी तिला नेहेमीच त्याची आठवण करून देई. आत्ताही त्या उबदार पाण्यात आपली पावलं सोडून बसलेली असताना तिचं मन वारंवार भूतकाळात रममाण होत होतं… ही यमुना आणि तिच्या काठचा हा कदंब… यांच्या साक्षीतच तर कित्येकदा भेटली होती ती दोघे! इथेच बसून तिने त्याच्या मुरलीतून निघालेले ते दिव्य स्वर मंत्रमुग्ध होऊन ऐकले होते. त्या स्वरांच्या नुसत्या आठवणीनेच आत्ताही तिची पावलं हळूहळू पदन्यास करू लागली… तिच्या पावलांच्या त्या नाजुक हालचालींमुळे यमुनेच्या त्या शांत प्रवाहातही तशाच हलक्या, नाजूक लाटा उठू लागल्या. पण तिचं मात्र त्याकडे लक्षच नव्हतं. ती नेहेमीप्रमाणे त्याच्या आठवणींत स्वतःला हरवून बसली होती…

हजारों योजने दूर असलेल्या सागर किनारी तो देखील असाच तिच्या आठवणींत रमून गेला होता. कितीतरी वर्षं लोटली होती त्या दोघांच्या त्या शेवटच्या भेटीला. मधल्या काळात कायकाय आणि किती काही घडून गेलं होतं…घडून गेलं होतं? का त्यानेच घडवून आणलं होतं? मनात हा विचार आला आणि तो स्वतःशीच हसला; जणू काही स्वतःच्या कृत्याचं स्वतःलाच स्पष्टीकरण देत असल्यासारखं पुटपुटला -” चांगलं, वाईट जे काही घडलं… ज्यांच्या आयुष्यात घडलं – ते त्या प्रत्येकाचं प्राक्तन होतं …त्यांनी स्वतःच स्वतःचं लिहिलेलं विधिलिखित होतं ते….मी तर फक्त निमित्तमात्र… ” विचारांच्या नादात तो तसाच त्या सागरकिनारी फेऱ्या मारत होता. आकाशात चमकणाऱ्या त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे लक्ष जाताच मात्र तो अचानक थबकला. तो दुग्धवर्णी , प्रकाशमान गोलाकार बघताच त्याला ‘ तिची ‘ आठवण झाली. पुन्हा एकदा स्वतःशीच कसनुसं हसत तो उसासला आणि म्हणाला,”माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना देखील माझ्या प्राक्तनाचाच परिणाम नाहीत का ? कितीही मनात आणलं तरी मी स्वतः त्यात कोणताही बदल घडवू शकत नाही. जर तसं काही करणं शक्य असतं तर आज मी असा, केवळ तिच्या आठवणी उराशी बाळगत राहिलो नसतो… मला प्राणप्रिय असणारी माझी मुरली अशी मूक झाली नसती. गेली कित्येक वर्षं इथे द्वारकेतल्या यादवजनांबरोबर रास खेळताना मला हे असं – काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी हरवल्या सारखं वाटलं नसतं. पण… पण नक्की काय हरवलंय मी? माझी प्राणप्रिय मुरली ?.. का जिच्यासाठी ती मुरली वाजवायचो ती माझी प्राणप्रिय सखी ?”

आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधत तो तसाच किनाऱ्यावरील पुळणीवर स्तब्ध उभा होता… त्याच्या पावलांशी शिवाशिवीचा खेळ खेळणाऱ्या सागराच्या त्या लाटांकडे एकटक बघत होता. एकामागोमाग एक किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या त्या लाटांमध्ये जणू काही स्पर्धाच चालू असावी – त्याच्या चक्रवर्ती पावलांना स्पर्श करून , पावन होऊन पुन्हा त्या सागरात विलीन होण्याची स्पर्धा! रात्रीच्या धवल चंद्रप्रकाशात दोन्ही हात कटीवर ठेवून उभा असलेला तो समोर पसरलेल्या त्या समुद्रासारखाच भासत होता… अथांग आणि काहीसा गूढ! पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. तो होताच मुळी जलतत्वाचा अधिपती… आणि तोही चांद्रवंशीय!

रात्रीच्या त्या एकांतात त्या सागर लहरींमधे पाय रोवून तो किती वेळ असा समाधिस्थ अवस्थेत उभा होता हे त्यालाही समजलं नाही. पण एका क्षणी त्याची ती तंद्री भंग पावली आणि त्याने चमकून त्याच्या पावलांशी सलगी करणाऱ्या त्या लाटांकडे पाहिलं. काही वेळापूर्वी त्याच्या पायांवर समर्पित होणाऱ्या त्या लाटा आता काहीशा अवखळ भासत होत्या…त्यांचा तो मृदू स्पर्श त्याला ओळखीचा वाटू लागला. इतका वेळ धीरगंभीर भासणाऱ्या समुद्राच्या गाजेत आता त्याला मधूनच कुठला तरी नाजूक ध्वनी ऐकू येत होता… तो अगदी लक्षपूर्वक ऐकू लागला… काही क्षणांतच त्याला त्या आवाजाची ओळख पटली आणि त्याच्या चेहेऱ्यावर त्याचं ते नेहमीचं प्रेमळ हसू फुललं. त्याला अचानक जाणवलं – ‘गोकुळात वाहणारी यमुना अखेर द्वारकेच्या सागराला भेटली म्हणायची… नुसती भेटलीच नाही तर अगणित लाटांवर स्वार होत, भूमातेला कितीतरी वळसे घालत शेवटी त्याच्या पायांपाशी येऊन विसावली…त्याच्यात पूर्णपणे एकरूप झाली. तो अनवधानाने बोलून गेला… “हा तर तिच्या पैंजणांचा आवाज… तिच्या सारखाच नाजूक आणि चित्त वेधून टाकणारा! आणि माझ्या पावलांना जाणवणारा हा मृदू मुलायम स्पर्श ? … हा देखील तिचाच! हो… नक्कीच… हा आवाज आणि हा स्पर्श .…. अजूनही स्मरणात आहे माझ्या. म्हणजे ?… म्हणजे आत्ता या क्षणी तीदेखील तिथे अशीच त्या यमुनेच्या जलात पाय सोडून बसली असावी… तिलाही येत असेल का माझी आठवण? माझ्या इतकीच तीव्रतेने? ठेवली असेल का तिने माझी मुरली अजूनही सांभाळून? नक्कीच जपत असेल माझी आठवण – अगदी जीवापाड! जशी मी उराशी बाळगून असतो तिने दिलेली तिची भेट! त्या विचारासरशी त्याचा हात त्याच्या वक्षावर स्थिरावला… आणि बघता बघता तो बेचैन झाला… सदैव त्याच्या छातीवर रुळणारी – त्यांच्या त्या अखेरच्या भेटीत तिने स्वतःच्या हातांनी त्याच्या गळ्यात घातलेली टपोऱ्या टवटवीत फुलांची ती वैजयंती माला .. त्याच्या प्रिय सखीची ती एकमेव आठवण याक्षणी त्याच्या गळ्यात नव्हती. त्याने चमकून आजुबाजुला पाहिलं… त्याची भांबावलेली नजर किनाऱ्यावरील वाळूचा कण न कण शोधू लागली. पण त्याला ती कुठेच दिसेना. “हे काय झालं? नेमकी आजच माझ्या गळ्यातली वैजयंती माला कुठे गेली? मगाशी रास खेळताना कुठे गहाळ झाली की काय? आणि मला त्याची जाणीवही नाही ? छे… छे इतका कसा मी वेंधळा? आता काय करू? कुठे शोधू?”

तो सैरभैर होऊन नुसताच उभा होता – काहीसा हताश आणि उदास! तेवढ्यात त्याला काही अंतरावर कोणीतरी असल्याचा भास झाला. त्याने नीट लक्ष देऊन पाहिलं… धीमी पावलं टाकत ‘ ती ‘ येत होती… त्याच्याच दिशेने! तिची पावलं संथ पडत असली तरी त्यांत एक वेगळाच निश्चय जाणवत होता. तिची ती भेदक आणि तरीही प्रेमळ नजर त्याच्या काळजाचा जणू काही ठाव घेत होती. तिच्या चेहेऱ्यावरचं ते नेहमीचं आश्वासक हास्य बघून त्याचं वाभरं मन आपोआपच स्थिरावलं. त्याच्या भांबावलेल्या नजरेत आता तिच्याविषयी अपार प्रेम दाटून आलं… तो स्वतःलाच उद्देशून म्हणाला,”इतक्या वर्षांच्या सहवासानंतर देखील तिची खरी ओळख पटलेली दिसत नाही तुला. तुझ्याही आधी तुझ्या मनाची अवस्था तिच्या अंतर्मनाने जाणलेली असते. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तू असा भ्रमित होतोस तेव्हा तू न बोलावताही ती तुझ्या समीप येऊन उभी राहते… एक शब्दही न उच्चारता तुला धीर देत, तुझ्या मनातील संभ्रमाना ती योग्य असा कौल देते. आत्ताही म्हणूनच तर आलीये ती इथे. तू तर तिला काहीही न सांगता, तिचा निरोपही न घेता एकटाच इथे निघून आलास; पण ती… ती मात्र तुझी आजची मनस्थिती ओळखून असणार आणि म्हणूनच तुला शोधत ती इथे येऊन पोचली आहे.”

त्याच्या डोक्यातले विचार जसजसे सुसूत्र होत होते तसतशी त्याच्या मनातली तिच्याबद्दलची ओढ अजुनच वाढत होती. त्याच्याही नकळत तो तिच्या दिशेने चालू लागला. काही क्षणांतच दोघे एकमेकांसमोर येऊन उभे राहिले. काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या त्याने तिला निरखून पाहिलं. आता मात्र तिच्या चेहेऱ्यावर त्याला ते ओळखीचं खट्याळ हसू दिसलं. आणि काही कळायच्या आत तिने आपले दोन्ही हात पुढे केले. त्याने तिच्या हातांकडे पाहिलं मात्र… तो जणू एखाद्या मूर्तीसारखा स्तब्ध झाला. तिच्या हातांत इतका वेळ तो शोधत असलेली त्याची वैजयंती माला होती… काही वेळापूर्वी तिच्याबरोबर रास खेळताना बहुदा त्याच्या गळ्यातून ती कुठेतरी पडली असावी.

एक शब्दही न उच्चारता तिने पुढे होत ती टवटवीत माला त्याच्या गळ्यात घातली. त्या क्षणीचं तिचं ते लोभस, निरागस रूपडं बघताच त्याचं मन तडक विदर्भ देशी जाऊन पोचलं. त्याने जेव्हा तिला स्वतःच्या रथात उचलून घेतलं होतं तेव्हा ती अगदी अशीच दिसत होती – अधोमुख , सलज्ज , निरागस पण तितकीच निग्रही. त्याच्या कणखर बाहुंत आपला नाजूक हात देताना तिने अतिशय आत्मीयतेने आणि तितक्याच विश्वासाने त्याच्याकडे पाहिलं होतं. काय नव्हतं त्यांच्या त्या काही क्षणांच्या नजरभेटीत… त्याच्या बद्दल तिला वाटणारा आदर, विश्वास, प्रेम आणि जन्मोजन्मीची समर्पणाची भावना – सगळं सगळं एकवटून आलं होतं तिच्या त्या भाववेड्या डोळ्यांत! आणि त्याच्या नजरेत… त्याच्या त्या कमलनयनांत तिला दिसली होती अपार, उत्कट प्रीती… युगानुयुगांची साथ देण्याचं वचन आणि तिच्या संरक्षणाची हमी!

आजही त्या सागर किनारी ते दोघे तसेच एकमेकांच्या डोळ्यांत बघत उभे होते. इतकी वर्षं उलटून गेली होती तरीही त्यांच्या मनातल्या त्या भावना अजूनही तशाच होत्या. किनाऱ्याकडे झेपावलेल्या लाटांचा पायांना स्पर्श होताच दोघेही भानावर आले. तिचे हात आपल्या हातात घेत तो म्हणाला,”रुक्मिणी, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझ्यासाठी हे जगणं किती कठीण झालं असतं गं. माझ्यापेक्षा तूच मला जास्त ओळखून आहेस; मला अंतर्बाह्य जाणून आहेस. माझ्या हृदयातील कोपरा न कोपरा तुझ्या परिचयाचा आहे. आणि तरीही तुझं माझ्यावर असलेलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. उलट दिसामाजी ते वाढतंच आहे. खरं सांगू… माझ्यापेक्षा तुझंच हृदय विशाल आहे. आणि म्हणूनच तुला सगळं काही ज्ञात असूनही तुझ्या मनात द्वेषाचा, रागाचा, मत्सराचा लवलेश ही नाही. एक सांगशील.. कसं जमतं गं तुला हे असं निस्वार्थी, उत्कट प्रेम करणं? “

आपल्या प्रियतमाच्या त्या निरागस, काहीशा बालसुलभ प्रश्नावर तितकंच निरागस हास्य करत रुक्मिणी म्हणाली ,”इथेच तर चुकता तुम्ही नेहेमी. मला तुमचं आणि माझं ह्रदय कधी भिन्न वाटलंच नाही; मग त्यातले मर्मबंध तरी वेगळे कसे भासणार ? जे तुमचं ते सगळं काही माझं… आणि माझं सर्वस्व तर मी कधीच तुमच्या पायांशी अर्पण केलंय – अगदी तुम्हाला न बघताच!”

तिच्या या उत्तरावर तो पुढे काही बोलणार तोच त्याच्या वक्षावर आपलं मस्तक टेकवत ती पुढे म्हणाली,”मला माहित आहे तुमच्या मनातला सल… पण खरं सांगू? मी राधिकेला कधी परकं मानलंच नाही. तुमच्या त्या कर्णमधुर बासरीचे स्वर मला कधीच प्रत्यक्ष ऐकायला मिळाले नाही, आणि कदाचित या जन्मात ते भाग्य माझ्या नशिबी नसेलही. तरीही मला तिची कधीच असूया वाटली नाही. आणि माझी खात्री आहे – तुमचा चिरंतर सहवास मला लाभला म्हणून तिनेही कधीच माझा दुस्वास केला नसणार. आम्हां दोघींनाही आपापल्या प्राक्तना नुसार जे आणि जेवढं मिळालंय त्यात आम्ही सुखी, समाधानी आहोत. तुमच्या वामांगी जेवढी मी शोभून दिसते तेवढीच तुमच्या गळ्यात ही वैजयंती मालाही खुलून दिसते. तुमचं ‘ दिसणं ‘ आणि तुमचं ‘ असणं ‘ दोन्हीही आम्हां दोघीं विना अपूर्ण आहे. आणि तुम्ही स्वतः देखील हे पुरतं जाणून आहात. हो ना? तेव्हा आता हे किंतु – परंतु चे पाश झटकून टाका आणि चला माझ्या बरोबर… प्रभास क्षेत्री समस्त यादवजन तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. कोजागिरीचा रास असा अर्ध्यात सोडू नये म्हणतात!”

आपल्या अर्धांगिनीच्या त्या चतुर वक्तव्यावर खळाळून हसत तो तिच्या बरोबर चालू लागला… त्या दोघांच्या त्या पाठमोऱ्या प्रतिमांना साक्षी ठेवत किनाऱ्यावर आलेली एक अवखळ लाट हलकेच पुन्हा त्या अथांग सागरात विलीन झाली… शांत, समाधानी आणि तृप्त !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलेय. आवडले.

आम्हां दोघींनाही आपापल्या प्राक्तना नुसार जे आणि जेवढं मिळालंय त्यात आम्ही सुखी, समाधानी आहोत.>>>>>> खरे आहे.

छान लिहीले आहे. मलाही राधा आणि लक्ष्मी(रखुमाई, रुक्मिणी) यांमध्ये दोघींना पूजताच येत नाही. राधा तितकीशी आवडत नाही. लक्ष्मी(रुक्मिणी) जास्त प्रिय असल्याने, राधा-कॄष्णाला मी सहसा नमस्कारही करत नाही.
.
तुम्ही ते द्वंद्व (माझ्या मनातील) छान पकडले आहेत.