पुस्तक परिचय : गोठण्यातल्या गोष्टी (हृषीकेश गुप्ते)

Submitted by ललिता-प्रीति on 8 August, 2025 - 01:47

या पुस्तकाचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून शीर्षकाचा अर्थ मी वेगळाच लावत होते. गोठणे हे क्रियापद मानून abstract शीर्षक असावं अशी समजूत करून घेतली होती. (मनं गोठतात त्याच्या गोष्टी, वगैरे.)

पण, हे तसं काहीही abstract नाही. गोठणे हे गाव आहे. (नागोठणेचा संदर्भ लेखकानेच सुरुवातीला दिला आहे.) लहानपणीच्या गावातल्या आठवणी असं पुस्तकाचं स्वरूप आहे. मुख्य भर व्यक्तिचित्रणावर आहे. मित्रमंडळींच्या गप्पाटप्पांमध्ये किस्से सांगण्यासारखी लेखनाची धाटणी आहे.
ते सगळं वाचायला मजा येते. काही व्यक्ती एकाहून अधिक लेखांमध्ये प्रसंगानुरूप, कधी केवळ एखाद्या उल्लेखापुरत्या येतात. त्यातून गावाचं एकजिनसी चित्र समोर उभं राहतं. खेडेगावातल्या/निमशहरी गावातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभावविशेष, अशा ठिकाणीच उद्भवू शकतील असे प्रसंग, पात्रांची बोलीभाषा हे सगळं टिपत टिपत चवीचवीने वाचण्याचं पुस्तक आहे.

निवेदनाच्या ओघात आलेले ट्रक मालवाहतुकीच्या व्यवसायातले बारकावे, मूर्तीकारांच्या कामांशी संबंधित वर्णनं किंवा अगदी गावाकडचे पतंग उडवण्याच्या युनिव्हर्सचे तपशील वाचायला मला फार आवडले. युनिव्हर्स अशासाठी म्हटलं, की त्यात निव्वळ पतंग उडवण्याच्या किंवा काटाकाटीच्या प्रसंगांचं वर्णन नाहीये, तर त्या जोडीने येणारे संवाद, इतर terminologies, पतंगबाजीशी संबंधित खास शाळकरी विचारसरणी, पतंग उडवण्यात वाकबगार असणारा गावातला एकजण, असं सगळंच. Trucks संबंधित बारीकसारीक terminologies पण तशाच.

तीच गोष्ट गोट्यांच्या खेळाची. मी लहानपणी गोट्यांचा खेळ खूप बघितला आहे. क्वचित खेळलेही आहे. गोट्या खेळणे हे आपल्याकडे जरा हेटाळणीच्या सुरात बोललं जातं. पण पुस्तकातलं गोट्यांच्या मॅचेसचं वर्णन, चढाओढ, त्या जोडीने येणारं खेळाडूंचं वर्णन, त्यातून दाखवलेली त्यांची व्यक्तिमत्त्वं, सगळं मला फार आवडलं.
हा सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो. आणखी काही वर्षांत हे लुप्त होणार आहे. तेव्हा अशी पुस्तकं म्हणजे या गोष्टींचा मोठा दस्तऐवज ठरणार आहे.

पुस्तकातले काही लेख पसरट झालेत. पण त्याकडेही वाटा फुटणारी रसाळ गप्पाष्टकं म्हणून बघितलं तर मग ते तितके पसरट वाटेनासे होतात. उलट काही ठिकाणी या निरनिराळ्या वाटा कोणत्या टप्प्यावर पुन्हा एकत्र येणार हे guess करत करत वाचलं गेलं.

कोकणी वातावरण, मुंबईसारखं शहर जवळ असणे, शिक्षण-अर्धशिक्षणाचे स्तर, इतर सामाजिक-आर्थिक स्तर, त्या स्तरांना गावाने जगण्याचा भाग म्हणून स्वीकारणे, कोकणी मुस्लिम लोकांच्या खासियती, जातीपातीसहितचं गावातलं वातावरण, मैत्री, हेवेदावे, शेती, निसर्ग, ऋतू, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून घडणारी गावातली व्यक्तिमत्वं, त्यांचे निरनिराळे वयोगट, प्रेमप्रकरणं, गावाचा म्हणून एकत्रित भोचकपणा, परंपरांवरचं प्रेम, एकमेकांबद्दलची अधिकउणी आस्था.... आणि मुळात या सगळ्याबद्दलची लेखकाची आस्था, त्याबद्दल इतरांना सांगण्याची असोशी - हे सगळं मिळून तयार झालेल्या या गोष्टी आवर्जून वाचाव्यात अशा आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिचय आवडला. ललित लेखांचा संग्रह आहे का? मला परिचय वाचताना विंचुर्णीचे धडे आठवलं.

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे - माधव कोंडविलकर यांचे आत्मचरित्र. यातला वेचा आमच्या वेळी ११/१२ च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता, म्हणून पुस्तकाचे नाव लक्षात राहिले. लेखकाचे नाव शोधावे लागले.

हा परिचय वाचून पुस्तक विकत घ्यायचा विचार केला पण...
आता लायब्ररीत मिळतंय का बघतो.
तुम्ही चित्रे ह्यांच्या पुस्तकाचा मागे परिचय लिहिला होता. तो वाचून पण असेच झाले.

देवाचे गोठणे मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात आहे. नागोठणे रायगड जिल्ह्यात. हृषीकेश गुप्त्यांच्या अनेक गोष्टींची पार्श्वभूमी या परिसरात आहे. हाकामारीच्या कथेत गावाच्या नावाचा उल्लेख नव्हता बहुतेक, पण हायवेवर असलेली माध्यमिक शाळा आणि पुराचा उल्लेख (८९ सालचा जांभूळपाड्याच्या परिसरात आलेला पूर) वाचून लक्षात आलं होतं की नागोठणे-रोहा परिसरातलं गाव असणार.

लेखकांचं नाव ऐकल्यावर हे पुस्तक वाचलं होतं.
>>सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो.> हो . हल्लीचे श्री.ना.
>>काही लेखन पसरट आहे> हो.
प्रवासात वाचण्यासाठी बरंय.
नागोठणे गाव मुख्य गोवा रस्त्यापासून थोडं आतमध्ये आहे - किंवा गोवा रस्ता थोडा गावाबाहेरून काढला होता असं म्हणू. दापोली ठाणे बसने येताना बस नागोठाणेत थांबते थोडावेळ. स्टँड मधल्या हाटेलाची कोथिंबिरवडी आणि ताक हे खास पदार्थ आहेत. सांगायचं म्हणजे असे कुठेच मिळत नाहीत. शिवाय वेटरांचं आणि मालकाचं मिठ्ठास आगत्याचं बोलणं. (आता नवीन ठेकेदार आलाही असेल.)
माझा संबंध गावापेक्षा नागोठाणे रेल्वे स्टेशनशी अधिक आला. तिकडून पाली गणपती, मागचा रखवालदार सरसगड, सहा किमीवरचा सुधागड इकडे जाण्यासाठी.

देवाचे गोठणे राजापूर जवळ आहे - रत्नागिरी जिल्ह्यात.

मलाही हाकामारी पुस्तक वाचताना ते पेण/रायगड भागात घडते असे वाटत राहिले. हाकामारी आवडले होते मला. आता गोठण्यातल्या गोष्टी वाचतो.

हृषिकेश गुप्त्यांची मी अमानवी, रहस्य /भिती-कथा अशा प्रकारची पुस्तकं जास्त वाचली आहेत. त्यांची शैली आवडते.
गोठण्याच्या गोष्टी वाचेन.

छान परिचय.
या पुस्तकाबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकले आहे.
गोठण्यातल्या गोष्टी वाचेन आता

छान पुस्तक परिचय.

मलाही पटकन मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं आठवलं, पुस्तक वाचलं नाहीये पण म टा त परिचय आणि एक लेख वाचलेला पूर्वी. कोंडविलकर म टा त लिहायचे.

देवाचं गोठणं, राजापूरजवळ, जिल्हा रत्नागिरी. माझ्या नवऱ्याचे आजोळ.

ललित लेखांचा संग्रह आहे का? >>> हो.

हृषिकेश गुप्त्यांची मी अमानवी, रहस्य /भिती-कथा अशा प्रकारची पुस्तकं जास्त वाचली आहेत.
>>>
आणि मी अमानवी, भीती या थीम्समध्ये तितकासा रस नसल्याने त्यांचं इतर काहीही वाचलेलं नाही.

'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' ही दीर्घकथा अनुभव अंकात आली होती, ती वाचली आहे. आणि आता हे पुस्तक.
'हजार वेळा' कथेत जे गावाकडचं उघड्या जागेत मोठा पडदा लावून सिनेमा दाखवण्याचं-पाहण्याचं युनिव्हर्स आहे ते सुद्धा 'गोठण्यातल्या गोष्टी' पुस्तकात येतं.

'हजार वेळा'वर सिनेमा आलाय असं वाचलं होतं, कुणी पाहिलाय का? ती कथा भारी होती, वेगळीच होती.

आवडली ओळख.

हा सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो. आणखी काही वर्षांत हे लुप्त होणार आहे. तेव्हा अशी पुस्तकं म्हणजे या गोष्टींचा मोठा दस्तऐवज ठरणार आहे. >>> सहमत आहे. जनरली कसलेही डिटेलिंग कथेत गुंफलेले असले की वाचायला छान वाटते. असे आपल्याकडे दुर्मिळ आहे.

परिचय आवडला. Happy
मलाही पहिल्या परिच्छेदातल्या सारखेच वाटायचे. पण आता हे आणि प्रतिसाद वाचून लक्षात आले.

हा सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो. आणखी काही वर्षांत हे लुप्त होणार आहे. तेव्हा अशी पुस्तकं म्हणजे या गोष्टींचा मोठा दस्तऐवज ठरणार आहे. >>> सहमत आहे.

पुस्तक वाचावेसे वाटले, छान परिचय..!

हा सारा मला सोशल हिस्ट्रीचा भाग वाटतो. आणखी काही वर्षांत हे लुप्त होणार आहे. तेव्हा अशी पुस्तकं म्हणजे या गोष्टींचा मोठा दस्तऐवज ठरणार आहे.>>>> सहमत..! गावांची होणारी स्थित्यंतरं बहुतांशी अस्वस्थ करणारी वाटतात ..