प्रथम एक गोष्ट नमूद करू ईच्छितो की ईथे बरेच जणांना हा लेख आणि यातील मुद्दे साधारण वाटण्याची शक्यता आहे. कारण मायबोली हा मंच मराठी लिखाणाची आणि वाचनाची आवड जोपासणार्यांचा आहे त्यामुळे इथे वावरणार्या लोकांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व तितकेच जास्त आहे.
पण मायबोली बाहेरील जगात बहुतांश लोकं माझ्या इतकेच जेमतेम मराठी जाणणारे, बोलणारे आणि वापरणारे असावेत. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य मराठी माणसाला, जो फार काही मोठा मराठीचा अभ्यासक नाही, त्याला मराठीप्रेम जोपासणे म्हणजे काय वाटते, आणि तो मराठी भाषेसाठी काय करतो, काय करू शकतो हे इथे लिहिणे गरजेचे वाटले म्हणून लिहीत आहे. किंबहुना मागेच असा धागा काढावा हे काही जणांकडून सुचवण्यात आले होते, पण कदाचित माझे मराठीप्रेम कमी पडले असावे जे ईतका विलंब लागला. काही हरकत नाही, "देर आये पर दुरुस्त आये" असे एका अमराठी भाषेत म्हणून सुरू करूया 
मी स्वतः काय करतो ते सांगतो.
तुम्ही तेच मुद्दे घेऊन किंवा आपल्या सोयीने लिहू शकता.
१) मराठी संवाद आणि संभाषण - मला जास्तीत जास्त मराठीतच बोलायला आवडते आणि तोच प्रयत्न राहतो. ईतर भाषेत पटपट बोलताना चटचट शब्द सुचत नाहीत आणि भावना सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येत नाही जे मातृभाषेत संवाद साधताना होते. त्यामुळे ओळखीचे अमराठी लोक ज्यांना जुजबी का होईना पण मराठी समजते त्यांच्याशी मराठीतच बोलायला बघतो.
मुलीच्या अमराठी मैत्रीणींशी मराठीतच बोलतो. ज्यांना फार समजत नाही त्यांना लाडानेच दटावतो, की मराठी बोलायला आले नाही तरी किमान समजायला हवे.. आणि त्याचे आता चांगले परीणाम दिसू लागले आहेत. त्या मराठी बोलत नसल्या तरी हळूहळू त्यांना मराठी आधीपेक्षा छान समजू लागली आहे. कारण मुलांची नवीन काही शिकायची क्षमता जास्त असते. त्यामुळे ज्यांचे महाराष्ट्रात आयुष्य गेले तरी ज्यांना मराठी बोलता येत नाही अश्यांना उगाच मारहाण करण्यापेक्षा त्यांच्या मुलांशी मराठीत बोला. त्यांची पुढची पिढी मराठी समजणारी होईल. जेणेकरून महाराष्ट्रात सार्वजनिक जागी आपल्याला खुशाल मराठी बोलता येईल.
ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्याशी त्यांना समजेल अश्या भाषेत बोलण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. पण अनोळखी लोकं जे कुठले भाषिक आहेत याची कल्पना नसते त्यांच्याशी बोलायची सुरुवात आवर्जून मराठीत करतो. अन्यथा तासभर हिंदीत बोलल्यावर समजते की अरे आपण दोघे मराठीच आहोत
मुंबईत हे बरेचदा होते.
रिक्षावाले, दुकानदार, रस्त्यातील कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत आवर्जून मराठीनेच सुरुवात करावी आणि नंतर त्याला समजत नाही हे लक्षात आले की हिंदीकडे वळावे हे आता सवयीनेच पाळले जाते. हे सर्वांनीच लक्षात ठेवून पाळले तर नक्कीच लक्षणीय फरक पडेल.
अर्थात या नादात बरेचदा असे झाले आहे की रिक्षावाल्याला मराठीत दिलेल्या सूचना समजल्या नाहीत आणि जिथे थांबवायचे होते तिथे तो थांबलाच नाही. पण तेवढे मराठी प्रेमापोटी चालवून घेतो, पुढे उतरून पुन्हा मागे चालत येतो.
२) मराठीत शुभेच्छा - हे मी आवर्जून पाळतोच असे नाही. पण देण्यास लाजत देखील नाही. विशेषतः एखाद्या मराठी माणसाच्या प्रोफाईलवर आधीच्या प्रतिसादात फारच इंग्लिश इंग्लिश, मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि गॉड ब्लेसड यू दिसले तर आवर्जून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो 
३) मराठी शाळा - स्वतः मराठी शाळांत शिकून डॉक्टर ईंजिनीअर झालेले आईबाप देखील आपल्या मुलांना मराठी शाळांत हल्ली पाठवत नाही. तरी माझा पहिल्या मुलीच्या वेळी तसा विचार होता. मातृभाषेतून शिक्षण घेतले की संकल्पना चांगल्या समजतात हा विचार मला पटलेला. तसे घरी बोलणे सुद्धा झाले होते. पण बायको मात्र मुलांना ईंग्लिश शाळेतच पाठवावे यावर ठाम होती. मी विरोध करणे शक्य नव्हते. कारण माझेच ईंग्लिश कच्चे आणि त्या कारणाने बरेच ठिकाणी बरेच वेळा माझे अडले देखील आहे. त्यामुळे मुलांचेही तुझ्यासारखे झाले तर ईथे येऊन तो विषय संपला. तसेच मराठी शाळेचा चांगला पर्याय सुद्धा मला उभा करता आला नाही. त्यामुळे ते राहिलेच.
पण...
४) घरी मातृभाषेचा वापर - मुलांशी घरात मराठीतच बोलतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय ते कौतुक. महाराष्ट्रात कुठल्याही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात मराठीतच बोलले जात असावे. पण याचाही एक किस्सा आहे. मुलगी शाळेत म्हणजे बालवाडीत जाऊ लागली तेव्हा इंग्लिश ही परकीय भाषा पहिल्यांदाच तिच्या कानावर पडायला सुरुवात झाली. साहजिकच सरावायला वेळ लागणार होता. तेव्हा जी आमची पहिलीच पॅरेंट-टीचर मिटींग होती. त्यात तिच्या बाईंनी आम्हाला सांगितले की तिच्याशी घरी ईंग्लिशमध्ये बोला. ज्यावर माझ्याही आधी माझ्या बायकोनेच स्पष्ट नकार दिला. म्हणाली, मुलांना ईंग्लिश शिकवणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि मातृभाषा जपणे आमची. त्यामुळे घरात आम्ही मराठीतच बोलणार. आजही घरात बोलली जाणारी पहिली भाषा मराठीच आहे.
५) मराठी वाचन आणि मराठी सहित्याची देवाणघेवाण - मराठीतल्या नावाजलेल्या लेखकांचे गाजलेले साहित्य कधी फार वाचले नाही. तसे ते कधी इतर भाषातले सुद्धा वाचले नाही. कारण मराठी भाषेवर प्रेम असले तरी मुळात वाचनाची आवड राहिली नाहीये. स्वत:चेच वाचन होत नसल्याने कोणाला मराठी पुस्तके वाचा असे प्रोत्साहन देऊ शकत नाही. पण स्वतः ला लिहायची आवड असल्याने माझे लेखनाचे धागे तसेच मायबोलीवरचे ईतर लेख आणि कथा ज्यांना आवड आहे त्यांना देतो. व्हॉटसपग्रूपवर येथील माहितीपुर्ण धाग्यांच्या लिंक ढकलतो. हे जास्त महत्वाचे वाटते. कारण ईंग्लिश ही माहितीची भाषा म्हणून ओळखली जाते. म्हणून तिचे महत्व जास्त आहे. तीच माहिती मराठीत मिळत असेल तर जरूर शेअर करावी. त्याने मराठी भाषेचे देखील महत्व वाढण्यास मदत होईल.
६) मराठी शिकवणी - बायको घरी सोसायटी आणि विभागातील मुलांची ट्यूशन घेते. आधी ती सर्व विषय शिकवायची. नंतर ते तिला जड जाऊ लागले तसे मोजकेच विषय शिकवण्याचा विचार करू लागली. हिंदी-मराठी किंवा ईंग्लिश-मॅथ्स-सायन्स असे दोन पर्याय होते. बायको खरे तर फादर अॅग्नेल कॉन्वेन्टची आहे. त्यामुळे तिला दुसरा पर्याय सोयीचा होता. पण आम्ही एकमताने ठरवले की आपण मराठी आहोत तर हिंदी-मराठी शिकवूया. कारण सोसायटीमध्ये अजून एक बाई हिंदी-मराठी ट्युशन घेत होती जी अमराठी होती. त्याऐवजी आपण चांगले मराठी शिकवू असे वाटले. ईंग्लिश मिडीयम मुलांचे मराठी शिकवण्यास फार अवघड नव्हते. आणि बायको कॉन्वेन्टची असली तरी दहावी बोर्डात मराठी या विषयात मुंबईत टॉपर होती. गरज पडेल तसे मराठी माध्यमात शिकलेलो मी, आणि माझी आई आणि इंटरनेट सोबतीला होतेच. आज तो निर्णय योग्य वाटतो. आपण आपली भाषा काही अमराठी मुलांना शिकवतोय याचे एक वेगळेच समाधान मिळते.
७) सांस्कृतिक कार्यक्रम - शाळा सोसायटीमध्ये महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा असो किंवा त्यांच्यावर भाषण द्यायचे असो, आवर्जून टिळक, सावित्रीबाईंपासून महाराजांपर्यंत महाराष्ट्रातील महापुरुषांचीच निवड करतो. ट्रेडिशनल डे असेल तेव्हा देखील महाराष्ट्राचीच संस्कृती जपतो. मुंबईतील शाळा-सोसायटीत सर्व जाती धर्म प्रांताचे लोक एकत्र नांदतात, तर अश्या उपक्रमातून ज्याने त्याने आपली संस्कृती ईतरापर्यंत पोहोचवावी असा विचार करून वेगळा विचार न करता मी आपली जपतो. मुंबईसारख्या शहरात बरेचदा आपल्या मुलांनाही आपली संस्कृती आणि परंपरांची ओळख अश्याच उपक्रमातून होते.
आमची सोसायटी तशी नवीनच आहे. ज्यात मराठी माणसाचा टक्का जेमतेम बारा ते पंधरा आहे. पण गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी लहान मुलांमध्येच रमतो आणि मोठ्यात फार मिसळत नाही, त्यामुळे पुढे पुढे करायला फार जायचो नाही. पण सुरुवातीच्या दोन तीन वर्षात जाणवले की गणेशोत्सवाचे स्वरुप हळूहळू अमराठी होत आहे. त्यामुळे जे मला जमते ते करू लागलो. आरतीला पुढाकार घेऊ लागलो. गणपतीची बरीच मराठी गाणी डाऊनलोड करून सोसायटीच्या सांस्कृतिक समितीला पुरवली. झाल्यास यंदा आपण मायबोलीवर देखील गणपतीच्या मराठी गाण्यांचा नवीन धागा काढूया. तेवढेच मला आणि आपल्या सर्वांनाच अजून पर्याय मिळतील.
८) मराठी चित्रपट - मराठी किंवा कुठल्याही भाषेचा प्रसार होण्यास चित्रपट हे देखील मला एक महत्वाचे माध्यम वाटते. मराठी चित्रपटाला चांगले दिवस यावेत आणि ते कायम राहावेत असे वाटते. त्यामुळे बहुतांश मराठी चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये बघतो. आवडल्यास हातचे न राखता कौतुक करतो आणि जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगतो. चित्रपटातील नावडत्या गोष्टींवर भाष्य करण्याऐवजी आवडलेल्या गोष्टी सांगतो. जर चित्रपट चांगला वाटलाच नाही तर उगाच ताशेरे न ओढता काही न लिहिता शांत बसतो. तसेही मराठी चित्रपटांचे मार्केटींग बजेट कमी असते. त्याला थोडाफार हातभार लावतो.
मायबोलीवर चित्रपट कसा वाटला असा धागा असला तरी नवीन चित्रपट बघून आले की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला स्वतंत्र धागा काढतो. सहज आतापर्यंत मायबोलीवरच काढलेले मराठी चित्रपट धागे मोजले तर जवळपास १८-२० भरले.. एप्रिल मे ९९, गुलकंद, आता थांबायचं नाय, झिम्मा-२, नाळ-२, आत्मपॅम्फ्लेट, वाळवी, झोंबीवली, झिम्मा, समांतर, मुंबई-पुणे-मुंबई ३, फास्टर फेणे, मुंबई पुणे मुंबई २, दगडी चाळ, क्लासमेटस, सैराट, दुनियादारी, बालकपालक....
गेल्या काही काळातील वाढत्या दर्जेदार मराठी चित्रपटांची संख्या पाहता केवळ याच धाग्यांनी पन्नाशी गाठल्यास नवल वाटणार नाही
९) ईतर लोकांचे मराठी सुधारणे - माझ्या मराठी बोलण्यात कुठल्या ग्रामीण बोलीभाषेचा अॅक्सेंट नसल्याने मी बोललेले मराठी बरेच अमराठी लोकांना सोपे सुटसुटीत वाटते. तसेच मराठी ऑर्कुट कम्युनिटीज आणि मायबोलीसारख्या मराठी संकेतस्थळांवर बागडल्याने माझ्या मराठीत जी काही थोडीफार सुधारणा झाली आहे, त्यामुळे माझ्या आजूबाजुच्या ईतर मराठी लोकांना देखील वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने माझे मराठी त्यांच्या तुलनेत भारी वगैरे वाटते. माझ्या लिखाणातील ज्या चुका ईथे सुधारल्या जातात त्या मी बाहेर जाऊन माझ्या परीने ईतरांच्या सुधारतो. फक्त एक काळजी घेतो. कोणाच्या चुकांवर न हसता, त्यांची टिंगल न उडवता सुधारतो. अन्यथा लोकं दूर पळतात असा अनुभव आहे.
१०) मराठी/देवनागरी लिपीतील टंकलेखनाचा प्रसार - ऑर्कुट काळात मी लॅपटॉपवर बराहा नोटपॅड वापरून देवनागरी लिपीत लिहायचो. पण बरेच जण रोमन लिपीतच मराठी लिहायचे. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरची फाईल मी जवळपास चाळीस पन्नास जणांना तरी मेल केली असेल. त्यानंतरही मोबाईलवर मराठी टाईप कसे करावे हे जवळपास अर्ध्या ऑफिसला आणि माझ्या ओळखीच्या अर्ध्या जनतेला सांगून झाले आहे. माझे मोठमोठाले मराठी मेसेज आणि लेख बघून बरेच जणांनी समोरून चौकशी केली आहे. मराठीत वॉईस टायपिंग ऑप्शन सुद्धा मी लोकप्रिय केला आहे. शाळेच्या पिकनिकला मित्रांना त्याचा डेमो दिला. आता आमच्या व्हॉटसग्रूपवर झाडून सारेच मराठीत टंकतात.
११) इतर -- कस्टमर केअरशी बोलताना मराठीचा पर्याय निवडतो. हे मागे कुठेतरी वाचले होते आणि पटले होते. मराठीचा पर्याय निवडाल तर त्या कंपनी सुद्धा मराठी भाषेला महत्व देतील. तसेच अधिकाअधिक मराठी मुलांना कामावर ठेवतील. तेव्हापासून आवर्जून हेच करतो.
१२.. १३.. १४... सुचेल तसे लेखात किंवा प्रतिसादात भर टाकायला आवडेल.
अरे हो, नुकतेच मुलांसाठी मराठी वाक्ये लिहिलेली टीशर्ट घेतली आहेत, जी त्यांना फार आवडली आहेत. म्हटले जरा त्यांनाही आपले मराठी असणे त्यांच्या जनरेशनला साजेश्या शैलीत मिरवू द्यावे 
लेख पूर्ण वाचला असाल तर तुमचे कौतुक आहे. ते तुमचे मराठी प्रेम आहे 
कारण विद्वत्तेचा निकष लावता मी कुठल्याही अंगाने मराठी भाषेवर हक्काने बोलावे या पात्रतेचा नाही. पण मराठी भाषा प्रेमाचा निकष लावता हो, कदाचित आहे. अश्या सर्व मराठीप्रेमींनी प्रतिसादात भर टाकावी. आपल्याला अजून काय करता येईल हे लिहावे, वर जे लिहिले आहे त्यात काय सुधारणा करता येईल हे सुचवावे.
- धन्यवाद
एक सर्वसामान्य मराठी भाषा प्रेमी
@ सुधीर कांदळकर,
@ सुधीर कांदळकर,
आपले प्रतिसाद मोलाचे आहेत. कारण छोट्या गावात परिस्थिती बदलली की वरचे लेखातील सगळेच मुद्दे बदलतात. तिथली गरज वेगळी आहे.
@ केशवकूल,
तुमचा मुद्दा या धाग्याशी संबंधित आहे का?
सर, म्हटले तर आहे नाहीतर
सर, म्हटले तर आहे नाहीतर नाही, हा एक गेम आहे. ते लोक चेंडू फेकतात आपण पळत पळत जाऊन... त्यावेळी ते लोक मस्त पाव लोणी खात बसतात.
कांदळकर व केकु, तुम्हा
.
चुकीचा धागा.
धागा तर चुकलाच पण मुद्दा ही
धागा तर चुकलाच पण मुद्दा ही चुकलाच. माफी चाहता हू.
ऋन्मेष तू जे मुद्दे मांडले
ऋन्मेष तू जे मुद्दे मांडले आहेत त्याप्रमाणे जर लोक वागले तर कित्येक प्राध्यापक मंडळींच्या परिसंवादातल्या रटाळ भाषणांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त परिणाम होईल.
तुझ्या मुद्द्यांमध्ये आणखी भर:
- मराठी संबंधी नियमांची माहिती घेऊन ती whatsapp वर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ते नियम संबंधित ठिकाणी उद्धृत करून तिथे मराठीतच काम होईल असे पाहणे. उदाहरणार्थ - महाराष्ट्र राजभाषा नियम १९६४ प्रमाणे महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी आहे. राज्य शासनाचा कारभार मराठीत होणे अपेक्षित आहे. एक विडिओ पाहण्यात आला जेथे राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचारी एका हिंदी बोलणाऱ्या ग्राहक बाईला मराठीत बोला नाहीतर interpreter घेऊन या असे सांगत होता. तो नियमाचे योग्य पालन करत होता.हे असंच झालं पाहिजे. त्याला हिंदीत बोलण्याचं काही obligation नाही. पण तिथेसुद्धा त्या हिंदी भाषक बाईची बाजू घेऊन एक मराठी भय्या त्या कर्मचाऱ्याला हिंदीत बोलण्यासाठी दमदाटी करत होता. आपलं दुर्दैव!
एका व्हिडिओमध्ये दोन राज्य कर्मचारी स्त्रिया असं सांगत होत्या की ज्या कर्मचाऱ्यांनी दहावीमध्ये हिंदी विषय पास केला नाही त्यांना राज्य सरकार हिंदीची वेगळी परीक्षा पास करायला लावतंय. त्याशिवाय त्यांची पगारवाढ/प्रोमोशन रोखून धरतेय. ह्याविरुद्ध आंदोलन व्हायला हवं.
सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचा कारभार मराठीत चालला पाहिजे असा नियम आहे. सोसायटी मीटिंग किंवा मीटिंगचे मिनिट्स वगैरेसाठी जर कुणी हिंदीचा वापर करत असेल आणि मराठीला डावलत असेल तर नियम दाखवून त्यांना मीटिंग मराठीतच करायला भाग पाडलं पाहिजे. सोसायटीत अगदी पन्नास अमराठी आणि एक मराठी असेल तरी हा नियम लागू आहे. निदान जिथे मराठी लोक बऱ्याच प्रमाणात आहेत त्या सोसायट्यांमध्ये तरी एकजूट दाखवून हट्टाने मराठीचा वापर करायला पाहिजे.
हिंदी आक्रमणाचे आणखी एक उदाहरण (a classic example of tolerant majority and intolerant micro-minority) : पंढरपूरला विठोबाच्या देवळात ३०-३५ कुटुंबांची सामूहिक पूजा चालू होती. सर्व मराठी कुटुंबे होती. केवळ एका अमराठी कुटुंबाने आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत पूजा सांगा म्हटले. पुजारी लगेच हिंदीत पूजा सांगायला लागले. एक मराठी माणूस "आम्हाला हिंदी येत नाही. मराठीत पूजा सांगा. मराठी राज्यभाषा आहे" वगैरे बोलायला लागला. तर पुजारी त्याला म्हणाले तुमच्या एका कुटुंबासाठी आम्ही मराठीत पूजा सांगू शकत नाही आणि त्यांनी सर्व पूजा हिंदीत सांगितली. बाकीची सगळी मराठी कुटुंबे निमूट होती.
कुठेतरी एक मार्मिक वाक्य वाचलं "आत्तापर्यंत अमराठी लोकांना आपण हिंदीचा पर्याय देऊन चूक केली. ह्यापुढे आपण त्यांना हिंदीचा पर्याय अजिबात द्यायला नको." नवीन भाषा शिकणं हे जिकीरीचं काम आहे. हौस म्हणून १% लोक सुद्धा शिकत नसतील. ९९% लोक शिकल्याशिवाय अडतं म्हणून शिकतात. त्यामुळे शक्य होईल तिथे अमराठी लोकांची मराठीसाठी अडवणूक करायला हवी. ह्यात अजिबात अपराधी वाटण्याचं कारण नाही. "मला मराठी येत नाही. हिंदीत बोला." असं म्हणून ते आपली अडवणूकच करत असतात. आपण आपल्या आयुष्यातला वेळ, आपली कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी वगैरे खर्च करून हिंदी शिकलोय. त्यांनी मराठीसाठी ते केलं नाही ह्याची किंमत त्यांना द्यायलाच हवी.
अजबराव मस्त पोस्ट !
अजबराव मस्त पोस्ट !
काही नवीन सापडले
आणि हा मुद्दा आवडला
>>>>>
आपण आपल्या आयुष्यातला वेळ, आपली कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी वगैरे खर्च करून हिंदी शिकलोय...
>>>>>
म्हणजे कोणाच्या तोंडावर फेकून मारायला किंवा कोणाला वादात हरवायला म्हणून नाही... तर आपण या संदर्भात जी भूमिका घेत आहोत ती योग्य आहे हे स्वतःला पटवायला म्हणून हा मुद्दा आवडला.
चीनने स्वतःच्या भाषेत
चीनने स्वतःच्या भाषेत अर्थव्यवस्था दुसर्या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे. जपानने इंग्रजी भाषेचे स्तोम न माजवता जपानी मधे तंत्रज्ञान आणले. आज जपानी, कोरीयन आणि चिनी भाषा शिकल्या जातात.>>ह्या तीन देशात इंग्रजी येणाऱ्यांना जास्त भाव आहे. पगार, पोझिशन पण चांगली मिळते. कोरियात तर प्रमोशन साठी इंग्रजीच्या परिक्षा द्याव्या लागतात.
ह्या तीन देशात इंग्रजी
ह्या तीन देशात इंग्रजी येणाऱ्यांना जास्त भाव आहे >>> इंग्रजी आणि चिनी दोन्ही भाषा येणाऱ्यांना जास्त भाव असेल असे वाटते.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
मी मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं तेव्हा त्याला मराठी शिकवायची जबाबदारी स्वतः वर घेतली होती. घरात त्याला आवडतील अशी भरपूर गोष्टीची पुस्तकं आणली होती. त्याच्या खोलीत मराठी मुळाक्षरा चे फलक लावले... रोज एखा द वाक्य त्याला लिहायला लावायची.
लहान वयातच त्यालाही पू. ल. आवडायला लागले होते.
सध्या बरेच घरात हे काम आजी
सध्या बरेच घरात हे काम आजी आजोबा आवडीने करतात.
पण किती मुले आजी आजोबांसोबत राहतात हा एक प्रश्न आहे.
मी काल जारण सिनेमा पाहिला.
मी काल जारण सिनेमा पाहिला. अर्धे संवाद इंग्रजीत. असेच असेल तर कशी टिकणार मराठी भाषा?
ते अमेरिकन्स ना मराठी
ते अमेरिकन्स ना मराठी अन्डरस्टँड whyला मदत म्हणून इंग्रजी डायलॉग टाक्लेत. मराठी काय लोणचं आहे का टिकवायला?
ह्या तीन देशात इंग्रजी
ह्या तीन देशात इंग्रजी येणाऱ्यांना जास्त भाव आहे. पगार, पोझिशन पण चांगली मिळते. कोरियात तर प्रमोशन साठी इंग्रजीच्या परिक्षा द्याव्या लागतात. >> मंदार डी जी, या तीन देशात इंग्रजी येणार्यांना जास्त भाव का असेल असं तुम्हाला वाटतं ? बघा विचार करून.
डिमांड जास्त सप्लाय कमी
डिमांड जास्त सप्लाय कमी
थोडक्यात तिथे इंग्लिश शिकवण्याला जास्त महत्त्व दिले जात नसावे.
<<मराठी काय लोणचं आहे का
<<मराठी काय लोणचं आहे का टिकवायला?>>
तो प्रश्न नाहीये.
काही लोकांना मराठी भाषा फार आवडते आणि ती टिकावी, त्यात आणखी चांगले वाङ्मय निर्माण व्हावे असे वाटते.
कुणाला तसे नसेल वाटत तर राहू दे.
मी चौथीपर्यंत मराठी व
मी चौथीपर्यंत मराठी व पाचवीपासून पुढे सेमी इंग्लिश माध्यमात शिकलो.
मराठी भाषेसाठी मी दोन गोष्टी वयाच्या तेराव्या वर्षापासून केल्या ज्या ( आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितले होते) अजूनही आहेत.
पहिली गोष्ट: माझी सही मराठीत आहे. (शुद्ध मराठीत आहे हे दिसते.)
दुसरी गोष्ट: माझ्या दारावरची पाटी मराठीत आहे. नातेवाईकांना व इतर ओळखीच्या लोकांना त्यांच्या दारावरील पाटी मराठीमध्ये लावण्यासाठी आग्रह धरतो.
इतर अन्य ...
मराठी भाषेसाठी करत असलेले खटाटोप..
कुठेही जे काही फॉर्म येतात ,ते मराठीत भरतो.
हॉटेलमध्ये मराठी मेनू कार्ड मागतो (हॉटेलवाला खोटे हसतो, पुढच्या वेळेला ठेवेन म्हणतो)
पुण्यामध्ये बसमध्ये एबीसी चौक /एफसी रोड वगैरे कोणी म्हटले तर त्याला "आप्पा बळवंत चौक"/फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणा असे आचरट पणाने सांगतो.
माझी अवलोकने
१.मराठवाड्यात मुस्लिम लोक जाणीवपूर्वक मराठी बोलत नाहीत. गेल्या काही वर्षात घराची नावे, नगरपालिकेच्या पाट्या इत्यादी सुद्धा उर्दूमध्ये आलेली आहेत
२.मुंबईतील परप्रांतीय मराठीत बोलायचा प्रयत्न करतात परंतु मराठी लोक त्यांच्याशी हिंदीत बोलल्यामुळे त्यांचे काम सोपे होते .
३. अमेरिकेत गेलो असता तेथील मराठी लोक जाणीवपूर्वक घरात मराठी भाषा जपताना दिसतात.
४. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या आहेत तेथे विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मराठीत बोलल्यास शिक्षा होते असे लक्षात आले .तेथे जाऊन याबाबत तेथील शिक्षकांना योग्य ती समज देण्याचे काम करतो.
सडेतोड विचार
सडेतोड विचार
सुबोध भावे
म्हणून मी आवर्जून मराठी चित्रपट सिनेमागृहात बघतो.
https://www.facebook.com/share/v/17JMHPanfp/
गेल्या वीकेंडचा किस्सा!
गेल्या वीकेंडचा किस्सा!
रिक्षात बसले की मी रिक्षावाल्याशी मराठीतच बोलतो. फार काही गप्पा मारायच्या नसतात जुजबीच बोलायचे असते त्यामुळे त्याला मराठी बोलता येत नसेल पण बोललेले समजत असेल तरी तितके पुरते. अगदीच मराठी बोललेले देखील समजत नाही असे वाटले तरच महत्वाची सूचना हिंदीत देतो.
तर परवा कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी गेलो होतो. तिथे रिक्षा करायची वेळ आली. रिक्षावाला जाळीदार पांढरी टोपी घातलेला मुसलमान होता. ते पाहून मी हिंदीत बोलायला सुरुवात केली. मध्ये बायकोचा फोन आलेला. तिच्याशी बोलणे झाले. ते अर्थातच मराठीतच. उतरताना पुन्हा त्याला हिंदीत सूचना देऊ लागलो तसे तोच मराठीत सुरू झाला. मी मात्र खजील झालो. मुसलमान बघून याला मराठी येतच नसणार हे जणू गृहितच धरले. ते देखील मराठी बोलणारे कित्येक कोकणी मुसलमान माझ्या ओळखीत असून..
यापुढे काळजी घेईन
विषय क्या है नेमका ?
विषय क्या है नेमका ?
शीर्षकात आणि लेखात आहे तोच
क्या है
शीर्षकात और लेखात आहे वहीच
भर टाका तुम्हीही..
Pages