मराठी भाषेसाठी आपण काय करतो आणि काय करू शकतो..

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2025 - 10:44

प्रथम एक गोष्ट नमूद करू ईच्छितो की ईथे बरेच जणांना हा लेख आणि यातील मुद्दे साधारण वाटण्याची शक्यता आहे. कारण मायबोली हा मंच मराठी लिखाणाची आणि वाचनाची आवड जोपासणार्‍यांचा आहे त्यामुळे इथे वावरणार्‍या लोकांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व तितकेच जास्त आहे.

पण मायबोली बाहेरील जगात बहुतांश लोकं माझ्या इतकेच जेमतेम मराठी जाणणारे, बोलणारे आणि वापरणारे असावेत. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य मराठी माणसाला, जो फार काही मोठा मराठीचा अभ्यासक नाही, त्याला मराठीप्रेम जोपासणे म्हणजे काय वाटते, आणि तो मराठी भाषेसाठी काय करतो, काय करू शकतो हे इथे लिहिणे गरजेचे वाटले म्हणून लिहीत आहे. किंबहुना मागेच असा धागा काढावा हे काही जणांकडून सुचवण्यात आले होते, पण कदाचित माझे मराठीप्रेम कमी पडले असावे जे ईतका विलंब लागला. काही हरकत नाही, "देर आये पर दुरुस्त आये" असे एका अमराठी भाषेत म्हणून सुरू करूया Happy

मी स्वतः काय करतो ते सांगतो.
तुम्ही तेच मुद्दे घेऊन किंवा आपल्या सोयीने लिहू शकता.

१) मराठी संवाद आणि संभाषण - मला जास्तीत जास्त मराठीतच बोलायला आवडते आणि तोच प्रयत्न राहतो. ईतर भाषेत पटपट बोलताना चटचट शब्द सुचत नाहीत आणि भावना सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येत नाही जे मातृभाषेत संवाद साधताना होते. त्यामुळे ओळखीचे अमराठी लोक ज्यांना जुजबी का होईना पण मराठी समजते त्यांच्याशी मराठीतच बोलायला बघतो.

मुलीच्या अमराठी मैत्रीणींशी मराठीतच बोलतो. ज्यांना फार समजत नाही त्यांना लाडानेच दटावतो, की मराठी बोलायला आले नाही तरी किमान समजायला हवे.. आणि त्याचे आता चांगले परीणाम दिसू लागले आहेत. त्या मराठी बोलत नसल्या तरी हळूहळू त्यांना मराठी आधीपेक्षा छान समजू लागली आहे. कारण मुलांची नवीन काही शिकायची क्षमता जास्त असते. त्यामुळे ज्यांचे महाराष्ट्रात आयुष्य गेले तरी ज्यांना मराठी बोलता येत नाही अश्यांना उगाच मारहाण करण्यापेक्षा त्यांच्या मुलांशी मराठीत बोला. त्यांची पुढची पिढी मराठी समजणारी होईल. जेणेकरून महाराष्ट्रात सार्वजनिक जागी आपल्याला खुशाल मराठी बोलता येईल.

ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्याशी त्यांना समजेल अश्या भाषेत बोलण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. पण अनोळखी लोकं जे कुठले भाषिक आहेत याची कल्पना नसते त्यांच्याशी बोलायची सुरुवात आवर्जून मराठीत करतो. अन्यथा तासभर हिंदीत बोलल्यावर समजते की अरे आपण दोघे मराठीच आहोत Happy मुंबईत हे बरेचदा होते.

रिक्षावाले, दुकानदार, रस्त्यातील कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत आवर्जून मराठीनेच सुरुवात करावी आणि नंतर त्याला समजत नाही हे लक्षात आले की हिंदीकडे वळावे हे आता सवयीनेच पाळले जाते. हे सर्वांनीच लक्षात ठेवून पाळले तर नक्कीच लक्षणीय फरक पडेल.

अर्थात या नादात बरेचदा असे झाले आहे की रिक्षावाल्याला मराठीत दिलेल्या सूचना समजल्या नाहीत आणि जिथे थांबवायचे होते तिथे तो थांबलाच नाही. पण तेवढे मराठी प्रेमापोटी चालवून घेतो, पुढे उतरून पुन्हा मागे चालत येतो.

२) मराठीत शुभेच्छा - हे मी आवर्जून पाळतोच असे नाही. पण देण्यास लाजत देखील नाही. विशेषतः एखाद्या मराठी माणसाच्या प्रोफाईलवर आधीच्या प्रतिसादात फारच इंग्लिश इंग्लिश, मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि गॉड ब्लेसड यू दिसले तर आवर्जून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो Happy

३) मराठी शाळा - स्वतः मराठी शाळांत शिकून डॉक्टर ईंजिनीअर झालेले आईबाप देखील आपल्या मुलांना मराठी शाळांत हल्ली पाठवत नाही. तरी माझा पहिल्या मुलीच्या वेळी तसा विचार होता. मातृभाषेतून शिक्षण घेतले की संकल्पना चांगल्या समजतात हा विचार मला पटलेला. तसे घरी बोलणे सुद्धा झाले होते. पण बायको मात्र मुलांना ईंग्लिश शाळेतच पाठवावे यावर ठाम होती. मी विरोध करणे शक्य नव्हते. कारण माझेच ईंग्लिश कच्चे आणि त्या कारणाने बरेच ठिकाणी बरेच वेळा माझे अडले देखील आहे. त्यामुळे मुलांचेही तुझ्यासारखे झाले तर ईथे येऊन तो विषय संपला. तसेच मराठी शाळेचा चांगला पर्याय सुद्धा मला उभा करता आला नाही. त्यामुळे ते राहिलेच.
पण...

४) घरी मातृभाषेचा वापर - मुलांशी घरात मराठीतच बोलतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय ते कौतुक. महाराष्ट्रात कुठल्याही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात मराठीतच बोलले जात असावे. पण याचाही एक किस्सा आहे. मुलगी शाळेत म्हणजे बालवाडीत जाऊ लागली तेव्हा इंग्लिश ही परकीय भाषा पहिल्यांदाच तिच्या कानावर पडायला सुरुवात झाली. साहजिकच सरावायला वेळ लागणार होता. तेव्हा जी आमची पहिलीच पॅरेंट-टीचर मिटींग होती. त्यात तिच्या बाईंनी आम्हाला सांगितले की तिच्याशी घरी ईंग्लिशमध्ये बोला. ज्यावर माझ्याही आधी माझ्या बायकोनेच स्पष्ट नकार दिला. म्हणाली, मुलांना ईंग्लिश शिकवणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि मातृभाषा जपणे आमची. त्यामुळे घरात आम्ही मराठीतच बोलणार. आजही घरात बोलली जाणारी पहिली भाषा मराठीच आहे.

५) मराठी वाचन आणि मराठी सहित्याची देवाणघेवाण - मराठीतल्या नावाजलेल्या लेखकांचे गाजलेले साहित्य कधी फार वाचले नाही. तसे ते कधी इतर भाषातले सुद्धा वाचले नाही. कारण मराठी भाषेवर प्रेम असले तरी मुळात वाचनाची आवड राहिली नाहीये. स्वत:चेच वाचन होत नसल्याने कोणाला मराठी पुस्तके वाचा असे प्रोत्साहन देऊ शकत नाही. पण स्वतः ला लिहायची आवड असल्याने माझे लेखनाचे धागे तसेच मायबोलीवरचे ईतर लेख आणि कथा ज्यांना आवड आहे त्यांना देतो. व्हॉटसपग्रूपवर येथील माहितीपुर्ण धाग्यांच्या लिंक ढकलतो. हे जास्त महत्वाचे वाटते. कारण ईंग्लिश ही माहितीची भाषा म्हणून ओळखली जाते. म्हणून तिचे महत्व जास्त आहे. तीच माहिती मराठीत मिळत असेल तर जरूर शेअर करावी. त्याने मराठी भाषेचे देखील महत्व वाढण्यास मदत होईल.

६) मराठी शिकवणी - बायको घरी सोसायटी आणि विभागातील मुलांची ट्यूशन घेते. आधी ती सर्व विषय शिकवायची. नंतर ते तिला जड जाऊ लागले तसे मोजकेच विषय शिकवण्याचा विचार करू लागली. हिंदी-मराठी किंवा ईंग्लिश-मॅथ्स-सायन्स असे दोन पर्याय होते. बायको खरे तर फादर अ‍ॅग्नेल कॉन्वेन्टची आहे. त्यामुळे तिला दुसरा पर्याय सोयीचा होता. पण आम्ही एकमताने ठरवले की आपण मराठी आहोत तर हिंदी-मराठी शिकवूया. कारण सोसायटीमध्ये अजून एक बाई हिंदी-मराठी ट्युशन घेत होती जी अमराठी होती. त्याऐवजी आपण चांगले मराठी शिकवू असे वाटले. ईंग्लिश मिडीयम मुलांचे मराठी शिकवण्यास फार अवघड नव्हते. आणि बायको कॉन्वेन्टची असली तरी दहावी बोर्डात मराठी या विषयात मुंबईत टॉपर होती. गरज पडेल तसे मराठी माध्यमात शिकलेलो मी, आणि माझी आई आणि इंटरनेट सोबतीला होतेच. आज तो निर्णय योग्य वाटतो. आपण आपली भाषा काही अमराठी मुलांना शिकवतोय याचे एक वेगळेच समाधान मिळते.

७) सांस्कृतिक कार्यक्रम - शाळा सोसायटीमध्ये महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा असो किंवा त्यांच्यावर भाषण द्यायचे असो, आवर्जून टिळक, सावित्रीबाईंपासून महाराजांपर्यंत महाराष्ट्रातील महापुरुषांचीच निवड करतो. ट्रेडिशनल डे असेल तेव्हा देखील महाराष्ट्राचीच संस्कृती जपतो. मुंबईतील शाळा-सोसायटीत सर्व जाती धर्म प्रांताचे लोक एकत्र नांदतात, तर अश्या उपक्रमातून ज्याने त्याने आपली संस्कृती ईतरापर्यंत पोहोचवावी असा विचार करून वेगळा विचार न करता मी आपली जपतो. मुंबईसारख्या शहरात बरेचदा आपल्या मुलांनाही आपली संस्कृती आणि परंपरांची ओळख अश्याच उपक्रमातून होते.

आमची सोसायटी तशी नवीनच आहे. ज्यात मराठी माणसाचा टक्का जेमतेम बारा ते पंधरा आहे. पण गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी लहान मुलांमध्येच रमतो आणि मोठ्यात फार मिसळत नाही, त्यामुळे पुढे पुढे करायला फार जायचो नाही. पण सुरुवातीच्या दोन तीन वर्षात जाणवले की गणेशोत्सवाचे स्वरुप हळूहळू अमराठी होत आहे. त्यामुळे जे मला जमते ते करू लागलो. आरतीला पुढाकार घेऊ लागलो. गणपतीची बरीच मराठी गाणी डाऊनलोड करून सोसायटीच्या सांस्कृतिक समितीला पुरवली. झाल्यास यंदा आपण मायबोलीवर देखील गणपतीच्या मराठी गाण्यांचा नवीन धागा काढूया. तेवढेच मला आणि आपल्या सर्वांनाच अजून पर्याय मिळतील.

८) मराठी चित्रपट - मराठी किंवा कुठल्याही भाषेचा प्रसार होण्यास चित्रपट हे देखील मला एक महत्वाचे माध्यम वाटते. मराठी चित्रपटाला चांगले दिवस यावेत आणि ते कायम राहावेत असे वाटते. त्यामुळे बहुतांश मराठी चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये बघतो. आवडल्यास हातचे न राखता कौतुक करतो आणि जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगतो. चित्रपटातील नावडत्या गोष्टींवर भाष्य करण्याऐवजी आवडलेल्या गोष्टी सांगतो. जर चित्रपट चांगला वाटलाच नाही तर उगाच ताशेरे न ओढता काही न लिहिता शांत बसतो. तसेही मराठी चित्रपटांचे मार्केटींग बजेट कमी असते. त्याला थोडाफार हातभार लावतो.

मायबोलीवर चित्रपट कसा वाटला असा धागा असला तरी नवीन चित्रपट बघून आले की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला स्वतंत्र धागा काढतो. सहज आतापर्यंत मायबोलीवरच काढलेले मराठी चित्रपट धागे मोजले तर जवळपास १८-२० भरले.. एप्रिल मे ९९, गुलकंद, आता थांबायचं नाय, झिम्मा-२, नाळ-२, आत्मपॅम्फ्लेट, वाळवी, झोंबीवली, झिम्मा, समांतर, मुंबई-पुणे-मुंबई ३, फास्टर फेणे, मुंबई पुणे मुंबई २, दगडी चाळ, क्लासमेटस, सैराट, दुनियादारी, बालकपालक....
गेल्या काही काळातील वाढत्या दर्जेदार मराठी चित्रपटांची संख्या पाहता केवळ याच धाग्यांनी पन्नाशी गाठल्यास नवल वाटणार नाही Happy

९) ईतर लोकांचे मराठी सुधारणे - माझ्या मराठी बोलण्यात कुठल्या ग्रामीण बोलीभाषेचा अ‍ॅक्सेंट नसल्याने मी बोललेले मराठी बरेच अमराठी लोकांना सोपे सुटसुटीत वाटते. तसेच मराठी ऑर्कुट कम्युनिटीज आणि मायबोलीसारख्या मराठी संकेतस्थळांवर बागडल्याने माझ्या मराठीत जी काही थोडीफार सुधारणा झाली आहे, त्यामुळे माझ्या आजूबाजुच्या ईतर मराठी लोकांना देखील वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने माझे मराठी त्यांच्या तुलनेत भारी वगैरे वाटते. माझ्या लिखाणातील ज्या चुका ईथे सुधारल्या जातात त्या मी बाहेर जाऊन माझ्या परीने ईतरांच्या सुधारतो. फक्त एक काळजी घेतो. कोणाच्या चुकांवर न हसता, त्यांची टिंगल न उडवता सुधारतो. अन्यथा लोकं दूर पळतात असा अनुभव आहे.

१०) मराठी/देवनागरी लिपीतील टंकलेखनाचा प्रसार - ऑर्कुट काळात मी लॅपटॉपवर बराहा नोटपॅड वापरून देवनागरी लिपीत लिहायचो. पण बरेच जण रोमन लिपीतच मराठी लिहायचे. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरची फाईल मी जवळपास चाळीस पन्नास जणांना तरी मेल केली असेल. त्यानंतरही मोबाईलवर मराठी टाईप कसे करावे हे जवळपास अर्ध्या ऑफिसला आणि माझ्या ओळखीच्या अर्ध्या जनतेला सांगून झाले आहे. माझे मोठमोठाले मराठी मेसेज आणि लेख बघून बरेच जणांनी समोरून चौकशी केली आहे. मराठीत वॉईस टायपिंग ऑप्शन सुद्धा मी लोकप्रिय केला आहे. शाळेच्या पिकनिकला मित्रांना त्याचा डेमो दिला. आता आमच्या व्हॉटसग्रूपवर झाडून सारेच मराठीत टंकतात.

११) इतर -- कस्टमर केअरशी बोलताना मराठीचा पर्याय निवडतो. हे मागे कुठेतरी वाचले होते आणि पटले होते. मराठीचा पर्याय निवडाल तर त्या कंपनी सुद्धा मराठी भाषेला महत्व देतील. तसेच अधिकाअधिक मराठी मुलांना कामावर ठेवतील. तेव्हापासून आवर्जून हेच करतो.

१२.. १३.. १४... सुचेल तसे लेखात किंवा प्रतिसादात भर टाकायला आवडेल.

अरे हो, नुकतेच मुलांसाठी मराठी वाक्ये लिहिलेली टीशर्ट घेतली आहेत, जी त्यांना फार आवडली आहेत. म्हटले जरा त्यांनाही आपले मराठी असणे त्यांच्या जनरेशनला साजेश्या शैलीत मिरवू द्यावे Happy

लेख पूर्ण वाचला असाल तर तुमचे कौतुक आहे. ते तुमचे मराठी प्रेम आहे Happy
कारण विद्वत्तेचा निकष लावता मी कुठल्याही अंगाने मराठी भाषेवर हक्काने बोलावे या पात्रतेचा नाही. पण मराठी भाषा प्रेमाचा निकष लावता हो, कदाचित आहे. अश्या सर्व मराठीप्रेमींनी प्रतिसादात भर टाकावी. आपल्याला अजून काय करता येईल हे लिहावे, वर जे लिहिले आहे त्यात काय सुधारणा करता येईल हे सुचवावे.

- धन्यवाद
एक सर्वसामान्य मराठी भाषा प्रेमी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत.

२. ईतर नाही इतर.

३. मुलांना ईंग्लिश शिकवणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि मातृभाषा जपणे आमची. त्यामुळे घरात आम्ही मराठीतच बोलणार. आजही घरात बोलली जाणारी पहिली भाषा मराठीच आहे.

हे पूर्ण पटले नाही. आपले मूल. दोन्ही भाषा अचूक येणे यावर आपले लक्ष हवेच.

४. या बाबतीत सई परांजपे यांचे विचार कडक आहेत. ठळक मुद्दे अमराठी भाषेतील शब्दात मांडलेले असतात म्हणून त्या वृत्तपत्रे वाचीत नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=sAHR3TxcTQ4
इथे त्यांची मुलाखत पाहावयास मिळेल.

५. मराठी शाळांत कांही वेळा जातीयवादाला अनुसरून काही विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जाते असे ऐकून आहे. ते खरे असल्यास आपल्या पाल्यावर चुकीचे संस्कार होऊं शकतात.

समयोचित लेखाबद्दल धन्यवाद.

जबरदस्त लेख...
कही दिवसात जनगणना होणार आहे त्यावेळी आपली मातृभाषा मराठी आहे हे नोंदवले जाते आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या. तसेच जर दुय्यम भाषेचा पर्याय असेल तर हिंदी सोडून कुठलीही भाषा नोंदवा. हिब्रू चालेल.

>>अन्यथा तासभर हिंदीत बोलल्यावर समजते की अरे आपण दोघे मराठीच आहोत Happy मुंबईत हे बरेचदा होते.<<
हल्ली मुंबईत हिंदितुन संवाद केल्याने परप्रांतियांच्या कानाखाली आवाज काढला जातो, त्याऐवजी जो मराठी माणुस संवादाची सुरुवातच हिंदितुन करेल त्याच्या कानाखाली आवाज काढणे सुरु करावे..

बाकि, लेख समयोचित...

ईतर नाही इतर >> धन्यवाद, बदल करतो.

आपले मूल. दोन्ही भाषा अचूक येणे यावर आपले लक्ष हवेच. >>> हो, हे मान्य. आपल्या दृष्टीने मुलांना दोन्ही भाषा येणे गरजेचे. पण शाळेत जर इंग्लिश पक्की होणार असेल तर मातृभाषा कशी पक्की होईल याची काळजी आपणच घ्यायला हवी या अर्थाने होते ते. याउपर मुलाची इंग्लिश कच्ची राहते असे वाटले तर आपण त्यावर आपल्या परीने मेहनत घेऊच. पण मराठी कच्ची राहिली तर शाळा काही एफर्ट घेणार नाही. ती जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे या अर्थाने होते ते.

@ केशवकूल
>>>तसेच जर दुय्यम भाषेचा पर्याय असेल तर हिंदी सोडून कुठलीही भाषा नोंदवा.>>>> याने मराठीचा फायदा काय हे कळले नाही..

@ राज,
हो लोजिकली तरी तेच करायला हवे. मराठी बोलायला सुरुवात मराठी माणसेच करत नसतील तर हिंदी भाषिकांनी मराठी आत्मसात करून बोलावी अशी अपेक्षा करायचा हक्कच काय उरला.

. पण सुरुवातीच्या दोन तीन वर्षात जाणवले की गणेशोत्सवाचे स्वरुप हळूहळू अमराठी होत आहे. त्यामुळे जे मला जमते ते करू लागलो. आरतीला पुढाकार घेऊ लागलो. गणपतीची बरीच मराठी गाणी डाऊनलोड करून सोसायटीच्या सांस्कृतिक समितीला पुरवली.>>> इतर सर्व मुद्दे जवळपास कटाक्षाने पळतो. या भर घातलेल्या मुद्द्यासाठी आभार....काठावर बसून किरकीर करुन काही साध्य होणार नाही. पाण्यात उतरायची तयारी आता प्रत्येकाने ठेवायला हवी. +१

@ऋन्मेश या वेळच्या गणेशोत्सव उपक्रमांसाठी शुभेच्छा. Happy

गप्प बसून मराठीत जे चांगलं साहित्य आहे ते वाचू शकतो. >> +१. दोन धागेव्नि चार पोस्ट कमी करून तोच वेळ मराठी वाचण्यासाठी वापरता येईल. "मुळात वाचनाची आवड राहिली नाहीये." इत्यादी फक्त सबबी आहेत असे लक्षात ठेवावे.

धन्यवाद आर्च आणि फाविद Happy

<< काठावर बसून किरकीर करुन काही साध्य होणार नाही. पाण्यात उतरायची तयारी आता प्रत्येकाने ठेवायला हवी. +१ >> +७८६ मुळात कोणी नेत्याने संघटनेने येऊन हे सांगण्याआधी, या सगळ्याला प्रसिद्धी मिळण्याआधी कुठल्याही वादापासून दूर राहत स्वयंप्रेरणेनेच काही गोष्टी आपल्या हातून घडणे गरजेचे. कारण मातृभाषेबद्दलचे प्रेम आपल्या सर्वात उपजत असतेच.

लेख आवडला. उत्तम मुद्दे.

मुद्दा क्र ९ >> मला वाटतं की मराठी बोलण्यातील चुका या ग्रामीण विरुद्ध शहरी किंवा बोली विरुद्ध प्रमाण यातून काढलेल्या नसाव्यात. ग्रामीण बाज, बोली भाषांतील विविधता आहे ती असू द्यावी. लेखी मराठीत पण ते अनौपचारिक असेल तर जे आहे ते समजून घ्यायला हरकत नाही. परंतु औपचारिक लेखन - उदा. वृत्तपत्र किंवा सरकारी सूचना - ह्या सर्वांना समान समजाव्यात आणि त्यात काही संदिग्धता असू नये यासाठी तिथे प्रमाण भाषा आणि अचूक मराठीचा आग्रह धरायला हरकत नाही (मी अनेकदा अनेक लोकांच्या चुका काढण्यासाठी कुप्रसिद्ध आहे, पण तरी विचारांती हा धडा मी माझ्यापुरता शिकलो आहे).

बाकी बरेच मुद्दे मांडले आहेस व इतका सर्वांगीण विचार केल्याबद्दल खरंच छान वाटलं. काही आणखी विचार खाली मांडतो.

जर मराठी टिकावी असं वाटत असेल तर ती पैसे मिळवून देणारी भाषा व्हायला हवी, त्याखेरीज गत्यंतर नाही. त्याकरिता अनेक आधुनिक विषय मराठीत लिहिले आणि वाचले जाण्याची गरज आहे. थोडक्यात, साहित्येतर मराठी लिखाण जास्त होण्याची गरज आहे. सध्या अच्युत गोडबोले व अन्य काही तशा प्रकारचं लेखन करत आहेत, पण ते पुरेसं नाही. तसं लिहिणारे भरपूर लेखक आणि अर्थात ते वाचणारे वाचक हवेत.

मराठी शब्दकोश नव्याने लिहिला जावा. गेल्या तीस चाळीस वर्षात जे नवनवीन शब्द मराठीत वापरले जातात त्यांचा अंतर्भाव त्यात व्हावा आणि भाषा वाहती ठेवावी. कोश छापीलच हवा असं नाही, ऑनलाईन असल्यास उत्तम.

ऑनलाईन ज्ञानकोश लिहिण्याचं काम सध्या शासन प्रयत्नातून गेले काही वर्षं सुरू आहे. तिथे नोंदी लिहिणारे आणि त्यांची प्रकाशनपूर्व समीक्षा करणारे अशा दोहोंची गरज आहे. याशिवाय "संदर्भ" सारखी काही विज्ञानाला वाहिलेली मराठी मासिकं आहेत, पण कुठलं मराठी वैज्ञानिक जर्नल मला अद्याप माहीत नाही. मुळात मराठी संशोधन लेखकच नसल्याने जर्नलमध्ये लिहिणार कोण हा प्रश्न आहेच. काही तुरळक मराठी ब्लॉग वा अन्यत्र संशोधनपर लेखन करणारे लोक आहेत. त्यांची एकत्र मोळी बांधून काही प्रयत्न करता आले तर बघता येईल. असे प्रयत्न काहींनी केले आहेत, नाही असे नाही, पण अद्याप त्यांना पुरेसं यश लाभलेलं नाही.

जाताजाता एक टीप लिहून ठेवतो - मराठीत विज्ञान किंवा तत्सम विषय लिहिताना अनेक इंग्रजी संज्ञांना उगीचच संस्कृतोद्भव अवजड शब्द वापरून वाचकांचं खच्चीकरण केलं जातं (मीही तो अपराध केलाय). ते करून वाचकांना मराठीपासून दूर लोटण्याऐवजी साधे सोपे मराठी प्रतिशब्द वापरून वा मूळचेच इंग्रजी शब्द आयात करून वैज्ञानिक मराठी वाचन सुकर करावं. काही अवजड संज्ञांना पर्याय नसेल तर वाचक एकवेळ समजून घेईल आणि स्वतःच्या शब्दसंपदेत भर टाकेल; पण हे तेव्हाच होईल जेव्हा मूळ लेखनविचार वाचकाला लेखन सोप्या भाषेत कळावं हा असेल.

जर मराठी टिकावी असं वाटत असेल तर ती पैसे मिळवून देणारी भाषा व्हायला हवी, त्याखेरीज गत्यंतर नाही. त्याकरिता अनेक आधुनिक विषय मराठीत लिहिले आणि वाचले जाण्याची गरज आहे. थोडक्यात, साहित्येतर मराठी लिखाण जास्त होण्याची गरज आहे. सध्या अच्युत गोडबोले व अन्य काही तशा प्रकारचं लेखन करत आहेत, पण ते पुरेसं नाही. तसं लिहिणारे भरपूर लेखक आणि अर्थात ते वाचणारे वाचक हवेत. >>> पूर्णपणे सहमत.
मराठी वाचक तेच तेच पुन्हा पुन्हा वाचनात अडकून पडला आहे.
अजून एक. प्लीज मराठी पुस्तकांच्या किमती कमी करा. त्यासाठी काय करायचे ह्याचा विचार व्हावा. बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांसाराख्या पल्प आवृत्यांमध्ये अभिजात साहित्य प्रकाशित झाले तर तर काय प्रॉब्लेम आहे? त्यात कमीपणा वाटतो काय?

सध्या मराठी उच्चवर्णीय मध्यम वर्गात अडकलेली आहे. मी स्वतः उत्तर प्रदेशात असताना हिंदी कवी संमेलने रात्र रात्र बसून ऐकली आहेत. फुक्कट. आजूबाजूला दाद देणारे सगळे कामगार वर्गातले होते, म्हणून ते कवी अर्सिदीज मधून हिंडतात आणि दुबई सारख्या ठिकाणी जाऊन कवी संमेलने करतात.

त्याकरिता अनेक आधुनिक विषय मराठीत लिहिले आणि वाचले जाण्याची गरज आहे. थोडक्यात, ... इत्यादि >>>
मी मध्ये स्पेस फ्लाईट वर एक कथा लिहिली होती. बराच अभ्यास करून लिहिली होती. ती इथेही होती. पण कुणी वाचली नाही. एका संपादकाने ह्यात फार टेक्निकल डीटेल्स आहेत असे कारण सांगून परत केली.
तेव्हा मी किती च्यु आहे त्याची बोचरी जाणीव झाली. आणि म्हणे मराठीत आधुनिक विषयावर लिहा. व्वा. छानच की.

चांगला लेख आहे. ह.पा., प्रतिसाद आवडला.
मी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर रहात आहे. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं आहे. कारण दुसरा पर्याय नाही. पण त्यांच्यासाठी वेळोवेळी मराठी पुस्तकं आणत गेलो. मोठ्या मुलाला वाचनाची आवड लागली आणि तो मराठी पुस्तकंही भरपूर वाचतो. घरात आम्हीही अर्थात मराठीतच बोलतो.
गेल्या काही वर्षांत काही नवीन अमराठी मित्रमैत्रिणी मिळाले, ज्यांच्याशी अनेक आवडीनिवडी जुळल्या. तेव्हा असं लक्षात येऊ लागलं की ज्यांचं वाचन चांगलं आहे, त्यांनाही मराठीमधले उत्तमोत्तम लेखक माहिती नसतात. मी अशा लोकांना आवर्जून मराठी लेखक, पुस्तकं, चित्रपट यांच्याबद्दल सांगत असते. मी मागे एकदा माबोवर कुठेतरी गाण्यांच्या कॉमन प्लेलिस्टबद्दल लिहिलं होतं. दहापंधरा जणांची ही यूट्यूब प्लेलिस्ट आहे. तिथे प्रत्येकजण आपल्या आवडीची गाणी add करतो. त्यात मी आवर्जून चांगली मराठी गाणी टाकते आणि ती गाणी इतरांना आवडल्याची पावतीही मला मिळते. अर्थात मलाही तमिळ, मल्याळम, बंगाली गाणी ऐकायला मिळतात आणि आवडतात.
मराठी पुस्तकांची हिंदी किंवा इंग्रजीत भाषांतरं कितपत झाली आहेत? ज्या पुस्तकांची झाली आहेत, त्यांची नावं ज्यांना माहिती असतील त्यांनी कृपया लिहिलीत तर एक यादी तयार होईल. मला जी माहिती आहेत ती मी वेळ मिळाला की लिहिते.

लेख वाचला नाही, मतावर प्रभाव पडू नये म्हणून प्रतिसाद लिहून झाल्यानंतर वाचणार आहे. Happy

भाषा संवादाचे माध्यम आहे. ती तेव्हांच मरते जेव्हां ती भाषा बोलणारे शिल्लक राहत नाहीत. भाषेत व्यवहार करणारे,गाणी म्हणणारे, कविता कथा लिहीणारे भाषेला समृद्ध करत नेतात. ब्राझिल मधे मॅन इन द होल या सांकेतिक नावाने प्रसिद्ध असलेला एका अनोळखी जमातीचा मनुष्य ऑगस्ट २०२२ मधे मरण पावला. त्याचे नावही जगाला ठाऊक नाही. त्याची संस्कृती, भाषा ही त्याच्या सोबतच लुप्त पावली. आज ही संस्कृती आणि भाषा याचा कुठलाच मागमूस राहिला नाही. मध्यंतरी भारतात सुद्धा या प्रकारची बातमी वाचली होती.
https://www.historynewsnetwork.org/article/last-speaker-of-ancient-langu...

https://www.bbc.com/future/article/20211014-the-man-who-found-indias-hid...

https://survivalinternational.org/articles/lastspeaker_andamanesesare

काही भाषा या आक्रमणांमुळे लुप्त होतात. आक्रमणकारी लोकांच्या सत्तेमुळे भाषेचे आक्रमण होते. संस्कृतीचेही होते. असे मानणारा एक गट आहे. तर विविध भाषेतले शब्द सामावून घेतल्याने भाषा समृद्ध होत जाते असे मानणारा दुसरा गट आहे. इंग्रजी जागतिक भाषा आहे. तिने जगातल्या अनेक भाषेतले शब्द घेतलेले आहेत. हे खरे असेल तर भाषाशुद्धीच्या आग्रहामुळं भाषेचा विस्तार होत नाही. ती आकुंचन पावत जाईल.
मराठी भाषा आणि बोली यावर कधीच बोलले जात नाही. मराठीच्या बोली या स्वतंत्र भाषाच आहेत असे मानणारे तसे मत उघडपणे मांड्त नाहीत. कदाचित त्याला विद्रोहाचा वास येत असेल.
बोली असो कि भाषा, महाराष्ट्रातल्या विविध बोली मिळून एक संस्कृती तयार होते जिची ओळख मराठी संस्कृती अशी आहे. मराठी भाषा जपलीच पाहीजे पण त्या बरोबर कोकणी, अहिराणी, खानदेशी ,खडी बोली अशा सर्व भाषा जपल्या पाहीजेत. किमान महाराष्ट्रात सर्वांना या बोलींची तोंडओळख शाळेच्या पातळीवर करून दिली पाहीजे.

आज हिंदी आणि इतर भाषेच्या बाबतीत हिंदी भाषिकांची जी विचारसरणी आहे तीच प्रमाण मराठीची आहे. हिंदी भाषकांना हिंदी आली तरी पुरेसं असतं. पण इतर भाषिकांना मातृभाषे सोबतच हिंदी ही जादाची भाषा शिकावी लागते. मराठी प्रमाण भाषा ही बोली भाषेवर आक्रमण करते हे अनेकांना पटणारे नाही. ग्रामीण मराठीतले अनेक शब्द आता ती भाषा बोलणार्‍या शहरी पिढीला माहिती नाहीत.

आपसातले सर्व व्यवहार फक्त मराठीतच करणारे लोक कष्टकरी आहेत कारण त्यांना दुसरी भाषा येत नाही. जे लोक मराठी शाळेत आपल्या मुलांना घालतात ते कनिष्ठ आर्थिक वर्गातून येतात. ज्यांना शक्य आहे ते सगळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात.

अर्थाजनाची माध्यमे बदलल्याने हे बदल थांबवता येणार नाहीत. जागतिक बदलांना सामोरे जाताना जगासोबत राहण्यासाठी जागतिक भाषा येणे गरजेचे आहे. मराठी भाषा जपण्याची चिंता याच वर्गातून केली जाते. मात्र ज्यांना दुसरा पर्यायच नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न नाही. कारण त्यांना मराठीतूनच बोलणे हा त्यांचा नाईलाज आहे.
मुलांना इंग्रजी बोलता आले तरच आपल्या मुलांची प्रगती होईल म्हणून आता पोटाला चिमटा घेऊन इंग्रजी शाळेत मुलांना घालण्याचे प्रयत्न होतात. त्यांच्या चित्रपटांनी आता १५०० कोटीचे बजेट गाठले आहे. चित्रपट हे भाषेचे प्रभावी माध्यम आहे. या भाषेतले चित्रपट आता हिंदीत डब होतात.
तर इंग्रजी सिनेमे भारतात प्रदर्शित होताना तमिळ, तेलगू आणि हिंदीत डब करतात पण मराठीत करत नाहीत. कारण मराठी प्रेक्षकाला हिंदी समजते हे गृहीत धरलेले आहे.
खरे तर मराठी भाषिकांची संख्या १२ कोटी आहे. जी तेलगू आणि तमिळ बोलणार्‍यांपेक्षा जास्त आहे.
चीनने स्वतःच्या भाषेत अर्थव्यवस्था दुसर्‍या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे. जपानने इंग्रजी भाषेचे स्तोम न माजवता जपानी मधे तंत्रज्ञान आणले. आज जपानी, कोरीयन आणि चिनी भाषा शिकल्या जातात. महाराष्ट्रात सुद्धा लोक या भाषा शिकतात. मुद्दामून हिंदी किंवा मराठी भाषा शिकल्या जातात का ?
या भाषा शिकून काय संधी आहेत ?

असे अनेक प्रश्न भिरभिरत राहतात. भाषा जपणे म्हणजे नेमकं काय हे खरंच सांगता येत नाही.
काय केले पाहीजे नेमके ?

मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. आता ती छोटा शिशु मध्ये आहे.प्रिस्कुल आणि नंतर इयत्ता चौथीपर्यंत पूर्ण मराठीमध्ये शिकणार आहे. पाचवीपासून सेमी इंग्लिश सुरू होईल.
असं असलं तरी चौथीपर्यंत त्यांना स्पोकन इंग्रजीचा सराव दिला जातो आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमधील बडबडगीते, देशभक्तीपर गीते शिकवली जातायत. तिला वाचन जमायला लागलंय. त्यामुळे सोप्या भाषेतील मराठी गोष्टींची पुस्तके आणून दिली आहेत आणि तिला ती खूप आवडतायत.
मुलांना मराठी किंवा इंग्रजी मिडीयम मध्ये शिकवताना त्यांना शिकवणारे शिक्षक ती भाषा grammatically correct बोलू आणि शिकवू शकतात का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घरीसुद्धा तीच भाषा बोलली गेली तर जास्त फायदेशीर ठरतं नाहीतर मुलं गोंधळून जातात.

हपा, छान प्रतिसाद.
चुका म्हणताना प्रमाण भाषेतील चुकाच अपेक्षित होते. आणि तुमच्या चुका सुधारण्याचा टोन कधीच खटकला नाही. उलट त्या संदर्भातील तुमच्या इतरांना लिहिलेल्या पोस्ट सुद्धा मी आवर्जून वाचतो. मुळात हे मायबोली पुरते असे नव्हतेच, मी फेसबुक वर देखील काही मित्रमैत्रिणींच्या वॉलवर बघतो की काही जण आपले मराठी कसे भारी आहे आणि समोरच्याने कशी मराठी भाषेची वाट लावली आहे हे दाखवायला त्याच्या चुका काढतात. तर चुका दाखवण्याचा हेतू हा नेहमी चुका सुधारणे हवे इतकेच म्हणायचे होते. आपण समोरच्या व्यक्तीच्या चुका सुधारून त्याच्यावर काही उपकार करतो आहे या ऐवजी आपण आपल्या भाषेसाठी करतोय असा विचार केला तरी झाले.

जितके शक्य आहेत तितके मोबाइल व डेस्कटॉप अ‍ॅप्स् आवर्जून मराठी भाषेत वापरतो. कस्टमर केअर वगैरे ठिकाणी फोनवर मराठीत बोलतो. त्यांना शक्य तिथे इमेल मराठीत लिहितो. महाराष्ट्रात आल्यावर सार्वजनिक ठिकाणी आवर्जून मराठीत बोलतो.

तेलंगणात राहून अनेक अमराठी जणांना मराठी संभाषण शिकवले आहे. (हैद्राबादेत अतेलुगु भाषकांपैकी सर्वाधिक मराठी भाषक आहेत).

- (बहुभाषिक) वामन राव

छान लिहिलं आहेस ऋ... मी पण जास्तीत जास्त मराठीचाच वापर करते बोलताना. मध्यंतरी मुलाच्या मुलाला एक सुरवंट आणला होता खेळण्यातला. त्याला शिकवत होते " ह्याला काय म्हणायचं ? , सुरवंट असं . " काही वेळाने त्याची बाळगी (हा शब्द मुलं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी कोकणात आम्ही वापरतो ) त्याला सांगत होती, " हे काय आहे, कॅटरपिलर " हाहा
मी चिन्मयी, तुम्ही मुलीला मराठी माध्यमात घातलं आहे ह्या साठी तुमचं खूप कौतुक आणि शुभेच्छा... म्हणजे आमची मुलं मराठी माध्यमातूनच शिकली पण आता एवढ्या वर्षात मराठी शाळेचा सामाजिक स्तर खूपच खालावला आहे . तरी ही तुम्ही हे धाडस केलत म्हणून तुमचं कौतुक.

छान लेख. बराच विचार करुन लिहिला आहेस.
मराठी वापरतो. इंग्रजी शब्दांना शक्य असेल तोवर बोजड नसलेले मराठी प्रतिशब्द आहेत का ते आठवून वापरायचा प्रयत्न करतो.

मनीमोहर, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आमची पिढी ज्या मराठी शाळांमध्ये शिकली आहे, त्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. काही खाजगी सुद्धा होत्या. पण नशिबाने शिक्षक खूप चांगले होते आणि शिक्षकांकडे शिकवण्यासाठी वेळ होता. आता जि.प. शाळा ओस पडण्यामागे सरकारी गाढव कामांचा खूप मोठा हात आहे. हजार प्रकारचे फॉर्म्स भरायचे, मिटिंग्जना जायचं, निवडणूकांची कामं, दारोदार फिरून हजार प्रकारची माहिती गोळा करायची कामं करण्यात शिक्षकांचा बराच वेळ जातो. शिकवणे हे दुय्यम काम झाले आहे. त्यातून शिक्षकांचा इंटरेस्ट निघून गेला तर काही नवल नाही.
मुलीसाठी शाळा खूप विचार करून निवडली आहे आम्ही. विद्याभारती संस्थेची शाळा आहे. शिकवण्याची पद्धत वेगळी आणि चांगली आहे.
आणि हो, वाचनासोबतच मराठी गाण्यांचीही आवड निर्माण होऊ शकते मुलांमध्ये. आमच्याकडे ऑटिझममुळे स्क्रीन टाईम शून्य आहे. पण ऐकायला गाणी सुरुच असतात. बडबडगीतांसोबत इतर गाणीही आवडतात तिला. सध्या शेकी-शेकी, निशाणा तुला दिसला ना, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रिपिट मोडवर सुरू आहेत. Happy

ता.क. आपण अभिमानाने मराठीमध्ये बोललो तरी पुरेसे आहे. भाषा आहे तशीच आणि तिथेच आहे. आपणच धडपडत सुटलोय. आणि यासाठी दुसऱ्या भाषांबद्दल तिरस्कार असण्याची गरज नाही.

चांगला लेख. आवडता विषय.
मुद्दे चांगले मांडले आहेत.
माझ्या बाबतीतील काही गोष्टी:
मराठी पुस्तक वाचन आणि खरेदी. मराठी ग्रंथप्रदर्शनांना भेट, मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती.
मराठी वाचनालय लावले आहे. घरी मराठी वृत्तपत्र.
ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त लेखन फक्त मराठीत.
काही व्हॉट्सॲप ग्रुपवर फक्त मराठीत लेखन.
ऑफिसमधील अमराठी लोकांशी मराठीतून संवाद.
मराठीत सशक्त बालसाहित्य अजून निर्माण व्हायला हवे आहे. बरेचसे बालसाहित्य जुनं आहे. माधवी पुरंदरे यांची पुस्तके छान आहेत.

छान लेख ऋन्मेष.

करत असलेल्या गोष्टी -
मराठी वर्तमानपत्र छापील आणि ऑनलाईन वाचणे
दुकानदार, बँक, सरकारी कार्यालय, हॉटेल, कॅब, रिक्षा सगळीकडे मराठीतून संभाषणाला सुरुवात करून समोरच्याला मोडकितोडकी येत असेल तरी मराठीतच बोलणे
कस्टमर केअरला मराठी पर्याय निवडणे
मराठी चित्रपट, नाटक, बघणे, मराठी पुस्तकं वाचणे
योग्य आणि सोपे मराठी शब्द असताना उगाच इंग्रजी किंवा हिंदी शब्द न वापरणे
Eat कर, take ना, ती sleep करत होती अशा फुटकळ वाक्यरचना ऐकल्या तर म्हणजे काय विचारणे आणि नाही कळलं म्हणणे

आज मराठी अस्तित्त्वाची लढाई लढत आहे. लढाई म्हटली की प्रतिस्पर्धी आलाच. सध्या सर्वात मोठा प्रतिस्पर्धी हिंदी आहे. "भाषा तोडनेका नही, जोडनेका साधन है" वगैरे भूलथापांनी काही होणार नाही. मराठी आणि हिंदीपैकी जी बाजू जास्त असहिष्णु ती जिंकणार.
"महाराष्ट्रातील अमराठी लोकांनी मराठी बोलल्याशिवाय मराठी भाषेला भवितव्य नाही" - हे वाक्य नीट लक्षात घ्या. ती एक अकॅडेमिक किंवा ritualistic भाषा बनून राहील. मराठी लोकांनी मराठी बोलण्यासाठी सुद्धा अमराठी लोकांनी मराठी बोलणं महत्त्वाचं आहे.
आज मायग्रेशन इतकं झालं आहे की १००% मराठी लोक एका ग्रूपमध्ये हे जवळजवळ दिसत नाहीच. अगदी कुटुंबामध्ये सुद्धा अमराठी सून, जावई वगैरे आहेत. थिअरी ऑफ इंटॉलरन्ट मायनॉरिटी नुसार ग्रुपमधला दहा पैकी एक जण जरी म्हणाला की मला मराठी येतच नाही, हिंदी मी बोलो, तर सर्व संभाषण हिंदीत होतं. अशाच प्रकारे मराठी लोकांनी सहिष्णुता दाखवून हिंदी लादून घेतली आहे. पुढच्या मराठी पिढीला तर म्हणून मराठी ऐवजी हिंदी सोयीस्कर वाटते. ही मराठीचं अस्तित्त्व संपण्याकडेच वाटचाल आहे.
एक अत्यंत केविलवाणं दृश्य म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांना एखाद्या अमराठी माणसाला थोबाडीत मारतानासुद्धा त्याच्याशी हिंदीत बोलावं लागतं. आम्हाला मराठी येत नाही म्हणजे नाहीच ही भूमिका अमराठी लोक जितक्या obviously घेतात त्याच्या त्याच्या १०% सुद्धा मराठी माणसं "आम्हाला हिंदी येत नाही म्हणजे नाहीच. आमच्याशी मराठीत बोला" अशी भूमिका घेत नाही. उलट मोडकं तोडकं हिंदी सहज बोलतात.
उदाहरण द्यायचं झालं तर मुसलमान हे अल्पसंख्य आहेत. पण हलाल सर्टिफिकेशन नसेल तर आम्ही माल घेणार नाही. त्यासाठी लागलं तर दहा मिनिटं चालून दुसऱ्या दुकानात जाऊ. अशी भूमिका त्यांनी घेतली. दुसऱ्या बाजूला हिंदू बहुसंख्य आहेत. पण आम्हाला हलाल किंवा नॉन-हलाल काहीही चालेल अशी त्यांची भूमिका असेल, तर दुकानदार साहजिकच हलाल मालच ठेवेल. नॉन-हलाल मालाचं अस्तित्त्व बाजारातून पुसलं जाईल. हे केवळ एक उदाहरण आहे. हलाल हा सर्वस्वी वेगळा विषय आहे.
ऋन्मेष ला दोष देण्याचा अजिबात हेतू नाही. उलट धागा काढल्याबद्दल आणि तो मराठीसाठी जे करत आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन. पण त्याचा हा प्रश्न हे मराठी समाजाला अजून समस्या नीट कळलीच नाही ह्याचं द्योतक आहे.
">>@ केशवकूल>>>तसेच जर दुय्यम भाषेचा पर्याय असेल तर हिंदी सोडून कुठलीही भाषा नोंदवा.>>>> याने मराठीचा फायदा काय हे कळले नाही."
केशवकूल ह्यांची क्षमा मागून मी उत्तर देण्याचा भोचकपणा करतो.
उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी ६०% मराठी + ४०% अमराठी जनता असेल, आणि सर्व्हे मधले प्रतिसाद असे असतील :
मराठी लोक: ५०% - मराठी + हिंदी . १०% - मराठी + अ-हिंदी भाषा (किंवा फक्त मराठी)
अमराठी लोक: १०% - हिंदी + मराठी. ३०% - हिंदी + अ-मराठी भाषा (किंवा फक्त हिंदी)
एकूण: ७०% लोकांना मराठी येते. ९०% लोकांना हिंदी येते.
मराठी लोक बहुसंख्य असून सुद्धा हिंदी मराठीला मागे सारून सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरते ह्याचं कारण बहुतेक मराठी लोक हिंदी येते म्हणून सांगतात. ह्या सर्वेंचा आधार घेऊन सरकारला हिंदी लादायला आयतंच कोलीत मिळतं.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आकडे थोडे वेगळे असतील पण हिंदीला निदान दुसरी अधिकृत भाषा म्हणून जाहीर करण्याकडे वाटचाल चालू आहे. प्रवास असा असेल: फक्त मराठी -> मराठी + हिंदीसुद्धा -> हिंदी+ मराठीसुद्धा -> फक्त हिंदी
थोडक्यात,मराठी लोकांनी "गर्व से कहो हमें हिंदी नाही आती" असं म्हणण्याची गरज आहे Happy

अजबराव ओके. आले लक्षात. म्हणजे अंदाज होताच. अश्या सर्व्हेमध्ये मराठीला स्पष्ट बहुमत मिळेल याची काळजी घेऊ शकतो.
दुसरी कुठली भाषा निवडताना हिंदी सोबत गुजराती सुद्धा टाळलेले बरे. ते ही मग उगाच कोणाला निमित्त मिळायला नको आणि मराठीचा हक्क मारला जायला नको. अन्यथा कुठल्याही भाषेवर किंवा भाषिकांवर कसला राग किंवा आकस नाही.

मी मालवणजवळच्या एका छोट्या कमी विकसित गावात राहतो. इथला अनुभव असा की
१. बहुतांश जनतेला हिंदी देखील समजत नाही. बोलता येणे वेगळे. मुलांना लोक मराठी माध्यमातच शाळेत घालतात.
२. लोकसंख्या कमी होते आहे. मग गावातल्या ५वी पर्यंतच्या शाळेत मुले कमी आहेत. पटसंख्या कमी म्हणून शिक्षकसंख्या कमी. ५ वर्गांना केवळ २ शिक्षक्/शिक्षिका आहेत. कमी पटसंख्येमुळे आजूबाजूच्या शाळा बंद पडताहेत.
३. यावर उपाय असा दिसतो आहे की ऑनलाईन शाळा काढणे. सुरुवातीला ए आय शिक्षक वापरले तरी चालण्यासारखे आहे. उत्कृष्ट दर्जा ठेवून ही मराठी ऑनलाईन शाळा जगातल्याकोणत्याही विभागात, दुर्गम आदिवासी पाड्यात चालवता येईल. अख्खी शाळा उभारण्यापेक्षा अगदी एकेका झोपडीत काय, पडवीत देखील शाळातला एक वर्ग चालविता येईल.
४. मुलांचे सामाजिक कौशल्य अर्थात सोशल स्किल वाढण्यासाठी महिन्यातून काही दिवस जिल्हा ठिकाणच्या शाळेत मुलांना बसवता येईल.
५. पटसंख्या कमी होत जाणारच आहे. कमी पटसंख्या असल्यास मुलांनी शाळेत येण्या ऐवजी शाळा विद्यार्थ्यांच्या घरी जावी लागेल. एका विद्यार्थ्याच्या घरी दोनतीन, पाच दहा मुले जमली तरी एक वर्ग चालू शकतो. आणि इन्स्टॉलेशनचा खर्च परवडू शकतो. दहा मुलांच्या घरी दहा वर्ग भरवून शाळा चालू शकेल. सगळे वर्ग एकाच गावात नसले तरी जवळच्या दोनतीन गावात मिळून दहा वर्ग भरू शकतात.
६. दर्जा उत्कृष्ट राखल्यास मुले दूरच्या शाळेत जाणार नाहीत.
७. मालवणसारख्या छोट्या गाववजा शहरात मराठीतर भाषीक दुकानदार मालवणीत बोलतात. इतर जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ठाऊक नाही. पिंपरी चिंचवडमध्ये बहुतेक दुकानदार मराठीच बोलतात.

असो लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

मी मागेही लिहिले होते. आता पुन्हा लिहितो.
ह्या सरकारणे मुद्दामहून ही काडी टाकली आहे. खरी गरज आहे ती गणित आणि सायन्स ह्यावर विचार करण्याची. चौथ्या इयत्तेतील मुला मुलींना हाच्चा घेऊन बेरीज वजाबाकी करता येत नाही असे एका सर्केक्षणात आढळले आहे. त्या कडे कोण लक्ष देणार.

Pages