सुखाच्या हिंदोळ्यावर..

Submitted by शिवानी बलकुंदी on 4 August, 2025 - 06:38

“मावशी, तू घरी आहेस का? मी आज तुझ्याकडे जेवायला येतो आहे,” किंवा “मावशी तू माझ्या सोबत शॉपींग ला चल न, तुझी चॉईस आई पेक्षा चांगली आहे.” किंवा “आई, तुला मावशी सारखा चिवडा करताच येत नाही.” अशी हक्क गाजवणारी, कौतुक करणारी भाचे मंडळी असणे हे माझे भाग्यच आहे असं मला कायम वाटत आले आहे.
कारण भाचे, भाचरे, भाचरं अशा नात्यातील लोक मला खूप प्रिय आहेत. त्यांच्या सोबत बोलणं, वेळ घालवणं, एक ना अनेक कारणं आहेत. भावाची किंवा बहीणींची मुले असली की आपण त्यांचे मावशी किंवा आत्या असंतो. ही मंडळी लहान असताना आपल्या कडून हक्काने लाड करून घेतात, त्यांना आपल्या हाताने भरवणे, न्हाऊ घालणे, त्यांच्याशी घोडा घोडा खेळणे, आणि त्यांच्या आई वडीलांची शिस्त धाब्यावर बसवुन त्यांचे अती लाड करण्यात काही वेगळेच सुख आहे. त्यामुळे कधी तर आपली मुले पण थोडी नाराज होऊन तू माझ्या पेक्षा तिचेच्/ त्याचेच जास्त लाड करते असं म्हणत असतात. शिवाय आपल्या मूलांमधे आणि भाच्यांमधे जर कधी भांडण झालेच तर चुकूनही आपल्या मूलांसमोर भाच्यांची बाजू घेता येत नाही. आणि तरिही या सगळ्या गोष्टीं कडे लक्ष न देता आपण आपले मावशी किंवा आत्या असण्याचे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत राहातो.
माहेरी गेल्यावर तर या भाचे मंडळीं मुळे आपले दिवस कसे जातात कळतच नाही. त्यांच्या सोबत फिरायला जाणे, त्यांना बगीच्यात घेऊन जाणे, त्यांच्या सोबत भेळ पाणीपुरी खाणे, सिनेमा बघायला जाणे. आणि हे सगळे करत असताना कुणी हट्ट, करतयं तर कुणी भोंगा वाजवत आहे. आणि त्यासाठी आपल्या मूलांना आपण जसे रागावतो तसेच आपण भाच्यांना पण रागाऊ शकतो, किंवा वेळ प्रसंगी रट्टा पण देऊ शकतो. हे आताच्या आई बाबांना कदाचित अजिबात आवडणार नाही. पण असे हक्काने रागावण्याचे कर्तव्य मामा, मावशी चोख बजावित असत.
ही भाचे मंडळी जस जशी मोठी होत असतात त्यावेळी तर हा आनंद वाढतच जातो. कारण आपली मुले मोठी करताना जी जवाबदारी आपल्याला पूर्ण करावी लागते तसे काही इथे करावे लागत नाही. शिवाय भाच्यांना त्यांच्या लहानपणी चे कीस्से रंगवूंन सांगताना खूप धम्माल येत असते. सगळे सोबत असताना असे कीस्से खूपच हसवतात. तर अशी गप्पांची मैफल अधून मधून किंवा नेहमीच भरतच असते.
मोठ्या झालेल्या भाचरांशी बोलणे, गप्पा मारणे, त्यांचे वाढदिवस साजरे करणे हे माझ्या मते सुख या कॅटेगरी मधे येतं असावं. एकतर बोलण्यासाठी कुठल्याही विषयाचं बंधंन नसतं, आणि नव्या काळामधे, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांची खूप मदत ही होते, शिवाय आपली मुले आपले म्हणणे ऐकून घेत नाही ही खंत भाचे मंडळी च्या मुळे कमी होते कारण ही मुले आपल्या मावशीचे, मामाचे म्हणणे मात्र खूप प्रामाणिक पणे ऐकत असतात. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना आपणही आपले वय विसरून लहान होत असतो, लाडक्या भाच्यांना अधून मधून छोटे छोटे गिफ्ट्स दिले तरी पुरेसे असतात, खूप काही महाग भेट वस्तु देण्या ची अजिबात गरज नसते. बस प्यार के दो बोल ही काफी है.
आताच्या हम दो हमारा बस एक ही च्या काळात हीच भाचे मंडळी आपल्या मुलांचे भावंड असतात. त्यामुळे त्यांनाही सख्खे भाऊबहीण नसले तरिही किमान भावंड असल्याचे सुख या मावस, मामे आणि चूलत भावंडांमुळे कायम मिळते.
अशा चार भाच्यांची श्रीमंती अनुभवत सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेण्याचे मला भाग्य लाभले आहे. हे सुख मला कायमच लाभावे यासाठी माझ्या भाच्यांना नेहमी सुखात ठेव अशी मी परमेश्वरा कडे प्रार्थना करते.
#सुरपाखरू #भाचे #मावशी
शिवानी बलकुंदी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो मी घरात सगळ्यात लहान म्हणजे 5 नंबर. टोटल 8 भाचे भाची भावाचे पकडून फक्त दोनच भाच्या बाकी सगळी मुलं. मुलींच्या मानाने मुलं खूप हट्ट करतात. But सगळं एंजॉय केलंय खूप आणि करते आहे.

मस्त! खरं आहे आणि अगदी. मी माझ्या दोन भाच्यांची बालपणं जवळून अनुभवली आहेत. प्रेम, लाड तर केलेच, पण वेळप्रसंगी त्यांना रागावलेही आहे. आता जाणवतं की इतर दोन भाच्यांपेक्षा या दोघींशी मी लवकर 'कनेक्ट' होऊ शकते, जरी मधल्या अनेक वर्षांमध्ये खूप सहवास मिळाला नसला तरी.
तसंच, माझ्या लहानपणी माझ्या आत्या आणि आतेभावंडं उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे यायची. तेव्हा जी काही मौजमजा केली तो आमच्या आयुष्यातला कायमचा आनंदाचा ठेवा आहे. दरवर्षी घडणाऱ्या या आनंदाच्या सहवासामुळे दोन्ही पिढ्यांमधले आम्ही सगळे एकमेकांना कायमचे जोडले गेलो आहोत. Happy

अरे मस्त लिहिले आहे
आणि एकूण एक वाक्यांना +७८६ झाले
मी कोणाची मावशी नाहीये किंवा माझ्या नशीबात अश्या प्रकारची मावशी नव्हती.
पण मुलांना आणि त्यांच्या मावश्यांना हे सुख पुरेपूर अनुभवताना बघतो.
एक सोडून दोन दोन मावश्या, त्या सुद्धा अविवाहीत, हवे तेव्हा वेळ देणार्‍या, सेविंगच्या भानगडीत न पडता आपला अर्धा पगार पोरांवर खर्च करणार्‍या, ईतर सारे जग एकीकडे गेले तरी पोरांचीच बाजू घेणार्‍या वगैरे वगैरे.... त्यामुळे मला सुद्धा बरेचदा कॉम्लेक्स देणार्‍या.. पण शेवटी आपल्याच पोरांचे नशीब चांगले जे त्यांना अश्या मावश्या मिळाल्या असे वाटणार्‍या..