तिने फक्त वहायचे . . . आपण फक्त पहायचे

Submitted by Narmade Har on 30 July, 2025 - 06:28

नर्मदा माई . . . .तिच्या प्रत्येक वळणावर ती काही ना काही आपल्याला शिकवत असते . मी नर्मदा मातेच्या काठावर बसून तिचा प्रवाह तासन्तास पहात बसायचो ! ती जणू काही मला आयुष्य कसे जगायचे तेच शिकवायची !
अतिशय अल्प साठा जन्माला घेऊन आलेला आपला जीव असतो . शारीरिक बळ अल्प असते , बुद्धी अल्प असते , सारेच कमी असते . नर्मदा मातेचा उगमही असाच करंगळी भर जाडीच्या धारेतून होतो .
हळूहळू वाटेत येणाऱ्या ओढ्यांना नाल्यांना नद्यांना ती समाविष्ट करून घेत घेत पुढे वाहत राहते . आपणही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्वच बऱ्या वाईट लोकांचा स्वीकार करत आयुष्य जगायचे असते . उगमाजवळ तिचे रूप अवखळ असते . आपलेही ही बालपण असेच निर्मळ , अवखळ व सुंदर असावे ! आपले बालपण तसे गेले नसेल कदाचित ,तरी किमान आपल्या सहवासातील लहान मुलांचे बालपण आपण हिरावून घेतले नाही पाहिजे ! बाल नर्मदा मातेसारखे ते निखळ आनंदी आणि उत्साही राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे .
जसजसा नर्मदा मातेचा प्रवाह मोठा होत जातो तस तशी ती शांत धीर गंभीर आणि स्थिर होत जाते . आपणही जाणिवा जागृत झाल्यावर आपले आयुष्य असेच शांत , धीरोदात्तपणे जगायला शिकले पाहिजे .
नदीच्या वाटेमध्ये चढ-उतार येत राहतात . त्यांना न घाबरता किंवा मध्ये आडव्या येणाऱ्या अडथळ्यांना न बिचकता ती प्रवाह बदलून वाहत राहते . आपणही आयुष्यामध्ये आलेल्या संकटांच्या पहाडांना न घाबरता त्यामुळे न डगमगता योग्य मार्ग काढून आयुष्याची वाटचाल चालू ठेवली पाहिजे .
कधी कधी अचानक जमिनीची पातळी खालावते . इतकी खालावते की नर्मदा मातेला त्वेषाने खाली झेप घ्यावी लागते . इथे तिचे रूप इतके भयंकर असते की समोरच्या पहाडांनादेखील ती उभी चिरून टाकते ! आपल्या आयुष्यात आपल्या शांततेचा भंग करणारा असा एखादा नीच प्रसंग आला तर शांतता सोडून देऊन अतिशय त्वेषाने त्या संकटावर तुटून पडायला नर्मदा मैया आपल्याला शिकवते ! यावेळी आपल्याला प्राप्त झालेली गती इतकी भयानक असते की समोरचे संकट क्षणात घाबरून पळून जाते . संकटांचे पहाड देखील चक्काचूर होतात . त्यानंतर मात्र जणू काही झालेच नव्हते अशा पद्धतीने नर्मदामाता शांत होते परंतु तिथेच न थांबता अतिशय गतीने पुढे प्रवाहित होते . आपणही आपली पातळी सोडून खाली आल्यावर फार काळ तिथेच न थांबता वेगाने पुढील मार्गक्रमणा करावी हे श्रेयस्कर असते .
थोडे अंतर गेल्यावर आपल्याला असा प्रश्न पडतो की हीच का ती नर्मदा मैया जी थोड्या वेळापूर्वी इतकी खवळलेली होती ? आपले वर्तनही इतके शांत आणि उदात्त असावे की लोकांना प्रश्न पडला पाहिजे की मगाशी प्रचंड खवळलेला मनुष्य हाच होता का ? कारण ते आपले मूळ स्वरूप आहे ! चिडणे , रागावणे ,चवताळणे ही पातळी सोडून वागणाऱ्यांसाठी दिलेली एक क्षणिक प्रतिक्रिया असू शकते . तो आपला स्थायी भाव नाही .
मध्येच कोणीतरी नर्मदा मातेला बांध घालून अडवते . ती त्याला विरोध करत नाही . तर ती आपले कार्य अधिक जोमाने आजूबाजूला सुरू करते ! आपला साठा वाढवते ! आपली क्षमता वाढवते ! आपली उपयुक्तता वाढवते ! आपला प्रत्येक थेंब अधिकाधिक लांब कसा पोहोचेल याची काळजी घेऊ लागते ! तिची खोली अधिकच वाढत जाते ! तिच्यातील गाळ शांत होत जातो आणि पाणी अधिक शुद्ध होते . आणि मग अडविणाऱ्यांना लक्षात येते की आता हिला अधिक काळ अडवून चालणार नाही ! त्यामुळे तिच्यातील परम शुद्ध झालेला जलसाठा पुढे सोडला जातो . पुन्हा ती आपल्या मूळ स्वरूपात येते ! आपणही आयुष्यामध्ये अडवणूक करणाऱ्या माणसांना अशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे ! कोणी आपली अडवणूक केली म्हणून दुःखी न होता आपले कार्य चालू ठेवले पाहिजे . उलट अधिक जोमाने ,अधिक ताकतीने , अधिक खोलीने कार्य केले पाहिजे . एका जागी बसून राहण्याची वेळ आली तर हताश , निराश न होता आपल्या ज्ञानाची खोली अधिकाधिक कशी वाढेल यावरती काम केले पाहिजे .आपली शक्ती वाढवली पाहिजे . युक्ती वाढवली पाहिजे . एकदा आपले सामर्थ्य वाढले की फार काळ कोणीही आपल्याला अडवू शकत नाही . उलट या अडवणुकी मुळे आपले सामर्थ्य अधिक वाढलेले असते आणि आपली उपयुक्तता देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असते .
नर्मदा माता वळणे घेत वाहते तेव्हा तिला दोन किनारे असतात . एक किनारा तो असतो जो तिच्या प्रवाहाला कधीच विरोध करत नाही . आणि एक किनारा तो असतो जो तिच्यापुढे भिंत म्हणून आडवीत उभा असतो ! तिला विरोध न करणाऱ्या किनाऱ्याला ती भरभरून दान देते ! उथळ पाणी ! प्रचंड वाळू ! सुंदर सुंदर रत्ने , शिवलिंगे ! सारं काही भरभरून देते ! परंतु अडवणूक करणाऱ्या किनाऱ्याला मात्र अशी काही खाऊन टाकते की दरवर्षी तो मागे मागे मागे सरकत राहतो ! अशा किनाऱ्यांची कित्येक फूट माती मैया दरवर्षी तिच्या सोबत वाहून नेते .
आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला सहकार्य करतात त्यांना आपण असेच सहाय्यभूत झाले पाहिजे . परंतु जे लोक सतत आणि विनाकारण तुमच्या सरळ आणि सज्जन वागण्याला विरोध करतात त्यांना आपल्या सामर्थ्याने मागे मागे सरकायला भाग पाडले पाहिजे . त्यांचे नुकसान होत असेल तर फारशी पर्वा केली नाही पाहिजे . कारण तसेही ते तुमच्या शांततेचा भंग करण्यासाठी खोडा घालत असतात . असे लोक भले प्रवाह पतीत झाले तरी फारशी चिंता केली नाही पाहिजे . कधीतरी अचानक नर्मदा मातेचा प्रवाह इतका खोल होतो इतका शांत होतो की असे वाटते की हा थांबलेला आहे . आयुष्यामध्ये असेच खोल ज्ञान प्राप्त झाल्यावर पूर्णपणे स्थिर राहत आले पाहिजे . उथळ पाण्याला खळखळाट फार . परंतु खोलीचे गांभीर्य वेगळे आहे . नर्मदा मातेच्या मधोमध खोल प्रवाह वाहतो तो अक्षरशः पृष्ठभागावर देखील दिसतो . त्या भागातले पाणी सदैव शांत असते . आपलेही ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचे स्वरूप असेच शांत आणि धीरोदात्त असले पाहिजे .
नर्मदा माता तिच्या पोटामध्ये अनेक जलचरांना सांभाळते अनेक प्राणी पक्षी तिच्या पाण्यावर जगतात अनेक झाडे पिके तिच्या सिंचनावर आयुष्य वाचवितात वाढवितात आणि इतरांना भरभरून दान देतात . आपलेही आयुष्य असेच असावे ! आपल्यामुळे अनेक लोकांचे कल्याण व्हावे . आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला काही ना काही नक्की मिळावे . कोणीही आपल्या सहवासातून विन्मुख जाऊ नये .
नर्मदा मातेचे कालवे खूप लांबपर्यंत जातात आणि पाणी पोहोचवतात .आपल्या नित्य मार्गापेक्षा दूरवर जाऊन आपले कार्य पोहोचविता आलेच पाहिजे . आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना न होता आपल्यापेक्षा अतिशय लांब असलेल्या आणि कधीही न पाहिलेला लोकांना देखील तो व्हावा ! नर्मदे किनारी असे काही भाग आहेत की जिथे कोणीही जाऊ शकत नाही ! कधीही जाऊ शकत नाही ! आपल्याही आयुष्यातील काही भाग असा असावा की जो फक्त आपल्याला माहिती आहे ! आपले ते स्वरूप , आपली ती धारणा फक्त आणि फक्त आपली असावी ! तिथे अन्य कोणालाही प्रवेशच नसावा !
नर्मदा मातेवर अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत . आपल्याही ज्ञानाचा उपयोग विविध प्रकारे आणि विविध माध्यमातून समाजासाठी करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असावे . जिथे प्रत्यक्ष पाणी जात नाही तिथे नर्मदा जला पासून तयार झालेली वीज मात्र जाते . पाण्यापासून वीज तयार होते आणि ती वीज जिथे कुठे जाईल तिथे पुन्हा पाणी उपसायला मदत करते . तसेच जिथे आपण प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही तिथे आपले विचार मिळेल त्या माध्यमातून पोहोचवायला काय हरकत आहे !आणि त्यासाठी विजे सारखे साधन नाही मित्रांनो ! जिथे जिथे वीज आहे अर्थात चेतना आहे तिथे तिथे ज्ञान आहे ! मोबाईल असो , लॅपटॉप असो ,आयपॅड असो , आयफोन असो किंवा कॉम्प्युटर असो . त्याची चेतना बॅटरी मध्ये साठलेल्या विजे मुळेच आहे . जेव्हा आपण काहीतरी वाचत असतो तेव्हा मूळ लिखाणाचे ते विद्युत रुपांतर केलेले असते . आणि आपल्यापर्यंत प्रवाहित होऊन पुन्हा एकदा त्याचे रूपांतर लिखाणामध्ये केले जाते आणि आपण वाचतो ! नर्मदा माता अनेक नद्यांना सामावून घेते . आणि अशा संगमांना अपरंपार महत्त्व आहे . आपल्या आयुष्यात कोणीतरी सामर्थ्यवान व्यक्ती येऊन मिळाली तर ती मैत्री फार महत्त्वाची मानली पाहिजे ! कारण त्यामुळे आपली शक्ती वाढत असते ! आपली बुद्धी वाढत असते ! आपली ओळख अधिक मोठी होत असते ! नर्मदामाईच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत . त्या सर्वांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करत ती वाहते . आपल्याही आयुष्यात असे अनेक पडाव येतात . त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञ राहत आपण आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे . नर्मदा मातेमध्ये कोणी फुले सोडतात , कोणी दिवे तर कोणी मेलेली जनावरे . परंतु ती मात्र सर्वांना सारखेच शुद्ध जल प्रदान करते . आपल्या आयुष्यात काही माणसे आपल्याला मदत करतात .काही माणसे आपल्याला चांगले काहीतरी देतात . तर काही माणसे अतिशय वाईट अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात .परंतु तरी देखील आपण या सर्वांना आपले शुद्ध ज्ञान तितकेच दिले पाहिजे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग प्रत्येकाला झाला पाहिजे ,असेच आपले वर्तन असले पाहिजे . त्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच नाही . नर्मदा मातेवर कुठल्याही प्रकारचे हातपाय न मारता जो पडून राहतो त्याला ती तारते बुडवत नाही . किंवा जो प्रचंड हातपाय मारतो त्याला देखील तारते बुडू देत नाही . अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याशी अनन्य पणे वागणारे जे कोणी असतील त्यांना आपण सांभाळले पाहिजे . ज्यांना हात पाय देखील आपल्या इच्छेने हलवता येत नाहीत अशा लहान थोर व्यक्तींना आपला आधार कायम राहिला पाहिजे . या उलट जे सतत प्रयत्नशील आहेत कष्टाळू आहेत अशांना देखील आपण योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे . अशी माणसे आपल्यामुळे बुडणार नाहीत ही आपली जबाबदारी आहे . महापुरामध्ये नर्मदेच्या काठावर ती काहीही शिल्लक ठेवत नाही ! आपलेही रौद्र रूप असेच असले पाहिजे ! त्याची भयानकता आणि दाहकता बघून आपल्या शांत रूपाचा अतिशय गौरव सर्वांनीच कायमच केला पाहिजे , इतके ते रौद्र रूप महाप्रचंड , महाविक्राळ , महाभयानक असावे ! अशी सर्व मार्गक्रमणा केल्यावर अतिप्रचंड ,अतिविस्तीर्ण पात्र धारण करून नर्मदा मैया शांतपणे समुद्राच्या पोटामध्ये लुप्त होऊन जाते . अशी लुप्त होते की पुन्हा तिच्या थेंबाचा एक कणही सापडत नाही . आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता देखील अशीच असावी ! अतिशय विस्तृत स्वरूपात भव्य दिव्य कार्य उभे राहिल्यावर जणूकाही माझे अस्तित्व शून्यच आहे याची जाणीव अंतर्यामी बाळगत आपण हळूच एक दिवस या जगाचा रामराम घ्यावा ! आपण जन्माला आलो तेव्हा जी स्थिती होती अगदी त्याच निष्कपट , निष्पाप स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वस्व जावे . आणि पुन्हा आपले अस्तित्व कोठेही दिसणार नाही अशा रीतीने शांतपणे या जगाच्या पसऱ्यातून हळूच लुप्त व्हावे . पुन्हा नव्याने उगम पावण्यासाठी ! कारण नर्मदा मैय्या काय आणि आत्मस्वरूप काय , अनादि , अनंत आहे . लक्ष देऊन पहिल्याशिवाय अनाकलनीय आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात अलक्ष्यासी लक्षी असा कोण आहे ? ते अलक्ष्य आत्मतत्व लक्ष्य अर्थात आपल्या साठी सहजसाध्य , सहजगम्य , सहजप्राप्य करणारी नर्मदा माता आहे . जे लक्षात येत नाही ते लक्षात आणून देतो तो गुरु . आणि जे लक्ष्य नाही त्याचा वेध घ्यायला शिकवतो तो सद्गुरु ! आपल्या कळत नकळत नर्मदा मैया आपल्यावरती खूप काम करते . आपल्याला घडवते . ते आईचे काळीज आहे . पालथं पडलेल्याला उताणं व्हायला शिकवते . उताणं पडलेल्याला कुस बदलायला शिकवते . कूस बदलणे जमलेल्या बालकाला रांगायला शिकवते . राहणाऱ्या बालकाला स्वतःच्या पायावर उभे करते . स्वतःच्या पायावर उभे राहू शकणाऱ्या बालकाला पहिले पाऊल टाकायला शिकवते . एक पाऊल टाकू शकेल अशा बालकाला चालायला शिकवते . चालणाऱ्या बालकाला धावायला शिकवते . आणि धावणाऱ्या बालकाला थांबायला शिकवते ! तिचे कुठले बालक कुठल्या इयत्तेमध्ये आहे हे तिला चांगले ठाऊक असते . त्यामुळे इथे कोणीही कुणाला आपले गुण सांगू नयेत ! इथे प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि त्याला मिळणारे गुण देखील वेगळे आहेत ! इथल्या परीक्षेमध्ये कोणीच नापास नाही ! इथला अभ्यासक्रमच वेगळा आहे ! सगळेच पास ! काठावर पास ! कारण परीक्षा देणारा तिच्या काठावर उभा असतो ! आणि परीक्षा देणारे पुरवण्यावर पुरवण्या जोडत असतात ! कारण तुम्हाला जे हवे ते इथे पुरविले जाते ! पुरविणारे हात असंख्य असतात! इथल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यानुसार बदलतात . जया मनी जैसा भाव ,तया तैसा अनुभव ! तिला काही फरक पडत नाही कारण ती करोडो वर्षे वाहतेच आहे ! आणि वाहत राहणार आहे . तिने फक्त वहायचे , आपण फक्त पाहायचे ! यातून आपले जे व्हायचे तेच व्हायचे ! नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
(माझी नर्मदा परिक्रमा या ब्लॉग वरील लेखांक ९९ मधील थोडासा भाग )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सर्वांचे कौतुक आहे. आदर आहे. पण सर्व गोष्टी नर्मदेला का relate करायच्या? नर्मदा नदी इतर सर्व नद्यांप्रमाणेच वाहते. त्याचा अर्थ आयुष्याशी का लावायचा? सर्व काही नर्मदा हा संकुचित विचार नाही का?

छान मनोगत

मी सगळे भाग वाचतो न चुकता
चांगला दस्ताऐवज तयार होतोय
सामाजिक, आर्थिक , भौगोलिक cross-section चांगला पकडलाय तुम्ही