“स्नो फ्लॉवर “ (Snow Flower ) गजेंद्र अहिरे यांचा चित्रपट बघायला मिळाला.. चित्रपट खूप सुंदर झाला आहे.
साधारण गोष्ट अशी आहे.
कोकणातले आई वडील रशियामध्ये आपल्या मुलाच्या मृत्यूपश्चात त्याच्या (आता अनाथ ) झालेल्या मुलीला ताब्यात(?) घ्यायला जातात. तिकडे मुख्य भाषेचा अडसर, त्यामुळॆ त्यांनी घेतलेला एक दुभाष्या, त्याच्या मार्फत अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत ते आपल्या नातीला घेऊन अखेर कोकणात जातात, जिला रशियन व्यतिरिक्त एकही भाषा येत नसते. मग पुढे तिचं काय होतं? ती सफेद बर्फाळ प्रदेशातून लाल मातीच्या कोकणातील घरात , गावात रमते का? रमली असेल तर कशी? हे सर्व चित्रपट बघितल्यावर कळेलच.
फ्रेम्स नेत्रसुखद आहेत- बर्फाळ प्रदेशातील पांढऱ्या शुभ्र पॅलेट आणि कोकणातली लाल माती, हिरवीगार झाडी, निळा - करडट समुद्र.
कथा, दिग्दर्शन , गाणी, संगीत सगळंच उत्तम.
छाया कदम यांनी कोकणी सामान्य स्त्री अगदी बेमालूम दाखवलीये, तिचं मुलांसाठीच झुरणं, नवऱ्याबरोबर असलेलं रागालोभाचं नातं सगळंच नैसर्गिक वाटतं. वैभव मांगले ह्यांनी पण उत्तम अभिनयाच्या छटा दाखवल्या आहेत.
मनवा देवेंद्र भागवत हिने चिमुरडी परी अतिशय छान सादर केली आहे - दोन अनोळखी लोकांचं आजी-आजोबा म्हणून तिला जवळ घेणं, हळू हळू त्यांनी तिच्या जवळ येणं, एकदम अनोळखी जगात प्रवेश करण अशा अनेक प्रसंगांत तिच्या reactions / प्रतिक्रिया सहज आल्या आहेत.
क्वचित काही खटकणार ते म्हणजे एक दोन वेळेला वैभव मांगले - छाया कदम खूपच लाऊड झाले आहेत असे वाटले.
चित्रपटानंतर स्वप्नील जोशीने त्यांची काही मिनिटांची मुलाखत घेतली त्यात अजूनही काही माहिती मिळाली. इतका सुंदर चित्रपट-ज्यात मराठी आणि रशियन कलाकार एकत्र दिसतात, बरेचसे चित्रण सैबेरियात झाले आहे तर उरलेले काही कोकणात (२ लोकेशन्स)- त्यांनी केवळ १३ दिवसात चित्रीत केला (८ दिवस सैबेरिया + ५ दिवस कोकण) ह्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले .
NAFA ने फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला म्हणून बघायला मिळाला.
मी पहिल्यांदाच NAFA हा नॉर्थ अमेरिकेचा मराठी फिल्म फेस्टिवलचा अनुभव घेतला.
ह्या चित्रपटाशिवाय अजून दोन शॉर्ट फिल्म्स ही आवडल्या. शॉर्ट फिल्म हा प्रकारही आवडला. काय सांगायचं असतं ते कोणताही पसारा न मांडता थेट तुमच्यापर्यंत पोहोचतं. “Submission” आणि “ The Girl with A Red Hat” ह्या दोन अतिशय भिन्न पण आजच्या तरुणाईच्या अत्यंत जवळच्या विषयावरच्या फिल्म्स होत्या.
१९२७ मध्ये उभारलेलं (म्हणजे ९८ वर्षे जुनं) कॅलिफोर्निया थिएटर - वेगळं इंटिरियर आहे- त्याचीही चित्रं टाकत आहे.
---
---
---
नाफा फेस्टिवलविषयी ऐकलं होतं.
नाफा फेस्टिवलविषयी ऐकलं होतं. योगायोग शॉर्ट फिल्म बघितली का? नाफाने तीन शॉर्ट फिल्मची निर्मिती केली या वर्षी असं ऐकलं.
Snow Flower चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे का? इंटरेस्टिंग वाटत आहे.
अरे वा! फारच रोचक स्टोरीलाइन
अरे वा! फारच रोचक स्टोरीलाइन आहे.
अरे वा! फारच रोचक स्टोरीलाइन
अरे वा! फारच रोचक स्टोरीलाइन आहे. >>>+१
माझ्या माहितीप्रमाणे तो
माझ्या माहितीप्रमाणे तो चित्रपट पण फेस्टिवल मध्येच मोस्टली दाखवतायेत.
हो योगायोग पण बघितला. तो पण ओके होता.
आपण मला विशेष करून पहिली सबमिशन आणि तिसरी द गर्ल विथ रेड हॅट हे जास्त आवडले. . त्याची निर्मिती नाफाची होती का माहित नाही पण माझ्या आठवणीप्रमाणे पहिली शॉर्ट फिल्म राणे म्हणून एका व्यक्तीची होती स्मिता राणे.
सकाळी ' मुक्ताई ' पण दाखवला. मोगरा फुलला वरुनच चित्रपट बनवलाय असे वाटले. अर्थात सुरुवातीला गो नी दांडेकरांना श्रेय दिले आहे.
मुक्ताई निमित्ताने परत तोच अनुभव आला, पुस्तक एका वेगळ्याच उंचीवर आहे. आणि चित्रपद त्याच्या जवळपासही जात नाही.
फारच रोचक स्टोरीलाइन आहे>> हो वेगळी आहे.
गजेंद्र अहिरेचे चित्रपट वेगळ्या पठडीतले असतात.
मुलाखत ऐकल्यावर अजून प्रभावित झाले - कौतुकही वाटलं
१२-१५ दिवसांत पूर्ण चित्रपटच शूटिंग संपवतो
कथा दिग्दर्शन बऱ्याचशा वेळा गाणी स्वतःचे करतो.
कधी कधी संगीतही देतो
ह्या चित्रपटातील एक गाण वैभव मांगले ने गायलं आहे .. (त्याच्यावरच चित्रित केलेल)
६८ चित्रपट केलेत
नंतर बघितलं मला आवडलेले काही चित्रपट त्याचे आहेत असे कळले..
जसे पोस्टकार्ड, सरोवर सरी
गुलमोहर, नॉट ओन्ली मिसेस राऊत, स्वामी पब्लिक अनलिमिटेड, अनुमती, पिंपळ ही काही अजून ऐकलेले/ पाहिलेली नवे..
आता आवर्जून जमतील तेव्हढे बघायचे ठरविले आहे.
खूप छान माहिती. धन्यवाद.
खूप छान माहिती. धन्यवाद.
हा चित्रपट कुठे पाहायला मिळेल?
रोचक विषय.
आता आवर्जून जमतील तेव्हढे बघायचे ठरविले आहे.>>> बघितले की इथे त्यांची नावे टाका.
कासव - मनात घर करणार!
कासव - मनात घर करणार! (चित्रपट )
“किती नशीबवान आपण? हे बघायला आपले डोळे आहेत, आपण आहोत. आपल्याला डोळे असतात कान असतात तरी बघायला आणि ऐकायला शिकावं लागतं”
जानकी (इरावती हर्षे ) हे मानवला (अलोक राजवाडे) सांगत असते.
एकाच वेळी किती सोपा आणि तितकाच complex, आपल्याला अंतर्मुख करणारा संवाद आहे. आपल्याला दिसतं, पण आपण पाहतो का? कानावर पडतं, आपण ऐकतो का?
आपण आपल्या मनाची कवाडे घट्ट बंद करून घेतली तर मग आपल्याला दिसत राहतो फक्त अंधार, आपल्याच आत कोंडलेला अंधार. गरज असते ती फक्त डोळे लख्ख उघडून जगाकडे बघण्याची.
मनातील गुंत्याचा निचरा होण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाला सेफ स्पेस लागते आणि आधारही. जे पूर्वी नात्यांच्या गोतावळ्यात सहज मिळून जायचं. पण आताच्या छोट्या, विभक्त किंवा नसलेल्या कुटुंबात ते कोठून मिळवायच?
तर आपल्या समविचारी, समदुःखी माणसांची मैत्रीची, बिना रक्ताच्या नात्यांची बेटे तयार करून…
दत्ताभाऊ हे जानकीला सांगत असतात तेव्हा ते आरपार आपल्याही मनाला जाऊन भिडत.
हा चित्रपट मला तीन स्तरांवर दिसला -
एक कासव (olive ridley sea turtle) - अरबी समुद्रातील कासवांच्या माद्या त्यांच्या प्रजनन कालावधीत (जून ते सप्टेंबर) किनाऱ्यावर येतत्, अंडी घालतत् आणि समुद्रात परत जातात. काही काळाने ती अंडी फुटून त्यातून कासवाची पिल्ले बाहेर येतात आणि समुद्राच्या लाटेबरोबर ती पिल्ले अलगद त्यांच्या त्या घरात शिरतात. परंतु अंडी घातल्यापासून ते पिल्ले बाहेर येऊन ती समुद्रात जाईपर्यंतचा काळ मोठा जिकिरीचा असतो, त्यांची राखण करायला लागते - अर्थात (लोभी ) माणसापासून. थोडक्यात त्यांनाही एक सुरक्षित अवकाश / जागा ( सेफ space) मिळावी लागते. आणि ती त्यांना मिळवून द्यायचं काम करणारे, दत्ताभाऊ ( मोहन आगाशे).
दोन मानव - आत्महत्येच्या एका असफल प्रयत्नानंतर, रस्त्याच्या कडेला पडलेला , तापाने फणफणलेला, त्याला न मागताच एक आधार मिळतो. एक सुरक्षित अवकाश (space ), जिथे कोणी त्याच्याकडून अपेक्षा ठेवणारं नाही की प्रश्नांचे भडीमार नाहीत जे त्याला त्याच्या कोषातून बाहेर पडायला उदयुक्त करतं.
तीन जानकी - तिचा भूतकाळ, जो कडेकडेने येत गेलाय. स्वतःचे बिघडलेले मनस्वास्थ्य मोठ्या कष्टाने परत मिळवून, आता अशाच गर्तेत सापडलेल्या दुसऱ्या एका जीवाला वाचवायला तत्पर असणारी. अवघड वाटेवरून जाताना, स्वतः शिकलेलं शहाणपण त्या अनोळखी मुलाला ओंजळीने देणारी. कासव जातानाच्या कामात दत्ताभाऊंना मदत करताना त्यात स्वतःचे सुख समाधान शोधणारी ती जानकी.
त्या व्यतिरिक्त कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा जानकिचा मदतनीस यदू ( किशोर कदम) - “ दिवभर कष्ट करून थकल्यावर मग कुठलं आलंय डिप्रेशन ..” किंवा
“अजून अंथरुणावर पडून राहिलो तर छताकडे बघताना यायचं डिप्रेशन ..”
ही अशी खेळीमेळीच्या स्वरात सहज म्हणून आलेली त्याची वाक्य, आपल्याला विचार करायला लावणारी,
बसस्टँडवर चहाच्या टपरीवर काम करणारा पोरसवदा शिरू - आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणारा, झालच तर समोरच्याला मदत करणारा
ही पात्र आणि ओघाने येणाऱ्या त्यांच्या कथा.
ह्या सगळ्याची सुंदर वीण घालत हळू हळू आपल्यालाही त्या पकडीत घेत चित्रपट एका आशावादी वळणावर येऊन संपतो.
कुठेही शब्दबंबाळ न होताही कितीतरी वाक्ये, संवाद चित्रपट संपल्यावरही मनात रेंगाळत राहतात.
मोहन आगाशे स्वतः सायकीअट्रीस्ट असल्यामुळे त्याचा प्रभावही चित्रपटात जाणवतो.
सर्वच कसलेले अभिनेते आहेत, त्यामुळे सगळ्यांचाच अभिनय उत्कृष्ट. अलोक राजवाडेचा अभिनय फारच सुंदर झालाय - उदास, भकास, विद्रोही, कासावीस, माणसात परत आलेला, आशावादी अशा कित्येक छटा त्याने सहजतेने व्यक्त केल्या आहेत. . “माझ्याशी नीट बोलायचं..” म्हणणारा तो हाच का असा प्रश्न पडावा..
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांसारखे मात्तबर दिग्दर्शक असल्यामुळे प्रत्येक बाजूने चित्रपट परिपूर्ण वाटत राहतो.
दोनच गाणी आहेत, तीही छान झालीयेत - अर्थपूर्ण, मनाला भिडणारी.
आणि आता दृश्ये -
ती अफलातून आहेत. सकाळच्या उन्हात चकाकणारा निळा समुद्र, फेसळत्या लाटा, खडकावर लाटा आदळून उडणारे तुषार, वाळूवर निवांत विसावलेल्या होड्या, सूर्यास्ताच्या वेळच केशरी आकाश आणि शांत केशरी पाणी, टुमदार बीच हाऊस - नारळी पोफळीच्या बागा आणि लाल दगडाची बैठी तटबंदी असलेलं, आणि सगळ्यात भर हरपून बघावं वाटलेलेलं शेवटच दृश्य - बेबी कासवं रेतीवरून चालत जात, किनाऱ्यावर अलगद पसरलेल्या लाटेबरोबर समुद्रात शिरतात!
MMBA ने, डॉ मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत एक विशेष शो आयोजित केला होता म्हणून हा चित्रपट बघायला मिळाला, त्याबद्दल त्यांचेही आभार!
घरी आल्यावर बघितलं तर, २०१७ ला प्रदर्शित झालेला कासव हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण कमळ, मिळवलेला पाचवा मराठी चित्रपट आहे. अजूनही अनेक पारितोषिके कासव ला मिळाली आहेत.
आठ वर्ष उशिरा का होईना पण चित्रपट बघायला मिळाला / बघितला हे भारी वाटलं.
चित्रपट कुठे पाहायला मिळेल?>>
चित्रपट कुठे पाहायला मिळेल?>>>
मला वाटतं ते लोकं फिल्म फेस्टिवल ना च दाखवतायत.
बघितले की इथे त्यांची नावे टाका>>
रिव्ह्यू संकट ..
वर एक टाकलाय
अरे वा! रोचक आहे.
अरे वा! रोचक आहे.
फार सुरेख समीक्षा केलीस
फार सुरेख समीक्षा केलीस छंदीफंदी.
छान परिचय.
छान परिचय.
नाफा बद्दल, अमेरिकन भाऊ नावाने youtube चालवणाऱ्या युट्युबर कडून समजलेलं, संबंधित कोणाची तरी मुलाखत घेतलेली.