जय माता दी
"प्यारसे बोलो जय मातादी"
"मिलके बोलो जय मातादी"
सारा आसमंत देवीआईच्या नाम गजराने गर्जत होता. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी उत्सुक असणारे आणि तिचं दर्शन घेऊन धन्य झालेले - सगळेच भक्तगण एकमेकांना संबोधून मातेच्या नावाचा गजर करत होते.
इतकी अवघड चढण चढून आल्यामुळे काही जणांना शारीरिक थकवा जाणवत असला तरी कोणाच्याही चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नव्हता. प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघाल्यासारखा प्रसन्न दिसत होता.
पण दहा वर्षांचा छोटा संतोष मात्र फारसा उत्साही दिसत नव्हता. काही वेळापूर्वीच वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन तो त्याच्या आई-बाबांबरोबर परतीच्या वाटेला लागला होता. रात्रभर उत्साहाने देवीच्या नावाचा पुकारा करत ती अवघड चढाई चढणारा संतोष आता मात्र दमला होता. पण शारीरिक थकव्यापेक्षा त्याच्या मनात निराशेचा भाव दाटून आला होता. एकीकडे आईचा हात धरून चालताना तो थोडा तक्रारीच्या सुरात म्हणाला,"आई, मला तर देवी दिसलीच नाही त्या गाभाऱ्यात. इतकं लांब चालत येऊन काय उपयोग? देवळात मुर्तीसुद्धा नाहीये देवीची. नुसते तीन पाषाण होते - ते सुद्धा त्या गुरुजींनी दाखवले म्हणून दिसले मला. त्यापेक्षा आपल्या गावातल्या देवळातच गेलो असतो ना आपण. तिथे केवढी मोठी, सुंदर मूर्ती आहे देवीची. आणि तिथे दर्शनासाठी इतकं चालायलाही लागत नाही."
आपल्या मुलाचे ते नाराजीचे बोल ऐकून त्याच्या आईला थोडी गंमत वाटली. आपल्या चालण्याची गती थोडी मंदावत ती म्हणाली, "देवीआई बद्दल असं बोलू नये बाळा. इथल्या गुहेत वैष्णोदेवी स्वतः राहते. तिच्या भक्तांना जरी ती दिसत नसली तरी तिचं मात्र तिच्या सगळ्या भक्तांवर लक्ष असतं ! जे भक्त मनापासून तिची प्रार्थना करतात, तिची आठवण काढतात त्यांची नेहेमी रक्षा करते ती… म्हणूनच आपणसुद्धा सतत देवीआईचं स्मरण करून तिचे आभार मानले पाहिजेत - फक्त संकटाच्या वेळीच नाही…आनंदाच्या प्रसंगी सुध्दा."
आपल्या आईचं हे स्पष्टीकरण ऐकून संतोषने होकारार्थी मान हलवली आणि तो पुन्हा चालू लागला. थोडा वेळ गेल्यावर मात्र तो अधूनमधून "इथे बसू या ना थोडा वेळ… माझे पाय दुखतायत खूप" म्हणत आपली नाराजी व्यक्त करत होता. पण त्याचे आई बाबा मात्र लवकरात लवकर पायथ्याशी जायची घाई करत होते.
"अरे सोनू, आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मूला पोचायचंय आपल्याला. नाहीतर आपली ट्रेन चुकेल." संतोषला वस्तुस्थिती समजावून सांगत त्याचे बाबा म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून संतोष अजूनच वैतागला. आईकडे बघत म्हणाला, "म्हणजे? आपण जम्मूपर्यंत चालत जायचं?" आपल्या मुलाचा तो निरागस प्रश्न आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे अविश्वासाचे भाव बघून त्याच्या आई बाबांना एकदम हसू फुटलं. स्वतःला कसंबसं सावरत आई म्हणाली," नाही रे बाळा. एकदा आपण खाली पोचलो की मग बसने जम्मूला जायचं." काही क्षण थांबून आई पुढे म्हणाली, " तू बसमधे मस्त आराम करून घे. मग जम्मूला पोचल्यावर एखाद्या छानशा हॉटेलमधे जाऊ जेवायला. चालेल ना? सांग बरं, तुला काय खायचंय आज? पनीरची भाजी का छोले?"
संतोषच्या आईने मोठ्या शिताफीने विषय बदलला होता. आता संतोषच्या पायांचं दुखणं कुठल्या कुठे पळून गेलं होतं. त्याच्या चालीत आता एक नवीनच लगबग जाणवत होती - लवकरात लवकर पायथ्याशी पोचायची; आणि तिथून जम्मूच्या हॉटेलमधे जायची. एकीकडे "जय माता दी"चा पुकारा करताना मनात मात्र तो ' पनीर का छोले ' या द्वंद्वात अडकला होता.
अखेरीस जम्मूला पोचल्यावर पनीर आणि छोले दोन्हींवर मनसोक्त ताव मारून झाल्यावर ते तिघेही जम्मू रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचले. नुकतीच पुण्याच्या दिशेने जाणारी झेलम एक्स्प्रेस एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली होती. बघताबघता तिथे असंख्य प्रवाशांची गर्दी झाली; एकच गोंधळ उडाला. त्या धक्काबुक्की मधून स्वतःला कसेबसे वाचवत ते तिघेही त्यांच्या आरक्षित जागांपर्यंत पोचले. संतोषचे बाबा बर्थखाली आपलं सामान लावत होते तेवढ्यात एक वयस्क जोडपं त्यांच्या कंपार्टमेंटमधे त्यांच्या समोरच्या बर्थवर येऊन बसलं. हळूहळू प्लॅटफॉर्म वरची गर्दी कमी होत होती. प्रवासी आपापल्या जागांवर जाऊन विसावत होते. थोड्याच वेळात एक जोरदार शिट्टी वाजली आणि ट्रेन सुरू झाली. संतोष खिडकीतून बाहेर बघत होता. आधी प्लॅटफॉर्म आणि काही मिनिटांतच स्टेशनही नजरेआड झालं… आता त्याला बाहेर रात्रीच्या काळोखा शिवाय काहीच दिसत नव्हतं. साहजिकच त्याची नजर ट्रेनच्या त्या कंपार्टमेंटमधे भिरभिरू लागली. मगाशी त्याच्या समोर बसलेले आजी आजोबा एव्हाना आपापल्या जागी आडवे झाले होते . त्याचे बाबा देखील आता त्यांची तिघांची झोपायची तयारी करत होते. “मी सगळ्यात वर झोपू?” संतोषने बाबांचा शर्ट ओढत विचारलं. त्यावर बाबा काही म्हणणार इतक्यात एक तिशीच्या वयातला तरुण घाईघाईने समोरच्या रिकाम्या बर्थवर येऊन बसला. त्याचा एकूण आविर्भाव बघता - त्याने अगदी धावतपळत, घाईघाईत ट्रेन पकडली असावी. त्याच्याकडे सामानही तसं बरंच होतं. एक सूटकेस, पाठीवर भलीमोठी सॅक आणि त्याशिवाय एक मोठ्ठी कापडी पिशवी. त्या पिशवीतून एक छोटीशी क्रिकेटची बॅट आणि एक प्लॅस्टिकची बाहुली डोकावत होती. अजूनही दोन तीन वस्तू होत्या - रंगीत कागदांत गुंडाळलेल्या… सगळ्या वस्तू अक्षरशः कोंबल्या होत्या त्या पिशवीत; अगदी घाईघाईत, शेवटच्या क्षणी सामानात टाकल्यासारख्या!
स्वतःच्याही नकळत संतोष त्या काकांकडे आणि त्यांच्या त्या पिशवीकडे टक लावून बघत होता. आपली सुटकेस आणि सॅक त्यांनी berth खालच्या जागेत सरकवली; पण ती पिशवी मात्र स्वतःपाशीच ठेवून घेतली.
सुरुवातीची जुजबी ओळख झाल्यावर संतोषचे आईबाबा बराच वेळ त्या काकांशी बोलत होते. त्यांच्या गप्पांमधून संतोषला समजलं त्याप्रमाणे - त्या काकांचं घर त्यांच्या गावाच्या - गारखेडेच्या जवळच असलेल्या जामनेर गावात होतं . पण सध्या ते कामानिमित्त त्यांच्या घरापासून खूप लांब - म्हणजे अगदी वैष्णोदेवीच्या डाँगराच्याही पुढे कुठेतरी राहत होते - एकटेच! आत्ता सुट्टी घेऊन ते त्यांच्या घरी निघाले होते. आणि ते जिथे काम करत होते तिथे दुकानं वगैरे काहीच नसल्यामुळे जम्मूला पोचल्यावर अगदी घाईघाईत त्यांनी त्यांच्या घरच्यांसाठी काही भेटवस्तू घेतल्या होत्या. त्या काकांना मराठीमधे बोलताना ऐकून संतोष एकदम खुश झाला. गेले दोन तीन दिवस त्याला मराठी बोलणारे कोणीच भेटले नव्हते आणि त्याला स्वतःला हिंदी नीट बोलता येत नव्हती. त्यामुळे त्याने ठरवून टाकलं- ‘आता परवा गाडीतून उतरेपर्यंत या काकांशी खूप गप्पा मारायच्या.' त्याच्या मनात बरेच प्रश्न गर्दी करत होते. खूप कुतूहल वाटत होतं. त्याला काकांना विचारायचं होतं - 'काका नक्की काय काम करतात? आणि त्यासाठी इतक्या लांब का राहतात? आपल्याच गावात राहून करावं ना काम… माझ्या बाबांसारखं! असं एकटं राहताना त्यांना घरच्यांची आठवण नाही येत?...' किती प्रश्न आणि किती शंका!
त्याच्या बाबांच्या प्रश्नाने संतोषच्या विचारांची साखळी मधेच तुटली. बाबा त्या काकांना विचारत होते,“आमचं सामान थोडं बाजूला सरकवू का? म्हणजे तुमच्या या पिशवीसाठी जागा होईल..” पण त्यावर नकारार्थी मान हलवत ते काका म्हणाले,”नको राहू दे. पिशवी उघडी आहे ना. आतली खेळणी आणि इतर वस्तू खराब होतील. मी माझ्या जवळच ठेवतो.”
त्यांचं ते उत्तर ऐकून संतोषची आई म्हणाली,”तुमच्या मुलांसाठी नेताय का ही खेळणी?" मुलांचा उल्लेख येताच काकांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. काहीशा भावूक स्वरात ते म्हणाले, "हो! मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे - जुळी भावंडं. परवा त्यांचा पाच वर्षांचा वाढदिवस आहे. त्याचसाठी मुद्दाम सुट्टी घेऊन घरी चाललोय. मागचे दोन वाढदिवस काही ना काही कारणाने जमलंच नाही जायला. या वेळी मात्र वर्षभर सुट्टी राखून ठेवली होती. काहीही करून या वर्षी हा दिवस एकत्र साजरा करायचं ठरवलं होतं. आणि म्हणूनच संध्याकाळी जम्मूला पोचल्यावर या सगळ्या भेटवस्तू घेतल्या विकत. खूप खुश होतील दोघं ही सगळी खेळणी, कपडे बघून."
काकांचं बोलणं ऐकून संतोषला एकदम उदास वाटायला लागलं. त्याला त्याचे स्वतःचे वाढदिवस आठवले. त्याने हळूच आपल्या आई बाबांकडे बघितलं. बाबांनी उगीचच घसा खाकरला आणि आईच्या डोळ्यांत तर चक्क पाणी जमा झालं होतं.
तेवढ्यात त्या काकांना कोणाचा तरी फोन आला आणि ते बोलत बोलत बाहेर गेले. त्यांच्या दिशेने एक चोरटा कटाक्ष टाकत संतोषने बाबांना विचारलं, "बाबा, हे काका तुमच्यासारखे घरीच राहून काम का नाही करत? त्यांच्या मुलांना कित्ती आठवण येत असेल त्यांची." त्याच्या या प्रश्नावर त्याला आपल्या जवळ ओढून घेत त्याचे बाबा पुन्हा एकदा खाकरले. गळ्यात दाटून आलेला आवंढा गिळत म्हणाले, "ते असे घरापासून लांब राहून काम करतात म्हणून तर माझ्यासारखे लोक आपापल्या घरी, आपल्या कुटुंबाबरोबर राहू शकतात." आपल्या बाबांचं हे असं रूप संतोषला नवीन होतं. तो अजूनच गोंधळला. "पण नक्की काय काम करतात ते?" त्याने बाबांचा चेहेरा आपल्या दिशेने वळवत विचारलं. त्याच्या डोक्यावरून आपला हात फिरवत बाबा म्हणाले, "डोंगरावरची वैष्णोदेवी जशी आपली रक्षा करते ना, तसेच हे काका आणि यांच्याच सारखे अजून कितीतरी लोक आपली सगळ्यांची रक्षा करतात. आपल्या देशाची रक्षा करतात."
संतोषच्या मनातल्या कुतुहलाची जागा आता आदराने घेतली होती. तो काकांचा फोन कॉल संपायची वाट बघत होता. त्याला खूप गप्पा मारायच्या होत्या काकांशी. खूप प्रश्न विचारायचे होते. पण दिवसभराच्या दमणुकीमुळे आता त्याचे डोळे हळूहळू बंद व्हायला लागले होते. पुढच्या काही क्षणांतच तो निद्रादेवीच्या अधीन झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचे आई बाबा, ते समोरचे आजी आजोबा आणि ते डोंगरावर राहणारे काका - सगळे चहा पीत गप्पा मारत बसले होते.
"काका, तुमच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला मी पण येऊ?" संधी मिळताच संतोषने त्या डोंगरावरच्या काकांना प्रश्न केला. त्यावर अगदी दिलखुलास हसत ते म्हणाले, "अरे, हो. ये की. माझ्याबरोबरच येतोस का? तसंही आपण सगळे एकत्रच उतरणार आहोत भुसावळला. तू गारखेड्याला जायच्या ऐवजी पुढे जामनेरला ये." संतोषच्या बाबांकडे बघून ते काका म्हणाले, "तुम्ही सगळेच या ना माझ्या घरी. तुम्हाला भेटून खूप छान वाटेल माझ्या घरच्यांना."
त्यांच्या या अगत्यशीर आमंत्रणावर संतोषची आई म्हणाली, "यावेळी राहू दे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सुट्टीवर याल तेव्हा नक्की येऊ."
आईचं ते उत्तर ऐकून संतोष मात्र खट्टू झाला. 'पण काही हरकत नाही. पुढच्या वेळी जाईन तेव्हा खूप मज्जा करेन,' स्वतःलाच समजावत त्याने पुन्हा आपली खिडकी शेजारची जागा पटकावली. अधूनमधून काकांच्या पिशवीतल्या त्या बॅटकडे आणि मग हळूच त्या काकांकडे बघण्यात त्याची तंद्री लागली होती.
थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्या काकांचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव बघून नकळत ते काका एकदम ताठ होऊन बसले. घाईघाईत फोन कानाला लावत म्हणाले, "जय हिंद साब. …. जी साब….. ओके साब…. नहीं साब….. दिल्ली उतर जाता हूॅं साब… ठीक है…."
संतोष अगदी कुतूहलाने त्यांचं ते एकतर्फी संभाषण ऐकत होता. तेवढी हिंदी तर येतच होती त्याला. पण त्याला जाणवलं की प्रत्येक वाक्यागणिक त्या काकांच्या चेहेऱ्यावरचे भाव मात्र बदलत होते. शेवटी त्या काकांनी "जय हिंद साब…" म्हणत कॉल बंद केला. त्यांचा एकंदर आविर्भाव बघताच त्यांच्या सहप्रवाशांमधे कुतूहल मिश्रित बेचैनी पसरली. आपल्याच विचारांत गुंग होऊन, शून्यात नजर लावून बसलेल्या काकांना बघून संतोष देखील उदास झाला. त्या शांततेचा भंग करत शेवटी त्याच्या बाबांनी विचारलं, "काय झालं हो? कोणाचा फोन होता? सगळं ठीक आहे ना? काही इमर्जन्सी आहे का?"
त्यांच्या त्या प्रश्नांच्या सरबत्तीने भानावर येत ते काका म्हणाले, "हो, हो. सगळं ठीक आहे. माझ्या वरिष्ठ साहेबांचा फोन होता. एक अतिशय महत्वाची गोपनीय कामगिरी आमच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर पुन्हा आमच्या ड्यूटीच्या जागी हजर रहायची ऑर्डर आली आहे. माझी सुट्टी रद्द झाली आहे. मला दिल्ली स्टेशनवर उतरून तिथल्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट करायचं आहे." हे सगळं सांगत असताना त्या काकांनी आपला चेहेरा आणि आवाज अगदी नेहेमीसारखा ठेवायचा खूप प्रयत्न केला असला तरी संतोषच काय; पण तिथे उपस्थित प्रत्येकाला त्यांच्या त्या प्रतिक्रियेमागची वेदना, अपेक्षाभंग झाल्याचं ते दुःख अगदी स्पष्ट दिसत होतं. एकीकडे आपल्या हातातली ती पिशवी आपल्या उराशी घट्ट कवटाळून धरत ते काका पुन्हा एकदा खिडकीबाहेर बघायला लागले. पुढे बराच वेळ कोणीच काही बोलले नाही - बोलू शकले नाही!
थोड्या वेळाने काहीतरी ठरवल्यासारखं त्या काकांनी संतोषच्या आई बाबांकडे बघत म्हटलं, "आता हे सगळं माझ्या घरच्यांना, खास करून माझ्या मुलांना कसं सांगायचं हाच मोठा प्रश्न आहे. खूप आशेने माझी वाट बघतायत ती दोघे. सारखी म्हणत होती - आपण सगळे मिळून खूप मज्जा करू. पण आता… या वर्षी सुद्धा व्हिडिओ कॉल वरच साजरा होणार त्यांचा वाढदिवस." काही क्षण थांबून थोड्या अजिजीच्या स्वरात ते म्हणाले, "तुम्ही माझं एक काम कराल का? मी तर उद्या माझ्या मुलांच्या वाढदिवसासाठी हजर राहू शकणार नाही. पण तुम्ही ही पिशवी त्यांना नेऊन द्याल का?" इतका वेळ आपल्या उराशी कवटाळून धरलेली ती खेळण्यांची पिशवी पुढे करत ते म्हणाले, "मी नाही तर निदान मी आणलेली खेळणी तरी मिळतील दोघांना त्यांच्या या खास दिवशी. जर जमलं तर मी उद्या फोनवर बोलेन त्यांच्याशी."
त्यांनी पुढे केलेली ती पिशवी आणि त्यांच्या आवाजातली ती अगतिक विनंती - या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संतोषचे आई बाबा देखील पुरते गोंधळून गेले होते. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. शेवटी संतोषच्या बाबांनी बोलायला सुरूवात केली, "तुमच्या घरी? जामनेरला? अहो, पण…" त्यांचं ते अर्धवट सोडलेलं वाक्य आणि त्यांच्या शब्दांतून डोकावणारे ते अनिश्चित भाव - न सांगताही बरंच काही सांगून गेले. संतोषने डोंगरावरच्या काकांकडे पाहिलं. पुढे केलेली ती पिशवी पुन्हा आपल्या उराशी कवटाळून धरत ते कसंनुसं हसले. पण त्यांच्या त्या हसण्या मागचा खरा अर्थ सगळ्यांनाच अगदी स्पष्ट वाचता येत होता. जणू काही ते म्हणत होते, 'वाटलं होतं तुम्ही तरी मदतीला पुढे व्हाल; पण…जाऊ दे, तुमच्याकडून इतकी साधी का होईना, पण अपेक्षा केली हेच चुकलं माझं!'
त्या क्षणी संतोषला अचानक काय वाटलं ते त्यालाही समजलं नाही; पण पुढे होत त्याने त्या काकांकडून ती पिशवी घेतली आणि म्हणाला, "हो, जाऊ की आम्ही जामनेरला, त्यात काय एवढं? तुमचा पत्ता लिहून द्या माझ्या बाबांना." आता नाईलाजास्तव का होईना पण संतोषच्या आईबाबांनी देखील तयारी दाखवली आणि मग पत्ता, फोन नंबर वगैरेची देवाणघेवाण झाली. या सगळ्या प्रकारात बघता बघता दिल्ली स्टेशन आलं देखील. सगळ्यांचा निरोप घेत, संतोषच्या आई बाबांचे वारंवार आभार मानत ते काका जायला निघाले. संतोषच्या हातातल्या त्या पिशवीला अगदी हळुवारपणे कुरवाळत त्यांनी संतोषला प्रेमाने थोपटलं आणि आपल्या बाकी सामानासह ते प्लॅटफॉर्मवर उतरले. त्यांच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे संतोष खिडकीतून पहात होता. त्याला उद्देशून त्याची आई म्हणाली, "कशाला हे नसतं लोढणं अडकवून घेतलंस रे गळ्यात? आधीच या प्रवासाची एवढी दगदग झालीये. कधी एकदा आपल्या घरी जाऊन बिछान्याला पाठ टेकते असं झालंय. त्यात हे जामनेरला जायचं खूळ घेतलंस. उद्याच त्या मुलांचा वाढदिवस म्हटल्यावर भुसावळला उतरलो की एस टी बस मधून गारखेड्याला न उतरता आधी सरळ पुढे जामनेरला जा, त्या अनोळखी गावात त्यांचं घर शोधा, त्यांच्या मुलांना ही पिशवी द्या… नसती उठाठेव. त्यापेक्षा त्यांच्या घरच्यांना सांगितलं असतं आपण फोन करून - ते आपल्या घरी येऊन त्यांचं सामान घेऊन गेले असते."
आपल्या आईचं हे असं रूप संतोषसाठी नवीनच होतं. एरवी सगळ्यांशी प्रेमाने बोलणारी, सगळ्यांना मदत करणारी त्याची आई आज असं का वागतेय हेच कळेना त्याला. थोडं चाचरत तो म्हणाला, "अगं पण आई, त्या काकांना किती वाईट वाटलं होतं त्यांची सुट्टी रद्द झाली म्हणून. आणि मला वाटलं की त्यांच्या मुलांना पण खूप दुःख होईल. म्हणून मी म्हणालो तसं. तुला दमायला झालं असेल तर तू गारखेड्याच्या स्टॉपवर उतरून घरी जा. मी आणि बाबा जाऊ जामनेरला. याल ना बाबा तुम्ही?"
संतोषचं स्पष्टीकरण ऐकताच त्याची आई थोडी वरमली आणि काहीसं ओशाळवाणं हसत म्हणाली, "होय रे बाळा. बरोबरच आहे तुझं म्हणणं. पण आपल्याला उगीच अर्ध्या पाऊण तासाचा जास्तीचा प्रवास करायला लागेल ना, म्हणून म्हटलं की त्यांनाच बोलावू सामान घ्यायला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तर तुझ्या त्या काकांना आणि त्यांच्या घरच्यांना नीट ओळखत सुद्धा नाही. अशा अनोळखी लोकांवर विश्वास ….."
आपल्या आईचं बोलणं मधेच थांबवत संतोष म्हणाला, "आई, ती अदृश्य देवीआई आपली रक्षा करते असं आपण मानतो आणि म्हणून इतका लांबचा प्रवास करून तिच्या दर्शनासाठी जातो; मग जे खरंच आपलं, आपल्या देशाचं रक्षण करतात त्या काकांसाठी आपण अर्ध्या तासाचा प्रवास नाही करू शकणार का गं?"
संतोषचा हा युक्तीवाद ऐकताच त्याचे आई बाबा दोघंही स्तब्ध झाले. हातातल्या पिशवीकडे एक कटाक्ष टाकत तो पुढे म्हणाला, "आणि जर ओळखीचं म्हणशील तर - ते काका तरी कुठे ओळखतात गं आपल्याला? कित्येक लोकांचे तर चेहेरेही नसतील बघितले त्यांनी; पण तरीही स्वतःच्या घरापासून, मुलांपासून इतक्या लांब राहून आपली रक्षा करतातच ना ते?"
आपल्या मुलाचे हे विचार ऐकून त्याचे आई बाबा मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्याच्याकडे बघतच राहिले. पण मग एकदम भानावर येत आईने संतोषला प्रेमाने जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून आपला हात फिरवत ती म्हणाली, "किती साध्या, सोप्या शब्दांत आम्हाला आमच्या चुकीची जाणीव करून दिलीस रे बाळा! आज तुझ्यामुळे एक खूप मोठं सत्कर्म करायची संधी मिळाली आपल्याला."
संतोषच्या बाबांनी आकाशाच्या दिशेने बघत आपले दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि ते पुटपुटले, "देवी आई, तुझी करणी अगाध आहे. कधी कोणाच्या रूपात येऊन योग्य मार्ग दाखवशील - काही सांगता येत नाही! जय माता दी… जय माता दी!"
छान आहे कथा. मस्त समांतर आहे
छान आहे कथा. मस्त समांतर आहे यात.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
मस्त कथा. लेकीला सांगीन नक्की
मस्त कथा. लेकीला सांगीन नक्की.
धन्यवाद urmilas आणि लेकीची
धन्यवाद urmilas आणि लेकीची प्रतिक्रिया देखील सांगा. मला आवडेल जाणून घ्यायला.
मस्त कथा. लेकीला सांगीन नक्की
मस्त कथा. लेकीला सांगीन नक्की. > मी पण
मस्त कथा
मस्त कथा
निमिता सांगितली कथा लेकीला.
निमिता सांगितली कथा लेकीला. शांतपणे ऐकुन घेतली. जशी संतोषने काकांच्या हातातील पिशवी घेतली तास तिला फार आनंद झाला :). म्हणाली मला आईचा फार राग आलाय. परत सांगशील अशी डिमांड पण आली. खरंच सुंदर आहे कथा. लिखाण सुरु राहुदेत.
urmilas, अहो , किती छान
urmilas, अहो , किती छान प्रतिक्रिया. इतकी प्रामाणिक प्रतिक्रिया मिळाली माझ्या कथेला आणि तीदेखील एका निरागस, निष्पाप जीवाकडून... माझं लिखाण सफल झालं. तुमच्या मुलीला माझ्याकडून एक प्यार भरी जादू की झप्पी.
आणि या मोबाईल गेम्स च्या काळात तुम्ही तुमच्या मुलीला गोष्टी सांगता, वाचून दाखवता; म्हणून तुमचं ही खूप कौतुक आणि आभार. __/\__
निमिता नक्कीच देईन. मोबाईल
निमिता नक्कीच देईन. मोबाईल पासून अजून तरी लांब ठेवता आलंय. प्रयत्न सुरूच ठेवीन
मायबोली मुळे थोडा वाचन होता आणि बालसाहित्य तिला आवर्जून सांगते. रोज गोष्ट सांग असा असतंच.
तुमचा लिखाण खूप फॉलो करते. पण या कथेच्या निमित्ताने संवाद झाला. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
वा ! छानच आहे ही कथा....
वा ! छानच आहे ही कथा....
___/\___
फारच छान. किती शिकण्यासारख
फारच छान. किती शिकण्यासारख असत लहान मुलाकडून.
छान कथा!
छान कथा!