फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं. हे कळल्यावर विरहानं व्याकुळ झालेल्या तरुणानं अखेर त्या झुडुपाशीच प्राण सोडला. तेव्हापासून त्या जोडप्याच्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या “कलाफाते” झुडुपाची निळसर, आंबटगोड फळं जो कुणी चाखतो तो पुनःपुन्हा इथल्या ओढीनं एल कलाफातेला परतून येतो अशी एक दंतकथा आहे.
निळ्याशार लागो अर्जेंटीनोकाठच्या उंचसखल टेकड्यांवर वसलेलं एक लहानसं गाव, एल कलाफाते. साधी, समाधानी लोकं. रंगीबेरंगी छपरांची छोटी, टुमदार घरं. दूर, क्षितिरेषेवर लांबच लांब पसरलेली, बर्फानं झाकलेली, उत्तुंग अँडीज पर्वतरांग. सरोवरावरून येणारा भराटवारा अंगावर घेत डोलणारी गवताळ माळरानं. सरोवर अन् आभाळाच्या लांबरुंद निळ्या कॅनव्हासवर काढलेले उंच पॉपलर वृक्षांचे पिवळेधमक फराटे. त्या रंगसंगतीत भर टाकायला म्हणून लांब लांब ढांगा टाकत चालणारे काटकुळ्या पायांचे गुलाबी फ्लेमिंगो. उथळ काठाजवळचा गाळ चिवडत, मासे टिपतांना भसाड्या आवाजात एकमेकांशी हितगूज करणारे अपलँड गूज अन् इतर नाना जातींची बदकं. उगाचच भुंकायचा वसा टाकून दिलेली, तळ्याकाठी शांतपणे सुस्तावणारी गुबगुबित कुत्री. कुणालाही कसलीच अनाठायी धांदल, गडबड नसते. ज्याला त्याला झेपेल त्या गतीनं इथं प्रत्येकाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं.
एका टेकाडावर असलेलं हॉटेल, लहानसंच पण टापटिपीचं होतं. भिंतीवरल्या मोठ्या खिडकीतून खालचं गाव, हिरवी पिवळी झाडं आणि पलीकडल्या निळसर टेकड्या भिंतीवर टांगलेल्या एखाद्या चित्रासारख्या दिसत होत्या. अगदी पहाटेच, थकलेल्या पायांनी रॉयचा निरोप घेऊन बसमध्ये चढलो होतो. तेव्हा निदान आज तरी फार वणवण नको म्हणून ठरवलं की तासभर पडी टाकायची आणि दुपारी उशीरा जेवायला बाहेर पडायचं. बसल्या बसल्याच गाढ झोप लागली.
लहानश्या डुलकीनंही बरीच तरतरी आणली. टेकाडावरनं खालच्या लिबर्टादोर अवेन्यूवर उतरलो. गावामधून जाणारा लिबर्टादोर अवेन्यू म्हणजे या छोट्याश्या गावाची धमनीच. बाकी गाव शांत असलं तरी इथं मात्र सर्वत्र पर्यटकांचा उत्साह सळसळत असतो. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी सुवेनरची, ब्रँडेड मालाची झकपक दुकानं, टूर कंपन्यांची ऑफिसं, नाना तऱ्हेची लहान मोठी रेस्टॉरंटस्, ब्रुवरीज, आईसक्रीम पार्लर्स, सगळं काही पर्यटकांनी गजबजलेलं असतं.
उन्हं डोक्यावर आली असली तरी हवा बऱ्यापैकी गार होती आणि त्यात नाष्टाही चुकलेला असल्यानं सपाटून भूक लागली. मिटबॉल्स विथ मॅश्ड पोटॅटो आणि जोडीला उगाच जरा घोटभर मॅलबेक वाइन असा सुटसुटीत पण चविष्ट लंच करून लागो अर्जेंटिनोकाठी लांबवर भटकून आलो.
सहज म्हणून एका सुपर शॉपी मधे डोकावलो. समोरच पिळाची खारी बघितली आणि वाटलं, इथं कोपऱ्यावर एखादी चहाची टपरी असती तर अशा गार हवेत, वाफाळता चहा अन् खारीनं काय बहार आणली असती. पण इथला "येरबा" झाडाची पानं उकळून केलेला "येरबा मात्ते" चहा आणि त्या खारीचा मेळ बसवणं माझ्या तरी कल्पनाशक्तीच्या पलिकडलं होतं.
लगेच पॅटागोनियन वाईन आणि बियर सेक्शनकडं मोर्चा वळवला. खेळण्याच्या दुकानात गेल्यावर एखाद्या लहान मुलाची होईल तशीच अवस्था अशा वेळी माझी होते. दुर्दैवानं फक्त केबिन लगेज समाविष्ट असलेल्या स्वस्त तिकिटावर प्रवासाला निघालो असल्यामुळे काहीही खरेदी शक्य नव्हती. तेव्हा कॅमेरात मावल्या तेवढ्या दारू गोळा करून बाहेर पडलो.
जेवायला जरा अवकाश होता म्हणून एक-दोन टूर कंपन्यांच्या ऑफिसमधे घुसून उगाचच थोड्या चांभार चौकशा केल्या. ग्लेशियर आईस वॉक टूरची नुसती किंमत ऐकूनच हात पाय गार पडले. सुदैवानं टूरच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळं स्वतःची समजूत घालणं जरा सोयीचं झालं. वाटेतल्या वेस्टर्न युनियन बँकेत डॉलर-पेसो विनिमय दर बरा दिसला म्हणून, खिशातल्या काही डॉलर्सची, पेसोत मोड करुन घेतली. चिक्कार पेसो मिळाले. ते कोंबून खिसा अगदी टम्म फुगला.
लागो अर्जेंटिनोकाठच्या गार वाऱ्याच्या माऱ्यापुढे काही तासांपूर्वी केलेला लंच फार टिकाव धरू शकला नाही. त्यात संध्याकाळ झाली तशी आजूबाजूच्या रेस्टॉरंट्स मधून येणाऱ्या खमंग वासांमुळे भूक अजूनच खवळली. काय बरं खावं? डोक्यात उत्तर तसं आधीच तयार होतं. “कॉरदेरो अल् असादोर!” इथली चुकवू नये अशी एक डेलिकसी. सोप्या शब्दांत सागायचं झालं तर चुलीवरची मेंढी. लिबर्तादोर ॲवेन्यूवरच्या बऱ्याचश्या रेस्टॉरंट्सच्या भिंतभर काचेमागे, मोठ्ठ्या चुलींवर, मेंढ्या अंग शेकताना दिसत होत्या. एरव्ही शेळ्या-मेंढ्याच्या वाटेला मी कधीही जात नाही पण एवीतेवी बिचाऱ्या मेंढीचा जीव गेलाच आहे असा विचार करून एका उंची रेस्टॉरंटमधे शिरलो. अदबीनं पुढे आलेल्या वेटरला, “ते जे काही बाहेरच्या काचेतून दिसतंय ते आणि त्याबरोबर ग्लासभर तुझी आवडती पॅटॅगॉनियन वाईन आण!” अशी सोपी, पण माझ्या स्पॅनिशचा आनंदीआनंद असल्यामुळे समजावून सांगायला तशी कठीण असलेली ऑर्डर कशीबशी देऊन मोकळा झालो.
अतिशय निगुतीनं मंद आचेवर भाजलेलं, ताजं, चविष्ट आणि लुसलुशीत “कॉरदेरो असादोर” खाताना वाटलं आपल्याकडे प्रचलित असलेली, “शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड!” ही म्हण निदान कालाफातेमधे तरी कधीही लागू पडणार नाही. मी अगदी तृप्त झालो आहे याची एक दोनदा खातरजमा करून झाल्यावर लाकडी बाऊलमधे वेटर अर्जेंटेनियन पेसोतलं बिल घेऊन आला. पेसोचं माप असतं हजारात. कुठलाही लहानसहान खर्च हजारांच्या घरात. सर्वसाधारणपणे एका अमेरिकन डॉलरला हजार अर्जेंटेनियन पेसो असा हिशोब. आतापावेतो हजारो अर्जेंटेनियन पेसो उडवून या गणिताला जरी मी सरावलो होतो तरीसुद्धा बिलाचे तब्बल छपन्न हजार पेसो बघून माझी छपन्न इंची (नसलेली) छातीही जराशी दडपलीच. माझ्यासाठी आपली मान उतरवलेल्या मेंढीने निदान माझा खिसा कापून का होईना, माफक सूड उगवला. भरल्या पोटानं अन् रोडावलेल्या खिशानं, रमत-गमत, टेकाड चढून हॉटेलवर परतलो आणि मस्त ताणून दिली.
आधीच शांत असलेलं कलाफाते, पहाटे अजूनच चिडीचूप झालं होतं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. पांढरी, पातळ दुलई डोक्यावरून घेऊन टेकड्यासुद्धा गपगार पसरल्या होत्या. जरा वेळानं घरांच्या छपरांमागनं निळाशार लागो अर्जेन्टीनो चकाकू लागला. पांढऱ्याशुभ्र टेकड्यांना सकाळच्या तिरकस उन्हात सोनेरी झळाळी मिळाली. अशा या जादुई वातावरणात बस पेरितो मोरेनो ग्लेशिअर ग्लेशिअरकडे निघाली.
बसमध्ये कुठल्याही बाजूची खिडकी मिळाली तरीही मी नेहमीच असमाधानी असतो. डावीकडे बसलो तर वाटतं, अरे उजव्या बाजूला जास्त चांगलं दिसतंय. उजव्या बाजूची जागा असली की डावीकडे बघून तळमळ होते. त्यातल्या त्यात पार मागची जागा मला आवडते कारण बस थोडी रिकामी असली तर डावी-उजवीकडे मुक्त संचार करता येतो (एकदा विमानातसुद्धा माझा असा उद्योग चाललेला बघून वैतागलेल्या हवाईसुंदरीने माझ्यावर डोळे वटारले होते).
दुर्दैवानं बस तुडुंब भरली होती.
यापूर्वी हिमालयातल्या झन्स्कार खोऱ्यातली ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी जवळून म्हणजे काही मैलांवरनं बघितली होती. इथे मात्र या अफाट हिमनदीला अगदी खेटून चालायला भक्कम लाकडी वॉक वे बांधलाय. सुमारे तीस किलोमीटर लांब आणि अडीचशे चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळाच्या या महाकाय हिमनदीच्या प्रवाहात कित्येक फूट उंचीचे अजस्त्र हिमनग धक्काबुक्की करत पुढे-पुढे सरकतात तेव्हा ढगांच्या गडगडाटसारखा आवाज सर्वत्र घुमतो. या चेंगराचेंगरीत सगळ्यात पुढच्या रांगेतले हिमनग कडाडत नदीत कोसळतात. प्रचंड मोठ्या लाटा वर उसळतात. तो रोमहर्षक थरार अनुभवायला जगाच्या कानाकोपऱ्यातून गर्दी जमते.
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं. हा टूर एवढा खर्चिक का याचं सोपं उत्तर समोरच दिसत होतं. पण हिरमुसून जायची गरज नव्हती. ग्लेशियर अगदी जवळून बघण्यासाठी, जिवाला (आणि खिशालाही) कमी धोकादायक अशा ग्लेशियर नौकविहाराचीही सोय होती. सुमारे शंभर दीडशे हौशी पर्यटकांना पाठीवर बसवून लाँच त्या भीमकाय हिमनगांजवळ घेऊन गेली. या स्वप्नवत ठिकाणी प्रत्यक्ष येऊन गेलो होतो याचे पुरावे गोळा करायला डुचमळणाऱ्या लाँचच्या डेकवरून फोन सावरत थोडं छायाचित्रण केलं.
एल चॅल्टेन च्या दऱ्याखोऱ्यात दिसलेली रंगीबेरंगी ग्वानाको झुडपं, करड्या माळरानावर मनसोक्त उंडारणारे ग्वानाको हरणांचे कळप भरपूर बघून झाले होते. तो ग्वानाको चवीला कसा आहे हे कुतूहल आणि पोटातली भूक शमवण्यासाठी लिबर्टादोर अवेन्यूवरच्या “वानाको बार” मधे शिरलो. बार तरुण तरुणींनी खच्चून भरला होता. गप्पांना ऊत आला होता. बियर, वाईनचे पेले किणकिणत होते. खिडकीला लागून असलेल्या लाकडी बेंचवर मोकळी जागा होती. बाजूला माझ्यासारखाच एकांडा, एक युरोपियन आरामात बियर चाखत बसला होता. वेट्रेस हातात मेन्यू टिकवून त्या गर्दीत गुप्त झाली ती कायमचीच. जरा वेळानं माझी चुळबूळ बघून बाजूच्या युरोपियनाने वेट्रेसला स्पॅनिशमधून मारलेल्या हाकाही आजूबाजूच्या त्या गदारोळात लगेच विरल्या. घड्याळ्यात रात्रीचे नऊ उलटून गेले होते. उद्या पहाटेचे उशुवायाचे विमान गाठायला, लवकर बिछाना गाठणं गरजेचं होतं. समोरच्या कोपऱ्यावरच आईस क्रीम पार्लर होतं. डूल्स दे लेच्चे किंवा कलाफाते बेरीज् इथले सगळ्यात प्रसिद्ध आणि आवडते फ्लेवर्स. पण कारुण्याची झाक असलेल्या कलाफाते बेरीजपेक्षा मादक मॅलबेक द्राक्षीच्या आईसक्रीमची सोबत त्यावेळच्या मूडमध्ये जास्त आश्वासक वाटली.
गार वारा सुटला होता. पावसाची भुरभुर सुरू होती. रस्त्यावरची वर्दळ आटली होती. हॉटेल फार काही लांब नव्हतं तेव्हा पावसातच झपझप चालू लागलो. काळवंडलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर टेकाडावरची निळ्या रंगाची “El Calafate” पाटी उठून दिसत होती. या नावासाठी निळ्याइतका समर्पक रंग दुसरा कुठला सापडणार नाही. टेकाडावर जायचा लोखंडी जिना चढून शॉर्टकटनं हॉटेलवर पोहोचलो. सामानाची नीट बांधाबांध केली. जवळच्या दोन फोन्समध्ये पहाटेचे चार गजर लाऊन उशाशी ठेवले अन् गुडूप झोपी गेलो.
मला उशुवायाला घेऊन जाणारं विमान आकाशात उडालं. विमानाच्या खिडकीतून अँडीजच्या भव्य पटावर एवढा धिप्पाड रॉयसुद्धा एखाद्या लहानश्या सोंगटीसारखा दिसत होता. मी हात हलवत पुटपुटलो, “बाय बाय रॉय ! पुन्हा नक्की भेटू”. मनात म्हटलं, दंतकथेप्रमाणं इथं पुन्हा परतून येण्यासाठी कुठलीही फळं खायची काहीच गरज नाही. तेवढंच कशाला, कुणी जादूनं मलाही कुठलंसं झुडुप बनवलं असतं तर रॉयच्या दऱ्याखोऱ्यात मी अगदी आनंदानं नांदलो असतो.
क्रमशः
फोटो आणि शब्द हातात हात घालून
फोटो आणि शब्द हातात हात घालून नृत्यरत आहेत लेखभर. ❤
Very impressive !
दोन आगावू निरिक्षणे :
१} @ कलाफाते
इतकी भारी स्टोरी असलेल्या कलाफाते बेरीजपेक्षा मादक मॅलबेक भाव खाऊन गेली याची चुटपुट वाटली. अन्य रूपात कलाफातेला न्याय दिला असेल ही अपेक्षा 😀
२} कॅमेरात मावतील तेवढ्या दारवा जमा करण्याची आयडिया फार आवडली आहे. तिथल्या वाईन्स जास्त strong असतात का ? Cognac glasses सादृश्य ग्लासात वारुणी दिसली म्हणून उगाचच भोचक पृच्छा 😀
सुंदर वर्णन आणि नेत्रसुखद
सुंदर वर्णन आणि नेत्रसुखद प्रचि!
शेवटच्या वाक्यावरून 'नागझिरा'मधलं व्यंकटेश माडगूळकरांचं वाक्य आठवलं. थोरोच्या मूळ वाक्यात बदल करून त्यांनी लिहिलंय की ताडोबाचं तळं मिळालं तर मुठीएवढा खंड्या होऊनही मी उरलेलं आयुष्य आनंदात घालवीन
अनिंद्य - हा हा... खरं आहे.
अनिंद्य - हा हा... खरं आहे. कलाफातेच भेटली असती तर न्याय देता आला असता ;).
इथल्या वाईन्स बऱ्यापैकी ड्राय असतात आणि द्राक्षाची सगळ्यात आवडती जात, मॅलबेक. कोनियाक ग्लास सारखा आकार होता खरा पण मोठा होता.
वावे - अगदी बरोबर. थोरोचा कोळी, माडगूळकरांचा खंड्या आणि माझं झुडूप :).
वा, वा. भारी वर्णन आणि फोटोज.
वा, वा. भारी वर्णन आणि फोटोज.
सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटोज
सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटोज.
मस्त!
मस्त!
फोटो कोलाज करायला नको होते. आम्ही आनंदाने स्क्रॉल केले असते आणि एक शब्दही वाचायचा चुकवला नसता
काय सुंदर लिहिलंय, फोटोही
काय सुंदर लिहिलंय, फोटोही तितकेच अप्रतिम!
मजा आली वाचायला.
अर्जेंटिना माझ्या विश-लिस्टवर आहेच. ते आता आणखी आणखी ढुश्या देऊ लागलं आहे.
खूपच सुंदर, नेत्रसुखद प्रचि.
खूपच सुंदर, नेत्रसुखद प्रचि.
तितकेच सुरेख शब्दांकन!
फक्त केबिन बॅग वर इतका प्रवास करण्याच्या तुमच्या धडाडीला सलाम.

हे असे सोलो ट्रॅव्हल , तेही इतक्या दूरच्या प्रदेशात, हे खास युरोपियनांमधे आढळून येणारे वैशिष्ट्य एका म म व माणसात आलेले पाहून उदंड अभिमान आणि आनंद वाटत आहे!
पुढचा दौरा कुठे?
काय सुंदर लिहिलं आहेत आणि
काय सुंदर लिहिलं आहेत आणि फोटोही अप्रतिम. आम्ही इथे जाण्याची शक्यता दूर दूर पर्यंत नाहीच. त्यामुळे छान भटकंती झाली तुमच्या बरोबर.
व्वा व्वा व्वा..
व्वा व्वा व्वा..
अशक्य सुंदर लिहिलं आहे आणि त्याला साजेसे फोटो.
अप्रतिम..
पेरितो मोरेनो ग्लेशिअर चे फोटो तर कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही.
तुमचे अँडीज वरील प्रेम पाहून मला उगाच शकिराच्या गाण्यातील ओळी आठवल्या.
Lucky you were born that far away so
We could both make fun of distance
Lucky that I love a foreign land for
The lucky fact of your existence
Baby, I would climb the Andes solely
To count the freckles on your body
Never could imagine there were only
Ten million ways to love somebody
Le-do-lo-le-lo-le, le-do-lo-le-lo-le
Can't you see? I'm at your feet
सायो, अस्मिता - धन्यवाद
सायो, अस्मिता - धन्यवाद
निर्मल - अशक्य काय, जाऊन जा.
ऋन्मेऽऽष - बरोब्बर पकडलंत. खूप फोटो असले की लिखाण लपून जातं.
ललिता-प्रीति - पुढचा भाग टाकला की जायला अजून प्रवृत्त व्हाल :).
छल्ला - केबिन लगेज बॅगपॅकचे स्वस्त तिकीटा व्यतिरिक्त अनंत फायदे आहेत. पुढचा दौरा म्हणून कंबोडिया आहे मनात. तोवर युद्ध थांबेल अशी आशा आहे.
ऋतुराज - "पेरितो मोरेनो ग्लेशिअर चे फोटो तर कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही", अगदी खरं आहे. फार कमी वेळ थांबता आलं. आठवडाभर मुक्काम हवा. ही कविता माहीत नव्हती.
खूपच सुंदर, नेत्रसुखद प्रचि.
खूपच सुंदर, नेत्रसुखद प्रचि.
तितकेच सुरेख शब्दांकन! >>>>+१
अप्रतिम प्रवासवर्णन आणि
अप्रतिम प्रवासवर्णन आणि प्रकाशचित्रे !! कलाफातेचं गळा फाटेपर्यंत कौतुक केलं तरी अपूर्ण वाटेल इतकं सुरेख
वा! ऋतुराज, आवड्या!
वा! ऋतुराज, आवड्या!
आता ते गाणं जाऊन ऐकते.
मंजूताई - धन्यवाद
मंजूताई - धन्यवाद
सरनौबत - हा हा हा
फोटो आणि लिखाण, अफाट सुंदर!
फोटो आणि लिखाण, अफाट सुंदर!
सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटोज
सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटोज.
खूप सुंदर फोटो आणि लिखाण .
खूप सुंदर फोटो आणि लिखाण . आवडले .
अजून एक ठिकाण माझ्या
अजून एक ठिकाण माझ्या विशलिस्टमध्ये ॲड होण्याचं क्रेडिट तुमच्या लिखाणाला व फोटोजना. दोन्हीही फार आवडलं.
हर्पेन, chanchal, जयु -
हर्पेन, chanchal, जयु - धन्यवाद
आऊटडोअर्स - नार्कोस वेबसीरिज आणि आता तुमचा कोलंबियाचा लेख वाचून माझ्याही विशलिस्टमध्ये एक ठिकाण ॲड झालंय.
अतिशय सुंदर फोटो आणि उच्च
अतिशय सुंदर फोटो आणि उच्च लिखाण
मला इथला एकही फोटो दिसत
मला इथला एकही फोटो दिसत नाहीये. असं का व्हावं बर ?
अफाट सुंदर आहे सारं. फोटो आणि
अफाट सुंदर आहे सारं. फोटो आणि वर्णन पण.
अफाट सुंदर निसर्गाचे तितकेच
अफाट सुंदर निसर्गाचे तितकेच अफाट सुंदर फोटो आणि तितकेच सुंदर फोटो…
मी हा धागा आला तेव्हाच वाचला होता आणि फोटो परत परत पाहताना प्रतिसाद द्यायचे राहुन गेले.
झकासराव, निकु, रायगड, साधना -
झकासराव, निकु, रायगड, साधना - धन्यवाद.