अंशुमन गायकवाड – क्रिकेटमधला लढवय्या सरदार

Submitted by गुरुदिनि on 20 July, 2025 - 11:14

(पूर्वप्रसिद्धी : 'तुषार' दिवाळी अंक)

anshuman.jpg

मूळ पुणे जिल्ह्यातील ‘दावडी’ गावचे ‘गायकवाड’ सरदार, थोरले शाहू महाराज आणि पेशवाईच्या काळात मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी गुजरातेत अनेकदा स्वाऱ्या करत. कालांतराने त्यांनी तेथेच बस्तान बसवले आणि आपली राजगादी ‘बडोदा’ येथे स्थापित केली. बडोद्याच्या याच शूर गायकवाड राजघराण्याशी दूरचे नाते असणाऱ्या ‘अंशुमन’ने क्रिकेटच्या मैदानावर लढवय्या बाणा दाखवत भारतीय क्रिकेटमध्ये अमीट ठसा उमटवला. या वर्षी हा तारा क्रिकेटच्या क्षितिजावरून अचानक नाहीसा झाल्याने ही शब्दरूप आदरांजली.

अंशुमनचा जन्म २३ सप्टेंबर १९५२ ला मुंबईत उषादेवी आणि दत्ताजीराव गायकवाड या दांपत्याच्या पोटी झाला. त्याने क्रिकेटपटू होणं अगदी साहजिक होतं कारण त्याला घरातूनच मिळालेला क्रिकेटचा वारसा. त्याचे वडील दत्ताजी भारतासाठी ११ कसोटी खेळले होते आणि त्यात ४ सामन्यांत भारताचे नेतृत्वही केले होते. शिवाय त्याच्या आईचे वडील व्यंकटराव घोरपडे हेही क्रिकेटपटू होते जे १९४२-४३ मधील बडोद्याच्या पहिल्या रणजी विजेतेपदाच्या वेळी बडोद्याचे कप्तान होते. त्यामुळे ‘महाराणी चिमणाबाई हायस्कूल’मध्ये शिकतानाच त्याचे स्पर्धात्मक क्रिकेट चालू झाले. घरी वडिलांकडूनच खेळाचे बाळकडू मिळाले आणि पुढे प्रथितयश प्रशिक्षक मामासाहेब घोरपडे यांच्याकडून व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाज असणारा अंशुमन वेळप्रसंगी सलामीलाही उतरून ती भूमिका योग्य प्रकारे निभावत असे. पुढील काळात वेगवान गोलंदाजीला निर्भयपणे सामोरा जाणारा अंशुमन लहानपणी मात्र त्यास घाबरत असे. त्याचे पळणे पाहून प्रशिक्षक घोरपडे नेटसमध्ये त्याचा एक पाय बांधून ठेवून तासनतास वेगवान गोलंदाजीचा सराव करायला लावत, जेणेकरून त्याची भीती निघून जावी. याचा त्याला खरोखरच फायदा झाला आणि बडोद्याच्या ‘सयाजीराव गायकवाड’ विद्यापीठात गेल्यावर त्याच्या खेळात सकारात्मक फरक होऊन मोठ्या प्रमाणात धावा होऊ लागल्या.

उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. पहिल्याच डावात तो फलंदाजीला गेला तेव्हा नुकताच कर्णधार पतौडी जखमी होऊन मैदानाबाहेर पडत होता आणि त्याचे रक्त खेळपट्टीवर सांडले होते. पण याने विचलित न होता तो परिस्थितीला धीराने सामोरा गेला. पहिल्याच मालिकेत रॉबर्ट्स, होल्डर, ज्युलियन यांचा वेगवान मारा आणि गिब्सची फसवी फिरकी यांना चांगले सामोरे जात त्याने दोन अर्धशतकांसह आश्वासक सुरुवात केली. असे असूनही पुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही आणि मग हा सिलसिला सुरूच राहिला. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या कठीण मालिका असल्या की त्याला निवडले जाई आणि इतर बऱ्याच वेळा त्याला वगळले जाई. कारकीर्दीतील एकूण ४० कसोटींपैकी २२ कसोटी तो एकट्या वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला.

त्यानंतर १९७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात होल्डींग, रॉबर्ट्स, होल्डर, डॅनियल, ज्युलियन यांच्या तोफखान्याला तोंड देताना त्याच्यातील जिद्दी, लढाऊ बाणा खऱ्या अर्थाने उठून दिसला. पोर्ट ऑफ स्पेन येथील कसोटीत भारताने विक्रमी ४०५ धावांचा पाठलाग करत कसोटी जिंकल्याने विंडीज संघ व कप्तान लॉइड सूडाने पेटले होते. काही करून पुढची किंगस्टन कसोटी व मालिका जिंकायचीच या आसुरी वृत्तीने विंडीजच्या चार वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर शरीरवेधी गोलंदाजीचा, बाऊन्सर्स, बीमर्स यांचा मारा केला. त्या काळी शरीरवेधी चेंडू, नोबॉल यांवर कसलेही नियंत्रण नसल्याचा फायदा त्यांनी घेतला व स्थानिक पंचही त्यांना सामील होते. त्याकाळी हेल्मेट, चेस्ट पॅड वगैरे आयुधेदेखील नसत. यामुळे भारताचे अनेक फलंदाज जायबंदी झाले. यात पहिल्या डावात झुंजार ८१ धावा काढणारा अंशुमनदेखील सामील होता. होल्डींगच्या एका डोक्याच्या दिशेने टाकलेल्या बिमरने त्याचा कान फोडला. त्याचा चश्मा उडाला आणि कानातून रक्त वाहू लागले. तेथील इस्पितळात तीन दिवस ‘ICU’ वॉर्डमध्ये राहिल्यावर कसेबसे त्याचे प्राण वाचले. पण तेथील उपचार समाधानकारक न वाटल्याने तो लगेच भारतात परतला. इथे आल्यावर त्याच्या कानाच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या ज्यामुळे त्याचा कान साफ बाद होण्यापासून वाचला, पण शेवटपर्यंत त्या कानाने त्याला कमी ऐकू येई.

अंशुमनने एकूण ४० कसोटीत कधी सलामीला तर कधी मधल्या फळीत खेळत चांगल्या बचाव तंत्रासह दोन शतके आणि दहा अर्धशतकांसह ३० च्या सरासरीने १,९८५ धावा केल्या. पण ही आकडेवारी अर्थातच त्याने बहुतांश वेळा शरीराची ढाल करत दाखवलेल्या जिद्द, लढाऊपणा, समर्पणवृत्तीला न्याय देताना दिसत नाही. त्याचे पहिले शतक १९७९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर येथे आले. तर दुसरे शतक (जे द्विशतक होते) पाकिस्तानविरुद्ध जालंधर इथे १९८३ साली झाले. ६७१ मिनिटांत आलेले हे दुहेरी शतक त्याकाळी प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात संथ द्विशतक होते. या खेळीने भारताला तो सामना वाचवता आला. अंशुमनची ही खेळी संयमी शैली आणि एकाग्रतेसाठी एक आदर्श वस्तुपाठ म्हणून ओळखली गेली. या डावाने अंशुमानला ‘द ग्रेट वॉल’ हे नामानिधान लाभले.

१९७५ आणि १९७९ च्या पहिल्या दोन एकदिवसीय विश्वचषकांतही अंशुमनने सहभाग नोंदवला. एकूण १५ वन-डेत त्याने २६९ धावा काढल्या. तर २०६ प्रथमश्रेणी सामन्यांत ३४ शतकांसह १२,१३६ धावांचा रतीब टाकला. शिवाय आपल्या उपयुक्त ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाजीने १४३ बळी मिळवले. जानेवारी १९८५ मधील कलकत्ता येथील इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना त्याचा अखेरचा सामना ठरला. डिसेंबर १९८७ मध्ये ‘लाडक्या’ वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेरचा वन-डे सामना खेळला. १९६९-७० ते १९९१-९२ अशी तब्बल बावीस वर्षे बडोदा आणि पश्चिम विभागासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळल्यावर शेवटच्या सामन्यात शतक ठोकून तो थाटात निवृत्त झाला.

निवृत्तीनंतर तो आपल्या लाडक्या खेळापासून दूर रहाणे शक्य नव्हते. बडोदा व भारतीय क्रिकेटमध्ये आगामी काळात त्याने प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रशासक आणि निवडकर्ता म्हणून भरीव योगदान दिले. १९९२ ते १९९६ या काळात तो राष्ट्रीय निवडसमितीचा सदस्य होता. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याची पहिली भूमिका १९९७ ते १९९९ या काळात होती. तर २००० सालामध्ये सामनानिश्चितीची कृष्णछाया भारत व जागतिक क्रिकेटवर पडली असता; एक प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचा माणूस भारतीय संघासोबत हवा म्हणून जॉन राइट याची निवड होईपर्यन्त त्याला दुसऱ्यांदा प्रशिक्षक पदावर नेमण्यात आले. या काळात हरभजन सिंग, झहीर खान, युवराज सिंग सारख्या गुणी खेळाडूंनी पदार्पण केले. २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला. त्यानंतर केनिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याने अल्प काळ काम केले. ‘गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड’ मध्ये अंशुमनने काही वर्षे नोकरी केली आणि २००० साली तिथून तो निवृत्त झाला. २००४ साली अमेरिकेतील ‘प्रो-क्रिकेट’मध्ये ‘कार्यकारी संचालक’ म्हणून त्याने काही काळ कार्यभार सांभाळला. २०२२ मध्ये ‘इंडियन क्रिकेटर्स असोसीएशन’च्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या ‘सल्लागार समिती’ आणि ‘अॅपेक्स काउन्सिल' मध्येही त्याने काम केले. २०१८ मध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान ‘सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कारा’ने त्याला सन्मानित करण्यात आले.

जवळच्या मित्रांमध्ये ‘चार्ली’ टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या अंशुमनबद्दल त्याचे मित्र, सहकारी खेळाडू, समीक्षक सारेच प्रेमाने व आदराने बोलतात. तो एका चांगल्या क्रिकेटपटूबरोबरच दिलदार मित्र आणि सज्जन माणूस होता यावर साऱ्यांचे एकमत होते. “खेळाडू, प्रशिक्षक, प्रशासक आणि निवडकर्ता म्हणून त्याने भारतीय क्रिकेटला सर्वस्व दिले आहे”, असे सुनील गावसकर म्हणतात. “माझ्या कमतरतांवर मात करण्यास त्यांनी मदत केली नसती तर माझी भारतीय संघात निवड झाली नसती”, असे झहीर खान सांगतो. “अंशुमन हा अतिशय सज्जन माणूस आणि निडर खेळाडू होता”, असे त्याचे डोके फोडलेला मायकल होल्डींग म्हणतो. “अंशुमनने मैदानावर घामाबरोबरच रक्त सांडले, तो सद्गृहस्थ होता आणि त्याच्यासारखा क्रिकेटपटू मी पाहिला नाही. ‘मेरी झांसी नही दुंगी’च्या थाटात ‘मेरी विकेट नही दुंगा’ या पवित्र्याने तो खेळायचा”, असे सुप्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि ललितलेखक द्वारकानाथ संझगिरी लिहितात. ‘गट्स अमिडस्ट ब्लडबाथ’ या अंशुमनवरील चरित्राच्या प्रकाशन प्रसंगी सचिन तेंडुलकर म्हणाला की, “मी खरोखरच भाग्यवान आहे की जेव्हा ते आमचे प्रशिक्षक होते तेव्हा मला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. ते नेहमीच आमच्या मदतीला हजर असायचे. ते प्रामाणिक आणि अत्यंत पारदर्शक होते. तो असा माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही आरामात विश्वास ठेवू शकता”.

अंशुमनची पत्नी ‘ज्योती गायकवाड’ ही चांगली चित्रकार आहे. या दांपत्याला अनिरुद्ध आणि शत्रुंजय हे दोन मुलगे असून दोघेही क्रिकेटपटू आहेत. यातील शत्रुंजयने बडोद्याचे रणजीमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. २०२३ मध्ये अंशुमनला रक्त-कर्करोगाशी साधर्म्य असणाऱ्या ‘मेलोडिसप्लास्टिक सिंड्रोम’ (MDS) या असाध्य व्याधीने ग्रासले. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांशी जिवाच्या कराराने लढणाऱ्या अंशुमनने या शत्रूलाही एक वर्ष प्राणपणाने कडवी लढत दिली. बरेच महीने त्याने लंडनच्या ‘किंग्ज कॉलेज हॉस्पिटल’मध्ये सर्वोत्तम उपलब्ध उपचार घेतले. गावसकर, कपिलदेव, अमरनाथ, मदनलाल, संदीप पाटील, कीर्ती आझाद यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर ‘बीसीसीआय’नेही त्याच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. पण अखेर क्रूर नियती बलवत्तर ठरली आणि तिने अंशुमनची विकेट घेतली. ३१ जुलै २०२४ ला मायदेशात, मायभूमी बडोद्यामध्ये अंशुमनने अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट मैदानावरच्या या शूर, जिगरबाज मराठमोळ्या सरदाराला सादर श्रद्धांजली.

(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)

- गुरुप्रसाद दि पणदूरकर,
(माहीम, मुंबई)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणजीमध्ये गायकवाड नेहमी चिकटुन बसायचा. मुंबई बडोदा , रणजीतली राय्व्हलरी पण त्या काळात खुप होती.

अंशुमन गायकवाड यांच्या कारकिर्दीचा छान आढावा घेतला आहे. खेळपट्टीवर एक भरवशाचा, चिवट फलंदाज - आता भारताची विकेट जाणार नाही हा विश्वास असायचा. त्यावेळी बॅटिंग म्हणजे पडझडच जास्त असायची. जोएल गार्नर, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्टस, मायकेल होल्डींग सार ख्या आग ओकणार्‍या तोफखान्याला यशस्वी रितीने सामोरे गेलेला भरवशाचा लढवय्या खेळाडू.

त्याने एकदा ओपनर म्हणून 201 रन्स केल्या होत्या ते बघितले होते व आठवते

बाकी जे माहीत नव्हते ते या धाग्यामुळे कळले

सुंदर धागा

छान लिहीले आहे. बरीच माहिती मिळाली.

१९९८ साली तो बहुधा कोच होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धचे त्यावेळचे विजय व कोच म्हणून अंशुमन गायकवाड हे समीकरण लक्षात आहे.

अनिल कुंबळेच्या ‘पर्फेक्ट-१०‘ च्या वेळी अंशुमन गायकवाड इंडियाचा कोच होता. त्याला खेळताना कधी पहायचा योग नाही आला. पण कोच म्हणून त्याने भरीव कामगिरी केली.