(पूर्वप्रसिद्धी - 'शिवतेज' दिवाळी अंक २०२४)
दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची गोडी लागली, कारण बडोद्यामध्ये खूप आधीपासून क्रिकेटचे वातावरण होते. १९३७-३८ पासून रणजी स्पर्धेत खेळणारा बडोद्याचा संघ सुरुवातीपासूनच चांगल्या खेळाडूंनी भरलेला असल्याने प्रभावी कामगिरी करत आला होता. १९४२-४३ आणि ४६-४७ मोसमाचे रणजी विजेतेपदही बडोद्याने जिंकले होते. यातूनच दत्ताजींसारख्या तरुण मुलांना क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली.
शाळेत असतानाच फलंदाज म्हणून चमक दाखवणाऱ्या दत्ताजींना मग बाराव्या वर्षी एक सुवर्णसंधी मिळाली. १९४० मध्ये बडोद्याच्या महाराजांनी तेथील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी भारताचे कसोटीपटू सी.एस.नायडू यांची नियुक्ती केली. यामुळे दत्ताजींच्या क्रीडागुणांना योग्य पैलू पाडले गेले. त्यांनी नायडूंकडून फलंदाजीबरोबरच लेग स्पिन गोलंदाजीचे धडे घेतले. भारताचे माजी कर्णधार सी.के. नायडू यांनी सुरू केलेल्या पहिल्या १४ आणि १६-वर्षांखालील विभागवार क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून प्रगती होत त्यांचा समावेश तेव्हाच्या अखंडित ‘मुंबई विद्यापीठ’ संघात झाला. पुढे लवकरच बडोदा विद्यापीठ वेगळे झाल्यावर ते तेथील ‘महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठा’तून खेळू लागले, इतकेच नव्हे तर त्या विद्यापीठाचे पहिले कर्णधारही बनले. १९४७-४८ च्या मोसमात त्यांचे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आणि १९४९-५० च्या मोसमातील रणजी विजेत्या बडोदा संघाचे ते सदस्य राहिले.
बडोदा संघात असताना विजय हजारे, हेमू अधिकारी, गुल मोहम्मद, घोरपडे, अमीर इलाही अश्या दिग्गज खेळाडूंचा त्यांना सहवास लाभला. या अनुभवाचा त्यांना फलंदाजी आणि कप्तानी यांमधील कौशल्य सुधारण्यास फार फायदा झाला. चांगला बचाव, सुरेख कव्हर ड्राइव्ह आणि उत्कृष्ट अष्टपैलू क्षेत्ररक्षक या कारणांसाठी त्यांचा लौकिक वाढू लागला. यामुळे १९५२ च्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी त्यांना इतका आनंद झाला की ते आपल्या खोलीतही संघाची टोपी आणि ब्लेझर घालून बसत, असे बऱ्याच वर्षांनी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले. पहिल्या लीड्स कसोटीत त्यांना संधी मिळाली पण ती सलामीचा फलंदाज म्हणून. या अनोळखी स्थानावर आणि ट्रूमन, बेडसर, लेकर सारख्या जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांसामोर ते अपयशी ठरले. या सामन्यात त्यांनी ९ आणि ० धावा काढल्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध मायदेशात आणि १९५३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर प्रत्येकी दोन सामन्यांत त्यांना संधी मिळाली. त्यातील प्रत्येकी एका सामन्यात त्यांची कामगिरी बऱ्यापैकी राहिली. पण ब्रिजटाउन येथील दुसऱ्या सामन्यात झेल घेताना त्यांची विजय हजारे यांच्याबरोबर टक्कर झाली आणि खांद्याच्या दुखापतीने जबर जायबंदी झाल्याने पूर्ण मालिकेला मुकावे लागले.
यानंतर तब्बल सहा वर्षे त्यांना कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. या दरम्यान देशांतर्गत स्पर्धांमध्ये बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ते सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिले. १९५७-५८ च्या मोसमात त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बडोद्याने घरच्या मोतीबाग मैदानावर सेनादलाचा डावाने पराभव करीत आठ वर्षांनी रणजी करंडक जिंकला. अंतिम फेरीत दत्ताजींनी शतक झळकावले तर त्याआधी गतविजेत्या बलाढ्य मुंबईविरूद्ध द्विशतक ठोकले. या निरंतर कामगिरीमुळे १९५९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली येथील अखेरच्या सामन्यात त्यांना परत बोलवण्यात आले. त्यात हॉल, गिलख्रिस्ट, स्मिथ सारख्या गोलंदाजांसमोर अर्धशतक ठोकत भारताला सामना वाचवायला त्यांनी सहाय्य केले.
या काळात भारतीय संघाच्या सततच्या अपयशामुळे भारताला स्थिर कप्तान मिळत नव्हता. अश्यात दिल्ली कसोटीतील कर्णधार हेमू अधिकारी देखील अनुपलब्ध झाल्याने पुढील इंग्लंड दौऱ्यासाठी अनपेक्षितपणे दत्ताजींच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. त्यांचा विद्यापीठ व बडोदा रणजी संघाच्या कप्तानपदाचा इतक्या वर्षांचा अनुभव कामी आला असावा. मात्र त्यांचे लहानपणापासूनचे मार्गदर्शक आणि निकटवर्तीय ‘महाराज फत्तेहसिंह गायकवाड’ हे तेव्हा भारतीय संघाचे व्यवस्थापक असल्यानेच दत्ताजींना कर्णधारपद मिळाले अशी कुजबूज काही क्रिकेटवर्तुळांमधून तेव्हा झाली. हा दौरा सुरू होण्यापूर्वीच विषमज्वराने (टायफॉइड) त्यांना गाठले आणि दौऱ्यादरम्यान ते पूर्णपणे फिट झाले नाहीत. यामुळे टीकाकारांना आपल्या कामगिरीने निरुत्तर करण्याची संधी त्यांना लाभली नाही. या दौऱ्यात ते चार सामने खेळू शकले पण फलंदाजीतही अपयशी ठरले आणि मालिकाही भारताने ०-५ अशी दारुणरित्या हरली. मात्र दौऱ्याचा आढावा घेताना ‘विस्डेन’ने, “त्यांचे कव्हर फिल्डिंग शानदार होते आणि यॉर्कशायरविरुद्ध केलेली १७६ धावांची खेळी लाजवाब होती”, असे कौतुक केले. तर लोकप्रिय ब्रिटीश क्रिकेटलेखक ‘ख्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स’ यांनी त्यांच्या कव्हर ड्राइव्हचे भरभरून गोडवे गायले.
यानंतर दीड वर्षांनी जानेवारी १९६१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मद्रास (चेन्नई) येथे एक कसोटी सामना दत्ताजींना मिळाला. पण त्यात चमक दाखवू न शकल्याने तो त्यांचा शेवटचा सामना ठरला. १९६३-६४ च्या मोसमापर्यंत ते बडोद्यासाठी खेळत राहिले, पण भारतीय संघात निवडीची शक्यता न राहिल्याने त्यांनी निवृत्ती घेतली. एकूण ११ कसोटीत ३५० धावाच केल्या असल्या तरी त्यांनी ११० प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये १७ शतकांसह ५,७८८ धावा केल्या आणि लेग स्पिन गोलंदाजीने २५ बळी घेतले. निवृत्तीनंतर प्रशिक्षण, संघ व्यवस्थापन, क्रिकेट बोर्ड संचालन याद्वारे ते आपल्या लाडक्या खेळाशी निगडीत राहिले. भारत आणि विशेषत: बडोद्यातील असंख्य युवा क्रिकेटपटूंना त्यांच्या अनुभव आणि मार्गदर्शनाचा फायदा मिळाला. त्यांचा मुलगा ‘अंशुमन’ याने त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करत भारतीय क्रिकेटविश्वात ठसा उमटवला.
बडोद्याच्या क्रिकेट आणि सामाजिक वर्तुळात त्यांचा मोठा दबदबा होता. ‘बडोदा क्रिकेट असोसिएशन’मध्ये प्रशासक जयवंत लेले यांच्यासह गायकवाड यांनी सहसचिव म्हणून भरीव काम केले. बडोदा संस्थानचे उपनियंत्रक म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले आणि बडोदा राजघराण्याशी असलेला दूरवरचा संबंध, ते समाजाच्या आणि युवकांच्या भल्यासाठी वापरीत. २००० सालापर्यन्त अधूनमधून ते बडोदा संघाचे प्रशिक्षक राहिले. त्यामुळे २०००-०१ साली बडोद्याने ४३ वर्षांनी रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवले तर २००१-०२ साली उपविजेतेपद. त्यांनी घडवलेले किरण मोरे, नयन मोंगिया, अतुल बेदाडे, रशीद पटेल, जेकब मार्टिन, झहीर खान, पठाण बंधू असे अनेकजण भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तर याच्या कितीतरी पटीने अधिक खेळाडू बडोद्यासाठी रणजीपटू झाले.
नियमित चालणे आणि व्यायाम यांद्वारे स्वत:ला तंदुरुस्त ठेवत दत्ताजी दीर्घायुषी ठरले. मुलगा अंशुमन याने सांगितलेल्या एका किश्श्यानुसार वयाच्या नव्वदीतही बडोद्यात गाडी चालवण्याचा उत्साह आणि फिटनेस त्यांच्याकडे होता. २०१६ साली दीपक शोधन यांचे निधन झाल्यावर आत्तापर्यन्त ते भारताचे सर्वात वयोवृद्ध हयात क्रिकेटपटू होते. बडोदा आणि गुजरात राज्यातील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. अलीकडेच दत्ताजी यांच्या अमूल्य योगदानासाठी ‘रावपुरा टपाल कार्यालया’त ‘बडोदा क्रिकेट असोसिएशन’च्या वतीने विशेष कव्हर प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच एका दूरचित्रवाहिनीतर्फे ‘ए.डी.व्यास जीवनगौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित केले होते. पण अकस्मात १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दत्ताजी यांचे बडोद्यातील रहात्या घरी ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
विशेष म्हणजे त्यांचा मुलगा क्रिकेटपटू अंशुमन हा गेले एक वर्ष कर्करोगाशी झगडत होता आणि त्याचेही या वर्षी ३१ जुलैला दुर्दैवी निधन झाले. तेव्हा दत्ताजी यांचे सुदैवच म्हणावे लागेल की त्यांना पुत्रवियोगाचे दु:ख सहन करावे लागले नाही. बडोद्यासारख्या परमुलखात आणि अखिल भारतात मराठी झेंडा डौलाने फडकवणाऱ्या या क्रिकेटच्या पितामहाला मानाचा मुजरा.
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
- गुरुप्रसाद दि पणदूरकर,
(माहीम, मुंबई)
<<विजय हजारे, हेमू अधिकारी,
<<विजय हजारे, हेमू अधिकारी, गुल मोहम्मद, घोरपडे, अमीर इलाही >>
चौथी पाचवीत असताना समोरच्या घरी जाऊन दिवसभर कॉमेंटरी ऐकताना ही नावे सतत कानावर पडायची. विजय मर्चंट, विनु मंकड, विजय मांजरेकर, त्यानंतर रमाकांत देसाइ, त्याहिनंतर हनुमंत सिंग, पतौडी, बोर्डॅ, नाडकर्णी अशी नावे आठवतात. त्यानंतर मात्र ३०-३५ वर्षे अंधार!
धन्य्वाद - नन्द्या७५
धन्य्वाद - नन्द्या७५