दे धक्का !

Submitted by मेधावि on 19 July, 2025 - 04:50

एक कबुली सुरवातीलाच देते. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही. किंबहुना Happy सोयीस्करपणे दोन्हीही आहे. आस्तिक असणं तुलनेनं सोपं असतं. एखाद्या सर्व-शक्तिमान ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या शक्तीवर विश्वासानं सगळं काही सोपवलं की आपण निर्धास्त. अशा वेळी विरोधी भूमिका घेणा-यांकडे पाठ फिरवून त्यांना हुर्र्ऽऽऽ करायला जमलं की झालं. पण तरी कधी काही चुकार प्रश्नांचे भुंगे सतावतात, कोड्यात टाकतात, त्रास देतात, आपल्या श्रद्धास्थानाच्या अस्तित्वावर शंका घेण्यास भाग पाडतात. अशा वेळी आपल्या श्रद्धास्थानावरचं अविचल प्रेम आणि विश्वास आपल्याला तो विरोध मोडून काढण्याची जबरदस्त ताकद देतो आणि मग झालो आपण सर्टीफाईड आस्तिक. सेफ गेम.

नास्तिक असलं की मग बेधडक प्रश्नांना बेधडक उत्तरं देता येतात. भावभावना, नातीगोती सगळं बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ अनुमान काढता येतं. किमान मनातल्या मनात तरी. पण गेम इथंच संपत नाही. त्या अनुमानाशी एकनिष्ठ रहाता येण्यात खरी कसरत असते. मजा म्हणजे इथंही इश्वरी शक्तीचं अस्तित्व दर्शवणारे प्रसंग कधीकधी सामोरे येतात. तेव्हा मग 'योगायोग' किंवा 'कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ' ह्या गोष्टींचा आधार घेऊन त्यां विचारांनाही उडवून लावायला जमलं की झालात तुम्ही सर्टीफाईड नास्तिक.

आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या ह्या द्वंद्वामधे माझा नेहमीच 'सिंपल पेंड्युलम' किंवा 'लंबक' झालेला असतो. मला देवळात जायला आवडतं. तिथलं शांत, सुगंधित, धार्मिक, मंत्रोच्चारीत वातावरण आवडतं. तिथली स्पंदनं आवडतात. पण कुठलातरी नेम पाळण्यासाठी किंवा नवस वगैरेसाठी त्याची सक्ती झाली की त्यातली मजा जाते. देवाचा आधार वाटावा, भिती वाटू नये असं आपलं माझं मत.

आपल्या मनात खोलवर पाप-पुण्याच्या कल्पना रुजलेल्या असतात. जोवर आपण आपल्या मनाच्या साक्षीनं 'योग्य' तो विचार किंवा गोष्ट करतो आहोत तोवर आपल्याला देवाची भिती नाही. पण जेव्हा आपणच आपल्या मनाला न पटणारी गोष्ट करतो तेव्हा ती देवाला आवडणार नाही असं वाटणं हेच 'देव' ह्या कल्पनेचं मूलतत्व असावं. नमस्कार करताना देवाच्या सगुण-साकार मूर्तीद्वारे आपण आपल्या मनाशी, त्यातल्या सुष्ट विचारांशी एकरूप व्हावं, जगण्याच्या कोलाहलात सैरभैर झालेलं मन त्यानं शांत आणि प्रसन्न व्हावं ह्यालाच भक्ती म्हणात असतील का?

कदाचित ह्यामुळेच, कुठल्याही पाॅप्युलर धार्मिक स्थळांना जावं असं मला कधीच वाटत नाही. पंढरपूर, तुळजापूर वगैरे नावं ऐकूनही धडकी भरते. गावची वेस ओलांडल्यापासून सुरू होणारा रिक्षावाल्यांचा, दलालांचा, दुकानदारांचा हल्ला, भुणभूण, पाठलाग हे सगळं खूप निराशाजनक असतं. पैसे देऊन मिळू घातलेलं व्हीआयपी, व्हीव्हीआयपी दर्शन हे पाहून उद्विग्न व्हायला होतं. देवापुढं भक्तांचं डोकं जेमतेम टेकवून, तर कधी 'आपटून' त्यांना रांगेतून पुढं ढकलण्याच्या किंवा हाकलण्याच्या ड्युटीवरचे पोलीस किंवा पुजारी पाहून कधीकधी आहे ती श्रद्धाही डळमळीत होईल की काय असं वाटतं. त्यामुळे नवरात्रात गणपतीला, गणपतीत चतुश्रुंगीला असं जायला मला आवडतं. शांत, निवांत देवळाचा परिसर न्याहाळता येतो आणि छानही वाटतं.

असो....
तर बोलायचं होतं वेगळ्याच गोष्टीबाबत. एक कल्पना बरेच दिवस घोळत होती मनात. ती अशी की, प्रवासाला निघायचं. निघायचं खरं..... पण जर आपल्यालाच माहीत नसेल की आपण कुठे जाणार आहे....तर? म्हणजे स्वतःच स्वतःला सरप्राईज द्यायचं. डबा आणि एक दिवसाचे कपडे घेऊन सकाळी सकाळी बस स्टेशनवर जायचं, समोर उभ्या असलेल्यापैकी एखाद्या बसमधे बसायचं आणि ती नेईल तिकडे जायचं. अगदी अप्रकाशित अशा एखाद्या लहानशा गावात किंवा खेड्यात जायचं. गाव म्हटलं की एखादी नदी, एखादी विहीर, देऊळ, पार, सरकारी शाळा, दवाखाना, एखाद् दुसरं पहाण्यायोग्य किंवा ऐतिहासिक ठिकाण असलं तर बघावं. हाॅटेल मिळालं तर खावं नाहीतर डबा उघडावा. मन रमलं तर रमवावं. नाही रमलं तर घरी परत यावं.

ही कल्पना मैत्रीणींशी बोलून दाखवली खरी पण बोलताक्षणीच त्यांनी ती उचलून धरली आणि लगेचच तारीख-वार ठरवून माझेच परतीचे दोर कापून टाकले.

सकाळी सकाळी स्वारगेट स्थानकावर उभ्या आम्ही तिघी जणी. समोरून आलेली बस होती पुणे-इंदापूर मार्गे -सोलापूर. तिकीट-तिकीट करत आलेल्या कंडक्टरला सांगायला पटकन गावाचं नावच सापडेना.
कं - कुठं जायचंय?
मी -अं.... कुठंही चालेल...
कं - अॅ???
मी - कुठं जायचंय ठरवलंच नाहीये....कुठंही चालेल.....
(कंडक्टर माझ्या चेह-यात कुठं काही गंमत दिसते आहे का ते बघायला लागला. )
मी - मग जरा सावरून.....बरं मग "इंदापूर" ( इंदापूर म्हणजे हर्षवर्धन पाटील, पतपेढ्या, साखर कारखाने, ऊस एवढीच माहीती गाठीशी होती)

तिकीट काढलं. महिला सन्मान योजनेमुळे अर्ध्या तिकीटातला प्रवास, एसी बस, सातच प्रवासी, दोन्ही बाजूस छान हिरवीगार शेतं, पावसाळी हवा असली तरी पाऊस नाही.....वा वा वा वा......हाच आणि असाच प्रवास करायचा होता.... आनंद..आनंद....

इंदापूरला पोचताना मैत्रीण म्हणाली, " मस्त वाटतंय ......असंच जाऊया का पुढे? सोलापूरपर्यंत?"

"चायला, डायरेक्ट सोलापूर???? "
प्रवास तर भारी चाल्लाय. संपूच नये असं वाटतंय. जावं का पुढं? ..अंममम्.....
पण आज येडेपणा करण्याचाच तर दिवस आहे....चालतंय की....चला....सोलापूरला जाऊ.

मी to कंडक्टर - तिकीट सोलापूरपर्यंत कराल का?
कं - आता त्याला एकंदर अंदाज आला होता. "अरे वा....प्लॅन बदलला? जरूर जा. मस्त आहे. अक्कलकोटला पण जा तुम्ही. ते पण मस्त आहे"

तिकटं काढली. पुढचा प्रवास सुरू. शप्पत सांगते, कधी सोलापूर आलं कळलं देखील नाही. एरवी मला पुणंसोलापूर बस दिसली तरी मळमळणं सुरू होतं. पण आजचा दिवस विशेष होता.

सोलापूरला गेलं की मग चांगलं हाॅटेल शोधून जरा निवांत होऊन मग पुढचं ठरवायचं असं ठरलं होतं. पण जसं सोलापूर स्टेशनला उतरलो तसं समोर अक्कलकोटची गाडी समोर उभी आणि कंडक्टर टिकटिक करत अक्कलकोट, अक्कलकोट .. चला चला म्हणत होता. गाडी मोकळीच होती. संमोहीत झाल्याप्रमाणे गाडीत जाऊन बसलो. एक तासात अक्कलकोट. मजा म्हणजे वटवृक्ष मंदीरात पाच मिनिटांत दर्शन झालं इतकी कमी गर्दी होती. परत स्टॅन्ड, परत समोर गाडी उभी...लगेच तासाभरात सोलापूर.

मग हाॅटेल, टिपीकल प्रवासी आकर्षणं, हाॅटेल, खाऊपिऊ, चटणी खरेदी आणि हाॅटेलवर परत. दुस-या दिवशी सकाळी दोन मिनीटात पुण्याची बस मिळाली आणि दुपारपर्यंत घरी परत.

सर्वच धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्या आहेत. स्टेशनला उतरल्यापासूनच नाकाला रुमाल लावावा लागतो. त्यामुळे मी तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट वगैरे ठिकाणी जायचं आजवर कायम टाळत आले आहे.

पण आज मी स्वतःला ब्रह्मांडाच्या हवाली केलं होतं आणि तिथून जी दिशा मिळेल तसा प्रवास करत होते तर मी चक्क ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आले होते. आजही मी आस्तिक आहे का नास्तिक ते मला माहीत नाही पण हा एक दिवसीय अनुभव मात्र भरपूर चमत्काराचा आणि मजेचा होता.

तसंही सिनीअर बच्चनसाहेबांनी म्हटलंच आहे..

मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा...क्योंकी फिर वो इश्वर के मन का होता है.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कल्पना !
असं मनमौजी जगता आलं पाहीजे.

.. असं स्वतःच स्वतःला सरप्राईज द्यायचं…

बेस्ट!

हे जमलं की “आनंदा नाही तोटा“

मस्त कल्पना आहे!
एक उनाड दिवस..

विचार करता लक्षात आले की शाळा कॉलेजात मित्रांसोबत तसे गर्लफ्रेंडसोबत काही प्रमाणात वापरलेली आहे. किंबहुना एकदा मुलीसोबत सुद्धा वापरली आहे. नेहमी चांगल्या आणि अविस्मरणीयच घटना घडतात हा सर्वातील समान धागा. नोंद करून ठेवतो, स्वतंत्र लेखाचा विषय आहे.