
प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676
मी अस्मिच्या रोबोटिक्स टीमची मेंटर आहे. गेल्या तीन वर्षांत माझा रोल हळूहळू बदलला आहे. सुरुवातीला "चला रे, आठवड्यातनं चार ते सहा तास तरी काम करायला हवं या प्रोजेक्टवर, आपली छान टूर्नामेंट होईल" वगैरे मोटिवेट करण्यापासून यावर्षी, "तुम्हाला काही मदत हवी असेल तर आधी सांगून ठेवा म्हणजे मी हात मोकळा ठेवीन" इथपर्यंत गाडी आली आहे.
ही सगळी मुलं खूप काही शिकली रोबोटिक्स टीममधून. नुसती इंजिनिअरिंग स्किल्स नव्हेत, पण टीमबरोबर कसं वागायचं, काम कसं संपवायचं, वेळ आणि क्वालिटी यांचा बॅलन्स, टूर्नामेंटच्यावेळी स्ट्रेस असताना शांत कसं राहायचं... एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टी. खूप कौतुक वाटतं मला या मुलांचं. आताशी हायस्कूलमध्ये आहेत पण कितीतरी अवधानं छान सांभाळतात. शाळा आहेच, त्याबरोबर रोबोटिक्स, आणि आता नवीन म्हणजे समर इंटर्नशिप, रिसर्च प्रोग्राम, युनिव्हर्सिटी प्रोग्राम्स या सगळ्याची ॲप्लिकेशन.. अस्मिच्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये, तिच्यावरचा तिच्या रोबोटिक्सच्या कामाचा प्रभाव मला खूप जाणवला. जाणवलं की गेल्या तीन वर्षांत, जीव तोडून काम केल्यावर मिळणाऱ्या यशाचा मझा तिला समजला आहे!
पण अजून एक महत्त्वाचा धडा शिकायचा राहिला होता.
गेल्या वर्षी अस्मिने आणि सगळ्या टीमनेच खूप काम केलं होतं. मुलं स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गेली, पण अनपेक्षितपणे एका पॉईंटने स्टेट चॅम्पियनशिपची शेवटची मॅच हरली - वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायची संधी अगदी थोडक्यात हुकली.
ही अस्मिची पहिलीच वेळ होती, खूप कष्ट घेतल्यावरही हवं तेवढं यश न मिळण्याची. खेळ म्हटलं की हरणं जिंकणं आलंच. कधीतरी हा धडा शिकायचा होताच तिला, पण तरीही हे हरणं मुलांनाच नाही तर मलाही खूप दुखलं... आता चॉकलेट गोळी देऊन रिझवण्याचेही दिवस तर उरले नाहीत! पुढचे दोन आठवडे थोडे अस्वस्थपणेच गेले.
आणि एका संध्याकाळी मला ऑफिसमध्ये अस्मिचा फोन आला, "आई माझं युनिव्हर्सिटी समर कॅम्प ला सिलेक्शन झालं! I am feeling so happy, so relieved.. I was waiting for something good to happen!!" मग पुढचे दिवस पटपट गेले. ॲप्लिकेशन एक्सेप्ट करा, पुढचे फॉर्म भरा, ईमेलवर कॉन्टॅक्ट करा असं तिचं काही ना काही चालू होतं.
बघता बघता अस्मिला युनिव्हर्सिटीमध्ये सोडायचा दिवस आला. आम्ही कॅम्पसवर थोडं लवकरच पोहोचलो. सुरेख हिरवंगार कॅम्पस. आम्ही तिथे सायकलने आणि पायी पायी भटकलो. तिथल्या आयकॉनिक जागांसमोर फोटो काढले, तिथल्या मेसमध्ये जेवलो. मुलांना राहायला छान टुमदार हॉस्टेल्स, चालायला केलेल्या पायवाटा, सायकलीचे ट्रॅक आणि मुख्य म्हणजे सगळ्या मुलांचा सळसळता उत्साह बघून जीव सुखावून गेला.
मला अस्मिचा खूप अभिमान वाटला. मी तिला म्हणाले, "खूप छान हँडल केलीस बाबू तू ॲप्लिकेशन, इतका कमी एक्सेप्टन्स रेट आहे, मला खूप कौतुक वाटतं तुझं!" ती पटकन म्हणाली, "आई मी खूप खुश आहे ग इथे यायला मिळालं म्हणून. It's a privilege! पण मी लक्षात ठेवीन की मी इथली ॲव्हरेज स्टुडन्ट असेन. इथे सगळेच त्याच ॲप्लिकेशन प्रोसेसमधून आले ना!" दोन मिनिटं थांबून ती म्हणाली, "आई, मी खूप विचार केला. मागच्या रोबोटिक सीजनला मी काम भरपूर केलं होतं, पण, मी रिजनल चॅम्पियनशिप नंतर कोड परफेक्ट करण्यात खूप जास्त वेळ घालवला आणि स्कोर वाढवण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. किती स्कोरवर कोड थांबावं याचा माझा अंदाज चुकला. बाकीच्या टीम्सना मी कदाचित अंडर एस्टीमेट केलं असं वाटतंय आता.. यानंतर मी खूप काम करीन पण कॉम्पिटिशन अंडर एस्टीमेट करण्याची चूक करणार नाही..." मी तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिले. तिने इतका विचार केला असेल असं वाटलंच नव्हतं मला. किती मोठी झाली माझी बाहुली!
बोलता बोलता आम्ही हॉस्टेलच्या समोर आलो होतो. निघायची वेळ झाली होती. तिने सायकल लॉक केली, मला मिठी मारली, आणि "बाय आई! Love you!" म्हणून उड्या मारत तिच्या ग्रुप मीटिंगसाठी गेली सुद्धा! तिच्या त्या लॉक केलेल्या सायकलकडे पाहता पाहता मला तिला सायकल चालवायला शिकवली तेव्हाची आठवण झाली. तेव्हा "आई सीट सोडू नको हां" म्हणणारी अस्मि.. आणि आज उतारावरून भरधाव जाताना खिदळणारी अस्मि.. माझ्या हातातून सायकलची सीट सुटली आहे. अस्मिने वेग पकडला आहे. माझ्या मनात "दाटून कंठ येतो, जा लाडके सुखाने.." वाजतंय आणि अस्मि गुणगुणत असेल, "This girl is on fire.."
छानच लिहिला आहे अस्मिचा
छानच लिहिला आहे अस्मिचा प्रवास. .. अस्मिला शुभेच्छा ...
सुंदर लिखाण.
सुंदर लिखाण.
Thank you शर्मिला आणि
Thank you शर्मिला आणि मनीमोहोर!
अस्मिला शुभेच्छा.
अस्मिला शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच, सकारात्मक किस्सा.
Thank you सामो!
Thank you सामो!
छान लिहिलयं..!
छान लिहिलयं..!
खूप सुंदर लिहिलंय..... आय कुड
खूप सुंदर लिहिलंय..... आय कुड कोरिलेट