सिल्व्हर लायनिंग

Submitted by मनीमोहोर on 13 July, 2025 - 11:04

सिल्व्हर लायनिंग

पाऊस म्हटलं की कोकणातल्या घरातल्या माजघरातला हवावसा वाटणारा, मन शांत करणारा अंधार, हिरवीगार भातशेती, पडवळ , काकडी, कारल, भोपळा ह्यांचे परसदारी घातलेले मांडव, सोनटक्का, तेरडा, अनंत , गुलाब चाफा ह्यांनी फुललेलं आगर, दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या , तुडुंब भरलेल्या विहिरी, निसर्गाच्या सान्निध्यात साजरे होणारे नागपंचमी , बैलपोळा, गोकुळ अष्टमी ह्या सारखे सण उत्सव ह्यांच्या आठवणी मनात गर्दी करायला लागतात.

आमची कोकणातली भातशेती.
IMG-20250706-WA0017.jpg

पावसामुळे हिरवेगार झालेले डोंगर, खळाळणारे झरे, रिमझिम किंवा धुवाधार कोसळणारा पाऊस, सतत आपला आकार बदलत राहणारे आकाशातले कृष्णमेघ , कधी तरी त्यातून डोकावणाऱ्या सूर्यामुळे त्या काळया ढगाना मिळालेली सिल्व्हर लाइन ची किनार, ऊन पावसाचा खेळ , इंद्र धनुची कमान वगैरे वगैरे अनेक गोष्टी आठवून मन आनंदी होत असलं तरी तुम्ही जर शहरात राहत असाल तर चार चार दिवस न वाळणारे कपडे, त्यांचा घरात भरून राहिलेला कुबट वास, दमट हवा हीच वास्तविकता असते. आणि त्यातून ही ते शहर जर मुंबई असेल आणि तुम्ही ट्रेन प्रवास करून रोज ऑफिस गाठत असाल तर मग विचारायलाच नको. पावसाळा
आला की मला माझे नोकरीचे दिवस आठवतात. आज ही घराच्या गॅलरीतून पाऊस बघताना ही कधी कधी मनाने मी १३८ ची सफर करून येते आणि ताजी तवानी होते. त्याची ही गोष्ट.

रात्रभर कोसळणाऱ्या पावसानेच एखादा दिवस उजाडतो. काळोखी भरून आलेली असते. आठ वाजले तरी सूर्यदर्शन होत नाही. रोजची सकाळची कामं करताना ही “ आज जाऊ या की नको ऑफिसला “ अशी दोलायमान स्थिती असते. पावसाचा जोर कायमच असतो. गाड्या असतील ना ?वाटेत पाणी भरून अडकणार तर नाही ना ? सकाळी पोचले व्यवस्थित तरी संध्याकाळी काय परिस्थिती असेल ? गाड्या बंद पडतील का ट्रॅक वर पाणी साचल्यामुळे ? अश्या विचारांच्या तंद्रीतच “ काय होईल ते होईल “ असा मनाचा हीय्या करून घराबाहेर पडते. रस्त्यातील खड्ड्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दाम रिक्षा नेऊन आपल्या अंगावर ते घाण पाणी उडवणाऱ्या रिक्षावाल्याना चुकवत चुकवत , छत्री, पर्स सांभाळत चिंब भिजलेल्या अवस्थेत कसे बसे स्टेशनवर पोचतो तर तिथे सुखावह, अनपेक्षित धक्काच बसतो. गाड्या थोड्या उशीराने धावत असतात पण निदान आहेत हे तरी काय कमी आहे असा विचार करत असतानाच चक्क एक रिकामी गाडी येते आणि बसायला ही जागा मिळते .

अर्धी लढाई जिंकल्याच्या आनंदात असतानाच गाडी सुरू होते. अपेक्षे पेक्षा प्रवास सुरळीत होऊन मी ऑफिसमध्ये पोचते. आज धुवाधार पावसामुळे उपस्थिती कमीच असते ऑफिसमध्ये. कामाच्या व्यापात संध्याकाळ होते तेव्हा मात्र पाऊस, गाड्यांचा गोंधळ या सगळ्याची जाणीव होऊन थोडी काळजी वाटते परतीच्या प्रवासाची.

बसस्टॉप वरील चणे वाल्याकडून एक गरमागरम चण्याची पुडी घेऊन मी १३८ नंबरच्या डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर अगदी पुढच्या सीटवर बसते. आज बसमध्ये ही गर्दी कमीच असते पावसामुळे. रस्ते ओले असतात. ट्रॅफिक जास्त नसतो. बस एका लयीत एकेक स्टॉप घेत जात असते. हातातले गरम चणे ही एकेक करून तोंडात जात असतात. पुढच्या ट्रेन प्रवासाची वाटणारी काळजी कधी संपते आणि मुंबईच सौंदर्य उलगडून दाखवणारा तो कफ परेड ते व्हीटी हा छोटासा प्रवास मी कधी एन्जॉय करू लागते ते माझं मलाच कळत नाही.

प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेडच्या बहुमजली इमारती, पुढे मंत्रालय, आमदारांचे टुमदार बंगले असं पास करत गाडी टर्न मारून मरीन ड्राईव्ह ला वळली की समुद्राचं दर्शन होत. आणि एकदम मोकळ मोकळं वाटायला लागत. भरून आलेलं आभाळ, हवेतला थोडासा गारवा, रिमझिम किंवा मुसळधार पडणारा पाऊस, खवळलेला समुद्र, कठड्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा, अमिताभ मौसमी च्या " रिमझिम गिरे " ची आठवण करून देणारी पावसात भिजणारी किंवा एका छत्रीत चालणारी तरुणाई , पावसात तसाच कुडकुडत उभा राहून कणसं, चहा विकणारा एखादा गरीब मुलगा , त्याचे रसरसलेले कोळसे, फुटपाथवर वाऱ्याने घुसळून निघणारी बॅरिंगटोनियाची छोटी छोटी झाडं , तिथल्या आर्ट डेको बिल्डिंग मधल्या बाल्कनीत उभा राहून समुद्र आणि पाऊस बघत गरम चहाचे घोट घेणारा कोणी एखादा पारशी बाबा, लांबवर दिसणारी मलबार हिल आणि पावसात धूसर दिसणारा राणीच्या गळ्यातला हार ... सगळंच मंत्रमुग्ध करणारं

मरीन ड्राइव्ह ( नेट वरून साभार )
603642411_f2a917cb5c_b.jpg

हा प्रवास असतो फार फार तर दहा मिनिटाचा पण अक्षरशः वेड लावणारा , एरवी नावडत्या असणाऱ्या मुंबईच्या प्रेमात पाडणारा…. बस चर्चगेट फाऊंटन करत करत कॅपिटॉल च्या गल्लीतून व्हीटी कडे येते. एरवी लाल सिग्नल मिळाला की गेली आयुष्यातली दोन मिनिटं (हाहा ) म्हणून वैतागणाऱ्या मला इथला सिग्नल मात्र लालचं मिळावा असं अगदी मनातून वाटत. कारण ऊन पावसाशी सामना करत इतके वर्ष उभी असलेली, मुंबईच्या इतिहासाची मूक भागीदार आणि साक्षीदार असलेली, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ,मुंबई शहराच वैभव असलेली, गॉथिक शैलीतली व्हीटीची ती भव्य इमारत , तिथलं घड्याळ वरच्या डेक वरून फार सुंदर दिसत. एवढच कशाला ओल्या रस्त्यावर पडलेलं तिचं प्रतिबिंब ही तेवढंच किंवा काकणभर अधिकच जास्त सुंदर दिसत. हा छोटासा प्रवास इतका आनंद देणारा असतो की घरी पोचे पर्यंत पुढे झेलावे लागणारे गाड्यांचे गोंधळ , गर्दी, उशीर, घाण, चिखल वैगेरेच काही वाटत नाही.

रोजचा ऑफिसला जाण्याचा हा खरं तर नीरस , कंटाळवाणा, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ही दमवणारा प्रवास पण त्यात ही कधी तरी असे सुखद ,कायम लक्षात राहतील असे क्षण अनुभवता येतात हे माझं भाग्यच म्हणायचं. Every cloud has a silver lining ह्या वचनाची प्रचिती देणारे हे क्षण रोजचा तोच तो प्रवास आनंदाने करण्याची ऊर्जा देऊन जातात. . फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे असायला हवेत.

(बेस्ट च्या १३८ नंबर च्या बसने प्रवास करणाऱ्या सर्वांना समर्पित)

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो आहेत. आताच चेक केले. जुन्या गेल्या आहेत आणि नवीन एसी डबल-डेकर बस आल्या आहेत. किंबहुना वर जी मी लिंक दिली आहे त्यात बहुधा त्याच बसचा फोटो काढला आहे Happy म्हणजे त्या रूटवर सुद्धा आहेत. फक्त वरच्या मजल्यावरील पुढच्या खिडकीची मजा नसेल त्यात.

मलाही डबलडेकर बसमधे पुढची सीट आवडते. मुंबईत बसने तसा कमी प्रवास केलाय. विटी (आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते झावबावाडी. तिथे आतेकडे रहायला गेल्यावर, गेटवे वगैरे.

एकदा आईच्या मामीकडे सायनला गेलेले दोन दिवस रहायला, तिने सायन दादर वडाळा वगैरे फिरवलेलं. नंतर ठाण्यात नोकरी करताना बसने जायचे पण डबलडेकर नव्हती.

सुंदर लेख!

कित्येक वर्षे लोटली तो भाग फिरण्याला.

डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर अगदी पुढच्या सीटवर बसते. >>> अगदी अगदी. बेस्टमधली बेस्ट सीट असते ती.....
+१.

अस्मिता, मामी, ऋन्मेष, माझे मन, अंजू देवकी धन्यवाद.
अस्मिता, धन्यवाद, तुझं. नाव ही आवडलं रुपेरी आणि कृष्णमेघ हे दोन्ही शब्द बेटर आहेत.
प्रश्न : मुंबई, मरीन ड्राईव, पावसाळा, ???
उत्तर : रिमझिम गिरे सावन. ----- इतकं घट्ट असोसिएशन आहे हे. >> अगदीच अनुमोदन ह्याला मामी. . आणि इतकी वर्ष होऊन ही हे गारूड कायम आहे अजून.
डबल डेकर बस जुन्या बंद झाल्या आहेत पण ac डबल डेकर चालू आहेत अजून. पुढच्या सीटला काच असेल बहुत करून त्यामुळे बाहेरचा नजारा दिसेल पण खिडकी नसल्याने वर खाता येणार नाही असं वाटतंय. मी AC डबल डेकर ने प्रवास नाही केलाय अजून. पण वरच्या डेक च्या सर्वात पुढच्या सीट ची मजा स्वतःच्या गाडीने फिरण्यात ही नाही. असो.

Pages