
सिल्व्हर लायनिंग
पाऊस म्हटलं की कोकणातल्या घरातल्या माजघरातला हवावसा वाटणारा, मन शांत करणारा अंधार, हिरवीगार भातशेती, पडवळ , काकडी, कारल, भोपळा ह्यांचे परसदारी घातलेले मांडव, सोनटक्का, तेरडा, अनंत , गुलाब चाफा ह्यांनी फुललेलं आगर, दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या , तुडुंब भरलेल्या विहिरी, निसर्गाच्या सान्निध्यात साजरे होणारे नागपंचमी , बैलपोळा, गोकुळ अष्टमी ह्या सारखे सण उत्सव ह्यांच्या आठवणी मनात गर्दी करायला लागतात.
आमची कोकणातली भातशेती.
पावसामुळे हिरवेगार झालेले डोंगर, खळाळणारे झरे, रिमझिम किंवा धुवाधार कोसळणारा पाऊस, सतत आपला आकार बदलत राहणारे आकाशातले कृष्णमेघ , कधी तरी त्यातून डोकावणाऱ्या सूर्यामुळे त्या काळया ढगाना मिळालेली सिल्व्हर लाइन ची किनार, ऊन पावसाचा खेळ , इंद्र धनुची कमान वगैरे वगैरे अनेक गोष्टी आठवून मन आनंदी होत असलं तरी तुम्ही जर शहरात राहत असाल तर चार चार दिवस न वाळणारे कपडे, त्यांचा घरात भरून राहिलेला कुबट वास, दमट हवा हीच वास्तविकता असते. आणि त्यातून ही ते शहर जर मुंबई असेल आणि तुम्ही ट्रेन प्रवास करून रोज ऑफिस गाठत असाल तर मग विचारायलाच नको. पावसाळा
आला की मला माझे नोकरीचे दिवस आठवतात. आज ही घराच्या गॅलरीतून पाऊस बघताना ही कधी कधी मनाने मी १३८ ची सफर करून येते आणि ताजी तवानी होते. त्याची ही गोष्ट.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसानेच एखादा दिवस उजाडतो. काळोखी भरून आलेली असते. आठ वाजले तरी सूर्यदर्शन होत नाही. रोजची सकाळची कामं करताना ही “ आज जाऊ या की नको ऑफिसला “ अशी दोलायमान स्थिती असते. पावसाचा जोर कायमच असतो. गाड्या असतील ना ?वाटेत पाणी भरून अडकणार तर नाही ना ? सकाळी पोचले व्यवस्थित तरी संध्याकाळी काय परिस्थिती असेल ? गाड्या बंद पडतील का ट्रॅक वर पाणी साचल्यामुळे ? अश्या विचारांच्या तंद्रीतच “ काय होईल ते होईल “ असा मनाचा हीय्या करून घराबाहेर पडते. रस्त्यातील खड्ड्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दाम रिक्षा नेऊन आपल्या अंगावर ते घाण पाणी उडवणाऱ्या रिक्षावाल्याना चुकवत चुकवत , छत्री, पर्स सांभाळत चिंब भिजलेल्या अवस्थेत कसे बसे स्टेशनवर पोचतो तर तिथे सुखावह, अनपेक्षित धक्काच बसतो. गाड्या थोड्या उशीराने धावत असतात पण निदान आहेत हे तरी काय कमी आहे असा विचार करत असतानाच चक्क एक रिकामी गाडी येते आणि बसायला ही जागा मिळते .
अर्धी लढाई जिंकल्याच्या आनंदात असतानाच गाडी सुरू होते. अपेक्षे पेक्षा प्रवास सुरळीत होऊन मी ऑफिसमध्ये पोचते. आज धुवाधार पावसामुळे उपस्थिती कमीच असते ऑफिसमध्ये. कामाच्या व्यापात संध्याकाळ होते तेव्हा मात्र पाऊस, गाड्यांचा गोंधळ या सगळ्याची जाणीव होऊन थोडी काळजी वाटते परतीच्या प्रवासाची.
बसस्टॉप वरील चणे वाल्याकडून एक गरमागरम चण्याची पुडी घेऊन मी १३८ नंबरच्या डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर अगदी पुढच्या सीटवर बसते. आज बसमध्ये ही गर्दी कमीच असते पावसामुळे. रस्ते ओले असतात. ट्रॅफिक जास्त नसतो. बस एका लयीत एकेक स्टॉप घेत जात असते. हातातले गरम चणे ही एकेक करून तोंडात जात असतात. पुढच्या ट्रेन प्रवासाची वाटणारी काळजी कधी संपते आणि मुंबईच सौंदर्य उलगडून दाखवणारा तो कफ परेड ते व्हीटी हा छोटासा प्रवास मी कधी एन्जॉय करू लागते ते माझं मलाच कळत नाही.
प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेडच्या बहुमजली इमारती, पुढे मंत्रालय, आमदारांचे टुमदार बंगले असं पास करत गाडी टर्न मारून मरीन ड्राईव्ह ला वळली की समुद्राचं दर्शन होत. आणि एकदम मोकळ मोकळं वाटायला लागत. भरून आलेलं आभाळ, हवेतला थोडासा गारवा, रिमझिम किंवा मुसळधार पडणारा पाऊस, खवळलेला समुद्र, कठड्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा, अमिताभ मौसमी च्या " रिमझिम गिरे " ची आठवण करून देणारी पावसात भिजणारी किंवा एका छत्रीत चालणारी तरुणाई , पावसात तसाच कुडकुडत उभा राहून कणसं, चहा विकणारा एखादा गरीब मुलगा , त्याचे रसरसलेले कोळसे, फुटपाथवर वाऱ्याने घुसळून निघणारी बॅरिंगटोनियाची छोटी छोटी झाडं , तिथल्या आर्ट डेको बिल्डिंग मधल्या बाल्कनीत उभा राहून समुद्र आणि पाऊस बघत गरम चहाचे घोट घेणारा कोणी एखादा पारशी बाबा, लांबवर दिसणारी मलबार हिल आणि पावसात धूसर दिसणारा राणीच्या गळ्यातला हार ... सगळंच मंत्रमुग्ध करणारं
मरीन ड्राइव्ह ( नेट वरून साभार )
हा प्रवास असतो फार फार तर दहा मिनिटाचा पण अक्षरशः वेड लावणारा , एरवी नावडत्या असणाऱ्या मुंबईच्या प्रेमात पाडणारा…. बस चर्चगेट फाऊंटन करत करत कॅपिटॉल च्या गल्लीतून व्हीटी कडे येते. एरवी लाल सिग्नल मिळाला की गेली आयुष्यातली दोन मिनिटं (हाहा ) म्हणून वैतागणाऱ्या मला इथला सिग्नल मात्र लालचं मिळावा असं अगदी मनातून वाटत. कारण ऊन पावसाशी सामना करत इतके वर्ष उभी असलेली, मुंबईच्या इतिहासाची मूक भागीदार आणि साक्षीदार असलेली, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ,मुंबई शहराच वैभव असलेली, गॉथिक शैलीतली व्हीटीची ती भव्य इमारत , तिथलं घड्याळ वरच्या डेक वरून फार सुंदर दिसत. एवढच कशाला ओल्या रस्त्यावर पडलेलं तिचं प्रतिबिंब ही तेवढंच किंवा काकणभर अधिकच जास्त सुंदर दिसत. हा छोटासा प्रवास इतका आनंद देणारा असतो की घरी पोचे पर्यंत पुढे झेलावे लागणारे गाड्यांचे गोंधळ , गर्दी, उशीर, घाण, चिखल वैगेरेच काही वाटत नाही.
रोजचा ऑफिसला जाण्याचा हा खरं तर नीरस , कंटाळवाणा, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ही दमवणारा प्रवास पण त्यात ही कधी तरी असे सुखद ,कायम लक्षात राहतील असे क्षण अनुभवता येतात हे माझं भाग्यच म्हणायचं. Every cloud has a silver lining ह्या वचनाची प्रचिती देणारे हे क्षण रोजचा तोच तो प्रवास आनंदाने करण्याची ऊर्जा देऊन जातात. . फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे असायला हवेत.
(बेस्ट च्या १३८ नंबर च्या बसने प्रवास करणाऱ्या सर्वांना समर्पित)
हेमा वेलणकर
मुंबईतल्या रादर साऊथ
मुंबईतल्या रादर साऊथ मुंबईतल्या पावसाचं अप्रतिम वर्णन केलं आहेत ममो.
मुंबईतला पाऊस म्हणजे अंबानीच्या बंगल्यापासून बैठ्या चाळीपर्यंत निळं प्लास्टिक, हवेतल्या प्रदुषणामुळे काळा झालेला चिखल, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतानाची चिकचिक यामुळे फारसा आवडला नव्हता जोपर्यंत पावसातली साऊथ मुंबई बघितली नव्हती.
तुम्ही वर्णन केलेला परीसर म्हणजे मुंबईचं वैभव. त्या परीसरात असंही फिरायला आवडतं. त्यात पाऊस म्हणजे एखाद्या सुंदर ललनेने शुचिर्भूत होऊन फिरावं. धो धो पाऊस असो की रिमझिम सगळाच परीसर नितळ होत जातो. उगीच नाही रिमझिम गिरे सावन इतकी वर्षं लोकांना भुरळ घालतं आहे.
सोनसळी उन पडलेलं असावं व क्षितीजावर ढग भरून आलेले असावेत आणि मुंबईत दुर्मिळ असा गार वारा खात एनसीपीएच्या टोकाला लाटांचा आवाज ऐकत बसावं यासारखं सुख नाही.
माझेमन, धन्यवाद पहिलाच
माझेमन, धन्यवाद पहिलाच प्रतिसाद आणि तो इतका सुंदर... तुझ्या प्रतिसादामुळे धाग्याची शोभा वाढली आहे. काय काय म्हणून कोट करू ?
तुम्ही वर्णन केलेला परीसर म्हणजे मुंबईचं वैभव. त्या परीसरात असंही फिरायला आवडतं. त्यात पाऊस म्हणजे एखाद्या सुंदर ललनेने शुचिर्भूत होऊन फिरावं. >> हे फार आवडलं.
मस्त!
मस्त!
मरीन ड्राईव्ह फोटो कमाल आला आहे. अगदी सिम्बॉलिक!
आम्ही असेही बरेचदा तिथे पडीक असतो, अगदी मध्यरात्री दीड दोन वाजताही. पण पावसात वेगळीच मजा असते. म्हणजे मुद्दाम भिजायला जावे तर तिथेच. एकदा तर इतका वेड्यासारखा कोसळत होता आणि आम्ही इतकी धमाल केली की केवळ अर्ध्या तासात दिवस अविस्मरणीय झाला. नंतर इतका वारा सुटला की मुलगा आपण उडून जातोय की काय म्हणून घाबरला तेव्हा निघालो. आजही त्याचे ते घाबरणे आठवून आम्ही हसतो.
पण त्यानंतर सुद्धा त्याला तिथे जायचेच असते. आणि त्या कट्ट्यावर बसायचेच असते. जादूच वेगळी आहे या जागेची.
मस्त लिहिलंय... एकदम
मस्त लिहिलंय... एकदम डोळ्यासमोर आलं पावसातील ठाणे स्टेशन, गाड्यांना कमी गर्दी, भिजलेल्या आणि स्वच्छ दिसणाऱ्या बस, त्याच्या काचांवरून निथळणारे पाणी...


हा घ्या झब्बू. पावसातला नाही, पण तीन चार वर्षांपूर्वी १३८ चा काढलेला आहे.
हाच बसचा फोटो तुम्ही डबल डेक
हाच बसचा फोटो तुम्ही डबल डेक बस बंद झाल्याच्या धाग्यावर शेअर केला होता ना..
मस्तः
मस्तः
१३८, १०८ ह्या पावसाळ्यात फिरण्यासाठी आवडत्या बसेस. डिप्लोमा करताना जुन जुलै मध्ये सुट्टी असताना १०८ मधुन शेवटच्या स्टॉप पर्यन्त जाउन परत येत होतो.
रिमझिम गिरे सावन हे आवडते गाणे. आजही हे गाणे बर्यापैकी रिलेट होतेय.
व्वा ममोताई एकदम सुंदर लेख.
व्वा ममोताई एकदम सुंदर लेख.
मी १३८ ने प्रवास फारच मोजक्या वेळा केला पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या जागा अगदी जशाच्या तश्या अनुभवल्या.
पावसात सुस्नात झालेली मुंबई पाहावी तर ती इथे.
.....बरेचदा पाऊस रिमझिम पडायला लागला की ऑफिसमधून आम्ही मुद्दाम जायचो इथे. भिजायला.
गरम चणा शेंगदाण्याची पुडी किंवा लिंबू तिखट मीठ लावलेलं भाजलेलं कणीस नक्कीच हवं.
मस्त लेख .
मस्त लेख .
… प्रेसिडेंट हॉटेल, कफ
… प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेडच्या बहुमजली इमारती, पुढे मंत्रालय, आमदारांचे टुमदार बंगले असं पास करत गाडी टर्न मारून मरीन ड्राईव्ह ला वळली की समुद्राच दर्शन….
मुंबईचा हा भाग म्हणजे ❤ मनाने फिरून आलो लागलीच.
सुंदर लिहिलेत.
आता पावसातली मुंबई म्हणजे गटारगंगा आणि नागरिकांचे निर्दयी टॉर्चर तेव्हढे उरले आहे.
मस्तच लेख हेमाताई!
मस्तच लेख हेमाताई!
मुंबईत (समजत्या वयात) जी काही ३-४ वेळा येऊन गेले तेव्हा हिवाळा वगैरे होता, त्यामुळे पावसाची फक्त वर्णनं ऐकून होते. अनुभवला नाही कधीच.
माझेमन, सुरेख पोस्ट!
मी जर कधी पावसाळ्यात मुंबईत आले तर मला क्वीन्स नेकलेसला फिरवून आण.
११वी असताना जेव्हा आले होते तेव्हा आत्तेने मला फोर्ट, मंत्रालय, तिची RBI वगैरे हिंडवून आणली होती. म्हणजे बाहेरच्या बाहेरच, कारण बाकीपण कामं होती. आणि मला लोकल ट्रेन जमली नाही तर पार बोरिवलीपर्यंत बसने जायचं तर वेळ लागणारच होता.
लेख खूप आवडला.
लेख खूप आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.
मस्त लिहिलेय…. ही मुंबै मला
मस्त लिहिलेय…. ही मुंबै मला खुप आवडते. कालपरवाच विचार करत होते की आता मुंबैला गेले की दादर शिवाजीपार्क करुन, प्रकाशचा साबुदाणा वडा खाऊन थेट गेटवे गाठायचा आणि उगीच तिथे फिरत राहायचे.
मागे एकदा मी व ऐशु असेच गेलो होतो बॅलार्ड एस्टेट वगैरे भाग फिरुन आलो, तिथल्या एका दगडी इमारतीत माझे विमकोचे ऑफिस होते, ऐशुला ती बिल्डिंग व मी बसायचे त्या भागातली खिडकी खालुन दाखवली, जिथे अधुन मधुन जायचो ते सिटी किचन दाखवले. ब्रिटानियामध्ये जाऊन बेरी पुलाव खाल्ला
अधुन मधुन हे करायला हवे. nostalgia is a very sweet medicine.
मस्त! मला मुंबई निवांत
मस्त! मला मुंबई निवांत फिरायची आहे एकदा!
सुंदर माझ्याही मुंबईतल्या
सुंदर. माझ्याही मुंबईतल्या आठवणी ताज्या झाल्या. कॉलेज दिवसात एमलेस वॉन्डरिंग ऊर्फ भटकन्ती. पायी केलेली. चर्चगेटला उतरून कधी विद्यापीठातून निघाल्यावर वस्तुसंग्रहालय ऊर्फ म्यूझियम नाहीतर रीगलला उजवीकडे वळून नेव्हीनगर पर्यंत चालत. पदपथावरच्या फेरीवाल्यांकडची बहुढंगी गिर्हाइके - हिप्पी खूप असत तेव्हा, इलेक्ट्रीक हाऊस जवळच्या दिल्ली दरबारचे रुचकर पदार्थ, स्ट्रॅन्ड सिनेमा, टीआयएफआरचा सुंदर परिसर आठवतो आहे. पदपथावर बहुतेक वेळा छत्री पण उघडावी लागत नाही. इतर ठिकाणी पावसाळ्यात वारा जोरदार. परत येतांना मधल्याच कुठल्या तरी गल्लीतून विद्यापीठाच्या टोकाच्या इन्स्टीटयूट ऑफ सायन्स समोरच्या बागेत.
कधी विद्यापीठासमोरच्या कंदील हॉटेलशेजारच्या गल्लीतून डावीकडे येऊनटाकसाळ, एशियाटीक लायब्ररी, मेडोज सर्कल करीत म्यूझियम - पायी भटकन्ती.
पावसाळ्यात छत्री सांभाळत लिंबू-मीठ विलेपित भुट्टा ऊर्फ कणीस आलेच.
नंतर ओल्ड कस्टम हाऊस, मंत्रालय इथे नोकरीतल्या कामानिमित्त जाणे असे. कंपनीचे वाहन अंधेरीला सोडले की रेलवेने चर्चगेट. वेळेआधी पोहोचलो तर टीपी म्हणून सत्यम कलेक्शन.
नंतर चि. छोटा असतांना त्याच्याबरोबर भटकन्ती केली. विविध ऋतूत. त्याही आठवणी आहेत.
सर्वात हळवी आठवण म्हणजे ओल्ड कस्टम हाऊससमोर एक इराणी रेस्तराँ होते. तिथे मारिओ मिरांडाचे म्हणजे त्याने काढलेले भलेमोठे म्हणजे सहा ते आठ फूट उंच आणि पंधरावीस फूट डावीकडून उजवीकडॅ चित्र होते. ते हॉटेल काही वर्षापूर्वी बंद झाले.
फार लिहिले. इथेच थांबतो.
गोष्ट मुंबईची या यू ट्यूब मालिकेत सारी मुंबई दाखवली आहे. जरूर पाहा.
सुंदर लेखाबद्दल, फोटोंबद्दल धन्यवाद
छान लिहिलंय. हे मी आहे हे
छान लिहिलंय. हे मी आहे हे सांगणार्या, पण गाड्या बंद पाडण्याइतपत न पडणार्या पावसाचं वर्णन आहे, त्यामुळे सुखद आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पाऊस असाच पडायचा ना?
पाऊस असला की गाड्या असतील की नसतील, किती लेट इ. प्रश्न तसेच दबा धरून उभे असत.
माझं पहिलं ऑफिस न्यु मरिन लाइन्स. दुसरं जमशेटजी टाटा रोडवर. तिसरं वर्ल्ड ट्रेड सेंटर. दुसर्या ऑफिसात शनिवारी कामाला आलो, तर लंच टाइम मध्ये बाहेर पडून मरिन ड्राइव्हच्या दिशेने चक्कर असे. एका पावसाळ्यात लाटांचे तुषार थेट रस्त्याच्या या बाजूलाही अनुभवलेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटर जायला यायला चर्चगेटहून स्पेशल बसेस होत्या. बराचसा रूट १३८ चा. पावसाळ्यात बधवार पार्क मच्छिमार वसाहतीत किनार्यावर आणून ठेव लेल्या नौका लक्ष वेधून घेत.
कफ परेडला जोराचा वारा असला की छत्र्या उलट्यापालट्या होत, क्वचित कोणाच्या ओढण्या उडून जात. ऑफिस २९ व्या मजल्यावर. त्यामुळे खिडकीतून पावसाळी ढग समोर दिसत.
संध्याकाळी उशिरा निघालो की १३८ घ्यावी लागे. वरच्या डेकवर बसून वार्याची मजा घ्यावी असं कधी वाटलं नाही. पण माझा एक बॉस लखनौहून आला होता. त्याला मात्र वरच्या डेकवरची पहिली सीटच हवी असे.
पावसामुळे गाड्या बंद पडल्याच्या दोन आठवणी आहेत. दोन्ही शनिवारच्याच आहेत. एकदा गाड्या बंद पडल्या. पण आम्ही निघेतो पाऊस ओसरला होता. तेव्हा बेस्टने युनिव्हर्सिटी जवळून अंधेरीसाठी स्पेशल बसेस सोडल्या होत्या. तिथवर जाताना दोघा सहकर्मींच्या अंगात शाळकरी मुलं संचारली आणि छत्रीचं पाणी उडवणं, साचलेल्या पाण्यात मुद्दाम उड्या मारणं असे त्यांचे प्रकार चालले होते. तेव्हा आपण यांच्याबरोबर नाही असं इतरांना दाखवायचं आणि आपल्याला हे आवडत नाही हे त्या दोघांना दिसणार नाही, अशी कसरत करावी लागली.
तर त्या बसचं तिकीट सरसकट दहा रुपये. ठेवलं होतं हे २००० सालाच्या आधीचं आहे. अंधेरीहून गाड्या आहेत आणि नेहमीच्या तुलनेत रिकाम्या आहेत, असा सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता.
इथे सुखद आठवणीच लिहायच्या आहेत त्यामुळे पावसात अडकल्याची आठवण लिहीत नाही.
वर्ल्ड ट्रेड सेंटर >>> व्वा!
वर्ल्ड ट्रेड सेंटर >>> व्वा! तिथून थोडं पुढं गेले की मेकर टॉवर्सला लागून एक छोटं गार्डन कम वॉकिंग ट्रॅक आहे. ठराविक वेळेलाच उघडतं. समोर जेट्टी आहे. त्यामुळे लाटाही फार उसळत नाहीत. मेकर टॉवरवाल्यांचा हेवा वाटतो या जागेसाठी.
बधवार पार्ककडे पाहताना मात्र २६/११ विसरता येत नाही.
छान लिहिलंय, फोटोही मस्त!
छान लिहिलंय, फोटोही मस्त! मनाने फिरून आले डबलडेकरमधून!
ती एक १३५पण होती ना मरीन ड्राइव्हवरून जाणारी? की मला चुकीचा नंबर आठवतो आहे?
शाळेतून ती घेऊन कैवल्यधामला जात असे मी. वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटायचं पावसाळ्यात या भागात.
आता गर्दी (आणि उकाडाही) खूप वाढल्याचं जाणवतं.
ऋन्मेष , अनिंद्य , जाई ,
ऋन्मेष , अनिंद्य , जाई , ऋतुराज, साहिल शहा, अमितव, साधना, शर्मिला, मंजू, प्रद्न्या, भरत, सुधीर कांदळकर, स्वाती, वावे सर्वांना धन्यवाद ... सगळ्यांचे प्रतिसाद , आठवणी खूप छान.
अमितव १३८ बॅकबे ते cst ही पाटी ही स्पष्ट दिसतेय फोटो मध्ये. छानच आलाय फोटो. १३८ नंबरची बस च खरी हिरॉईन आहे ह्या धाग्याची.
व्हीटी ला येतानाच हा नजरा दिसत असे. WTC ला जाताना राणीचा हार मागे राहत असे , त्यामुळे दिसत नसे. फक्त थोडासा NCPA चा तुकडा तेवढा दिसत असे. तसेच दोन नंबरची एक स्पेशल बस ही असे व्हीटी ते WTC अशी पण ती कुपरेज वरून जाई त्यामुळे समुद्र दर्शन अजिबात होत नसे.
आता पावसातली मुंबई म्हणजे गटारगंगा आणि नागरिकांचे निर्दयी टॉर्चर तेव्हढे उरले आहे. >> खर आहे. अर्थात तेव्हा ही प्रवास अजिबातच सुखाचा नव्हता. पावसाळ्यात रोज ऑफीसला जाताना जाऊ या की नको वाटे कारण दिवसभरात वाढला पाऊस तर संध्याकाळी घरी पोचणं कठीण..
मला मुंबई निवांत फिरायची आहे एकदा! वरळी ब्रिज, समुद्राखालून झालेला रस्ता, NCPA, फाऊंटन फोर्ट, कुलाबा , कफ परेड बॅलार्ड पिअर अशी राऊंड मारली तर मुंबईच्या प्रेमात पडायला होईल तुला वावे.
पावसाळ्यात बधवार पार्क मच्छिमार वसाहतीत किनार्यावर आणून ठेव लेल्या नौका लक्ष वेधून घेत. >> हो , आणि डोळे मिटलेले असले तरी आणि मासळीच्या वासाने कळत असे बधवार पार्क चा स्टॉप.
१०८ ही बस आमच्या ऑफिस वरून जायची असं वाटतंय.
तो मरीन ड्राईव्ह चा फोटो मी नेट वरून घेतलाय हे लिहायला विसरले. आता लिहिते.
इथे तुमचे ही काही सिल्वर लायनिंग वाले मुमेंट्स असतील तर नक्की लिहा.
ममो, तुम्ही सिल्वर लायनिंग
ममो, तुम्ही सिल्वर लायनिंग असं शीर्षक घेतलेलं बघुन थोडं आश्चर्य वाटलेलं. सोनेरी किनार अगदी शब्दशः असला तरी बर्यापैकी रुळलेला आहे ना? का आणखी काही सुचवायचं आहे जे मला समजलं नाहीये?
माझ्या करिअरची सुरुवात
माझ्या करिअरची सुरुवात 'बख्तावर'पासून झाली. अनेक वर्षे १३८ ने प्रवास केला, नेहमी वरच्या मजल्यावर जायलाच आवडायचे. क्वचित कधीतरी एक antique बस १३८ रूटवर यायची, ती माझी आवडती होती. दुर्दैवाने कधी फोटो काढता आला नाही याची आता हळहळ वाटते. लंचटाईममध्ये NCPA समोर समुद्र बघायला जायचो, पावसाळ्यात भाजलेली मक्याची कणसे खायला आवडायचे. शनिवारी अर्धा दिवस ऑफिस झाले की रमतगमत स्ट्रँड बुक डेपोत किंवा सत्यम मध्ये खरेदी करून, मग मोकँबो बारमध्ये थंडगार बियर ढोसून मग GPO मध्ये फिलाटेलिक ब्युरोमध्ये जाऊन स्टॅम्प्स् खरेदी करायचो, अशा रम्य आठवणी आहेत.
<< पावसातली मुंबई म्हणजे गटारगंगा >> नॉस्टॅल्जिया म्हणून या आठवणी छान वाटतात, पण मुंबई ही तेव्हापण गटारगंगा होती आणि आता पण. भले पावसाळा असो वा नसो. त्याकाळी मला आवडलेले शहर म्हणजे मंगलोर, कोचीन. एकंदरीत दक्षिण भारत मला खूप स्वच्छ वाटायचा मुंबईच्या तुलनेत. (तेव्हा तरी, सध्याची परिस्थिती माहीत नाही.)
मारिओ मिरांडाचे म्हणजे त्याने काढलेले भलेमोठे म्हणजे सहा ते आठ फूट उंच आणि पंधरावीस फूट डावीकडून उजवीकडॅ चित्र होते. >> Cafe Mondegar. अजून सुरू आहे.
सुरेख चित्रदर्शी वर्णन. मी
सुरेख चित्रदर्शी वर्णन. मी ही फिरले लेखातून. प्रतिसादही सुरेख.
लेख इतका सुरेख झाला आहे की
लेख इतका सुरेख झाला आहे की त्याच्यावर एक शॉर्ट फिल्म बनू शकेल.
मी १०८ चा प्रवासी होतो. तेंव्हा बहुतेक २ लि. पण त्याच रुटवरून जायची. पण आता ती वेगळ्याच रुटला आहे.
ममो, तुम्ही सिल्वर लायनिंग
ममो, तुम्ही सिल्वर लायनिंग असं शीर्षक घेतलेलं बघुन थोडं आश्चर्य वाटलेलं. सोनेरी किनार अगदी शब्दशः असला तरी बर्यापैकी रुळलेला आहे ना? का आणखी काही सुचवायचं आहे जे मला समजलं नाहीये? >> अमितव, शीर्षका बाबत मी स्वतःच confuse आहे. त्यामुळे आधी " काळया ढगाची चंदेरी किनार " असं भाषांतरित मराठी नावच लिहिल होतं पण ते कृत्रिम वाटल्याने इंग्लिश लिहिल. पण english लांबलचक वाटत होतं म्हणून फक्त "चंदेरी किनार " ठेवणार होते पण " सिल्वर लियनिंग "मध्ये ब्लॅक क्लाउड अभिप्रेत आहे ते "चंदेरी किनार" मध्ये आहे असं वाटलं नाही म्हणून पुन्हा कट करून फक्त " सिल्व्हर लायनिंग" ठेवलं. असो. किती तो विचार हाहा
अंजू , उपाशी बोका , माधव धन्यवाद. धन्यवाद...
ही स्पेशल २ लिमिटेड होती. जी व्हीटी ते world trade व्हाया कुपरेज जात असे.
मस्त लिहिलेय.
मस्त लिहिलेय. फोटोही छान.
मला तर हे शीर्षकही आवडलेय तरीही विरंगुळा म्हणून लिहितेय, आवडले तर घ्या ममो.
सिल्व्हरला चंदेरीपेक्षा रूपेरी जास्त चपखल वाटतेय.
कृष्णमेघातली रूपेरी कडा /(किनार), मेघछायेतली रूपेरी कडा/ किनार.
माझेमन, भरत, कांदळकर यांच्या पोस्टी आणि अमितचा फोटोही छान आहेत.
आहा! काय लिहिलं आहेस गं.
आहा! काय लिहिलं आहेस गं. अगदी डोळ्यापुढे चित्रं उभं राहिलं.
प्रश्न : मुंबई, मरीन ड्राईव, पावसाळा, ???
उत्तर : रिमझिम गिरे सावन. ----- इतकं घट्ट असोसिएशन आहे हे.
डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर अगदी पुढच्या सीटवर बसते. >>> अगदी अगदी. बेस्टमधली बेस्ट सीट असते ती.
ममो तुला संपर्कातून मेसेज
ममो तुला संपर्कातून मेसेज केलाय तो बघ.
डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर
डबल डेकरमध्ये वरच्या डेकवर अगदी पुढच्या सीटवर बसते. >>> अगदी अगदी. बेस्टमधली बेस्ट सीट असते ती.
>>>>>>>
असते नाही मामी... असायची..
डबल डेकर बंद झाल्या.
आणि ते सुख सुद्धा
डबल डेकर !! मुंबईची शान - ८६ वर्षांचा हा प्रवास अखेर थांबला!
https://www.maayboli.com/node/84028
योगायोग बघा..
त्या धाग्याची सुरुवात सुद्धा पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर... याच वाक्याने झाली आहे
डबल डेकर बंद झाल्या >>> ए सी
डबल डेकर बंद झाल्या >>> ए सी डबल डेकर सुरु झाल्यात टाऊनमध्ये. बहुतेक ममोंनी सांगितलेल्या रूटवरही असतील बहुतेक. एकदा फिरायचं आहे तिकडे डबल डेकरने.
आहेत आहेत डबल डेकर. मध्यंतरी
आहेत आहेत डबल डेकर. मध्यंतरी बंद होणार असं म्हणत होते पण आहेत काही रुटसवर.
Pages