DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

Submitted by कुमार१ on 9 July, 2025 - 02:28

‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली. हा नक्कीच विसाव्या शतकातील क्रांतिकारक जीवशास्त्रीय शोध होता

पुढील 70 वर्षांमध्ये या मूलभूत संशोधनाचा उपयोग जीवशास्त्रापासून न्यायवैद्यकीय शास्त्रापर्यंत अनेक शाखांमध्ये झालेला आहे त्याचा थोडक्यात हा आढावा :
१. डीएनए मधील जनुके विविध प्रथिनांचे उत्पादन नियंत्रित करतात यावर शिक्कामोर्तब झाले.
२. या शोधातूनच पुढे ‘जनुकीय अभियांत्रिकी’ या नव्या विज्ञानशाखेचा उगम झाला.

३. त्यातून पुढे जैवतंत्रज्ञान ही शाखा विकसित झाली. त्या शाखेत सूक्ष्मजीवांच्या जनुकांत फेरफार करून विविध प्रथिने, हॉर्मोन्स आणि प्रतिजैविके तयार करतात. ती विविध रोगोपचारांत वापरली जातात.
४. प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएची रचना अद्वितीय (unique) असते. या मुद्द्याचा उपयोग न्याय्यवैद्यकशास्त्रात केला जातो. गुन्हेगाराची ओळख त्यामुळे पक्की होते. वादग्रस्त पितृत्वाच्या दाव्यातही त्याचा उपयोग होतो.

५. बऱ्याच अनुवांशिक आजारांत जन्मतः शरीरात एखादे प्रथिन वा एन्झाइम तयार होत नाही. अशा रुग्णांसाठी जनुकीय उपचार करता येतात. या तंत्राची घोडदौड चालू असून पुढील शतकापर्यंत ती सार्वत्रिक उपचारपद्धती झाली असेल.

आता प्रस्तुत लेखाचे प्रयोजन सांगतो.
डीएनए हा मानवी जीवनाचा मूलाधार असल्यामुळे त्याच्यावर कितीही संशोधन झाले तरी त्याच्या भोवतालचे काहीसे गूढ वलय अद्यापही कायम आहे. त्या दृष्टिकोनातून त्यावर अधिकाधिक संशोधन सतत होत असते. अशा नवीन संशोधनांची टिप्पणी करण्यासाठी हा धागा उघडून ठेवत आहे. यथावकाश त्यात संशोधनानुसार भर घालता येईल.

तूर्त दोन महत्त्वाच्या संशोधन घटनांचा उल्लेख करतो :
१. कृत्रिम डीएनएचे उत्पादन
(Synthetic Human Genome project)
याची मुहूर्तमेढ गेल्याच महिन्यात रोवली गेली. पाश्चात्य देशातील अनेक नामवंत विद्यापीठे या प्रकल्पात सहभागी झाली आहेत. या महत्त्वाकांक्षी संशोधनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग देखील केला जाईल अशी टीका त्यावर होत आहे. ‘सेपियन्स’ या प्रसिद्ध पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “माणसाला देव बनण्याची घाई झालेली आहे का?’, असाही सूर या निमित्ताने माध्यमांमधून उमटला.
काही असाध्य रोगांवर उपचार ही त्याची सकारात्मक बाजू, पण 'हवा तसा' कृत्रिम मानव (?) तयार करण्याच्या दिशेने ते संशोधन गेल्यास ते तापदायक ठरेल. सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून या प्रकल्पाकडे पहावे लागणार आहे.

२. गुन्ह्याचा पोलीस तपास
गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी न्याय वैद्यकशास्त्राच्या अंतर्गत डीएनए चाचणीचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासंदर्भात डीएनएचे नमुने कसे गोळा केले जातात हे जाणून घेणे रोचक आहे. आपल्यातील अनेकांनी आतापर्यंत पोलीस/ सीआयडी आणि तत्सम मालिका व चित्रपट पाहिले असणार आणि त्यात हे सगळे रंजक पद्धतीने दाखवले जाते. पण चित्रपट हा शेवटी कल्पनेचाच खेळ असल्यामुळे तिथे कथानायकाला सगळ्या अनुकूल गोष्टी दाखवल्या जाऊन शेवटी गुन्हेगार सापडतोच व गजाआड जातो ! परंतु वास्तव दरवेळी तसे नसून कित्येकदा ते खडतर असते.

CID_(Indian_TV_series).png
गुन्ह्याच्या ठिकाणी जेव्हा पोलीस पोचतात तेव्हा तिथे ज्या काही निर्जीव वस्तू सापडतात त्या ताब्यात घेऊन त्यांवर उमटलेले बोटांचे ठसे मानवी डीएनएसाठी तपासले जातात. परंतु या प्रकारे (trace and touch samples) मिळणारा डीएनएचा नमुना कित्येकदा किरकोळ व अपुरा असतो. तसेच या नमुन्यांमध्ये कित्येकदा अन्य गोष्टींची भेसळ (contamination) देखील झालेली असते. त्यामुळे निव्वळ अशा तपासणीतून उपलब्ध झालेला पुरावा गुन्हेगार शोधण्यासाठी तकलादू देखील ठरतो. तसेच सराईत सुशिक्षित गुन्हेगार गुन्हा करताना हातमोज्यांचा आणि शरीरभर घातलेल्या संरक्षक झग्याचा देखील वापर करतात. त्यामुळे त्यांच्या बोटांचे ठसे उमटण्याचाही संभव नसतो. नमुना मिळवण्यातली ही पण एक महत्त्वाची मर्यादा आहे.

या दृष्टीने गुन्ह्याच्या ठिकाणी काही वेगळ्या स्वरूपाचा डीएनए मिळवता येईल का? यावर अनेक वर्षे संशोधक विचार करीत होते. गेल्या काही वर्षात त्यांना एक महत्त्वाचा आशेचा किरण दिसलेला आहे आणि तो म्हणजे गुन्हास्थळाच्या वातावरणातील डीएनए अर्थात, environmental DNA (eDNA). या डीएनएचे नमुने तिथली हवा आणि आसपासची धूळ यातून गोळा केले जातात. एखाद्या बंदिस्त जागेत जर काही माणसे काही काळ वावरून गेली तर त्यांच्या शरीरातून (त्वचा, केस आणि कपड्यांमार्फत) बाहेर पडलेले डीएनए-रेणू तिथल्या हवा आणि धुळीत बराच काळ टिकून राहतात असे लक्षात आलेले आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तींच्या बोलण्या, खोकण्या आणि शिंकण्यातून देखील डीएनए-रेणू बाहेर पडत असतात. तसेच गुन्ह्याच्या स्थळी जर एखादा छोटामोठा पाण्याचा साठा असेल तर त्यातही माणसांचे डीएनए (Aquatic eDNA) साठून राहू शकतात.

या प्रकारचे डीएनए नमुने पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात व पुरेसे मिळतील अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. किंबहुना गुन्हास्थळी पुरेसा डीएनए गोळा होईपर्यंत संबंधित नमुना गोळा करण्याचे उपकरण चालू स्थितीत ठेवता येईल. तसेच या आधुनिक चाचणीमधून एखाद्या बंदिस्त जागेत येऊन गेलेल्या एकूण माणसांचा अंदाज येईल आणि त्यांनी तिथे घालवलेला एकूण वेळ देखील काढता येईल. याखेरीज गुन्ह्याच्या ठिकाणी एखाद्या प्राण्याचा वापर झाला असल्यास त्याचीही स्वतंत्र माहिती काढता येईल.

अर्थात हे नवे तंत्रज्ञान पूर्ण विकसित होण्यास अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. एखादी व्यक्ती संबंधित खोलीत निव्वळ येऊन गेली असेल आणि काही बोलली किंवा खोकली नसेल, तर कितपत डीएनए गोळा होईल हे पहावे लागेल. तसेच व्यक्तींच्या वावरामुळे खोलीत जमा झालेला डीएनए किती काळ चांगल्या अवस्थेत राहतो हे पण पहावे लागेल. खोली जर वातानुकूलित असेल तर त्याच्या झडपांद्वारे एका खोलीतील डीएनए दुसऱ्या खोलीत जातो का, हा पण एक महत्वाचा मुद्दा असा नमुना गोळा करण्याची उपकरणे, त्यांचे प्रमाणीकरण आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान या सर्वांमध्ये संशोधनानुसार टप्प्याटप्प्याने सुयोग्य बदल करावे लागतील. हे सगळे झाले जीवशास्त्रीय मुद्दे परंतु सरतेशेवटी, जगातील किती न्यायालये या प्रकारच्या अत्याधुनिक पुराव्याला अंतिम पुरावा मानणार हा प्रश्न देखील उरतोच.

येत्या दशकात या नवतंत्रज्ञानाचा कसा विकास होतो आणि ते गुन्ह्याच्या तपासासाठी किती प्रभावी व मान्यताप्राप्त ठरते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
**********************************************************************************

संदर्भ :

  1. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7268995/#:~:text=You%20have%20b....
  2. https://analyticalsciencejournals.onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/el...
  3. https://www.sciencealert.com/first-step-towards-an-artificial-human-geno...
  4. . . .
    डीएनए संदर्भातील यापूर्वीचे लेखन :
    विमान अपघातातील मृतांची ओळख : ‘डीएनए’ आणि अन्य चाचण्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर
हा खरा प्रॉब्लेम आहे . स्तनाच्या कर्क रोगा संबंधी
...if you are at risk, be prepared to pay $ 3000 or more. Why so much? In 1998 the Utah-based company Myriad Genetics patented two genes: BRCA1 and BRCA2. So, because Myriad essentially owns the genes, the company is the only one that can conduct the test, so it sets the price....
gene चे पण पेटंट!!!
Human Genetic Engineering सध्या तरी खर्चिक बाब आहे. समाजातील मोजक्या लोकांनाच परवडेल असा मामला आहे. त्यामुळे होणारे काय की समाजातील विषमता वाढत जाणार आहे.

केळ आणि माणूस ह्यांचे ५०% DNA एकसारखे आहेत.
Humans and chimps share a surprising 98.8 percent of their DNA. How can we be so similar--and yet so different?
Mice share approximately 85% of their DNA with humans,
Zebrafish share about 70% of DNA with human. चिकन ६० अन्नि दुक्कर ९८%!
मिन्जर 90%
कुत्रा ८४%
डॉल्फिन आणि हत्ती ९८%!!!
...
असे हे आपले नातेवाइल आहेत.

* Humans and chimps share a surprising 98.8 percent of their DNA
>>> क्या बात है !
या विषयावरील लक्ष्मण लोंढे यांचा लक्ष्मणझुला या पुस्तकात असलेला 'एक टक्क्याचा खेळ' हा लेख अतिशय वाचनीय आणि मार्मिक आहे. त्यातला अत्यल्प मजकूर उद्धृत करायचा मोह होतोय :

"वानराचा नर व्हायला फक्त एक टक्क्याचा फरक पुरला. आणखी फक्त एका टक्क्याच्या फरकात कदाचित नराचा नारायणही होणं शक्य आहे किंवा नराचा नरराक्षसही बनणं शक्य आहे. फक्त एका टक्क्याच्या फरकानं".

एक विज्ञानाचा चमत्कार म्हणावा अशी बातमी वाचनात आली. श्रेया सिद्दनागौडर नावाच्या अठरा वर्षे वयाच्या मुलीचे हात एका अपघातामुळे कोपरापासून amputate करावे लागले होते. ते एक मॅचिंग डोनर मिळाल्याने पुन्हा जोडले गेले. >>>> खूपच भारी... हॅट्स आॅफ टू टेक्नाॅलाॅजी अँड टू मेडिकल टीम टू... ___/\___

>>>>>Angelina Jolie ह्या अभिनेत्रीचा DNA प्रोफाईल मध्ये हा gene मिळाल्यावर तिने शस्त्रक्रिया करून त्यापासून सुटका करून घेतली.
रॅडिकल निर्णय होता. कसा घेतला तिने तो निर्णय Sad दोन्ही ब्रेस्टस काढून टाकल्या.

कुमार सर, नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख.
environmental DNA (eDNA) >> भारी प्रकार. अधिक वाचायला हवे.
मलेरियाविरोधी लस>>> यावर बरेच वर्षापासून संशोधन चालू आहे. KEM मध्ये काही चाचण्या झाल्याचे स्मरते.
एक टक्क्याचा खेळ>>>> पुस्तक वाचनीय आहे.
स्ट्रॉबेरीचा DNA.>>>>> कॉलेजमध्ये कॉलीफ्लॉवरचा DNA extraction असायचे.

सन 1953मध्ये ‘डीएनए’ची रचना शोधून काढणाऱ्या संशोधक चमूचे प्रमुख असलेले जेम्स वॅटसन यांचे नुकतेच वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासह अन्य दोन संशोधकांना या संशोधनाबद्दल 1962चे वैद्यकविज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

पुढे 2000 च्या दशकात वॅटसन यांनी कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्या बुद्धिमत्तेतील फरकाबाबत काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे त्यांनी विज्ञानविश्वाचा रोष ओढवून घेतला. त्यानंतर त्यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

2014 मध्ये त्यांनी आपले नोबेल संबंधित सुवर्णपदक लिलावात विकले होते. मात्र एका रशियन अब्जाधीशाने ते मोठ्या किमतीला विकत घेऊन पुन्हा त्यांना परत केले होते.

https://www.bbc.com/news/articles/cn8xdypnz32o

वानराचा नर व्हायला फक्त एक टक्क्याचा फरक पुरला.>> हा एक टक्क्याचा (1.2%) फरक तब्बल ३.५ कोटी base-pairs चा असतो ( out of total 3 billion base-pairs). शंभर वर्षांत एका वंशात( ४ पिढ्या) सुमारे ५०००-१३००० बेस-पेअर्स चेंज होतात. एआय आणि एमएल मधील क्रांतीचे परिणाम या क्षेत्रात क्रांतिकारी ठरण्याची लक्षणे आत्ताच दिसू लागली आहेत. जिनोम अल्ट्रेशन/मॉडीफिकेशन मधे ट्रायल अँड एरर चा जमाना मागे पडून एआय, एमएल च्या मदतीने प्रिसाईज आणि एफिशिअंट बदलांची खात्री मिळेल या दिशेने एकूणच या तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू झाली आहे.

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत काही विशिष्ट जीन्सचा दुप्पट डोस देऊन " स्वार्झनेगर उंदीर" आणि "मेराथॉन उंदीर" बनवण्यात यश मिळवले आहे.
https://www.cbsnews.com/news/gene-alteration-makes-super-mice/
औषधे घेऊन dopingचा प्रयत्न आता मागे पडून जेनेटिक manipulationचे प्रकार सुरु होतील.

But A Big But...
जर तुम्ही माझा वरचा प्रतिसाद वाचला असेल तर मग ही दुर्दैवी केस ही वाचा,
Death but one unintended consequence of gene-therapy trial
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC81135/

१. जेनेटिक manipulationचे प्रकार >>>
खंरय. असे नवे संशोधन भविष्यात कोणत्या दिशेने जाईल काय सांगता येत नाही.

2. दुर्दैवी केस >>>
त्या तरुणाचा मृत्यू दुर्दैवीच आहे.
अशा संशोधनावर शासन यंत्रणेचे कठोर नियंत्रण आवश्यक आहे. कायदेशीर मुद्दे कसोशीने पाळले गेले पाहिजेत.

>>>>>>>>>शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत काही विशिष्ट जीन्सचा दुप्पट डोस देऊन " स्वार्झनेगर उंदीर" आणि "मेराथॉन उंदीर" बनवण्यात यश मिळवले आहे.
आत शत्रू राज्यात हे असे विकृत प्राणी सोडण्याचे निषेधार्ह प्रकार सुरु होतील.
माझ्या एका वाचनाप्रमाणे वाघ हा भारतिय प्राणी नाही. चीनने पूर्वी मुद्दाम वाघ भारतात सोडले. खखोदेजा.

माझ्या एका वाचनाप्रमाणे वाघ हा भारतिय प्राणी नाही. चीनने पूर्वी मुद्दाम वाघ भारतात सोडले. खखोदेजा.>> ही माहीती खात्रीलायक खोटी आहे. चीनमधून भारतात आले हे खरं आहे पण त्या वेळी चीन या नावाचं कोणतंही राष्ट्र अस्तित्वात नव्हतं.( चींनच काय ईतर कोणतेही राष्ट्र अस्तित्वात नव्हतं.. Happy ) प्रिसिविलायजेशन काळात हे घडलं होतं.

डीएनए रचनेच्या संशोधना दरम्यान विविध वैज्ञानिकांमध्ये असलेले साहचर्य आणि स्पर्धा यासंबंधीचे काही महत्त्वाचे फोटो इथे पाहता येतील :

https://www.bbc.com/news/articles/c51yxlzw0w0o

वॅटसन आणि क्रिक यांच्या आधी रोझालिंड फ्रँकलिन यांना काही महत्त्वाची मूलभूत माहिती मिळाली होती. परंतु नंतर त्यांना डावलले गेले का, हा या संदर्भातील अत्यंत वादग्रस्त विषय आहे.

डीएनए रचनेच्या संशोधना दरम्यान विविध वैज्ञानिकांमध्ये असलेले साहचर्य आणि स्पर्धा यासंबंधीचे काही महत्त्वाचे फोटो इथे पाहता येतील :>> @कुमार खूपच छान Archives.

फा वि
त्यातली ती नोबेल मिळाल्याची त्या काळची 'तार' वाचताना मला फार मजा वाटली.
मस्त !

त्यातली ती नोबेल मिळाल्याची त्या काळची 'तार' वाचताना मला फार मजा वाटली.>> सेम पिंच...मी ही अगदी झूम करुन वाचली.

एक चमत्कारिक खटला व डीएनए चाचणीला मनाई
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती.

मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे.

एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.

https://www.scconline.com/blog/post/2025/11/12/section-112-presumption-l...

एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही. >>
चांगला निर्णय.
Court noted that the refusal to submit to the DNA test is protected by precedent such as Goutam Kundu vs. State of West Bengal, (1993) 3 SCC 418....

व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. >> +१
The Court held that her surrender of her own privacy does not constitute a waiver of the right to privacy of the appellant and the now-adult child....

>>>>>>>एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.
असे किती खोटे आरोप होतील? त्यापेक्षा चाचणी करुन जर दावा फोल निघाला तर त्या बाईला दंड ठोठवा ना. माझ्या मते चाचणी व्हायला हवी होती.
------------
अ‍ॅबॉर्शन लिगल झाले की बायका मीठ मिर्ची आणायला निघाल्यासारख्या अ‍ॅबॉर्शन करत सुटतील असे वाटणे हे जितके निरर्थक आहे, फोल आहे तितकेच 'डि एन ए" टेस्ट लिगल झाल्यास, उठ सूठ कोणीही बायका उठुन पुरुषांवरती आरोप करतील - असे वाटणे निरर्थक आहे.

एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.
असे किती खोटे आरोप होतील? त्यापेक्षा चाचणी करुन जर दावा फोल निघाला तर त्या बाईला दंड ठोठवा ना. माझ्या मते चाचणी व्हायला हवी होती.>>>माझ्या माहितीप्रमाणे हा निकाल कोणत्याही एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात जर पेटर्निटीच्या मुद्द्याचा अर्थाअर्थी थेट संबंध नसेल आणि पितृत्व सिद्ध झाल्याने गुन्ह्याच्या निकालात काहीही फरक पडणार नसेल तर इतर कोणत्याही कारणास्तव डीएनए चाचणीची मागणी केली असता असता डीएनए चाचणीची सक्ती असणार नाही....माझ्या मते हा अगदी योग्य आणि मार्गदर्शक निकाल आहे

सर्वोच्च न्यायालयाने ज्या 112 कलमाचा उल्लेख केलेला आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा डीएनए-पट ही व्यक्तिगत गोपनीय बाब आहे.
इथे पितृत्वाचा मुद्दा मुख्य नसल्यामुळे ती चाचणी करणे अयोग्य ठरवलेले दिसते. तसेच अन्य सबळ पुराव्याचाही अभाव असल्याचे म्हटले आहे.
कायदे अभ्यासक अधिक सांगू शकतील.

हिटलरच्या डीएनएचे संशोधन आणि वैज्ञानिक वादविवाद
https://www.bbc.com/news/articles/c5ylw4pz83do

गेले आठवडाभर पाश्चात्य माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजते आहे. हिटलरने जिथे आत्महत्या केली होती तिथल्या सोफ्यावर सुमारे 80 वर्षांपूर्वीचा रक्ताचा डाग होता. त्यावरून हिटलरच्या डीएनएची शास्त्रीय तपासणी करण्यात आली. यापूर्वीच त्याच्या एका पुरुष नातेवाईकाच्या वाय क्रोमोसोमशी तुलना करून हा निष्कर्ष निघाला की संबंधित रक्त हिटलरचेच होते.

आता त्याचा संपूर्ण डीएनए-पट तयार करण्यात आला आणि त्यातून काही प्राथमिक निष्कर्ष काढले गेले :
1. हिटलरचे पूर्वज ज्यू होते असा एक प्रवाद अनेक वर्षे चालू होता. प्रस्तुत डीएनएमधून हिटलर ज्यू वंशाचा नाही असा निष्कर्ष.
2. दुसरा महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, हिटलरला Kallmann syndrome हा आजार होता. या आजारात वयात येतानाचे लैंगिक बदल न घडल्यामुळे एकंदरीत लैंगिक अवयव छोटे आणि अपरिपक्व राहतात. महायुद्धाच्या काळात हिटलरची निंदा करणारे या आशयाचे गीत त्या काळी प्रचलित होते.

वरील वैज्ञानिक संशोधनामध्ये इतिहासकारांनी आता उडी घेतली आहे आणि आपली मते व्यक्त केलीत. “त्याला एकंदरीत लैंगिक इच्छाच नव्हती आणि त्यामुळे त्याचे काही तसे खाजगी आयुष्य नव्हते. परिणामी त्याने स्वतःला संपूर्णपणे राजकारणाला वाहून घेतले होते”.

3. तिसरा निष्कर्ष : हिटलरला एक मनोविकार होता तो कदाचित या चारपैकी एक असू शकतो : autism, ADHD, schizophrenia and bipolar disorder.

या प्राथमिक संशोधनावर इतर वैज्ञानिकांनी अर्थातच उलटसुलट मते व्यक्त केलेली आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार हे ‘निष्कर्ष’ म्हणजे रोगनिदान नव्हे. त्या डीएनए अभ्यासावरून फक्त एवढेच समजते की हिटलरला ते आजार होण्याची शक्यता अधिक होती. अन्य काहींच्या मते मूळ संशोधकांनी स्वतःचीच अनेक गृहीतके निष्कर्ष म्हणून जाहीर केलीत. एकंदरीत हे संशोधन म्हणजे सवंग प्रसिद्धीचा हव्यास असल्याचेही काहींनी म्हटले आहे.

मूळ संशोधकांनी या नसत्या उठाठेवी करून उगाचच हिटलरचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणले असेही काहींचे मत. एक प्रकारे हा नैतिकतेचा भंग आहे.
वरील सर्व मुद्द्यांची दखल घेणारा एक माहितीपटही तयार करण्यात आलेला आहे.

असा हा हिटलर डीएनएचा तहलका !

Pages