'मेट्रो इन दिनों'- सिनेमा अभिप्राय

Submitted by संप्रति१ on 5 July, 2025 - 09:06

२००७ साली अनुराग बासूंचा 'लाईफ इन अ मेट्रो' आला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता हा 'मेट्रो इन दिनों' आला आहे. काळ म्हटलं तर बदलतो, म्हटलं तर नाही. काही भावना चिरंतन असतात, प्रेम ही त्यापैकी एक. प्रेम माणसात नेमके काय काय बदल घडवतं? हे काही पकडता येत नाही.
परंतु या सिनेमात प्रेम वेगवेगळ्या अंगांनी चाचपडून पाहण्याचा, प्रेमाच्या अनेक रंगछटा उलगडून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.त्याअर्थी या सिनेमाचं वर्णन 'रोमान्सचा सोहळा' असं करता येईल.

यामध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील प्रेमभावनेचं चित्रण केलेलं आहे. किशोरांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही काही ना काही रिलेट होऊ शकेल, असं हे आहे.

पाच वेगवेगळ्या कथा आहेत, त्यातून नातेसंबंध आणि भावनिक गुंतागुंत यांचा प्रवास सादर केला आहे. सगळ्या कथा एकमेकींशी गुंफलेल्या आहेत. तसेच प्रत्येक कथानकाभोवती काही उपकथानकं विणली आहेत.

अली फजल आणि फातिमा सना शेख करिअर, स्ट्रगल, पॅशन, जबाबदारी, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप यासंबंधित समस्यांभोवती घुटमळणारं, त्यातून मार्ग काढणारं जोडपं आहे.

पंकज त्रिपाठी-कोंकणा सेन, विवाहित जोडप्यांना एका टप्प्यावर येणाऱ्या एकमेकांच्या कंटाळ्यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कोंकणा सेन गुणी अभिनेत्री आहे. तिच्या रोलमध्ये अनेक पदर आहेत आणि अपेक्षेप्रमाणे तिनं ते लीलया पेलले आहेत. पंकज त्रिपाठींची नुसती उपस्थितीच पुरेशी असते. ते काहीही प्रयत्न न करता सहजपणे वावरतात आणि लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणतात.

सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात हळुवारपणे उलगडत जाणारी लव्हस्टोरी पाहताना 'लाईफ इन मेट्रो' मधील इरफान-कोंकणाची आठवण होते. सारा अली खानने तिचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे. आदित्य रॉय-कपूरचा परफॉर्मन्स अगदीच 'क्लास' आहे यात. (मला हा ॲक्टर आवडायला लागलाय आता.) 'कमिटमेंट फोबिक मॅन चाईल्ड' असं एक नवीन आधुनिक विशेषण या रॉय-कपूरच्या भूमिकेतून माहिती झालं.

तसेच कोंकणा-पंकज या जोडप्याच्या किशोरवयीन मुलीचं एका वर्गमित्राबद्दलचं/वर्गमैत्रिणीबद्दलचं कोवळं लुसलुशीत कुतूहलवजा प्रेम आहे.

आणि आपल्या विधवा सुनेला तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन करू देण्यासाठी अव्यक्त प्रयत्न करत राहणारे अनुपम खेर आणि त्यामध्ये त्यांना मदत करणारी नीना गुप्ता, यांची कथा आहे. या तिघांच्या काही दृश्यांमध्ये एक फार चांगली ऊब आणि मॅच्युरिटी जाणवते. अनुपम खेर दमदार अभिनेते आहेत, ही फॅक्ट आहे. (जरी माणूस म्हणून त्यांचे विचार फार काही उन्नत नसले तरी, अभिनेते म्हणून ते त्यांचं जे आहे ते आहेच.! त्याबद्दल तोंडभरून कौतुक करण्यात कंजूषपणा करण्याचं काही कारण नाही.)

मुंबई, कोलकाता, बँगलोर हा सगळा महानगरी कॅनव्हास, त्यातील रस्ते, फूटपाथ, मेट्रो-ट्रेन्स, कॅफे, झाडं, चौक, वर्दळ, पाऊस, कोलाहल, शहरांच्या क्षितिजरेषा हे सगळं देखणं आहे. पंकज त्रिपाठी आणि कोंकणा सेन एका सीनमध्ये बोलत उभे असतात, आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर दूरवर एक मोठी फॅक्टरी दिसते, तिच्या चार धुरांड्यातून धुराचे मोठमोठे लोट संथपणे आकाशात उठताना दिसतात, हे दृश्य विलक्षण आहे. कसला कळत नाही, पण एक खोल ठसा उमटतो मनावर.

अनुराग बासू दिग्गज दिग्दर्शक आहेत बाय द वे ! समकालीन महानगरांतील गजबजलेल्या कोलाहलातून इतक्या सुंदर मानवी कथा, भावना, नातेसंबंधांतलं राजकारण, एकटेपणा, भावनिक विलगता, कन्फ्युजन, वियोग, माणसांची दुर्बलता, अहंकार टिपणं, ते शांत, सौम्यपणे दाखवणं, आणि दाखवताना कुठंही जजमेंटल न होणं, हे भारीय म्हणजे.

बाकी, संपूर्ण सिनेमात सगळ्यात जास्त मंत्रमुग्ध करणारं काय असेल, तर ते म्हणजे संगीत आणि गाणी..! प्रीतम, अरिजीत सिंग यांनी इथं एक अलौकिक सांगीतिक कल्लोळ तयार केलेला आहे. प्रत्येक दृश्याच्या पार्श्वभूमीवर वाजत असलेलं हे संगीत आत्मा तृप्त करणारं आहे.

कथानकाचा बराचसा भाग गाण्यांद्वारे सांगितलेला आहे. पात्रांचे बरेचसे संवाद, कथन कवितांच्या व गाण्यांच्या माध्यमातून येतात. हे वेगळेपण कानांना सुखावतं. काहीतरी थेरप्युटिक, ताजतवानं करणारं आहे हे, असं वाटतं. शिवाय गालिबचे शेर, इतर काही चिरंतन गझला अनोख्या पद्धतीने पेश केल्या आहेत. विशेषतः ‘वो जो हममें तुम में करार था’आणि 'तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लागे' हे गाणं फारच आवडलं.

सुरुवातीला सिनेमात गुंतायला थोडा वेळ लागतो, पण नंतर मात्र एकदम छान लय पकडली आहे. इंटरव्हलपर्यंत इतक्या वेगवेगळ्या भावभावनांच्या हिंदोळ्यांतून जातो की अंधारात आपल्या भावना शिगेला पोचतात, वारंवार उचंबळून येत राहतात.

इंटर्वलनंतर वेग थोडा मंदावतो. जवळपास पावणेतीन तासांचा सिनेमा आहे. लांबी थोडीशी कमी करता आली असती तर बरं होतं. तरीही गोष्ट पुढे नेण्याची रीत नॉन-लिनियर असल्यामुळे आणि म्युझिक जोरकस आणि प्रवाही असल्यामुळे शेवटपर्यंत लक्ष गुंतून राहतं.

'ॲनिमल' सारखे विषारी सिनेमे, विकृत मनोवृत्ती चेतवणारे प्रोपगंडा-सिनेमे, इतिहासाची सोईस्कर मोडतोड करून दाखवले जाणारे भयानक सिनेमे रूढ होण्याच्या काळात असा सिनेमा येणे म्हणजे निव्वळ सुख आहे.

बघा जमल्यास. सिनेमा तुम्हाला आवडेल किंवा क्वचित आवडणारही नाही, परंतु यातली गाणी आणि म्युझिक न आवडण्याचा ऑप्शनच तुमच्याकडे नसेल, एवढं नक्की.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण
ट्रेलर वरून अंदाज आलेला...
चित्रपट छान असणार..

परिचय आवडला.
लेखातली अनेक वाक्ये, विशेषणे आवडली. एकच नोंदवतो - कोवळं लुसलुशीत कुतूहलवजा प्रेम

संप्रती यांचे लिखाण छानच असते. हा परिचय पण नेटका आहे. चित्रपट आवडला म्हणुन वाहात जाऊन उगीच भरमसाट लिहिले नाही की अगदीच त्रोटकही नाही. थेटरात जाऊन पाहायची शक्यता शुन्य आहे, ओटिटिवर आला की पाहिन.

लाईफ… ही आवडलेला. त्यातल्या सगळ्याच कथा आवडलेल्या, शिल्पा शेट्टीची विषेश आवडलेली.

इन दिनो….. हे लाईफ इन अ मेट्रो मधले गाणे सुरेख आहेच पण अलविदा… खुप आवडते आहे.

बघितला. मस्त आहे. स्टारकास्ट तगडी आहे एकदम. मध्येमध्ये गाणी असल्यामुळे एकदम म्युझिकल पाहत असल्याचा फील येतो. आधीच्या लाईफ इन मेट्रोमध्ये जशी चार पाच जणांची आयुष्य समांतर ट्रॅकवर चालू असतात तसंच यातही आहे. बघायलाच हवा असा आहे.

लाइफ इन मेट्रो आवडता सिनेमा आहे. अधूनमधून परत बघते मी.
हा पण नक्की बघणार.
चित्रपट समीक्षण आवडले हे. छान लिहिले आहे.

‘लाइफ इन अ मेट्रो ‘ खूप आवडला होता आणि गाणीही आवडली होती, ‘मुंबई’ या शहराचं एक कॅरॅक्टर सतत दिसत रहातं त्या सिनेमात तसे या नवीन सिनेमात झाले नाही.. ३ मेट्रो सिटीज पैकी कुठल्याच शहराचं कॅरॅक्टर ठळक दिसत नाही.. मला तरी ‘मेट्रो इन दिनो‘ सिनेमा काही खास वाटला नाही आणि म्युझिकल स्टाइल गाणी पण नाही आवडली, नॉट माय टाइप .
फॉरमॅट पहिल्या सारखाच आहे थोडा फार , तरी डेप्थ नाही कुठल्या स्टोरीज मधे.
यात दाखवलेल्या लव्ह स्टोरीज अपिलिंग नाही वाटल्या, मॅरीड कपल्स वर फोकस आहे इथे.
त्यातल्या त्यात कोंकणा पंकज त्रिपाठीचा पार्ट फक्त, आवडला !
इतर कोणाचेच परफॉर्स्मान्सेस नाही आवडले, सारा अली खान अगदीच अनबिअरेबल आहे, तिची स्टोरी सर्वात वीक होती.
आदित्य रॉय कपुरचे कॅरॅक्टर ‘ये जवानी है दिवानी’ मधल्या बनी कडून उधार घेतल्या सारखे वाटले.
नीना गुप्ता - अनुपम खेर स्टोरी धर्मेन्द्र नफिसाच्या तुलनेत कमी इन्टेन्स आहे.
अली जाफर - फातिमा एकदम अ‍ॅव्हरेज.
वन टाइम वॉचेबल आहे पण खूप स्लो वाटला .

छान लिहिलंय.

प्रीतमचे संगीत आवडत असले तरी अरिजित अजिबात आवडत नाही. मला सगळी गाणी सेम चालीची वाटली ऐकली तेव्हा. एक ' दिल का क्या ' नावाचं गाणं बरं वाटलं.

कास्ट मध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी सोडून कोणी आवडत नाही. सो या इमोशन युक्त राईडला माझा पास.

तुम्ही रिव्ह्यू लिहिल्यामुळे त्यात काय आहे ते कळलं निदान. मनापासून धन्यवाद.

अली जाफर>>
डीजे,
अली फजल आहे तो, जफर भाई हे त्याचं फुकरे मधलं स्क्रीन नेम होतं...

छान परिचय.
आधी 'लाइफ इन अ मेट्रो' पुन्हा बघणार. मग हा बघणार.

शुक्रवारी लगेच जाऊन बघुन आलो.
म्युझिकल आहे. चार/ पाच कुटुंबांच्या एकमेकांत गुंतलेल्या कथा आहेत. ब्रिलियंटली एडिटींग करुन ते तुकड्यातुकड्यातील जग एकसंध करुन दाखवलं आहे. काळाच्या, स्थळांच्या, व्यक्ती-व्यक्तीतील संबंधांच्या उड्या फार सहज आणि तरी एक ठसा सोडून अशा दाखवल्या आहेत.
एकेकटी गाणी बघितली तर लाईफ-इन - मेट्रोचं संगीत जास्त लक्षात राहिल असं आहे. पण यात संगीतमय संवाद, गाणी गात ऑर्केस्ट्रा प्रत्यक्ष दृष्यांत असुन अदृष्य असणे, म्युझिकल असल्याने एक संगीत सतत वाजत असण्याचा परिणाम फार सुंदर आहे.
मी सिनेमा बघताना रंगुन गेलेलो, त्या मॅजिकमुळे असेल पण तेव्हातरी कुठलीच गोष्ट खटकली नाही. शेवटी ते रंगुन जाणे इज द की!

आदित्य रॉय कपूर - सारा अली खान पासून नीना गुप्ता - अनुपम खेर सगळ्या कथा त्यावेळी बघताना तरी कनविंसिंग वाटल्या. सगळ्यात आवडली ती कोंकना सेन शर्मा- पंकज त्रिपाठीची. ते कलाकार ही नीना गुप्ता खालोखाल सगळ्यात जास्त आवडतात.
सिनेमातील मला भावलेली गोष्ट म्हणजे बहुतेक समस्या सोडवलेल्या नाहीत. ज्या सोडवल्या आहेत त्यात एकतर काही तरी मेख ठेवली आहे, किंवा त्या सहजा सहजी सुटलेल्या नाहीत. मराठी सिनेमात ज्या स्किन डीप समस्या आणि मोकळेपणी बोलुन तर सुटतात असं सोप्पंतर होतं सगळं असतं ते अजिबात होऊ दिलेलं नाही. फिल्मी घडणार घडणार वाटत असताना एकतर ते घडत नाही, किंवा मॅटर ऑफ फॅक्टली काही तरी कंगोरा दिसतो.
मला सिनेमा एकदम आवडला. सुरुवातीपासून शेवट पर्यंत मजा आली. माझा फुल रेको!

हा बघायच्या आधी आठवणी जाग्या करायला म्हणून लाईफ इन मेट्रो बघायची गरज नाही असं वाटतं. अर्थात बघायला हरकत काहीच नाही. Happy

…आधी 'लाइफ इन अ मेट्रो' पुन्हा बघणार...

हे केले.

.. मग हा बघणार.…

हे करणार. <<

मग इथे दीर्घ प्रतिसाद देणार.. हे ही करा, प्लीज..