रम्य ते बालपण

Submitted by शिवानी बलकुंदी on 2 July, 2025 - 06:29

लहान असताना अनेकदा आपण मोठ्यांकडून “आमच्या वेळी नव्हतं असं काही” हे वाक्य ऐकत आलो. आता तेच वाक्य नकळत आपण आपल्या मुलांना पण म्हणत असतो. तसं पहिलं तर हे खरंच आहे नाही का. आपल्या लहानपणीच्या कितीतरी किंबहुना अनेक गोष्टी, वस्तु, आपले जीवनमान खूप म्हणजे खूपच बदलले अहे. त्यातीलच एक म्हणजे मुलांचे खेळ. आताची मुले जे खेळ खेळतात ते बघून हे प्रकर्षाने जाणवते. मुलं आता स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबलटेनीस, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांच्या वर्गांना सकाळी किंवा संध्याकाळी जातात किंवा क्लब जॉइन करतात. बदलत्या राहणीमानाला आपल्यालाही आपलेसे करावेच लागते या प्रकारात घरातील आई वडील, किंबहुना आईच मुलांना ने आण करण्याची जबाबदारी पार पाडत असते.
या उलट पूर्वीचे खेळ म्हणजे २५-३० वर्षांपूर्वी खेळांचे वर्ग फारच थोडे होते. किंबहुना उच्च मध्यमवर्गीय प्रकारातील लोकांची मुलेच या क्लासेस ला जात असत. त्यामुळे आमची खेळाची भूक आम्ही परिसरातील मित्र मैत्रिणींना गोळा करून भागवत असू. हे सगळे खेळ आज आठवले तरी गंमत वाटते. कुठल्याही कोचिंग शिवाय शारीरिक व्यायाम करून घेणारे हे सगळे खेळ खेळल्यामुळे आमचे बालपण श्रीमंत झाले, असेच आज वाटते. यापैकी काही खेळ जे मला आठवत आहेत ते मला इथे सांगावेसे वाटतात.
लंगडी / पकडपकडी
साखळी / खंडसाखळी
टिक्कर बिल्ला / कंचे
आंधळी कोशिंबीर /लपाछुपी
सुरकांडी / लगोरी
विटी दांडू
याशिवाय धापधुपी, , धावणे, तीन पायांची शर्यत, दोरीवरच्या उड्या, इलास्टिक मध्ये पाय घालून खेळणे, नदी की पहाड, आईचं पत्र हरवलं, आजी बाई तूप लोणी, तळ्यात मळ्यात असे अनेक खेळ आम्ही खेळलेले आठवत आहे. काळाच्या आणि राहणीमानाच्या बदलात हे खेळ कुठेतरी लुप्त झालेले आहेत. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना ठराविकच खेळाडू संख्या असायला हवी किंवा ठराविकच आकाराचे मैदान असायला हवे किंवा अमुक एखादी वस्तूच घ्यायला हवी असे काहीही नियम नव्हते. या खेळांमध्ये कितीही जण सामील होऊ शकत होते, कितीही जण मधूनच आईने बोलावले म्हणून किंवा पडले, लागले म्हणून बाद होत असत पण खेळ कधीच थांबत नव्हता. शाळेतून घरी येऊन दप्तर ठेवले की आई येते ग म्हणून आम्ही जे गायब व्हायचो ते थेट दिवेलागणी च्या च वेळी घरात परत येत असू. त्यामुळे त्या खेळांसारखी धमाल आजच्या खेळात नाही असेच वाटते.
तुम्हालाही तुमच्या लहानपणीचे खेळ आठवत असतील तर नक्की सांगा...
#सुरपाखरू

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लहानपणी मित्रमैत्रिणींबरोबर धु-ड-गू-स घातलेला आहे. दिवाळी/उन्हाळी सुट्टी म्हणजे पहील्या ३-४ दिवसात गृहपाठ करुन 'टाकणे' व नंतरचे दिवस खेळणे. लपंडाव, डबा ऐसपैस, लिंगोरचा / लगोरी, लंगडी, टिपरीपाणी, लंडन-लंडन-लंडन, वीषामृत, तळ्यात की मळ्यात, कटिंग द केक, जोड साखळी, जंगलजिम- झोके-सीसॉ, घसरगुंडी यासर्वातून वेळ मिळाला की दुपारी कॅरम, पत्ते, मोनॉपली, सागरगोटे, बिट्ट्या.
दिवे गेले की लपंडाव ज्यामध्ये मुले शर्टची अदलाबदल करत मग चूकीचे नाव घेतले की धोप्पा होइ. त्यातही मी फार कनवाळू - मैत्रिणीचे राज्य स्वतःवरती घेइ.
किती मजा होती तेव्हा. आंबे खाउन, पंख्याखाली लोळाणे, चिवडा-लाडूचे बोकाणे भरत दिवाळीअंकांचा पुस्तकांचा फडशा पाडणे. संध्याकाळी सायकलने कॅम्पातल्या ग्रंथालयात जाउन हवी ती पुस्तके आणणे.

@ सामो, वा किती सुखद आठवणी आहेत, सगळी धम्माल नजरेसमोरून गेली, खरंच same to same आठवणी आहेत. तुम्ही सांगितलेले बरेच खेळ खेळलेले आहे. पण काही खेळ, जंगल जीम, कटींग द केक नवीन आहेत. बाकी पुस्तकं वाचणे ही अगदी तसेच होते, मजा आली प्रतिक्रिया वाचायला, धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद @सामो, ऋतुराज, नि.३, मनीमोहर. @ मनीमोहोर तुमचा लेख वाचला, छान लिहिला आहे, आम्ही पण उन्हाळाभर पत्ते कुटत असू.