कोंदट, घामट स्वयंपाकघरं

Submitted by रानभुली on 29 June, 2025 - 02:05

निमित्त आहे मॅक्सीतल्या मुलीचे रील्स व्हायरल होणं.

या व्हायरल रील्स वर अनेक न्यूज चॅनेल्सच्या सोशल मीडीयातल्या पोर्टल्सने स्टोर्‍या बनवायला सुरूवात केली आहे.
बीबीसी मराठीने एका महत्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधलंय. मॅक्सीचा इतिहास वगैरे बाजूला ठेवूयात.

पण बीबीसीने मार्मिक विश्लेषण केलंय.

व्हिडीओचा सारांश ( युट्यूब व्हिडीओ बघणे शक्य नसल्यास)
गृहीणी नेहमी घरातल्या पुरूषांना गरम गरम अन्न वाढता यावं म्हणून जास्तीत जास्त वेळ किचन मधे घालवते. अगदी भाज्या आधी बनवल्या तरीही चपात्या ऐन वेळी ती बनवते. सर्वांची जेवणं होऊन ती फक्त आपलं जेवण होण्यासाठी वाट बघत नाही. तर एकदाची सर्वांची जेवणं झाली कि घामाने थबथबलेल्या पाठीला थोडीसा आराम मिळावा, वॉश घेऊन रेशमी / सुती मॅक्सीचा स्पर्श व्हावा असं तिला वाटत असतं.
खर तर मॅक्सी हा विषय व्हायरल झाल्याने त्या दृष्टीने बीबीसीने या प्रश्नाकडं पाहिलं.

पण किचन मधे येणारा घाम आणि किचनमधे असताना घालायचे कपडे यासारखाच दुर्लक्षित विषय आहे किचनची रचना. यावर जास्त चर्चा वाचनात आलेल्या नाहीत. द ग्रेट इंडीयन किचन्स पाहिलेला नाही, पण गृहीणींचं किचनमधे कसं शोषण होतं यावर तो आहे एव्हढं मायबोलीमुळे समजलं. किचनची रचना त्यात आहे कि नाही याची कल्पना नाही.

घर घेताना नवरा बायको आधी सँपल फ्लॅट ( शो फ्लॅट ) बघायला जातात. तेव्हां अनेकदा किचनच्या जागी ओट्याची जागा दिसते. ज्या घरात किचनची जागा हॉलचा भाग असते (मधे अर्धी भिंत असते) ती घरं लक्झरी म्हणून प्रचंड महाग असतात. पूर्वीप्रमाणे प्रशस्त किचन आता लयाला गेलं आहे. आता किचनच्या नावावर एव्हढीच जागा दिसते.

तरीही खूप घरं पाहिल्यानंतर मोठं किचन स्त्रीला पसंत पडतं. पण नंतर किंमत, सगळे टॅक्सेस , हफ्ता, लोन मंजुरी यांचा ताळमेळ बसत नाही तेव्हां स्त्री किचनच्या बाबत तडजोड करते. बरेचदा जाहीरातीतून बेडरूमची जाहीरात केलेली असते. सेल्स वाला ही सांगत असतो कि हॉल मधे पाहुणे येतात आणि बेडरूम ही आपली खासगी जागा असते. बेडरूम मधे आपला मूड शांत होत असतो. म्हणून हॉल आणि बेडरूम मनासारखे असेल कि घर घेताना जास्त बघू नये.

बेडरूम, हॉल आणि किचन च्या ओढाताणीत मग किचनवर तडजोड होते.
पण स्त्रीचा सर्वात जास्त वेळ किचनमधे जातो हे नंतर लक्षात येतं. ज्या घरात किचन छोटं असून त्याला पूर्ण भिंती घालून हॉलपासून वेगळं केलं जातं त्या किचन मधे उभं राहणं अशक्य होतं. फोडण्या, वेगवेगळे वास आणि गरम हवा यामुळं शरीर आतून बाहेरून भट्टीत घातल्यासारखं होत असतं.

काही ठिकाणी तर आजूबाजूला उंच इमारती असल्याने हवा खेळती नसते. किचनला काही घरात खिडकी नसते. वर व्हेंटिलेटर्स नावाला दिलेले असतात. चिमणी लावल्यावर काही दिवस बरं वाटतं. पण किचनच्या गरम भिंती, तप्त हवा यापासून ती काहीच प्रमाणात सुटका करते. किचन अरूंद असेल तर सिलिंग फॅन सुद्धा छोटाच लावावा लागतो. तो अक्षरशः असून नसल्यासारखा.

जर किचनमधे हवा खेळती राहत नसेल तर कधी कधी फॅन फक्त गरम हवा फिरवत राहतो, हे म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात !
खेळती हवा, किमान दोन बाजूला वायूविजन होण्यासाठी खिडक्या हे स्वप्नच राहतंं.

तरीही समजा बर्‍यापैकी आकाराचं किचन मिळालंच तरीही उंचीत मार खाल्लेला असतो.
पूर्वीची घरं किमान साडेदहा फूट उंच असत. ही उंची सिव्हिल इंजिनियर नातेवाईकांनी त्यांच्या हॅण्डबुक प्रमाणे योग्य असल्याचे सांगितले आहे. पारशांची घरं उंच असतात. शहरात सुद्धा त्यांची घरं अशीच असतात. बाकीच्यांनी फ्लॅट्संस्कृती आपलीशी केली आहे. प्रीमीयम किंवा लक्झरी घरात राहणारे सुदैवी असतात. पण सर्वांच्या नशिबात हे सुख नसतं.

गावाकडची घरं सुद्धा उंच असतात. हल्ली २/३ बीएचके मधे सुद्धा साडेनऊ फूट उंचीची घरं मिळतात. दिसायला टुमदार पण फक्त किचनमधे वेळ घालवणार्‍यालाच त्यातले तोटे कळतात.

बैठ्या बंगल्यात किचनला जागा सोडलेली असते. पण ते ही तीन बाजूंनी बंदीस्त असतं. समोर खिडकी दिलेली असते. बैठ्या घरात सुद्धा उंची बघितली जात नाही. साडेनऊ फूट हे स्टँडर्ड होत चाललं आहे. नियमच बिल्डर्सच्या बाजूने बनवले जातात.

कपडे सुटसुटीत असायला हवेत पण घराचं बांधकाम हा कळीचा मुद्दा आहे.
वास्तुशास्त्र सोडून द्या. पण किचन बांधताना वार्‍याची दिशा लक्षात घ्यावी. आत येणारी हवा आणि बाहेर जाणारी हवा अशा पद्धतीने व्हेंटिलेशन रचलेलं असावं. उंची किमान साडेदहा फूट असावी आणि वावरायची जागा किमान दोनशे स्क्वेअर फूट असावी म्हणजे खेळती हवा राहते. गरम हवा निघून जायला मदत होते.

अशा किचनमधे थोडा जास्त वेळ घालवता येऊ शकतो.
किचनमधे स्त्रीनेच वेळ घालवावा का हा इथे विषय नाही. जे कुणी स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडत असेल , मग मेड का असेना, त्याच्यासाठी रचना त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने, कंफर्टच्या दृष्टीने असावी ही माफक अपेक्षा आहे.

असे कायदे बनवावेत, या सोयींसहीत माफक दरात घर मिळावं या अपेक्षा असल्या तरी हे काही होणार नाही म्हणून शेखचिल्ली प्रमाणे स्वप्नं बघण्यात अर्थ नाही. पण शक्य झालंच तर बिल्डरशी बोलून किचन मधे सुधारणा करता आल्या तर बरंच आहे. आमच्या इथे बर्‍याच जणांनी ड्राय बाल्कनी (किचनला जोडून असलेली) किचन मधे घेतल्याने मोठी जागा निर्माण झाली आहे. एक अजून हाफ बाल्कनी असलेल्यांनी वॉशिंग मशीन आण डिश वॉशरचे कनेक्शन तिथे घेतले आहे.

ओट्यांची रचना ज्याला हवी तशी त्याने ठेवावी.

पण स्वप्नवत किचन हे स्वतः बांधलेल्या घरातच मिळू शकते.
एकदा गुजरातमधे एका मल्याळी फॅमिलीचं घर बघण्याचा योग आला.
शहरापासून किंचित लांब जागा घेऊन त्यांनी घर बांधलं. केरळात मिळणारा लाल दगड आणून तिथल्याच कारागिरांनी दोन महीन्यात लोड बेअरिंगचं घर बांधलंय.

त्यांच्या घरात दोन किचन्स आहेत. एक मॉडर्न आणि दुसरं जे आहे ते पारंपारिक.
पारंपारिक किचन ओपन असतं. म्हणजे मुख्य घराचा भाग नसतं. मधे जोडणार्‍या भागात लाकूड फाटा किंवा कोळसा असतो. या किचनच्या भिंती अर्धवट असतात आणि लाकूड किंवा सिमेंटच्या खांबांवर कौलारू (किंवा पत्र्याचं) छत असतं. उतरत्या छतामुळे पाऊस आत येत नाही. अशा किचनमधे एक से एक चुली रचलेल्या असतात. त्या किचन ओट्यासारख्याच असतात. वारं आलं तर चूल विझणार नाही अशी रचना असते.
धूर झाला तरी तो भिंती पूर्ण नसल्याने कोंडला जात नाही. चूल पेटवताना खोकला येतो. (कार्बनचा धूर तसा घातक, पण धूर कोंडून राहत नसेल तर नसायला पाहीजे).

आम्ही मध्यंतरी दिल्ली चंदीगड प्रवासात रस्ता सोडून किंचित आत एका रिसॉर्ट मधे गेलेलो. त्यांचं किचन असंच स्वतंत्र गोलाकार होतं.
पुण्यात आळंदी रस्त्यावरचं गोखले मळा वाल्यांचं किचन असंच आहे. अभिरूची वाल्यांचंही किचन बघण्यासारखं असायचं. ते बंद झालं त्याचं वाईट वाटतं.

पानशेत जवळचं शांतीवनचं किचन आणी डायनिंग सुद्धा स्वप्नवत आहे.
कुलू मनाली रस्त्यावर एक असंच रिसॉर्ट आहे. ही किचन्स देखणी आणि आरोग्यदायी आहेत. हल्ली बेंगलुरू किचन्स नावाने संपूर्ण स्टीलची किचन्स येतात. पण ही हॉटेल्ससाठी ठीक आहेत. पुण्यात एक गुजराथी कुटुंब आहे. आम्ही लहान असतानाच त्यांच्या घरात शंभरच्या वर मेंबर्स होते. त्यांनी असं किचन बनवून घेतलं होतं. मोठ्या श्रीमंत कुटुंबात अशी किचन्स दिसतात. पण घरातल्या व्यक्तीने अशा किचनमधे काम करायचं ठरवलं तर अवघड आहे.

सध्या तरी हे स्वप्नवत वाटत असलं तरी तडजोड न करता किचन साठी तजवीज केली तर तिच्यासाठी ते वरदान ठरेल. तिनेही लांबचा विचार करताना किचनमधे तडजोड नकोच करायला. घर घ्यायचं असलं कि येतात पैसे. सुरूवातीला घरासाठीही अशक्य वाटत असताना अचानक पैसे जमा होऊ लागतात. तर थोडं बजेट वाढवून किचन कडे लक्ष दिलं तर आयुष्य सुखात जाईल. पुन्हा पुन्हा हा जन्म मिळत नाही.

आवडलेली काही किचन्स.
फोटो आंजावरून साभार
प्रचि क्र १
2db2cb4e27073c6dff2eceb776861df6.jpg
प्रचि क्र २
4d803c1e4e6e8942b839998221e8834c.jpg
प्रचि क्र ३
16a4785b0c4df1313888bf0806b84b83.jpg
प्रचि क्र ४
774aeea26940e48f7da1df5f0695a990.jpg
प्रचि क्र ५
0fa66543ee47bf99d02aca2bd2bf3ade.jpg
प्रचि क्र ६
2a75218a260a120696b3840444f012d5.jpg
प्रचि क्र ७
e96433d438d693ee2b76d18949b222a1.jpg
प्रचि क्र ८
4d803c1e4e6e8942b839998221e8834c_0.jpg
प्रचि क्र ९
8cbbaa20d433055515f9ddaee4effe4b.jpg
प्रचि क्र १०
0afca89181b20189935ae6ca7d93c11b.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानभुली, छान लेख.
फोटो पण खूप आवडले.
महत्वाचा विषय.
सगळ्यांची मते आणि चर्चा आवडली.
शहरातील आजकालची किचन पाहता, किचन मधील स्पेस मॅनेजमेंट महत्वाची आहे.

Pages