कोंदट, घामट स्वयंपाकघरं

Submitted by रानभुली on 29 June, 2025 - 02:05

निमित्त आहे मॅक्सीतल्या मुलीचे रील्स व्हायरल होणं.

या व्हायरल रील्स वर अनेक न्यूज चॅनेल्सच्या सोशल मीडीयातल्या पोर्टल्सने स्टोर्‍या बनवायला सुरूवात केली आहे.
बीबीसी मराठीने एका महत्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधलंय. मॅक्सीचा इतिहास वगैरे बाजूला ठेवूयात.

पण बीबीसीने मार्मिक विश्लेषण केलंय.

व्हिडीओचा सारांश ( युट्यूब व्हिडीओ बघणे शक्य नसल्यास)
गृहीणी नेहमी घरातल्या पुरूषांना गरम गरम अन्न वाढता यावं म्हणून जास्तीत जास्त वेळ किचन मधे घालवते. अगदी भाज्या आधी बनवल्या तरीही चपात्या ऐन वेळी ती बनवते. सर्वांची जेवणं होऊन ती फक्त आपलं जेवण होण्यासाठी वाट बघत नाही. तर एकदाची सर्वांची जेवणं झाली कि घामाने थबथबलेल्या पाठीला थोडीसा आराम मिळावा, वॉश घेऊन रेशमी / सुती मॅक्सीचा स्पर्श व्हावा असं तिला वाटत असतं.
खर तर मॅक्सी हा विषय व्हायरल झाल्याने त्या दृष्टीने बीबीसीने या प्रश्नाकडं पाहिलं.

पण किचन मधे येणारा घाम आणि किचनमधे असताना घालायचे कपडे यासारखाच दुर्लक्षित विषय आहे किचनची रचना. यावर जास्त चर्चा वाचनात आलेल्या नाहीत. द ग्रेट इंडीयन किचन्स पाहिलेला नाही, पण गृहीणींचं किचनमधे कसं शोषण होतं यावर तो आहे एव्हढं मायबोलीमुळे समजलं. किचनची रचना त्यात आहे कि नाही याची कल्पना नाही.

घर घेताना नवरा बायको आधी सँपल फ्लॅट ( शो फ्लॅट ) बघायला जातात. तेव्हां अनेकदा किचनच्या जागी ओट्याची जागा दिसते. ज्या घरात किचनची जागा हॉलचा भाग असते (मधे अर्धी भिंत असते) ती घरं लक्झरी म्हणून प्रचंड महाग असतात. पूर्वीप्रमाणे प्रशस्त किचन आता लयाला गेलं आहे. आता किचनच्या नावावर एव्हढीच जागा दिसते.

तरीही खूप घरं पाहिल्यानंतर मोठं किचन स्त्रीला पसंत पडतं. पण नंतर किंमत, सगळे टॅक्सेस , हफ्ता, लोन मंजुरी यांचा ताळमेळ बसत नाही तेव्हां स्त्री किचनच्या बाबत तडजोड करते. बरेचदा जाहीरातीतून बेडरूमची जाहीरात केलेली असते. सेल्स वाला ही सांगत असतो कि हॉल मधे पाहुणे येतात आणि बेडरूम ही आपली खासगी जागा असते. बेडरूम मधे आपला मूड शांत होत असतो. म्हणून हॉल आणि बेडरूम मनासारखे असेल कि घर घेताना जास्त बघू नये.

बेडरूम, हॉल आणि किचन च्या ओढाताणीत मग किचनवर तडजोड होते.
पण स्त्रीचा सर्वात जास्त वेळ किचनमधे जातो हे नंतर लक्षात येतं. ज्या घरात किचन छोटं असून त्याला पूर्ण भिंती घालून हॉलपासून वेगळं केलं जातं त्या किचन मधे उभं राहणं अशक्य होतं. फोडण्या, वेगवेगळे वास आणि गरम हवा यामुळं शरीर आतून बाहेरून भट्टीत घातल्यासारखं होत असतं.

काही ठिकाणी तर आजूबाजूला उंच इमारती असल्याने हवा खेळती नसते. किचनला काही घरात खिडकी नसते. वर व्हेंटिलेटर्स नावाला दिलेले असतात. चिमणी लावल्यावर काही दिवस बरं वाटतं. पण किचनच्या गरम भिंती, तप्त हवा यापासून ती काहीच प्रमाणात सुटका करते. किचन अरूंद असेल तर सिलिंग फॅन सुद्धा छोटाच लावावा लागतो. तो अक्षरशः असून नसल्यासारखा.

जर किचनमधे हवा खेळती राहत नसेल तर कधी कधी फॅन फक्त गरम हवा फिरवत राहतो, हे म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात !
खेळती हवा, किमान दोन बाजूला वायूविजन होण्यासाठी खिडक्या हे स्वप्नच राहतंं.

तरीही समजा बर्‍यापैकी आकाराचं किचन मिळालंच तरीही उंचीत मार खाल्लेला असतो.
पूर्वीची घरं किमान साडेदहा फूट उंच असत. ही उंची सिव्हिल इंजिनियर नातेवाईकांनी त्यांच्या हॅण्डबुक प्रमाणे योग्य असल्याचे सांगितले आहे. पारशांची घरं उंच असतात. शहरात सुद्धा त्यांची घरं अशीच असतात. बाकीच्यांनी फ्लॅट्संस्कृती आपलीशी केली आहे. प्रीमीयम किंवा लक्झरी घरात राहणारे सुदैवी असतात. पण सर्वांच्या नशिबात हे सुख नसतं.

गावाकडची घरं सुद्धा उंच असतात. हल्ली २/३ बीएचके मधे सुद्धा साडेनऊ फूट उंचीची घरं मिळतात. दिसायला टुमदार पण फक्त किचनमधे वेळ घालवणार्‍यालाच त्यातले तोटे कळतात.

बैठ्या बंगल्यात किचनला जागा सोडलेली असते. पण ते ही तीन बाजूंनी बंदीस्त असतं. समोर खिडकी दिलेली असते. बैठ्या घरात सुद्धा उंची बघितली जात नाही. साडेनऊ फूट हे स्टँडर्ड होत चाललं आहे. नियमच बिल्डर्सच्या बाजूने बनवले जातात.

कपडे सुटसुटीत असायला हवेत पण घराचं बांधकाम हा कळीचा मुद्दा आहे.
वास्तुशास्त्र सोडून द्या. पण किचन बांधताना वार्‍याची दिशा लक्षात घ्यावी. आत येणारी हवा आणि बाहेर जाणारी हवा अशा पद्धतीने व्हेंटिलेशन रचलेलं असावं. उंची किमान साडेदहा फूट असावी आणि वावरायची जागा किमान दोनशे स्क्वेअर फूट असावी म्हणजे खेळती हवा राहते. गरम हवा निघून जायला मदत होते.

अशा किचनमधे थोडा जास्त वेळ घालवता येऊ शकतो.
किचनमधे स्त्रीनेच वेळ घालवावा का हा इथे विषय नाही. जे कुणी स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडत असेल , मग मेड का असेना, त्याच्यासाठी रचना त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने, कंफर्टच्या दृष्टीने असावी ही माफक अपेक्षा आहे.

असे कायदे बनवावेत, या सोयींसहीत माफक दरात घर मिळावं या अपेक्षा असल्या तरी हे काही होणार नाही म्हणून शेखचिल्ली प्रमाणे स्वप्नं बघण्यात अर्थ नाही. पण शक्य झालंच तर बिल्डरशी बोलून किचन मधे सुधारणा करता आल्या तर बरंच आहे. आमच्या इथे बर्‍याच जणांनी ड्राय बाल्कनी (किचनला जोडून असलेली) किचन मधे घेतल्याने मोठी जागा निर्माण झाली आहे. एक अजून हाफ बाल्कनी असलेल्यांनी वॉशिंग मशीन आण डिश वॉशरचे कनेक्शन तिथे घेतले आहे.

ओट्यांची रचना ज्याला हवी तशी त्याने ठेवावी.

पण स्वप्नवत किचन हे स्वतः बांधलेल्या घरातच मिळू शकते.
एकदा गुजरातमधे एका मल्याळी फॅमिलीचं घर बघण्याचा योग आला.
शहरापासून किंचित लांब जागा घेऊन त्यांनी घर बांधलं. केरळात मिळणारा लाल दगड आणून तिथल्याच कारागिरांनी दोन महीन्यात लोड बेअरिंगचं घर बांधलंय.

त्यांच्या घरात दोन किचन्स आहेत. एक मॉडर्न आणि दुसरं जे आहे ते पारंपारिक.
पारंपारिक किचन ओपन असतं. म्हणजे मुख्य घराचा भाग नसतं. मधे जोडणार्‍या भागात लाकूड फाटा किंवा कोळसा असतो. या किचनच्या भिंती अर्धवट असतात आणि लाकूड किंवा सिमेंटच्या खांबांवर कौलारू (किंवा पत्र्याचं) छत असतं. उतरत्या छतामुळे पाऊस आत येत नाही. अशा किचनमधे एक से एक चुली रचलेल्या असतात. त्या किचन ओट्यासारख्याच असतात. वारं आलं तर चूल विझणार नाही अशी रचना असते.
धूर झाला तरी तो भिंती पूर्ण नसल्याने कोंडला जात नाही. चूल पेटवताना खोकला येतो. (कार्बनचा धूर तसा घातक, पण धूर कोंडून राहत नसेल तर नसायला पाहीजे).

आम्ही मध्यंतरी दिल्ली चंदीगड प्रवासात रस्ता सोडून किंचित आत एका रिसॉर्ट मधे गेलेलो. त्यांचं किचन असंच स्वतंत्र गोलाकार होतं.
पुण्यात आळंदी रस्त्यावरचं गोखले मळा वाल्यांचं किचन असंच आहे. अभिरूची वाल्यांचंही किचन बघण्यासारखं असायचं. ते बंद झालं त्याचं वाईट वाटतं.

पानशेत जवळचं शांतीवनचं किचन आणी डायनिंग सुद्धा स्वप्नवत आहे.
कुलू मनाली रस्त्यावर एक असंच रिसॉर्ट आहे. ही किचन्स देखणी आणि आरोग्यदायी आहेत. हल्ली बेंगलुरू किचन्स नावाने संपूर्ण स्टीलची किचन्स येतात. पण ही हॉटेल्ससाठी ठीक आहेत. पुण्यात एक गुजराथी कुटुंब आहे. आम्ही लहान असतानाच त्यांच्या घरात शंभरच्या वर मेंबर्स होते. त्यांनी असं किचन बनवून घेतलं होतं. मोठ्या श्रीमंत कुटुंबात अशी किचन्स दिसतात. पण घरातल्या व्यक्तीने अशा किचनमधे काम करायचं ठरवलं तर अवघड आहे.

सध्या तरी हे स्वप्नवत वाटत असलं तरी तडजोड न करता किचन साठी तजवीज केली तर तिच्यासाठी ते वरदान ठरेल. तिनेही लांबचा विचार करताना किचनमधे तडजोड नकोच करायला. घर घ्यायचं असलं कि येतात पैसे. सुरूवातीला घरासाठीही अशक्य वाटत असताना अचानक पैसे जमा होऊ लागतात. तर थोडं बजेट वाढवून किचन कडे लक्ष दिलं तर आयुष्य सुखात जाईल. पुन्हा पुन्हा हा जन्म मिळत नाही.

आवडलेली काही किचन्स.
फोटो आंजावरून साभार
प्रचि क्र १
2db2cb4e27073c6dff2eceb776861df6.jpg
प्रचि क्र २
4d803c1e4e6e8942b839998221e8834c.jpg
प्रचि क्र ३
16a4785b0c4df1313888bf0806b84b83.jpg
प्रचि क्र ४
774aeea26940e48f7da1df5f0695a990.jpg
प्रचि क्र ५
0fa66543ee47bf99d02aca2bd2bf3ade.jpg
प्रचि क्र ६
2a75218a260a120696b3840444f012d5.jpg
प्रचि क्र ७
e96433d438d693ee2b76d18949b222a1.jpg
प्रचि क्र ८
4d803c1e4e6e8942b839998221e8834c_0.jpg
प्रचि क्र ९
8cbbaa20d433055515f9ddaee4effe4b.jpg
प्रचि क्र १०
0afca89181b20189935ae6ca7d93c11b.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम विषय, या वर विचार व्हायलाच हवा अन परिवर्तन देखील
मी उत्तर भारतात बरेच दिवस राहिलो आहे, तिथे स्वयंपाक घरे अक्षरशः खुराडी असतात...
त्या मानाने दक्षिण भारतात खुली असतात, निदान पारंपारिक जुन्या घरात

अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.. स्वयंपाक हे फक्त फोडण्या घालायची जागा नसून तिथे दिवसातल्या अनंत क्रिया होत असतात. ऊंची ला योग्य असा ओटा. सामान साठवण्यासाठी नीट कप्पे . दिवसाचा बराचसा वेळ ऊजेड आणी हवा यायला हवी अशी रचना त्यानंतर एकजण जर ओट्यावर स्वयंपाक करत असेल तर दुसरा मनुष्य खाली बसून त्याला / तिला निवडणे चिरणे वगैरे करता येईल ईतकी जागा हे हव्वेच आहे.
हल्ली कुठल्यातरी मोकळ्या पॅसेज मधे एक ग्रॅनाईट च फळकूट लाऊन टाकायचे आणी त्याला किचन म्हणायचे अशीच फॅशन आली आहे

सध्याच्या घरात स्वयंपाक घर म्हणजे नीट स्वतंत्र खोली आहे जिथे तीन माणस अगदी निवांत मांडी घालुन जेऊ शकतात.
नवे घर घेताना मी अक्षरशः कित्येक नावाजलेल्या बिल्डर चे प्रोजेक्ट स्वयंपाक घर माझ्या अपेक्षेनुसार नाही म्हणून नाकारले आहेत.

मी जर जागा घेऊन घर बांधले ना तर स्वयंपाक घराला लागून कोठीची खोली करेन नक्की. जास्तीचा किराणा .. साठवणीचे धान्य वगेरे नीट ठेवेन.
बैठ्या घरात स्वयंपाक घराला मागे अंगणात निघणारा अजून एक दरवाजा काढेन आणी तिथेच छोट्या व्हरांड्यात वाॅम डिशवाॅशर वगैरे ठेवेन.
एक छोटा लोखंडी पलंग ही ठेवेन ज्यावर वस्तू ऊन दाखवायला ठेवता येतील
बघूयात कधी स्वप्न पुर्ण होतय

खूपच छान विषय आणि त्याची मांडणी. मला पण आवडेल आरोग्यदायी आणि ऐसपैस kitchen. Hmmm बघू केव्हा योग येतो ते

घरं पुरुष बांधतात त्यामुळे सैपाकघर हा विषय कायम बॅकफुटवर राहिलाय हेमावैम.

फ्लॅट विकत घेताना सैपाकघर स्टँडर्ड मिळते. आपण स्वतः घर बांधले तर काही करता येते.

आमचे आंबोलीचे घर बांधत असताना ते कसे असावे ह्यावर मी शुन्य विचार केला. भावाने डिजाईन केले पण डिस्कशन करावे हे कोणालाच सुचले नाही. फ्रेंच विंडो हवी हे माझ्या डोक्यात होते तेवढे मी करुन घेतले. बाकी घराबाबत विचार करायला हवा हे सुचले नाही. सुचले असते तर सहज करुन घेता आले असते. बिल्डर घरचाच असल्याने घर पाच वर्षे इन द मेकिंग होते. ह्या पाच वर्षात मी केलेल्या साईट विझिट्सची संख्या पाचपेक्षाही कमी भरेल Happy आणि त्या मुद्दाम केलेल्या साईट विझिट्स नव्हत्या. Happy

कायमचे राहायला आल्यावर घरातल्या असंख्य त्रुटी लक्षात आल्या. तेव्हाच लक्ष दिले असता तर ह्या त्रुटी राहिल्या नसत्या ह्या विचाराने आता खुप वाईट वाटते पण आता काही करता येण्यासारखे नाही. जो हुवा सो हुवा.

ऐशुला असे घर हवे होते जिथे सैपाकघर ही मुख्य खोली असेल. जिथे सगळे एकत्र गप्पा मारता मारता सैपाक करतील, जेवतील, पुस्तके वाचतील, सैपाक करणारी व्यक्ती एकाच वेळी सैपाक करु शकेल, पुस्तक ऐकु शकेल, गप्पात भाग करु शकेल, सैपाकात मदत घेऊ शकेल.

सैपाकघराची डिजाईन अशी असते की सैपाक करणारी व्यक्ती आत एकटी पडते आणि बाकीचे बाहेर बसुन गप्पा मारतात. सैपाक करणार्‍याला त्या गप्पात सहभागी होता येत नाही. त्यामुळे सैपाकघरच मुख्य खोली करा जिथे एकत्रित सगळे करता येईल असे तिला वाटते. असो. तिचे स्वप्न साकार होवो ही प्रार्थना.

फोटोतली सैपाकघरे to die for अशी आहेत. पण अशाउघड्या सैपाकघरात कुत्री मांजरी पक्षी (कावळे) त्रास देतील असे वाटते.

रेड सॉइल स्टोरीज ह्या यु ट्युब चॅनेलच्या पुजा व शिरीषने असे ओपन किचन बांधुन घेऊन तिथुन चॅनेल सुरु केले. त्यांना मिळणारे लाखो व्युज पाहुन त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असे वाटते.

फोटोतली सैपाकघरे to die for अशी आहेत. पण अशाउघड्या सैपाकघरात कुत्री मांजरी पक्षी (कावळे) त्रास देतील असे वाटते.>>> साधना ! काही फोटोवरुन तरी ही इथे अमेरिकेत असतात ती बॅकयार्ड मधली बार्बेक्यू आयलॅन्ड किवा आउटडोअर पिझा अवन्स वाटतायत..ही मेन किचन नाहित (जरी आलमोस्ट सगळ्या तशा सोयी असल्या तरी) लोकाकडे जरा मोठ बॅकयार्ड असेल तर हौसेन करुन घेतात.

महत्त्वाचा आणि दुर्लक्षित मुद्दा घेतलात.

आमच्या सोसायटीला व अर्थात इमारतीला ५१ वर्षे झाली. सोसायटीत १RK, 1BHK, 2BHK , 3BHK असे सगळ्या प्रकारचे फ्लॅट आहेत. त्यातल्या सगळ्यात लहान फ्लॅटमध्ये घरात शिरताच किचन आणि शेवटी हॉल. या किचनला ओट्यावर ३ x २.५ फुटाची खिडकी.. तिला सुरुवातीला खालीवर करायच्या आडव्या काचा होत्या. बहुतेकांनी त्या बदलून ग्रिल + काचेची दारं असं करून घेतलं. वायुवीजन नसल्यात जमा.

आमचं स्वैपाकघर ११ x १० फुटाचं आहे. एका बाजूला ६ x ४ ची खिडकी. आधी लाकडी तावदाने होती. आता स्लायडिंग काचा. आईने ग्रिल लावू दिलं नाही. ओट्यावर ती ३ x २.५ फुटाची खिडकी. शिवाय हॉलमधली खिडकी किचनच्या दाराच्या समोर. त्यामुळे हवा मस्त खेळती राहते. पंखा लावलाच तर किमान गतीवर. दिवसा दिवेही लावावे लागत नाहीत. फक्त ओट्याची रुंदी (भिंतीपासून कडेपर्यंत) कमी वाटते. आणखी अर्धा फूट चालेल.
मोठ्या फ्लॅटस मध्ये ओपन किचन आहेत. हॉलमधून दिसणार्‍या. म्हणजे हॉलच्या एका टोकाला ओटा. किचन तुम्हांला हवं तेवढं. पण बहुतेकांना हे न झेपल्याने त्यांनी पार्टिशन घालून घेतलं किंवा तिथे कपाटं वगैरे ठेवून आडोसा केला. त्यामुळे नैसर्गिक उजेड आणि खेळती हवा नाहीत.

आमच्या नंतर बनलेल्या आणि बहुतेक रिडेव्हलपमेंटच्या घरांत किचन अगदीच अंग चोरून उभ्या असतात. एका वेळी दोन माणसांचा वावर कठीण. त्यात वॉशिंग मशीनची जागाही किचनमध्येच. ती घरं बघितलं की आमचं किचन किती प्रशस्त आहे, हे जाणवत राहतं.

आमच्या कॉलनीच्या रिडेव्हलपमेंटच्या पुड्या सुटू लागल्यात. ते प्रत्यक्षात आलं तर किचन मोठं ठेवा म्हणून आग्रह धरायला हवा.

स्वतःचं घर वगैरे कधीतरी स्वप्नरंजनापुरतं होतं. तेव्हाही किचनचा विचार केला नव्हता , असं आठवतं.

महत्वाचा विषय आहे; मतमतांतरे वाचायला मिळतील. धागा काढल्याबद्धल आभार.

मतभिन्नतेच्या आदरासहित: किचन आटोपशीर असावे. आजकाल स्वयंपाक करणारी व्यक्ती दिवसभरात किती वेळ किचनमध्ये असते? सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर. त्याप्रमाणात जागेच्या प्रती चौरस फूट किमतीचा विचार करायला हवा. ओटा L शेपचा नसावा. दोन समांतर ओटे असावेत. किचनला खिडकी हवीच. त्याशिवाय इतरत्र storage room (कुठीची खोली) हवी. क्रॉकरी ठेवण्यासाठी वेगळा विभाग असावा. किचन व डाइनिंग हे वेगवेगळे असावे.

अवांतर: जागेच्या प्रती चौरस फूट किमतीचा विचार करता डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉप परवडतो!

आजकाल स्वयंपाक करणारी व्यक्ती दिवसभरात किती वेळ किचनमध्ये असते?>>>>

सगळे पुरुष बिल्डर्स हाच विचार करतात. जिथे आठ तास फॅन्/एसी लाऊन डोळे मिटुन, अंधार करुन झोपेत घालवणार ती बेडरुम छान प्रसन्न, हवेशीर हवी.

कशासाठी? पोटासाठी!! हा आयुष्याचा जगन्नाथाचा रथ आपण ओढतो ते उदरभरणाचे चविष्ठ भोजन जी व्यक्ती बनवते तिला प्रसन्न वातावरणात पाकसिद्धी करुदे असे आपल्या डोक्यात कदापी येत नाही!!! Happy

ज्यांचं घर खूप मोठं आहे आणि त्यांनी किचन लहान केलंय तर किचन मोठ का केलं नाही असा विचार मनात येऊ शकतो.
पण जिथे घरच खूप लहान आहे उदा मुंबईतील घर , तिथे ही किचन मोठं आणि खोल्या लहान हे मला पटत नाही. तिथे किचन लहान च असणे योग्य आहे. कारण आपण आपल्या खोलीप्रमाणे किचन मध्ये रिलॅक्स होऊ शकत नाही, झोपू शकत नाही. वगैरे वगैरे.. तसेच आजकाल रेडीमेड पदार्थ आणण्याकडे ही कल वाढलेला आहे, स्वयंपाकाच काम खूप ठिकाणी औट सोर्स ही केलेलं असतं त्यामुळे लहान घरात किचन खोलीपेक्षा लहान असणेच योग्य वाटते मला.

बाकी सगळे आऊट सोर्स करा, कृपया जेवण आउटसोर्स करु नका. बाहेर मिळणार्‍या जेवणात - मग ते हॉटेलचे असो वा घरच्यासारखे - कुठले तेल, मसाले, भाज्या वापरल्यात याची अजिबात खात्री देता येत नाही. हे सगळे कमी प्रतीचे वापरुनही चव चांगली येण्यासाठी टेस्ट एन्हान्सर्स उपलब्ध आहेत. कित्येक ठिकाणी हल्ली हे वाचायला मिळते, पॉडकास्ट्स ऐकायला मिळतात.

शेवटी सगळी धडपड अन्नासाठी आहे. एवढे पैसे कमावताय ते उत्तम आरोग्यदायी अन्न खाण्यासाठी वापरा. हे अन्न घरात शिजवायला वेळ काढा. हा वेळ आज काढता येत नसेल तर कदाचित याची जबरी किंमत भविष्यात चुकवावी लागेल. एवढेच हात जोडुन सांगणे आहे.

आजकाल स्वयंपाक करणारी व्यक्ती दिवसभरात किती वेळ किचनमध्ये असते?>>>>

तिन्हीत्रिकाळ ज्येना, लहान मुलं यांना पचेल, रुचेल असा चौरस, नाविन्यपूर्ण काय स्वयंपाक करायचा याचा मेंटल लोड आणि उन्हाळ्यात कोंदट, वायुविजन नीट होत असलेल्या किचनमध्ये दररोज न चुकता २ तास घातल्यावर जो वैताग येतो, जी चिडचिड होते त्याने कित्येक बायकांचे बीपी वाढत असेल.
लोक जेव्हा आजकाल बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलंय अशी सहज टिप्पणी करतात त्यामागे किचनमध्ये जाणं आणि मागचं आवरणं नको हा एक छुपा हेतू असतो हे फारसे कुणाला जाणवत नाही.

मला ऐशूची कल्पना आवडली.

कृपया जेवण आउटसोर्स करु नका >> आउट सोर्स म्हणजे बाई येऊन स्वयंपाक करते असं म्हणायचं होतं मला... आता तिचा तरी जीव च आहे ना, तिला उकडत नसेल का ? असं म्हणू नका.. वर्क प्लेस बघुनच ती कामाला तयार होणार आहे.

फाटे फुटतायत पण चार वेळा स्वयंपाकाचा लोड जर घरातल्या एकाच बाईवर पडत असेल तर विचार सरणीत मेजर झोल आहे. घरकाम स्वयंपाक घेतल्या सगळ्यांची जबाबदारी आहे एकट्या बाईची नाही.

लेखामधली सर्व स्वयंपाकघरं Outdoor Kitchens आहेत.

बिल्डर लहान किचन देतात कारण हल्ली सदनिकांचे दर पहाता आणि परवडण्याची क्षमता पहाता एकूणच घराचे क्षेत्रफळच आक्रसलेले आहे.
मोठी घरं, ज्यांची खरेदीक्षमता मोठी त्यांना किंवा जिथे जमीनीचे दर कमी तिथे बऱ्यापैकी जणांना परवडू शकतील. मेट्रोसिटीज, टियर-१ शहरात हे जमणे कठीण आहे.
त्यातही आता स्विगी, झोमॅटोची चलती पहाता, Cloud Kitchen च्या संकल्पनेस मिळणारा प्रतिसाद पहाता आणि नोकरी, व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची वाढलेली संख्या पहाता "बिना स्वयंपाकघराची घरे" किंवा Community Kitchen हा ट्रेंड रुढ होऊ पहातोय.
दिवसाच्या वेळेनुसार खोलीचा वापर (Day Living-Night Sleeping), सोफा-कम-बेड सारखे फोल्डेबल पर्याय आणि कमी दराची, परवडण्याजोगी घरे यामुळे Studio Apartment हा पर्याय आता आधीच लोकप्रिय आहे.
अंतर्गत घरसजावटकारात महिलांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे त्यामुळे फक्त पुरुषांवरती याचा दोष ढकलणे अप्रस्तुत वाटते.
Kitchen Furniture ही आता एवढी मोठी इंडस्ट्री झाली आहे की या क्षेत्रातील स्त्रिया, पुरुष, भांडवलदार (Owner), Manufacturers हे कायम स्रियांच्या गरजांना धंद्यासाठी का होईना पण प्राधान्य देत असतात.
आधुनिक किचन डिझाईनमधे चिमणी, एक्झाॅस्ट फॅन आणि परवडत असल्यास एसी या सर्वांचा सुयोग्य ताळमेळ स्वयंपाकघर सुखकारक ठेवण्यास खूप मदत करतो. हा खर्च मोठ्या जागेमधे होणाऱ्या भांडवली खर्चापेक्षा जास्त किफायतशीर असतो.
मुळात मोठी खिडकी असेल तर ती हवा उजेडासाठी उपयुक्त असते. पण रात्री तिचा उजेडासाठी उपयोग नाही. अशावेळी न तापणाऱ्या Led Light Strips नेमक्या ठिकाणी आणि नेमक्या मात्रेत उजेड देण्यासाठी (अगदी दिवसाही) उपयुक्त ठरतात..

. घरकाम स्वयंपाक घेतल्या सगळ्यांची जबाबदारी आहे एकट्या बाईची नाही>>>>

म्हणुन मी सैपाकघरातील व्यक्ती हा शब्द प्रयोग केलाय Happy

निरु, सुंदर पोस्ट… प्रशस्त सैपाकघर हे ऐशुच्या कल्पनेप्रमाणे स्वप्नरंजन आहे. घर घेतले की लोक इंच इंच भुमी लढवल्यासारखे जागा जास्तितजास्त वापरायला कशी मिळेल हे पाहतात. त्यात किचन ही लास्ट प्रायोरिटी असते.

सगळे पुरुष बिल्डर्स हाच विचार करतात. << Happy
सर्व स्त्री/पुरुष बिल्डर्स लोकांच्या गरजेच्या लसावी नुसार घरं बांधतात.
बऱ्याच लोकांना मोठं किचन हवंय आणि ते बिल्डर्स देत नाहीत, असं होत नसतं.

घर घेतले की लोक इंच इंच भुमी लढवल्यासारखे जागा जास्तितजास्त वापरायला कशी मिळेल हे पाहतात. त्यात किचन ही लास्ट प्रायोरिटी असते. <<
यात लोकांचा दोष नाही. घरं कुठे, कोण आणि काय बजेटमधे बांधणार या तिन गोष्टींवर किचनच काय, घरातला कोणताही भाग अवलंबून असतो.
Nuclear Family की Joint, हे आणि यासारखे अन्य घटकही यावर परिणाम करतात.
एखाद्या Complex ची गोष्ट असेल तर readymade कपड्यासारखं होतं. बंगला/स्वतंत्र घर असेल तर Tailor Made..
स्वप्नं वेगळी (ती असायला हवीतच) आणि व्यवहार वेगळा.
स्वप्न व्यवहारात/प्रत्यक्षात उतरणं हा आनंद..
आणि ती प्रत्यक्षात उतरवणं, हे कर्तृत्ववानपणाचं लक्षण..

मस्त चर्चा चालली आहे.

साधनाताई, तळमळ पोहोचली. तुमच्या शेतघरात नक्की करत येईल. ओपन किचन मधे पक्षी, मांजरं हा तुमचा मुद्दा अचूक वाटला. काल सगळीच प्रचि दिली नाहीत. केरळातली पारंपारिक किचन्स असतात त्यात अशी ओपन नसतील पण वर सिमेंट, झावळ्यांच्या जाळ्या असतात. काही किचन्स मधे स्टील्सच्या जाळ्या किंवा हिरव्या रंगाच्या पीव्हीसी जाळ्याही लावता येतात. ही चित्रं फक्त स्पष्टता यावी म्हणून घेतलीत.

भरत यांची पोस्ट आवडली. हो , छोट्या घरात सुद्धा व्हेंटिलेशन्स काही ठिकाणी छान असतं. ज्या घरात व्हेंटिलेशन आहे तिथे प्रॉब्लेमच नाही.
बाकिच्या पोस्ट्स वाचतेय हळू हळू.
वामन राव सर, पोस्टचा विषयच आहे ना कि किंमती प्रचंड असल्याने तडजोड केली जाते. अर्थात तुमचं मत बरोबर आहे. पण सकाळ,संध्याकाळ एक एक तास जातो हे काही सगळीकडेच लागू होत नाही. आणि हे लॉजिक जर मान्य केलं तर आपल्याकडे पाहुणे तरी रोज कितीसे येतात ? मग तेव्हढ्यासाठी मोठ्ठा हॉल का घ्यायचा हे पण लॉजिक मान्य करावं लागेल ना ?
लहान असताना आमच्या कडे हॉल असा नव्हता. व्हरांडा, बैठकीची / झोपायची खोली आणि भलं मोठं स्वयंपाकघर. त्याला दोन खिड क्या होत्या आणि हवा खेळती होती. बैठकीच्या खोलीतच आम्ही झोपायचो, दिवसा कुणी आलं गेलं तर त्याच खोलीत.

अनिरूद्ध सर,
छान पोस्ट्स.

किचन च्या गरजांमधे तडजोड करून घरं घेणं सर्रास होत असल्याने त्यासाठी आग्रही राहिल्याशिवाय बिल्डर्स पुन्हा पहिल्यासारखी किचन्स देतील असं वाटतं का ?
जो दुर्लक्षित विषय आहे त्यावर चर्चा केली तर कदाचित इथून पुढे आपण आग्रहाने मागणी करू. बिल्डर्स लोकांनी किचन मधे काटछाट नक्कीच लोकांच्या गरजा लक्षात घेऊन केलेली नाही.
घर घ्यायच्या आधीच जर किचन बद्दल स्पष्ट विचार असतील तर जिथे कुठे उपलब्ध आहे तिथे थोडं बजेट ताणून ते घेणं अगदीच अशक्य नाही. पुण्यात आता लगतच्या उपनगरात सुद्धा ७५ - ८० लाखांपासून घरं मिळतात. एव्हढी जमवाजमव करताना पाच दहा लाखांची जास्तीची तजवीज करणं अगदीच अशक्य नसेल ना ?
बिल्डरशी बोलून घरात बदल करून घेणं शक्य असेल तर पहावं.
सध्या जे ट्रेण्डिंग आहे तेच गरजेचं आहे असं समजून घर घेतलं तर मनासारखं मिळण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जाणार नाहीत.
हे कबूल आहे कि तडजोड करावी लागते. पण त्यातल्या त्यात मनाजोगतंपण बघायला हरकत नसावी.

दिल्लीतल्या घरांमध्ये / फ्लॅट्स मध्ये किचन खूपच लहान असतं. आईकडे स्व्तःचे बांधलेलं घर असल्याने मोठं, १०-१२ माणसं जमिनीवर बसून जेवू शकतील + डायनिंग टेबल ठेवलेलं असं मोठं किचन + डायनिंग होते. इथे त्या घरापेक्षा मोठ्या आकाराच्या फ्लॅटमध्ये ३-४ माणसं उभी राहून कसाबसा स्वयंपाक करू शकतील इतकंच किचन आहे. बाकी खोल्या तिथल्यापेक्षा मोठ मोठ्या, पण किचन मात्र टिचभर. त्यात या किचनला खिडकी नाही. एक मोठा एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी आणि सिलिंग फॅन लावलेला आहे. पण उन्हाळ्या -पावसाळ्याच्या दिवसात इथे अगदी अर्धा तास सुद्धा गॅससमोर घालवणं म्हणजे शिक्षा वाटते.
माझ्या जावेच्या घरातलं स्वयंपाकघर मला खूप आवडतं. ओपन किचन आहे तिचं. भिंतीला लागून खिडकीशी एक ओटा आहे पण तो बाकी कामासाठी वापरला जातो. मुख्य स्वयंपाकासाठी मध्यभागी एक ओटा आहे. तिथे काम करताना डायनिंग आणि छोट्या हॉल मध्ये गप्पा मारत, टिव्ही बघत काम करता येतं. तिच्या घरी स्वयंपाक करायला आम्हा सर्वांनाच खूप आवडतं.
पूर्वी बहूतेक फोटो काढले होते मी. सापडले तर देते इथे.

उत्तम विषय आणि विचारप्रवर्तक चर्चा !

हेच बाथरूम्स बद्दलही होत आहे. अगदी जेमतेम उभे राहता येईल अशी कोंदट स्नानागरे महानगरात कॉमन होत आहेत.

… बिना स्वयंपाकघराची घरे" किंवा Community Kitchen हा ट्रेंड रुढ होऊ पहातोय.…

+ १

यावर मायबोलीवर एक लेख पाडण्याचा + चर्चा घडवण्याचा दोषी आहे मी Happy

'आऊटसोर्सची' कल्पना आवडली आणि अगदी आचरणातच आहे. अन्य महत्वाचे विषय आहेत, फक्त स्वयंपाकात वेळ जाऊ नये. आवड असेल तर ठीक.

मला किचन मोठं हवं होतं त्यामुळे मी 20 वर्षांपूर्वी फ्लॅट घेताना ते डोक्यात ठेऊन घेतला, रिसेल घेतला आहे पण हॉल आणि किचन बऱ्यापैकी मोठं आहे, बेडरूम लहान आहे दहा बाय दहा, त्याला लागून पुढे तिथे 10 बाय 4 गॅलरी आहे, ती वेगळीच ठेवलीय. किचनमध्ये ओट्यावर मोठी खिडकी आहे (मध्ये आधीपेक्षा अजून मोठी केली) आणि किचन आणि हॉलमध्ये एक छोटी खिडकी केली आहे आधीच्यांनी ती मी बंद केली नाही.

माहेरी पूर्वी कौलारू दीड खोल्यांच्या चाळीत होतो तेव्हाही स्वयंपाकघर अगदी लहान नव्हतं, नंतर बिल्डिंगमध्ये दोन खोल्या, तेव्हाही बऱ्यापैकी मोठं होतं, नालासोपारा इथेही आमचा दोनच खोल्यांचा फ्लॅट होता पण किचन मोठं होतं त्यामुळे एकंदरीत स्वयंपाकघर (किचन) जरा वावरायला मोठं हवं आणि हवेशीर हवं हा विचार होता. खरंतर जेवायला हॉल मधेच बसतो किचन मोठं असून, सवय.

पूर्वीपासून लहान घरात राहूनही किचन मोठे होते. नीट वावरता येत होते. त्यामुळे आताही घर घेताना लहान किचनचे मोठे करुन घेतले. त्यातल्या त्यात. एक छोटी गॅलरी होती ती आत घेतली भिंतीला लागून ओटा केला ज्याच्या वर खिडक्या आहेत. त्यामुळे, समांतर ओट्यामुळे जेमतेम एक माणूस आत जाईल असे असलेले किचन निदान हवेशीर झाले. शिवाय २,३ माणसे आत वावरु शकतात आता. मला ते बोळकांड्या सारखे हल्लीचे किचन अंगावर येते. मग कामच करावेसे वाटत नाही. ओटा निट हवा, खिडक्या हव्यात आणि वावरायलाही जागा हवीच हवी. तेच बाथरूमच्या बाबतीतही. अगदी एक माणूस जेमतेम उभा राहिल अशी बाथरुम बांधतात हल्ली ते पटत नाही. पण यावर उपाय नाही मिळालाय अजून Happy

माहेरी पूर्वी कौलारू दीड खोल्यांच्या चाळीत होतो तेव्हाही स्वयंपाकघर अगदी लहान नव्हतं, नंतर बिल्डिंगमध्ये दोन खोल्या, तेव्हाही बऱ्यापैकी मोठं होतं, नालासोपारा इथेही आमचा दोनच खोल्यांचा फ्लॅट होता पण किचन मोठं होतं >> येस. पूर्वी घरांची रचना अशीच होती लहानपणी. टायनी किचन्स तेव्हां टीव्हीत दिसायची.

निकु >>> छान केलं, किचनची जाङा वाढवली ते. काँग्रॅट्स !