वाचायचा कंटाळा असल्यास थेट व्हिडिओ बघू शकता.
व्हिडिओची लिंक -
https://jmp.sh/p3yq45mA
पण असे नुसते बघण्यात मजा नाही,
लेख वाचल्यावरच त्यातील भावना कळतील.
-------------------------------------------------------
क्रिकेट वेडे कुटुंब !
पणजोबांना पाहिले नाही. पण आजोबांना क्रिकेटचे भयंऽऽकर वेड. ज्यांच्यासोबत क्रिकेट बघायला मजा यावी असे माझे पहिले जोडीदार तेच. लहानपणी माझ्या वयाच्या मित्रांमध्ये क्रिकेटबद्दल मला चार गोष्टी जास्त कळायच्या यालाही जबाबदार तेच. या क्रिकेटप्रेमावरून ते आज्जीचा फार ओरडा खायचे. पण आज्जी सोडून आमचे सारे घरच क्रिकेटवेडे असल्याने त्यांच्या या आवडीवर कधी गदा आली नाही.
त्यांची नर्व्हस नाईनटी मध्ये विकेट पडली आणि मी वडिलांसोबत क्रिकेट बघणे सुरू केले जे त्यांचाच वारसा पुढे चालवत होते. आता याला आजोबांचा अनादर समजू नका, ते स्वर्गातल्या पॅव्हेलियन मधून हे वाचत असतील तर त्यांनाही त्यांच्या आयुष्याच्या इनिंगबद्दल हे असे क्रिकेटच्या भाषेत सांगणे आवडेल याची खात्री आहे. माझ्या आईला देखील क्रिकेटची इतपत आवड की मुंबईचे रणजी खेळाडू सुद्धा ती ओळखायची. माझ्या जन्माच्या आधीच्या खेळाडूंची नावेही चटचट सांगायची. आजही डेली सोप मालिकांमधून डोके वर काढून स्कोअर विचारत राहते.
क्रिकेटमध्ये दोन फलंदाजांमधील मोठ्या पार्टनरशिपमध्ये एक जण बाद झाला की दुसरा सुद्धा बाद व्हायची शक्यता बळावते. या नियमाला अनुसरून आजोबांपाठोपाठ काही वर्षातच आज्जी देखील आपले शतक थोडक्यात हुकवून गेली आणि आमचे छोटेखानी त्रिकोणी कुटुंब पुर्णपणे क्रिकेटवेडे झाले.
आज संकष्टी आहे, आज उपवास आहे, आज अमुकतमुक सणवार आहे, या धर्तीवर आज मॅच आहे असे आमच्याकडे म्हटले जायचे. त्यानुसार सारे प्लॅन्स बनायचे. अगदी आजही बनतात. पण यामुळे एक फायदा झाला तो असा की माझ्या क्रिकेट आवडीच्या आड कधी अभ्यास आला नाही. मला बोर्डाच्या परीक्षेच्या काळातही क्रिकेटची मॅच बघण्यापासून कोणी अटकाव केला नाही.
भारताचा संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर असताना भारतात रात्रीचे दोन वाजलेत, तर आता झोप म्हणून मला कोणी सांगितले नाही.
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये सामना असताना पहाटे चार-पाच वाजताचा अलार्म घरचे मला स्वतःच लाऊन द्यायचे.
ती गोष्ट वेगळी की जेव्हा मॅच असायची तेव्हा का कसे माहीत नाही, पण मला स्वतःहून जाग यायची. आणि घरच्यांना याचेही कौतुक वाटायचे.
अन्न वस्त्र निवारा यानंतर क्रिकेट ही आपली गरज आहे हे आमच्या घरी स्वीकारून झाले होते. त्यामुळे आमचे घर म्हणजे एक क्रिकेटचा अड्डा झाला होता. चाळीत प्रत्येकाच्या घरी टीव्ही आणि क्रिकेटचा चॅनेल असायचा पण सारे मॅच बघायला आमच्या घरी जमायचे. कित्येक अविस्मरणीय सामन्यांसोबत त्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.
पण नुसते क्रिकेट बघणे नाही तर खेळायला सुद्धा घरून तितकीच मोकळीक होती आणि तितकेच प्रोत्साहन दिले जायचे. वडील स्वत:ही शालेय जीवनात Harris Shield आणि Giles Shield या नावाजलेल्या स्पर्धात खेळले होते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये घरी ईडियट बॉक्स समोर बसून मी टाईमपास करताना दिसलो की मला स्वत:हून खेळायला पिटाळायचे.
आजही ते विनाकारण आपल्या काळातील क्रिकेटर्सच्या आठवणी उगाळून नॉस्टेल्जिक न होता नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये रमतात. रिटायर्ड लाईफचा पुरेपूर फायदा उचलत दिसेल तो सामना बघतात. आपल्याहून निम्म्या वयाच्या मुलांसोबत बघतात. म्हणून आजही त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे ते मित्र क्रिकेटच्या थीमचा केक आणतात.
आता हेच क्रिकेटचे वेड चौथ्या पिढीत झिरपू लागले आहे. मुलगा तर लहान आहे, पण लेक क्रिकेटमध्ये ईंटरेस्ट घेऊ लागली आहे. माझ्या पुर्ण आयुष्यात मी जितके सामने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन बघण्याचा अनुभव घेतला असेल तो आकडा तिने या वयातच मागे टाकला आहे. ज्या खेळाडूंना मी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही त्यांना ती आयपीएल निमित्ताने जवळून बघून आली आहे. ईतकेच नाही तर भारतीय महिला संघाचा सामना बघायला गेली असताना तिचे टीव्हीवर सुद्धा झळकून झाले आहे.
एकत्र क्रिकेट बघायचा जो आनंद मी माझ्या आजोबांसोबत, आईवडीलांसोबत आणि चाळीतील समवयीन मित्रांसोबत लुटला आहे तोच आता लेकीसोबत घेतो आहे.
मी सचिननंतर पहिल्यांदा कुठल्या खेळाडूचा फॅन झालो असेल तर ते सौरव गांगुलीचा. योगायोगाने बायको सुद्धा त्याचीच चाहती आणि त्याला लाडाने 'दादी' म्हणून हाक मारणारी निघाली. पण तिची क्रिकेटची आवड त्या पिढीच्या खेळाडूंसोबतच ओसरली. मी मात्र त्यानंतर त्या लेव्हलचा कोणाचा चाहता झालो असेल तर ते रोहीत शर्माचा. आणि योगायोगाने ईथेही माझ्या लेकीचा तोच सर्वात फेव्हरेट आहे. त्याचे घरभर नाव लिहिणे, चित्र काढणे, त्याच्या नावाची आणि नंबरची जर्सी विकत घेणे, त्याचा खेळ बघायला आपला खेळ सोडून येणे, त्याची बाजू घेत मित्रांसोबत फॅनवॉर करणे, तिच्या वयाला साजेसे सगळे करते. म्हणूनच तिच्यासोबत मॅच बघायची एक वेगळीच मजा येते.
चाळीतल्या आयुष्यात क्रिकेटने ज्या आठवणी दिल्या त्या मनाच्या कोपर्यात कैद आहेत.
जसे की, युवराज सहा चेंडूत सहा सिक्स मारत होता तेव्हा चाळीतील सर्व मुले गणपतीच्या आरतीला ब्रेक देऊन आमच्या घरी जमले होते आणि सहावा सिक्स मारताच, "गणपती बाप्पा मोरयाऽ" असे जोराने ओरडले. सोबत बडवायला आरतीचे ढोल आणि टाळ तयार होतेच.
धोनीने जेव्हा वर्ल्डकप विनिंग सिक्स मारला तेव्हा गडचिरोली जिल्ह्यातील एका खुल्या मैदानात मोठ्या पडद्यावर बघताना शेकडो लोकांच्या साथीने जल्लोष केला होता.
अगदी राहुल द्रविडने अॅलन डोनाल्डला मारलेला अनपेक्षित सिक्स सुद्धा आम्ही मित्रांनी एकमेकांना टाळी देऊन एन्जॉय केला होता. असे सगळ्याच अविस्मरणीय सामन्यांसोबत काही ना काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
पण आता मोबाईलचा जमाना आहे. या आठवणी केवळ मनातच न जपता कॅमेर्याने सुद्धा टिपता येतात. अश्याच कळत नकळत जमा झालेल्या दोन सुंदर आठवणी, त्यामागच्या भावना आणि त्या माझ्यासाठी का विशेष आहेत हे समजावे म्हणून आतापर्यंतचा लेख ही त्याची प्रस्तावना समजा. अन्यथा हा थोडक्यात संपणारा विषय नाहीये.
१) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - २०२४ ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप -
अटीतटीचा अंतिम सामना आणि अंतिम क्षण!
३० बॉल ३० शिल्लक राहिले आणि सगळे उठून आत गेले. ईच्छा तर माझीही फार होती. कारण २०२३ वर्ल्डकपमध्ये सर्व सामने जिंकल्यानंतर आलेला अंतिम सामन्यातील पराभव अजूनही मनात रुतून बसला होता. आणि आज पुन्हा तेच होत होते. पुन्हा तेच उघड्या डोळ्यांनी बघणे शक्य नव्हते. शेवटची आशा म्हणून बुमराहची एक ओवर बघावी म्हणून थांबलो ते थांबलोच. दोन विकेट पडल्या आणि सामना पुन्हा चुरशीचा झाला तेव्हा आत गेलेली मंडळी पुन्हा बाहेर आली.
शेवटच्या क्षणांचा थरार टिपायला लेकीने मोबाईल कॅमेरा चालू केला आणि स्वत:च विसरून गेली. कारण समोर घडणारे नाट्य दुसरे काही सुचू न देणारे होते. शेवटच्या ओव्हरला १६ धावा हव्यात आणि ते मारायची क्षमता राखून असलेला किलर मिलर स्ट्राईकला. ज्याची भिती वाटत होती तेच झाले. पहिलाच चेंडू मिलरने भिरकावून दिला आणि शिट शिट शिट.. याने सिक्स मारला.. म्हणत मी जवळपास कोसळलोच होतो. पण बॉल बाऊंडरी पार जाता जाता त्या क्षितिजावर कसा काय माहीत अचानक सुर्या उगवला आणि काही समजायच्या आतच, त्याने झेल पुर्ण करायच्या आतच, लेक किंचाळू लागली.. विकेऽऽऽ ट.. विकेऽऽऽऽ ट.. पण मला हे सारे अविश्वसनीयच वाटत असल्याने जोवर सुर्यानेच एक हात वर करून मी झेल घेतला आहे, मी वर्ल्डकप कवेत घेतला आहे हे डिक्लेअर केले नाही तोपर्यंत माझ्या तोंडातून एक शब्द फुटला नव्हता आणि जेव्हा फुटला तेव्हा.... आपण एक ईतिहास घडतानाचे साक्षीदार झालो आहोत याची नोंद त्या व्हिडिओत घेतली गेली होती. जेव्हा जेव्हा तो व्हिडिओ बघितला जाईल तेव्हा तेव्हा तितकाच आनंद पुन्हा पुन्हा होईल. आणि या खेळाने आजवर किती आनंद दिला आहे याचीही जाण राहील.
२) भारत विरुद्ध ईंग्लंड २०२५ - पहिला कसोटी सामना
ऋषभ पंत,
हा माझा सध्याचा प्रचंऽऽड आवडीचा खेळाडू!
म्हणजे अगदी जसा चित्रपटात शाहरुख तसा क्रिकेटमध्ये पंत.
भारतीय क्रिकेट संघाचा एक्स फॅक्टर. ज्याला मी प्रेमाने "चुम्मा" नाव ठेवले आहे. कारण त्याचा खेळ, त्याचा अॅटीट्यूड, त्याचा मैदानावरील वावर सारे चुम्मा आहे. मन खुश होते त्याला खेळताना बघून. तो फलंदाजीला असताना मी टीव्ही समोरून हलत नाही, एक बॉल चुकवत नाही. आणि हे आजचे नाही तर जेव्हा तो सुरुवातीच्या अपयशानंतर संघातून बाहेर गेला होता तेव्हाही मी कित्येकांचा विरोध पत्करून त्याच्यावर विश्वास दाखवला होता.
आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या तो माझ्या लेकीचा सुद्धा वन ऑफ द फेवरेट खेळाडू झाला आहे, ज्याला ती त्याच्या "स्पायडी" या टोपणनावाने हाक मारते.
त्या दिवशी तो पहिल्या इनिंगला शतकाजवळ आला तेव्हा त्याचा नव्वदीत बाद व्हायचा नकोसा पराक्रम लेकीलाही माहित होता. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो त्याची तेव्हा कसोटीत सहा शतके होती आणि तो सात वेळा नव्वदीत बाद झाला होता.
त्यामुळे आम्ही दोघे टीव्ही समोर त्याच्या शतकाची प्रार्थना करत बसलो होतो. जसे तो क्षण जवळ आला तसे लेकीने व्हिडिओ काढायला सुरुवात केली. 99 ला पोहोचला तेव्हा मी मनोमन म्हटले आता एका धावेसाठी हा काही ग्लोरी शॉट मारायला जाणार नाही. सिंगल काढूनच शतक साजरे करेल. फार काही स्पेशल व्हिडिओ निघणार नाही. पण ऋषभ पंत तर ऋषभ पंत आहे. त्याने ९९ वर असताना.. जिथे सिंगल काढणे सुद्धा पुरेसे ठरले असते.. जिथे हा "स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" काहीही करू शकतो म्हणून प्रतिस्पर्धी कर्णधाराने सुद्धा बाऊंंडरीला फिल्डींग लावली होती.. तिथे याने आपल्या सातत्याने नव्वदीत बाद व्हायच्या दबावाला झुगारून, पुढे सरसावत, एका हाताने सिक्स मारला आणि शतक साजरे केले.
गंमत इथेच संपत नाही!
त्याने आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात शतक झाल्यावर छानपैकी कोलांटी उडी मारली होती. आणि आताही तो पुन्हा तेच करणार याची लेकीला पुर्ण खात्री होती. तिने आधीच `फ्रंट फ्लिप, फ्रंट फ्लिप' असा ओरडा सुरू केला. आणि त्यानेही तिला निराश केले नाही. लेकीचा तो आवाज आणि त्याने तिची फर्माईश पूर्ण केल्यावर तिला झालेला आनंद दोन्ही व्हिडिओत रेकॉर्ड झाले आणि माझ्यासाठी तो व्हिडिओ अजून स्पेशल झाला.
म्हटले तर या दोन्ही व्हिडिओत आमचे साधे नख दिसत नाही, पण या खेळावर केलेले भरभरून प्रेम आणि त्या खेळानेही परतफेड म्हणून दिलेला अमर्याद आनंद निव्वळ आवाजातूनही पोहोचतो
"टूटा है गाबा का घमंड.." ती आयकॉनिक कसोटी जिला नुकतेच या शतकातील टॉप थ्री ग्रेटेस्ट कसोटी सामन्यात स्थान मिळाले. त्यावेळी देखील जेव्हा ऋषभ पंतने विनिंग शॉट मारला तेव्हा मला भरून आले होते. त्या विजयाची किंमत एखाद्या वर्ल्डकपपेक्षा कमी नव्हती. मला आनंदाने, हर्षोत्साहाने ओरडावेसे वाटत होते. ओरडलोही असेल. पण सोबत कोणी टाळी द्यायला नव्हते, आपण जिंकलो म्हणत कोणी मिठी मारायला नव्हते. आईवडील मुंबईला होते, बायको आतल्या रूममध्ये होती, मुले लहान होती. त्या क्षणी मला प्रकर्षाने जाणवले होते की क्रिकेटच्या ईतिहासातील हा एवढा अविस्मरणीय क्षण साजरा करायला आपल्यासोबत कोणी क्रिकेटवेडे नाही. क्रिकेटचा आनंद हा कधीच असा एकट्याने बघण्यात नव्हता. आपण काहीतरी मागे सोडून आलो आहोत हि चुटपूट तेव्हापासून होतीच...
पण आता पुन्हा तो आनंद गवसू लागला आहे, आणि ईथून तो वाढतच जाणार आहे. त्याच खेळाप्रती आणि खेळाडूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हा लेखनप्रपंच
वर बघितला नसल्यास आता व्हिडिओ बघू शकता,
व्हिडिओची लिंक -
https://jmp.sh/p3yq45mA
धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष
लई भारी !
लई भारी !
अनुभवाशी माझी बरीच जवळीक असल्यासारखं वाटलं. माझे वडीलही उत्कृष्ट पोहणारे व क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन इ, खेळात प्रवीण होते. त्यांना क्रिकेटची चांगलीच जाण होती. माझा नातू क्रिकेट छानच खेळायचा पण तो टेबल टेनिस सिरीयसली खेळायला लागला व आता तर फुटबॉलच्या आत्यंतिक प्रेमात पडलाय ! त्यामुळे मलाच आता फुटबॉलमध्येही रस घ्यावा लागतोय !!
धन्यवाद भाऊ!
धन्यवाद भाऊ!
माझे वडीलही उत्कृष्ट पोहणारे व क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन इ, खेळात प्रवीण होते. >>>> उरले काय? फुटबॉल.. ते सुद्धा नातवाने कसर भरून काढली
क्रिकेटबाबत म्हणाल तर भारतात अशी क्रिकेट वेडी कुटुंबे बरीच असतील. म्हणजे खेळायची नाही तरी किमान बघायची आवड असलेली. फक्त एकत्र मिळून बघणे आणि एन्जॉय करणे नशिबात असायला हवे.
*फक्त एकत्र मिळून बघणे आणि
*फक्त एकत्र मिळून बघणे आणि एन्जॉय करणे नशिबात असायला हवे.*! +१. !!!
काय योगायोग!
काय योगायोग!
आज बरोबर एक वर्ष झाले सूर्याच्या या कॅचला आणि भारताच्या वर्ल्डकप विजयाला.
धागा प्रकाशित करताना हे डोक्यात सुद्धा नव्हते
आवडला लेख.
आवडला लेख.
धन्यवाद शर्मिला
धन्यवाद शर्मिला
छान आठवणी आणि विडिया देखील..!
छान आठवणी आणि विडिया देखील..!
शाळा, कॉलेजात असताना क्रिकेट मॅच टिव्हीवर पाहायला आवडायच्या.. त्यातले काही जास्त कळत नव्हते तरी पण.. !
__ आणि क्रिकेट आवडण्यामागे एक गुपित होतं.. काय तर ते तेव्हाचे क्रिकेटपटू क्रश होते.. शाळा - कॉलेजात प्रत्येक मुलीला अजय जडेजा नाहीतर राहुल द्रविड आवडायचा. ज्युनिअर कॉलेजात असताना आधी अजय जडेजा आवडायचा पण मैत्रिणीचा तो क्रश झाला तर मी माझा चॉईस बदलला आणि राहुल द्रविडवर जीव ओवाळायला सुरुवात केली. माझी आवड लक्षात घेऊन मित्र - मैत्रिणींनी राहुल द्रविडचे मोठे पोस्टर भिंतीवर लावायला दिले. ते घरातल्या भिंतीवर लावले. भिंतीसमोर खिडकी होती. खिडकीतून मागे वळलं की मागेच हसतमुख द्रविड भिंतीवर विराजमान असलेला दिसायचा. कधी-कधी खिडकीतून पाठी वळल्यावर पोस्टर वरचा द्रविड अचानक दचकवायला लागला. पोस्टर बघून मागे कोण तरी हसत उभं आहे असा भास व्हायचा. मग मात्र तिथून त्याची उचलबांगडी केली.
आता क्रिकेटवर तितकसं प्रेम उरलं नाही. नवऱ्याला तासन् तास टिव्ही समोर एकाग्र होऊन क्रिकेट मॅच पाहताना पाहिलं की, पहिला राग त्या टिव्हीवर येतो.. मग नवऱ्यावर. ..!
मुलाला फुटबॉल खेळायला आवडते. दोन वर्षापूर्वी एका नामांकित कंपनीने राष्ट्रीय पातळीवर पंधरा वर्षाखालील फुटबॉलच्या चार टिम बनवल्या होत्या. पुणे, नागपूर, प. बंगाल आणि एक आमच्या जिल्ह्याची .. मुलाची निवड झालेली त्यात.
कर्नाटकातल्या बेल्लारीमध्ये सामने रंगले होते. .. तिथेच त्यांना फुटबॉलचं ट्रेनिंग दिलं होतं. छान अनुभव होता मुलाचा..!
खरंतर क्रिकेटपुढे इतर खेळांना महत्त्व दिले जात नाही. ते द्यायला हवे. क्रिकेटच्या ग्लॅमरपुढे बाकीचे खेळ फिके पडतात हे सत्य आहे.
शाळा - कॉलेजात प्रत्येक
शाळा - कॉलेजात प्रत्येक मुलीला अजय जडेजा नाहीतर राहुल द्रविड आवडायचा.
>>>>
आपण सेम जनरेशनचे आहोत

माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा माझी बायको आणि तिच्या मैत्रीणी म्हणा, आधी अजय जडेजा आणि नंतर राहुल द्रविड..
मी मुलगी असतो तर मी सुद्धा नक्कीच राहुल द्रविड
इतर खेळांना सुद्धा महत्त्व दिले जायला हवे हे खरे आहे. अर्थात आवड कोणाला जबरदस्ती लाऊ शकत नाही. पण ज्याला आहे त्याला आपली आवड जपण्याची मुभा, पुरेशी संधी आणि सोयी सुविधा हव्यात..