मनमौजी इमोजी!

Submitted by निमिष_सोनार on 27 June, 2025 - 08:10

फक्त खूप इमोशनल असणारी माणसंच चॅटिंग करतांना जास्त स्मायली वापरतात का? स्मायलीपेक्षा इमोजी हा शब्द बरोबर आहे कारण रडणाऱ्या चेहऱ्याला स्मायली कसे म्हणणार बरं? नाहीतर वेगवेगळ्या कॅटेगरी निर्माण कराव्या लागतील जसे स्मायली, क्रायली, अँग्रीली, सॅडली! माझ्या निरीक्षणानुसार काहीजण इमोशनल असूनही चॅटिंगदरम्यान इमोजी वापरताना कंजुषपणा करतात म्हणजे इमोजीचा वापर जवळपास करतच नाहीत किंवा फार थोडा करतात.

असे लोक कोणते असतात?

गप्पा मारताना आपल्याला ज्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे बिलकुल कळत नाही, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच इमोशन दिसत नाही (किंवा ते मुद्दाम दिसू देत नाहीत), हे तेच लोक असावेत जे चॅटिंग करतांना ईमोजीचा वापर करत नाहीत! म्हणजे, थोडक्यात जे मनमोकळे नाहीत, असे लोक! मुखवटाधारी!

ते फक्त वाक्य लिहितात. बरेचदा त्यांच्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह सुद्धा नसतं. भले त्यांच्या मनात आणि शरीरात विविध इमोशन्स पिंगा घालतही असाव्यात, पण त्या व्यक्ती इतरांना जसे चेहऱ्यावरून ते जाणवू देत नाहीत तसेच, चॅटिंगमध्ये सुद्धा ते त्या भावना इमोजी वापरून व्यक्त करत नाहीत!

अर्थात, ऑफिसमधील सहकाऱ्यांसमवेत किंवा बॉस समवेत चॅट करतांना तसेच कुणाही विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत चॅट करतांना मात्र आपण इमोजीचा वापर विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक केला पाहिजे हे खरे आहे. कारण शेकडो इमोजी आहेत आणि त्या प्रत्येकाचा नीट अर्थ बरेचदा आपल्याला माहिती नसतो. स्थळ, काळ, व्यक्ती, देश, वय आणि संदर्भ यानुसार त्याच इमोजीचा अर्थ बदलतो किंवा वेगळा घेतला जाऊ शकतो. जसे की दोन व्यक्ती एकमेकांना टाळ्या देणारा इमोजी आपण नमस्कार या अर्थाने वापरतो.

पण, नातेसंबंध, मैत्री, ऑफिस असो, की मग विरुद्धलिंगी व्यक्ती असो, चॅटिंग करणाऱ्याशी तुमचे किती बाँडिंग आहे किंवा एकमेकांशी फ्रीक्वेन्सी किती जुळते त्यानुसार इमोजीचा वापर ठरतो. असे असेल तर इमोजींचे मनमौजीपणाने आदान प्रदान होते आणि या इमोजींच्या ट्रॅफिकमध्ये एखादा इमोजीचा वापर चुकलाही तरीही समोरच्याला फारसे त्याबद्दल काही वाटत नाही.

हे मात्र नक्की आहे की, दोन तीन शब्द किंवा वाक्य लिहिण्यापेक्षा काहीवेळा एक दोन इमोजी वापरल्याने संदेश जास्त परिणामकारकरित्या पोचतो! म्हणूनच तर त्याला इमोजी म्हणतात. काय म्हणता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमोजी भरपूर वापरतो. 👍

In fact, माबोवर पुरेश्या इमोजींची सोय नाही अशी माझी तक्रार आहे. 👎

❤ हा इमोजी माबोवर लोकप्रिय करण्यात माझा हात आहे हे नम्रपणे नमूद करतो.

बदाम आणि किस (खोबऱ्याचा नव्हे) यांचे कित्येक ईमोजी आहेत मार्केटमध्ये. फ्लर्टिंग करताना खूप फायद्यात येतात. पण मला नाही आवडत. म्हणजे फ्लर्टिंग आवडते पण इमोजीचा फार वापर आवडत नाही. शब्दांमधून त्याच भावना पोहोचवण्याची आणि समोरच्या व्यक्तीने बरोबर ओळखण्याची मजाच वेगळी