थरार बिबट्याचा

Submitted by मनीमोहोर on 27 June, 2025 - 07:50
वाघ

थरार बिबट्याचा

आंब्याचा सिझन संपला, पाऊस ही वेळेवर आला ह्या वर्षी. कौलं शाकारणे, खळ्यातला मांडव उतरवणे वगैरे दरवर्षीची पावसा आधीची कामे सुरळीत पणे पार पडली. भाताच्या पेरण्या ही झाल्या शेतात. मार्च पासून सुरू झालेला आंब्याच्या सिझन आणि पुढे पावसाची कामं ह्यातून घरच्या मंडळीना थोडी उसंत मिळाली . थोडी स्वस्थता आली सर्वांच्या जिवाला.

त्यामुळेच काल रात्री कोकणात आमच्याकडे रात्री नऊ सव्वा नऊ च्या सुमारास स्वयंपाक घरात मजेत गप्पा मारत जेवणं चालू होती. एक सुनबाई तेवढी झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत होती. बाकी जास्त जाग नव्हती ओटीवर. नऊच वाजलेले असल्याने खळ्यात, घरात सगळीकडे लख्ख ट्यूब लाईट मात्र लावलेल्या होत्या. जेवून खाऊन आमचा मोत्या ही दारात विसावला होता.

तेवढ्यात अचानक खळ्यात त्या ट्यूब लाईटच्या उजेडात ही दोन हिरवे डोळे चमकलेले झोपाळ्यावर गाणी ऐकत बसलेल्या आमच्या सूनबाईना दिसले आणि क्षणार्धात झेप घेऊन त्या तेजस्वी डोळ्यांचा मालक असलेला बिबट्या मोतीच्या आणि सुनबाईच्या पुढ्यात उभा ठाकला. तिची तर भीतीने दातखिळीच बसली पण प्रसंगावधान राखून ती मोठ्याने “ वाघ वाघ” असं किंचाळली. बिबट्या मोत्यापासून दोन फुटांवर आणि सुनबाईंपासून चार फुटावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात उभा होता.

प्रत्येक कुत्र्याचा एक स्वभाव असतो. आमचा मोती अजिबातच आक्रमक कुत्रा नाहीये. तो शांत, लाघवी, आणि फारच प्रेमळ आहे. पण केवळ मालकाशी इमान राखायचं ह्या एकाच हेतूने समोर साक्षात मृत्यू उभा ठाकलेला असताना ही मागचा पुढचा विचार न करता तो त्या बिबट्यावर धावून गेला. साखळीने मोत्याला बांधलेलं नव्हतं म्हणूनच हे शक्य झालं. नाहीतर डोळ्यासमोर मोत्या त्याची शिकार होताना पाहणं नशिबात आलं असतं. सुनबाईच्या किंचाळण्याने घरातली सगळी जण ही ओटीवर येऊन ओरडू लागली. त्यामुळे तो बिचकला. सावज सोडून निघून गेला.

मोत्या पिल्लू असतानाच
IMG-20201012-WA0010_0.jpg

हा अलीकडचा

IMG-20221026-WA0033~2.jpg

जाता जाता त्याचा पंजा मोत्याच्या शेपटीवर पडला आणि थोडी जखम होऊन त्यातून रक्त यायला लागलं. पण हळद वगैरे चेपल्यावर ते ही थांबल. आज पशू वैद्याकडून तपासून घेतलं मोत्याला, सगळं ठीक आहे. घरातल्या माणसांवर आणि मोत्यावर ही आलेलं जीवघेण संकट त्याच्या शेपटीवर निभावलं. ह्या प्रसंगाचा हिरो असणाऱ्या मोत्याला मात्र ह्याची फारशी कल्पना नसावी. घरातल्या कुत्र्यावर घरातल्या माणसांचं अतोनात प्रेम असतं. मोत्याच्या कामगिरीमुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. पण त्याच वेळी ह्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे ह्याची ही जाणीव झाली

हा प्रसंग अक्षरशः दोन ते तीन मिनटात आटोपला पण अख्खी रात्र कोणाचा ही डोळ्याला डोळा लागला नाही, सगळे गर्भ गळीत झालेत. घरात आणि घराबाहेर ही एक अदृश्य दहशत आहे. आम्हाला जेव्हा इकडे हे समजलं तेव्हापासून आम्ही ही इकडे हादरलो आहोत. मे महिन्यात आम्ही घरी गेलो होतो तेव्हा मुलाचा तीन वर्षाचा मुलगा वाट्टेल तसा रात्री ही खळ्यात हुंदडत होता. मी ही पहाटे अंधारात एकटी शांतपणे खळ्यात बसत होते, रात्री सर्वांच्या खळ्यात बसून गप्पा होत होत्या हे आठवून ते किती रिस्की होतं आणि देवाच्या कृपेनेच वाचलो असंच मनात येत आहे. आता पुढे काय हाच विचार सतत मनात आहे.

मला इतके दिवस वाटत होतं रात्री उशिरा बाहेर पडत असतील बिबटे त्यांचं भक्ष्य शोधायला. पण काल तो रात्री साडे नऊ च्या सुमारास सगळी कडे लाईट चालू असतानाच आला होता. मुलांना कामावरून येताना कायम धास्ती वाटणार आता. आमचा गुरांचा गोठा बंदिस्त आणि सेफ आहे पण त्या वासाने किंवा कुत्रा घरात असला तरी कुत्र्याच्या वासाने तो येतच राहणार आहे. कोकणातलं आमचं घर दोन दारं लावली की विषय संपला असं नाहीये. दारं कायम बंद करण्याची घराला सवय ही नाहिये त्यामुळे ते ही खूप कठीण आहे. आम्हाला आमचं घर स्वच्छ, कुठे अडगळ नाही असं वाटत असलं तरी विचार केला तर घराजवळ अनेक ओपन जागा आहेत त्याला येण्यासाठी आणि त्याला लपण्यासाठी ही खूप ठिकाणं आहेत. काल तो घाटी उतरून न येता दहा फूट खाली उडी मारून डायरेक्ट खळ्यात आला तसा शेजाऱ्यांच्या गडग्यावरून ही येऊ शकतो. त्यामुळे एवढा बंदोबस्त अशक्य आहे.

गावच्या पंचायतीत बिबट्या अंगणात आल्याची तक्रार करून ठेवली आहे. वनखात्याची माणसं तो पकडतील आणि जंगलात सोडून देतील पुन्हा. कारण बिबट्या ठार मारायला कायदेशीर परवानगी नाही. तो मोठा गुन्हा आहे. निसर्ग साखळीत बिबट्या महत्वाची भूमिका बजावतो हे कबूल पण फक्त बिबट्यांची संख्या वाढून उपयोगी नाही, त्यांचे भक्ष्य असलेले इतर प्राणी ही जंगलात असले पाहिजेत तरच समतोल राहिल. नाहीतर मनुष्य हेच त्यांचं अन्न बनेल.

परदु:ख शीतल असतं. इतके दिवस बातम्या वाचून त्याची दाहकता समजत नव्हती. पण आज मनातून त्याला बंदुक मारून ठार करावं असं वाटत आहे तथापि त्या ही बाबतीत हात बांधले गेले असल्याने फार हताश वाटत आहे.

हेमा वेलणकर

( प्र चि नेटवरून )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे
काय हा थरारक अनुभव.
हल्ली बिबट्याच्या एवढ्या बातम्या येत आहेत त्यामुळे
असे वाटते की त्यांचा ही कुत्र्यासारखा सुळसुळाट झाला आहे की काय.
काळजी घ्या.

आजच्या पुणे सकाळ मध्ये तीन बातम्या वाचल्या बिबट्या बद्दल, एक पकडल्याची आणि दोन दिसल्याची. जीव मुठीत धरून राहायची वेळ आहे खेड्यांमध्ये.
काही महिन्यापूर्वी निगडी मध्ये भर वस्तीतल्या एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये मधे सकाळी ९ वाजता बिबट्या आला होता. नंतर किती तरी दिवस मी तिकडे गेले तर ती बातमी आठवायची.

थरारक अनुभव ममो.
जाई आणि फार्स डेंजर अनुभव आहेत
कुत्रा शेळी हे बिबट्याचे सहज सावज आहेत.
मावशीचे गाव पन्हाळा डोंगर रांगा आणि मसाई पठार डोंगर रांगेला लागून. तिथे बिबट्याना लपायला फार नैसर्गिक जागा आहे. मागच्या चार महिन्यात त्यांच्या गावात देखील बिबटे फेऱ्या मारतात.मावशीच्या घराच्या मागे गोठा आहे तिथले रेडकू शिकार केली त्याने रात्री. हे मावस-चुलत भाउ माझे.
त्यांनी आता बंदिस्त गोठा बांधून घेतलाय.
आवाज करणे, लोकांनी दंगा करणे हे देखील उपाय करतात लोकं.
त्यांच्या गावात मोर आणि रान डुक्कर ह्यांचा त्रासही फार वाढलाय हल्ली.
भुईमूग सगळा खाउन टाकतात रान डुक्कर.
गावकरी हैराण आहेत.

ऋ, शुगोल, निरु, मंजू, धनुडी, अश्विनी, मानव, देवकी, एन एस, धनवंती , अमितव, झकासराव... धन्यवाद.

थरार एकवेळा.. आणि काळजी कायमची.. >> हो ना... ही दहशत कधी जाईल असं वाटत नाहीये आत्ता तरी.
देवकी , मानव कटांदर नवीन समजलं.
गावकरी हैराण आहेत. >> हो ना... बिबटे, गवे, मोर, माकड ह्यांना आपण जंगलात राहू देत नाही, आणि ते आपल्याला आपल्या गावात राहू देत नाहीत , पिकं घेऊ देत नाहीत अश्या कात्रीत सापडलो आहोत आपण. शहरात भटक्या कुत्र्यांची , बिबट्यांची दहशत आहेच. ह्यातून मार्ग काढायचा कसा ? असो.

ह्या थरारक प्रसंगाचा हिरो असणाऱ्या मोत्याचा फोटो लेखात ऍड करते आहे. फोटो तो पिल्लू असतानाच आहे. आता चांगला तरणा बांड गडी झालाय. आमच्याकडे कुत्र्याच नाव नेहमी जॉनी असतं , हाच अपवाद आहे , हा मोती कारण ह्याचा पांढरा शुभ्र रंग...

नमस्कार.
https://www.theelephantsociety.org/lion-lights
आफ्रिकेतल्या एका मुलाने काहीतरी बनवलं आहे. विकत कसे कुठे घ्यायचे ते सापडेना. परत शोधुन लिन्क टाकते.

कटांदर शब्द कधी ऐकला नव्हता. उदमांजर मुलांना नेण्याइतकं मोठं असतं का ?

ममो, मोत्याचा फोटो खूप आवडला. लॅब आहे, ओडीनसारखा वाटला.

बाब्बो इतक्या जवळ, वाचूनच थरकाप उडाला. बिबट्या आपल्या भागात येतात, मध्यरात्रीनंतर येतात, अगदी अंगणात येऊन जातात ऐकून आहे पण हे अति थरारक.

मोत्याची कमाल. आता कसा आहे तो. छोटा असतानाचा फारच गोंडस.

जाई आणि फार्स बापरे अंगावर काटा आला.

बाप रे ममो, अगदी डोळ्यासमोरच प्रसन्ग उभा राहिला..
आय होप या भितीतुन लवकर बाहेर पडता येइल.. वन्यविभाग लवकर काही पावल उचलेल..काळजी घ्या.
जाई आणि फार्स यान्चेही डेंजर अनुभव आहेत..

बापरे, फारच बिकट प्रसंग. आणि इतर किस्से वाचून जाणवलं की कोकणात असं वाढत चाललंय. खूप सावध रहायला हवं.

कटांदर म्हणजे कांडेचोर असावे
उदमांजर बहुतांश पाणी आणि खाजणात नदी खाडी किनारी फक्त वावरते.

दोन्ही प्राण्यांची ताकत लहान मूल उचलण्याची नसल्याने फक्त सावधगिरी उपाय किंवा गप्प झोपवण्याची ताकीद म्हणून प्रघात असावा.

-----------------
वरील प्रतिसादात काही उपाय सुचवले आहेत त्यात थोडी भर ―

१) खऱ्या बंदुकीसारखे आवाज आणि आगीचा लोळ काढणारे पिस्तुल सहजगत्या हल्ली ऑनलाईन मिळेल त्याचा वापर करणे अगदी भर पावसातही सहज सोपे असे आहे.

२) हल्ली बऱ्याच ग्राम देवळात आरतीच्या वेळी वाद्य म्हणून जे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरतात त्याचा उपयोग केल्यास अचानक टाळ घंटा ढोलकी असा अचानक झालेला जोरदार आवाज त्या श्वापदाच्या संकटाला लक्ष भरकवटण्यास आणि घाबरून पळवून लावण्यास जंगलातल्या शिकारीच्या वेळी हाकाटी सारखा उपयोगी पडू शकतो.

https://youtu.be/22msHw2QBgA?si=cNkoFV-AAXchA77F

याचा केस स्टडी म्हणून अभ्यास व्हायला हवा नी जिथे जिथे हिंस्र वन्य पशू आणि मानव अधिवास शेअर करतात, तिथे यातले फाईंडीग्ज अंमलात आणून त्याची परिणामकारकता तपासायला हवी.

लिहायचं टाळत होते, पण मैत्रिणीचा अनुभव आहे, लिहिते. मार्चमधला.
चिपळूणजवळ एका खेड्यात तिने घर बांधलंय. तिचे मिस्टर तिथे राहून घर-शेत-गोठा बघतात, ही इथे पुण्यात असते, दर १५ दिवसांनी तिथे जाते. तर शिमग्याच्या वेळी ती सुट्टी घेऊन गेली होती, बरोबर भाओजींचे मित्र होते.
एकदा रात्री कुत्री विचित्र आवाजात का भुंकतायत म्हणून भाओजी पटकन टॉर्च घेऊन बघायला गेले. गोठा बंदिस्त आहे, पण तरी ते चटकन गेलेच बघायला. हातात दुसरं काही नाही. पण दोनच मिनिटांत त्यांचाही आरडाओरडा ऐकू आला. मैत्रीण दुसर्‍या दारातून बघायलाच गेली होती ती धावत भाओजींच्या दिशेने गेली. त्यांनी पटकन तिला भाला आण म्हटलं. (नुसत्या आवाजाच्या शेतकरी बंदुकीचं काम झालं नाहिये अजून, म्हणून २ साधे भाले करून घेतले आहेत). ती भाला घेऊन गेली आणि तिला बिबट्या दिसला. ती पुन्हा धावत येऊन दुसरा भाला घेऊन येईस्तोवर बिबट्याने भाओजींवर हल्ला करून ते दोघंही झटापट करत होते. शेवटी मैत्रिणीने भाल्याच्या धाकाने बिबट्याला आडवं पाडलं! मधेच कुत्री आल्यामुळे तो बिबट्या बिथरणे वगैरे झालंच, पण मग तो अंदाज चुकून पडला. थोडं लागलं त्याच्या पायाला. तोवर मित्राने आरडाओरडा करून माणसं गोळा केली. (शिमग्याची म्हणून तरणी नोकरदार मुलं वाडीत आली होती, एरवी कठीण झालं असतं! आणि हा मित्र स्वतः हार्ट पेशंट आणि नाजुक तब्येतीचा आहे, त्यामुळे त्यांना घरातच थांबायला सांगितलं होतं.) बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद केलं. भाओजींना बरंच लागलं. २-३ आठवडे हॉस्पिटलाईज होते. आता हळूहळू बरे होतायत.
ते एकटेच त्या घरात रहातायत. घराचं काम चालू आहे. सध्या तरी रोजचं रूटीन काम करायचं, शेतीची कामं बंद ठेवली आहेत. हात दुखला की सरळ झोप घेतात कारण जीव वाचवायचा म्हणून होती-नव्हती तेवढी सगळी शक्ती त्या झटापटीत कामी आली. अक्षरशः गळून जातात कधीकधी. सुदैवाने एक मदतनीस मुलगा, अगदी मनापासून त्यांचं पडेल ते काम करतो, गोठा सांभाळतो.

बापरे, प्रज्ञा! जिवावरचा प्रसंग.
आमच्या गावी वानरांचा भरपूर त्रास आहे. याबद्दल कधी विषय निघाला की शेवटी बाबा म्हणायचे, 'तरी बरं, वानरंच आहेत. हाकलून तात्पुरती का होईना, पळून जातात. सिंधुदुर्गात हत्ती यायला लागलेत. त्यापेक्षा हे बरं.' आता बिबट्याचे एकेक प्रसंग वाचून वाटायला लागलंय, वानरांचा त्रास यापुढे काहीच नाही. नुकसान कितीही झालं तरी जिवाची भीती वाटावी, असं तरी काही नाही!

फिनिक्स, अस्मिता, निकु, अंजू, प्राजक्ता, मामी, ललिता, अNi, सामो, प्रज्ञा, वावे, मानव , फाविदडी, धन्यवाद.

मोत्या फारच गोड होता लहान पणी. खळ्यात लपाछपी इतका मस्त खेळायचा मुलांबरोबर .. बरोबर शोधून काढायचा लपलेल्या मुलाला.

फिनिक्स फॉरवर्ड केलं तुमचा व्हिडिओ घरी. अni धन्यवाद सजेशन साठी.

फार्स बघितला व्हिडिओ. . असा काहीतरी समन्वय साधला गेला पाहिजे.

प्रद्न्या, काय भयानक अनुभव आहे. ते खूपच धीराचे म्हणून बिबट्याशी फाईट देऊ शकले. नशीबच बलवत्तर म्हणायचं. फार्स तो व्हिडिओ वेगळा वाटतोय, पण लोकमत मधली बातमी सेम वाटतेय मला तरी.
आमच्या घरातली माणसं कशी व्यवहार करतील त्यांचे नित्याचे ? गुरांच्या कुत्र्याच्या वासावर ते बंदिस्त असले तरी येऊ शकतो तो घराजवळ ! की ह्या बरोबरच जगायचं आता ? संध्याकाळी सहा वाजले की हातातली कामं सोडून घरात बंद होऊन बसायचं या पुढे ? विचार करून मति गुंग झालीय.

वावे आमच्याकडे इतके दिवस वांदरं नव्हती पण यंदा होती थोडी थोडी...त्यांच्यामुळे जीवाला धोका नसला तरी वाटेल तसे आंबे पाडवून नासधूस केली तर नुकसान किती , आमचा चरितार्थ कसा चालायचा ?
बोकलत धन्यवाद... अहो कुत्रा सुटा होता म्हणून त्याने प्रतिकार केला, बांधलेला असता तर अशक्य होतं त्याला बिबट्याच्या अंगावर धावून जाणं.

हो, हेच ते. (आता मूळ घटना आणि बातमीत काय आहे वगैरे... या सगळ्या गोष्टी तपासत नाही बसले मी. इन फॅक्ट, मला हे खूप उशिरा समजलं, अगदी २-३ आठवड्यामागे समजलं. थेट सुप्रियाशी फोनवर बोलले तेव्हा जबर धक्का बसला मला. अर्थात तोवर व्हिडिओ, बातम्या वगैरे झालं होतं. मी सध्या बरीच दूर आहे या सगळ्यापासून.)

आता मूळ घटना आणि बातमीत काय आहे वगैरे... या सगळ्या गोष्टी तपासत नाही बसले मी.>>>
Details doesn't matter in this case....डिटेल्स काही ही असले तरी हा हल्ला जवळपास पूर्णवाढ झालेल्या (Sub-Adult)२ वर्षीय बिबट्याचा होता. Really brave Encounter & a fascinating story.

प्रज्ञाचा प्रतिसाद वाचण्यापूर्वी 5_६ दिवसांपूर्वी to व्हिडिओ पाहिला होता.धन्य त्या गृहस्थाची!

डेंजर अनुभव आहे! लौकर बंदोबस्त होवो! गावातील घरांना ओपनिंग खूप असतात हे माहीत आहे त्यामुळे कुंपण वगैरे किती शक्य आहे माहीत नाही. पण मोशन सेन्सर फ्लडलाइट्स, मोशन कॅमेरे वगैरे यामुळे निदान मोठे प्राणी आलेले कळतील. अर्थात एरव्ही तेथे घरच्या प्राण्यांची हालचाल नसेल तरच. हे शहरी लोकांनी सुचवलेले अफाट उपाय वाटतील पण त्यापेक्षा तेथील मर्यादांची फारशी माहिती नाही.

कोकणात बिबटे नुकतेच दिसू लागले आहेत का? अशी घरे, गर्द झाडी वगैरे तेथे पहिल्यापासूनच आहे. इतक्यात हे धोके वाढण्याचे काही नवीन कारण आहे का?

Pages