
थरार बिबट्याचा
आंब्याचा सिझन संपला, पाऊस ही वेळेवर आला ह्या वर्षी. कौलं शाकारणे, खळ्यातला मांडव उतरवणे वगैरे दरवर्षीची पावसा आधीची कामे सुरळीत पणे पार पडली. भाताच्या पेरण्या ही झाल्या शेतात. मार्च पासून सुरू झालेला आंब्याच्या सिझन आणि पुढे पावसाची कामं ह्यातून घरच्या मंडळीना थोडी उसंत मिळाली . थोडी स्वस्थता आली सर्वांच्या जिवाला.
त्यामुळेच काल रात्री कोकणात आमच्याकडे रात्री नऊ सव्वा नऊ च्या सुमारास स्वयंपाक घरात मजेत गप्पा मारत जेवणं चालू होती. एक सुनबाई तेवढी झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत होती. बाकी जास्त जाग नव्हती ओटीवर. नऊच वाजलेले असल्याने खळ्यात, घरात सगळीकडे लख्ख ट्यूब लाईट मात्र लावलेल्या होत्या. जेवून खाऊन आमचा मोत्या ही दारात विसावला होता.
तेवढ्यात अचानक खळ्यात त्या ट्यूब लाईटच्या उजेडात ही दोन हिरवे डोळे चमकलेले झोपाळ्यावर गाणी ऐकत बसलेल्या आमच्या सूनबाईना दिसले आणि क्षणार्धात झेप घेऊन त्या तेजस्वी डोळ्यांचा मालक असलेला बिबट्या मोतीच्या आणि सुनबाईच्या पुढ्यात उभा ठाकला. तिची तर भीतीने दातखिळीच बसली पण प्रसंगावधान राखून ती मोठ्याने “ वाघ वाघ” असं किंचाळली. बिबट्या मोत्यापासून दोन फुटांवर आणि सुनबाईंपासून चार फुटावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात उभा होता.
प्रत्येक कुत्र्याचा एक स्वभाव असतो. आमचा मोती अजिबातच आक्रमक कुत्रा नाहीये. तो शांत, लाघवी, आणि फारच प्रेमळ आहे. पण केवळ मालकाशी इमान राखायचं ह्या एकाच हेतूने समोर साक्षात मृत्यू उभा ठाकलेला असताना ही मागचा पुढचा विचार न करता तो त्या बिबट्यावर धावून गेला. साखळीने मोत्याला बांधलेलं नव्हतं म्हणूनच हे शक्य झालं. नाहीतर डोळ्यासमोर मोत्या त्याची शिकार होताना पाहणं नशिबात आलं असतं. सुनबाईच्या किंचाळण्याने घरातली सगळी जण ही ओटीवर येऊन ओरडू लागली. त्यामुळे तो बिचकला. सावज सोडून निघून गेला.
मोत्या पिल्लू असतानाच
हा अलीकडचा
जाता जाता त्याचा पंजा मोत्याच्या शेपटीवर पडला आणि थोडी जखम होऊन त्यातून रक्त यायला लागलं. पण हळद वगैरे चेपल्यावर ते ही थांबल. आज पशू वैद्याकडून तपासून घेतलं मोत्याला, सगळं ठीक आहे. घरातल्या माणसांवर आणि मोत्यावर ही आलेलं जीवघेण संकट त्याच्या शेपटीवर निभावलं. ह्या प्रसंगाचा हिरो असणाऱ्या मोत्याला मात्र ह्याची फारशी कल्पना नसावी. घरातल्या कुत्र्यावर घरातल्या माणसांचं अतोनात प्रेम असतं. मोत्याच्या कामगिरीमुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. पण त्याच वेळी ह्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे ह्याची ही जाणीव झाली
हा प्रसंग अक्षरशः दोन ते तीन मिनटात आटोपला पण अख्खी रात्र कोणाचा ही डोळ्याला डोळा लागला नाही, सगळे गर्भ गळीत झालेत. घरात आणि घराबाहेर ही एक अदृश्य दहशत आहे. आम्हाला जेव्हा इकडे हे समजलं तेव्हापासून आम्ही ही इकडे हादरलो आहोत. मे महिन्यात आम्ही घरी गेलो होतो तेव्हा मुलाचा तीन वर्षाचा मुलगा वाट्टेल तसा रात्री ही खळ्यात हुंदडत होता. मी ही पहाटे अंधारात एकटी शांतपणे खळ्यात बसत होते, रात्री सर्वांच्या खळ्यात बसून गप्पा होत होत्या हे आठवून ते किती रिस्की होतं आणि देवाच्या कृपेनेच वाचलो असंच मनात येत आहे. आता पुढे काय हाच विचार सतत मनात आहे.
मला इतके दिवस वाटत होतं रात्री उशिरा बाहेर पडत असतील बिबटे त्यांचं भक्ष्य शोधायला. पण काल तो रात्री साडे नऊ च्या सुमारास सगळी कडे लाईट चालू असतानाच आला होता. मुलांना कामावरून येताना कायम धास्ती वाटणार आता. आमचा गुरांचा गोठा बंदिस्त आणि सेफ आहे पण त्या वासाने किंवा कुत्रा घरात असला तरी कुत्र्याच्या वासाने तो येतच राहणार आहे. कोकणातलं आमचं घर दोन दारं लावली की विषय संपला असं नाहीये. दारं कायम बंद करण्याची घराला सवय ही नाहिये त्यामुळे ते ही खूप कठीण आहे. आम्हाला आमचं घर स्वच्छ, कुठे अडगळ नाही असं वाटत असलं तरी विचार केला तर घराजवळ अनेक ओपन जागा आहेत त्याला येण्यासाठी आणि त्याला लपण्यासाठी ही खूप ठिकाणं आहेत. काल तो घाटी उतरून न येता दहा फूट खाली उडी मारून डायरेक्ट खळ्यात आला तसा शेजाऱ्यांच्या गडग्यावरून ही येऊ शकतो. त्यामुळे एवढा बंदोबस्त अशक्य आहे.
गावच्या पंचायतीत बिबट्या अंगणात आल्याची तक्रार करून ठेवली आहे. वनखात्याची माणसं तो पकडतील आणि जंगलात सोडून देतील पुन्हा. कारण बिबट्या ठार मारायला कायदेशीर परवानगी नाही. तो मोठा गुन्हा आहे. निसर्ग साखळीत बिबट्या महत्वाची भूमिका बजावतो हे कबूल पण फक्त बिबट्यांची संख्या वाढून उपयोगी नाही, त्यांचे भक्ष्य असलेले इतर प्राणी ही जंगलात असले पाहिजेत तरच समतोल राहिल. नाहीतर मनुष्य हेच त्यांचं अन्न बनेल.
परदु:ख शीतल असतं. इतके दिवस बातम्या वाचून त्याची दाहकता समजत नव्हती. पण आज मनातून त्याला बंदुक मारून ठार करावं असं वाटत आहे तथापि त्या ही बाबतीत हात बांधले गेले असल्याने फार हताश वाटत आहे.
हेमा वेलणकर
( प्र चि नेटवरून )
बाप रे...कठीण आहे. कोविड
बाप रे...कठीण आहे. कोविड काळात रस्त्यांवर वाहनं नव्हती तेव्हा बरीच जंगली जनावरं त्यांच्या हद्दी ओलांडून नवीन भागात केली. त्यामुळे असे खूप किस्से ऐकू येताहेत. वन खातं लवकर कारवाई करेल अशी अपेक्षा. तोवर सावधगिरीने वावरणं हेच आपल्या हातात आहे.
ओह!!!
ओह!!!
हम्म्म्म ममो.. माणसे
हम्म्म्म ममो.. माणसे-जनावरे संघर्ष आता आपल्या दारात
येऊन ठेपला आहे.
मोतीमुळे तुमचा धोका वाढलाय, त्याला संभाळा.
मायबोलीकर इन मिन तिनने सांगितलेल्या उपाययोजना, सावधानता इथे कॉपी पेस्ट करतेय -
खरं आहे , बिबट्या माणसांजवळ राहून हुशार झालेला प्राणी आहे. साधारण बिबटे संध्याकाळी ५ वाजता अॅक्टिवेट होतात.
अंधार पडायची वाट पहात नाहीत. एका ठिकाणी ३ ते ४ तास दबा धरुन बसु शकतात. तो अंगणात रस्त्याकडे किंवा तो येऊ शकतो अश्या जागेकडे पाठ करुन बसु नका. जमिनीवर तर अजिबात नाही. लहान मुलं संध्याकाळनंतर एकट्याने वावरणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
एक चांगलं आहे आताच्या काळात कोकणात मॅन इटर बिबट्या झाल्याची केस नाही आहे. महाराष्ट्रात जुन्नरमध्ये अन बोरिवली नॅशनलपार्कमध्ये ४ एक वर्षांपूर्वी केसेस होत होत्या. बाकी शक्यतेवढी काळजी घ्या.
एक आणखी उपाय आहे, बिबट्या वाघाला घाबरतो. आजकाल ब्लुटूथवर चालणारे चांगले स्पीकर येतात त्यातला एखादा घेऊन घरा जवळ ठेऊन, मोबाईल कनेक्ट करुन, युट्युबवरुन त्यावर वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज लावायचा अधेमधे, कदाचित तो एरिया सोडेल.
वाघ बिबटे आपल्या टेरेटरीत गोल फिरत असतात एकारात्री ३० ते ४० किमीची चाल करु शकतात. किंवा दोन एक दिवस एका जागी च वावरू शकतात. पण एका ठराविक काळानंतर पुन्हा त्या जागी येतात.
तुमच्याकडची भेट हि फक्त मोत्यासाठी होती, अन ही पहिली भेट नक्कीच नव्हती त्याने आदल्या दिवशी रेकी केली असणार की इकडे एक कुत्रा आहे.
घरातल्या लहानग्यांची काळजी घ्या , घरा बाहेर फिरताना हातात चांगली मजबुत काठी ठेवा, समोर दिसल्यास त्याला पाठ दाखवू नका पाठ करुन पळू नका समोर उभे राहून फेस करा घाबरल्यासारखे दाखवू नका, जोरात ओरडा काठी आपटा , माणसांबाबत बिबटे फार भित्रे असतात बाकी चिंता करु नका.
आईशप्पथ! थरारक प्रसंग.
आईशप्पथ! थरारक प्रसंग.
खरंच, ही सततची भीती मनात बाळगावी लागणार आता तुमच्या परिसरातल्या सगळ्यांनाच.
बिबट्या मोठ्यापासून दोन
बिबट्या मोठ्यापासून दोन फुटांवर आणि सुनबाईंपासून चार फुटावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात उभा होता.
बाप रे! खतरनाक !
तो अंगणात रस्त्याकडे किंवा तो
तो अंगणात रस्त्याकडे किंवा तो येऊ शकतो अश्या जागेकडे पाठ करुन बसु नका. जमिनीवर तर अजिबात नाही. लहान मुलं संध्याकाळनंतर एकट्याने वावरणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
>>> बरोबर
मोतीमुळे धोका वाढलाय
>> खरं आहे. शक्य झाल्यास मोतीसाठी पिंजरा बनवून घ्या ओटीवर. मध्यंतरी सोमेश्वरला गेले होते. त्या कुटुंबाने त्यांच्या कुत्रे मांजरांसाठी पिंजरे बनवले होते अंगणात. कारण मांजराला घरात ठेवलं तरी ते हळूच खिडकीतून निसटू शकत. चक्क कुलूप घालतात जेवणं झाल्यावर त्या पिंजऱ्यांना.
बाप रे !
बाप रे !
कसला भयंकर प्रसंग !!!
तुमच्या सर्वांच्या प्रसंगावधानाबद्दल कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.
कुणाचीही दातखील बसेल असा प्रसंग होता.
मोती कुत्र्याचं खूप विशेष वाटलं.
घरावरचं संकट कुत्रं आपल्या अंगावर घेतं अशी एक म्हण आहे. त्याचीच प्रचिती आली.
बापरे! तुम्ही लिहिलत ममो
बापरे! तुम्ही लिहिलत ममो म्हणून खरच असणार अशी खात्री वाटली. नाहीतर कोणी तरी गोष्ट लिहिली आहे असं वाटलं असत. काळ आला पण वेळ आली नाही ही म्हण पटली. मोतीच कौतुक,
ओह ! वाचूनच शहारे आले . मोती
ओह ! वाचूनच शहारे आले . मोती आणि तुमच्या सूनबाई सुखरूप आहेत हे वाचून बरं वाटलं.
थोडाफार फरकाने हा प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता . हनुमान जयंतीला सासरी पूर्ण गाव मंदिरात असत. आजेसासुबाई बेड रिडन असल्याने मी , नवरा आणि आमचा कुत्रा हॅरी घरात होतो . रात्री ९ वाजता आम्ही जेवण वाढायला सुरुवात करतो तेव्हा खळ्यात बसलेल्या हॅरीला आत घेतो . तसे मी त्याला घेऊन आले आत आणि दरवाजा लावला . कडी लावून खिडकी बंद करायला गेले तेवढ्यात डरकाळीचा आवाज ! आणि समोर वाघोबा उभे. त्यावेळी भीतीने जी गाळण उडाली तिच नाव !
पटकन खिडकी लावली आणि गप्प बसलो. थोड्यावेळ्याने जसे माणसांचे परतण्याचे आवाज ऐकून तो निघून गेला .
तुमच्याकडची भेट हि फक्त मोत्यासाठी होती, अन ही पहिली भेट नक्कीच नव्हती त्याने आदल्या दिवशी रेकी केली असणार की इकडे एक कुत्रा आहे.
सहमत! गावातल्या सगळ्यांचा हेच मत होत. हॅरीचा सुगावा लागल्याने तो भेट देऊन गेला अस सगळ्यांचं मत झालं
खरंच परदु:ख शीतल. जेव्हा आपली
खरंच परदु:ख शीतल. जेव्हा आपली वेळ येते तेव्हा काय होत असावं हे अनुभवलं लेखातून . काही महिन्यांपूर्वी मायबोलीवर मी एक कथा लिहिली " टुकारवाडीत वाघ". गावकरी वाघ पकडायला काय करतात ते आठवलं.
काही काळ जागते रहो करायला लागेल. तो एक वेगळाच तणाव असेल सगळ्यांवर , अगदी दिवसा देखील.
बाप रे!
बाप रे!
Omg ! थरारक.
Omg !
थरारक.
थरारक प्रसंग.
थरारक प्रसंग.
बापरे, सगळे सुखरूप आहेत ते
बापरे, सगळे सुखरूप आहेत ते वाचून बरं वाटलं. मोत्या खरंच शूरवीर.
घरावरचं संकट कुत्रं आपल्या अंगावर घेतं अशी एक म्हण आहे. त्याचीच प्रचिती आली. >>> अगदी. मीही ऐकलं आहे हे. विश्वासही आहे ह्यावर.
गेल्या वर्षी असाच सेम प्रसंग
गेल्या वर्षी असाच सेम प्रसंग आमच्या ईथे घडलेला. आणि योगायोगाने तो ही जून मधेच. बहूतेक जून मध्यावर. आमचं घर घाटीच्या सर्वात वरच्या बाजूला आहे आणखी ही एक घर आहे पण ते बंद असते. आमच्या घराला लगेच घाटीने खाली लागून चुलत काकांचे घर आहे. रात्री १० च्या सुमारास माझ्या चुलत काकांचा मुलगा जेवण आटोपून खेकडे पकडायला म्हणून माझ्या चुलत भावाच्या मुलांना घेऊन जायला वर आमच्या घराकडे यायला निघाला. त्यावेळी चुलत भाऊ जेवण आटोपून खळात बसयाला बनवलेल्या धक्क्यावर झोपला होता आणि त्याची दोन मुलं एक ७ वर्षांचा, एक १२ वर्षांचा खळात खेळत होते. आमच्या घराच्या १०० फूट वर जाऊन घाटी संपते व आंब्याच्या बागा सुरू होतात. काकाच्यां घरापासून घाटीने आमचे घर वरच्या बाजूला ५० फुटांवर. माझा चुलत काकांचा मुलगा घाटीने वर २५ एक फुट आमच्या घराकडे आला असेल, त्याच्याकडे मोठ्या झोताची चार्जींग बॅटरी जी खेकडे पकडायला वापरतात ती होती, त्याने सहज पायाखालचा बॅटरीचा झोत घाटीने वरच्या दिशेने मारला, तर घाटीच्या शेवटाला म्हणजे त्याच्या पासून साधारण सवाशे फूट अंतरावर फणसाखाली एक मोठा बिबट्या खाली उतरण्याच्या तयारीत होता , बॅटरीचा झोत त्याच्या तोंडावर पडताच तो गपकन खाली बसला, माझ्या चुलत काकांच्या मुलाची पंचाईत ही झाली की ना तो बिबट्याच्या दिशेने आमच्या घराकडे येऊ शकत होता , ना तो वळून पाठी स्वतः च्या घराच्या दिशेने पळू शकत होता कारण २-३ ऊडीत त्याने त्याला गाठले असते, चुलत काकांचा मुलगा तसाच झोत स्थिर ठेवून स्तब्ध ऊभा राहीला. साधरण एका मिनीटाने तो बिबट्या उजव्या दिशेला पसार झाला. चुलत काकांचा मुलगा तडक आमच्या घरी आला व खळ्यात झोपलेल्या माझ्या चुलत भावाला उठवले, त्याला आधी खरं वाटलं नाही पण साधारण ५ एक मिनिटात उजव्या बाजूला असलेल्या मुळम वाडीतून रशी बॉंब फोडल्याचे आवाज आले. जे त्या लोकांनी बिबट्याला पळवायला फोडले होते. त्या दिवशी जर माझ्या चुलत काकांचा मुलगा ५-१० मिनीटे उशीराने घरातून निघाला असता तर तो बिबट्या कदाचित घाटीने तडक आमच्या खळात आला असता आणि माझ्या चुलत भावाची दोन्ही मुलं लहान असल्याने काहीही विपरीत घडू शकले असते.
बाप रे..काय dangerous
बाप रे..काय dangerous situation होती:(
भयानक आणि भितीदायक प्रसंग..
भयानक आणि भितीदायक प्रसंग..
वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करायला हवा बिबट्याचा.. मनात बिबट्याची कायम भीती घेऊन रोज जगायचं म्हणजे कठीण काम आहे. बिबट्याचं संकट लवकर टळू दे..!
भयानक ! बेक्कार परिस्थिती
भयानक ! बेक्कार परिस्थिती होती! काळजी घ्या, सावध असा!
जाई, फार्स , तुमचेही अनुभव खतरनाक!
सध्या स्वानंदी सरदेसाईचा युट्युब चॅनल पहाते आहे. त्यांच्याकडेही कुत्रीवर असाच हल्ला झालेला मागे. गावात गस्त आणि संध्याकाळी एकट्याने बाहेर पडणे टाळणे असे उपाय केलेले आठवतायत.
कोकणातील माणसे खरच धाडसी म्हणायला हवीत. तिकडे कायम अश्या गोष्टी ऐकल्या आहेत. तसेच जुन्नर कडील लोकांचे ही अप्रूप वाटते मला.
^^मनात बिबट्याची कायम भीती
^^मनात बिबट्याची कायम भीती घेऊन रोज जगायचं म्हणजे कठीण काम आहे. बिबट्याचं संकट लवकर टळू दे..!^^
अगदी खरं
जाई, फा.वि.द.डि. , बापरे!
जाई, फा.वि.द.डि. , बापरे!
अस्मिता, शर्मिला, अनिंद्य,
अस्मिता, शर्मिला, अनिंद्य, स्वाती,, केया , फा. वी द डी, निकु, रुपाली, धनवंती, दसा, जाई, आर्च, रानभूली, माझेमन, हार्पेन, साधना, वावे, गिरीकंद, धन्यवाद .
साधना खूप छान पोस्ट आहे, कळवते हे सगळं गावाला.
माझेमन पिंजऱ्यात ठेवायची कल्पना छान वाटतेय. सांगते गावाला.
घरावरचं संकट कुत्रं आपल्या अंगावर घेतं अशी एक म्हण आहे. त्याचीच प्रचिती आली >> . बरोबर म्हणतात असं कोकणात तरी.
जाई, फार्स विथ द डिफरन्स काय कठीण प्रसंग...
मनात बिबट्याची कायम भीती घेऊन रोज जगायचं म्हणजे कठीण काम आहे हो ना खरं आहे. खूपच भीती बसली आहे बाहेर जायची. संध्याकाळी तुळशीला दिवा लावणे बंद केलं आहे थोडे दिवस.
बापरे.. !
बापरे.. !
खरा वाघ बिबट्या असा खुला दिसतो किंवा त्याची साधी गुरगुर ऐकू येते तेव्हा काय गाळण उडते या दोन्हीचा अनुभव घेतला आहे आयुष्यात.. पण तरी फेसबुक युट्युब वर एखादा वस्तीत बिबट्या शिरल्याचा व्हिडिओ बघतो तेव्हा बघताना तो रोचक वाटतो... पण तुमचा अनुभव वाचताना मात्र काळजी वाटली. लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त होऊ दे आणि तुमचे रुटीन आयुष्य सुरू होऊ दे
बाप रे! ममो, फारच भयंकर अनुभव
बाप रे! ममो, फारच भयंकर अनुभव!
मोत्याची इमानदारी खरंच कौतुकास्पद आहे.
जाई, फार्स तुमचे अनुभवही भितीदायक आहेत.
हल्ली कोकणातल्या स्वानंदी सरदेसाईचा युट्युब चॅनेल बघते. तिनेही असाच एक अनुभव सांगितला, तिच्या कुत्र्यासंबंधी.
थरारक अनुभव...
थरारक अनुभव...
थरार एकवेळा.. आणि काळजी कायमची..
बापरे! दोन्ही प्रसंग ममो व
बापरे! दोन्ही प्रसंग ममो व फाविडींचा ..
बापरे ममो फाविदडी डेंजर
बापरे ममो फाविदडी डेंजर प्रसंग आहेत. जाईचा पण.
थरारक अनुभव...
थरार एकवेळा.. आणि काळजी कायमची..>>>निरू+१११११
बापरे... थरारक प्रसंग!
बापरे... थरारक प्रसंग!
भयंकर व थरारक प्रसंग ममो, जाई
भयंकर व थरारक प्रसंग ममो, जाई, फाविदडि!
ममो, जाई आणि फाविदdi भयंकर
ममो, जाई आणि फाविदdi भयंकर प्रसंग!
मोतीचे खूप कौतुक!
साधनाचा प्रतिसाद खूप आवडला.
यावरून माझ्या लहानपणीची आठवण आठवली. गावचं घर गावापासून खूप लांब पण नदीजवळ होते. नारळीची पोफळीची झाडे एकदम खळ्यालगत होती.आम्ही सारी भावंडे खळ्यात मधोमध झोपायचो आणि आया कडेला झोपायच्या.का तर वाघरु(बिबळ्या?) येईल आणि कडेला झोपवले तर मुलांना उचलून नेईल.
कटांदर(बिबळ्यासारखाच एक प्राणी की बिबट्याचं) होते म्हणे.
कटांदर म्हणजे उद (उद मांजर
कटांदर म्हणजे उद (उद मांजर अथवा मसण्या उद).
मसण्या उद लहान मुलांना उचलुन नेतो असा समज (अथवा मुलांना त्याच्या नावाने रात्री भीती घालण्याची प्रथा) आमच्या गावी पण होता.
Pages