क्रिकेटचे पाळणाघर

Submitted by चिमण on 17 June, 2025 - 06:53

लॉर्ड्स क्रिकेट मैदान ही क्रिकेटची पंढरी आहे हे सर्वश्रुतच आहे. दर वर्षी हजारो पर्यटक भक्तिभावाने फक्त हे मैदान बघायला येतात. त्यात भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे हे तिथे काम करणार्‍या माणसानेच मला सांगितलं. अर्थात भारतीयांचे एकूण क्रिकेट वेड बघता यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणा! मी पण त्यातलाच एक! पण क्रिकेटचं अति वेड असलं तरी क्रिकेटच्या एकूण इतिहासाबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे.

उदाहरणार्थ, क्रिकेटचा जन्म कुठे झाला? मी याचं उत्तर बेधडकपणे लॉर्ड्स असं दिलं असतं. हा प्रश्न मला कधीही पडला नाही आणि मला ही कधी कुणी विचारला नाही. याचा अर्थ इतरांना पण तो पडला असण्याची शक्यता नाही. कुठलेही नस्ते प्रश्न न पडणं आणि पडले तरी त्यावर खोलात जाऊन विचार न करणं हा माझा स्थायीभाव आहे. तर, क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की कुणालाच माहिती नाही. पण इतकं माहिती आहे की क्रिकेट शेकडो वर्षांपासून दक्षिण इंग्लंडमधे खेळलं जात होतं. तेथे सोळाव्या शतकामधे क्रिकेट खेळलं गेल्याचे संदर्भ आहेत.

क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की माहिती नसलं तरी क्रिकेटचं पाळणाघर कुठे होतं ते नक्की माहिती आहे. हॅम्पशायर कौंटीतील हॅम्बल्डन क्रिकेट क्लबला क्रिकेटचं पाळणाघर म्हंटलं जातं. अर्थात मला याची काहीच कल्पना नव्हती. बर्‍याच लोकांना हे माहीत असेल असं वाटत नाही म्हणून हा एक छोटा लेख!

तर मला हा क्लब काही वर्षांपूर्वी या भागात बरीच वर्ष वास्तव्य असलेल्या माझ्या मेव्हण्याने दाखवला. हा क्लब 1750 मधे स्थापन झाला व लवकरच एक प्रभावशाली क्लब बनला. आधुनिक क्रिकेटची नियमावली बनवण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे हा क्लब 'क्रिकेटचे पाळणाघर' म्हणून प्रसिद्ध आहे. त्या नियमावलीत तिसरा स्टंप असला पाहीजे तसेच बॅटची रुंदी किती हवी असे काही उल्लेखनीय नियम होते. नवीन जुन्या नियमांवरील चर्चा व संमत झालेले ठराव याच्या नोंदी या क्लबच्या मिनिट्समधे आहेत.

हॅम्बल्डन क्रिकेट मैदान

वरील फोटोत दाखवलेले मैदान हे हॅम्बल्डन क्रिकेट क्लबचे जुने मैदान आहे. हे Broadhalfpenny Down या नावाने ओळखले जाते. तिथेच बॅट अ‍ॅंड बॉल पब आहे.
बॅट अ‍ॅंड बॉल पब

त्या पबवर आता खालील पाटी आहे.

बॅट अ‍ॅंड बॉल पबच्या भिंतीवरील पाटी

इंग्लंडच्या बहुतेक मैदानांसारखे Broadhalfpenny Down हे मैदान देखील सुंदर आहे. या मैदानाचे काही फोटो....
पॅव्हेलियन
Broadhalfpenny Down
Broadhalfpenny Down
Broadhalfpenny Down
Broadhalfpenny Down
Broadhalfpenny Down

या मैदानावर अजूनही क्रिकेटचे सामने होतात.

एक सामना
एक सामना
एक सामना

काही दिवसानंतर क्लबचे ठिकाण व मैदान जवळच्या दुसर्‍या एका मैदानावर हलले. त्या नंतर 1780 मधे लंडन मधला मेरिलबोन क्रिकेट क्लब हा क्रिकेटचा अधिकृत क्लब बनला. लॉर्ड्स मैदान मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या मालकीचे आहे. लॉर्ड्स हे नाव त्याच्या संस्थापकाच्या थॉमस लॉर्ड नावावरून पडलं.

असो, आपल्या क्रिकेट वेड्यांना आता लॉर्ड्स नंतर Broadhalfpenny Down हे मैदानही बघायला जायला हरकत नाही. मुख्य म्हणजे इथे प्रवेश घ्यायला पैसे पडत नाहीत.

तळटीप:
1. Broadhalfpenny Down संकेतस्थळ: https://www.broadhalfpennydown.com/
2. हॅम्बल्डन क्रिकेट क्लब संकेतस्थळ: https://hambledon.cc/

--- समाप्त ---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. हे माहीत नव्हते. कोणी विचारले असता माझ्याही उत्तराने मेरिलबोन क्रिकेट क्लब पलीकडे की अलीकडे उडी मारली नसती. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

छान माहिती. या क्लबबद्दल माहिती नव्हतं.

अशा ग्राऊंडवर क्रिकेट बघायला (आणि खेळायला) किती मस्त वाटत असेल.
न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊन ग्राउंडची आठवण झाली.

छान लेख
माहिती नविन आहे आणि इन्टेरेस्टिंग

>> अशा ग्राऊंडवर क्रिकेट बघायला (आणि खेळायला) किती मस्त वाटत असेल.
मला तर इथल्या कॉलेजची मैदानं बघून इतकं जळायला होतं की काही विचारू नकोस. त्यापुढे आपल्या कॉलेजच्या व विद्यापीठाच्या मैदानं म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत असं वाटतं!

धन्यवाद ऋन्मेष, ललिता आणि किल्ली!