
मालिनी, इन्स्पेक्टरच्या मागोमाग त्या अर्धप्रकाशित, दमट खोलीत शिरली. एका स्ट्रेचर समोर ते येऊन थांबले. जवळ उभ्या असलेल्या नर्सला, इन्स्पेक्टरने नजरेने खूण केली. ती स्ट्रेचरवरील देहावर पांघरलेली पांढरीशुभ्र चादर दूर करू लागली. आधीच विलक्षण अस्वस्थ असलेल्या मालिनीच्या शरीराला कंप सुटला. श्वास जोरजोराने येऊ लागला.
"मिसेस राऊत.." इन्स्पेक्टर म्हणाले. "सावरा स्वतःला." तिने हळूवारपणे होकारार्थी मान हलवली. नर्सने, त्या देहावरची चादर जराशी दूर केली. एक क्षणभर शांतता..
"मधू.." जोरात किंचाळून मालिनी हमसून हमसून रडू लागली. "ओह्ह मधू.. हे काय झालं रे ? असा कसा मला सोडून गेलास तू ?" रडता रडता ती बोलत होती. इन्स्पेक्टर आणि नर्सने तिचं सांत्वन करून, तिला कसंबसं शांत केलं. इन्स्पेक्टर तिला घेऊन बाहेर पडला.
_____
ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेले, मालिनीचे पती मधुकर त्या दिवशी सकाळीच परतणार होते ; पण सायंकाळ होऊनही ते परतले नाहीत. ते कॉलही उचलत नव्हते. त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला, तर ते निघाले असतील एवढंच उत्तर मिळालं. तेव्हा शेवटी ती पोलिसांकडे गेली. आणि.. आज तिला पोलिसांकडून बोलावणं आलं होतं. मधुकरच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी..
_____
"तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर, आम्ही कसून तपासणी केली. तुमच्या घराकडे येणारे दोन रस्ते. एक, हमरस्ता. आणि दुसरा जरा एकांतातला, माळरानावरून येणारा. जो शॉर्टकट आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, ते कधी त्या रस्त्याने जा-ये करत नसत ; पण सर्व शक्यता ध्यानात घ्यायच्या, म्हणून आम्ही तिकडेही गेलो. तेव्हा त्या मोकळ्या, ओसाड माळरानावर तुमची कार आढळली. उलटलेली. मिस्टर राऊंताचा देह आम्ही बाहेर काढला. अर्थात, देहावर खूप साऱ्या जखमा होत्या. आणि ते मृत झालेले होते. तो अपघात होऊन बराच वेळ उलटून गेल्याचं उघडच दिसत होतं." इन्स्पेक्टर मालिनीला सांगत होते. ती स्तब्ध उभी होती. क्षणभर थांबून इन्स्पेक्टर म्हणाले -
"एकूण ज्या पद्धतीने हे घडलं आहे, त्यावरून मला असं वाटतं की.." मालिनीने एकदम त्यांच्याकडे नजर वळवली. पण इन्स्पेक्टर मध्येच थांबले.
"नाही. तुमची अवस्था पाहता, आपण आता याबद्दल बोलायला नको. संध्याकाळी मीच तुमच्या घरी येतो. मला काही प्रश्नही विचारायचे आहेत. ओके? सांभाळून जा."
कसंनुसं हसत, होकारार्थी मान डोलावून ती निघाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे इन्स्पेक्टर काही क्षण पाहतच राहिला.
-----
दरवेळी राऊत जो मार्ग टाळत, त्याच सुनसान रस्त्यावर त्यांच्या गाडीला, अशा प्रकारे झालेला अपघात ; यांतून हा अपघात नसून, योजनापूर्वक केलेला घात असावा हे समजायला इन्स्पेक्टर मानेंना वेळ लागला नव्हता. मात्र अशा अवस्थेत, ते मालिनीला हे सांगू शकत नव्हते, आणि तिच्याकडे काही चौकशीही करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी ते काम जरासंच पुढे ढकललं होतं. अर्थात, खुनाचीच केस असली तर फार उशीर करून चालणार नव्हतं.
एकच प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता.. राऊंताच्या जीवावर कोण टपलं असावं ?
*******
मालिनी कोचावर, मान झुकवून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. एकदम पावलांचा आवाज ऐकू आला. पावलं जवळ जवळ आली, आणि एकदम तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. ती जराशी दचकलीच.
"अगं.. घाबरतेस काय. मी आहे." मधुकरचा भाऊ दिनेश तिच्यापाशी उभा होता. ती उठून उभी राहिली.
"काय गं. इतकी tense का दिसत आहेस ?" दिनेशने विचारलं. त्यावर जराशा खोल आवाजात मालिनी म्हणाली..
"कारण खुनासारखा गंभीर गुन्हा पचवण्या एवढी मी, निर्ढावलेली नाहीये दिनेश !"
"Oh come on मालिनी ! कितीदा समजावू ? तू स्वतः काहीच केलं नाहीयेस. हे सारं मी घडवून आणलंय. तू फक्त मला साथ दिलीस. आणि, आपल्या एकत्र येण्यासाठी हे गरजेचं होतं ना." दिनेशने विचारलं. त्यावर हलकसं स्मित करत मालिनीने होकारार्थी मान हलवली.
"That's like a good girl." तिच्या हनुवटीला स्पर्श करून तो म्हणाला. आणि तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागला ; पण तिनं त्याला रोखलं.
"आता काय ?"
"काही नाही. फ्रेश होऊन येते." ती हसून म्हणाली. आणि आतल्या दिशेने गेली. दिनेश हसला.
_____
" हे काय सांगताय डॉक् ? पण असं कसं..?" माने कॉलवर बोलताना म्हणाले. पलिकडून काहीतरी उत्तर आलं.
"Oh doctor.. how irresponsible you are!" चिडून इन्स्पेक्टर माने म्हणाले. "हो.. त्यांना तर कळवावच लागेल." इन्स्पेक्टरने फोन ठेवला.
-----
बेडरूममध्ये, मालिनी दिनेशच्या बाहुपाशात होती. त्याचे राकट हात तिच्या गोऱ्यापान, कोमल सर्वांगावर फिरत होते. खिडकीतून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहत तिने विचारलं -
"दिनेश.. तू चक्क एक मर्डर घडवून आणलास. तोही तुझ्या सख्ख्या भावाचा. का ?"
"फक्त तुला मिळवण्यासाठी. आणि आता, तू माझी आहेस?" तिच्या गालावरून हात फिरवत दिनेश म्हणाला. तिने हळूच होकारार्थी मान हलवली.
"मला जरा काळजी वाटते रे. तो इन्स्पेक्टर मला काहीतरी विचारणार होता ; पण मग मध्येच थांबला. त्याला संशय तर नसेल आला, की हा अपघात नसून ठरवून केलेला मर्डर आहे."
"नाही गं. आणि तसा संशय आलाच, तरी आपल्या पर्यंत तो नाही पोहोचू शकणार. मी सगळी काळजी घेतली आहे. आणि.. थोड्याच दिवसांनी आपण इथून दूर निघून जाऊ."
"तुझ्या याच हुशारीने तर मला प्रेमात पाडलं." त्याच्या ओठांचं चुंबन घेत, मादक स्वरात ती म्हणाली. अजूनच उत्तेजीत होऊन, तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. तोच मालिनीच्या मोबाईलची रिंग वाजली -
"अरे सोड ना. फोन वाजतोय." लाडिकपणे म्हणत, मालिनी ने स्वतःला सोडवून घेतल़. आणि कॉल रिसीव्ह केला.
"हॅलो. इन्स्पेक्टर, तुम्ही यावेळी का.." ती जरा त्रासिकपणे म्हणाली ; पण मग इन्स्पेक्टरचे शब्द ऐकून ती चकित झाली.
"काय ? पण हे कसं शक्य आहे ?" ती म्हणाली. "अच्छा ? ठिक आहे." एवढं बोलून तिने फोन कट केला.
"काय गं, काय झालं ?" दिनेश ने विचारलं.
"अरे मधुकरची बॉडी, mortuary मधून गायब झाली आहे." मालिनीच्या आवाजात आश्चर्य आणि काहीशी भीती होती.
"काय ? पण एक Dead body कोण गायब करेल ?" दिनेशने आश्चर्याने विचारलं.
"तेच तर. आपल्याला जावं लागेल, लवकर." ती म्हणाली.
"हो. तू Panic नको होऊस. बाहेर जाऊन थांब. मी येतोच." दिनेशने सांगितलं.
-----
फोनवरून बातमी समजताच इन्स्पेक्टर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रात्रीची वेळ असल्याने तिथे केवळ वॉचमन, आणि शवागारात रात्रीच्या शिफ्टला असलेली नर्सच आधीपासून होती. तिने डॉक्टरांना कळल्यावर ते आले होते. नर्स व वॉचमन, खूप घाबरले होते. मृत झालेल्या मधुकरला पाहिल्याचं, दोघेही अगदी शपथेवर सांगत होते. नर्सने सांगितल्याप्रमाणे, ती थोडावेळ बाहेर जाऊन जेव्हा परतली. तेव्हा मधुकरचा फ्रीजर बॉक्स उघडा होता. आणि मधुकर आपल्या पायांवर उभा होता. तिने अत्यंत भीतीने ओरडण्यासाठी तोंड उघडलंच होतं, की मधुकर रागाने तिच्या अंगावर धावून आला. त्याच्या हालचालीत किंचीत विकृती आलेली दिसत होती. अर्धवट किंचाळून ती बेशुद्धच पडली. तिचा आवाज ऐकून वॉचमन धावला, तर.. त्याला मधुकर बाहेर पडताना दिसला. ते भयानक ध्यान पाहून वॉचमनची ही दातखीळ बसली. मधुकरला अडवण्याचा त्याने मुळीच प्रयत्नही केला नाही.
नेमका, कॉरिडॉर आणि बेसमेंट मधील सीसीटीव्ही बंद होता. त्यामुळे नर्स आणि वॉचमनच्या सांगण्यात किती सत्यता आहे ते पडताळून पाहणं शक्य नव्हतं. या साऱ्या प्रकारामुळे इन्स्पेक्टर tense झालेले असतानाच, त्यांना मालिनीचा फोन आला. तिचं बोलणं ऐकून तर माने अजूनच गोंधळले. आता खरं खोटं करायला वेळच नव्हता. मालिनीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे माने काही हवालदार सोबत घेऊन तातडीने निघाले.
-----
बेडरूमच्या बाहेर पडून, पाणी पिण्यासाठी मालिनी किचन कडे वळाली. अचानक पाठीमागे कुणाची तरी चाहूल लागली. दिनेश असेल, असा विचार करून तिने मागे पहायचं टाळलं. इतक्यात पाठीमागून तिला कुणीतरी मागे ओढलं. तिच्या मानेवर ओठांचा स्पर्श जाणवला.
"दिनू.. आता नको ना. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. नाहीतर पोलिसांना संशय येईल. अन् आता मी तुझीच आहे. थोडी कळ काढ."
मात्र त्या हातांची पकड ढिली न होता, अधिकच घट्ट होऊ लागली. त्याचे ओठ तिच्या मानेवर रूतले गेले. तिचे डोळे धुंदावले होते. गळ्याभोवती पडलेल्या हाताच्या पकडीने, किंचीत घुसमटल्यासारखं होऊ लागलं. ती पुन्हा हळूवारपणे म्हणाली-
"दिनेश.. नको ना." मात्र हे म्हणत असतानाच, तिला दोन गोष्टी आता नीट जाणवल्या. त्या हाताचा, आणि ओठांचा स्पर्श अत्यंत थंडगार होता. आणि कसलीशी दुर्गंधी जाणवत होती. म्हणजे, तो दिनेश नव्हता !
"ए.. कोण आहे ?" मागे दिनेशच्या ओरडण्याचा आवाज आला. मग त्याची जवळ येणारी पावलं ऐकू आली. हळूहळू तिच्या गळ्यावरील त्या हाताची पकड सुटू लागली. दिनेश 'त्याच्या'शी झटापट करत असावा. मालिनीने ताकद लावून तो हात झटकला. आणि दूर होऊन, तिनं मागे पाहिलं. तिला मोठा धक्का बसला ! आपल्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. तो मधुकर होता ! तिचा मृत झालेला नवरा ! त्याची लालभडक, क्रुद्ध नजर तिच्यावर खिळलेली. ती आत्यंतिक भीतीने जागीच उभी राहिली. वेगाने मागे वळून, मधुकर ने दिनेशच्या तोंडावर ठोसा मारला. तो मागे कोलमडला. ते पाहताच, शरीरावर ची बंधनं गळून पडल्यासारखी मालिनी भानावर आली. पुढे होऊन तिने मधुकरला थांबवायचा प्रयत्न केला ; पण त्यानं जोरात धक्का देऊन तिला मागे लोटलं, आणि तो खाली कोसळलेल्या दिनेशच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबू लागला. मालिनी स्वतःला सावरुन पुन्हा त्याच्याकडे धावली ; पण मधुकर चे हात दूर सारण्याचा प्रयत्न करत दिनेश म्हणाला -
"मालिनी.. तू आधी पोलिसांना फोन कर."
क्षणभर मालिनीचा निर्णय होईना ; पण मग नाईलाजाने ती टेलिफोन कडे वळाली. आणि थरथरत्या स्वरात, घाईघाईने तिने इन्स्पेक्टरला सारं काही सांगून बोलावून घेतलं..
फोन ठेवून मालिनी दिनेश कडे धावली. त्याच्या अंगावर बसलेल्या मधुकरला तिने जोराचा धक्का देवून पाडलं. दिनेशला तिने सावरून उठवलं. आणि दोघे दरवाजाकडे धावले. मागून वेगाने येणारी पावलं त्यांना ऐकूच आली नाहीत. आणि
"फट्ट" असा जोरदार आवाज झाला. दिनेश ची पावलं एकदम थांबली. मालिनीने वळून पाहिलं तर, दोन्ही हातांनी डोकं पकडून तो खाली कोसळत होता. मागेच मधुकर, हातात मोठी फुलदाणी घेऊन उभा होता. मालिनी किंचाळली. मात्र काहीही करण्याचं भान येण्यापूर्वीच, मधुकरने कोसळलेल्या दिनेशच्या तोंडावर एकावर एक फटके मारून त्याचं तोंड छिन्नविछिन्न करून टाकलं. मालिनी अगदी सुन्न होऊन तो भयानक, अमानुष प्रकार पाहत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा एक टपोरा थेंब गालांवर उतरला.. दिनेश गतप्राण होताच मधुकरने वर मालिनी कडे पाहिलं. त्याची ती थंड, कठीण नजर पाहून तिचा थरकाप उडाला ; पण त्या नजरेखाली तिच्या हालचाली गोठल्या होत्या.
_____
इन्स्पेक्टर मानेंनी बंगल्यावर पोहोचून धावतच हॉल गाठला. आणि.. आतमधील दृश्य पाहून, क्षणभर तेही स्तब्ध होऊन गेले. हॉलमध्ये मधुकरचा भाऊ, दिनेश मरून पडला होता. त्याचा चेहरा जखमांनी विद्रूप झाला होता. त्याच्याच शेजारी मधुकरचा मृतदेह पडला होता. त्याच्या हातात रक्ताने माखलेला फ्लॉवर पॉट ! आणि, थोड्या अंतरावर मालिनी जमिनीवरच बसली होती. तिने एव्हाना स्वतःला थोडं सावरलं होतं. इन्स्पेक्टर समोर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इन्स्पेक्टर मानेंनीही सुस्कारा सोडत मनाशी कबुली दिली. "हे जग माणसाच्या विश्वास अविश्वासांवर मुळीच चालत नाही. कधी, कुठे, काय घडू शकते, हे आपल्याला काय सांगता येणार ?
समाप्त
© प्रथमेश काटे
छान कथा आहे, आवडली. लिखाणाची
छान कथा आहे, आवडली. लिखाणाची पद्धत छान आहे, साधी सोपी ओघवती भाषा, संवादांचा पुरेसा वापर, गतिमान कथानक, या गोष्टी वाचकाला खिळवून ठेवतात. लिहीत राहा.
खूप आभारी आहे. आपल्या सदिच्छा
खूप आभारी आहे. आपल्या सदिच्छा कायम राहुद्या.