अवकाश

Submitted by शिवानी बलकुंदी on 12 June, 2025 - 06:36

संक्रांत म्हणजे जसे तिळगूळ तसेच संक्रांत म्हणजे पतंग. रंगबिरंगी पतंगांनी भरून गेलेले आकाश बघण्यात एक वेगळीच मजा आहे.
मधूनच एखादी आरोळी, ओ काsssss ट ,
अधूनमधून मुलांचा गलका, पतंग पकडण्या साठीची धडपड, आणि ती हाती आली की झालेला आनंद आणि उत्साह. जणू एखादे रत्न च हाती लागले आहे.
आकाश असेच सगळ्याच पतंगांना आपल्यात सामावून घेते. नुसते सामावूनच घेत नाही तर त्यांना दिमाखाने व डौलाने वरवर जायला मदत देखील करते.
माणसाच्या मनाला देखील या पतंगा सारखेच डौलाने वरवर जायला खूप आवडते. कधी उंच उंच जायला, कधी वाऱ्या सोबत डोलायला तर कधी नुसते च पक्षांसारखे सारखे विहरायला.
पण सगळ्याच मनांना असे पतंगांसारखे उंच आकाशात भरारी घ्यायला जमतेच असे नाही.काही पतंग आकाशात उडण्यासाठी वाट बघत असतात. तर काहींचे दोर उडल्याबरोबरच कापल्या जातात. काहींना उडण्या आधीच जखमी होणे वाट्याला येते.
माणसाला देखील अशा अनेक प्रकारांच्या संकटांना सामोरे जात जात आयुष्य घालवावे लागते. आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगां मधून निर्माण झालेल्या विविध भवनां चे कल्लोळ माणूस व्यक्त करू शकत नाही. आणि आहे ते स्वीकारून वाट्याला आलेले क्षण निमूटपणे जगावेच लागतात.
जशी सागराची खोली, पर्वताचे टोक आणि आकाशाची विशालता हे सगळे खूप अथांग आणि उत्तुंग आहे, तेथे नेहमीच अनाकलनीय घडामोडी घडत असतात. तसेच माणसाचे मन आहे. ते देखील अथांग आहे, गूढ आणि व्यापक आहे. हे सगळे आपल्याला विशाल काय भासत असले तरीही सागराच्या आत सुरू असलेल्या असंख्य प्राण्यांच्या हालचाली, आकाशात नित्य घडत असलेले बदल, आणि उत्तुंग पर्वतांवरील वादळे, ही बाह्य जगाला सामान्यपणे दिसत नाहीत त्यासाठी त्यांचे जवळून निरीक्षण करावे लागते. जसा त्यांना देखील बदलांचा सामना कायमच करावा लागतो. तसेच आपल्या मनाच्या गाभाऱ्यात देखील जे सुरू असते ते बाहेरील जगाला कळतेच असे नाही. ही सगळी च प्रतीके माणसाला कायम हेच शिकवीत आलेली आहे.
त्यांच्या मधील हा गुण माणसाने घ्यावा म्हणजे त्याला देखील आयुष्यातील दुख पचवून ही कायमच आनंदी राहता येईल.
कारण आयुष्यात सगळ्यांनाच व्यक्त होण्यासाठी पतंगा सारखे अवकाश मिळत नाही. त्याना भरारी घेण्यासाठी एकतर वाट बघावी लागते, अथवा प्रयत्न पूर्वक वर गेल्यानंतर तिथे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो किंवा त्यांचे पंख च छाटून टाकले जातात.
मनातील भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी चे अवकाश, खरंच कोणा कोणाला हे मिळू शकते, हा गहन प्रश्न आहे. कारण सगळ्याच मनांना डौलाने वरवर जाऊन आकाशात राज्य करता येण्यासाठी, अवकाशात आनंदाने विहार करण्यासाठी गरज आहे ती अवकाश मिळण्याची.

#सुरपाखरू #प्रयोग२०२५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults