
संगीत देवबाभळी - एक दृकश्राव्य अनुभव
पडदा उघडतो तो डाव्याबाजुला दोन खणी घर दिसतं. चूल आहे, चार डबे असतील. फडताळ आहे. त्यावर कटीवर कर आणि विटेवर उभी विठ्ठलाची मूर्ती आहे. नुसती मूर्तीच आहे, त्याला हार फुलं सजावट काही नाही. तिथेच एक पोटुशी बाई लवंडली आहे, आणि गाणं म्हणत्येय. पहाटेची वेळ वाटावी असं अंधार आणि गाण्याची चाल आणि एकुणच रागरंग बघुन - ऐकून वाटतंय.
रंगमंच्याच्या उजव्या बाजुला चार पायर्या चढून गेलं की भंडारा डोंगर आहे, आणि आणखी चार पायर्या उतरल्या की इंद्रायणीचा काठ आहे. शेवटची पायरी उररुन एक पाय खाली सोडला की जळी विहरायची सोय आहे, समोर एक दिवा असा लावला आहे जेव्हा कोणी नदीवर जाईल तेव्हा त्या नदीच्या शांत लाटा, पाण्याची डुचकीभळ खळखळ दिसू येईल.. हो दिसू येईल, काहीसा रव ही जाणवेल. सारा एक दिवा आणि छायाप्रकाशाचा खेळ! भंडारा डोंगरावर अभंग लिहायला एक पंतोजींकडे असायचं तसं डेस्क आहे. त्यावर अभंग ठेवून ते इंद्रायणीत बुडवायची वेळ झाली की घोंघावणार्या वार्याची आणि कागद उडण्याची सहज अशी सोय केलेली आहे.

इकडे डाव्या हाताला असलेल्या घराला बाहेर पडायला आणि परत आत यायला एक दार दाखवलं नसून ते तिथे आहे हे मात्र आपल्याला दिसेल याची सोय आहे. बाहेर ओसरी आहे. ही ओसरी आहे म्हणजे, ती काही प्रॉप वापरुन केलेली नाही. पण ओसरी कुठे आणि कधी संपते आणि कुठे उजवीकडची इंद्रायणी चालू होते हे पात्रांच्या हालचालीतून समजल्याने बराचसा खुला रंगमंच असून त्याला एक बंदिस्त अवकाश आलेलं आहे. घरात चुली समोर बसायला जागा आहे. चूल पेटलेली आणि शांतावलेली वेगवेगळी दिसते, भाकरी थापुन ती तव्यावर नजाकतीत पडते, त्यावर पाणी फिरवलं की वाफ येते, हे सगळं चालू असताना सुरा-तालात गाणं चालू असते. कडवं चालू असताना भाकरीचं पीठ मळलं जात नाही, मधल्या पीसेस मध्ये ते बरोबर मळून होतं. सगळं कोरिओग्राफ्ड आहे पण सहज आहे. विचारपूर्वक प्रत्येक हालचाल घडते, नजाकतीत घडते.
घराच्या मागून यायला रंगमंच्याच्या विंगेतून जागा आहे. नाटकात दोनच पात्र आहेत. एक उजवीकडून रंगमंच्याच्या अवकाशातून बाहेर पडेल त्याच क्षणी दुसरं गाणं गात डावीकडून घरात शिरतं. ही एक लय आहे ना, ती किती जादुई असू शकते!
ब्रॉडवेच्या म्युझिकल्स मध्ये जशा नजाकतीत हालचाली घडतात, त्याची आठवण यावी अशा नृत्य न करता लयीत, गाणे गाताना तालाचा तोल सांभाळत केलेल्या हालचाली. स्वर, ताल कुठे कसे आहेत याचा विचार करुन केलेल्या. खरंतर ऑब्युअस, पण इतका साधा विचार कोण करतो च्या जमान्यात हेच नाविन्यपूर्ण वाटावं अशा. समेवर एखादी गोष्ट घडली तर काय मजा येते ते बघितल्याशिवाय नाहीच समजणार. गायनातील, वादनातील, अभिनयातील, हालचालीतील, एकमेकांच्या नेत्रपल्लवीतील, एंट्री आणि एक्झिट मधली सम.. या सगळ्या समा ( एक सम, अनेक समा) एकावेळी आल्या की अंगावर रोमांच उभे रहातात.

तुकोबारायांची आवली भंडार्यावर धन्याला शोधत न्याहरी घेऊन चालली आहे. धनी रात्री कधी घरी आलेले... पण आलेले तरी का? त्या विठ्याच्या नादाला लागून पार इस्कोट केलेल्या संसारात गांजलेली पोटुशी आवली तो रंगंचावरील चारच पायर्यांचा भला मोठा डोंगर कशीबशी चढते आहे. चढताना तिच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो आणि ती कोसळते. बेशुद्धच पडते. तिच्या पायातला काटा काढायला विठ्ठल येतो. स्वतः तिचा पाय हातात घेऊन काटा काढतो, पण नंतरची जखम भरू येई पर्यंत आपले तुकोबाराया काही काळजी घेणार नाहीत म्हणून रखुमाईला आवलीकडे जाऊन तिची जखम भरेपर्यंत तिची सेवा करायला धाडतो. आता इतका काटा काढला तर जखम पण बरी करायची ना विठ्ठलाने. देवच ना तो? हा आपल्या सारख्या ठार नास्तिकांना पडलेला प्रश्न रखुमाई बोलूनच दाखवते.
रखुमाई 'लखुबाई' नावाने आवलीकडे येते. तिच्या धन्याला, काळतोंड्याला घातलेल्या शिव्या ऐकून किती त्या विठ्ठलावर रखुमाईचा राग/ रुसवा असला तरी ही आवलीची फटकळ वाणी काही तिला झेपत नाही. ती विठ्ठलाकडे तो सल बोलूनही दाखवते. पण रखुमाईचं दु:ख आणि आवलीचं दु:ख खरंच काही वेगळं आहे का?
आवली आपल्या पायातला काटा कोणी काढला आणि ही बया आपल्या घरी का आली आहे, न कळल्याने चिडलेली. त्यात हक्काचा नवरा घरदार, चांगली चाललेली सावकारकी नदीत बुडवुन हरीनामात मग्न. रखुमाईचा विठ्ठलाशी उभा दावा! त्यात त्याने त्याच्या कुठल्या भक्ताच्या बायकोची सेवा करायला पाठवल्याचा राग आहे तो वेगळाच.
गोष्टीत पुढे काही फार वेगळं होत नाही, होणं शक्य ही नसतं. नशिबाने अजुनही पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई मंदिरं वेगळी असल्याने टिपिकल मराठी चित्रपटातील स्किन डीप समस्या आणि अय्या! सोप्पं तर होतं, थोडं समजुतीने घेतलं की सगळ्या समस्या सुटतात असला अतर्क्य आणि गोग्गोड शेवट सुदैवाने करणं अशक्यच. शेवट फार महत्त्वाचा ही नाही. पण त्यापर्यंतचा प्रवास, त्यासाठी वापरलेले अभंग, अनेक तुकारामांचे अभंगच वापरले आहेत. ते वरवर ऐकले तर जो अर्थ अभिप्रेत आहे त्याच्या विपरित प्रसंगी ते वापरुन ध्वनित अर्थ फार खुबीने बदलुन त्यात मजा आणली आहे. असे शब्दांचे, अर्थांचे पदर, बरोबर गाण्यांच्या साध्या सहज चाली, रंगभूषा, पात्रांच्या विचारपूर्वक केलेल्या हालचाली, प्रकाशाचे खेळ, त्यातुन ध्वनित होणारे दिवसांच्या वेगवेगळ्या प्रहरीचे रंग, रुप, पार्श्वसंगीत (बॅकग्राउंड स्कोर), अभिनय... इतके पदर असलेलं मराठी नाटक फार क्वचित बघायला मिळतं. यात उगाच तयार केलेली कौटुंबिक समस्या नाही, टाळ्याखाऊ हशा नाही, खटकेबाज संवाद आहेत काही, गालातल्या गालात हसू येईल अशा जागा आहेत, काही स्टिरिओटिपिकल जागा ही आहेत पण एकुणात बरंच काही चालू आहे, आपली झोळी लहान. त्यात आज किती सामावतंय तितकं सामावून घेऊ. हा वेगवेगळ्या मितींमधला अनुभव समजुन घ्यायला परत बघवंच लागेल असा गोडी अपूर्णतेचा अनुभव घेऊन नाट्यगृहाचा बाहेर पावले पडतात. इंग्रजी चित्रपट बघताना हा अनुभव काही नवा नाही, पण आपल्या मराठी नाटकांत क्वचितच मिळणारा हा अनुभव संगीत देवबाभळीच्या निमित्ताने मिळाला.
यात सगळी गाणी, वादन प्रत्यक्ष नाट्यगृहात रंगमंचावर/ विंगेत होतं. तुकारामांची गाणी सोडली, तर आवली (शुभांगी सदावर्ते) आणि रखुमाई (मानसी जोशी) गाणी रंगमंचावर म्हणतात. ही गाणी पूर्वीच्या संगीत नाटकात 'चला आता माझं गाणं ऐका' आविर्भावात गायलेली असायची अशी अजिबात नाहीत. वेस्टर्न म्युझिकल मध्ये जशी गोष्टीत गाणी गाण्यात गोष्ट असं चालू असतं, सध्या गाणं चालू आहे का संवाद हे अंतर धूसर धूसर होत गेलं की आणखी आणखी मजा येते, इतकंच लक्षात रहातं.
नाटकाच्या फ्रेम्सवर विचार करुन, कपडेपट, रंगमंच्याच्या मागच्या पडद्यावर प्रकाशाने तयार होणारा ग्लो, वापरलेल्या प्रॉप्सचा पोत असं सगळं केल्याने नाटक डोळ्याला ही सूदिंग वाटतं. वरती दिलेल्या शेवटच्या चित्रात त्याची कल्पना येईल.
गाणं गात गात इंद्रायणीच्या पात्रात लुगडं धुणं, त्याचा पिळा बनवणं, त्यात एकमेकांशी संवाद साधणं आणि ते सगळं लयीत सुंदर दिसेल असं करणं. लय पकडणे आणि ती पाळणे हा मला वाटतं सगळ्याचा आत्मा आहे.
लेखन, दिग्दर्शन, गीते प्राजक्त देशमुखची आहेत. निर्मिती भद्रकाली प्रॉडक्शनची आहे. संगीत आनंद ओकचे आहे. नेपथ्य, संकल्पना प्रदिप मुळ्येची आहे. प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षितची आहे. ह्या सगळ्यांची नावं आवर्जुन शोधली कारण सगळी मजा हे सगळे घटक एकत्र काम करताना बघण्यात आहे.
पुण्याला बालगंधर्वला तीन दिवस आधी तिकिटं काढूनही बाल्कनीची तिकिटं मिळाली. प्रयोग अर्थात हाउसफुल्ल होता. मला मजा आली. तुम्ही बघितलं नसेल आणि शक्य असेल तर फुल रेको!
सर्व चित्रे आंतरजालावरुन/ नाटकाच्या जाहिरातींतून साभार.
हो, हे नाटक कायम हाऊसफुल असतं
हो, हे नाटक कायम हाऊसफुल असतं..तिकिटे मिळत नाहीत.
Pages