आपली गोष्ट - वसंताची चाहूल

Submitted by sugandhi on 30 May, 2025 - 23:29

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

दोन्ही मुलं प्राथमिक शाळेत जायला लागली त्या सुमाराला आम्हाला नॅशनल पार्कच्या जंगलांमध्ये भटकायला जायचं वेड लागलं होतं. शाळेचं वर्ष सुरू झालं रे झालं, की सुट्ट्यांचं कॅलेंडर बघायचं आणि सगळ्या सुट्ट्यांना कुठल्या ना कुठल्या नॅशनल पार्कचा प्लॅन करायचा हे आमचं अगदी ठरून गेल्यासारखं झालं होतं. छोटी सुट्टी असेल तर जवळचे पार्क, मधल्या मधल्या आठवड्याभराच्या किंवा मोठया सुट्ट्यांना लांब लांबचे पार्क! माझी आणि प्रमोदची तीन-चार मावस, चुलत भावंड, मित्र मंडळी असा आमचा छानसा ग्रुप जमला होता. आम्हा सर्वांची मुलंही साधारण सारख्या वयाची आहेत. त्यामुळे आमचं वारंवार भेटणं होत असे. कधी आम्ही एकत्र एखाद्या नॅशनल पार्कला जात असू तर कधी घरीच जमून जुने फोटो पाहू, इकडच्या तिकडच्या आपल्या आपल्या ट्रिपच्या गमती जमती सांगू असं आमचं चालत असे.

अस्मि आणि अद्वयचं पाचवी आणि तिसरीचं वर्ग वर्ष चालू झालं, त्या वर्षी उन्हाळ्याची सुट्टी संपता संपता, ऑगस्टच्या शेवटाकडे अलास्काला जायचा प्लॅन केला होता. अलास्का मध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फ असतं. त्यामुळे तिकडे फिरायला जाण्याचा सीजन बराच लिमिटेड आहे. सहाजिकच दहा-बारा महिने आधीच सगळी बुकिंग करावी लागतात. कुठे राहायचं, कुठले नॅशनल पार्क करायचे यावर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप व्हिडिओ पाहिले, चर्चा केली आणि मग हॉटेलची बुकिंग, बोट, विमान राईडची बुकिंग, रेंटल कार एक ना दोन खूप सारे प्लॅन झाले.

पण कधी कधी आपण ठरवतो एक आणि होतं काहीतरी वेगळच! मुलांच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या संपल्या आणि जानेवारी 2020 उजाडला. शाळा सुरू झाली आणि अचानक संपलीच! कोविडचं सत्र सुरू झालं होतं.. शाळा बंद, ऑफिस घरून, अशी सुरुवात झाली तेव्हा वाटलं होतं की हे एखाद्या महिन्यात संपेल. पण मग रोज नवे मृत्यूदर वाचायला मिळायला लागले. हा आजार नक्की कशाने होत आहे आणि कसा थांबवायचा हे समजेना. वॅक्सिन सुद्धा नव्हतं. साथी बरोबर सगळीकडे भीती पसरली. कोणी कोणाला भेटेना. साधं दुकानात जाऊन यायचं म्हटलं तरी तो एक मोठा प्रोजेक्ट व्हायला लागला. मग प्रवास तर फार दूरची गोष्ट! विमान प्रवास जवळजवळ विचारच न करण्यासारखा. जणू आजाराबरोबर हवेत काळजी सुद्धा भरून राहिली होती.

मग हळूहळू व्हिडिओ कॉल व्हायला लागले. ज्यांना खूप वर्षात भेटलो नव्हतो अशा मित्रमंडळींना, नातेवाईकांना फोन व्हायला लागले. एकमेकांची खुशाली, एकमेकांच्या दुःखात सहभाग; प्रत्यक्षात नाही पण मनाने सगळ्यांना जवळ आणत होता. आपण आणि आपले अगदी जवळचे नातेवाईक सुखरूप आहेत हीच किती मोठी गोष्ट आहे हे जाणवत होतं. पण तरीही मन खात होतं. घरामध्ये बांधून पडल्यासारखं झालं होतं.

दुसऱ्या कोणाला भेटता येत नव्हतं पण बाहेर पडणं सहज शक्य होत होतं. तरीही तो नोव्हेंबर महिना थोडा उदासवाणाच वाटत होता. एकदा आमच्या ग्रुप पैकी कुणीतरी "बे एरिया मध्ये दिसणारे फॉल कलर" अशी एक आजूबाजूच्या रस्त्यांची लिस्ट पाठवली. सोबत पानगळ सुरू झालेल्या झाडांचे लाल पिवळे फोटोही पाठवले होते. मग पुढच्या रविवारी सकाळी आम्ही सुद्धा ते रंग बघायला जायचं ठरवलं. त्या लिस्ट मधल्या सगळ्या ठिकाणी फिरलो पण फारसे काही रंग दिसले नाहीत. आधीच रंजीस झालेलं मन अजूनच खट्टू झालं.

घरा जवळ आलो तेव्हा सूर्य डोक्यावर यायला लागला होता. घराच्या दोन चौक आधीच्या वळणावर अचानकच नजर गेली, तर तो रस्ता दोन्ही बाजूच्या झाडांनी पूर्ण पिवळाधम्म झाला होता. गाडी थांबवून आम्ही त्या रस्त्यावर चालत गेलो. आधीच पिवळ्या जर्द झालेल्या रस्त्यावर, ती दोन्ही बाजूची सोनसळी झाडं, वाऱ्याच्या मंद झुळके बरोबर अजून आपल्या पानांचा सडा शिंपत होती. जणू आपल्या उन्हाच्या हातांनी, आम्हाला कुरवाळून ती सांगत होती, "ही कोविडची पानगळ संपली की वसंत ऋतू येणारच आहे..." ते उबदार मऊ उन्ह त्या क्षणी खोल आतपर्यंत झिरपत गेलं. तिथल्या तिथे सगळ्यांना व्हिडिओ कॉल केला आणि आम्ही सगळेच त्या पिवळ्या भंडाऱ्यात माखून गेलो..

घरी निघालो तेव्हा गाडीत रेडिओवर बातम्या चालू होत्या. बातमी होती - नवीन येऊ घातलेल्या कोविडच्या वॅक्सिनची. पानगळ संपली नसली तरी, वसंताची चाहूल लागली होती..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वॅक्सिन आणि वसंताची चाहूल अगदी मार्मिक आहे. तसच झालेलं लोकांना फार ब्लीक वातावरण होतं पण व्हॅक्सिनेशनने मात केली.

छान लिहिलेय.

सगळी स्फुटे वाचतेय. मजा येतेय वाचायला.

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!