तथागताचे शांत हसू!

Submitted by अवल on 28 May, 2025 - 01:57

(बौद्ध धर्मातील वाळू मंडलची अनुभूती)

जगातल्या सर्वात उंच पठारावर
गारठलेल्या समुद्रभूमीतून
जास्तीत जास्त गडद, रंगीत, कठीण रत्न
दिवसोंदिवस वाकून शोधलेली.
अन मग अनेको दिवस त्यांना
खट्ट खरखट्ट करत उखळीत दळलेली
अन तयार झालेली रवाळ, रंगीत वाळू.
हे सर्व करताना आलेले निसर्गभान
आसपासच्या निरव शांततेची जाणीव
वाऱ्याची अन खालच्या नद्यांची गाज
निसर्गाचं आपल्याशी असणाऱ्या
नात्याची जाण.
त्यातून आलेला संयत साधनेचा प्रयास
चिंतन आणि मनन यातून आलेल्या
एकात्म आकृत्या
आणि अंतिम शांततेच्या
त्या उदगात्याचे स्मरण!
अन मग त्या सगळ्यांचे सार उतरवत
विश्व, निसर्ग, मानवी मन याच्या संरचना
भौतिक आकृत्यातून विविध रंगात रचताना
"चक्र पूर" मध्ये रंगीत वाळू भरून
त्यावर तारांनी आघात करत
कर कर कर कर या तालात
त्यांच्या समन्वयातून पडणारी संततधार -
रवाळ रंगीत वाळूची संततधार.
घेत जाते विविध आकार, रंग, आकृती
एक वा अनेकांची तपश्चर्या, साधना
उलगडत जाते लाकडी चवथऱ्यावर
एक विश्व!

आणि मग तो दिवस येतो
पूर्ण होते वालुका मंडल!
उत्कट रचना, अमूर्त शांतता, सशक्त ताकद
रचणारे, बघणारे, वास्तु, आसमंत, सृष्टी...
सर्वच शूचिर्भूत होते; निरोगी होते; पवित्र होते.
बाहेरून, आतून, सूक्ष्मातून
एक सच्चिदानंद संवाद.
करुणा, सहसंवेदना, नश्वरतेची जाणीव
अन वैश्विक उपचार पाझरत राहतात.
सगळे करून टाकतात-
स्वच्छ, सुंदर, तरल, निरभ्र.
विश्वाचे, मनाचे, ज्ञानप्राप्तीच्या मार्गांचे
ध्यान, एकाग्र, चिंतन, अध्यात्म
यांना चालना देत उभे राहते
रंगीत वालुकामय मंडल!

आणि मग येतो तोही क्षण
संपूर्ण मंडलाच्या सर्व त्रिज्यातून
एकत्र येत जातात सर्व दिशा,
सर्व रंग, सर्वमिती, सर्व आकाश.
आणि मध्यात तयार होत जाते
हे निरंग सत्व!
सूचवत जाते विश्वाची नश्वरता
त्याचा सहज, तत्पर, स्वीकार.
अन मग मृतघटिकेत सामावून
आणले जाते पुन्हा नदीच्या तीरावर
तिथल्याच नदी तीरी अर्पण केली जाते
निरंग सत्वाची वाळू.
अगदी तितक्याच निर्लेपपणे, निरपेक्षपणे
जिथून आलो तिथेच संपणे
मोक्ष पावणे!
अन या सर्वांच्या मध्यात
फक्त मंडलाचे जगणे!

काश
काश, असे जगता आले असते तर?
तथागताचे शांत हसू
मग तरळले असते
प्रत्येकाच्याच ओठी...!

---

"चक्रपूर" - फनेल सारखे एक धातूचे साधन ज्यात वाळू भरून रांगोली- मंडल रेखले जाते.
फोटो नेटवरून साभार
images-1.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं सुंदर लिहिलंय....सच्चिदानंद संवाद.
बुध्दाचं स्मित किती सुंदर...
केवढी शांत अनुभुती..

दसा, रुपाली, सामो, रमड सर्वांना धन्यवाद.
इतकी क्लिष्ट, मोठी कविताही वाचली जाते हे मायबोलीवरच होऊ शकतं Happy

कितव्यांदा तरी वाचली ही.. जसे जास्त वाचेन तसे जास्त लयबद्ध होतेय.
^^निसर्गाचं आपल्याशी असणाऱ्या
नात्याची जाण.^^
किती सुरेख असते ही... काश.. ही प्रत्येकाला झाली तर जग खूप सुखी होईल ना????
अवल, खूप वेगळ्या पातळीवर लिहिले आहे... खोलवर भिडणारे...

>>>>>इतकी क्लिष्ट, मोठी कविताही वाचली जाते हे मायबोलीवरच होऊ शकतं Happy
वाचनप्रेमी लोक इथेच सापडतात बाकी बाह्य जगात बरेच जण फक्त सेल्फी घेउन मिरवण्यात धन्यता मानतात - असाच अनुभव आहे.

आबा, धनवंती, शर्मिला धन्यवाद
सामो खरय

खरं तर या कवितेला थोडी पार्श्वभूमी लिहायला हवीय. पण आळस...
शक्य तर ब्लॉगवर पहा. तिथे ऑडिओ टाकला आहे तपशिलासाठी
https://mayurapankhi.blogspot.com/2025/05/blog-post_18.html?m=1

तुझ्या ब्लॉगला भेट दिली. रेकॉर्डिंग ऐकले. आवडले.
एक सुंदर लेख शेअर करते आहे - ३ पिलर्स ऑफ हॅपिनेस
Access to joy is appreciating the magnificence of the temporary.
---------------
युअर मदर & माय मदर - एक मस्त कविताही लगे हाथ ... शेअर केली आहे.

धनवंती Happy
बघते जमलं तर स्पष्टिकरण लिहिते १-२ दिवसात

आवडली, सुरेख आहे. मला बहुतेक कळाली आहे कारण बुद्धाचा प्रवास बऱ्यापैकी माहिती आहे. "बहुतेक" यासाठी की जो लिहितो त्यालाच पुरते कळालेले असते, बाकी वाचक फारतर जवळ जाऊ शकतात. पण बुद्धाच्या साधनेचे टप्पे, आयुष्य आणि आत्मज्ञान याचा प्रवास वाचलेला असल्याने कळालीही व आवडलीही. Happy