२ लेख

Submitted by अंगारकी on 26 May, 2025 - 09:26

हे पूर्वीचे लेख आहेत पण अजुनही माझ्याशी रेझोनेट होतात. किंबहुना, जास्तच.

----------------------------- कामाच्या ठिकाणचे स्नेहसंबंध-----------------------------
केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची. मला भेटवस्तू मिळाली तर मी आनंदतेच पण मी जेव्हा कोणाला भेटवस्तू देते आणि ती व्यक्ती, ती भेट स्वीकारते तेव्हा, त्या व्यक्तीचा आनंद पाहूनच, माझा आनंद द्विगुणीत होतो.
नोकरी करणार्‍या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फयदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात हे जर चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात.
समाजात वावरताना, आपल्या नकळत आपण समोरच्या व्यक्तीला जोखत, मापत असतो, त्याचवेळेला तिचे चांगले गुण आत्मसात करत असतो, वाईट गुणांवर शिक्कामोर्तब करून त्या व्यक्तीचे गुणांकनही करत असतो. खरच आपला मेंदू या सर्व क्रिया एकाच वेळी, भरभर, सुसूत्र रीतीने पार पाडत विधायक कामात गुंतून रहातो ही मोठी नवलाची गोष्ट नाही का?
आज हे सर्व आठवण्याचं कारण आज, एकीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तिने आम्हाला पार्टी दिली वगैरे वगैरे पण त्याहूनही- आज अजून एका मैत्रिणीच्या मुलीला डिसलेक्सिया आहे ही बातमी कळली. अनेक महीन्यांनी ही मैत्रिण ओपन अप झाली. तिचे हे दु:ख ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. पण अर्थात तिला बोलायला तर आम्ही आहोत हाच त्यातल्या त्यात दिलासा. दुसर्‍या एकीला मूलच नाही. तिला हवं आहे पण होत नाही. प्रत्येकीचं काही ना काही.
तर असे हे निकटचे स्नेहसंबंध, अपल्या गरजेचे आणि कामाच्या ठिकाणी सहज रीत्या फलद्रूप होणारे. प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?

--------------------------------------- रिक्तता.... शून्य--------------------------------------
या इंटर्व्ह्यूला मला एक प्रश्न विचारला गेला होता जो मला खूप आवडला कारण तो प्रश्न मला अतिशय "इनसाइटफुल" असा वाटला. प्रश्न हा होता की "तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता?" जसे माणसाचे मित्र त्याच्याबद्दल बरच काही सांगतात त्याचप्रमाणे एखादा माणूस त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करतो हे त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातं असं मला वाटतं.
आपण सगळेच जणं आपापला रिकामा वेळ कोणत्या ना कोणत्या कामांनी, विचारांनी भरून काढत असतो. कोणी नाना व्याप मागे लावून घेतो तर कोणी व्यसने, कोणी चांगल्या सवयी अंगी बाणवतो तर कोणी चिंता करत बसतो. नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे. आणि जो तो आपल्या परीने हा रिकामा वेळ भरून काढत आहे.
क्वचित एखादा अवलिया, संत पुरुष असा निघतो जो की या रिक्ततेला न घाबरता तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो. विशेष काही न करता, तटस्थ अवलोकन करीत तो संपूर्ण जीवन व्यतीत करतो. पण असा महात्मा विरळाच. आपण सामान्य लोक जरा मोकळा वेळ मिळाला की बेचैन होतो आणि स्वतःमागे व्याप वाढवून घेतो.
जशी शांतता ही शब्दाच्या पातळीवरील रिक्तता तसेच मौन हे वाणीच्या पातळीवरील पोकळी. मौनी साधू हे साधना म्हणून मौन पाळतात. उपास ही आहार या पातळीवरील रिक्तता. ती देखील सहजसाध्य नाहीच. संपूर्ण कडकडीत उपास हा कष्टसाध्यच असतो. ध्यान (मेडीटेशन) ही विचारांच्या पातळीवरील शून्यता. ध्यान किती प्रचंड अवघड आहे हे सर्वशृत आहेच.
अशा रीतीने रिक्तता, पोकळी, शून्यता या गोष्टी नगण्य नसून अतिशय कष्टसाध्य आहेत. किंबहुना आपण जर थोडे शांत झालो तर लक्षात येईल आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे. म्हणजे आपलं आयुष्य बघा रिकामा वेळ जो आपण भरून काढतोय, आपलं मन हा कोरा घडा आहे ज्यात आपण विचार ओततोय. आपण मूळात मौन आहोत नंतर आपण शब्द उच्चारत आहोत असं काहीसं.
अवर ट्रु नेचर इज स्पेस .... शून्य!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

// आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे. म्हणजे आपलं आयुष्य बघा रिकामा वेळ जो आपण भरून काढतोय, आपलं मन हा कोरा घडा आहे ज्यात आपण विचार ओततोय. आपण मूळात मौन आहोत नंतर आपण शब्द उच्चारत आहोत असं काहीसं.
अवर ट्रु नेचर इज स्पेस .... शून्य!

अप्रतिम!!! अहा!!

नोकरी करणार्‍या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फयदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य... >>>>
पटलं. मानसिक स्वास्थ्य म्हणजे सुख दुःख, आचार - विचार - आहार ह्यांच्या आदान प्रदानामुळे मिळणारे असेल तर नक्कीच.. तो एक वेगळाच कंपू तयार होतो.. साधारण पुढेमागे असणाऱ्या वयाचे, वेगवेगळ्या स्तरांतून, समाजांतून, प्रांतातून , संस्कृतीतून आलेले लोक, रोज ८-९ एक तास एकत्र घालवतात त्यातून बराच काही शिकायला मिळतं.
फक्त त्याची दुसरी मला जाणवलेली बाजू म्हणजे कॉर्पोरेट मध्ये काम करणारे साधारण सगळे एकाच आर्थिक स्तरातील असतात... ती एक या प्रकाराच्या सामाजभिमुखतेला आलेली मर्यादा वाटते.

*"*

अशा रीतीने रिक्तता, पोकळी, शून्यता या गोष्टी नगण्य नसून अतिशय कष्टसाध्य आहेत.>>> आवडलं!

दोन्ही लेख छान!