टिका वि. सर्वसमावेशकता

Submitted by सामो on 26 May, 2025 - 09:13

पूर्वीचा एक लेख शोधता शोधता हा लेख सापडला. जसाच्या तसा देते आहे.
------------------

अमेरिकेत यायच्या आधी ....
.
आता अशी सुरुवात केली की तुम्ही म्हणाल हं झालं हिचं सुरु अमेरिकेत येण्यापूर्वी आणि अमेरिकेत येण्यानंतर हेच 2 कप्पे आहेत जणू आयुष्याचे. तर खरं तर तसे नाही लग्नापूर्वी-लग्नानंतर, नोकरीपूर्वी-नोकरीनंतर , अमकं पूर्वी-अमकं नंतर असेही कप्पे आहेत. पण तुमच्या मनात चेष्टेचा, टीकेचा सूर येणे साहजिकच आहे कारण तुमची माझी तशी ओळख आहे पण मैत्री नाही. माझी सुखं दु:ख तुम्हाला माहीत नाहीत आणि म्हणूनच माझी विचार करण्याची पद्धत, तसं मला का वाटतं, माझया खरं तर vulnerabilities बद्दल सुद्धा अनभिज्ञ आहात. आणि म्हणूनच पट्टकन judgement पास करण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि हा धागा त्याबद्दलच आहे. की अनोळखी परिस्थितीवर, लोकांवर किती चट्टकन नकारात्मक लेबल्स, जजमेंट्स लादता येतात किंवा पास करता येतात.
.
हां तर अमेरिकेत येण्यापूर्वी मी ही अगदी हीच भाषा बोलता असे जी मी क्वचित आंजावरती ऐकलेली आहे - अमेरिका म्हणजे मठ्ठ लोकांचा देश, अति मांस जन्य पदार्थ खाऊन चरबीचे थर साठविणाऱ्या ओबीस लोकांचा देश. या लोकांना आपल्या जगाव्यतिरिक्त ना कोणाचं भान असतं ना तसे असल्याची खंत. आंजावरती काही जणांनी हेही म्हणताना ऐकलेले आहे की - अमेरिका - ऊठसूठ जंतूनाशक द्रव्य (hand sanitizes ) लावून हाताला क्रीम्स फासणाऱ्या लोकांचा देश. हे जे शेवटचं वाक्य बोललेले लोकं हे नक्की एकदा अमेरिकेची वारी करून परत गेलेले आणि मग आपल्या निरीक्षणातून वाईट तेवढे उचललेले. तर सांगायचा मुद्दा मी ही हीच भाषा बोले. बरोबर पूर्ण अथवा अर्धवट ज्ञानातून टिपलेल्या वाईट बारकाव्यांवरती बेतलेले नकारात्मक विचार.
.
पण या देशात आले आणि हळूहळू इथले लोक कळत गेले. आमच्या पहिल्याच गावामध्ये जोपर्यंत कार विकत घेतलेली नव्हती, तोपर्यंत कार-पुलिंग करून मदत करणारे लोक भेटले तसेच थँक्स Giving ला आवर्जून आम्हा तिघाना घरी बोलावून मेजवानी खाउ घालणाऱ्या शार-टीशा भेटल्या. या लोकांनी ज्यांनी कधीही हे जाणवू दिले नाही की आम्ही परके आहोत. आम्हाला त्यांच्याबरोबर, त्यांच्या गटात, देशात सामावून घेतले. कोणाकोणाचे नवरे चक्क एका रात्रीत बायको-2 मुले सोडून फरार झालेले होते आणि आईने सिंगल पेरेंटिंग करून मुलांना वाढविले होते. काही मैत्रिणींची अति बेढबपणामुळे , खरं तर ऊंचीही अति असल्याने लग्न होत नव्हते. पण त्यांच्या आईने माझी मैत्रीण असल्यामुळे माझ्यापुढे मुलीच्या लग्नाची काळजी बोलून दाखवलेली मला आठवते. ती वेळ जेव्हा मला वाटले अरे ही परदेशी बाईही भारतीय आईसारखीच बोलते आहे, मुलीच्या भवितव्याची काळजी करते आहे. काहीजण एकाकीच होते. बसस्टॉपवरती तर किती जण किती जण भेटले जे फक्त एका स्मितहास्यावरती त्यानी पूर्ण आयुष्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली.किंबहुना जास्तीत जास्त ब्लु कॉलर्ड, गरीब लोक हे बसमध्येच भेटत गेले. साहजिकच आहे.काहीजणी वयाच्या ७० व्या वर्षी नोकरी करताअना पाहील्या कारण काय तर अपार्टमेन्टचे भाडे नाहीतर कोण भरणार, डोक्यावरती छप्पर कसे रहाणार. लोकांच्या वेदना कळत गेल्या आणि हे कळत गेले की आपल्यासारखेच हाडामांसाचे लोक आहेत, सुख-दु:खे आहेत. कदाचित त्यांची दु:खे "विकसित देशातील" दु:खे आहेत पण त्यांच्याकरता ती तितकीच संघर्षमय आहेत.
.
सांगायचा मुद्दा हा की या लोकांच्या vulnerabilities कळू लागल्या आणि त्यांच्याशी मैत्री होऊ लागली, मदतही अर्थात मिळू लागली होती, त्यांच्या मनाचा मोठेपणा कळू लागला होता. मग हे वैचारिक/शाब्दिक आसूड ओढणे, खाजगीत का होईना पट्टकन अविचारी ताशेरे देणे हे कमी होउ लागले. हळूहळू अशी वेळ आली की मुलीच्या ज्या मैत्रिणी ओबिस आहेत त्याच्या बद्दल चक्क काळजी खरंच, खरच काळजी वाटू लागली. स्वतः:ची भावनिक गुंतवणूक झाली. अरे किरा तर आपल्या रियासारखीच आहे, पण ..... ती जर याच गतीने जाडी होत राहिली, तर बिचारीला नाना व्याधी जोडणार, नोकरी कशी मिळणार, लग्न कसं होणार ....वगैरे. (डिस्क्लेमर - नोकरी व लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्ये नाहीत हे जाणून आहे.)
.
म्हणजे एका लक्षात आले की लेबल लावणे हे सोपे असते. याउलट त्या व्यक्तीला, त्या त्या वंशाला , लोकांना जाणून घेऊन, त्यावर विचार करून, जीभेवरती लगाम ठेवून बोलणे हे अवघड असते. कुठेतरी एक फार सुंदर वाक्य वाचलेले होते जे आता आठवत नाही - या अर्थाचे होते - दुसऱ्याला कमी लेखून जो एक वॉर्म ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो, एक जी समाधानाची भावना आपल्याला मिळते ती अतुलनिय असते नाही... तिची तुलनाच अन्य आनंदाशी होऊ शकत नाही. अर्थात हे वाक्य उपरोधिक होते.
.
मला असे नाही म्हणायचे की तुम्ही कोणावरही टीका करूच नका. टीकेचे , constructive criticism चे एक स्वतः:चे अजोड स्थान विश्वात आहे. टीकेमुळे दुसर्‍यात चांगला बदल घडण्याचे chances असतात निदान टीकेमुळ आपण काही गोष्टी नाकरतो आणि स्वत:लाच डिफाईन करत असतो. टिकापात्र व्यक्ती स्वतः: receptive असेल व ती अंतर्मुख होऊन विचार करू शकली तर टीकेचा लाभही होतो. अन्यथा टीका वायाही जाऊ शकते किंवा उलटूही शकते. पण टीका करण्यापलीकडे, एखादी सिच्युएशन जर माणुसकीच्या डोळ्यांनी पहाता येत असेल तर ते उत्तम. judgement पास करणे, सारासार विवेक,नीरक्षीर विवेक हे बुद्धीचे अंगभूत गुणधर्म आहेत, Faculties of intellect हे मान्यच आहे. पण तरीही आमच्यासारखे लोक कदाचित बुद्धी आणि मन यामध्ये पर्याय दिला तर मनाने, विचार करणे जास्त पसंत करत असावेत. म्हणजे बुद्धी अगदी गहाणच टाकावी असे नाही, पण ... या पणचे काय करायचे? मला ही सीमारेषा आखता येत नाही. कधी एखाद्या व्यक्तीला Discriminate करायचे आणि कधी समजुन घ्यायचा आटोकाट प्रयत्न करायचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद राभु व कुमार सर.
---------
अवांतर -
राभु मला धागा आठवत नाहीये पण तू लिहीलयस तुला थंडी भरुन येतेय व कामावरुन घरी जावेसे वाटते आहे. जावे का?
- हा काय प्रश्न झाला? जाच. घरी जाच. वाटेत कोण काळजी घेइल? हे असे प्रश्न पडता कामा नयेत.

सामो, छान लिहिलंयस, आवडलं.

- दुसऱ्याला कमी लेखून जो एक वॉर्म ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो, एक जी समाधानाची भावना आपल्याला मिळते ती अतुलनिय असते नाही... तिची तुलनाच अन्य आनंदाशी होऊ शकत नाही. अर्थात हे वाक्य उपरोधिक होते. >>> :|

खरंय, criticism एक गोष्ट आहे पण emapathy हवी.

एका भारतीय बाईने " ह्या लोकांना काही कळतं का? " असं धडधडीत विधान करून धक्का दिला होता. एक तर ती स्वतः काही तीर मारत नव्हती आणि असं सरसकट सगळेच (गोरे) असे निर्बुद्ध असल्याचं ती कसं म्हणू शकते?

तसंच आजी-आजोबा नातवंड , मुलांच्या भविष्याची वाटणारी काळजी, त्यांच्या आनंदासाठी झटणं ह्या काही गोष्टी वैश्विक आणि कालातीत असतात (जरी पद्धती वेगळ्या असल्या) हेही जाणवले.

>>>>काही गोष्टी वैश्विक आणि कालातीत असतात
होय मग त्यात पेन्शनर्स ही आले. विस्कॉन्सिनमध्ये रोज सकाळी ६:३० वाजता मॅकडॉनल्डमध्ये घोळका करुन गप्पा ठोकणारे आजोबाज आणि पुण्यातले पर्वतीवरील पेन्शनर्स - अगदी काही फरक नाही.
खूपदा तर इथल्य लोकांचे आणि माझ्या लहानपणी अनुभवलेल्या व्यक्तीमत्वांचे मॅपिंग होते चक्क.
खरच कालातित, स्थलातित अनुभव येतो.

लेख आवडला.
अमेरिकेला कधी गेलो नाही, पण जर्मनी/स्वित्झर्लंडमध्ये बरेच साम्य आढळले.
बाहेरचे खाऊन पोट/तब्येत खराब होईल म्हणणारे, चांगल्या आरोग्याच्या पारंपरिक टिप्स देणारे, काटकसरी आणि दुसऱ्याचा पैसा उगाच खर्च झाला की हळहळणारे, गॉसिप करणारे, बघता बघता एखादी छोटीशीच गोष्ट रंगवून वाऱ्यासारखी पसरवणारे, नविन पिढीला नाव ठेवणारे, जुन्या पिढीला नाव ठेवणारे, क्षणात मदतीला धावून येणारे, गर्दीत पाकीट सांभाळ म्हणणारे, सरकारच्या नावे खडे फोडणारे, अमुक वस्तू महागली म्हणुन चर्चा करणारे, जगाचं भलं व्हावं म्हणुन प्रार्थना करणारे.

संस्कृतीत, ऑपचारिकेत भिन्नता तर शिस्त, नागरी जाणिवा यात फरक आढळतो.

सुंदर लेख..!
अंगभूत संवेदनशीलतेने माणसांतले माणूसपण टिपणं तुला छान जमते हे ह्या लेखावरून लक्षात येतेय.

छान लेख...
Criticism वरून आठवलं

सुखाचे रहस्य...

एखाद्याला ऐकूच न येणारी
भाषा ज्याला बोलता येते
तोच फक्त सुखी असतो
असे मोरू मनापासुन मानतो
आणि याचे खरेपण स्वतःपुरते जाणतो

मंगेश पाडगावकर (मोरू)
एक भन्नाट मुक्तक

छान लिहिलंय!
जे सांगायचंय ते अगदी व्यवस्थित शब्दबद्ध झाले आहे 👍

छान लिहिलंय. आवडलं .अमेरिकेतील स्थानिक लोकांच्या व्यक्तिमत्वाचा ऐक वेगळा पैलू खूपच छान मांडलाय . एरव्ही हि बाजू क्वचितच समोर येते.

>>एरव्ही हि बाजू क्वचितच समोर येते.<< +१
कारण बहुतेक लोक इथे अनेक वर्षं राहुनहि आपला उपरेपणा जपण्यात धन्यता मानतात. खरं पहाता इथल्या प्रत्येक भागाचं (साउथ, नॉर्थ, मिडवेस्ट, वेस्ट, पॅसिफिक नॉर्थवेस्ट) स्वतःचं असं कॅरेक्टर आहे. त्या त्या भागाचा रंग अंगावर चढल्या शिवाय तुम्हाला अमेरिका एंजॉय करता येत नाहि..

सामो, छान लिहिलंय. आणि तुम्हि इथे ब्लेंड-इन (नॉट फिट-इन) झाल्याबद्दल अभिनंदन...

>>>>सामो, छान लिहिलंय. आणि तुम्हि इथे ब्लेंड-इन (नॉट फिट-इन) झाल्याबद्दल अभिनंदन...
धन्यवाद राज.

सामो
खूप छान लिहिलंय. प्रत्येक वाक्यावर अगदी अगदी असे झाले.
शेवटी जगभर माणसे सारखीच विचार करतात . . अगदी सासू भेटायला येणार आहे म्हणून चिंतेत असणे किंवा अचानक हाऊस गेस्ट्स येणार , आता दोन दिवस काय स्वयंपाक करू अशा को वर्कर् , यापासून ते काहीच सेविंग होत नसल्याने चिंता करणाऱ्या सिंगल आया, सर्वांचे प्रॉब्लेम्स युनिव्हर्सल. पण ह्यातही माणुसकी जपणारेही अनेक . .
अमेरिकेने कुठल्याच व्यक्तीला जज न करणं शिकवलं . हळूहळू सहज सर्व स्वीकारत गेले . एक वेगळीच दृष्टी मिळाली. जर भारताच्या बाहेर पडले नसते तर मी हे कितपत करू शकले असते यावर मला माझ्यावर शंका आहे .
लेख मस्तच .

धन्यवाद आरती. खरे आहे जश्या माझ्या भवतालच्या कक्षा रुंदावल्या तश्या माझ्या मानसिक विकासाच्याही. पुस्तक वाचनामुळेही अगदी हेच होत असते. नवीन जग कळते. आणि आपला संकुचित दॄष्टीकोन विशाल व्हायला मदत होते.

उसनी मतं घेतली की आपण खरे टीकाकार होत नाही. आपल्याला आलेल्या अनुभवांतून टीका केली पाहिजे. पूर्वग्रहही चुकीचे ठरू शकतात.
लेख पटतोय.

टीकेचे स्थान आहे. आईच्या लाडाचे जसे स्थान असते तसे कटु बोलाचेही Happy किंबहुना सम ऑफ बेस्ट ऑफ माय फ्रेन्डस वेअर ट्रु क्रिटिक.
शरदजी धन्यवाद.

सामो छान लिहिलयस मनापासून Happy
लोक जगाच्या पाठिवर कुठेही जा. काही व्यक्ती साम्य, लकबी, सवयी सारख्या सापडतातच Happy गोंडस आजोबा, जीव तोडून माया लावणारी एखादी आज्जी. पोराला खांद्यावर घेऊन मेळा दाखवणारा बाप..वगैरे.
मला ही सिंगापूर बद्दल लिहावंस वाटतंय पण वेळ मिळत नाही, शिवाय इतकं छान रंगवून लिहिता येत नाही.
इथले लोक फिटनेस्स बद्दल प्रचंड जागरूक आहेत. शिस्त अंगी इतकी बाणलेली आहे की बस्स. ओबीस मुलं , लोक आहेत पण खूप कमी. ह्या चायनीज लोकांच्यात सिंगल राहणे हे प्रमाण प्रचंड आहे, कारणे अनेक असावीत. इथल्या स्त्रिया खूप स्वतंत्र आहेत, फुकटचा मेल ईगो खपऊन घेत नाहीत, फिटनेस, मेक उप, स्कीन केयर यात खूप खर्च करतात, सोबतच खणे पिणे बिलस, मुलांच्या ट्युशन्स, शाळा ह्यांवरही.
स्त्रिया पुरुषांच्या २ वर्ष पुढे असतात, कारण १२ वी नंतर प्रत्येक मुलाला आर्मीत जावेच लागते. सेम बॅच मुली पुढे निघून जातात. मग जास्त पगारावाल्या मुली कमी पगार मुलाला सहसा स्वीकारत नाहीत.
गोव्हरमेंट युथ नी लग्नं करावीत यासाठी काय काय प्रोग्राम्स आखत असतं..

आशु लिही ना. तुझ्या प्रतिसादातून, सिंगापूर, खूप कळतय की. नक्की मनावर घे लिहायचं.
>>>>शिवाय इतकं छान रंगवून लिहिता येत नाही.
असं बोलू नकोस. श्रीगणेशा कर. करच.

>>अमेरिकेने कुठल्याच व्यक्तीला जज न करणं शिकवलं .

+१ आरती.

सामो, लेख नेहमीप्रमाणेच मस्त व पटलाच.

>> इथले लोक फिटनेस्स बद्दल प्रचंड जागरूक आहेत. शिस्त अंगी इतकी बाणलेली आहे की बस्स. ओबीस मुलं , लोक आहेत पण खूप कमी.

आशू२९ प्लीज सिंगापूरबद्दल नक्की लिहाच अशी नम्र विनंती.
जगातल्या ब्ल्यू झोन्समध्ये सिंगापूरचा समावेश झाल्यापासून सिंगापूरबद्दल आणखी जिव्हाळा निर्माण झाला आहे.

छान लिहिले आहेस. Happy
बरेच अनुभव आलेत असे. माणसं प्रत्यक्ष जरी रंग, भाषा, धर्म आणि संस्कृतीमुळे वेगवेगळी दिसली तरी आतून कुठेतरी आपल्यासारखीच असतात असं मत आता थोडंफार जग बघून बनलंय. त्यामुळे बऱ्यापैकी समानदृष्टी आली आहे.