आपली गोष्ट - मिमीची शौर्यगाथा

Submitted by sugandhi on 24 May, 2025 - 10:26

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

शनिवारी सकाळी आरामात उठून, किचन मधल्या छोट्या स्क्रीनवर एखादी ओळखीची जुनी मूव्ही लावून, एकत्र गप्पा मारत साग्रसंगीत स्वयंपाक करणं हे माझ्या आणि प्रमोदच्या आवडीचं काम आहे. त्या दिवशी सुद्धा आम्ही "चुपके चुपके" मूवी लावून, किचनमध्ये वावरत होतो. हवेत छानसा गारवा होता. खिडक्या उघडून टाकल्या होत्या. बाहेरून येणाऱ्या झुळूकेबरोबर संत्र्याच्या फुलांचा मंद वास येत होता. प्रमोद वेलची कुटून फिल्टर कॉफी लावत होता आणि मी कांदा-टोमॅटो भाजून वाटप करत होते.

आणि अचानकच प्रमोद थबकला. "काय रे?" असं मी विचारेपर्यंत दार उघडुन तो बाहेर धावत गेला सुद्धा! मिक्सरचा आवाज आणि शर्मिलाचं "अबके सजन सावन मे.." यामध्ये मला बाहेरचा मांजरांच्या भांडणाचा आवाज ऐकूच आला नव्हता. हात धुवून मी बाहेर गेले, तोपर्यंत प्रमोदने भांडण सोडवलं होतं. सोडवलं म्हणजे अक्षरशः सोडवलं - एक पांढरा आणि एक केशरी असे दोन फरचे बॉल एकमेकांच्या अंगावर जाऊन झालेला एक मोठा बॉल त्याने मोठ्या मुश्किलीने सोडवला. मग रॉन फिसकारून पळून गेली आणि मिमी आमच्या गाडीखाली जाऊन बराच वेळ जोर जोरात रागाचे आवाज काढत बसली. खूप वेळ बाबा पूता करून, ट्रिट दाखवून मी मिमीला घेऊन घरात आले तेव्हा सुद्धा ती चांगलीच रागावलेली होती. अजूनही तिच्या अंगावरचे सगळे केस उभे राहिले होते आणि शेपूट खारी सारखी फुललेली होती.

घरी आल्यावर मिमी सरळ अद्वयच्या बेड खाली जाऊन बसली. मीही विचार केला, तिला कशाला आत्ता त्रास द्या, बसू दे बेड खाली. दुपारची जेवणं वगैरे झाल्यावर मी शांतपणे बेड जवळ जाऊन बसले. सहसा मी एकटी बसले आहे असं बघून मिमी लाडाने मांडीत येऊन बसते. पण आज काही ती येईना. मग मात्र मी तिला जरा जबरजस्तीनेच उचलून घेतली. तिच्या उजव्या कानाला थोडं लागलं आहे एवढं मला समजलं, पण ती अजिबातच स्वस्थ हातात राहायला तयार नव्हती. मला वाटलं चाटून करेल ती बरं स्वतःला. टमी सुद्धा चाटेल तिला. थोड्यावेळाने टमी आली. पण मिमी तिलाही मुळीच जवळ येऊ देईना. टमी अगदी कावरीबावरी झाली. आता मलाही अस्वस्थ वाटायला लागलं. पण डॉक्टरांची नेहमीची वेळ संपली होती. आम्ही एक दिवस थांबून काय होतंय ते पहायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा मिमी आम्हाला कुणाला तिच्या जवळ येऊ देत नव्हती. मग मात्र आम्ही तिला कशीबशी कॅरियर मध्ये घालून डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथेही ती कुणाला हात लावू देईना. कधी नाही ते ती नखं बाहेर काढून पंजा मारायला लागली, तेव्हाच डॉक्टर म्हणाले की तिला बरंच लागलं असावं.. मग डॉक्टरांनी आणि अजून एका नर्सने मिळून तिला धरून तिची जखम साफ केली, औषध लावलं आणि तिने जखम खाजवू नये म्हणून तिच्या गळ्याभोवती एक प्लास्टिकचा कोन घातला. ते म्हणाले, "कान फाटला आहे. नाजूक असतो मांजरांचा कान. जखम भरून नाही आली तर सर्जरी करावी लागेल.."

बिचारी मिमी! कुठे शूरवीरपणा करायला गेली आणि काय होऊन बसलं! दर एक दिवसाआड डॉक्टरांकडे जाऊन तिची जखम साफ करून घ्यायला लागत होती. सुदैवाने सर्जरी मात्र करावी लागली नाही. हळूहळू आठ दिवसात जशी जखम भरून आली, तसा मिमीचा तापटपणा जाऊन शिष्टपणा परत आला आणि माझ्या जीवात जीव आला. आता मानेभोवतीच्या कोनसकट मिमी, फराफरा आवाज काढून, चाटण्याच्या हेतूने खुळ्यासारखी जीभ हलवत बसे. ते बघून आम्हाला जरा करमणूकच होत होती. हे सगळं प्रकरण आता बोचरं न राहता विनोदी झालं होतं...

पंधरा दिवसांनी गळ्यातला कोन काढून टाकल्यावर, आता मिमी परत बाहेर जायला लागली. "चला बाई, आता तरी मिमीला bravery आणि stupidity मधला फरक चांगला समजला असेल!" असं मी म्हणते आहे, तोच बाहेरून मांजरांच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आम्ही चटकन बाहेर जाऊन बघितलं, तर आपली शूरवीर मिमी शेजाऱ्यांच्या अंगणात ऊन खात पडलेल्या, स्वतःच्या दुप्पट आकाराच्या रॉनच्या अंगावर धावून चालली होती!! सुंभ जळला तरी पीळ जळला नव्हता..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मांजर ही फार high attitude प्रजाती आहे हे ( परत एकदा) पटले.. माऊ पालक म्हणून हे भांडण सोडवणे हे महत्वाचे काम असते.
गोष्ट आणि चित्र खूप छान...