रॉक बॅलन्सिंग आर्ट - लगोरीचे अपग्रेड वर्जन

Submitted by कविन on 7 May, 2025 - 22:40

गेल्या महिन्यात मी एक वर्कशॉप अटेंड केले. रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप
रॉक बॅलन्सींग म्हणजे एकावर एक दगड रचून साधलेला बॅलन्स. आपण लहानपणी लगोरी खेळलोय ते आठवतय? एक प्रकारचे रॉक बॅलन्सिंगच ते देखील. पण तिथे एक उतरंड होती. आता जो प्रकार शिकायला गेले होते तिथे असा क्रम असायलाच हवा असे बंधन नव्हते.
एका ओळखीच्या व्यक्तीच्या वॉलवर रॉक बॅलन्सिंगचे फोटो बघून उत्सुकता चाळवली आणि हे वर्कशॉप घेणाऱ्या व्यक्तीला शोधून फेसबुक मेसेंजर वरुन सरळ मेसेजच केला आणि मग तिथून त्याच्या व्हॉट्स ॲप ब्रॉडकास्ट गृपवर दाखल झाले.
त्याने कामशेत जवळच्या वर्कशॉपची घोषणा केली आणि ताबडतोब संधीचा लाभ घेत मी नाव नोंदवून मोकळी झाले.

असे वर्कशॉप घेणाऱ्या गौतम वैष्णव नावाच्या अवलिया विषयी थोडे सांगते. आत्तापर्यंत ६०००+ लोकांना त्याने ही कला शिकवली आहे.
गौतम दगड बॅलन्स करता करता कॉर्पोरेट इव्हेंट मधे mindfulness चे धडे देतो आणि शाळेत वर्कशॉप घेतो तेव्हा हेच दगड एकाग्रता वाढीसाठी कसे मदत करतील हे विद्यार्थ्यांना समजावतो. आमचे वर्कशॉप झाल्यावर पुढल्या विकांताला त्याचे अंध मुलांसाठी स्पेशल वर्कशॉप होते.
मुळात हे असे काही असते आणि त्याचे वर्कशॉप घेतले जाते हेच मला योगायोगने समजले. मी अटेंड केले ते वर्कशॉप पूर्ण दिवसाचे होते आणि ते कामशेत इथल्या शांबाला रिसॉर्टवर होते. पण तो काही ठिकाणी कॅफेमधे दोन तासांची वर्कशॉप्स देखील घेतो.
आमचे वर्कशॉप दोन सत्रात होते. जेवणाच्या आधीच्या सत्रात त्याने थोडे टेक्निकल मुद्दे समजावले. बॅलन्स साधण्यासाठी तीन पॉईंट्स कसे शोधायचे, ॲंगलचा विचार कसा करायचा वगैरे वगैरे थोडे थिअरी सांगत थोडे प्रॅक्टिकल करुन घेत समजावले.

सुरवातीला साधे सोपे दगड एकमेकांवर रचायला दिले. गरज पडेल तिथे (म्हणजे ती पावलो पावली पडत होती सुरवातीला) हात धरुन गिरवायला शिकवावे तसे समोर करुन दाखवत शिकवले.
साधे सोपे दगड लावणंही सोपे काम नाही हे पहिल्या सत्रात अनुभवले. कधी पटकन यश तर कधी किती वेळ प्रयत्न करुनही एक बॅलन्स काही जमेना अशी परिस्थिती होती.

"मोबाईल हातात घ्यायचा नाही आणि इतरांचे काय चाल्लेय याकडे ढुंकूनही बघायचे नाही" या त्याच्या सुचनांचे पालन करत प्रत्येक जण तिथे दगडांबरोबर काय तो प्रवास करण्यात मग्न होता.

दुसऱ्या सत्रात मात्र त्याने दगडांना आणि आम्हाला मोकळे सोडले. दुसऱ्या सत्रात काठीण्य पातळीही वाढत गेली. एक जमलं की त्याहून कठीण दगड तो हातात आणून द्यायचा. एक टप्पा पार केल्यावर मग त्याने हातात वीट दिली
वीट हातात देऊन जेव्हा गौतमने आम्हाला विचारलं की ही वीट या एका टोकावर खालच्या दगडावर बॅलन्स करणे शक्य आहे का? तेव्हा पटकन हो म्हणायला जीभ काही रेटेना. पण गौतम विचारतोय म्हणजे हे होत असणार असेही मन सांगत होते. म्हंटल करुन बघूया प्रयत्न. पहिला दुसरा करत बरेच प्रयत्न फोल ठरले. अगदी जमलय वाटता वाटता पण फिस्कटले. पण तो म्हणाला, “प्रयत्न सोडू नका, लक्ष संपूर्ण वीट आणि दगडावर द्या.” मनात येणारे इतर विचार बाजूला सारुन तो म्हणाला तसे सगळे केले. तो म्हणाला, “वीट कुठे बॅलन्स होईल हे ती वीटच सांगतेय ते ऐका.” तर वीटेचे म्हणणे ऐकायला जीवाचे कान केले म्हणजे ती कुठे झुकतेय? कुठे पाय रोवल्यासारखी पकड जाणवतेय, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला.
आणि एक क्षण असा आला की वीटेचे सांगणे आम्हाला एकदम व्यवस्थीत कळले आणि ती बॅलन्स झाली.
 “जमत नाही ते जमलं” एका क्षणाचं अंतर होतं पण ते पार करायला काहींना ५, काहींना १० तर काहींना १५-२० मिनिटे लागली होती. प्रत्येकाने आपापल्या गतीने तो टास्क पूर्ण केला पण दुसऱ्याकडे लक्षच द्यायला मनाला वेळच नसल्याने प्रत्येकाने आपापल्या यशाचा आनंद १००% अनुभवला.
वर्कशॉपमधे बेसचा दगड हलू नये म्हणून त्याने आम्हाला एक लाकडी सांगाडा दिला होता. तो त्याने स्वत: डिझाईन करुन घेतला आहे. आम्हाला बेसचा दगड देतानाही सुरवातीला बऱ्यापैकी खडबडीत दगड दिला होता. दुपार नंतर जसे आम्ही लेव्हल पार करत गेलो तसे मग या बेसच्या दगडातही जरा कमी खडबडीत ते बऱ्यापैकी सपाट दगड हातात दिले गेले. त्याला विचारले तर तो म्हणाला आता त्याचा इतका सराव झालाय की त्याला कोणताही पृष्ठभाग वर्ज्य नाही. त्याने किती प्रयोग केलेत हे बघायला त्याचे इंस्टाग्राम प्रोफाईल बघाच एकदा. आपण आss वासून बघतच राहू. आम्ही आत्ताशी बेसिक लेव्हल वरच धडपडत छोट्या यशात आनंद मानतोय.
तसेही दगडावर दगड बॅलन्स करण्याचे कसले आलेय वर्कशॉप? ते ही फी भरुन? आणि काय मिळणार ते शिकून? करायच काय पुढे त्या रचनेचं? याबद्दलचे कोणतेही प्रश्न माझ्या मनात येण्यापुर्वी आणि इतरांनी ते विचारण्यापुर्वी मी नाव नोंदवून वर्कशॉपला गेले ते एक बरे झाले. कारण परत आल्यापासून अशा सगळ्या प्रश्नांना सामोरे जातेय. काही गोष्टी अनुभवण्याच्या असतात फक्त. त्या का करते हे कळायला ती तल्लीनता, ती झिंग अनुभवावीच लागेल. नाहीतर मी कितीही काही सांगितले तरी ते तोकडेच ठरेल.
दगड काही कायमस्वरुपी बॅलन्स होत नाहीत. रचना केली, तिचा आनंद घेतला आणि ती मोडून पुढची रचना करायला सुरवात केली इतके साधे सोपे होते हे. Mindfulness practice, meditation अशी भारदस्त नावे द्या किंवा let go करायचा पाठ, never give up चा पाठ शिकवणारी कला म्हणा याला. माणसाच्या फिलॉसॉफीकल जगात याला कशाशी जोडता याच्याशी दगडाला देणे घेणे नाही पण म्हणून त्यातून माणसाला त्याच्या जगात जगायला पूरक अशा बऱ्याच गोष्टी दगड शिकवून जात नाही असेही नाही. 
एकाग्रता, संयम, never give up attitude, let go of things, mindfulness practice हे सगळे ही कला as a by product तुम्हाला मिळवून देते. मुख्य काय मिळते? तर आनंद. 
प्रत्येक दगड वेगळा, त्याला बॅलन्स करताना करावा लागलेला विचार, प्रयत्न वेगळा त्यामुळे ‘जमत नहीये ते जमलं’ हा प्रवास दरवेळी नवीन गोष्ट शिकण्याइतका नवा आनंद देतो. 
सध्या तरी साध्या सोप्या रचना करण्यापुरतेच थोडेफार जमतेय पण गौतम वैष्णवच्या कलाकृती बघून यात किती काय करता येते हे कळते. तितका टप्पा पार करायला जमेल न जमेल. कदाचित त्याच्या इतका ध्यास घेतला तर कुर्मगतीने का होईना कधीतरी जमेल नक्की. तितके नाही जमले तरी कुठे बिघडले? जे जमतेय त्यातूनही जो आनंद मिळतोय तो कुठे कमी आहे? आणि बाय प्रॉडक्ट्स म्हणून फिलॉसॉफिकल धडे मिळतात परत परत गिरवायला तो बोनस फॅक्टर आहेच या प्रवासात मिळणारा. आता हा प्रवास वर्कशॉप बाहेरही सुरुच रहाणार आहे. इतका काळ खिजगणतीतही नसलेल्या रस्त्यावरच्या दगडांनीही लक्ष वेधून घ्यायला सुरवात केली आहे. 
गौतम वैष्णवचा संपर्क क्रमांक +91 97621 24690
त्याचे इंस्टाग्राम प्रोफाईल : @GAUTII009

InShot_20250507_224739577.jpgInShot_20250507_224448833.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिल आहे.
रॉक बॅलन्सिंग बद्दल नेहमीच उत्सुकता होती.
आज ते सविस्तर कळलं

अमेझिंग!

रॉक बॅलन्सिंग बद्दल कसं करायचं ते थोडंफार कळलंच पण आज ते का करायचं ते ही समजलं.

मस्त.
हे करणंच नव्हे, असं वर्कशॉप प्रत्यक्ष अटेंड करणं सुद्धा छान अनुभव असावा.

खूपच छान
दगड रचण्याची process intersting असणारे.
चुकत चुकत शिकणे
एकाग्रता
तू म्हणालीस तसं दगड काय म्हणतो हे ऐकणे
मजेदार असणार.
.
भारी

कुठेतरी पिकनिकला गेल्यासारखे जाऊन असे वर्कशॉप्स अटेंड करणे हा छान अनुभव असेल.
प्रत्यक्ष या कृतीत किती आनंद येत असेल हे तर तो आनंद घेतल्यावरच समजेल.
पण लिहिले खूपच छान शब्दात. त्यांना हा लेख पाठव. जाहिरात म्हणून वापरता येईल इतका भारी झालाय.

बाई दवे, मला लगोरी नाही तर झेंगा आठवला.

Wow
मस्त ओळख आणि हा अनुभव फारच छान असेल.
तू केलेल्या balancing कलाकृती देखील सुंदर आहेत

धन्यवाद Happy

हर्पा, बरं राहिली लगोरी बाजूला Proud आपण बॅलन्सिंग आर्त्तच म्हणू म्हणजे त्या दगडांनाही भारी वाटेल Proud

ऋन्मेष, झेंगा काय असतं?

Srd, नक्की बघा करुन. दगड हट्टी झाले तर आपण दहा हट्टी व्हायच मग Lol पण ठीक आहे आपण प्रयत्न करुन बघायचा त्यातूनही नाही लागला तर परत प्रयत्न करायचा Proud असं आम्हाला त्याने ऐकवलं होतं Lol

येस्स हे प्रकरण इतकं इटरेस्टिंग आहे की मी हल्ली येता जाता खाली मान घालून चालायला शिकलेय (दगड बघत) Lol

Welcome back to writing on maayboli..
आता लेख वाचायला घेते Happy

हायला कवे, मी हे आधी कुठे बघितलंय यांचा विचार करत होते.... तेव्हा आठवलं WA वर या गौतम वैष्णवचा व्हिडिओ बघितला होता. अमेझिंग आहे.आणि तू या वर्कशॉपला जाऊन आलीस म्हणजे 1st hand एक्सपिरीयन्स मिळाला म्हणायचा.
मला आवडेल अशा प्रकारचं वर्कशॉप अटेंड करायला.
जेंगा/झेंगा एक गेम आहे. मला के ड्रामा मुळे कळला.

झेंगा - लाकडी ब्लॉक्स रचून त्यापासून टॉवर बनवणे.
टॉवर न पाडता एका वेळी एक ब्लॉक काढणे ( structure gets weaker and it falls at some point- balance is delicate) , मग काढलेला ब्लॉक टॉवरच्या वर ठेवा.

https://www.amazon.ca/Hasbro-A2120E180-Classic-Jenga/dp/B00ABA0ZOA

Pages