आपली गोष्ट - माझं लेकरू आणि मांजरु

Submitted by sugandhi on 2 May, 2025 - 10:23

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

हा माझा लेक - अद्वय. मिडल स्कूल मध्ये आहे. माझ्या जीवाचा तुकडा आहे. अगदी लहान होता ना, तेव्हा माझ्या मागे मागे रांगायचा. संध्याकाळी त्याला आणायला गेलं की नुसती आई दिसली म्हणून तोंड पसरून हसायचा.
आता माझं लेकरू मोठं झालं आहे. जरा जरा angry young man झालं आहे. आता त्याला लहानपणी सारखं कुस्करता येत नाही. पण मी त्यासाठी एक सोल्युशन काढलं आहे. माझ्याकडे दोन मांजरं आहेत - पांढरी मिमी आणि काळी पांढरी लठ्ठ - टमी! मिमी आणि टमीला मी मनसोक्त कुस्स्करु शकते. माझी मांजरं म्हणजे कायम दोन वर्षाचं राहणार मूल आहेत. म्हटलं तर माझ्या मागे मागे असतात, पण इंडिपेंडेंट पण आहेत. आपली आपली एक दोन दिवस राहू सुद्धा शकतात.

माझी सकाळ म्याऊ म्याऊच्या अलार्म ने होते. मांजरांना सकाळी मी बाहेर सोडते. आमचं घर एका ओढ्यापाशी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेला बाहेर रान कुत्रे वगैरे असतात. आपलं मांजर त्यांच्या तोंडचा घास होऊ नयेत म्हणून त्यांना घरी सुद्धा यायला शिकवलं आहे. त्यांना शिकवलंय की खाऊच्या भांड्याचा आवाज झाला की धावत घरी यायचं. रोज संध्याकाळी काळोख व्हायच्या आधी आम्ही त्यांना घरी बोलवतो.

सहसा संध्याकाळी बोलवायच्या आधीच मांजरं घरी येतात. पण क्वचित कधीतरी - आली लहर केला कहर! काल तेच झालं. संध्याकाळी खिडकीत नाचून गेलं मांजर, पण घरी काही येईना. एक भला मोठा उंदीर तोंडात घेऊन पळत पळत गेली कंपाउंड वरून. म्हणजे आता खाऊच्या मिषाने यायचा प्रश्नच नव्हता. अंधार पडायला लागला. खायची थाळी वाजवली, हाका मारल्या, बाहेर जाऊन ट्रीट चा आवाज केला. बाहेर दोन तीन फेऱ्या पण मारल्या. पण आज बहुतेक बाईसाहेब night out चा plan करत होत्या. शेवटी मी झोपायला जायचं ठरवलं. अद्वय च्या
खोलीत अजून दिवा चालू होता. त्याला म्हटलं - "अद्वय, अरे टमी नाही आली अजून, तुझी खिडकी उघडू का? दिसेल तरी तुला, आली तर?"
"नको ना, मला नाही आवडत खिडकी उघडी ठेवायला - तशीही काळोखात ती काई दिसणार नाही मला" - तो कुरकुरला. मला जरा वाईटच वाटलं. लहानपणापासून टमी कायम याच्या पाठी पाठी असते. तो पण किती खेळायचा तिच्याशी! आणि आता त्याला तिच्यासाठी खिडकी पण उघडी ठेवायला नको? कुठे गेलं माझं सेन्सिटिव्ह लेकरू??
माझ्या खोलीत जाऊन पडले खरी, पण झोप लागेना.
तितक्यात बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला - आणि अस्मीची - माझ्या लेकीची आरोळी आली - "आई, टमी आली! अद्वय थांबला होता ग तिच्यासाठी, तिने पण बरोबर त्याच्या खिडकी बाहेर म्याँव केलं आणि त्याने तिला लगेच आत घेतलं! झोप आता शांतपणे!"
मला एकदम शांत वाटलं, डोळे जड झाले आणि सुखाची झोप लागली - माझं मांजरु आणि लेकरू दोन्ही एकदमच सापडले होते मला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you, पहिल्यांदाच लिहिते आहे. तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं