
रेल्वे इंजिनाच्या कर्कश्य भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला. डोळे किलेकिले करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली, रेल्वे कोणत्यातरी स्टेशनवर थांबली होती. रॉबिनने फलाटावर पाहिलं तर फलाटावर जास्त गर्दीपण न्हवती, तरीसुद्धा रेल्वेने हा थांबा का घेतला असं वाटून रॉबिन चरफडतच व्यवस्थित उठून बसला. अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणी शरीराला आळोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली. रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते. रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले न्हवते. त्याच्या सीटच्या विरुद्ध असलेल्या सिंगल सीटवर मात्र एक तरुण आणी त्याच्या समोर एक वयस्क बाई बसलेली होती. तो तरुण कसलतरी पुस्तक वाचण्यात मग्न होता, तर ती वयस्क बाई हातात जपमाळ घेऊ पुटपुटत बसली होती. रेल्वे फलाटावर थांबली असल्याने थोड्या वेळातच काही तुरळक प्रवासी डब्यात चढले आणी जिथे जिथे रिकाम्या जागा होत्या तिथे जाऊन विसावले. दोन लोक रॉबिनच्या समोर असलेल्या लांब आडव्या बाकावर बसले, तर एक विवाहित जोडपे स्वतःला सावरत रॉबिनच्या शेजारी येऊन बसले.
प्रवासी रेल्वेमध्ये चढल्याने आता डब्यातील रिकाम्या जागा त्या प्रवाशांनी बसण्यासाठी बळकावल्या. समोरच्या सीटवर प्रवासी आल्याने आता मस्तपैकी पाय मोकळे सोडून झोपता येणार नाही या विचाराने रॉबिन जरासा निराश झाला. तेवढ्यात रेल्वेने परत एकदा कर्कश्य आवाजात भोंगा वाजवला आणी एका हलक्याश्या धक्क्याने रेल्वे सुरु झाली. आता निवांत झोपता येणार नसल्याने रॉबिनने जवळची शाल घडी करून सीट खाली ठेवलेल्या पिशवीत ठेवून दिली. पिशवीत शाल ठेवताना बाजूच्याच कप्यात ठेवलेलं टपालपत्र रॉबिनच्या नजरेस पडलं. पत्र आधीच वाचून झालेलं होतं तरीसुद्धा विचारांना काही अधिक चालना मिळते का ते पाहण्यासाठी रॉबिनने ते पत्र पिशवीच्या कप्यातून बाहेर काढलं आणी आतील मचकुरावरून नजर फिरवू लागला...
प्रिय रॉबिन,
“खरंतर बरेच दिवसांनी तुला पत्र लिहतोय. तुला पत्र लिहावे कि न लिहावे, बऱ्याच दिवसांनी या म्हाताऱ्याने कशी काय आठवण काढली असं तर तुला वाटणार नाही ना? या विवंचनेत असतानाच मंडळींनी आग्रह केला म्हणून मग धीराने तुला पत्र लिहायला बसलो. तुला मी तुझा लहानपणापासून ओळखतो म्हणूनच तुझा बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे. तुझा वडिलांनी मला माझा पडत्या काळात भरपूर मदत केली. नोकरी मिळवून दिली. माझ्या संसाराला बळ मिळालं. काही काळ शहरात काम करून मग करमेनासे झाले मग गावाकडे आलो.
पडीक असलेली शेती परत नीट करून राबू लागलो. तुझे आई वडील गेल्याचे कळल्यावर मी आणी मंडळी ढसाढसा रडलो, मिळेल त्या गाडीने त्यांच्या अंतिम दर्शनाला आलो. तुला शेवटच बघितल ते तिथेच. तुझ्या गुप्त्हेरी कामांचे किस्से वर्तमानपत्रात अधून मधून वाचायला मिळतात. उर अभिमानाने भरून येतो. जात्याच खूप स्वाभिमानी असल्याने मानलेल्या वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती दान करून स्वतःच नशीब तू स्वतः आजमवायला चाललेला पाहून ऊर भरून आला आणी मलासुद्धा देवाने निपुत्रिक न ठेवता तुझासारखाच मुलगा द्यायला हवा होता असं वाटून गेलं. असो.
इथल्या परिस्थितीचा तुला संदर्भ कळावा म्हणून काही गोष्टी लिहीन. गावाकडे आल्यावर मी शेती करत होतो उत्पन्न जास्त न्हवत, जेमतेम खायला मिळायचं. असं चालू असतानाच गावातील एक मोठे असामी जगदीश शेंडे यांचाकडे मी कामाला लागलो. शेंडेंचा माझावर विश्वास असल्याने मला त्यांनी घरकामात मदत म्हणून ठेवून घेतलं, चांगला पगार देऊ केला. मी त्यांची पडेल ती कामे करतो. शेंडेसाहेब हे मोठे प्रस्थ आहेत वडिलोपार्जित संपत्ती बरीच आहे, बरेच धंदे आहेत, तसेच एक पतपेढी देखील आहे. चांगली शेती वाडी आहे, घरे आहेत. शेंडे साहेबांचा स्वभाव देखील चांगला आहे पण सध्या त्याचं लक्ष थाऱ्यावर नाहीये. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी गावापासून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर एक बंगला विकत घेतला. त्याची चांगली डागडुजी केली. पण त्या नंतर अचानक भलतेच घडले. रात्रीच्या वेळी बंगल्यातून चित्रविचीत्र आवाज येऊ लागले. संध्याकाळच्या वेळी खिडकीमध्ये एक बाई केस मोकळे सोडून खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून रस्त्याकडे पाहत असलेली बऱ्याच जणांनी पाहिली. लोकांच्या अफवा असतील वाटून शेंडे साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर मी सुद्धा एकदा रात्री असंच तिथून जाताना बाईच्या मोठमोठ्याने हसण्याचा आणी गाणे गुणगुण करत असल्याचा आवाज आला. मला शंका आल्याने मी आत बंगल्यात जाऊन पहिले, तर भयाण शांतात होती, एवढ्या मागच्या खोलीतील एक दरवाजा धाड्कन आदळला, आणी ऊss असा कोल्हेकुई केल्यासारखा आवाज आला. मी घाबरून तसाच तिथून पळत आलो. शेंडे साहेबांनी सुद्धा असाच अनुभव घेतला. तेव्हापासून सगळे त्या बंगल्याला भूतबंगलाच म्हणून लागले. एवढे कमी होते कि काय म्हणून शेंड्यांच्या राहत्या घरात एकदा एका भिंतीवर रक्ताने “मी आले आहे” असं वाक्य लिहिलेलं दिसलं. शेंडे कुटुंबीय भयाने कंपितच झाले होते, पण मी त्यांना धीर दिला. नंतर काही दिवसांनी त्याच्या घरात बेडरूम मध्ये समान इतस्त विखुरलेलं दिसलं. कपाटाचे कप्पे उघडे होते, कागदपत्रे विखुरली होती. आम्हाला तर काही कळेनासे झाले. हि करणीबाधा आहे कि भानामती. मला काहीही सुचले नाही. शेंडे देखील हतबल झाले. मग मला अचानक तुझं नाव आठवलं. या प्रकरणात तुला काही करता येईल कि नाही मला माहित नाही पण माझ्या ओळखीचं दुसर कोणीहि नाही ज्याची मदत घेऊन मी शेंडे साहेबांना आधार देऊ शकेल. तू इकडे येऊ शकलास तर खूपच मदत होईल. तुझा उत्तराची वाट पाहत आहे.
तुझाच,
हरिभाऊ
पत्र वाचून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिटून रॉबिनने पत्र परत पिशवीत ठेवले, हात हनुवटीवर ठेवून तो खिडकीबाहेर पाहत विचारात गढून गेला. अनाथालयातून ख्रिश्चन दाम्पत्याने दत्तक घेऊन रॉबिनला एका छानशा घरात आणले तिथेच रॉबिनचे बालपण गेले. लहान असताना आपल्या मानलेल्या वडिलांनी घरात हरिभाऊ आणी त्यांच्या मंडळी या गरीब जोडप्यास काही दिवस आसरा दिल्याचे त्याला आठवले. नंतर जवळच एका कंपनीत कारकून म्हणून हरिभाऊंना चिकटवले. नंतर काही वर्षांनी हरिभाऊ गावी निघून गेले. आई वडील गेल्यावर त्यांच्या अंत्यविधीसाठी हरिभाऊ धावत पळत आल्याचे त्याला आठवले. काही दिवसापूर्वीच रॉबिनला हरिभाऊंचे पत्र आले. पत्रातील मचकूर वाचून रॉबिन काही क्षण बुचकळ्यात पडला खरा कारण असले विचित्र प्रकरण रॉबिन काही हाताळत न्हवता. भुतेखेते वगेरे विचित्र प्रकार रॉबिनच्या पचनी पडत नसत, तरीही रॉबिन हरिभाऊंच्या शब्दाला मान देऊन आणि शेंडे कुटुंबियांना आधार म्हणून रॉबिनने हरिभाऊंना आपण येत असल्याचे पत्राने कळवले आणी म्हणूनच तो हरिभाऊंच्या गावाकडे रेल्वेने निघाला होता, खरंच हे भूतबंगला प्रकरण आहे नक्की काय प्रकार असावा? शेंडेंच्या घरातील घटना देखील विचित्र वाटत होत्या. रक्ताने लिहिलेला “मी आले आहे” असा मचकूर नक्की कोण आलीय असं भासवत असावा, कि घरातीलच कोणत्यातरी नोकराचे किंवा नातेवाईकाचे हे चाळे असतील ? रात्रीच्या अंधारात गावातील लोकांना बंगल्यात चित्रविचित्र आकार दिसत असावेत उगाचच भूत वगेरे म्हणून अफवा पसरवली असेल. काहीही असो या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला रॉबिन उत्सुक होता. तसेच जरासा विरंगुळा म्हणून गाव भटकून यावे असा रॉबिनचा मानस होता.
तासाभराने रेल्वे एका स्टेशनवर थांबली. रॉबिनने बाहेर पाहिलं तर त्याला इच्छित असलेल्या रेल्वे स्थानकावर रेल्वे उभारली होती. आपलं समान घेऊन रॉबिन डब्याच्या बाहेर पडला. फलाटावर उतरून इकडेतिकडे पाहू लागला. आजूबाजूला फळे आणी इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते ओरडत फिरत होते. थोडसं चालत जाऊन त्याने तिकीट खिडकीजवळ नजर टाकली तर एक वयस्क माणूस अंगात सदरा आणी खाली धोतर, खांद्यावर एक पंचा अशा वेशात हात डोळ्यावर ठेवून इकडे तिकडे पाहत उभा होता. रॉबिनने दुरूनच त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याने हरिभाऊंना ओळखलं त्यामुळे तो तिकडे गेला.
रॉबिनने जवळ गेल्यावर हरिभाऊंना मिठी मारली. हरिभाऊनी देखील रॉबिनला पाहून घट्ट मिठी मारली.
“ काय हरिभाऊ .. जसे होतात तसेच आहात अगदी, ओळखायला वेळ लागला नाही” मिठी सोडवत आपलं समान खांद्यावर घेत रॉबिन म्हणाला.
“ आता काय बदलणार मी बाबा.. पिकलं पान... तू मात्र खूप बदललास, चांगला हट्टाकट्टा आणी उंच झालायस” रॉबिनचे दंड चापचात दोन पडके दात असलेली बत्तीशी दाखवत हरिभाऊ म्हणाले.
गप्पा मारतच हरिभाऊ आणी रॉबिन रेल्वे स्थानकाबाहेर आले. बाजूला उभ्या असलेल्या टमटमला हात करून दोघेही आतमध्ये बसले, इतर प्रवासी आधीच बसल्याने गाडी तडक निघाली. रेल्वे स्थानकापासून हरिभाऊंच गाव जरा लांब होतं. रस्त्यातील कच्च्या रस्त्यामुळे गाडी वर खाली हेंदकळत होती. आजूबाजूची हिरवीगार झाडे पाहून रॉबिनला मस्त वाटत होतं, हवादेखील झुळूझुळू वाहत होती, वाहत्या हवेत रॉबिनने छाती भरून श्वास घेतला. बरेचसे खाचखळगे पार करून गावातून आतमध्ये शिरत टमटम एका कोपऱ्यावरच्या हॉटेलसमोर थांबली. रॉबिन आणी हरिभाऊ खाली उतरून चालू लागले. थोडं अंतर चालल्यानंतर काही वेळातच दोघेही हरिभाऊंच्या एका बैठ्या घरापुढे आले. आत
मध्ये येताच अंगणातच असलेल्या एका लाकडी बाजेवर रॉबिन विसावला. ते दोघेही आत आलेले पाहून हरिभाऊंच्या पत्नीने रॉबिनला पाणी दिले आणी त्याची विचारपूस केली. रॉबिनला पाहून दोन्ही दांपत्याला खूपच आनंद झालेला होता. एकतर बऱ्याच दिवसांनी ते त्याला पाहत होते. रॉबिन थकलेला असल्याने हात पाय धुवून लगेच जेवायला बसायला त्याला हरिभाऊंच्या पत्नीने सांगितले तसे दोघेही जेवायला बसले.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवण वगैरे उरकून अंगणात रॉबिन हात डोक्यामागे ठेऊन मस्तपैकी बाजेवर पडला आणी त्याच्याच बाजूच्याच एका लाडकी खुर्चीवर बसून हरिभाऊनी पानाच्या डब्यातून पाने काढली आणी छोट्याश्या पिशवीतून सुपारी काढून अडकित्त्याने सुपारी कातरू लागले.
“ जेवण मस्त झालं हरिभाऊ, मस्तपैकी झोपावं वाटतंय आता इथेच” पडल्या पडल्या रॉबिन म्हणाला.
“ झोप कि मग कोणी अडवलंय तुला” सुपारी कातरत कातरत खाली मान घालून हरिभाऊ खालच्या सुरात म्हणाले.
“ तत्पूर्वी तुम्ही मला इथे का बोलावलं याची इत्यंभूत माहिती घ्यावी म्हणतो” रॉबिन नाटकी आवाजात म्हणाला.
यावर हरिभाऊसुद्द्धा गालातल्या गालात हसले.
“ मग सांगा आता काय म्हणतायत तुमचे शेंडे साहेब आणी त्यांच्या मागे लागलेली भुते” एका अंगावर होतं एका हातावर डोकं टेकवत रॉबिन म्हणाला.
सुपारी कातरून झाल्यावर हरिभाऊंनी पानावर बोटानेच थोडासा चुना पसरवला, मग थोडी कात टाकली आणि कातरलेली सुपारी टाकून पानाची घडी घालून तोंडात कोंबली.थोडावेळ चावून झाल्यावर हरिभाऊंनी सांगायला सुरुवात केली. –
“ मी शेंडे साहेबांच्या घरी त्यांचा विश्वासू माणूस म्हणून कामाला आहे हे तुला तर माहित आहेच, त्यांच्या घरातली पडेल ती कामे करणे आणी त्यांच्या अनुपस्थितीत घरातला कारभार सांभाळणे हि माझ्यावर जबाबदारी आहे. घरात इतर नोकरही आहेत. प्रत्येक कामाला एक एक माणूस ठेवला आहे. शेंडे साहेबांचा कामाचा व्याप मोठा आहे. गावात बरीच बागायती शेती आहे, शहरात त्यांचे व्यवसाय देखील आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांचा खूप मोठ्या मोठ्या शेठ लोकांसोबत संपर्क येत असे. त्यापैकीच एक व्यापारी माणिकलाल मेहता होते. शहराला जाणाऱ्या मार्गावर स्वस्त मिळाली म्हणून एक चांगली जमीन त्यांनी विकत घेतली आणी त्यावर मस्त अलिशान बंगला बांधला निवांत कधीतरी सुट्टीच राहता यावे म्हणून, बंगला अजून बांधायचा बाकी होता तरीही मेहता शेठ आणी त्यांचे कुटुंबीय तेथे राहायला येत असतं. मेहता दाम्पत्याला एक मुलगी होती अवनी नावाची. ते तिघेही बंगल्यावर येत आणी राहून जात. मेहता पती पत्नीमध्ये बरेच वाद असायचे. शेंडे साहेबांनी सांगितलं होतं कि पती पत्नी सारखे संपतीवरून वाद घालत असत. मेहता साहेब मग वैतागून घरातच दारू प्यायला बसत. त्यादिवशी सुद्धा ते असेच घरात दारू पीत बसले होते. दुर्दैवाने किचनमध्ये काम करताना मेहतांच्या मुलीच्या साडीच्या पदराला चुकून आग लागली आणी मेहता शेठची मुलगी अवनी त्यातच जळून मृत्युमुखी पडली. घरात मेहता साहेब आणि अवनी दोघेच होते, त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. मेहता साहेब शुद्धीत नसल्याने त्यांना घडला प्रकार कळला नाही. पत्नी बाहेरून आल्यावर तिला किचन मध्ये काळीठिक्कर पडलेली पोरगी बघून पत्नीने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत उशीर झालेला होता. या घटनेस मेहतांच्या पत्नीने मेहतांचा बेजाबदारपणा असल्याचं सांगून त्यांच्यावर केस केली आणी मेहतांपासून काडीमोड घेतला. मेहता हे पूर्णपणे खचले आणी त्याचं कामातसुद्धा लक्ष लागेना. मुलीच्या मृत्यूला आपणच जबाबदार मानून त्यांनी हे घर विकून परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ बहिण सुद्धा त्यांना तिकडे न राहता आपल्या गावाकडे येण्यास सांगू लागले. त्यानुसार मेहतांनी अर्धवट बांधलेला तो बंगला शेंडे साहेबांना अल्पमूल्यात विकला आणी हा परिसर सोडून आपल्या गावी निघून गेले. नंतर शेंडे साहेबांनी तो बंगला संपूर्ण बांधायला घेतला. बंगल्याच्या आधीच्या रचनेत फेरबदल केले आणी बंगल्याची चांगली डागडुजी केली. २-३ नवीन खोल्या बांधल्या. कंपाऊंड बांधून घेतलं. समान वगैरे ठेवायला एक शेड बांधलं, अजून बऱ्याच गोष्टी बांधायच्या होत्या, पण इथपर्यंत सगळं ठीक होतं. बंगल्यात राहायला कोणीही गेलेलं न्हवत. हा थोडंफार बांधकामाच समान होतं तेवढच.
एकदा एक गावतील कष्टकरी मजूर संध्याकाळच्या वेळेस त्या बंगल्याच्या समोरील रस्त्याने येत असताना त्याला मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला तसं त्याने बंगल्यातील खिडकीत पाहिलं तर पूर्ण बंगला काळोखात बुडलेला दिसला. रस्त्यावर कोणीही न्हवत. तो जरासा घाबरला पण तिथून तसाच निघून आला. नंतर गावातीलच काही लोकांना रात्र पडण्याच्या सुमारास कोणीतरी चित्र विचित्र आवाज काढत असल्याचा आवाज आला. हे सगळं झाल्यावर याची गावभर चर्चाच झाली. बऱ्याच लोकांना तिथे असले प्रकार तिथे अनुभवायला मिळाले. पण नक्की काय भानगड आहे हे पाहायला बंगल्यात कोणीही पाउल ठेवयला तयार होईना. बंगल्याच्या आजूबाजूला झाडे झुडुपे आणी काही शेते देखील आहेत त्यामुळे रात्रीच्या सुमारास तिथे अजूनच भयाण शांतता पसरत असे. मी स्वतः देखील तसा अनुभव घेतला, एकदा शेतीच्या कामासाठी काही अवजारे आणण्यासाठी मी बंगल्यावर गेलो असता मुख्य दरवाजातून आत गेल्यावर मला खूप विचित्र शांततेचा आवाज आला. समान घेऊन बाहेर पडणार एवढ्यात मला आतल्या एका खोलीतून कोल्हेकुई सारखा विचित्र आवाज आला. मी एवढा घाबरलो कि मागे वळूनही पाहता पसार झालो. शेंडे साहेबांच्या या सगळ्या हकीकती कानावर आल्या. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं पण बंगल्यावर जाण्याचं धाडस त्यांच्यामधे होईना. दिवसा एकदा बाहेरूनच त्यांनी बंगल्यात डोकावून पाहिलं तर बंगल्याच्या भिंती पूर्ण खराब झालेल्या होत्या, समान इतस्त विखुरलेलं होतं. एवढचं काय तर आतमध्ये सगळीकडे मातीच माती झालेली दिसत होती. आत जाण्याचं धाडस काही त्यांना झालं नाही.
काही दिवसांनीच त्यांना त्यांच्या राहत्या घरात एका भिंतीवर “ मी आले आहे” असा रक्ताने लिहिलेला मचकूर दिसला आणी जोरदार चर्चांना उधाण आलं. त्या बंगल्यात जळून मेलेली मेहतांची मुलगी ‘अवनी’ हीच भूत बनून त्या बंगल्यात वावरत आहे अशी चर्चा सुरु झाली. आत मात्र कोणीही त्या बंगल्याच्या आसपास देखील फिरकेना. बंगला शेंडे यांनी विकत घेतलेला असल्याने अवनी भूत बनून त्यांना त्रास देतेय असं सगळे समजू लागले. नंतर काही दिवसांनी शेंडे साहेबांच्या राहत्या घरात कोणीतरी समान इकडेतिकडे फेकलेलं नजरेस पडलं आणी अवनी बंगल्यातून इकडे पण येते असा समाज सर्वांचा झाला. शेंडे कुटुंबीय तर हादरूनच गेले. त्यांनी घाबरून पटकन पुजारी बोलावून हवन आणी पूजा राहत्या घरात केली पण भीती हि त्यांची पाठ काही सोडेना. शेंडे साहेब आता एकटे कुठेही फिरत नाहीत. नेहमी त्यांच्या बरोबर कोणीतरी सोबतीला असतेच. बंगला विकायचा विचार देखील त्यांनी केला पण तो बंगला भूतबंगला आहे असा समाज सगळीकडे झाल्याने त्याला कवडीमोल किंमत मिळते. मुद्दाम कोणीतरी अफवा पसरवून बंगल्याची किंमत पाडायला बघतेय असं वाटून शेंडे साहेब अजूनच अस्वस्थ झालेत. त्यांचा तो अस्वस्थ चेहरा आणी जीवाची घालमेल मला पाहवेना म्हणून मी त्यांना विचारलं कि हा बंगला विकता येण्यासाठी मी काही कुठून मदत मिळते का ते पाहतो. म्हणून मग मी तुला बोलावलं कि हा नक्की भूतबंगल्याचा प्रकार आहे कि बंगल्याचे बाजारमूल्य घसरावे यासाठी केलेला बनाव.
एवढं बोलून हरिभाऊंनी पानाची पिंक बाजूला टाकली आणी पंचाने तोंड पुरू लागले. रॉबिनने शांतपणे हरिभाऊंच म्हणण ऐकून घेतलं आणी हात डोक्यामागे ठेवून पाठीवर आडवा झाला.
“ तुला काय वाटतंय एकंदर सगळ्या घटनांवरून” तोंड पुसत हरिभाऊ म्हणाले.
“ हम्म.. त्या भूतबंगल्यामध्ये नक्कीच कोणाचातरी इंटरेस्ट असला पाहिजे” रॉबिन बाजेवर आडवा होत बोलाला.
“ आणी त्या भूताबाद्द्ल काय वाटत?... चित्रविचित्र आवाज बंगल्यात येतात “ चेहऱ्यावर गंभीर भाव आणत हरिभाऊ म्हणले.
“ असू शकतील, काय सांगता येतंय” रॉबिन म्हणाला.
रॉबिनच्या या उत्तराने हरिभाऊ देखील चाट पडले.
“ म्हणजे तुझा देखील भुताखेतांवर विश्वास आहे तर” हरिभाऊ खुर्चीत सरळ बसत म्हणाले.
“ नाही.. मी असं कुठे म्हणालो कि भूतांवर विश्वास आहे म्हणून”
“ अच्छा मग विश्वास नाहीये तर “
“ मी असं देखील म्हणालो नाही कि विश्वास नाहीये” रॉबिन शांत स्वरात म्हणाला आणी पाठीवर पडून आकाशाकडे चांदण्या पाहून विचारमग्न झाला.
रॉबिनच्या या कोड्यात बोलण्याने हरिभाऊ वैतागले. त्यांना कळेना कि रॉबिनला नक्की काय म्हणायचं आहे. आपला पंचा खुर्चीच्या हातावर आपटून “ नक्की काय ते नीट सांगशील का ? असं हरिभाऊ म्हणाले.
त्यांचा तो वैतागलेला चेहरा पाहून रॉबिनला हसू आलं.
“ अहो हरिभाऊ तूर्तास काहीही बोलणं आतातायीपणच ठरेल, एवढचं सांगण्याचा हेतू होता माझा” रॉबिन म्हणाला.
“अस्स.... “ हरिभाऊ कपाळावर आठ्या आणत म्हणाले.
रॉबिनने परत सरळ होत एका अंगावर पडून हरिभाऊंकडे नजर केली आणी म्हणाला “ बर मला एक सांगा शेंडेच्या घरात कोण कोण राहतय?”
“ शेंडे साहेबांच्या घरात ते, त्यांची पत्नी, त्यांचा एक वाया गेलेला मुलगा आणि त्यांचा एक मेहुणा राहतो” हरिभाऊ आठ्ठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाले.
“ आत्तापर्यंत बंगला विकत घेण्यासाठी शेंडेकडे किती लोकं आले ? रॉबिनने विचारलं.
“ नाही.. माझ्या माहितीत अजून कोणी आलेलं नाही” हरिभाऊ उत्तरले.
“ घरातील नोकर मंडळी कशी आहेत “
“ सगळेजण शांतच आहेत, आपापली कामे करत असतात” हरिभाऊ म्हणाले.
“ हम्म बऱ... आपण उद्या शेंडे साहेबांच्या राहत्या घराकडे जाऊन त्यांची भेट घेऊयात, बघुयात तिथे काय परिस्थिती आहे” असं म्हणून रॉबिन परत विचारमग्न झाला.
“ ठीक आहे तसं करूयात. बऱ आता तू झोप शांत आपण उद्या सकाळी बोलूयात. आता रात्र पण झालीय आणी तू देखील दमला असशील” खुर्चीवरून उठत हरिभाऊ म्हणाले आणी आत घरात जाऊ लागले.
“ आणी हो हरिभाऊ ....” रॉबिनने हाक मारून हरिभाऊंना थांबवले तसे ते जागीच थांबून मागे पाहू लागले.
“मी एक गुप्तहेर आहे आणी इथे भूतबंगल्याचा तपास करायला आलोय हे तुम्ही आणी शेंडे साहेब सोडून इतर कोणाला सध्यातरी कळायला नकोय” रॉबिन मान वर करत बोलला.
“ ठीक आहे” मान डोलावून हरिभाऊ सावकाशपणे घराच्या आतमध्ये जायला वळाले.
क्रमशः
छान सुरुवात. पुढील भागाच्या
छान सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत
पुढचा भाग येऊ दे पटकन.
पुढचा भाग येऊ दे पटकन.
ते वर्तुळ वाले कुलकर्णी अजून माबोवर असतील तर त्यांना पण ही विनंती लागू होईल...
छान सुरुवात. पुढील भागाच्या
छान सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत