तुम्ही डोळस आहात? की आंधळे आहात?

Submitted by तुष्कीनागपुरी on 14 February, 2025 - 00:00

आज हा लेख वाचल्यावर तुम्ही कदाचित एका नव्या संकल्पनेला सामोरे जाणार आहात. मी ज्या विषयावर बोलतोय तशी स्थिती फक्त चार टक्के लोकांमधे आढळते असे सध्याचे उपलब्ध गणित आहे. ते गणित चुकीचे देखील असू शकते पण फार कमी लोकांमधे ही स्थिती आढळते इतके नक्कीच बरोबर धरता येईल. त्यामुळे असे गृहित धरुया की तुम्ही त्या छोट्या गटामधे मोडत नाही आणि त्यामुळे तुमच्यासाठी हा एक नवा विषय आहे.

नवे काही ऐकू आले किंवा वाचायला मिळाले की आपण नेहमीच साशंक असतो आणि ते बरोबर देखील आहे कारण आजकाल जुनाच माल नवा करून पुन्हा सादर करायचा धंदा सगळीकडे सुरू आहे. पण तरीही वाचून बघा तुम्हाला हे आधी माहित होते का ते.

नुकताच आमच्या मित्रमंडळींमधे झालेला एक संवाद ऐकवतो.

मी: मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मला इतक्यातच कळले की मला अफॅंटॅसिया आहे.
मित्र१: अफॅंट-काय?
मी: अफॅंटॅसिया, म्हणजेच मी माझ्या मनात कल्पना दृष्य स्वरूपात बघू शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो ना की कल्पना कर, डोळ्यासमोर चित्र आण, किंवा कल्पना करा की आपण जंगलात आहोत किंवा प्राणिसंग्रहालयात आहोत, तेव्हा जसे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहते, तसे माझ्या मनात माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहत नाही, अंधार असतो कशाचेच चित्र दिसत नाही, काळा पडदा असावा तसा अंधार असतो.
मित्र२: काय सांगतोस, म्हणजे जेव्हा तू पुस्तक वाचतोस तेव्हा ते प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर घडतांना तुला दिसत नाहीत?
मी: अगदी तेच, मला गोष्टीतले प्रसंग कळतात, मला भावना कळतात, संकल्पना कळतात, पण मला ते मनात दिसत नाहीत, कल्पनेत दिसत नाहीत. मी तथ्यांमधे, शब्दांमधे, भावनांमधे, संकल्पनांमधे विचार करतो, चित्रांमधे नाही.
मित्र१: हे विचित्रच वाटते आहे. सगळ्यांनाच मनात चित्र दिसते, नाही का? तू कदाचित काहीतरी चूक करतो आहेस लक्ष केंद्रीत केलेस आणि प्रयत्न केलास तर तुला पण चित्र दिसेलच. कदाचित तू आवश्यक तितका प्रयत्न करत नाहीयेस.
मी: मला पण आधी असे वाटले होते की मी काहीतरी चुकतोय किंवा निट करत नाहीये. पण या विषयावर अधिक वाचन केल्यावर आणि काही तपासण्या केल्यावर मला कळलेय की माझा मेंदू वेगळा आहे, ही एक मेंदूभिन्नता[२] आहे, कमतरता नाही.
मित्र२: म्हणजे जर तुला निळा रंग आठव किंवा प्रिय व्यक्तीचा चेहरा आठव म्हटले तर तुला डोळ्यांसमोर काही दिसत नाही का?
मी: नाही. मला निळा रंग ही संकल्पना ठाऊक आहे, मला प्रिय आणि ओळखीच्या लोकांचे चेहरे पाहिल्यावर ओळखता येतात पण आठवताना ते चित्रात्मक दिसत नाहीत. आठवणी या फक्त चित्रांत्मक नसतातच, आठवणी भावना, घटना, संवाद अश्या अनेक पदरी असतात माझ्यासाठी फक्त त्यात चित्रमय काही नसते.
मित्र२: मग तुला स्वप्न कशी पडतात?
मी: मला स्वप्न पडतात आणि बरेचदा आठवलेली स्वप्ने पाहता त्यात मला रंग आणि चित्रे देखिल दिसतात असा माझा अंदाज आहे. पण अफॅंटॅसिया असणारे सगळेच स्वप्नांमधे चित्रे पाहू शकतात असे नाही असे मी वाचलेय.
मित्र२: हे विचित्रच आहे, मला जाणिव नव्हती असे देखील असू शकते. चित्र दिसत नाहीत यावर विश्वास बसत नाहीये
मित्र१: हो विश्वास बसत नाहीये, हे तू काहीतरी आपल्याच मनाने तयार करून सांगतो आहेस असे वाटते आहे.
मी: मान्य आहे की हे वेगळे आहे. पण हे खरे आहे आणि माझी स्थिती असणारे बरेच लोक जगात आहेत. त्यावर सध्या अनेक जागांवर लिहिले आणि बोलले जातेय. मेंदूभिन्नता आणि या स्थितींबद्दल सध्या जागरूकता वाढवणे सुरू आहे आणि असे लोक जगात आहेत हे आपल्याला माहित असायला हवे. मला आशा आहे की तुम्ही माझ्या अनुभवांवर विश्वास ठेवाल.
मित्र२: मला विश्वास आहे तुझ्यावर. तसेही प्रत्येक व्यक्ती निराळा असतोच.
मित्र१: बरं गड्या, मला अजून या बद्दल अधिक वाचावे लागेल असे दिसते आहे, मला याबद्दल अजून सांगशील.
मी: धन्यवाद मित्रांनो मला ऐकून घेतल्याबद्दल मला माझा हा भाग तुम्हाला कळावा हीच माझी इच्छा होती.

या संवादातून तुम्हाला कल्पना आली असेल की जगात काही व्यक्ती अश्या असतात माझ्या सारख्या ज्यांना मनातला डोळा नसतो. म्हणजे चित्ररूप काही मनात आणता येत नाही. दिसत नाही. आठवणी सुद्धा चित्रमय नसतात तर शाब्दिक, घटनात्मक आणि भावनात्मक असतात.

मला वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षापर्यंत ही गोष्ट माहित नव्हती. आजुबाजुला बोलल्या जाणारे शब्द जसे कल्पना करा की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर आहात वगैरे बोलले गेले की मला वाटायचे की ही एक शाब्दिक क्रिया असते. शब्दशः आणि तत्थ्यात्मक तपशीलांच्या आधारावर मनात हे आणले जाते, तेव्हा मला हे ठाऊक नव्हते की इतर सगळे प्रत्यक्ष चित्र मनासमोर आणतात. ज्या दिवशी मला हे कळले की तसे नाही. आपल्याला मनातला डोळाच नाही, आपण मनात चित्र पाहू शकत नाही तेव्हा माझी विश्वसंकल्पना[१] अमुलाग्र बदलली.

आपण जगत असलेले शब्द आणि संकल्पना अश्या एका क्षणात जेव्हा बदलुन जातात तेव्हा आपण एकदम कोसळतो. असे वाटायला लागते की आता पर्यंत आपण जे काही जगलो ते खोटे होते, आपले आतापर्यंतचे आयुष्यच एक असत्य होते, आणि आपल्याला जे जग दिसते आहे (गम्मत आहे की हे शब्द पण माझ्या आयुष्यात शब्दच आहेत चित्र नाहीत हे मला आता माहिताय) ते तसे नाहीच. किंबहुना इतरांचा अनुभव याहून फारच वेगळा आहे तेव्हा तो धक्का पचवायला वेळ द्यावा लागतो.

एकदा तसा वेळ मिळाला आणि आपण सुरवातीच्या धक्यातून सावरलो की मग खरी शोधाशोध सुरू होते. हे काय आहे, असे अजून कुणी आहे का? सध्याच्या आंतरजालीय साधनांमुळे हे सोपे झाले आहे त्यामुळे आपल्यासारख्याच स्थितीत असणाऱ्या लोकांचे गट आणि लिखाण शोधता येते. त्यांचे अनुभव वाचून आपल्या अनुभवांशी पडताळता येतात. त्यातूनच आपल्या सारख्याच अवस्थेत असणारे लोक कसे जगतात, त्यांचे जगण्याचे शोधलेले कोणते ठोकताळे आहेत असे सगळे शोधून काढता येते आणि मग एक नवा जन्म सुरू होतो.

मी काय म्हणतोय हे अजूनही नक्की समजले नाही असे वाटत असेल तर मेंदूभिन्नतेची जागरूकता प्रसार करणारे अफॅंटॅसिया असलेल्या लोकांचे एक संकेत स्थळ आहे जिथे एक उपयुक्त पान आहे https://aphantasia.com/guide/ जे अधिक माहितीसाठी वाचता येईल.

जसे आधीच्या काळात डाव्या हाताने लिहिणाऱ्यांना छळले जायचे, ते चूक आहे किंवा पाप आहे इतके पण टोक गाठले जायचे पण आता आपण डावखोऱ्या लोकांना मेंदूभिन्नतेचा एक भाग समजून स्वीकारतो. तसेच अनेक न दिसणाऱ्या भिन्नता असतात हे पण आपण आता समजून घेतले पाहिजे. अशी भिन्नता एक दोष नसून फक्त भिन्नता म्हणजे जगण्याची एक वेगळी पद्धत तऱ्या इतकेच समजणे आवश्यक आहे.

मला ही गोष्ट कळल्यावर माझ्या आयुष्यातली कितीतरी कोडी सुटत गेली. जसे मला माईंड मॅप पद्धत कधी वापरता आली नाही, ते का हे मला समजले. आपली पाठ करायची आणि लक्षात ठेवायची पद्धत वेगळी आहे हे समजले. इतरांचे ठोकताळे किंवा पद्धती मला जश्याच्या तश्या वापरता का येत नाहीत हे समजले. आपल्या वेगळ्या पद्धती समजून घेता आल्या.

मला मनात चित्र दिसत नाहीत पण मी चित्रकार आहे, मी कवी आहे, मी कथाकार आहे त्यामुळे या भिन्नतेमुळे माझ्या कल्पनाशक्ती मधे काही कमतरता नाही. मी नव्या कल्पना नवे विचार मांडू शकतो आणि लिहू शकतो त्यात भिन्नता इतकीच आहे की ते मला चित्ररूप दिसत नाही तर शाब्दिक, भावनिक आणि सैद्धांतिक पातळीवर मांडता येते.

असेही काही लोक असतात ही माहिती सगळ्यांना असणे आवश्यक यासाठी आहे कारण तुमच्या घरात ओळखीत आणि आसपास असे काही व्यक्ती हमखास असू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवतांना हे समजून घेतले पाहिजे की काही विद्यार्थी चित्रांच्या आधारे का शिकू शकत नाहीयेत, त्यांना लिखित उतारे अधिक लवकर लक्षात येतात.

मला विडियो किंवा चित्रमय माध्यमांपेक्षा लिखित आणि शाब्दिक माध्यमांमधून माहिती अधिक पटकन आत्मसात करता येते. साधारण[३] सगळ्यांना चित्रमय पद्धतीने अधिक चांगले शिकता येते ही समज त्यामुळे तितकी बरोबर नाही हे माझी स्थिती समजली की लक्षात येते.

#सुरपाखरू

(अफॅंटेसिक)
तुषार
नागपूर, शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५

[१] विश्वसंकल्पना – वर्ल्ड व्ह्यू
[२] मेंदूभिन्नता - न्यूरोडायवर्जन्स
[३] साधारण – नॉर्मल, टिपिकल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आठवणी सुद्धा चित्रमय नसतात तर शाब्दिक>>

एक प्रश्न आहे,-
शब्द म्हणजे पण अक्षरांचं चित्रच असतं. मग लिखित शब्द कसे लक्षात राहतात / डोळ्यासमोर येतात ह्या condition मधे?

तसंच अगदी रोज भेटणारी व्यक्ती वेगळ्या ठिकाणी दिसली तरी मी ओळखत नाही त्या व्यक्तीला.>>>>

मलाही…

कधी कुठे जातो, आजुबाजुचे म्हणतात अरे ती/तो बघ टिवी/पिक्चरमधला अमुक तमुक… मला ओळखताच येत नाही, मी ओळखेपर्यंत ती व्यक्ती निघुन गेलेली असते Happy

त्यावरुन आठवले. मी लहान असताना आमच्याकडे नेहमीचा गॅसवाला, निळा डगला घालुन गॅस द्यायला यायचा. एकदा ट्युब बदलायची होती म्हणुन तो सिविल ड्रेस करुन दारात आला. तो दिसायला जरा कुरुप होता, काळा रंग वाकडे पुढे आलेले दात वगैरे… दार मीच उघडले आणि त्याला बघुन इतकी घाबरले की ओरडुन जोरात दार बंद करायला लागले. तो दरवाजा धरुन बाहेरुन ओरडतोय की बेबी मी आहे, मी आहे. आई धावत आली आणि त्याला बघुन म्हणाली अग गॅसवाले आहेत ते, येऊदे आत.. मी लांब जाऊन बघत बसले. तो रोजचा गॅसवाला आहे हे पटायला खुप वेळ लागला.

हे नवीन काहीतरी वाचलं. रोचक वाटलं.

तुम्ही म्हणालात की तुम्ही चित्रकार आहात. Memory Drawing काढता का ? जर डोळ्यासमोर काही उभेच रहात नाही मग चित्र नक्की कसं जमतं.अतिशय प्रामाणिक आणि भाबडा प्रश्न आहे .कुठलाही खोचकपणा किंवा उपहास नाही.
तुम्हाला दैनंदिन जीवनात काही practical problems येतात का ?

उगाचच अवांतर , CID सिरीयलमध्ये कधी कधी कोणी eye witness किंवा victims ना अशी काहीतरी वेगळी condition असायची.
एका eye witness ला संगीत ऐकून डोळ्यासमोर काहीतरी चित्र/प्रसंग उभे रहायचे.
Dr साळुंखेना अशा special conditions बद्दल इत्यंभूत माहिती असायची.

इंट्रेस्टींग लेख आहे. आवडला.
मलाही मल्टिमोडल मेमरी, एकुणएक स्पर्श, रस, गंध, सगळं लक्षात राहतं. चित्रकल्पनाही माझ्या बहुतेक 'लार्जर दॅन लाईफ' होऊन बसतात. कुणी घराची कल्पना कर म्हटलं तर पूर्ण गाव डोळ्यासमोर अक्षरशः वसतं. भावना सुद्धा चित्रासारख्या दिसतात. सगळी मेमरीच व्हिज्युअल आहे. हे येथे चित्रपटांवर लिहिल्याने लक्षात आले. क्वचित इतरांना वाटतेही मी जास्त करते पण ते माझे नॉर्मलच असते आणि मला तसेच दिसत असते. माझ्यासाठी ते अगदी खरंखरं वर्णन असतं. अर्थात ते लिहिल्यावर आणि इतरांचे वाचल्यावर / तुलना केल्यावर लक्षात यायला लागले.

ह्या मेंदूभिन्नतेबद्दल कल्पना नव्हती. प्रत्येकच मेंदू भिन्न असतो व काहींना आव्हानं जरा जास्त असतात असं लक्षात आलं आहे.
धन्यवाद ह्या लेखाबद्दल. Happy

अभिप्रायांसाठी अनेक धन्यवाद मंडळी. काही अभिप्रायांना सविस्तर उत्तरे द्यायची आहेत ती वेळ घेऊन एकानंतर एक लिहेन समजून घ्यावे.

मंडळी, तुमच्या शंकांना उत्तरे द्यायच्या आधी एक disclaimer आवश्यक आहे तो आधी लिहितोय. मी ज्या स्थितीबद्दल बोलतोय ती सध्या संशोधनाच्या आधीन आहे. याबाबत सर्व माहिती उपलब्ध नाही आणि निष्कर्श काढता येईल इतका data अजून उपलब्ध नाही, त्यामुळे ही माहिती सध्या फक्त माझे अनुभव याच श्रेणीत मानल्या जायला हवी.

मानसिक स्थितींच्या बाबतित comorbidities म्हणजेच अनुषंगाने येणारे अनेक अतिरिक्त गोष्टी पण सहभागी असतात त्यामुळे मला काही जमते किंवा जमत नाही यात फक्त अफॅंटॅसिया चाच हात आहे की मला चिकटलेल्या अजून कोणत्या स्थितीमुळे तसे आहे याचा निर्णय लावणे कधी कधी मला देखील सोपे होत नसावे आणि मी निष्कर्श काढले तर ते चुकू शकतात.

माझे अनुभव आणि मी जे निरिक्षण करतोय ते खरे असणार, पण ते कशाने होतेय हे निष्कर्श माझे मत समजावे आणि तो मी मांडत असलेला एक सिद्धांत समजल्या जाऊ नये.

> एक प्रश्न आहे,- शब्द म्हणजे पण अक्षरांचं चित्रच असतं. मग लिखित शब्द कसे लक्षात राहतात / डोळ्यासमोर येतात ह्या condition मधे?
@SharmilaR
मला चित्र दिसत नाही. अक्षराचं चित्र देखील दिसत नाही. मी जेव्हा शाब्दिक म्हटले तेव्हा मला factual, verbal, असे म्हणायचे होते, घटनात्मक, संकल्पनात्मक आणि भावनात्मक नोंदी मला आठवतात आणि त्या चित्रात नव्हे तर घटना म्हणून तत्थे म्हणून आठवतात.
डोळ्यासमोर येणे हा शब्दप्रयोग माझ्यासाठी नाही. माझ्या डोळ्यासमोर काही येत नाही, काळा अंधारा पडदा असतो. अगदी धुसर आकृती पण नसते.
एक मात्र खरे आहे की मला भौगोलिक रस्ते आणि त्यांचे संबंध लक्षात राहतात. मी घरी येतांना रस्ता चुकत नाही. मला पुढचा चौक कोणता हे आठवते, ते मला एक तत्थ म्हणून माहित असते. एक वेगळ्या कारणाने मला कामचलाऊ स्मृती[१] निट वापरता येत नाही त्यामुळे मला स्मृतीमहाल सारख्या पद्धतींचा वापर करून माहिती लक्षात ठेवावी लागते जी मी आता गरज असेल तिथे वापरतो. पण तो अफॅंटॅसिया चा प्रभाव नसावा.

@साधना,
मला लोकांचे फोटो पाहून ते ओळखू येतात. मला पाहून चित्रे काढता येतात, किंबहुना मी हौशीने फोटो पाहून चेहऱ्यांचे रेखाचित्रे काढली आहेत. ती मला का काढाविशी वाटली त्याचे कारण चित्र मनात उरत नसल्याने हे मी आधी नमूद केलेले आहेच.

@अस्मिता
ते पोलिस तपासात गुन्हेगाराचे चित्र काढणाऱ्या व्यक्तीला पाहून मला सदैव त्रास झालाय कारण हे कसे शक्य आहे हे मला कळतच नसायचे. आता मला कळते की लोकांना चक्क चित्र दिसते ती। व्यक्ती नसतानाही चित्र दिसते, आणि कादंबरी वर्णन वाचून चेहरे कल्पनेत डोळ्यासमोर आणता येतात.

प्रियकर आपल्या प्रेयसीचा चेहरा आठवून काढतो ही घटना पण मला अशी यातना द्यायची. मी चित्रकार असल्याने आपल्या प्रेयसी चे चित्र काढणे इतरांना जमते तर आपल्याला जमेलच असे वाटायचे पण कसले काय काहीच दिसायचे नाही त्यामुळे स्वतःवरचा विश्वास तुटायला लागलेला. आपल्यात काही फॅक्टरी मेड डिफेक्ट आहे असेही बरेचदा वाटायचे. नंतर उलगडले की तुमच्या कडे असते ते आमच्याकडे नाही हो.

[१] वर्किंग मेमरी

मला असं विचारायचं होतं, की अक्षर लक्षात कशी रहातात.
अर्थात हे सगळं explain करणं सोपं नसावं, आणि डोळ्यासमोर काहीच नं येणं ही समजून घेणं मला अवघड वाटत असावं.

> अक्षरं लक्षात कशी राहतात
अक्षरंच नाही चेहरे देखील ओळखता येतात मला, pattern recognition मधे मला काही अडचणी येत नाहीत मेंदूमधे ते करायचा विभाग चित्रांवरती पूर्णतः अवलंबून नाही हे यातून कळते.
मला नकाशे आणि रस्त्तांचे चित्र काढून दाखवता येते. नकाशातले कोणते गाव कुठे ते पण लक्षात ठेवता येते आणि पुन्हा दाखवता येते.
चित्र पुन्हा पाहिले की ते काय हे ज्ञान असतेच, फक्त ते डोळ्यासमोर नसताना समोर आणता येत नाही, दृष्टीचा पुनरानुभव घेता येत नाही

अक्षरंच नाही चेहरे देखील ओळखता येतात मला, pattern recognition मधे मला काही अडचणी येत नाहीत मेंदूमधे ते करायचा विभाग चित्रांवरती पूर्णतः अवलंबून नाही हे यातून कळते.>> धन्यवाद.

मी ज्या स्थितीबद्दल बोलतोय ती सध्या संशोधनाच्या आधीन आहे.>>> बरोबर पहिल्यांदा तुमचा लेख वाचलेला तेव्हा थोड धुंडाळल्यावर कळलं की अगदी अलीकडेच म्हणजे २०१५ मधे अफॅंटॅसिया ही टर्म पहील्यांदा कॉईन्ड झाली..... it's pretty new concept, considering our so far knowledge about how our brain learn,, process, store and recall information.

मला अ‍ॅफँटसिआ आहे हे आत्ताच हे वाचुन कळले. ..... +१.
आधी फारसे कधी जाणवले नाही.पण 2 वर्षांपूर्वी ध्यानासाठी(फारच मोठा शब्द आहे) बसल्यावर ज्या सूचना देत असत त्या डोळ्यांसमोर अजिबात येत नव्हत्या. उदा.कल्पना करा की तुम्ही एक शिडी उतरत आहात/तुम्ही समुद्राकाठी आहात,पाणी तुमच्या पायाला स्पर्श करत आहे इत्यादी इत्यादी.
शेवटी मी ध्यानाचा प्रयत्न सोडला.

हा लेख वाचला त्यावेळी कळले की मीही या गटात आहे.

लेखावरचा प्रतिसाद दिल्यावर इथे आलेले प्रतिसाद वाचले. इंटरेस्टिंग आहेत.
मला जे जाणवतं ते अनेकांना वाटतं ही भावना सुखावणारी आहे.
मलाही क्राईम पॅट्रोल बघताना चेहरा ओळखता येईल का ही शंका असते. तसेच स्केच आर्टिस्टला वर्णन करून सांग म्हणाले तर जमेल का हा प्रश्न पडतो.

युनिफॉर्म मधला माणूस साध्या कपड्यात समोर आला तर मलाही ओळखता येत नाही.
इतकेच नाही तर एखादी व्यक्ती एकाच ठिकाणी भेटत असेल आणि ती अचानक दुसरीकडे भेटली तर संदर्भ लागायला वेळ लागतो.
स्वप्नं मात्र तपशिलासहीत पडतात . स्वप्नात अगदी क्लोज अप्स दिसतात. पण संपूर्ण स्वप्नं विसरून जातं आणि त्यातले हायलाईट्स तेव्हढे लक्षात राहतात.

जागेपणी पण स्वप्नं पडतात. कदाचित त्याला स्वप्नं म्हणता येणार नाही. त्यासाठी घडून गेलेली घटना, वाचनात आलेलं काही असे इनपुटस असतीलच असंही काही नाही. जे दिसतं ते खरं खुरं दिसतं. ते मात्र लक्षात राहतं.

interesting आहे हे

इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

मला मल्टीमोडल मेमरी आहे तर. मला दृश्यं, चवी, पोत, ध्वनी, गंध हे सगळं आठवतं.>>+१ meditative state मधे मला मनाच्या अवकाशात रंग गंध स्वर स्पर्श अनुभवता येतात. काही वेळा मनात संतूर ते बासरी सगळ्या वाद्यांचा सुरेल ऑर्केस्ट्रा मनाच्या कानाने अनुभवलाय अगदी एखाद्या ठिकाणी इतर अनेक जणांसोबतीने मेडीटेशन करतानाही असा अनुभव घेतला आहे आणि जो बाजूला बसलेल्या सह साधकांना नव्हता आला. (त्यांना काही वेगळे अनुभव आलेच अर्थात) (याचे लोजिक विचारु नका. मनाचे भ्रम म्हणून सोडा हवेतर. मी हे का व कसे घडले असेल किंवा तत्सम विचार फुंकून टाकले आहेत. आता कार्यकारण भावाशी देणेघेणे नाही. स्वत:पुरता अनुभव घ्या आणि स्वत:शी स्वत:च्या अनुभवाशी प्रामाणिक रहा बाकी सोडून द्या असे सध्या माझ्यापुरते ठरवले आहे. सोमीवर असे काही लिहून सांगायचाही हा कदाचित पहिलाच अटेंप्ट असेल. एरव्ही न लिहीणेच प्रेफर करते कारण वैयक्तिक अनुभव हे त्या व्यक्तीपुरतेच खरे खोटे असतात.)

Pages